(प्रकाशचित्रे Credits:: दिनेश अनंतवार, अभिजीत देसले, Discoverसह्याद्री)
...सह्याद्री, सूर्य अन् मॉन्सून या तुल्यबळ शक्तींनी अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात नितांत सुंदर ‘नंदनवन’ फुलवलंय…
कळसूबाई - आजोबा - घनचक्कर – न्हापता – मुडा - घोडीशेप - कात्रा असे एकसे बढकर एक असे रौद्र पर्वत,
प्रवरा – मुळा – मंगळगंगा अश्या वळणवेड्या नद्यांची विलक्षण रम्य खोरी,
सांधण घळीसारखा अफलातून निसर्ग चमत्कार,
चौढ्यामेंढ्या - उंबरदार - निसणी - करवली (करोली) - गुयरी – पाथरा – सादडे – कोकणकडा नाळ अश्या जबरदस्त घाटवाटा,
गच्च रानवा, तुफान पर्जन्य, वन्यजीव सृष्टी अश्या रीतीने सह्याद्री आपल्या सर्वोत्तम गुणांनी खुललाय.
या मनस्वी सह्याद्रीची अन् घाटमाथ्यावर तांडव करणा-या मेघांची पूजा बांधताना, वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी उभारले आहेत:
अलंग - कुलंग - मदन - रतनगड - हरिश्चंद्रगड - पाबरगड - भैरवगड – कलाडगड असे देखणे दुर्ग,
हरिश्चंद्रेश्वर - अमृतेश्वरासारखी जुनी राऊळं,
अन् भंडारदरा – घाटघर सारखी धरणं अन् विद्युतनिर्मिती प्रकल्प.
या नंदनवनामध्ये भटकंतीसाठी आम्ही तिघे निघालो होतो. कोकणातून ‘करोली’ (करवली) घाटानं चढाई करून कळसूबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्य गाठायचं, निसर्गचमत्कार ‘सांधण घळ’ बघून, ‘रतनगड’ समजून घ्यायचा, पुढे मुळा नदीच्या खो-यातून हुंदडत हरिश्चंद्रगडला साद घालायची, असा जंगी बेत होता.
------------------------------------------------------------------------------------------------------------
पुणे - कल्याण - शहापूर अश्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या प्रवासात ट्रेकर्स कंटाळले. शहापूरपाशी महामार्ग सोडल्यावर डोळखांब – साकुर्ली असे टप्पे घेत जाताना, सूर्याने लगबगीनं साईन-आऊट केलं होतं. अखेरीस आम्ही पोहोचलो सह्याद्रीच्या ‘आजोबा’च्या कुशीत – डेहणे गावी आजोबा पर्वताच्या पायथ्याशी.
पल्याडच्या ‘वोरपड’ गावात मारुती मंदिरात मुक्काम केला. जेवणानंतर निवांत वारं खायला निघालो. चंद्र आभाळात नसल्याने लख्ख चांदण्यांचा मंद उजेड अवघ्या खो-यात अलगद पाझरत होता. आजा पर्वत, रतनगड अन् सह्याद्रीच्या बलदंड भिंतीचा भव्य आकार जाणवत होता, थरारून टाकत होता. उद्याच्या घाटवाटेच्या चढाईची ट्रेकर्सना ओढ लागली होती...
सह्याद्रीचं भव्य पॅनोरमा दृश्य – करोली घाट
भल्या पहाटेच निघालो. हलक्या गारव्यात धूसर प्रकाशात भल्या मोठ्ठ्या सॅक्स पाठीवर लादून कूच केलं. काळू नदीच्या काठाने लांबवर पसरलेल्या डोंगरसोंडेला वळसा घालत निघालो. समोर उलगडू लागलेला सह्याद्रीचा भव्य पॅनोरमा बघून अंगावर सुखद शहारा आला. अग्गदी समोर होता डोंगरापासून सुटावलेला ‘बाण’ नावाचा सुळका. कातळ अन् दाट झाडीच्या टप्प्यांमागे रतनगडचा माथा अन् डावीकडे ‘खुट्टा’ नावाचा सुळका डोकावत होते. करोली घाटाची जागा कुठे असेल, याचा अंदाज आम्ही बांधू लागलो.
