खोट्टे (फोटोसह)

Submitted by नंदिनी on 13 December, 2011 - 05:55

माझे आजोबा जेव्हा महाराष्ट्रामधे (बारामती साखर कारखाना!!!) आले तेव्हा आजूबाजूच्या बायका इडली म्हणजे उकडलेल्या भाताचा गोळा असं म्हणायच्या म्हणे. नंतर मुंबई-पुण्याकडे उडप्याचं हॉटेल म्हटलं की इडली-दोसा हे समीकरण फिक्स झाले. हळूहळू मात्र आठवड्याच्या नाश्त्यामधे एकदा तरी इडली-सांबार्-चटणी असा बेत बनायला लागला. मराठी धिरडी-घावणाच्या सोबत हे दोन पदार्थ आणून बसवण्यात या हॉटेलवाल्यांचा मोठा हात आहे. मात्र ही इडली आणी दोसा इथेच या भागातील खाद्यपरंपरा संपत नाही. मंगळूरमधे कोकणी, केरळी, कानडी तसेच ख्रिश्चन अशा विविध खाद्यपद्धतींचा संगम झालेला आहे. फक्त इथे हॉटेल्स चांगली नाहीत. सर्वच मंगळूरी-उडप्यानी भारतभर हॉटेल्स काढल्याने त्यांच्या गावात हॉटेल्स चांगली नाहीत. Happy

आपल्याकडे इडली म्हटलं की गोल चंद्रासारखी असते. इथे मंगलोरला रहायला आल्यावर मात्र मला इडलीचे वेगवेगळे प्रकार समजायला लागलेत. त्यापैकीच हा एक पदार्थ- खोट्टे. फणसाच्या पानाचे द्रोण बनवून त्यामधे बनवलेली इडली.

खोट्टे (कोकणीमधे त्याला हिट्टू असेही म्हणतात. कानडीमधे हिट्टू म्हणजे पीठ) कोकणी लोकामधे (कामत, शेणॉय, पै इत्यादि व तत्सम आडनावाचे लोक) तसेच कानडी लोकामधे प्रसिद्ध आहे. सणासुदीला तर हमखास बनवला जातो. खास करून नागपंचमीला याचाच नैवेद्य करतात. याच्यासोबत ओल्या नारळाची चटणी हमखास बनवतात. सांबार बहुतेकदा बनवत नाहीत. या इडलीला फणसाच्या पानाचा स्वाद येतो. आणि ही इडली अत्यंत हलकी होते. शिवाय तेलाचा एकदेखील थेंब न वापरता बनवली जाते.

आपण बर्‍याचदा इडली रवा वापरून इडली बनवतो. इथे मंगळूरकडे मात्र इडली राईस म्हणून एक वेगळा तांदूळ मिळतो. हा तांदूळ व उडदाची डाळ भिजवून वाटून घेतलं जातं. त्याचं प्रमाण घरटी बदलतं. पण तरीही सर्वसाधारणपणे १ माप डाळ आणि २ माप तांदूळ भिजत घालतात. हे मिश्रण पूर्वी रूब्बीकल्ल म्हणून एका दगडी वाटण्याच्या यंत्रामधून वाटून घेतले जाई. त्यासाठी मिश्रण एका जमिनीत पुरलेल्या वाडग्यासारख्या भागात ओतून हाताने वरवंट्याने वाटावे लागायचे. एका हाताने मिश्रण वाटताना वाडग्यातून बाहेर येणारे मिश्रण परत आत ढकलत रहायचे. (अधिक माहितीसाठी विरासतमधले छन छन चूडी बोले गाणे बघा. त्यामधे तब्बू हे रूब्बीकल्ल वापरतेय). अत्यंत कष्टाचे व वैतागवाणे काम.

आता याची जागा ईलेक्ट्रिक वेट ग्राईंडरने घेतली आहे. यामधे दोन दगड (ग्रॅनाईट) एकमेकावर फिरतात आणि मिश्रण वाटले जाते. मिक्सरमधे डाळ व तांदूळ अत्यंत वेगाने फिरून त्याचे बारीक तुकडे होतात मात्र ग्राईंडरमधे त्याचे दगडामुळे कुटले जातात. व अर्थात इडली जास्त हलकी व चांगली बनते. (ईडलीच नव्हे तर डोसा-आप्पे-मेदूवडा यासारखे सर्वच पदार्थ). हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवून आंबवायचे. दुसर्‍या दिवशी पीठ फुगून दुप्पट झालेले असते. चवीनुसार मिठ घालायचे. हे तयार झालेले मिश्रण द्रोणामधे भरायचे आणी उकडायचे. झाले. सिंपल. Happy

पण खोट्टे बनवायचे कसे?

हे काम सोपं नाहिये Happy पण सरावाने हळू हळू जमेल. (कोण प्रयत्न करून बघणार आहे इथे? Happy )

१. प्रथम फणसाची पाने घ्या. पाने स्वच्छ धुवून पुसून घ्या. शक्यतो एकाच आकाराची पाने घ्या. मधे लावण्यासाठी पत्रावळीसाठी ते काड्या मिळतात त्या घ्या. किंवा सरळ टूथपिक.

