कोणतं गाणं कोणत्या रूपात कधी, कुठे, कसं भेटेल काहीही सांगता येत नाही... त्यातही काही गाणी परत परत भेटत राहतात. कधी एक हलकीशी झलक दाखवून उत्सुकता चाळवून जातात, आणि मग सुरु होतो शोध. या शोधात तुमच्याही नकळत तुम्ही गुरफटत जाता, गाणं हुलकावणी देऊन निघूनही गेलेलं असतं. काळाच्या ओघात कधीतरी सक्रीय शोधही मागे पडतो. कधी मित्रांबरोबर विषय निघाला तर तुमच्या शोधाबद्दल, उत्सुकतेबद्दल त्यांच्याशी बोललं जातं. मग ते ही काही काळ त्या शोधयात्रेत सामील होतात. कधी उत्तर मिळतं, कधी मिळत नाही. मनात मागे नुसताच त्या गाण्याचा, प्रश्नाचा ठसा उरतो. हलकासा, न जाणवणारा, त्रास न देणारा पण तरीही पुसुन न टाकता येणारा. दिवस, महिने, वर्ष मागे पडतात. नवीन गाणी, नवे प्रश्न, नवा शोध या सगळ्यात आपण नव्याने गुरफटून जातो...
... आणि अचानक ध्यानीमनी नसताना फार सहजपणे एखाद्या क्षणी 'ते' गाणं सामोरं येतं, उत्तर सापडतं आणि एका क्षणात शोध संपतो. मन जबरदस्त सुखावून जातं.
कालच अश्याच एका गाण्याचा शोध माझ्यासाठी अचानक संपला. ते गाणं म्हणजे पडोसन मधलं ' एक चतुर नार करके सिंगार' ! मन्नाडे आणि किशोर ह्या दोघा दिग्गजांची जुगलबंदी. हिंदी चित्रपट संगीतातील 'टॉप ५ कॉमेडी गाणी' अशी यादी केली, तर त्या पाचात हे गाणं नक्कीच असेल इतकी शब्दांची, सूरांची, आवाजाची आणि विनोदासाठी अतिशय आवश्यक अशा 'टायमिंगची' जमलेली भट्टी ! आरडीचं एक जबरी कंपोझिशन....
पण माझ्यासाठी ह्या आवडत्या गाण्याची गोष्ट मात्र इथेच संपत नाही.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. कुठेतरी ऐकलं होतं किंवा कोणत्यातरी लेखात एक ओझरता उल्लेख वाचला होता की 'एक चतुर नार' हे गाणं किशोरच्या आधी अशोककुमारच्या आवाजात आहे म्हणे !
झालं ! आता ते गाणं कोणतं, कोणत्या सिनेमातलं आहे की नॉनफिल्मी अल्बम मधलं, रीलीझ झालं की नाही, असे एक ना भारंभार प्रश्न पडायला सुरुवात झाली.... गाण्याचा शोध चालू झाला.
काही प्राथमिक शोधाशोधीनंतर, अशोक कुमारच्या १९४१ सालच्या ' झूला' या चित्रपटात 'एक चतुर नार करके सिंगार' ही गाण्याची पहिली ओळ असलेलं गाणं आहे, इतकी माहिती मिळाली आणि हा शोध इथेच अडकला.
पुढे काही वर्षांनी आर्डी बर्मनच्या पुस्तकात ह्या गाण्याबद्दल अजूनच इंटरेस्टींग, उत्सुकतावर्धक माहिती मिळाली ती अशी -
" एक चतुर नार हे एक अतिशय चतुरपणे एकत्रीत केलेलं, पटकन लक्षात येणार नाही अशी विविध गाण्यांची मांडणी करून रचलेलं गाणं आहे. गाण्याची पहिली ओळ - एक चतुर नार करके सिंगार - ही झिंझोटी रागातली रचना अशोककुमारच्या झूला (१९४१) चित्रपटातील गाण्यावर बेतलेली आहे. पुढील 'अरे देखी तेरी चतुराई' ही ओळ विष्णूपंत पागनीसांच्या ' वन चले राम रघुराई' ह्या भजनाचं विडंबन आहे. (संत तुलसीदास - १९३९). तर 'काला जा रे जा रे' ही ओळ लता मंगेशकरने गायलेल्या जिद्दी (१९४८) चित्रपटातील ' चंदा रे जा रे जा' या छायानट रागावर आधारीत गाण्यावर बेतलेली आहे. ह्या सगळ्या गाण्यांचं एकत्रीकरण करून कवी राजेंद्र किशन आणि संगीतकार पंचम यांनी एका अजरामर विनोदी गीताची निर्मीती केली"
जबरदस्त ! सगळंच एकदम भारी वगैरे वाटायला लागलं आणि यातली एक एक गाणी शोधण्याच्या मागे मी लागले.