खो-याच्या आत आत जाऊ लागलो, तसं सूर्यकिरणं हळूहळू सह्य माथ्यावर विखरू लागली. समोरच्या खुट्टा सुळक्याला सूर्यकिरणे स्पर्शून उतरू लागली. एका प्रेमळ कातक-यानं मायेनं विचारपूस केली. ओढ्याच्या काठाने जाऊन करोली घाटाची वाट डावीकडे घळीतून चढत जाणार होती, असं सांगितलं. आत्तापर्यंतची वाट मस्त मळलेली असल्याने घाटवाट सहज सापडेल, असं वाटलं.
वोरपड गावापासून दोन तास चालल्यानंतर डावीकडे एक अर्धवर्तुळाकार कडा लक्षवेधक होता. करोली घाटाच्या वाटेवर रानव्यामुळे इतर खुणा सांगता येत नाहीत. म्हणून या कड्याच्या जवळ पोहोचणं, ही वाटेवरची महत्त्वाची खूण.
आम्ही सह्याद्रीच्या अग्गदी कुशीत पोहोचलो होतो. करोली घाटाची घळ, साम्रद गावाजवळचा कडा, सांधण घळीची जागा अन् बाण सुळका अश्या देखण्या दृश्यानं खुळावलो. ओढ्यात रेंगाळलेलं पाणी, त्यावर नाच करणा-या पाणनिवळ्या अन् आम्हांला घेरून टाकलेला आसमंत अनुभवत निवांत कातळावर पाठ टेकवली..
पाउलवाट एका मोकळवनात आलेली होती. ‘बाण’ कडे जाणारा ठळक ओढा उजवीकडे होता.
या ठिकाणापासून दोन वाटा फुटतात - एक जाते बाण सुळक्याकडे (याचा ओढा उजवीकडे, अन् ठळक आहे), तर दुसरी करोली घाटाकडे (वाट पुसट आहे. ओढ्यातून आहे).
(टीप: काही ट्रेकर्स घाटमाथ्यावरून ’सांधण घळ’ रॅपलिंग करून बाण सुळक्याजवळ धबधब्याच्या एका टप्प्यावर मुक्काम करतात, अन् दुस-या दिवशी करोली घाटाने साम्रदकडे चढतात. त्यांच्यासाठीही हा महत्त्वाचा फाटा.)
पण आम्हांला कल्पना नव्हती, की इथे एक चकवा आमची वाटंच बघत होता.. रानवा गच्च दाटलाय. ओढ्यामधून दगडांवरून वाटा थोड्या पुढे जात असाव्यात असं वाटावं, अन् अचानक हरवत जाव्यात असं होत होतं. खरं तर घाटवाट चढताना ‘बघूयात कुठेतरी घुसून, सापडेल वाट..’ अश्या रीतीनं वाट सापडणं कठीण. तब्बल दोन तास – नकाशा वाचन – चर्चा – एक्स्प्लोरींग केल्यावरही करोली घाटाची नक्की वाट काही सापडेना. शेवटी मदत मागायला उलटं फिरलो. अर्ध्या तासाच्या शोधानंतर दोघा पारध्यांना कसंबसं वाट दाखवायला कबूल केलं. अर्थातंच, ज्या ठिकाणी आम्ही ‘वाट सापडत नाही’ असं हिरमुसून मान्य केलं होतं, तिथून अवघ्या दहा मिनिटात या पारध्यांनी आम्हांला योग्य वाटेवर सोडलं.
करोली घाटाच्या चकव्याने आमचे तीन तास अन् मोलाची शक्ती वसून केली होती. तरीही आम्ही हटलो नाही, म्हणून कदाचित प्रसन्न होऊन करोली घाटाने ओढ्याच्या बाजूनं दार किलकिलं केलं.
