शशी कपूर----एक अभिनेता म्हणून हे नाव कधी मला लक्ष द्यावसं वाटलच नव्हतं. लहानपणी कधीतरी टीवी वर ना ना करते प्यार तुम्हिसे कर बैठे म्हणणारा एक छान चॉकलेट हीरो म्हणून इतकीच यांची ओळख. जास्तीत जास्तं दीवार, त्रिशूल मधे अमिताभचा भाऊ किंवा मित्र म्हणून. बस, त्यापुढे या शशी कपूर या हिरोची ची ओळख असली तरीही शशी कपूर ह्या अभिनेत्याची कधीच ओळख नव्हती.
काही दिवसांपूर्वी एक झालं की एक गोड गाणं ऐकायला मिळालं. हे गाणं कशातलं असेल म्हणून शोधत होते तर एक फार छान चित्रपट हाती लागला. हा चित्रपट होता जुनून. दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि निर्माता शशी कपूर.
ह्या चित्रपटाची जी पार्श्वभूमी आहे तो काळ आहे अठराशे सत्तावन च्या स्वातंत्र्ययुद्धाचा. देशभर इंग्रजी सत्तेविरुद्धचा असंतोष पराकोटीला पोहोचलेला. मंगल पांडेनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाचा झेंडा उभारला होता. त्याला दिलेल्या फाशीने संपूर्ण सैन्य बिथरले होते. दिल्ली, मेरठ, रामपुर, कानपुर येथे सैनिकांचे सशस्त्र उठाव सुरू झाले होते. इंग्रजी सत्तेला आता उलथवून टाकायचेच असा निश्चय करून ठिकठीकाणून सैनिकांच्या तुकड्या एकत्र येत होत्या. अतिशय स्फोटक वातावरण निर्माण झालेले होते.
अशा पार्श्वभूमीवर ही कहाणी फिरते ती जावेद खान या नवाब आणि त्याच्या परिवाराभावती. स्वत: जावेद त्याची बायको फिर्दौस, त्याची चाची, तिचा मुलगा आणि सून. लखनौ मधे राहणारा हा परिवार. जावेद खान चा एक भाऊ सरफराझ खान हा अतिशय कडवा पठाण आहे. हा इंग्रजांविरुद्ध हिरीरीने लढत असतो. मात्र जावेद खान ला या लढाईशी काहीही देणंघेणं नाही. तो तसा आपल्या कुटुंबात आणि पाळलेली कबूतरे उडवण्यात खुश असतो. गावातच एक इंग्रज कुटुंब असतं. या कुटुंबात नवरा, बायको मिरियम त्यांची तरुण मुलगी रुथ आणि आजी असे सदस्य आहेत.
आता जावेदखां हा ह्या रुथ च्या प्रेमात पडलाय. प्रेम म्हणजे खरंतर त्याच्या या प्रेमाला अब्सेशन...जुनून हे अधिक योग्य शब्द आहेत.
एक दिवस या शहरात सुद्धा उठाव होतो. चर्च च्या प्रार्थनेच्यावेळी हिंदूस्थानी सैनिकांची एक सशस्त्र तुकडी हल्ला करते आणि तिथल्या सर्व लोकांची कत्तल करते. रुथ चे वडील सुद्धा या हल्ल्यात मारले जातात.या सगळ्या गदारोळात मरिअम, रुथ आणि आजी हे कसेबसे निसटतात. त्यांना एक हिंदू व्यापारी आसरा देतो. अशा भयानक वातावरणात खरंतर या इंग्रजांना स्वत:च्या घरी ठेवून घेणे म्हणजे मृत्युलाच आमंत्रण. पण तो भला सावकार मात्र या कुटुंबाला ठेवून घेतो.
