प्राचीन कोकण संग्रहालय
गणपतीपुळ्यापासून अवघ्या एक किमीवर प्राचीन कोकण हे संग्रहालय वसवलेले आहे. ओपन एअर आहे आणि इथे गेल्या काही शतकांतील कोकणी जीवनशैलीची माहिती इथे देण्यात आलेली आहे. लाईफसाईझ मूर्तीमधून हा सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलीना प्रशिक्षण देऊन इथे गाईड म्हणून रोजगार दिलेला आहे.
या संग्रहालयाच्या सुरूवातीलाच आपले स्वागत या मामाकडून केले जाते.
सुमारे तीन एकर फिरायचे म्हटले की आईला "कसंतरी व्हायला लागलं" मग तिने मी सुनिधीला घेऊन गाडीत बसून राहते तुम्ही फिरून या असे सांगितले. हे ऐकेस्तोवर सुनिधी गाढ झोपलेली होती. पण लगेच उठून तिने "मलापण फिरायचेच आहे" असे जाहीर केले. मग आईकडे नाईलाज होता. मात्र पूर्ण संग्रहालय बघून झाल्यावर मात्र अजिबात तिला फिरल्यासारखे वाटले नाही.
निवांत काय बसून राहिलाय ? चला फिरूया. कोकण बघायचा आहे ना?
या परिसरामधे मुद्दाम काही दुर्मिळ औषधी वनस्पतीची व झाडाची लागवड करण्यात आलेली आहे. तसेच, प्रत्येक जन्मनक्षत्राचे असा एक आराध्य वृक्ष असतो, त्यानुसार ही नक्षत्र बाग लावण्यात आलेली आहे. भेट देणार्यानी आपापल्या जन्मनक्षत्रानुसार कुठला आराध्य वृक्ष आहे ते शोधावे. प्रत्येक वृक्षाचे औषधी गुणधर्म इथे लिहिलेले आहेत. ते जरूर वाचावेत.
आता गावात जायचे म्हटले की पिंपळ पार आलाच. हा पिंपळ दोनशे वर्ष जुना आहे असं गाईड म्हणाली.
तिथेच उभी असलेली ही कडकलक्ष्मी.
काय भिती वाटली? घाबरता काय? चला पुढे. नाहीतर छडी वाजे छम छम... इतका क्युट पंतोजी कधी पाहिलाय का?
हे कोकणगीत. शिलालेखामधे कोरलेले आहे. कवि माधव यानी रचलेले हे गीत सुंदर आहेच. शिलालेख म्हटल्यावर मला एकदम माबोवरच्या इतिहास विषयक चर्चा आठवायला लागल्या. कोण जाणे, पाचशे सहाशे वर्षानी तेव्हाची वरदा या शिलालेखावर एखादा संशोधनात्मक लेख लिहत असेल.
कोकण ही परशुराम भूमी. समुद्रामधे बाण मारून त्यानी ही भूमी तयार केलेली आहे. त्यामुळे त्याना इथे प्रणाम करायलाच हवा.
हा आदिवासी. कोकणातलाच आदिवासी आहे का मला माहित नाही. कुणाला ठाऊक असेल तर कृपया सांगा.
वाघोबा वाघोबा जंगलचे आजोबा
रात्रीच्या अंधारात झाडामागे लपता
लुकुलुकु डोळ्यांनी टुकूटुकू बघत
अंगावर पट्टे गालिचा छान
येवो कोणी जावो कोणी ताठ तुमची मान.(*)
अर्थात हा वाघ खरा नाही आहे. पण कोकणात वाघ नाही तर किमान बिबळ्या तरी मुक्तपणे फिरताना पाहिलेला आहे. माझी एक मैत्रीण रत्नागिरीजवळच्या आडी नावाच्या एका गावात रहायची. एकदा बिबळ्या मध्यरात्री त्यांच्या घरात पडवीवर आला होता. माझे पप्पा दाभोळमधे ज्या गेस्ट हाऊस्मधे रहायचे तिथला रक्षक एक वाघ होता म्हणे. वावरात रहाणार्याकडून काही चुका झाल्यातर हे वाघोबा येऊन दर्शन द्यायचे म्हणे. पप्पाच्या काही ज्युनिअर्सनी वाघाचे फोटो/व्हीडीओ काढलेले आहेत. कधी मिळाले तर इथे अवश्य शेअर करेन.
