पुणेकरांची आवडती ‘पर्वती’

Submitted by ferfatka on 13 February, 2014 - 04:34

पुण्यात राहून पर्वतीला गेला नाही असा पुणेकर सापडणे अवघडच. सिमेंट क्राँकिटच्या वाढल्या जंगलामुळे पर्वती टेकडी लांबून दिसणे जरा अवघडच बनली. पूर्वी लांबून सहजरित्या दिसणारी पर्वती बांधकामांमुळे दिसेनाशी होत आहे. संध्याकाळी व्यायामासाठी येणारे असंख्य पुणेकर व पर्यटकांमुळे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पर्वती गजबजलेली असते. टेकड्यांवरील अवैध बांधकामांचा मध्यंतरी प्रश्न उभा राहिला होता. या टेकडीला सुद्धा हा प्रश्न सतावू लागला आहे. अशा या पर्वती टेकडीवर केवळ पर्यटन व व्यायामासाठी उत्तम जागा असे संबोधले जाते. मात्र, या टेकडीचा इतिहास समजून घेणारे फारच कमी आहेत. मनाला थोडा विरंगुळा व व्यायाम असेच या टेकडीकडे पाहिले जाते. लहानपणी पर्वतीवर अनेक वेळा गेलो. शर्यती लावून पर्वतीवर पोहोचयचे हा आमचा आवडता कार्यक्रम. आज बरेच वर्षांनी ‘फेरफटका’ करण्याच्या निमित्ताने पर्वतीवर गेलो. त्या विषयी.....

Picture 105.jpgटेकडीविषयी :

मुळा-मुठेच्या संगमावर असलेल्या पुण्याला अनेक छोट्या-मोठ्या टेकड्या लाभल्या आहेत. या टेकड्यांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. चतु:श्रृंगी, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, फर्ग्युसन कॉलेजमागील टेकडी अशा टेकड्यांनी पुणे शहर वेढलेले दिसून येते. या टेकडीची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे २१०० फूट आहे. माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. टेकडीवर पोहचण्यासाठी सुमारे १०३ ते १०५ पायºया चढल्या की १५ ते २० मिनिटात आपण वर पोहोचतो. पेशवेकाळात परिसरात हिरवीगार दाट झाडी, तुरळक वाड्यावस्त्या होत्या. टेकडीच्या पायथ्याच्या परिसरात सपाट मैदान असल्याने पेशव्यांचे सरदार व त्यांचे घोडदळ या ठिकाणी तळ देत असत. पुढे नानासाहेबांनी पर्वतीवर मंदिर बांधून या टेकडीला अजून नावारूपास आणले. कालांतराने लोकसंख्या वाढल्याने या टेकडीच्या परिसरात प्रचंड बांधकामे सुरू झाली. टेकडीला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडायला वेळ लागला नाही. बघता बघता हा सर्व परिसर बांधकामांनी भरून गेला.

टेकडीवरील मंदिर उभारणी :

थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांची कारकिर्द म्हणजे १७४०-१७६१ या कारकीर्दीत पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचे मध्यवर्ती केंद्र बनले होते. पेशव्यांनी पुणे शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली. पुण्याचा विकास व सुशोभीकरण करताना नानासाहेब पेशव्यांनी पर्वती देवस्थान व सारसबाग वसवली. या पाठोपाठच पुण्यातील अनेक पेठा, वाडे, मंदिरे, रस्ते, हौद यांचा विकास केला.

‘देवदेवेश्वर’

