वॅलेंटाईन डे ! ___ शतशब्दकथा

Submitted by तुमचा अभिषेक on 9 August, 2013 - 12:04

सालाबादाप्रमाणे येणारा प्रेमदिवस.. उधळायला संस्कृतीरक्षकांची जय्यत तयारी होतीच..
निषेधाचे बॅनर शहरभर लागले होते..

कट्ट्यावरच्या राहुल’चीही तयारी झाली होती.. चॉकलेट परफ्यूम ग्रीटींग अन फुले...
आणखी काय लागते..!

गेल्या तीन वर्षांचा त्याचा रेकॉर्ड होता, एकही वॅलेंटाईन डे फेल गेला नव्हता..
यावेळी मात्र अंदाज फसला.. त्याला हसूनच नकार देत ती पुढच्याकडे वळली..

टाय विस्कटतच त्याने पुष्पगुच्छ जमिनीवर आदळला..
अर्थातच, अपमान अन पराभवाची निशाणी कोणाला आवडते !

ते निघून गेले अन एवढा वेळ जवळच उभी.. नुसतेच बघत असलेली ‘ती’ ... लगबगीने पुढे आली..
पडलेली फुले उचलून हृदयाशी कवटाळली..
डोळ्यात काहीतरी तरळले आणि तिच्याही नकळत दोन अश्रू कोसळले..

तिची अन तिच्या पोरांच्या, आजच्या जेवणाची सोय झाली होती !

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages