गोळाबेरीज अर्थात पुलंची पुण्याई भागिले सर्व काही

Submitted by nikhilmkhaire on 12 February, 2012 - 10:11

झारापकर अभिनंदन
पु.ल. देशपांडे नावाच्या अवलियावर सिनेमा काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल!
--समाप्त--

झारापकर महाराष्ट्राची माफी मागा!

पु.ल. देशपांडे नावाच्या अवलियावर एक टुकार सिनेमा काढल्याबद्दल! अतिशय सुमार पटकथेबद्दल! स्वतः रावसाहेब रंगवल्याबद्दल आणि बाकी सुमार कलाकार निवडीबद्दल! आयटम साँग नावाचा छिचोर प्रकार केल्याबद्दल! निर्माते आणि प्रेक्षक या दोहोंच्या पैशांचा चुराडा केल्याबद्दल! अष्टपैलू या शब्दाला मान मिळवून देणार्‍या या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तीमत्त्वाला साधारण इनोदी लेखक केल्याद्दल... झारापकर किती गुन्ह्यांसाठी तुम्हाला माफी मागावी लागेल याची कल्पना आहे का? ती असती तर असा दर्जाहीन सिनेमा तुम्ही तयार केलाच नसता...

सिनेमाची सुरुवात होते नाटकासारखी किंवा एकपात्री वाचनाच्या कार्यक्रमासाठी तिथे एक जण पु.लं.चं गोळाबेरीज हे पुस्तक वाचत असतो. आणि तिथून पु.लं.च्या जीवनाचा प्रवास उलगडत जातो. अशी आऊटलाईन. आणि वेळोवेळी पु.लं.च्या पुस्तकातली असंख्य पात्र एन्ट्री घेतात. ती का येतात ते अखेरपर्यंत कळत नाही!

सुरुवात होते अविनाश नारकर यांच्या हरीतात्यांपासून! झारापकर, या पहिल्याच प्रसंगाला मला शंका आली की, तुम्ही पु.लं.चं एकही पुस्तक-कथा-वा- लेख वाचला नाही! (आणि नंतर तुम्ही मान्य केलंत की, तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहात आणि तुमच्या वडिलांनी तुम्हाला पु,ल. वाचून दाखवले) अहो, पु.लं.नी प्रत्येक पात्रं एवढं छान रंगवलं आहे की, नुसतं वाचलं तरी ते आख्खं पात्र समोर उभं राहतं. पण तुम्हाला ते कष्ट घ्यायचेच नव्हते. मग तुम्ही चितळे मास्तर आणि दामले मास्तर यांचं अजिब मिक्श्चर करून मोहन आगाशे तयार केले. आणि सुबोध भावे नंदा प्रधान झाला... कशासाठी? आहो, अविनाश नारकर जर हरीतात्या होऊ शकतो आणि सुबोध भावे- नंदा प्रधान तर उद्या सिद्धार्थ जाधव बालगंधर्व म्हणून उभा राहिल्यास नवल ते काय! आणि खुद्द झारापकर, आपण स्वतः रावसाहेबांच्या भूमिकेत आलात त्या शीनचं वर्णन तर काय करावं महाराजा! एवढा कारकुंड्या रावसाहेब? एवढा नाटकी?

निखिल रत्नपारखी नावाचा गुणी नट तुम्ही पु.लं.च्या भूमिकेसाठी निवडलात, तिथेच निम्मी बाजी मारली होतीत. पण त्याला एवढा वाया घालवून तुम्ही काय मिळवलंत मिस्टर झारापकर? अंगविक्षेप करणारे पु.ल.? की तुम्ही त्याला सांगीतलं होतं- बाबा रे, आजवरची सर्वांत वाईट अ‍ॅक्टिंग कर! सुनिताबाईंची आवस्था तर याहून वाईट. त्यांची भूमिका करणार्‍या डॉ. नेहा देशपांडे- कामत (या पु.लं.च्या नात आहेत) यांची भूमिका नक्की काय ते शेवटपर्यंत कळतच नाही. खर्‍या आयुष्यात सुनिताबाईंनी पु.लं.साठी किंवा साथीनं जे काही केलं ते तुम्हाला माहित नसावंच! असतं तर सुनिताबाईंना असं मेणाचं बनवलं नसतंत आणि 'गरिबांविषयी वाईट वाटतं' हा एकच लूक घेऊन त्या आख्ख्या सिनेमाभर वावरल्या नसत्या! मराठी सिनेमाचं बजेट कमी असतं, पण हिरॉईनला दोनच ब्लाऊज घालून आख्ख्या सिनेमाभर वावरायला लागण्याएवढं कमी असतं का हो?