२. ही चार पाने अशी एकमेकासमोर लावून घ्या. फोटो दाखवलय त्याप्रमाणे प्रत्येक पानाला टूथपिक लावून घ्या.

३. आता ही चार पाने उचलून बाजूबाजूच्या पानाला टूथपिक लावत द्रोण पूर्ण करा. सगळ्यात जास्त वेळ या स्टेपला लागतो.

हे तयार झाले खोट्टे. द्रोण पूर्ण झाल्यावर सगळीकडून नीट तपासून बघा. अन्यथा इडलीचे पीठ त्यामधून बाहेर येइल.

आता यामधे इडलीचे मिश्रण घालून वीस मिनिटे उकडा.

इथे इडलीपात्र (पेडावण्) असे असते. यामधे इडली स्टॅन्ड नसतो. मोदकपात्राप्रमाणेच एक जाळी असते आणि खोट्टे नसतील तर वाट्यामधून अथवा ग्लासमधून इडली बनवतात.

उकडून झाल्यावर प्लेटमधे देताना वाटले तर द्रोण काढून द्या, अथवा द्रोणासकट द्या. इडलीला फणसाच्या पानांचा एक वेगळाच सुवास आलेला असतो. शिवाय इडलीवर द्रोणाच्या शिरांचे छान डीझाईन दिसते.

भरपूर प्रमाणात इडल्या बनवायच्या असतील तेव्हा ही पद्धत सोपी पडते. कारण एक अथवा दोन इडल्या प्रत्येकी पुरेश्या होतात. शिवाय जास्त भांडी घासावी लागत नाहीत. Happy म्हणूनच लग्नमुंजीतून हा प्रकार नाश्त्याला असतो. सणाच्या दिवसातून हे द्रोण इथे मंगलूरमधे विकत मिळतात. एरव्ही मिळतात असं मला समोरच्या राव आंटीनी सांगितलय. फक्त कुठे मिळतात हे त्यानादेखील माहित नाही. Happy तसे जर मिळाले तर मीपण अशी इडली बनवेन. Happy

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मी हे किंग्स सर्कल च्या कैफे मद्रास मधे खाल्ल होत, टेर्रिफिक टेस्ट, ते ह्या बरोबर एक लाल रंगाची तेल घातलेली चटणी पण देतात, थोडा कारम्पोड़ी किंवा आपल्या डांगर सारखा काहीतरी प्रकार असतो तो ...खुपच आवडल होता, एकदम बघून तोंपासु Happy

नंदिनी, भारी काम केलस.. फोटो सुंदर.. खोट्टे आणि चटणी फार टेंप्टिंग दिसत आहे.. Happy
आम्ही तिसर्‍या मजल्यावर राहातो.. आणि बेडरुमच्या बाल्कनी मध्येच फणसाची फांदी डोकावते.. घरी आयती पाने मिळतात.. रोज दिवसातून एखादवेळेस माझा सवादोन वर्षाचा लेक त्याची पिवळी होऊन बाल्कनीत पडलेली पाने खाली टाकून देण्याचे काम करतो.. माझा नवरा कामत. नेहेमी मला फणसाच्या पानातल्या इडलीची महती सांगतो. पण नेहेमी पीठ केलं की घाईघाईत इडली तरी नाही तर बहुतेक वेळा डोसेच घातले जातात.. आता फोटो बघून एवढे तों.पा.सु. की विचारून सोय नाही. पुढच्या वेळेस खर्रर्रर्र्च खोट्टे !!

हे अशेच आमच्या बाजुवाली फणसाच्या पानात बनवायची.. पण पिठामध्ये काळी मिरी टाकते अन अशे उकडुन घेते... त्याला ती उंडे म्हणायची.

मस्त रेसिपी आणि सुंदर फोटो.

फणसाची गोड सांदणं आम्ही अश्या फणसाच्या पानाच्या द्रोणात करतो . त्या द्रोणाना आम्ही खोले म्हणतो जो 'खोट्टे 'च्या जवळ जाणारा आहे. अशा सांदणांना फणसाच्या पानाचा सुरेख स्वाद येतो तसेच मोदकपात्रात केलेल्या सांदणां पेक्षा ती टिकतात ही जास्त दिवस.

मस्त धागा वर काढला....
उंडे अजुनही आमच्याकडे बनवले जातात केळीच्या पानात.
आणि सांदणं आंबा आणि फणस दोन्हीच बनवतात.

mooga mole N idli mast bet.. sunday la karen mhantey.. sadhya market madhe ambadi & Bamboo shoots pan alet.. bamboo shoots & ambadi ghalun mooga mole mast hoil.. Navroba khush hoil... ha aaj kelela plan ahe... sunday paryant tikla pahije...

kaal mi khotte banvale.. with chuntney & mooga molo.. n khottech packing pan perfect zhale hote.. ekpan khotta leak nahi zhala.. mi photo pan kadhle.. but somehow opera madhun upload hote nahi ahet. koni help karel ka mala. how to upload photos ? Thanx Nanditai..tumchyamule mala punha ekda khotte try karaveshe vatale...

Pages