इथे जावेद खान ला सुगावा लागतो तो की रुथ या कुटुंबाकडे कडे आहे. हा माणूस या रुथच्या प्रेमात पार वेडा झालेला असतो त्यामुळे तो त्या सावकाराच्या अनुपस्थितीत त्याच्या घरात घुसतो आणि रुथ आणि तिच्या आईला ज़बरदस्तीने आपल्या घरी घेऊन येतो. आता या स्त्रिया घरी आल्यावर जावेद ची बेगम साहजिकच विरोध करते. पण तिच्या विरोधाला कोण जुमानणार? जावेद साहेब तर जाहीर करून टाकतात की मी या रुथ शी निकाह लावणार म्हणजे लावणारच.
रुथ अतिशय भेदरलेली आहे. तिने आपल्या जन्मदात्याचा खून होतांना आपल्या डोळ्यांनी बघितले असते. इथे जावेद च्या घरी कसेबसे जीव मुठीत घेऊन ही मुलगी राहात असते. संपूर्ण चित्रपटात एक दोन शब्द सोडले तर तिच्या तोंडून शब्दच फुटत नाही. हिची आई मात्र अतिशय धीराची बाई असते. आपल्या लेकीच्या पुढे ही आई अक्षरश: ढाल बनून सतत वावरत असते. ही बाई जावेद पुढे एक अट ठेवते. खरंतर अटी वगैरे टाकणे तिला परवडणारं नसतंच. परिस्थिती अशी असते की मनात आले तर जावेद कधीही हिचं डोकं उडवून तिच्या मुलीशी जबरदस्तीने निकाह लावू शकला असता. पण तरीही हि जोखीम बाई उचलते आणि यशस्वी सुद्धा होते.
कलाकारांविषयी काय बोलणार? हिंदी / इंग्रजी रंगभूमी वरचे एक से एक दिग्गज इथे वेगवेगळ्या भूमिकेत ज़बरदस्त काम करून जातात. मग ती भूमिका अगदी एका मिनिटाची का होईना त्यात पर्ल पदमसी असो की सवीता बजाज असो. सहायक भूमिकांमधे लक्षवेधक आहे कुलाभूषण खरबंदा. त्या सावकाराच्या पात्राला ते एक प्रकारचा भारदस्तपणा, खरेपणा देतात. बाकी भूमिकांमधे बेंजामीन गिलानी, दीप्ती नवल, जलाल आगा ही गुणी मंडळी छान प्रामाणिक पणे आपापले काम करतात.
आता मुख्य कलाकार. नसिरुद्दीन शहा कडव्या सरफराझ खान च्या भूमिकेत. इंग्राजंबद्दलचा तिरस्कार, त्यांच्या विरुद्ध लढण्याची ईर्शा. याचबरोबर जावेद खान सारखे आप्तजन देशासाठी लढायचे सोडून कबूतरबाजी मधे रमलेले बघून होणारी चिडचिड. शेवटी एक एक लढाई हरतांना येणारि हताशा, त्रागा सर्व भावना त्याने पडद्यावर जिवंत उभ्या केल्या आहेत.
सुषमा सेठ--अत्यंत ताकदीची ही अभिनेत्री. जावेदची चाची, जावेद आणि त्याच्या बायकोच्या वाद- भांडणात आपलेपणाने मध्यस्थी करणारी कुटुंबातील प्रमुख. आपल्या सुनेचे पोटच्या मुलीसारखे लाड करणारी प्रेमळ सासू अशी अनेक रूपं ह्यांनी फार समर्थपणे सादर केली आहेत. भाषेची खास लखनवी नझाकत, चालण्या-बोलण्यातला नवाबी तोरा सगळं मस्तं आणि सहज.
शबाना आझमी--- यांनी फिरदौस ची भूमिका अफाट जीव तोडून केली आहे. तोंडाने जराशी फटकळ पण मनाने साधी. स्वत:ला मूल नाही हे दु:ख आहेच त्यात नवरा कायम तुसड्यासारखा वागतोय. हे सगळं कमीच आहे की काय म्हणून नवर्याचं हे एकतर्फी प्रेमप्रकरण आहेच जोडीला. या सर्व गोष्टींमुळे झालेला त्रागा, मनस्ताप तिच्या देहबोलितून, डोळ्यातून आणि शाब्दिक फटकार्यातून थेट आपल्यापर्यंत पोहोचतो.