करोली घाटाची वाट लांबची आहे, त्यामुळे वाट काही संपेना. दाट झाडो-यातून चढताना पाठीमागे बघितलं, तर ‘आजा’ पर्वत आम्हांला दमलेलं बघून मिश्कीलपणे म्हणत असावा, ‘अरे करोली घाट चढताना इतकं दमताय.. माझ्या वाटा - पाथरा अन् गुयरीची दार (आजोबाच्या अवघड घाटवाटा) कश्या चढाल..’
पायात गोळे येवू लागले. डावी-उजवीकडचे कातळकडे अजूनही उंच होते. मग खास आजोबाच्या वशिल्याने ट्रेकर्सना शंखनितळ पाणी मिळालं. वाघरू जसं लवंडून पाणी लपालप पितं, तसं खास ‘वाघरू’ स्टाईलनं पाणी पिऊन तृप्त झालो. अहाहा.. लय झ्याक!!!
पुढे वाटेत २-३ कातळटप्पे लागले. अवघड कुठेच नाहीत. फारसं दृष्टीभय नाही. दोराची आवश्यकता नाही.
अखेरीस तब्बल आठ तासांच्या चालीनंतर आम्ही पोहोचलो घाटमाथ्यावर साम्रद गावी. साम्रद गाव फारंच अनोख्या जागेवर वसलंय. उत्तरेला अलंग-मदन-कुलंग हे बेलाग दुर्ग, पूर्वेला भंडारदरा धरणाचा विस्तृत जलाशय, तर दक्षिणेला रतनगडाचा अजस्त्र पहाड.
अनुभवला सांधण घळीचा थरार..
आता गावाजवळचं अनोखं निसर्गआश्चर्य ‘सांधण घळ’ आम्हांला खेचून घेऊन गेलं. सांधण ही एक १.५ किमी लांब अन् शे-सव्वाशे फूट खोल अशी लांबचलांब घळ आहे.
ही घळ इतकी प्रचंड आहे, की ती वाहत्या पाण्यामुळे सह्याद्रीतल्या बेसॉल्ट खडकाचं भूस्खलन होवून बनणं शक्य वाटत नाही. (तसं असतं, तर सह्याद्रीत इतर ठिकाणी अश्या घळी कश्या नाही बनल्या. आणि सांधणमध्ये सलग वाहत्या पाण्याची हालचाल नाही.) त्यामुळे, वैविध्यपूर्ण रचना असलेली सांधणची ही महाप्रचंड घळ कुठल्याश्या भूगर्भीय हालचालींमुळे प्रस्तरभंग होऊन निर्माण झाली असावी.
या घळीत अनेक ग्रूप्स जायंट स्विंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग असे उपक्रम राबवतात. सांधण घळ दर्शनाचा थरार अन् कवतिक उरात साठवून आम्ही मागे फिरलो.
(टीप: ‘सांधण घळी’बद्दल विपुल लिखाण व प्रकाशचित्रे उपलब्ध असल्याने वर्णन लिहीत नाहीये..)
मावळत्या दिनकरा अर्घ्य देण्याकरता साम्रद गावच्या कोकणकड्यापाशी पोहोचलो. एकीकडे अलंग-मदन-कुलंग या बेलाग दुर्गांवर सांजप्रहर दाटत होता. दुसरीकडे समोर होती काळू नदीची दरी.
ट्रेकर्सना स्वतःची पाठ थोपटवून घ्यायची सवय नसते, पण त्या क्षणी करोली घाटाची कसली मोठ्ठी परिक्रमा पालथी घातलीये, हे बघून थक्क व्हायला झालं. भटकंतीचा पहिला दिवस करोली घाटातला सह्याद्रीचा पॅनोरमा अन् सांधण घळीच्या थरारक दर्शनाने सार्थकी लागला होता...
सह्याद्रीतलं अद्भूत दुर्गरत्न ‘रतनगड’ - त्र्यंबक द्वाराने
दुस-या दिवशीचा पल्ला थोडासा लांबचा होता. गडाच्या उत्तरेच्या त्र्यंबक द्वाराने रतनगड, दुर्गदर्शन करून गड पूर्वेकडच्या गणेश द्वाराने उतरायचा. अन् घनदाट रानातून कात्राबाई खिंडीच्या मार्गे कुमशेतला मुक्कामी पोहोचायचं होतं.
