तो नववीत आहे. आपणही नववीतच आहोत. त्याचा वर्ग, मुख्याध्यापक अप्पा, बेंद्रीण बाई, परांजपे बाई, मांजरेकर सर, घंटा देणारा शिपाई असं सगळं कंटा़ळवाणं विश्व आहे. आपलंही असणार! सुर्या, फावड्या, चित्र्या हे जानी दोस्त आणि मिसाळ, बिबिकर, सुकडी, आंबेकर असे ठळक नमुने! हे सगळेही आपलेच! त्याची टिपिकल आई, अंबाबाई, पोराला चक्क समजून घेणारे वडील, त्याचा लाडका नरूमामा - हे तर आपलेच सगे! पण.... त्याला वर्गातली एक मुलगी ज्ज्जाम आवडते. ही गोष्ट तो सगळ्यांपासून लपवतो. मित्रांमध्ये, मामाबरोबर बोलताना प्रेमाबिमाचा विषय निघाला की विषयच बदलतो किंवा निघून जातो, तिच्यासाठी आपल्या दोस्तांनाही बरोबर 'वापरून' घेतो - असं काय काय करतो. पण वेळ येते तेव्हा मात्र तिला थेट सांगतो. आपण केलं होतं असं? आणि ते ही शाळेत असतांना? अर्थात, आता आपण एकमेकांजवळ कबूल करायला हरकत नाही - हो! अनेकदा केलं होतं, पण मनात! कारण मुख्य प्रॉब्लेम हा होता, की 'हे' नक्की काय वाटतंय हे तेव्हा आपल्याला कळलंच नव्हतं! ही मनात जपलेली, आणि काळाच्या ओघात पुसट झालेली 'शाळा' घेऊन दिग्दर्शक सुजय डहाके आपल्याला भेटायला आलाय!
मिलिंद बोकीलांच्या प्रसिद्ध "शाळा" या कादंबरीवर आधारित 'मधल्या सुटी'सह दोन तासांचा 'शाळा' हा चित्रपट म्हणजे गतकाळाची सुंदर सफर आहे. चित्रपटाला कथानक असं विशेष नाही. जे कादंबरीत आहे तेच, पण थोडक्यात आणि प्रभावीपणे! शाळकरी वयातलं भावविश्व, मनात फुलणारे वसंत, अधमुर्या वयातली हिरवळ... असं सगळं सगळं चित्रपटात खूप सुंदर टिपलंय! मुकुंद जोशी (अंशुमन जोशी) या मुलाभोवती फिरणारा हा चित्रपट! पहिल्या परिच्छेदातला 'तो' म्हणजेच हा मुक्या! मग त्याचे दोस्त, त्या प्रत्येकाचं 'सामान', जणू 'त्या' एका मंजिलसाठी जगायच्या इच्छा - अगदी आपल्याही जिव्हाळ्याचं विश्व! शिरोडकर (केतकी माटेगावकर) ही मुक्याची 'लाईन'!
अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर ही निवड अत्यंत अचूक झाली आहे. त्या दोघांचे सीन्स, त्या वयातील भावना, ती उर्मी, लज्जा, एकंदरीत वागणं - केवळ लाजवाब! सर्वात कौतुक म्हणजे, त्या धडधडत्या भावना संवादातून बाहेर येताना कुठेही थिल्लरपणा, उथळपणा झालेला नाही! अत्यंत संयमित तरीही थेट पोचणारा अभिनय करून घेण्यात दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी गुण! एक-दोन ठिकाणी केतकी थोडी भूमिका सोडून बाहेर आल्यासारखी वाटते, पण इट्स ओकेच! ती खूप फ्रेश आणि सुंदरही दिसली आहे! इंटर्वलच्या आधी त्याला 'लाईन' क्लिअर असल्याचं सांगताना, 'चेस'स्पर्धेच्या वेळी 'आता जिंकून टाक' हे सुचवताना तिने दिलेले 'सिग्नल' पाहून थेटर 'खल्लास' होतं हे 'त्या' सरलेल्या वयाचे स्मरणे! अंशुमनचा चेहरा पूर्ण चित्रपटभर छान बोलतो. मुळात त्यांचं खरं वय लक्षात घेतलं तर अभिनयातले अगदी बारकावे माफ करावेसे वाटतात. सुर्या, चित्र्या, फावड्या - एकदम झक्कास! 'चष्मा लावणार्या ढासू मुलांमुळे देशाचं काहीही होत नाही, ते होतं ते या असल्या मुलांमुळेच!' हे सांगणारा नरूमामा (जितेंद्र जोशी) आपल्यालाही हवा होता एवढं वाटतं, ते पुरेच आहे! मुक्याच्या वडिलांच्या भूमिकेत नंदू माधव अगदी मस्त - अगदी समजूतदार बाप! मुख्याध्यापक अप्पा (दिलीप प्रभावळकर), बेंद्रे बाई (देविका दफ्तरदार) ठीक. मांजरेकर सर (संतोष जुवेकर) म्हणजे 'आपले' सर वाटतात. बाकी अमृता खानविलकर का आहे याचं उत्तर बहुधा पहिल्याच प्रसंगात दडलेलं असावं! (तात्पर्य सुरूवात चुकवू नका!)
भाज्यांचे भाव, पात्रांचे वेष, जुनी घड्याळं यातून १९७५ चा काळ छान उभा राहिला आहे. छायाचित्रण, संगीत - ठीकठाक. मुळात चित्रपटाचा प्राण हा त्या वयातलं विश्व असल्यामुळे फोकस तिथेच ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
बाकी अजून सांगण्यासारखं विशेष काही नाही! तुम्ही कादंबरी आधी वाचून नंतर चित्रपट बघायला जात असाल तर उत्तम आणि न वाचता जात असाल तर अति-उत्तम! पण तुम्ही कुठल्याही प्रकारातले असा, अल्लड वयातल्या नागमोडी आणि बहुधा अव्यक वळणांवर भरलेली ही 'शाळा' एकदा नक्कीच बघण्यासारखी आहे!
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.com/)
मस्त. पहायचाच आहे हा सिनेमा.
मस्त.
पहायचाच आहे हा सिनेमा. माझा मुलगा या पुस्तकाचा पंखा आहे. त्यानं गेला आठवडाभर सिनेमा पाहण्यासाठी भुणभूण लावलेली आहेच.
बघायलाच हवा हा सिनेमा छान आणि
बघायलाच हवा हा सिनेमा
छान आणि नेमकं लिहीलं आहे नचिकेत.
पण सिनेमात पुस्तका इतकी मज्जा
पण सिनेमात पुस्तका इतकी मज्जा नाहीये ! सिनेमात 'शाळा' केलीये आणि पुस्तकात शाळेतली 'मज्जा'.
मी पाहिलाय सिनेमा.. आणि चिकवा
मी पाहिलाय सिनेमा.. आणि चिकवा मध्ये लिहिलं सुद्धा. पुस्तक वाचून चित्रपट पहायला गेलं तर अपेक्षाभंग नक्की आहे, पण एकूणात आवडायला हरकत नाही. अंशुमन आणि केतकी उत्तम.. यात वाद नाही. इव्हन सुर्या... पण त्याला अजून वाव देता आला असता.
माझं मत, पुस्तक न वाचता जा, सिनेमा जास्ती आवडेल.
नादखुळाशी सहमत... पुस्तकात
नादखुळाशी सहमत... पुस्तकात मज्जा आहे ती चित्रपटात नाही. बरिचशी सेन्सॉर झाली असेल बहुधा..
कारण सुर्याच्या शिव्या सुद्धा म्यूट केल्यात सिनेमात..
पण पुस्तकातल्या कविता काही शब्दप्रचार... हे सॉलिड आहेत, त्याला व्यवस्थित फाटा दिलाय सिनेमात.
तुम्ही कादंबरी आधी वाचून नंतर
तुम्ही कादंबरी आधी वाचून नंतर चित्रपट बघायला जात असाल तर उत्तम आणि न वाचता जात असाल तर अति-उत्तम!