नाफिसा अली---अप्रतिम सौंदर्य, निरागस चेहरा, भेदरलेले डोळे आणि दोन चार डायलॉग्स इतकीच या भूमिकेची मागणी होती ती नाफिसा अली ने दोनशे टक्के पूर्ण केलेली आहे.
शशी कपूर----एक अभिनेता म्हणून माझ्या मते जरा बर्यापैकी मर्यादित कौशल्य असलेला हा माणूस स्वत: निर्माता असलेल्या चित्रपटांमधे अप्रतिम अभिनय करून जातो. ही जादू स्वत:च्या चित्रपटामधे काम केले म्हणून आलेल्या जबाबदारीच्या जाणिवेतून झाली असते का उत्तम दिग्दर्शकाबरोबर काम केल्याचा परिणाम. कारण काहीही असो पण हे मात्र आहे खरं. कुठे सुहाग आणि नमक हलाल मधील शशी कपूर आणि कुठे जुनून, कलयुग आणि विजेता मधील शशी कपूर, काही तुलनाच नाही.
इथे जावेद खानची नवाबी ऐट, कबुतरे पाळण्यात आणि उडवण्यात मश्गूल असलेला बेफिकीरपणा. स्वत:च्या बायकोशी नेहमी तिरसट पणे बोलणे. रुथविषयी वाटणारं पराकोटीचं आकर्षण. हे आकर्षण इतकं आहे की हा माणूस स्वत:ची बायको समोर असतांना बेधडक पणे सगळ्यांना सांगतो की मला ही मुलगी रुथ आवडते आणि मी हिच्याशी लग्न करणार आहे. हे वेड, बेदरकारपणा आणि बायकोच्या मनाची किंचित सुद्धा फिकीर न करण्याची वृत्ती. जावेद खान हे पात्र शशी कपूरने अतिशय मन लावून, जीव ओतून उभं केलं आहे.
लास्ट बट नॉट द लीस्ट.....जेनिफर केंडाल. पडद्यावरची मॅडम मरिअम लॅबडॉर आणि प्रत्यक्षातली सौ. शशी कपूर.
नवरा गमावलेली कसबसा आपला आणि आपल्या मुलीचा जीव वाचवून जावेद खान च्या आश्रयाला आलेली ही स्त्री. बरं हा आसरा पण कसा? की गायीने कसायाकडे आश्रय मागावा असा. कधी कोणाची गैरमर्जी होईल आणि आपला जीव जाईल याची शाश्वती नाही अशा परिस्थितीत ही स्त्री भक्कमपणे परिस्थितीला तोंड देते.
या भूमिकेचे अनेक पैलू आहेत. जिवाच्या भितीनी पार भेदरुन गेलेली. पण अशा प्रतिकूल परिस्थितही स्वत:ची अस्मिता, स्वाभिमान आणि डिग्निटि सांभाळून राहणारी मरिअम.
वरवर राकट दिसणारा जावेद खान आपल्या मुलीच्या प्रेमात पार बुडून गेलाय आणि तो दिसतो तितका काही धोकादायक नाहीये हे एकदा लक्षात आल्यावर मग मात्र त्याच्यापुढे ठामपणे उभी ठाकणारी बाई जेनिफर केंडल यांनी फार छान उभी केली आहे.
कुठेही भारंभार संवाद नाहीत पण चेहरा आणि देहबोली सगळं काही बोलून जाते. आधी जिवाच्या भयाने थरथर कापणारी पण जरा बाजी आपल्या हातात आली आहे हे लक्षात आल्यावर तिच्या चेहर्यावरील हावभावात, आवाजात आलेली एक किंचित जरब. अगदी लक्षात येईल न येईल असा सटल हा फरक या गुणी अभिनेत्रिने इतका अप्रतिम दाखविला आहे की त्याला तोड नाही.