साम्रद गावातून रतनगड विलक्षण देखणा दिसतो. (खालचं प्र.चि. आदल्या दिवशीचं आहे.)
साम्रद गावातून रतनगडची वाट झक्क मळलेली.
कळसूबाई रांगेवर अलगद ऊष:प्रभा उजळू लागली. सहज गुणगुणू लागलो, “पूरब से सूर्य उगा फैला उजियारा, जागी हर दिशा दिशा जागा जग सारा...”
धारेवर पोहोचल्यावर रतनगडाच्या उत्तर अंगाचे सणसणीत कडे जवळून दिसले. गडाच्या माथ्याजवळ उजवीकडच्या घळीतून त्र्यंबक द्वाराची वाट आहे. माथ्यावर किंचित टेकून सूर्यकिरणे निसटत होती.
गडापासून किंचित सुटावलेला ‘खुट्टा’ सुळका आपल्याच तो-यात हरवला होता.
खुट्ट्याच्या उजवीकडून निसरड्या दगड-धोंड्यांवरून उभी वाट चढू लागली.
खुट्टा सुळका आणि रतनगड यांना जोडणा-या धारेवर आम्ही उभे होतो.
गवताळ आडव्या वाटेनं जाताना रतनगडाकडून ‘बाण’ सुळक्याकडे कोसळलेल्या दरीचं रौद्र अन् खोलवर दर्शन झालं.
कातळमाथ्याच्या पोटातून धम्माल आडवी वाट होती. धोकादायक कुठेच नाही.
एवढ्या काळ्याकभिन्न कातळपट्ट्यामधून आता माथ्याकडे जाणारी वाट कशी असेल, याची उत्सुकता मनात होती. कातळाला छेदणा-या एका जलौघानं कोरलेल्या घळीतून त्र्यंबक द्वाराच्या अरुंद उभ्या पाय-या खणल्या आहेत. पाठीमागची खोSSSल दरी, पाठीवरचं ओझं, मनातली थोडीशी भीती अन् उभ्या पाय-यांवर लागणारी धाप – सगळ्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत त्र्यंबक द्वार गाठलं.
दारात सामोरं आलं सुरेख दृश्य अन् भणाणणारा वारा.
“प्रौढप्रतापपुरंदर....” अशी घोषणा देऊन राजांचं स्मरण केलं. साम्रद वरुन त्र्यंबक द्वाराच्या वाटेने रतनगडावर पोचायला दोन तास लागले होते.
माथ्यावरून कळसूबाई रांग अन् अलंग-मदन-कुलंग दुर्ग, भंडारदरा जलाशय अन् गडाचा साथी खुट्टा सुळका असं प्रसन्न दृश्य सामोरं आलं.
रतनगडाच्या नेढ्यापलीकडे पाबरगड अन् घनचक्कर पर्वत डोकावले.
आम्ही गेले दोन दिवस कुठल्या डोंगर-द-यांमध्ये भटकतोय, याचा कॅनव्हास..
गडावरची असंख्य टाकी.. पाण्यासाठी उपयुक्त आहेतंच, पण ही टाकी तटबंदीच्या कामासाठी लागणा-या दगडाच्या खाणीच खरं तर...
कोरीव खोली/ गुहा – पहारेक-यांसाठी असू शकेल.
कोकणदरवाजा, राणीचा हुडा (गोल बुरुज) अन् पाण्याची टाकी मागे टाकून आम्ही गडाच्या दक्षिणे टोकाला पोहोचलो. कात्रा अन् आजोबा पर्वताच्या कोकण कड्यांचं विलक्षण रौद्र अन् खोलवर दर्शन झालं.
गणेशद्वारापासून पुढे जात गुहेमधल्या रत्नाबाईचं दर्शन घेतलं. इथे प्रवरा नदीचा प्रतीकात्मक उगम होतो, असं मानतात. मुक्कामास आलेल्या पर्यटकांनी गुहेची दुर्दशा केली होती.
