गोळाबेरीज अर्थात पुलंची पुण्याई भागिले सर्व काही

Submitted by nikhilmkhaire on 12 February, 2012 - 10:11

झारापकर अभिनंदन
पु.ल. देशपांडे नावाच्या अवलियावर सिनेमा काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल!
--समाप्त--

झारापकर महाराष्ट्राची माफी मागा!

पु.ल. देशपांडे नावाच्या अवलियावर एक टुकार सिनेमा काढल्याबद्दल! अतिशय सुमार पटकथेबद्दल! स्वतः रावसाहेब रंगवल्याबद्दल आणि बाकी सुमार कलाकार निवडीबद्दल! आयटम साँग नावाचा छिचोर प्रकार केल्याबद्दल! निर्माते आणि प्रेक्षक या दोहोंच्या पैशांचा चुराडा केल्याबद्दल! अष्टपैलू या शब्दाला मान मिळवून देणार्‍या या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तीमत्त्वाला साधारण इनोदी लेखक केल्याद्दल... झारापकर किती गुन्ह्यांसाठी तुम्हाला माफी मागावी लागेल याची कल्पना आहे का? ती असती तर असा दर्जाहीन सिनेमा तुम्ही तयार केलाच नसता...

सिनेमाची सुरुवात होते नाटकासारखी किंवा एकपात्री वाचनाच्या कार्यक्रमासाठी तिथे एक जण पु.लं.चं गोळाबेरीज हे पुस्तक वाचत असतो. आणि तिथून पु.लं.च्या जीवनाचा प्रवास उलगडत जातो. अशी आऊटलाईन. आणि वेळोवेळी पु.लं.च्या पुस्तकातली असंख्य पात्र एन्ट्री घेतात. ती का येतात ते अखेरपर्यंत कळत नाही!

सुरुवात होते अविनाश नारकर यांच्या हरीतात्यांपासून! झारापकर, या पहिल्याच प्रसंगाला मला शंका आली की, तुम्ही पु.लं.चं एकही पुस्तक-कथा-वा- लेख वाचला नाही! (आणि नंतर तुम्ही मान्य केलंत की, तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहात आणि तुमच्या वडिलांनी तुम्हाला पु,ल. वाचून दाखवले) अहो, पु.लं.नी प्रत्येक पात्रं एवढं छान रंगवलं आहे की, नुसतं वाचलं तरी ते आख्खं पात्र समोर उभं राहतं. पण तुम्हाला ते कष्ट घ्यायचेच नव्हते. मग तुम्ही चितळे मास्तर आणि दामले मास्तर यांचं अजिब मिक्श्चर करून मोहन आगाशे तयार केले. आणि सुबोध भावे नंदा प्रधान झाला... कशासाठी? आहो, अविनाश नारकर जर हरीतात्या होऊ शकतो आणि सुबोध भावे- नंदा प्रधान तर उद्या सिद्धार्थ जाधव बालगंधर्व म्हणून उभा राहिल्यास नवल ते काय! आणि खुद्द झारापकर, आपण स्वतः रावसाहेबांच्या भूमिकेत आलात त्या शीनचं वर्णन तर काय करावं महाराजा! एवढा कारकुंड्या रावसाहेब? एवढा नाटकी?

निखिल रत्नपारखी नावाचा गुणी नट तुम्ही पु.लं.च्या भूमिकेसाठी निवडलात, तिथेच निम्मी बाजी मारली होतीत. पण त्याला एवढा वाया घालवून तुम्ही काय मिळवलंत मिस्टर झारापकर? अंगविक्षेप करणारे पु.ल.? की तुम्ही त्याला सांगीतलं होतं- बाबा रे, आजवरची सर्वांत वाईट अ‍ॅक्टिंग कर! सुनिताबाईंची आवस्था तर याहून वाईट. त्यांची भूमिका करणार्‍या डॉ. नेहा देशपांडे- कामत (या पु.लं.च्या नात आहेत) यांची भूमिका नक्की काय ते शेवटपर्यंत कळतच नाही. खर्‍या आयुष्यात सुनिताबाईंनी पु.लं.साठी किंवा साथीनं जे काही केलं ते तुम्हाला माहित नसावंच! असतं तर सुनिताबाईंना असं मेणाचं बनवलं नसतंत आणि 'गरिबांविषयी वाईट वाटतं' हा एकच लूक घेऊन त्या आख्ख्या सिनेमाभर वावरल्या नसत्या! मराठी सिनेमाचं बजेट कमी असतं, पण हिरॉईनला दोनच ब्लाऊज घालून आख्ख्या सिनेमाभर वावरायला लागण्याएवढं कमी असतं का हो?