हे झालं अ‍ॅक्टर आणि कॅरेक्टर आता पटकथा की काय घोळ आहे त्याविषयी जरा. पटकथा लिहिली आहे स्वयं सिद्धहस्त लेखक झारापकर यांनी! काय लिहिली आहे. आहाहा! काय ते शिन! घरामध्ये कधी बुंदी पाडून घेतली आहे का झारापकर? त्या बुंदीचे लाडू करतात. आणि समजा तुम्हाला सांगीतलं की 'या लाडवातून बुंदीची पहिली कळी कोणती ती ओळखा'! तर जमेल का हो तुम्हाला? तुम्ही थोर आहात तुम्हाला जमेलही कदाचीत. पण आमच्यासारख्या सोम्या-गोम्यांना नाही जमणार! तुमचा हा सिनेमा बघताना असंच काहीसं होतं. कुठल्याही गोष्टीचा कशाशीही काहीही संबध नाही. हा येतो, तो जातो, मग आणखी एक हा येतो, आणखी एक तो जातो. असं युगानु युगे सुरू असतं. तुमच्यासारख्या पु.ल. न वाचलेल्यांसाठी हा प्रकार म्हणजे पहिली कळी शोधून काढण्यासारखा आहे. मुळात कथा कोणाची आहे? पुलंची की, त्यांच्या पात्रांची? मुळात तुमचा विचार होता की, महाराष्ट्रात काय पु.ल. वाचले नसतील असे माझ्यासारखे (पक्षी: झारपकरांसारखे) चार सहा जणच असतील. बाकीच्यांना कळेलच! बाकीच्यांना कळेल ते तुमचं ढोंग! काही तरी दिव्य करत असल्याचा आव आणण्याचं नाटक! आणि हे नाटक साधण्यासाठी तुम्ही पु.लं.नीच लिहिलेले संवाद जसेच्या तसे वापरले. (त्यातही इनोदी असल्यास प्राधान्य) आणि जिथं स्वतःचे संवाद घालायची वेळ आली, तिथं झारपकर तुमचं पितळ उघडं पडलं आहे. तुम्ही सपशेल लोटांगण घातलं आहे. पु.लं.चे संवाद आणि तुमचे संवाद यांच्यामध्ये "घरची आणि बाजारची वीट" असा वीट येण्याएवढा मोठा फरक आहे.

गाणी म्हणजे त्यांचं संगीत या विषयी मी केवळ अज्ञान म्हणून बोलत नाहीये झारापकर! पण त्याची भरपाई मी चित्रीकरणाविषयी बोलून करेन. कुठल्या मोबाईलच्या कॅमेरात असं शुटिंग जमतं हो? फ्रेम वगैरे काय असतात? कलाकाराच्या गालाचा मुका घ्यावा असे शॉट लावून आधुनिक काळ लपवता येतो का हो? माझे हे प्रश्न अतिशय बाळबोध वाटतील तुम्हाला पण पडले आहेत खरे! एडिटींग नावाचं एक शास्त्र आहे, ते तुम्हाला माहिती आहे का हो? असं म्हणतात की, एडिटरच्या पाठीमध्ये कणा नावाची एक जागा असेल तर तो सिनेमाच्या कसल्याही फुटेजमधून जादू घडवून दाखवतो. तसा एखादा एडिटर भेटल्यास नक्की कळवेन.

आज खरोखरंच रावसाहेब असायला हवे होते... त्यांनी योग्य शब्दामध्ये आमच्या भावना पोचवल्या असत्या... पण एकुणच काय पु.लं.ना सिनेमा नावाचं माध्यम लाभलं नाही. ते असतानाही आणि दुर्दैवानं, आपल्यासारख्या थोरामुळं... ते नसतानाही.