गडाच्या पूर्व द्वारांवर काही प्रतिकचिन्हे आहेत. त्यात भैरव, गणेश, मारुती, विष्णूचा मत्स्यावतार ओळखू आला.
सह्याद्रीतलं अद्भूत दुर्गरत्न ‘रतनगड’ आता सोडायची वेळ झाली होती.
रतनगडाच्या उत्तरेच्या घाटघर – साम्रद पासून निघून दक्षिणेला कुमशेतमार्गे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याच्या पाचनई गावाला जाणारी वाट इंग्रजांनी वापरात आणली होती. या मार्गावरचे मैलाचे दगड अजूनही कुठे कुठे सापडतात. रतनगडच्या पूर्वेकडे २०० मी उतरल्यावर रतनवाडीला उतरणारी वाट सोडली, दक्षिणेला (उजवीकडे) जाणारी घाटघर – पाचनई वाट निवडली. दोन मिनिटांच्या अंतरावर गोड पाण्याची उत्तम सोय असलेलं टाकं दिसलं. पाण्यावरच्या किरकोळ तवंग-वनस्पतीचा उपद्रव नाही. हा पहा, दोन मोबाईल्स अन् इंटरनेटवर मार्केटिंग करणारा साम्रद गावातला आधुनिक वाटाड्या ‘दत्ता भांगरे’.
उत्तम जेवण अन् थोडक्या विश्रांतीनंतर पुढच्या वाटचालीसाठी कूच केलं. रतनगड हळूहळू मागे पडू लागला.
दाट रानापल्याड कात्रा डोंगराच्या पूर्वेच्या ‘अग्निबाण’ सुळक्याला वळसा घालून कात्राबाई खिंडीत आम्हांला पोहोचायचं होतं.
रतनगडच्या प्रेमात पडल्याने पुढे जातानाही ‘मागे परतोनी पाहे...’, असा खेळ चाललेला...
घनदाट रानांतून वाट आडवी धावत होती.
कात्राबाई खिंडीकडे जाण्यासाठी एक महत्त्वाचा फाटा आता लवकरंच लागणार होता. या छोट्याशा खिंडीतून पुढे ट्रॅव्हर्स मारत आलो होतो.
परत एकदा दाट झाडीचे टप्पे सुरू झाले. क्वचित झाडीतून मोकळ्या जागेतून जाणवलं, की अग्निबाण सुळक्याला वळसा घालून आम्ही आता पुढे आलो होतो.
आता आली रतनगड ते हरिश्चंद्रगड ट्रेकमध्ये हमखास वाट चुकावी अशी जागा. समोर जाणारी ठळक वाट सोडून तिरकी उजवीकडे वळणारी वाट आम्ही आता घेतली. अग्निबाण सुळक्याला वळसा घातल्यानंतर हा फाटा १० मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर आहे. (बाकी कुठल्याच सांगण्यासारख्या खूणा नाहीत.)
रतनगडाच्या निम्म्या उंचीवरच्या पाण्याच्या टाक्यापासून एक-सव्वा तासांत कात्राबाई खिंडीजवळ आम्ही पोहोचलो. वाट उभा चढ चढू लागते. पाठीमागे आम्ही चालून आलो, ते रान विलक्षण दिसत होतं.
स्थानिक गिरीजनांचं श्रद्धास्थळ असलेलं ‘कात्राबाई’चं अनगड ठाणं या खिंडीत आहे. वाहिलेले खण-बांगड्या अन् एखादी करवंटी – बस्स, बाकी काही दिखावा नाही.
खिंडीतून पूर्वेला पाबरगड – घनचक्कर; तर दक्षिणेला प्रथमच हरिश्चंद्रगडाचं दर्शन झालं. हरिश्चंद्रगडाला लागूनच होता कलाडगड. तर समोर 'कुमशेतचा कोंबडा' नावाचा सुळका उठावला होता.
कात्राबाई खिंड उतरून सपाटीवर आलो. शेता-शिवारात गहू तरारला होता.
कात्राबाई खिंडीपासून कुमशेत गाव गाठायला दोन तास लागले होते. सह्याद्रीच्या कुशीतलं साधं गाव. ट्रेकर्सचं स्वागत करणारं.