हे वाक्य कादंबरी वाचून चित्रपट बघायला जाणार्यांसाठीच आहे.
चिकवा मधे वाचलंय खरं आजच..
चिकवा मधे वाचलंय खरं आजच.. बघायचा आहे...!
नच्या, सुरेख लिहील आहेस. तुला
नच्या, सुरेख लिहील आहेस. तुला दहापैकी साडेनऊ गुण.

सिनेमा दोघांवर केंद्रीत असल्याने पुस्तक वाचणार्याची बरीचशी निराशा होऊ शकते. प्रत्येकाने आपापला अभिनय चोख केलाय. पण काही प्रसंगातला त्या दोघांचा अभिनय काबिलेतारीफ आहे. हा सिनेमा पुन्हा आपल्याला शाळेत घेऊन जातो यातच दिग्दर्शकाचं यश दडलय.
आनंद मस्त लिहिलयसं.. तुमच्या
आनंद मस्त लिहिलयसं.. तुमच्या सोबत शाळेत यायल आवडलं असतं पण... आमची शाळा ७ नंतर सुरू होते.
अल्लड वयातल्या नागमोडी आणि
अल्लड वयातल्या नागमोडी आणि बहुधा अव्यक वळणांवर भरलेली ही 'शाळा' एकदा नक्कीच बघण्यासारखी आहे!>>>>> नचिकेत, तुझं वरचं लिखाण आणि विशेषतः हे वाक्य वाचल्यानंतर हा सिनेमा पहावा अशी इच्छा मनात निर्माण झाली.
व्वा.... मस्तं लिहिलयं.....
व्वा.... मस्तं लिहिलयं..... हे वाचुन आता हा सिनेमा पहावा असं वाटतय ...
परवा बहुतेक याच सिनेमा मधलं गाणं पाहीलं... तेव्हा नाव समजु शकलं नव्हतं.... पण त्या गाण्यात केतकी माटेगावकर होती... सो हा तोच सिनेमा असावा..... गाणं छान वाटलं...
हम्म्म.... पहायला हवा आता..
माझं मत, पुस्तक न वाचता जा,
माझं मत, पुस्तक न वाचता जा, सिनेमा जास्ती आवडेल.>>>>>>>> दक्षिणाशी सहमत
पुस्तकातले बरेच प्रसंग जरी काटले असले तरी 'त्या' दिवसांच्या आठवणीने चेहर्यावर स्वतःशीच केलेले एक स्माईल आणण्यात चित्रपट नक्कीच यशस्वी झालाय. मला आवडला.
केतकी ची शिरोडकर बघून आम्हाला पण (म्हणजे बायकांना :फिदी:) एक दोन ठिकाणी 'खल्लास' म्हणावसं वाटलं तर 'इतरांचं' काय झालं असेल.
आणि अंशुमन जोशी या मुलाच्या मी प्रेमात
मस्त लिहलेय...
मस्त लिहलेय...
मी ट्रेलर पाहिलाय. तो मुलगा -
मी ट्रेलर पाहिलाय. तो मुलगा - अंशुमान जोशी - खल्लास अभिनय करतोय. आता कधी एकदा सिनेमा पहातेय असं झालंय
नचिकेत मस्त..आज बघणार आहे,
नचिकेत मस्त..आज बघणार आहे, तेही माझ्या शाळेतल्या गँगबरोबर
कळत्या नकळत्या वयाच्या
कळत्या नकळत्या वयाच्या सीमारेषेवरचे भावजीवन रेखाटणार्या 'शाळा' वर सिनेमा निघणार हे काही महिन्यांपूर्वी जाहीर झालं तेव्हा बर्याच भुवया वर गेल्या होत्या. पुस्तकात हे सारं नीट, विस्तृत पध्दतीने मांडता येतं, आणि पुस्तकं वाचणारा वर्ग हा सिनेमा बघणार्या वर्गापेक्षा थोडा वेगळा असतो- हे दोन मुख्य फायदे. चित्रपट हे दृक-श्राव्य माध्यम असल्याने जास्त ताकदवान, पण सारा पसारा दोन तासांत मांडायचा तर अनेक गोष्टी काटछाट करणे, काही गोष्टी आटोपशीर करणे- हे आलंच. हे करताना संदर्भ बदलण्याची प्रचंड भिती असते. विशेषतः 'शाळा'चा नाजूक विषय दिग्दर्शक कसा हाताळतो- याची उत्सुकता होती. थोडाही पाय घसरला असता, तरी तद्दन फालतूपणाकडे गाडी कशी नि कधी वळली असती, हे सांगता येत नाही.