पण झारपकर तुम्ही घाबरू नका! "डोक्याला ताप नको" असं म्हणत सिनेमाला जाणारी आणि "लंच ब्रेकमध्ये" अण्णा हजारेंना पाठिंबा देणारी एक निर्बुद्ध पिढी जन्माला आली आहे... मोठी झाली आहे आणि नुसतीच मोठी झाली नाही तर फोफावली आहे. तिला तुमचे हे माकडचाळे नक्की आवडतील.

असो... आता यानंतर अत्र्यांवर सिनेमा काढा तेही फारफार विनोदी होते. व्हेरी फ्फन्नी, यु नो!

--समाप्त--

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परीक्षणातून तुमच्या मनातली कळकळ समजली.......
अजुन मी नाही पाहीला हा चित्रपट...पण वरचं सगळं वाचुन आता पाहावासा पण वाटत नाहीये....:-(

आमचं वाईफ गेलं होतं पहिल्याच दिवशी हा शिणुमा बगायला. आम्चं वाईफ म्हणजे नुस्त्या करमणुकीसाटीच जातं बघा. कला दर्जा वगैरे भानगडी त्याला माहीत नाहीत. पुलंना /त्यांच्या संबंधित कलाकृतीना चांगलं म्हटलं नाहीतर लोक वेड्यात काढतात एवढं माहीत. तर ते जाऊन सोड्डा हो. तर आमचं वाईफ देखील लै बोअर सिनेमा, त्याला लिंक अशी नाहीच. आणि पहिल्याच खेळाला माणसं पण नव्हती असा रिपोर्ट घेऊन आलं की हो आमचं वाइफ !

मित्रा धन्यवाद,
स्पष्ट परीक्षण लिहिल्या बद्दल आणि आमचा वेळ आणि पैसा वाचवल्या बद्दल सुद्धा
विनायक परांजपे

<< पण वरचं सगळं वाचुन आता पाहावासा पण वाटत नाहीये.... >> उलट, मला कुतूहल निर्माण झालंय, खरंच इतका चुथडा कुणी करूं शकतो इतक्या चांगल्या विषयाचा [ विषयाला पूर्ण न्याय देण्याचं शिवधनुष्य पेलणं अर्थात कठीणच ], इतके सारे कसलेले अभिनेते घेऊन !!! पाहिल्याशिवाय नाही मत व्यक्त करता येणार.

परवा गोळाबेरीजच्या प्रिमिअरला जायचा योग आला. आयटेम सॉन्ग सुरु झाल्यानंतर सुन्न होवून मध्यंतरात घरी आलो व सुटकेचा नि:श्वास टाकला. आदरणीय पुल आणि सुनिताबाई ...खरच या सर्वांना माफ करा. आम्ही ह्या असल्या सिनेमाला गेलो म्हणून आम्हालाही. पुलंच्या कलाकृतीला कोणीही...खरंच कोणीही हात लावू नये...त्यांच्या पुस्तकांची व कथाकथनाची पारायणे केलेल्या आमच्यासारख्या त्यांच्या भक्तांच्या मनात ती पात्रे व तो स्थळ-काळ जसा उभा आहे तो कायम तसाच रहाणार आहे. कोणा क्षितिज झारापकरच्या मनाप्रमाणे त्यात बदल नाही होऊ शकत. ह्या कला़कृतींना ह्या असल्या हल्ल्यांपासून वाचवले पाहिजे.

<< "डोक्याला ताप नको" असं म्हणत सिनेमाला जाणारी आणि "लंच ब्रेकमध्ये" अण्णा हजारेंना पाठिंबा देणारी एक निर्बुद्ध पिढी जन्माला आली आहे... >> जेंव्हा इतराना असं म्हणून कुणी स्वतःचं मत इतरांच्या गळीं उतरवूं पहातो, तेंव्हा मीं खूप सावध होतो ! निर्बुद्ध म्हणून कां होईना पण, वर म्हटल्याप्रमाणे, मोहन आगाशे, प्रभावळसारखी मातब्बर मंडळी असलेला हा सिनेमा मी पहाणार व मगच माझं मत ठरवणार ! Wink

फार उत्सुकता होती या चित्रपटाबद्दल... पण ...पण वरचं सगळं वाचुन आता पाहावासा पण वाटत नाहीये....