आम्हांला बघून गावातली पोरं कुतूहलानं जमा झाली.
कुमशेतच्या शेताडीमागे आसमंत मोठ्ठा काव्यमय दिसत होता. दिवसभरच्या सणसणीत चढाई-उतराईनं शिणावलेल्या ट्रेकर्सनी शाळेच्या ओसरीत मुक्कामासाठी कॅरीमॅट्स पसरली.
पाय दुखत होते, पण ट्रेकच्या भन्नाट दुस-या दिवशीची दृश्यं डोळ्यांसमोर अजूनही तरळत होती - काय ती त्र्यंबकद्वाराची थरारक वाट, आणि काय ते कात्रा अन् आजोबाचे कराल कडे.. सर्वात मज्जा आली होती कुमशेतच्या वाटेवरच्या रानव्यामध्ये.
थंडी दणक्यात पडली होती. कुमशेतची कुत्री बिबट्याला घाबरत नाहीत, पण आता ती दचकत होती दमलेल्या ट्रेकर्सच्या घोरण्याच्या आवाजाने!!!
हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर - मुळा खो-याचा स्वर्गीय परिसर
तिस-या दिवशी कुमशेत गावचा निरोप घेऊन हरिश्चंद्रगडाकडे कूच केलं. गवताळ माळापल्याड कलाडगड अन् त्याच्यामागे हरिश्चंद्र पर्वत दिसत होता.
वाटेवरचा कोरीव दगड बघून थबकलो. मग आठवलं, आपण घाटघर ते पाचनई या इंग्रजांनी वापरत आणलेल्या वाटेवर आहोत. त्यावरचे हे मैलाचे दगड. दगडावर इंग्रजीत लिहिलंय ‘Samrad 12 | Pachnai 6’.
पुढच्या दहा मिनिटात एक अतिशय देखणं दृश्य आमच्या समोर आलं. अल्लड नदी ‘मुळा’ (पुण्याजवळची नव्हे) वळणवेडी डोंगर-वळया कातत कातत आपलं खोरं बनवत गेली होती. पावसाळ्यात ‘कशी काळ नागिणी..’ असं रूप धारण करून पाण्याचा ध्रोन्कार काय भयंकर वाहत असेल, याची कल्पनाच करवत नाही.
दाट झाडो-यानं मढवलेलं मुळा नदीचं खोरं प्रसन्न करून गेलं..
मुळा नदीच्या पात्रामध्ये ‘तुम्ही हरिश्चंद्रगडाला जात असले’ अश्या दगडावरच्या खुणेचा कौतुकसोहळा झाला.
मुळा नदीचं पात्र विलक्षण रम्य. फोटोत तितकीशी कल्पना येणार नाही, पण मी सह्याद्रीमध्ये पाहिलेल्या अल्प ठिकाणांपैकी प्रेमात पडलो असलेली एक ठेवणीतली जागा.
ब्रम्हानंदी टाळी लागावी अशी! Solitude!!!
निवांत डुंबून ताजेतवाने झालो.
मुळा नदी उतारावर दोन-तीनदा पार करून, पुढे चढ चढून ‘पेठेच्या वाडी’ला पोहोचलो. कुमशेतपासून दीड तासाची अप्रतिम चाल!!! मागे वळून कुमशेतचा कोंबडा अन् मुळा नदीच्या अनवट खो-याला अलविदा केलं.
हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर पुढचा टप्पा आहे - पेठेच्या वाडीपासून दोन तासांच्या चालीने पाचनईला पोहोचणं. वाटेत उभ्या निसरड्या वाटेचा कलाडगड अन् मागे न्हापता हे देखणं शिखर दिसतं.
पाचनईपासून चढणारी हरिश्चंद्रगडाची रम्य वाट सुपरिचित आहेच.
कातळकड्याच्या पोटातून चालत जाण्याची मज्जा अनुभवताना, रतनगडाच्या त्र्यंबक द्वाराजवळचा असाच टप्पा अन् तिथला थरार आठवतो.