हे झालं अ‍ॅक्टर आणि कॅरेक्टर आता पटकथा की काय घोळ आहे त्याविषयी जरा. पटकथा लिहिली आहे स्वयं सिद्धहस्त लेखक झारापकर यांनी! काय लिहिली आहे. आहाहा! काय ते शिन! घरामध्ये कधी बुंदी पाडून घेतली आहे का झारापकर? त्या बुंदीचे लाडू करतात. आणि समजा तुम्हाला सांगीतलं की 'या लाडवातून बुंदीची पहिली कळी कोणती ती ओळखा'! तर जमेल का हो तुम्हाला? तुम्ही थोर आहात तुम्हाला जमेलही कदाचीत. पण आमच्यासारख्या सोम्या-गोम्यांना नाही जमणार! तुमचा हा सिनेमा बघताना असंच काहीसं होतं. कुठल्याही गोष्टीचा कशाशीही काहीही संबध नाही. हा येतो, तो जातो, मग आणखी एक हा येतो, आणखी एक तो जातो. असं युगानु युगे सुरू असतं. तुमच्यासारख्या पु.ल. न वाचलेल्यांसाठी हा प्रकार म्हणजे पहिली कळी शोधून काढण्यासारखा आहे. मुळात कथा कोणाची आहे? पुलंची की, त्यांच्या पात्रांची? मुळात तुमचा विचार होता की, महाराष्ट्रात काय पु.ल. वाचले नसतील असे माझ्यासारखे (पक्षी: झारपकरांसारखे) चार सहा जणच असतील. बाकीच्यांना कळेलच! बाकीच्यांना कळेल ते तुमचं ढोंग! काही तरी दिव्य करत असल्याचा आव आणण्याचं नाटक! आणि हे नाटक साधण्यासाठी तुम्ही पु.लं.नीच लिहिलेले संवाद जसेच्या तसे वापरले. (त्यातही इनोदी असल्यास प्राधान्य) आणि जिथं स्वतःचे संवाद घालायची वेळ आली, तिथं झारपकर तुमचं पितळ उघडं पडलं आहे. तुम्ही सपशेल लोटांगण घातलं आहे. पु.लं.चे संवाद आणि तुमचे संवाद यांच्यामध्ये "घरची आणि बाजारची वीट" असा वीट येण्याएवढा मोठा फरक आहे.

गाणी म्हणजे त्यांचं संगीत या विषयी मी केवळ अज्ञान म्हणून बोलत नाहीये झारापकर! पण त्याची भरपाई मी चित्रीकरणाविषयी बोलून करेन. कुठल्या मोबाईलच्या कॅमेरात असं शुटिंग जमतं हो? फ्रेम वगैरे काय असतात? कलाकाराच्या गालाचा मुका घ्यावा असे शॉट लावून आधुनिक काळ लपवता येतो का हो? माझे हे प्रश्न अतिशय बाळबोध वाटतील तुम्हाला पण पडले आहेत खरे! एडिटींग नावाचं एक शास्त्र आहे, ते तुम्हाला माहिती आहे का हो? असं म्हणतात की, एडिटरच्या पाठीमध्ये कणा नावाची एक जागा असेल तर तो सिनेमाच्या कसल्याही फुटेजमधून जादू घडवून दाखवतो. तसा एखादा एडिटर भेटल्यास नक्की कळवेन.

