नमस्कार मायबोलीकर …
इथे व्यक्त होण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.
एक नविन विचार मांडत आहे. कसं वाटतंय लेखन जरूर सांगा...
अगदी लहानपणी शाळेत असताना बाईंनी चित्रकलेतील हा नवीन प्रकार शिकवलेला आम्हाला. वेगवेगळ्या प्रकारचे कागदी छोटे-छोटे तुकडे एकत्र करून त्यापासून एक नवीन अर्थपूर्ण चित्र तयार करणे. मला हे असं कोलाज बनविण फार आवडायचं आणि लहानपणी शाळेत असताना बनवलेली कोलाज अजूनही जपून ठेवली आहेत मी.
खरंच किती सुंदर कल्पना आहे ही की काहीही अर्थ नसलेले वेगवेगळे तुकडे एकत्र करून एक नाविन्यपूर्ण चित्र बनाविणे. आपल आयुष्य पण असंच असत नाही का? वेगवेगळ्या, एकमेकांपासून भिन्न असलेल्या माणसांचं, अनुभवांचं आणि भावनांच एक सुंदर कोलाजच असत की आपलं आयुष्य म्हणजे. एका चित्रकाराच्या दृष्टीकोनातून पाहिले तर ही कल्पना मला जाम भुरळ घालत आहे.
माणूस जेंव्हा जन्माला येतो तेंव्हा या चित्राला सुरवात होत असावी. मग जसजसे दिवस, महिने, वर्षे सरतात तसतसे या चित्राला निरनिराळा आकार आणि रंग प्राप्त होऊ लागतात. जितक्या प्रकारची माणसं, तितक्या प्रकारची चित्रं. प्रत्येक माणसाच्या आयुष्याप्रमाणे निराळ्या आकाराचे आणि निराळ्या रंगांचे कोलाज तयार होते. माझ्यामते या कोलाजाला आकार देण्याचे काम आपल्या आयुष्यात येणारी वेगवेगळी माणसे करतात. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण जितकी जास्त माणसे जोडतो तितका या चित्राचा आकार मोठा होत जातो. त्याचप्रमाणे चांगल्या-वाईट माणसांचाही या आकारावर परिणाम होत असावा. चांगली माणसे जोडल्यामुळे चांगला आकार मिळत असावा या चित्राला. याच माणसांमुळे आपल्याला मिळणारे वेगवेगळे अनुभव आणि या अनुभवांमधून व्यक्त होणाऱ्या वेगवेगळ्या भावना या चित्रामध्ये रंग भरण्याचे काम करतात. आनंदी अनुभव हिरवा तर दुखद अनुभव काळ्या किंवा गडद रंगांचे अस्तित्व दाखवतात. प्रेमामुळे, मग ते आई-वडिलांचं किंवा प्रियकराच असो, या चित्रात लाल, गुलाबी, केशरी असे रंग भरले जातात. पांढरा रंग शुद्धतेचे प्रतिक आहे. पिवळया रंगामुळे आश्चर्य तर निळया-जांभळ्या रंगांमुळे अस्वस्थता दर्शविली जाते. या चित्राचा आकार आणि रंग काळानुरूप बदलत जातात.
शाळेमध्ये असताना बनविलेले कोलाज आणि या आयुष्याच्या कोलाजामध्ये हाच काय तो मोठा फरक आहे. आयुष्याचे कोलाज जिवंत असते. त्याला अमृताचा स्पर्श झालेला असतो. माणसाच्या प्रत्येक श्वासागणिक ते अधिकाधिक गहिरे आणि मोहक होत जाते. कोलाजाचे सतत बदलते रंग ह्याला एक वेगळा अर्थ प्राप्त करून देत जातात.