Picture 078.jpg

२३ एप्रिल १७४९ साली नानासाहेबांनी ‘देवदेवेश्वर’ मंदिर बांधले व नाव दिले ‘पर्वती’. नानासाहेबांनी प्रतिष्ठा केलेल्या शंकराच्या पिंडिला ‘देवदेवेश्वर’ असे नाव दिले. देवस्थानचा उभारणीचा आरंभ जरी नानासाहेबांनी केला असला तरी दुसºया बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत पायºया बांधल्या गेल्या. भारतातील सर्वच मंदिर उभारताना ज्योतिष व खगोलशास्त्राचा वापर झाल्याचे दिसून येते. याही ठिकाणी २२ मार्च व २३ सप्टेंबरला सूर्याेदयाच्या वेळी सूर्यकिरण शिवपिंडीवर पडतात. हे पाहण्यासाठी काहीच अवधी असतो. मात्र, यावेळी चांगलीच गर्दी होते. मुख्य मंदिराच्या बाहेरील चारही कोपºयांवर सूर्यनारायण, गणेश, पार्वती आणि जनार्दन विष्णू यांची छोटी मंदिरे आहेत. पूर्वी मंदिराच्या व्यवस्थेसाठी पेशव्यांच्या दरबारातूनच रकमेची व्यवस्था करण्यात येत असे. सवाई माधवरावांची मंजुही या मंदिरात झाल्याची नोंद इतिहासात सापडते. कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा आदी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. कार्तिक महिन्यातील त्रिपुरीपौर्णिमे दिवशी म्हणजे नोव्हेंबरमध्ये दर्शनासाठी येथे गर्दी होते. तसेच श्रावणात सोमवारी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. १५ जुलै १९३२ ला मंदिरातील मूर्तींची चोरी झाली. या चोरीचा तपास मात्र लागला नाही. त्यानंतर ब्रासपासून तयार केलेल्या मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. १७६१ला पानिपताच्या तिसºया लढाईत मराठी साम्राज्याची प्रचंड हानी झाली. मुलगा विश्वासराव व भाऊसाहेब गेल्यामुळे खचून गेलेल्या नानासाहेबांनी जून १७६१ पर्वतीवर ‘‘भाऊ भाऊ...’’ करीत देह ठेवला. मंदिराच्या बाहेरील बाजूस नानासाहेब पेशवे यांची समाधी आहे. पर्वतीवर अनेक थोरांचे पाय लागले. नाना फडणवीस, भाऊसाहेब, पाहिले माधवराव, महादजी शिंदे, रामशास्त्री, दुसरा बाजीराव, पेशवे घराण्यातील स्त्रिया येथे दर्शनासाठी नेहमीच येत असत. दुसºया बाजीराव पेशव्यांनी खडकी येथे सुरू असलेली ब्रिटीशांबरोबरची लढाई याच पर्वतीवरून पाहिल्याची नोंद आहे.

पेशवे संग्रहालय :

मुख्य मंदिरा शेजारी नानासाहेब पेशव्यांचे स्मारक आहे. त्या शेजारी १७९५ रोजी बांधलेल्या वाड्यातील काही भागात पेशव्यांचे संग्रहालय उभारले आहे. मराठी साम्राज्याच्या असंख्य बºयावाईट घटनांची साक्षीदार राहिलेल्या पर्वती टेकडी वर चित्रकार जयंत खरे यांनी पेशवे संग्रहालयाची उभारणी केली आहे. या संग्रहालयात मराठा साम्राज्यातील अनेक सुंदर वस्तूंचा संग्रह मांडला आहे. १० रुपये तिकीट देऊन आपण हे संग्रहालय पाहू शकतो.

Picture 054.jpg

मराठा राजवटीतील वापरण्यात येणारी ‘नाणी’, ब्रिटीशकालीन नाणी, विविध प्रकारच्या तलवारी, ढाल, विविध हत्यारे, बंदूका याच बरोबर पेशवे घराण्यातील व्यक्तींची चित्रे व त्यांची थोडक्यात माहिती वाचण्यास मिळते. शनिवारवाड्याचा नकाशा, १७९१ नुसार पुण्यातील विविध बागांची नावे जसे की, हिराबाग, सारसबाग, वसन्तबाग, मोतीबाग, पर्वतीबाग, वानवडीचीबाग, हिंगण्याचीबाग, रमणबाग, वडगावबाग, माणिकबाग, पाषाणबाग, कात्रजबाग आदी बागांची नावे येथे वाचण्यास मिळतात. पेशवेकालीन दरवाज्यांना लावण्यात येणारी कुलपे, अभ्यासासाठी वापरण्यात येणारी धुळपाटी, विविध पगड्या, हत्तीचा पाय. याच बरोबर तांदूळ, गहू व कडधान्यांचे त्यावेळेचे दरपत्रक पाहून आश्चर्य वाटते. बºहाणपुरचे सरदार भुस्कटे यांच्या वाड्यातील खांब व खिडक्यांच्या चौकटी येथे आणून या संग्राहलयाची शोभा अजून वाढवलेली आहे. पर्वती व पुणे शहराची जुन्या काळातील छायाचित्रे हे सारे पाहत असताना नकळत मन इतिहासात रमते व वेळ कसा जातो हे समजत नाही.