आज खरोखरंच रावसाहेब असायला हवे होते... त्यांनी योग्य शब्दामध्ये आमच्या भावना पोचवल्या असत्या... पण एकुणच काय पु.लं.ना सिनेमा नावाचं माध्यम लाभलं नाही. ते असतानाही आणि दुर्दैवानं, आपल्यासारख्या थोरामुळं... ते नसतानाही.

पण झारपकर तुम्ही घाबरू नका! "डोक्याला ताप नको" असं म्हणत सिनेमाला जाणारी आणि "लंच ब्रेकमध्ये" अण्णा हजारेंना पाठिंबा देणारी एक निर्बुद्ध पिढी जन्माला आली आहे... मोठी झाली आहे आणि नुसतीच मोठी झाली नाही तर फोफावली आहे. तिला तुमचे हे माकडचाळे नक्की आवडतील.

असो... आता यानंतर अत्र्यांवर सिनेमा काढा तेही फारफार विनोदी होते. व्हेरी फ्फन्नी, यु नो!

--समाप्त--

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदीमध्ये असाच शेंडा बुडखा नसलेल्या कथा घेऊन दस कहानिया , डर्ना मना है बनले तर किती कौतुक, वेगळा प्रयोग म्हणूण... तसे दहा दहा मिनिटाच्या स्वतंत्र कथा काढायला हव्या होत्या का? तुम्ही काढून दाखवा तसा... आम्ही मग मायबोलीवर समीक्षण नक्कीच लिहू Proud

पण झारपकर तुम्ही घाबरू नका! "डोक्याला ताप नको" असं म्हणत सिनेमाला जाणारी आणि "लंच ब्रेकमध्ये" अण्णा हजारेंना पाठिंबा देणारी आणि त्यातूनही वेळ उरलाच तर मायबोलीवर चित्रपट समीक्षेच्या नावाने टिनपाट धागे काढणारी एक निर्बुद्ध पिढी जन्माला आली आहे..

हं... आता बरोबर आहे.

सुनिताबाईंची आवस्था तर याहून वाईट. त्यांची भूमिका करणार्‍या डॉ. नेहा देशपांडे- कामत (या पु.लं.च्या नात आहेत) यांची भूमिका नक्की काय ते शेवटपर्यंत कळतच नाही. खर्‍या आयुष्यात सुनिताबाईंनी पु.लं.साठी किंवा साथीनं जे काही केलं ते तुम्हाला माहित नसावंच! असतं तर सुनिताबाईंना असं मेणाचं बनवलं नसतंत आणि 'गरिबांविषयी वाईट वाटतं' हा एकच लूक घेऊन त्या आख्ख्या सिनेमाभर वावरल्या नसत्या! >>> Happy
१०० % अनुमोदन. मला वाटतेय नातीला पु.लं नि नक्कि पुन्हा अभिनयाचे धडे घ्यायला पाठवले असते हा सिनेमा बघुन. पुर्ण सिनेमाभर एकच लुक आहे. अगदिच प्लास्टिक फेस आणि हावभाव सुद्धा.

स्पष्टच सांगायचं म्हणजे, पुस्तकातून पुलं वाचताना जी अनुभूती येते ती प्रत्यक्ष पुलंच्या अभिवाचनात देखील येत नाही. पुलं देखील स्वतःच्या सादरीकरणात कमीच पडलेत , पंचेस देखील जोरकसपणे घेता आलेले नाहीत ...

सुनीताबाईंचं पात्र दिग्दर्शकानेच तसे उभे केले असेल. इथे म्हटलंय : "But it's even worse in its imagining of the character of Pu.La's wife, Sunita Deshpande, a formidable woman with a distinct identity who is reduced to serving tea, picking up after her husband and watching him fondly as he spouts his famous lines"

इंद्रायणी काठीच्या ध्वनिमुद्रणाचे दृश्य चांगले वठलेय म्हणे. पं भीमसेन जोशींच्या भूमिकेत कोण आहे? आणि पार्श्वगायन कोणाचे आहे?

Pages