विष्णूपंत पागनीसांचं 'बन चले राम रघूराई' भजन सापडलं, आणि त्यात 'अरे देखी तेरी चतुराई' स्पष्ट ऐकू यायला लागलं. आधी मनात खुदकन आणि मग चक्क मोठ्याने खदाखदा हसू आलं. माझ्यासाठी त्या भजनाला एक नवीन मीती प्राप्त झाली.
देवआनंदच्या 'जिद्दी' मधलं लताच्या आवाजातलं ' चंदा रे जा रे जा रे' हे गाणं पण सापडलं. आजवर जिद्दी म्हणजे लता - किशोरचं पहिलं रेकॉर्ड झालेलं ड्युएट " ये कौन आया रे " (https://www.youtube.com/watch?v=j6aaQphk1Pg) या गाण्यासाठी माहिती होतं. आता त्या सिनेमाच्या गाण्यांना 'पडोसन' चा एक नवा संदर्भ जोडला गेला.
आता उरलं अशोककुमारच्या आवाजातलं 'एक चतुर नार' ही ओळ असलेलं गाणं. खूप शोधलं पण हे गाणं काही पहायला मिळालं नाही...
बरीच वर्ष झाली... आणि काल अचानक, अगदी अचानक एका मित्रानं ' हे तू आधी पाहिलं आहेस का?' अश्या मेसेजसकट एका गाण्याची लिंक पाठवली... उत्सुकतेनं मी लिंकवर क्लीक केलं आणि हर्षवायू झाल्यासारखी माझी परिस्थीती.
त्या लिंकमधलं गाणं होतं अशोक कुमारच्या आवाजातालं 'एक चतुर नार करके सिंगार' !
निकीत, ती लिंक पाठवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
वर्षानुवर्ष चाललेला 'एक चतुर नार' ह्या गाण्याचा शोध काल माझ्यासाठी अचानक संपला... म्हणजे निदान पुढचे काही प्रश्न , उत्सुकता निर्माण होईपर्यंत तरी !
एक चतुर नार करके सिंगार - झूला (१९३९) - अशोक कुमार
https://www.youtube.com/watch?v=RtthfgNa7YY
बन चले राम रघूराई - संत तुलसीदास (१९३९) - विष्णूपंत पागनीस
http://gaana.com/song/ban-chale-ram-raghu-rai
ही लिंक ओपन झाली नाही तर -
http://www.shazam.com/track/45806835/ban-chale-ram-raghu
चंदा रे जा रे जा रे - जिद्दी (१९४८) - लता मंगेशकर
https://www.youtube.com/watch?v=ghtBSj7rvfw
पुस्तक संदर्भ : R. D. Burman: The Man The Music, अनिरुद्ध भट्टाचार्जी आणि बालाजी विठ्ठल.
खूप छान लिहिले आहेस रार. आता
खूप छान लिहिले आहेस रार. आता वेळात वेळ काढून ऐकेन ह्या लिम्क्स. धन्यवाद.
भारी !!! सगळी गाणी ऐकून
भारी !!! सगळी गाणी ऐकून हसायला आलं जोरात !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त! लेख दोनदा वाचला अन आता
मस्त! लेख दोनदा वाचला अन आता त्या लिन्क्स वर माहित नाही किती वेळा जाईल..! खुप खुप धन्स!