‘मॉर्निंग वॉक’

पुणे शहर हे पर्वती टेकडीच्या चारही बाजूला पसरलेले शहर आहे. आरोग्य चांगले राहावे यासाठी चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. हे जाणूनच पुणेकर रोजच्या धकाधकीतही सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ करून ताजेतवाने होण्यासाठी पर्वतीवर येतात. पर्वती म्हणजे हक्काची व्यायामशाळाच बनली आहे. पर्वतीवर अनेक विक्रम केले गेलेले आहेत. तीन तासात टेकडी २१ वेळा चढणे, ७ तासात ४४ वेळा चढणे याच बरोबर अनेक सामाजिक संघटना अबालवृद्धांसाठी टेकडी चढण्याच्या स्पर्धा होतात. पुणे शहराचा विस्तार या निसर्गरम्य ठिकाणाच्या जवळ झाल्याचा हा फायदा सध्या पुणेकर उठवत आहेत. व्यायामाच्या निमित्ताने या टेकडीस वषार्नुवर्षे भेट देणारे अनेक पुणेकरांचा दिनक्रम येथून सुरू होते ते येथील हिरवीगार वनराई, टेकडीवरील वारा, स्वच्छ हवा (?) घेऊनच. पण मी गेलो तेव्हा संध्याकाळी येथील पायºया चढत असताना एक प्रकारचा घाणेरडा वास जाणवत होता. बहुद्या टेकडीला पडलेल्या विळख्याचा हा परिणाम असावा. असो.

‘मॉर्निंग वॉक’ दुसºयांना ‘ताप’

Picture 068.jpg

तर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या टेकडीवर सकाळी व सायंकाळी व्यायामसाठी येतात. बरं नसते चालत जाऊन पर्वतीवर जाणे इतपत ठिक आहे. मात्र, काहीजण आपण पायºया चढत असताना हश्श हुश्श करत जोरात पळत जातात अचानक मागून आलेल्या या महाभागाचा धक्का लागून वा गांगरून वृद्ध व्यक्ती पडलेल्या मी पाहलेल्या आहेत. काही जण याही कहर म्हणून की काय पायाने पर्वतीवर लंगडी घालताना दिसून येतात. पायºया उलट्या उतरणे, मोकळी जागा पाहून योगाभ्यासाचे नाना प्रकार करणे. हा व्यायाम प्रकार करत असताना दुसरे कोणी आपल्याला पाहतो आहे का ? नाही याचे भान न ठेवता व तेही ‘अर्धी पॅन्ट’ व आता खाली वाकला तर पॅन्ट फाटेल की काय? अशी पाहणाºयाला उगाचच भीती देत घाबरवत आपला व्यायाम करत असतात. हे व्यायाम करताना नवीन येणाºया पाहुण्यांना, पर्यटकांना व विशेष करून स्त्रियांना हे विचित्र वाटते व हसूही येते. पण वाढते प्रदूषण, वाढती लोकसंख्या व अपुरी जागा यामुळे याला पर्याय नाही असेच वाटते. तरी सुद्धा याचे भान ठेवायला पाहिजे हे मात्र, नक्कीच. पर्वतीवर गेल्यावर तळजाई टेकडीवरही जाता येते त्या विषयी पुन्हा कधीतरी

पर्वती मंदिराचा परिसर :

मुख्य देवालयाचे प्रवेशद्वार भव्य आहे. दोन्ही बाजूस द्वारपाल म्हणून भैरवांच्या मूर्ती असून त्यांची स्थापना मात्र, १९८४ मध्ये केलेली आहे. मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. या तटबंदीवर जाण्यासाठी पायºया आहेत. अर्ध्या तासासाठी ५ रुपये नाममात्र तिकीट घेऊन येथे जाता येते. या सज्जावरून पुणे शहराचे विहंगम दर्शन घडते. मनपा भवन, स्वारगेट एसटी स्टॅण्ड, सारसबाग, खालून वाहणारा कॉनॉल येथून छान दिसतो. सुर्याेदय व सुर्यास्त या ठिकाणी सुंदरच दिसतात. दिवाळीतील किल्यांत दाखवलेल्या शहराप्रमाणे पुणे शहर दिसते. मोठ मोठे ट्रक, कार सुद्धा अगदी छोटे खेळण्यातल्या गाड्यांसारखे दिसतात. सूर्यास्तानंतर लखलखणारे पुणे शहर पाहण्यासारखे असते. देवळाच्या अंगणात जमिनीखाली भुयारात जाणारा रस्ता आहे. हा रस्ता तळघरात जातो व पुढे शनिवारवाड्यात निघतो असेही बोलले जाते. मात्र हे खरे नाही. खाली एक चौकोनी खोली असून तिचा उपयोग बहुधा कोठारासारखा केला जात असावा. सध्या या भुयारावर कुंपण घातले आहे.
जुनी पर्वती व पुणे कसे होते. या विषयी अनेक दुर्मिळ छायाचित्रे सध्या उपलब्ध आहेत. ही छायाचित्रे ब्रिटीश राजवटीतील आहे. त्यापैकीच पर्वतीची ही छायाचित्रे.