हे चित्र कधीच का पूर्ण होत नाही?? नाही.. तसे नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्याचे आपले असे एक चित्र असते. माणूस जसजसा मोठा होत जातो - वयाने म्हणा किंवा अनुभवाने म्हणा तसतशी या कोलाजाची प्रतिमा विस्तारत जाते. पण याला पण सीमा ही आहेच. माझ्यामते या चित्राचा खरा चित्रकार वेगळाच असतो. या चित्रकाराने प्रत्येक माणसाला त्याच्या मालकीचे हे चित्र सजवण्याची संपूर्ण मुभा दिलेली असते परंतु त्याचा कॅनवास ठराविकच असतो. त्यावरच्या चित्राच्या आकाराला जरी मोकळीक असली तरीही कॅनवास च्या सीमेच्या बाहेर जाणे शक्यच नसते. श्वासागणिक मनमोहक होत जाणाऱ्या या कोलाजाला पूर्णविराम हा असतोच, आणि तो मिळतो तो माणसाच्या शेवटच्या श्वासानंतर.
या चित्रकाराकडे लाखोंनी विलक्षण अशी कोलाज असतील. पण मजा म्हणजे त्यातले एखादे कोलाज जरी आपल्याला खूप आवडले तरी त्याची नक्कल करणे अगदीच शक्य नाही. आज शास्त्राने जरी कितीही प्रगती केली तरीही या चित्रकाराला आव्हान द्यायला जमणे जरा मुश्किलच आहे.कारण प्रत्येक कोलाज तयार होण्याचा कालावधी आणि त्याची रचना केवळ त्या चित्रकारालाच ठाऊक. हा चित्रकारही अजब आहे. त्याला अशी निरनिराळी चित्रे बनवायला आवडतात पण याच्या निर्मितीमध्ये तो स्वतः फारस काहीच करत नाही. फक्त महत्वाचे असे सर्व साहित्य तो पुरवतो आपल्याला. वेळ प्रसंगी या साहित्यात काही कमी-जास्त असेल तर मदतही करतो पण याहून जास्त काहीच नाही. हे थोडक्यात अस होत कि mall मध्ये सर्व सामान समोर दिसत असत आपल्याला, पण प्रत्येक वेळी ते तिथे कुणी आणून ठेवलय याचा आपण विचारच करत नाही… खर तर ते आपल्याला जरुरी पण वाटत नाही. पण याचमुळे कळत -नकळत आपल्याला असे वाटू लागते कि या चित्राचे आपणच मालक आहोत आणि हे सुंदर चित्र संपूर्णपणे आपलचं आहे. परंतू हे चित्र जेंव्हा पूर्ण होत त्या नंतर ते कायमस्वरूपी खऱ्या चित्रकाराकडेच राहत. इतरांकडे उरतात त्या रम्य आठवणी आणि परत नवे साहित्य … नवे चित्र बनवण्यासाठी… नविन कोलाज निर्माण होण्यासाठी … !
ओहो... सुरेख ललित. (माझी
ओहो... सुरेख ललित.
(माझी हरवलेली बहिण-बिहिण आहेस का काय.. हे बघ - http://www.maayboli.com/node/7986)
खूप आवडलं हे सांगायलाच नको.
दाद (शलाका माळगावकर) - वाहः…
दाद (शलाका माळगावकर) -
खर सांगू , मला जेंव्हा हि कल्पना सुचली ना तेंव्हा खूपचं छान वाटल होतं कि आपल्याला काहीतरी वेगळ सुचतय इतरांपेक्षा…. पण तुमचा लेख वाचून मजा वाटली ह्याची कि "तो " चित्रकार समान विचारसरणीची माणसं निर्माण करतो … आपल्या विचारांच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर तो दोन समान कोलाज तयार करतो, समान बर का सारखी नाही… त्या कोलाजाचा काहीसा भाग सारखा असावा आपला… छान वाटल तुमचा लेख वाचून… 
वाहः… !! असेल असेल… "बचपन में मेलेमे बिछडे हुए" वगैरे प्रकार असेल कदाचित…. !!
छान लेखन... ! आवडलं.
छान लेखन... ! आवडलं.
मस्तच लिहिलंयत, आवडलं.
मस्तच लिहिलंयत, आवडलं.
मस्त
मस्त