वनराज भाटिया यांचे संगीत आहे. गाणी फारशी नाहीच आहेत. एक अप्रतिम गाणं आहे आशा भोसले यांनी गायलेलं ' सावन की आई बाहर रे'. अगदि एका कडव्याचं पण अतीगोड गाणं आहे हे.
https://www.youtube.com/watch?v=dLM-9Ds1MtY
बघायलाच हवा असं दिसतंय.
बघायलाच हवा असं दिसतंय.
छान आहे लेख. चित्रपट शोधुन
छान आहे लेख. चित्रपट शोधुन बघते. नफिसा अली एका कलिगची फार जवळची नातेवाईक आहे.
सुंदर परीचय! हा चित्रपट मी
सुंदर परीचय! हा चित्रपट मी हायस्कूलमधे असताना बघितला होता. खूप आवडला होता.
सुरेख लिहिलंय. खूप खूप खूप
सुरेख लिहिलंय. खूप खूप खूप वर्षांपूर्वी पाहिला होता. आता आठवत नाही. पुन्हा पहायला हवा.
हा चित्रपट मी दुरदर्शनवर
हा चित्रपट मी दुरदर्शनवर पाहिलेला. त्यातले इश्कने तोडी... हे गाणे लक्षात होते. त्या गाण्यासाठी शोधाशोध करुन हल्लीच युट्युबवर पाहिला हा चित्रपट. खुप कापाकापी केल्यामुळे हाती फारसे काही लागले नाही. नासीरची व्यक्तीरेखा तर आठवलीच नाही पटकन.
कामे सगळ्यांचीच खुप छान झाली. जेनीफरचे काम सगळ्यात सुंदर आहे. मुलीची राखण करणारी आई तिने अतिशय छान उभी केलीय.
घिर आयी काली घटा हे आशाबरोबर वर्षानेही गायलेय.
पण माझ्या मते चित्रपटातले जास्त उठावदार गाणे रफीचे "इश्कने तोडी सरपे कयामत" हे आहे.
~~अभिनेता म्हणून माझ्या मते
~~अभिनेता म्हणून माझ्या मते जरा बर्यापैकी मर्यादित कौशल्य असलेला हा माणूस ~~
तुम्ही उत्सव, हिफाजत, न्यू दिल्ही टाइम्स वगैरे चित्रपटांबद्दल ऐकले किंवा वाचले नाहिये का?
जूनून माझा अतिशय आवडता चित्रपट. हा पाहिल्यावर आवर्जून त्या लेखिकेच्या कादंबर्या वाचल्या. तुम्हालाही चित्रपट आवडला वाचून छान वाटलं. पण हा चित्रपट विस्मरणात वगैरे नाही हो गेलेला
Varada, kalyug too.
Varada, kalyug too.
वरदा, तुम्ही दिलेल्या लिस्ट
वरदा,
तुम्ही दिलेल्या लिस्ट मधील पण उत्सव, न्यु देहल्ली टाईम्स हे पण शशी कपूरनेच निर्मीत केलेले होते. मूळ लेखात ही हेच म्हण्टले आहे >>शशी कपूर----एक अभिनेता म्हणून माझ्या मते जरा बर्यापैकी मर्यादित कौशल्य असलेला हा माणूस स्वत: निर्माता असलेल्या चित्रपटांमधे अप्रतिम अभिनय करून जातो<< जे अगदी खरे आहे. विजेता मधील बाप आणि कलयुग मधील करण विलक्षण ताकतीने उभा केला आहे त्याने.
जुनून - फार विरळा बनलेल्या
जुनून - फार विरळा बनलेल्या उत्तम सिनेमांपैकी एक .....
उत्तम परीक्षण ...