http://ferfatka.blogspot.com/2014/02/blog-post_10.html

गतकाळाचे वैभव व आधुनिकतेची साक्ष ठरलेल्या या पर्वतीवर फिरावयास येणाºयांनी येथील इतिहासाचें स्मरण नक्कीच ठेवायला पाहिजे.

  • पर्वती टेकडी पाहण्याची वेळ : पहाटे ५ ते रात्री ८ पर्यंत.
  • तिकीट दर :
  • मंदिराच्या सज्जावरील गच्चीसाठी प्रत्येकी ५ रुपये अर्धा तासाकरिता.
  • पेशवे संग्राहलय : सकाळी ७.३० ते रात्री ८ पर्यंत. प्रत्येकी १० रुपये.
  • टीप : पेशवे संग्रहालय निवांत पाहण्यासाठी किमान २ तास तरी वेळ राखून ठेवावा. पर्वतीवर पोहचण्यासाठी १५ ते २० मिनिटे पुरतात. संग्राहलय परिसरात व मंदिरात फोटोग्राफीसाठी बंदी आहे.
  • अजून काय पहाल : शनिवारवाडा, सारसबाग, केळकर संग्राहालय, विश्रामबागवाडा, मंडई परिसर, तुळशीबाग, दगडूशेठ गणपती, केसरीवाडा, चतृश्रृंगी.
  • कसे जाल : स्वारगेटला उतरल्यावर रिक्षा अथवा पायी अथवा कोणाला तरी विचारात व आकाशाकडे नजर ठेवल्यास नक्कीच सापडेल न सापडल्यास येथे विचारा की?
  • अंतर : डेक्कन जिमखाना : अंदाजे www.४ किलोमीटर,
  • स्वारगेट ते पर्वती : 2 किलोमीटर.

पर्वतीची जुनी छायाचित्रे पाहण्यासाठी
http://ferfatka.blogspot.com/2014/02/blog-post_10.html

अधिक फोटोंसाठी क्लिक करा...
http://ferfatka.blogspot.com/2014/02/blog-post.html

पर्वतीवरील हा फेरफटका आपणास कसा वाटला? या विषयी जरूर कळवा. माझा ई मेल आहे.....

ferfatka@gmail.com किंवा No Comments बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहा...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे २ नम्बरचे आवडते ठिकाण.:स्मित:( पहिले अर्थातच सारसबाग) बर्‍याच वेळा जाणे झालेय, पण ते शाळेत आणी ज्युनीअर कॉलेजला असतानाच. कालान्तराने सर्व मागे पडले. आता नव्याने सुरुवात करायला हवी.

फेरफटका धन्यवाद माहिती आणी चित्रान्बद्दल. मस्त दर्शन घडवता आहात.

फेफ नेहमीप्रमाणेच सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. महाशिवरात्रीनिमित्त पर्वतीभेट बर्‍याचदा घडली आहे. छान ठिकाण.

सध्या पार वाट लागलीये पर्वतीची..

गच्चीवर जायला पैसे कधीपासून घ्यायला लागले.. मी कायम फुकटातच बघितल गच्चीवरुन..

ते काका आत्ता खाली घरन्गळतील की मग घरन्गळतील अशा अवस्थेत झोपलेत.:खोखो: टाकली तर नसेल? की व्यायामाचा कुठला नवीन प्रकार करतायत देव जाणे.

आणी हो त्या गच्चीसाठीच्या पैशाबद्दलः तर त्या गच्चीवरच्या गवाक्षातुन तुफान वारा आम्ही अनूभवलाय. आता उडु की मग उडु अशी अवस्था व्हायची, त्यातुन मी आणी माझी बहीण दोन्ही काडीपैलवान. जाम हलायचो वार्‍याने.:हाहा: असे कुणी उडुन पडले तर त्याच्या औषधोपचारासाठी पैसे गोळा करत असतील.:फिदी:

छान! Happy

पर्वतीला पडलेला झोपडपट्टीचा विळखा, टेकडीचे होणारे खोदकाम या विषयी मागे खूप गदारोळ झाला होता. बाकी सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.