अगदी कळकळीनं लिहिलंय.
पण समहाऊ मला या सिनेमाचा असाच काहीसा रिपोर्ट अपेक्षित होता. याची वर्तमानपत्रात प्रथम जेव्हा जाहिरात पाहिली तेव्हा मला पहिला प्रश्न हाच पडला होती की ही सगळी विविध ढंगी पात्रं सिनेमात एकत्र कशी काय आणणार? त्यांना एकत्र कसं गुंफणार? 'पु.लं.' ही एक गोष्ट सोडली तर त्यांच्यात समान असा धागा काहीच नाही, त्यापेक्षा मग मालिका बनवायची. (हा प्रयत्न अल्फा-मराठीवर झाला होता. पण तेव्हा गुजराथमधे मराठी च्यानलं दिसत नसल्यामुळे मला पहायला मिळाला नव्हता. ज्यांनी-ज्यांनी ती मालिका पाहिली होती त्यापैकी बहुतेकांना ती आवडली नव्हती, पण पु.लं.वरच्या प्रेमापोटी कुणी त्याला शिव्याही घातल्या नव्हत्या - असं मला आठवतंय.)

हुश्श! 'हा सिनेमा पहायचाच' हा चिरंजिवांचा आग्रह मोडीत काढल्याबद्दल मला हायसं वाटतंय!
आता मी आनंदानं 'शाळा' सिनेमा पहायला मोकळी. Wink

पाहील्याशिवाय काय बोलणार ? पण काही साहीत्यकृतींचा सिनेमा होऊ शकत नाही हे खरंच. स्टार प्रवाह वर नारायण धारप यांच्या कथांवर आधारीत एक मालिका सुरू आहे. वाचताना या कथांनी घांम फोडला होता सर्वांगाला.. टीव्हीवर पाहताना एक विनोदी कथा पाहतोय असं वाटतं. दोष माध्यमाचा कि क्षमतेचा हे नाही सांगता येत.

दोष माध्यमाचा कि क्षमतेचा हे नाही सांगता येत. >>> निरनिराळ्या माध्यमांची ताकद, कमकुवत बाजू आणि कुठल्याही दोन माध्यमांतला फरक - हे न ताडणे हा दोष

निखिल, चांगलं लिहिलंयस. सिनेमा बघितल्याशिवाय बाकी काही बोलणं योग्य नाही. बघणारा चित्रपटाला वाईट म्हणून कशीही परखड टिका करूच शकतो. तू म्हणतोयस तसं सगळं प्रकरण फसलेलंच असू शकतंच कदाचित मात्र दिग्दर्शक म्हणून झारापकरांनी घेतलेल्या स्वातंत्र्याबद्दलचा आक्षेप अयोग्य आहे.
हे तुला सांगावं लागावं?

जेंव्हा इतराना असं म्हणून कुणी स्वतःचं मत इतरांच्या गळीं उतरवूं पहातो, तेंव्हा मीं खूप सावध होतो <<<
एखाद्या कलाकृतीबद्दल असेच दाखले देऊन तोंड फाटेस्तो स्तुती केली जाते तेव्हा हेच म्हणाल का?

वर म्हटल्याप्रमाणे, मोहन आगाशे, प्रभावळसारखी मातब्बर मंडळी असलेला हा सिनेमा मी पहाणार व मगच माझं मत ठरवणार<<<
तुमचं मत तुम्हीच ठरवा. इथे कुणी फतवा काढला नाहीये बघू नका म्हणून पण मातब्बर मंडळी असली म्हणजे सिनेमा उत्तम असेलच असं नसतं. किंवा मातब्बर नाव जोडली गेलेली असली की कलाकृतीबद्दल निगेटिव्ह बोलायचंच नाही असंही नसतं.

दोष माध्यमाचा कि क्षमतेचा हे नाही सांगता येत.<<<
केवळ क्षमतेचा.

थोडक्यात बेरीज झाली पण गणित पार चुकलय असच ना ? सिनेमाच्या वृत्तपत्रीय परिक्षणात पण हाच सूर आहे. व्यक्तीचित्रणात्मक सिनेमात अभ्यास महत्त्वाचा. फक्त कलाकारांचाच नव्हे तर दिग्दर्शकाचा सुद्धा. कदाचित तोच झाला नसावा. असो. अजून तरी सिनेमा पाहीलेला नाही. ज्यांनी पाहीलाय त्यांची मते ऐकून 'धजावेन' अस वाटत नाही.

perfect review !!! Atishay tukar banawlay chitrapat!