मी हा सिनेमा पाहिला आहे पण
मी हा सिनेमा पाहिला आहे पण मला कळलाच नाही.
चिनूक्स, कलयुग चा उल्लेख
चिनूक्स, कलयुग चा उल्लेख लेखात आलाय म्हणून नाही केला
शशी कपूर----एक अभिनेता म्हणून
शशी कपूर----एक अभिनेता म्हणून माझ्या मते जरा बर्यापैकी मर्यादित कौशल्य असलेला हा माणूस स्वत: निर्माता असलेल्या चित्रपटांमधे अप्रतिम अभिनय करून जातो
हे वाक्य असेही वाचता येईल ना - शशी कपुर - व्यावसायिक चित्रपटांमध्ये अभिनयकौशल्य दाखवण्याची संधी न मिळालेला एक उत्तम नट. स्वत:च्या निर्मितीमध्ये त्याने त्याचे कौशल्य दाखवुन दिले.
कशाला असे वाचायचं!! वरदा
कशाला असे वाचायचं!! वरदा म्हणिंग राईट.
'मेरे पास माँ है' म्हणल तर कोण आठवतो? भक्त पुंडलिक??
फोनवरून रीफ्रेश मारताना डबल
फोनवरून रीफ्रेश मारताना डबल पोस्ट पडली.
पण शशी कपूर प्रथमपासूनच उत्तम भूमिकांच्या मागे होता. एकीकडे बॉलीवुड मधे जम बसवताना त्याने householder, shakespearewallah इ. चित्रपट केलेच की. तत्कालीन हिंदी सिनेमात त्याला तितक्या ताकदीच्या भूमिका मिळालेल्या दिसत नाहीत. शिवाय हिंदी सिनेमात कामं करून त्याला पृथ्वी थिएटर ची चूल पेटती ठेवायची होती त्यामुळे पैसे कमावण्यासाठी त्याने जमतील तितके सिनेमे केले हे विदित आहेच
छान लिहिलंय. लहानपणी टीव्हीवर
छान लिहिलंय.
लहानपणी टीव्हीवर बघितला. आवडला होता.
शशी कपूर आणि नफिसा अलीची शेवटची नजरा-नजर अजूनही आठवते. तो माझा सर्वात आवडता शॉट.
सत्यकथा. त्या रुथने जावेदच्या आठवणीतच पूर्ण आयुष्य काढलं. बऱ्याच वर्षांनी ती इंग्लंडमध्ये अविवाहित देवाघरी गेली. असं चित्रपटाच्या शेवटी सांगितलं.
शशी कपूर आणि नफिसा जास्त आवडले मला. अभिनय सर्वांचाच उत्तम होता.
राजकपूर म्हणजे भोळा
राजकपूर म्हणजे भोळा राजू...शम्मीकपूर म्हणजे दंगाधुडगूस....तर शशीकपूर म्हणजे सज्जन शालीनपणाचे उदाहरण. अशा काहीशा या तीन बंधूंच्या प्रतिमा सिनेरसिकाच्या मनी उमटल्या होत्या. प्रेम तर सर्वांवरच केले आपल्या प्रेक्षकांनी. पण या तिघांतील शशीकपूरने व्हिलन धर्तीच्या ज्या काही दोनचार भूमिका केल्या तिथेही तो पूर्ण खलनायक अशा व्याख्येत बसणार्या रुपात पडद्यावर आलेला नाही. "जुनून" मध्ये एका इंग्लिश मुलीवर लुब्ध झालेला जावेद तिच्या प्राप्तीसाठी स्वतःच्या बायकोच्या कौटुंबिक स्थितीकडे पाठ फिरवितो तर इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढा देत असलेल्या भावाच्या आणि त्याच्या साथीदारांच्या प्रयत्नांना साथ न देता कबुतरबाजीत मश्गुल होऊन जाणे त्याला महत्त्वाचे वाटते. शशीकपूरचे जावेद हे पात्र त्या काळातील समाजरचनेतील युवकांच्या एका गटाचे प्रतिनिधीत्व करत आहे. "बाहर हो मातम, मेरी मोहोर मोहरम..." अशा तत्त्वज्ञानाला गोंजारत बसत त्या गोर्या कातडीच्या परीची आराधना (बळजबरी करीत नाही तो कधीच...संताप व्यक्त करतानासुद्धा) करणे त्याला ब्रिटिश विरोध बंडापेक्षाही महत्त्वाचे वाटते. भावाच्या आणि अन्यांच्या नजरेत ही एक प्रकारची त्याची खलनायकीच होय. पण म्हणून तो रुढार्थाने तसा नाही हे श्याम बेनेगल यानी आपल्या दिग्दर्शन कौशल्याने जुनून मध्ये दाखविले आहे.