हरिश्चंद्रगडावर उगम पावून मुळा नदीला मिळणा-या मंगळगंगा नदीच्या घळीजवळ वाट पोहोचते. समोरचा हरिश्चंद्रचे डोंगर उतार अन् रानवा मोहवतो.
मंगळगंगेच्या न्हाणीपाशी पाण्याच्या रांजणकुंडात पाणनिवळ्या उगाच लगबगीत असतात. मोठ्ठं निवांत अन् प्रसन्न वातावरण.
दाट रानातून चढून गेल्यावर तारामती शिखराच्या पायथ्याचं हरिश्चंद्रेश्वराचं अफलातून राऊळ - पाण्यामधलं शिवपिंड - कोकणकडा बघून सगळे कष्ट विसरून जातो.
सूर्य पश्चिमेला कललेला असतो. आपल्या मनाचं पाखरू मात्र अजूनही रुंजी घालत असतं ट्रेकच्या चढ-उतारांवर..स्थळ-काळ-वेळ विसरून मनसोक्त घुम्मचक्करी केली होती.
करोली घाटातलं सह्याद्रीचं भव्य पॅनोरमा दृश्य बघून शहारलो..
उत्तमोत्तम दुर्ग-मंदिरांमध्ये रमलो..
गिरिजनांच्या साध्या-भोळ्या-निर्व्याज प्रेमानं भारावलो..
कधी अनुभवला सांधण घळीचा थरार..
तर कधी नजर गरगरली रतनगडच्या द-यांमध्ये..
कानामध्ये वारं भरलेल्या वासरागत उधळलो..
कुमशेतच्या वाटेवर गच्च रानव्यामधला पाचोळ्याचा चुबुक-चुबुक आवाज आठवतोय..
मुळा खो-याचा स्वर्गीय परिसर अनुभवून मंत्रमुग्ध झालोय...
आजा पर्वताच्या कुशीत आकाशाच्या टोपातलं तारांगण कवतिकानं पाहिलंय...
चुलीजवळच्या रंगलेल्या जुन्या-नवीन ट्रेक्सच्या गप्पांमध्ये रमलो..
ऊर् धपापेपर्यंत चढाई-उतराई केली..
तहानल्यावर कुंडातलं पाणी वाघारासारखं लप-लप करत प्यालं..
खरं सांगू, सह्याद्रीच्या नंदनवनाची ‘रानभूल’ अजूनही मनावर गारुड करतीये…
पूर्वप्रकाशित: http://discoversahyadri.wordpress.com/2014/01/04/karolighat_sandhan_rata...
- © Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे) 2014
फारच सुंदर .....तुमच्या सोबत
फारच सुंदर .....तुमच्या सोबत माझी हि सफर झाली ...हे सगळ वाचून
फोटो हि अप्रतिम !
डिस्क्या जळवतोयस
डिस्क्या जळवतोयस रे!!!!!
रच्याक ने... जबरदस्त वर्णन रे.. भारी वाटल वाचुन.. पुन्हा एकदा सह्याद्रीचि सफर घडवलिस.. त्या बद्दल आभार भावा...
वेडसह्याद्रीचे:: तुम्हांला हा
वेडसह्याद्रीचे:: तुम्हांला हा भटकंती वृतांत आवडला, हे वाचून आनंद झाला. खूप धन्यवाद!!!
कोकण्या:: हा हा, खरंतर हा ट्रेक ब्लॉग लिहिण्याचा हेतू म्हणजे, आपला सह्याद्री सोडून अमेरिकेत रमणा-यांना जळवणे हाचं.. चला, ते जमलंय
प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!!!
खूपच भारी फोटो!
खूपच भारी फोटो!
अहा... कसला भारी ट्रेक...
अहा... कसला भारी ट्रेक... हेवा वाटावा असाच. स्मित
फोटो वृत्तांत आवडला.>>+१००
तुझ्या लिखाणात जादू आहे रे
तुझ्या लिखाणात जादू आहे रे मित्रा ...... अग्दी गुंगवून टाकतोस ....
सह्याद्रीचे प्रेम तर शब्दाशब्दातून निथळत आहे ........