आईशप्पथ, भारीच ! योगायोगाने
आईशप्पथ, भारीच ! योगायोगाने ह्यातल्या 'चतुर नार' बद्दल मी आत्ताच पंधरा दिवसांपूर्वी एका पुस्तकात वाचलं पण बाकीच्या दोन गाण्यांविषयी मात्र माहीत नव्हतं. खूप हसले लिंक्स ऐकून.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनेकानेक धन्यवाद
मस्तच! फार आवडतं हे गाणे!
मस्तच! फार आवडतं हे गाणे! काला रे जा रे जा... तर भलती आवडती लाईन!! सूर बदल गया.. हम छोडेगा नई जी....![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
भेळतील चुरमुरे, शेव दाखवल्याबद्द्ल थँक्यू
छान तसेच अगदी मनोरंजक असा
छान तसेच अगदी मनोरंजक असा शोध. जुन्या गाण्यांच्या चालीवरून नव्याने गाणी रचली म्हणजे एक प्रकारे त्या मूळ गायक संगीतकाराला पुढच्या पिढीतील कलाकारांनी दिलेला मानाचा मुजराच म्हणावा लागेल. अशोककुमार यांच्या आवाजातील एक चतुर नार ऐकताना खासच वाटले.
तुम्ही जो शोध घेतला आहे, त्यात थोडीशी भर घालतो...अशोककुमार आणि किशोरकुमार यांच्या संदर्भातच. किशोरकुमारने "झुमरू" चित्रपटाला संगीत दिले होते. यातील "कोई हमदम ना रहा कोई सहारा न रहा..." हे त्यावेळी फार लोकप्रिय झालेले एक गाणे....१९६१ चे हे गाणे. त्याची लिंक
https://youtu.be/TDPb2ShfjHo
पण विशेष म्हणजे हेच गीत अशोककुमार यांच्या आवाजात, याच चालीत बांधले गेले होते....१९३६ च्या "जीवननैय्या" या चित्रपटासाठी. सरस्वतीदेवी यानी संगीत दिले होते.
लिंक https://youtu.be/tZTtYfieivM
अरे कसला मस्त शोध आहे हा!
अरे कसला मस्त शोध आहे हा!
आणि लेखही छान. ती गाणी ऐकून खूप मजा आली. स्पेशली 'बन चले राम रघुराई' ऐकून खरंच हसू आलं क्षणभर. थँक्स रार!! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हैला... सॉलिडच!!
हैला... सॉलिडच!!
फारच भारी आहे हे. जबर्या.
फारच भारी आहे हे. जबर्या.
थोपुवर पंचम फॅनला शेअर करतो. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरॅक्स!
जबरॅक्स!
आई गं! काय भारी आहे..मज्जा
आई गं! काय भारी आहे..मज्जा आली ऐकायला!
मस्त शोध.. हे गाणे इतकी
मस्त शोध..
हे गाणे इतकी चमत्कारीक वळणे घेते कि त्याचे रेकॉर्डिंग कसे झाले असेल असे वाटत राहते ( नाच ना जाने आंगन टेढा... ओ टेढे... ) मन्ना डेंनी सांगितले होते कि किशोरने हे गाणे त्यांच्याकडून अलगद हिरावून घेतले होते.
मन्ना डेंचे.. साँवरीया साँवरीया .. मात्र त्यांचेच आणि मेहमूदचे आहे, तर भाई बत्तूर केवळ लताचे.. आणि मै चली.. लताचे नव्हे तर आशाचे. बाकीची किशोरची![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास लेख! लेख वाचून मस्त
झकास लेख!
लेख वाचून मस्त वाटलं होतं पण खालचे गाणे ऐकून हसू आले. त्यात अशोक कुमारच्या सुंदर अभिनयाचा आणि गळ्याचा पुरावा मिळाला.
तू लिहिल्याप्रमाणे 'बन चले राम रघुराई' मध्ये अगदी किशोरचा आवाज ऐकू येतो इतके डोक्यात बसले आहे ते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे भारिये!! मस्त!
हे भारिये!! मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लेख, शोधयात्रा आवडली.