पद्मावति यानी सार्यांच कलाकारांच्या अभिनयकौशल्याला दाद दिली आहे ती मला वाटते अगदी योग्यच होय. नफिसा अलीने या चित्रपटानंतर मायानगरीला नमस्कार केला होता. त्यानंतर मी त्याना पाहिले ते "लाईफ इन मेट्रो" मध्ये.
शशीकपूर यांच्या अभिनयक्षमतेबद्दल वरील प्रतिसादांतून मते वाचायला मिळाली. एक गुलछबू, हसरा आणि खाओ-पिओ-जिओ धतीच्या भूमिका त्याच्या वाट्याला आल्या असल्या तरी चाळीशीनंतर त्याने ज्या गंभीरतेने आपल्या कारकिर्दीकडे पाहिले (निर्माता या अर्थानेसुद्धा) ते त्याच्या परिपक्वतेचे लक्षण मानले जावे. उदा. "न्यू देल्ही टाईम्स" मधील त्याची भूमिका.....(राजकीय पटलावरील विषयाचा हा चित्रपट किती लोकांना पूर्णपणे कळाला असेल...विशेषतः शेवट...या देखील एक औत्सुक्याचा विषय ठरू शकेल. पद्मावति यानी पाहिला नसेल तर जरूर पाहावा....शशीकपूरविषयी त्यांचे मत बदलेल.)
सत्यकथा. त्या रुथने जावेदच्या
सत्यकथा. त्या रुथने जावेदच्या आठवणीतच पूर्ण आयुष्य काढलं. बऱ्याच वर्षांनी ती इंग्लंडमध्ये अविवाहित देवाघरी गेली. असं चित्रपटाच्या शेवटी सांगितलं. >>>> हे माहित नव्हते, नव्यानेच कळले ... धन्यवाद अंजूताई ..
मस्त परिक्षण!
मस्त परिक्षण!
माझा अगदी आवडता चित्रपट. अगदी
माझा अगदी आवडता चित्रपट. अगदी संवादासकट लक्षात आहे.
( सबकुछ करे है पर हाथ नाही धोवै है, कागज से पोछे है... रुथ धिस शाल नॉट हेपन अगेन वगैरे... )
सावन कि आयी बहार रे, हे गाणेही सुंदर. चित्रपटात ते वर्षा भोसले च्या आवाजात होते. रेकॉर्ड आशाच्या आवाजात होती.
नफिसा अलि, एका चित्रपटात अमिताभची पत्नी च्या रोलमधे पण होती ना ?
जुनून सुरेख सिनेमा. रस्किन
जुनून सुरेख सिनेमा. रस्किन बॉन्डच्या अ फ्लाईट ऑफ पिजन्स या दीर्घकथेवर आधारित हा सिनेमा आहे. संहितेशी प्रामाणिक राहून बनवलेला सिनेमा. पं. सत्यदेव दुबेंनी याचे संवाद लिहिले होते. अतिशय परिणामकारक होते ते पण कुठेही वरचढ नाहीत.