सुजय डहाकेचा 'शाळा' बघून मात्र समाधान वाटलं. एका, नाजूक विषय मांडणार्या चांगल्या पुस्तकाला व्यवस्थित न्याय देणारा चांगला सिनेमा. 'मुकुंदा जोशी'च्या शेड्स अंशुमन जोशीने अचूक पकडल्या आहेत. या अकरावीत शिकणार्या मुलाने मूळ पुस्तकातला नववीत शिकणारा नायक नीट समजूनउमजून घेतला आहे. वर्गातल्या मुलीबद्दल वाटणारं अनाम आकर्षण त्याने अनेक पातळ्यांवर बरोबर दृश्यरूपात उभं केलं आहेच; पण त्याशिवाय त्याचं मित्रांसोबतचं भावजीवन, परीक्षा आणि अभ्यासाबद्दलची घालमेल, सतत नजर ठेवणार्या मोठ्या बहिणीसोबतचं तुटक आणि बेपर्वा वागणं, बापाबद्दल वाटत असलेला एक प्रकारचा विश्वास- हे सारं मोजक्या बोलण्यातून तर अनेकदा संवादांशिवायच मस्त दाखवलं आहे. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे आपल्या शाळेतल्या दिवसांच्या आठवणी पुन्हा एकदा जगायला लावणं- हे यश.
या 'मुक्या'शी शालेय जीवन जगलेला प्रत्येक मुलगा जसा रिलेट करेल, तस्संच अगदी प्रत्येक मुलगी केतकी माटेगावकरने उभ्या केलेल्या 'शिरोडकर'शीही. अभिनयातली समज, चेहेर्यावरचे हावभाव, अल्लड दिसणं-बोलणं, शिरोडकरमधलं तिने दाखवलेलं सुक्ष्म आव्हान आणि निर्व्याजता याचं अजब मिश्रण- या सार्या गोष्टींचं कौतुक वाटतं.
संतोष जुवेकरने 'झेंडा'मधल्या कामावरून अनेक अपेक्षा निर्माण करून ठेवल्या आहेत. त्याने केलेला 'मांजरेकर मास्तर' त्या पूर्ण करतो. देविका दफ्तरदारचं काम पुन्हा एकदा आवडलं. प्रभावळकरांचा हेडमास्तर आणि जितेंद्र जोशीचा 'नायकाचा मामा' एकदम मस्त! बेधडक वृत्तीची 'आंबेकर'ही अगदी पुस्तकातून आपल्या मनात उभ्या राहिलेल्या प्रतिमेबरहुकुम..! अमृता खानविलकरबद्दल न बोलणं योग्य होईल.
'सुर्या'चे मूळ पुस्तकातले संवाद कुणाला 'व्हल्गर' वाटतील, तर कुणाला विषयाला अनुसरून आणि त्या त्या जागेवर बरोबर असे वाटतील. ते टाळून (म्हणजे त्यांचं 'बीप' करून) दिग्दर्शकाने बरोबर केलं की नाही, यावरही वेगवेगळी मतं येतीलच. पण हा 'सिनेमा' असल्याने मूळ विषयाचा फोकस अनावश्यक चर्चेकडे वळण्याचा धोका टाळला आहे, आणि ते स्वीकारार्ह वाटतं. हे पात्र अनेक दृष्टींनी महत्वाचं आहे. वातावरणनिर्मिती करण्यात या पात्राचा महत्वाचा सहभाग आहे.