Impossible nakkich nahiye. Lets hope, Pu La nwar lavkarach ek changala chitrapat milel apalyala

दोष क्षमतेचा
>> + १

<< दोष माध्यमाचा कि क्षमतेचा हे नाही सांगता येत. >>> मला वाटतं, पुस्तक वाचताना आपण स्वतःच्या कल्पनाशक्तीनुसारही व्यक्ती, प्रसंग रंगवत असतो; त्याच्याशीं दिग्दर्शकाने रंगवलेलं सारं जुळणं कठीणच असावं. दुसरं, कथानकावर नाटक, सिनेमा काढणं यापेक्षां लेखकाच्या वेगवेगळ्या व्यक्तीरेखा गुंफून एक कथानक निर्माण करणं महाकठीण काम. आत्तांच असाच एक प्रयत्न असलेलं " सारे प्रवासी घडीचे " नाटक पाहिलं व तिथंही जयवंत दळवींच्या चाहत्यांची कांहीशी अशीच प्रतिक्रिया येणं सहाजिक वाटलं. कदाचित, झारापकरानी ह्या मर्यादा ओळखून अधिक अभ्यास व मेहनत घेणं आवश्यक होतंही असेल पण मला ह्या मर्यादा लक्षांत ठेवून ते किती व कुठे कमी पडले यासाठी हा सिनेमा पहावासा वाटतो, हें खरं. मध्यंतरानंतर नाटक/ सिनेमा सोडून येणं मलाही नवीन नाही पण ते पैसे व तो निर्णय माझा असावा असं मला वाटतं.

पण समहाऊ मला या सिनेमाचा असाच काहीसा रिपोर्ट अपेक्षित होता. याची वर्तमानपत्रात प्रथम जेव्हा जाहिरात पाहिली तेव्हा मला पहिला प्रश्न हाच पडला होती की ही सगळी विविध ढंगी पात्रं सिनेमात एकत्र कशी काय आणणार? त्यांना एकत्र कसं गुंफणार? 'पु.लं.' ही एक गोष्ट सोडली तर त्यांच्यात समान असा धागा काहीच नाही, >>> लले सेम पिंच आता माझा तुला, मी असेच मत ज्योतीकडे व्यक्त केले - "ही सर्व पात्रे एका धाग्यात गुंफणे मुष्कीलच नाही तर नामुमकीनच आहे". तरीही पु.लं.वरील प्रेमापोटी व सर्व पात्रांच्या कथांची परत एकदा ऊजळणी करण्यासाठी चित्रपट जरूर पाहीन.

पुलंना प्रत्यक्ष नाही पण त्यांनी ऐन उमेदीत, दूरदर्शनवर सादर केलेले कार्यक्रम मी बघितले आहे. मी नाही धाडस करणार हा चित्रपट बघायचे. कारण त्या आठवणी अजून ताज्या आहेत.

<< एखाद्या कलाकृतीबद्दल असेच दाखले देऊन तोंड फाटेस्तो स्तुती केली जाते तेव्हा हेच म्हणाल का? >> "हा सिनेमा पहाणारेच खरे रसिक" व " हा सिनेमा पहाणारे निर्बुद्ध" असं म्हणणारे दोन्ही माझ्यासाठी तरी सारखेच ! माझा रोख सिनेमाची स्तुति किंवा त्यावर टीका यावर अजिबात नाही, << "डोक्याला ताप नको" असं म्हणत सिनेमाला जाणारी ...एक निर्बुद्ध पिढी जन्माला आली आहे... >> असं म्हणून जें आपल्याला आवडलं नाही ते बघणारे "निर्बुद्ध", असं म्हणण्यावर आहे !!!

<< इथे कुणी फतवा काढला नाहीये बघू नका म्हणून पण मातब्बर मंडळी असली म्हणजे सिनेमा उत्तम असेलच असं नसतं. >> सिनेमा बघायला जातील ते "निर्बुद्ध" ह्या म्हणण्यापेक्षां फतवा परवडला !!!आणि, मातब्बर मंडळी असली तर इतरांपेक्षां स्वतः पाहून मत बनवणं अधिक योग्य होतं; त्यामुळे सिनेमा उत्तम असेलच, असं नाही म्हणालोय मी.