ही इथे स्थापन केलेली वाघजाई देवी. याच देवीच्या बाजूला पालखी व इतर छत्र चामरे वगैरे ठेवलेली आहेत. तसेच, काही शतकांपूर्वीची वाद्ये इथे बघायला मि़ळतात. उनापावसापासून संरक्षण व्हावे म्हणून ती काचेच्या पेटीत ठेवलेली आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो नीट आला नाही. (म्हणजे त्या वाद्यांसोबत माझाच फोटो काढतानाच प्रतिबिंब पण फोटोत आलय त्यामुळे सतिश त्याला भुताटकी म्हणतो. )
गावशिकार
हा दरवेशी. अस्वलाचे खेळ करणारा. आता बहुतेक कायद्याने अशा खेळांवर बंदी आणलेली आहे.
इथून पुढे बलुतेदाराची माहिती दिलेली आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक बलुत्याचं स्वतःचं असं एक महत्त्व होतं. गाव स्वयंपूर्ण असल्याने त्यांची सामाजिक व्यवस्था भरभक्कम होती.
न्हावी.
गावामधील सर्व लोकाच्या घरामधे प्रवेश असणारा व सर्वाचीच हजामत करणारा. गावातील प्रत्येक भानगडीची माहिती याला असणारच. याचा अजून एक साईड बिझनेस म्हणजे लग्ने जुळवणे. अजूनही कित्येक घरामधे लग्न ठरल्यानंतर न्हाव्याचा मानपान करायची रीत आहे.
हे खोताचे घर. खोत म्हणजे गावचा राजा. कोकणामधे खोत हे प्रामुख्याने ब्राह्मण व मराठा जातीचे असतात. इथे दाखवलेले घर ब्राह्मणाचे आहे. खोताची मुले सारीपाट खेळताना दिसत आहेत. या प्रचिमधे दिसत नाहीये पण खोतीणीच्या साडी व दागिने अगदी अस्सल ब्राह्मणी पद्धतीचे वाटावेत असे ठेवले आहेत. पुढे येणार्या सर्व बलुतेदारांचे व इतर स्त्रियांची वेशभूषा त्या त्या बलुत्याला व जातीनुरूप ठेवली आहे, असे गाईड म्हणाली. पण खोतीणीच्या नऊवारीला ओचा नाही, असे वाटते.
हा हसरा कुणबी. सुपामधे धान्य पाखडणारी त्याची बायको. इथे शेतकर्याला आवश्यक असणारी सर्व अवजारे वगैरे देखील ठेवली आहेत.
हे मासे पकडण्याचे एक जुने साधन. (मी नाव विसरले) एकदा का मासा यामधे घुसला की त्यातून त्याला बाहेर पडता येत नाही म्हणे.
आता माश्यांचा विषय निघालाच आहे तर "घेता का ही ताजी म्हावरं?"
इथून पुढे कुंभार, सुतार, लोहार, वाणी, तेली अशा बलुतेदारांची प्रतिकृती उभारण्यात आलेल्या आहेत. विस्तारभयास्तव त्या इथे देत नाही.
आता इतकं फिरल्यावर भूक लागणारच ना? त्यासाठी हे बघा स्वयंपाकघर. घंगाळं, चहाची किटली आणी टिफिनचा पितळी डबा या वस्तू बघून मला एकदम जुन्या मराठी चित्रपटांचीच आठवण झाली. आई म्हणे, किती छान, मला अशा कधीतरी पुन्हा चुलीसमोर स्वयंपाक करायचा आहे. पप्पानी लगेच "घरातल्या किचनचा रस्ता माहित नाही आणी चुलीसमोर स्वैपाक?" अशी कमेंट टाकलीच.
सतिशला मात्र या पितळी डब्याचे फारच आकर्षण वाटले. त्याने दोन तीन क्लोजप घेतलेत. डब्याच्या वर असणारा गडू किती छान आहे ना?
इथे तांदळाच्या शेवया करायचं यंत्रदेखील ठेवलेले होते. कोकणात हल्ली मी ते फारसं वापरताना पाहिलेलं नाही. मात्र ईकडे मंगळूरकडे अगदी आठवड्यातून एकदा तरी या शेवया केल्या जातात. पूर्वीच्या काळचं हे पुरण यंत्र. यातून पुरण काढणे आपल्या स्टीलच्या यंत्रापेक्षा सोपे असते. पुरणाचे प्रमाण जास्त असेल तेव्हा तर काम भराभर होते. शिवाय यामधले पुरण अगदी बारीक व चांगले होते. -- इति गाईड.
इथून पुढे भजनी मंडळाचे सोंगे आहेत. त्याचा फोटो मुद्दामून देणार नाही. प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे.