जूनून माझा अतिशय आवडता
जूनून माझा अतिशय आवडता चित्रपट. हा पाहिल्यावर आवर्जून त्या लेखिकेच्या कादंबर्या वाचल्या. >>> कोणत्या लेखिकेच्या वरदा?
अगं माझ्या डोक्यात ruth
अगं माझ्या डोक्यात ruth prawer jhabvala होती पण ते चुकलंय. रस्किन चीच कथा आहे. खूप वर्षांपूर्वी वाचल्याने गोंधळ झाला. कारण या सिनेमाच्याच् संदर्भात रुथ चं नाव मित्राकडून कळलं होतं आणि तिची पुस्तकं वाचली होती. Flight of pigeons मात्र अजून वाचली नाहीये
छान लेख. जुनून चित्रपटात १८५७
छान लेख. जुनून चित्रपटात १८५७ चा माहौल जसाच्या तसा उभा केला आहे. हम दिल्ली हार गए! ह्या एका संवादावेळी नासिरची दिसणारी हतबलता, शशी कपूरची निराशा आणि जेनिफरच्या डोळ्यात उमटलेले विजयी भाव निव्वळ अप्रतिम.
शशी कपूर----एक अभिनेता म्हणून
शशी कपूर----एक अभिनेता म्हणून माझ्या मते जरा बर्यापैकी मर्यादित कौशल्य असलेला हा माणूस स्वत: निर्माता असलेल्या चित्रपटांमधे अप्रतिम अभिनय करून जातो <<< हे फार खटकलं.
शशी कपुर चा जुनून मी किती ही वेळा ही पाहीन.
संवाद : पं सत्यदेव दुबे आणि इस्मत चुघताई
जुनून...आता विस्मरणात गेलेला
जुनून...आता विस्मरणात गेलेला पण एक उत्तम चित्रपट. <<< विस्मरणात ??? !!!
दुरदर्शन वर लागतं हा शिन्मा
अवांतर : दर रविवारी दुरदर्शन वर दु १२ वाजता छान शिन्मा लागतात, २-३ महिन्यांपुर्वी शतरंज के खिलाडी पाहिलं, फुल्ल धमाल आली परत पाहताना
सर्व प्रतिक्रियांचे खूप
सर्व प्रतिक्रियांचे खूप मनापासून आभार.
वरदा-- माहितीपूर्ण प्रतिसाद. मी हिफाज़त आणि न्यू देल्ही टाइम्स बघितला नाही अज़ून. तुम्ही आता हे संगीतल्यावर हे बघावे असे वाटताहेत. उत्सव मात्र उल्लेख करायचा राहून गेला.
प्रसन्न हरण खेडकर, धन्यवाद.
साधना-- प्रतिसाद खूप आवडला. छान शब्दात नेमका आशय सांगितला.
अशोक---नेहमीप्रमाणेच अतिशय अभ्यासपूर्ण, संतूलित आणि चपखल शब्दात समजावून सांगण्याची हातोटी. तुमच्या प्रतिक्रियेमधूनसूद्धा नवीन गोष्टी, नवीन पैलू कळतात . तुमचे खूप खूप आभार.
तुम्ही आणि वरदा यांनी उल्लेख केल्यामुळे न्यू देल्ही टाइम्स हा चित्रपट नक्कीच बघीन.
तुम्ही म्हणता तसे " एक गुलछबू, हसरा आणि खाओ-पिओ-जिओ धतीच्या भूमिका त्याच्या वाट्याला आल्या असल्या तरी चाळीशीनंतर त्याने ज्या गंभीरतेने आपल्या कारकिर्दीकडे पाहिले (निर्माता या अर्थानेसुद्धा) ते त्याच्या परिपक्वतेचे लक्षण मानले जावे." अगदि खरे आहे.
आहा! जुनून! मी पण सिनेमा
आहा! जुनून! मी पण सिनेमा कितीही वेळा पहायला तयार आहे.
अगदी प्रथम शाळेत असताना दूरदर्शनवर पाहिला होता.