नीरजा,
दिग्दर्शकानं घेतलेल्या स्वातंत्र्यावर बिलकूलही आक्षेप नाही. आक्षेप आहे तो दांभिकतेवर... स्वातंत्र्य घेताना आपण जबाबदारी साफ विसरतो आहोत, हे लक्षात न येण्यावर! का? आणि कशासाठी? या प्रश्नांची उत्तरं दिग्दर्शकाच्या डोक्यामध्ये पक्की असणं आवश्यक असतं. इथं ती कधीच मिळत नाहीत. पुल. वाचून आणि ऐकून प्रेक्षकांच्या मनामध्ये पात्रांचा एक सर्वसाधारण आकृतीबंध आधीच तयार झालेला आहे. इथं एकीकडं तो ग्राह्य धरला गेला आहे, त्यात गैर काहीच नाही. आजवर वाचलेली, ऐकलेली माणसं पडद्यावर भेटणार या अपेक्षेनं सिनेमा पहावा, तर तिथं दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य समोर येतं आणि मग घुसमट होते. प्रेक्षकांची आणि पात्रांचीही...

भाऊ नमसकर,
आपल्या तिकिटाचे पैसे मी भरत नाही, त्यामुळे आपण आपले खुदा, काय! Wink

<< आपल्या तिकिटाचे पैसे मी भरत नाही, त्यामुळे आपण आपले खुदा, काय! >> तुम्हाला काय परमनंट पास मिळालाय, सिनेमांचा व तुमचं ऐकून न वागणार्‍याना 'निर्बुद्ध' ठरवण्याचा ? Wink

<< निर्बुद्ध शब्द भारीच्च टोचलेला दिसतोय >> नाही. आपलं मत मांडताना ज्या इतराना तें आपणही पारखून घ्यावं असं वाटेल, त्याना आधीच ' निर्बुद्ध' म्हणण्याची वृत्ती नाही आवडत, इतकंच !!

निखिल खैरे,

तुमचं परीक्षण आवडलं. माझा एक जुना प्रोजेक्ट मॅनेजर म्हणायचा की प्रोजेक्ट कसा चालवावा याप्रमाणे तो कसा चालवू नये याचीही उदाहरणे अभ्यासायला हवीत. त्या धर्तीवर बेक्कार चित्रपट कसा असतो हे पाहण्यासाठी तरी मी हा पाहीनच! Happy

तुमचे अवलोकन वाचले. त्यात तुम्ही स्वत:ला आळशी, माजोरडा, इत्यादि विशेषणांनी सजवले आहे. मात्र वरील परीक्षणात ती अजिबात जाणवत नाहीत. तरी त्यांना न्याय देईल अश्या जोमदार परीक्षणाची वाट पहाट आहे.
Biggrin

आ.न.,
-गा.पै.

निर्मात्याला पैसे जास्त झाले कि त्याने कुठे डाका घातला होता ? कि पिक्चर बनवणे म्हणजे पीपी प्रेझेंटेशन बनवण्यासारखं सोपं आहे ? कुणीही यावं आणि बनवावा ? कितीतरी पिक्चर्स फसतात, मग काय ते माफी मागतात ? याआधी टुकारातल्या टुकार पिक्चरला माफी मागा अशी मागणी कुणी केली होती अस आठवत नाही. स्वतः पुलंनी तरी केली असती का ?

पिक्चर वाईट असेल पण भाषा जरा अतीच वापरली आहे. इतकं दु:ख झालं असेल तर उठा आणि चांगला पिक्चर काढून दाखवा ना ! सोप्प तर आहे. आणि तुम्हाला नॉलेज आहेच कि. मग आता काय अडलं ?

तेच तर.. पुलंचं वांगमय ऑडिओ विजुअल मध्ये स्टोअर नाही, म्हणून हेच लोक ओरडत असतात.. आता कुणीतरी कसा का होईना प्रयत्न केला तर त्याला दाद द्यायची सोडून असले टिनपाट धागे काढून बसलेत.

.

पिकचर काढला म्हणून दुखावल्या जाणा-या अशा फॅन्सनी याधीच पिक्चर काढून मोकळं व्हायला हवं होतं. ती पोकळी कि काय भरून काढायचं काम मग दुस-या कुणा (पुलं माहीत नसलेल्या ) करंट्या निर्माता दिग्दर्शनाके केलं नसतं. यू मिस्ड द बस..द रिझल्ट इज गोळाबेरीज

Pages