मुक्याचा सल्ला ऐकून सुर्याचं 'केवडा'ला 'विचारणं', आणि त्यानंतर शाळेत आणि घरी उठलेला गदारोळ- हा कथेच्या दृष्टीने खूप महत्वाचा भाग. शिवाय त्या त्या पात्रांचं अशा प्रसंगीचं (टोकाचं) वागणं हे पुस्तकाला एका वेगळ्याच उंचीवर नेतं. हा प्रसंगही सुजयने मस्त हाताळला आहे. या प्रसंगात सर्वात जास्त कमाल केली आहे ती नायकाचा बाप झालेल्या नंदू माधवांनी!
'शाळा' म्हणजे नुसते मास्तर, मुलं मुली, बाकडी, वर्ग, अभ्यास, परीक्षा इतकंच नाही. या सगळ्याव्यतिरिक्त जी शाळा आपल्या 'मनात' भरते- तीच आपल्याला जास्त शिकवून जाते. या मनात भरलेल्या शाळेचं आपण आयुष्यभर देणं लागतो- हेच खरं.
सगळ्याच चांगल्या
सगळ्याच चांगल्या पुस्तकांवरच्या सिनेमांची हीच गत होत असते असे वाटते. मारीओ पुझोचे गॉडफादर वाचून नंतर सिनेमा पाहिला तेव्हा फार अपील झाला नव्हता.
देखणेका है!
देखणेका है!
साजिरा, मस्त लिहिलं आहेस.
साजिरा, मस्त लिहिलं आहेस. आवडलं.
(No subject)
आनंदयात्री, साजिरा- सुरेख
आनंदयात्री, साजिरा- सुरेख लिहीलं आहेत.
पण सिनेमात पुस्तका इतकी मज्जा
पण सिनेमात पुस्तका इतकी मज्जा नाहीये ! सिनेमात 'शाळा' केलीये आणि पुस्तकात शाळेतली 'मज्जा'.>>.अगदी बरोबर
पुस्तकाच्य प्रेमात असणार्याना सिनेम अपील होणार नाही..
हा शिरोडकरच "आपल्याया जमायच नाही बुवा" हे वाक्य अपील होउ शकात
नचिकेत...मस्त लिहले आहे...
नचिकेत...मस्त लिहले आहे... नक्की बघणार..
साजिरा - मस्तच रे!
साजिरा - मस्तच रे!
आलो की बघीन.. आणि मग काय ती
आलो की बघीन.. आणि मग काय ती प्रतिक्रिया... बघीन हे नक्की...
मस्त लिहीलंस, नचिकेत.. नक्की
मस्त लिहीलंस, नचिकेत..
नक्की बघणार शिणुमा!!
साजिरा, मस्तच पोस्ट
साजिरा, मस्तच पोस्ट
चित्रपटाबद्दल काही लिहायचा
चित्रपटाबद्दल काही लिहायचा पहिलाच प्रयत्न होता..
सांभाळून घेतल्याबद्दल धन्यवाद!
साजिरा - मस्त लिहिलं आहे!
शाळा वाचली होती. ती प्रचंड
शाळा वाचली होती. ती प्रचंड आवडली हे सांगायला नकोच. नंतर 'गमभन' ही पाहिलं. ते ही उत्कृष्ट होतं. त्यामुळे आता हा सिनेमा पहायचा आहे. परिक्षणाबद्दल आनंदयात्री आणि साजिरा, धन्यवाद.
पुस्तक आधी वाचलं काय, नि नंतर
पुस्तक आधी वाचलं काय, नि नंतर वाचलं काय. दोन्ही वेळेला वेगवेगळ्या प्रकारे पुनःप्रत्ययाचा आनंद येईल. पुस्तकाची पदोपदी आठवण येऊन सिनेमा बघताना येऊन तुलना करायचा मोह होतोच. पण मग त्याही बाबतीत दिग्दर्शकाने निराशा केलेली नाही, असं माझं मत.
आधी सिनेमा बघून मग पुस्तक वाचलं तर ती सारी पात्रं पुन्हा जिवंत होऊन आपल्या आजूबाजूला वावरत आहेत, असं नक्की वाटेल. कसंही केलं तरी चालेल, पण दोन्हींचा आस्वाद घेणं मस्ट.
Pages