मस्त लेख, शोधयात्रा आवडली. खरंच खुप मनोरंजक माहिती मिळाली.:)
आवडलं
आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप महत्वपुर्ण आणि रोचक
खुप महत्वपुर्ण आणि रोचक माहिती. घरि जावुन ऐकते. तुम्च्या लेखाचि लिंक शेअर केली तर चालेल का?
व्वा!मस्त!मज्जा आली एकायला
व्वा!मस्त!मज्जा आली एकायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार छान संशोधन
फार छान संशोधन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरी.
मस्त माहिती!
मस्त माहिती!
मनापासून धन्यवाद ... शेयर
मनापासून धन्यवाद ... शेयर करायला काहीच हरकत नाही, अजून लोकं ही जबरी गाणी एंजॉय करु शकतील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडलेच!
आवडलेच!
कसला मस्त प्रकार आहे हा रार,
कसला मस्त प्रकार आहे हा रार, असे अजून शोध नि लगे हाथ लिही पटकन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अशोककुमार यांच्या आवाजातील एक चतुर नार ऐकताना खासच वाटले. >> +१
मस्त! ते अशोक कुमार चे गाणे
मस्त! ते अशोक कुमार चे गाणे कधीतरी ऐकले होते असे अंधुक आठवते. बाकी बर्याच ओळी या कोणत्यातरी गाण्यांचे विडंबन असाव्यात असे नेहमीच वाटत होते (पुलंच्या पुस्तकातील अनेक उल्लेख जसे कसलेतरी विडंबन आहे हे जाणवते, नक्की कशाचे ते कळाले नाही तरी), पण बरीच इंटरेस्टिंग माहिती मिळाली!
अजून असे 'शोध' आहेत का चालू? ते ही लिही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इन्टरेस्टिन्ग !!!
इन्टरेस्टिन्ग !!!
शोधयात्रा मस्तच...! 'चतुर
शोधयात्रा मस्तच...!
'चतुर नार' म्हणजे त्यातील सर्व अष्टपैलू कलाकारांच्या गुणांचा परिपाकच..! संगीत रचना, रिदम्स, ताल तुकडे, वाद्यांची मिसळण, गायन, अभिनय, चित्रीकरण... कशा कशाचे कौतूक करावे ..? मेहमूद, किशोरदा, सुनित दत्त, आणि ईतर मंडळी यांचे हावभाव, अंगविक्षेप अक्षरशः हसून लोळवतात.. 'टायमिंग' चे धडे आहेत.
हे गाणे ध्वनीमुद्रीत करताना ऊपस्थित पब्लिक ला कसला जबरी अनुभव आला असेल.. परत आजाच्या सारखे कट पेस्ट ची सोय नाही.. पहिल्याच फटक्यात सगळे ठोक यायला हवे. पंचम वरील कार्यक्रमातून त्याच्या वाद्य चमूंकडून यातले किस्से अनेकांनी ऐकले असतीलच.. तरिही 'नवल' वाटत राहते.
'पडोसन' बघून दगडावरही स्मित रेषा ऊमटू शकतील आपण तर निव्व्वळ माणसे आहोत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी आहे शोध!
भारी आहे शोध!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे शोध .. आवडला .. >>
मस्त आहे शोध .. आवडला ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> "कोई हमदम ना रहा कोई सहारा न रहा..."
लेजण्ड्ज् /गोल्डन कलेक्शन किंवा तत्सम HMV च्या सीडीमध्ये याबद्दल अशोक कुमार चं वक्तव्य आहे .. किशोरने ते गाणे म्हणायची इच्छा बोलून दाखवली अशोक कुमारकडे .. १४ मात्रा वाला आडातेडा गीत घशाला काहितरी इजा झालेल्या किशोरला कसं झेपेल असं अशोक कुमारला वाटलं .. पण किशोर म्हणाला "मै ये १४ मात्रा वात्रा कुछ नही जानता, आँप मुझे सिखाइयें, मै रिहर्सल करके गा लूँगा "![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त. दिनेश जी, मै चली मधली
मस्त.
दिनेश जी, मै चली मधली स्केल सुन्दर बदलली आहे.
Pages