ग्रेट, ग्रेट ..... अनेक शुभेच्छा व लिखाणाकरता मनापासून धन्स .....
वाह!! क्या बात
वाह!! क्या बात है!!!
शशांक+१
हॅट्स ऑफ टू ऑल ट्रेकर्स!!
अहाहा, कस्ली मस्त दृष्ये
अहाहा, कस्ली मस्त दृष्ये आहेत.
कष्टपूर्वक हा ट्रेक पूर्ण करुन त्याहुन जास्त कष्टपूर्वक** हे फोटो इथे मायबोलिचीच सुविधा वापरुन डकवलेत, इथे मांडलेत, बसल्याजागी सैर करवुन आणलित, त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद
** असे म्हणायचे कारण की, इथे अपलोड करतान फोटोचा मूळ जास्त पिक्सल्स्/केबी कमी करुन १५० केबीमधे बसवायला लागतो, त्यामुळे बहुतेकजण पिकासा वगैरे बाह्य ठिकाणी टाकलेल्या फोटोन्च्या नुस्त्या लिन्का देतात, बहुधा ते जास्त सोप्पे असावे, इव्हन पिकासावर फोटु अपलोड करणेही सोप्पे असावे.
ट्रेकर्स!.. त्रिवार मानाचा
ट्रेकर्स!.. त्रिवार मानाचा मुजरा
खुपच मस्त फोटो आणि
खुपच मस्त फोटो आणि वर्णन
अमोल केळकर
- दैत्य, कविन, वर्षू नील,
- दैत्य, कविन, वर्षू नील, vinayakparanjpe, अमोल केळकर:: तुम्हांला हा भटकंती वृतांत आवडला, हे वाचून आनंद झाला. खूप खूप धन्यवाद..:)
- limbutimbu:: माझा स्वतंत्र ब्लॉग आहेच, पण खरी दाद अन् आनंद मिळतो मायबोलीवरच्या सह्याद्रीमित्रांपर्यंत सह्याद्रीची अनुभूती पोहोचवल्यावर.. मन:पूर्वक धन्यवाद!!!
- शशांकजी:: अग्गदी मनापासून अनुभवलेले क्षण असल्याने, ते काही वर्षांनंतर वाचतानाही परत अनुभवता यावेत, अन् दोस्तांपर्यंत पोहोचवावेत, म्हणून हा लिखाणाचा खटाटोप.. तुमच्यासारख्या दर्दी वाचकांची दाद मोलाची..
फोटो वृत्तांत आवडला.>>+१०००
फोटो वृत्तांत आवडला.>>+१०००
तुम्हा लोकांचा हा ट्रेकिंग
तुम्हा लोकांचा हा ट्रेकिंग ग्रुप पब्लिक आहे का private ? पब्लिक असेल तर यायला आवडेल आम्हाला पण. तसा प्लान अगोदर कळू शकेल का?
नुतनजे:: खूप धन्यवाद अमित
नुतनजे:: खूप धन्यवाद
अमित M.:: आमचा ट्रेकर मित्रांचा ग्रूप आहे, पण ट्रेक्स आयोजित करत नाही.. ब्लॉग वाचून आमच्याबरोबर ट्रेक करावासा वाटला, हे वाचून मस्त वाटलं। धन्यवाद!!!
मस्त... मस्त... मस्त...
मस्त... मस्त... मस्त...
मस्त मस्त!!!!! घरात बसून
मस्त मस्त!!!!! घरात बसून ट्रेकचा आनंद लुटला.
खरंच ! घरात बसून ट्रेकिंग
खरंच ! घरात बसून ट्रेकिंग केले . सर्व फोटो मस्त जमून आले आणि त्या त्या ठिकाणचे स्पष्टीकरण हि छान केलेले आहे .....
आमचे ट्रेकिंग राजमाची , लोहगड आणि वासोटा च्या पुढे कधी गेलेच नाही
पण तुमच्या या धाग्या मुळे पुन्हा ते दिवस आठवले !
शरीरात धमक आहे तो पर्यंत मस्त फिरा मंडळी !
Pages