ही मचाण. मचाणीवर उभे राहून पाहिल्यास जयगडपर्यंतचा परिसर दिसतो. पण मचाण चढणार आहात ना?
मचाणीवर पोचल्यावर समोरचा नजारा असा दिसतो.
गाव सर्व फिरून झालं आता वेळ देवदर्शनाची. हा इथे बसलेला चर्मकार. इथे जवळच मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे. संगमेश्वर जवळच्या मार्लेश्वर या शंकराच्या ठिकाणी चांभार लोक मानकरी आहेत. त्याची कथा इथे पाठीमागे चित्राच्या स्वरूपात बघायला मिळेल.
आणि ही मार्लेश्वराची प्रतिकृती .
लगोरी
याच्याच जवळ अजून एक गुहा आहे, हे खरंतर एक भुयार असून ते कितीतरी किलोमीटर दूर असलेल्या एका जुन्या किल्ल्याकडे अवघ्या दोन्-तीन मिनिटात घेऊन जातं. जे कुणी या संग्रहालयाला भेट देतील त्यानी अवश्य या भुयारामधून फिरायला जावं.
आता गाव फिरून झाल्यावर एक उपाहार गृह आहे. तिथे अप्रतिम उकडीचे मोदक मिळतात. अस्मादिकासकट सर्वजण ते मोदक खाण्ञामधे व्यस्त असल्याने फोटो काढायचे सुचले नाही.
शॉपिंगसाठी हे दुकान. इथे कोकण मेवा तसेच लाकडी वस्तू मिळतात.
ही गावाची सीमा. आणि गावचा राखणदार. त्याला नमस्कार करून मग ही अद्भुत सफर संपवूया.
==========================================
मी या संग्रहालयातील काही निवडक प्रचि इथे टाकलेले आहेत. जे कुणी कोकण फिरण्यासाठी जातील त्यानी अवश्य भेट द्या. (आणी ज्याच्याकडे माझ्यापेक्षा चांगला कॅमेरा आणि फोटोग्राफी स्किल्स आहेत त्यानी फोटो टाका.)
इथून बाहेर पडायला आम्हाला साडेपाच वाजले म्हणजे सुमारे दोन अडीच तास आम्ही हे संग्रहालय बघत होतो.
पुन्हा रत्नागिरीला जाण्यासाठी आम्ही आरेवारे पुलावरून गेलो. मुंबई गोवा सागरी महामार्ग (नियोजित) वाटेत परत समुद्र सोबत होताच. तेव्हादेखील भरपूर फोटो काढले. (झब्बू!!!!)
(समाप्त)
लेखातील वघोबाच्या कवितेसाठी
लेखातील वघोबाच्या कवितेसाठी प्राचीचे आभार.
मस्त फोटो... आम्ही ३
मस्त फोटो... आम्ही ३ वर्षापूर्वी गेलो होतो तेंव्हा इथे गेलो होतो.
हे माहित नव्हतं. गणपती
हे माहित नव्हतं.
गणपती पुळ्याला २-३ वेळा जाणं झालं पण इकडे नाही गेलो. आता यावेळी जाऊ तेव्हा नक्की भेट देवु. धन्स नंदिनी !
मस्तच....कोल्हापूरातल्या
मस्तच....कोल्हापूरातल्या कन्हेरी मठाची आठवण झाली...
वाह.मस्त फोटो आणि छान माहिती.
वाह.मस्त फोटो आणि छान माहिती.
क्लास!
क्लास!
वा मजा आली बघताना
वा मजा आली बघताना
छान आहे! मलापण तिकडे जायचे
छान आहे! मलापण तिकडे जायचे आहे.
छान आहे उपक्रम. (आधी
छान आहे उपक्रम. (आधी बघितल्यासारखी वाटतेय हि जागा. मी स्वतः गेल्याचे आठवत नाही. बहुतेक इथेच फोटोमधे बघितले असेल.)
छान!
छान!
अतिशय सुंदर प्रचि, आणि वर्णन
अतिशय सुंदर प्रचि, आणि वर्णन सुद्धा
मस्त ग.
मस्त ग.
मासे पकडण्यासाठी जे बांबू
मासे पकडण्यासाठी जे बांबू पासून बनवलेलं साधन आहे त्याला 'तोंडया' म्हणतात. ओहोळावर किंवा नदीवर छोटासा बांध घालून त्या बांधला मधोमध हा तोंडया घट्ट बसेल अस भोक ठेवलं जातं...बांध असल्याने माश्याना खाली उतरायचा रस्ता फक्त ह्या तोंडयाद्वारे असतो,पाणी ह्या तोंडयात शिरते त्यासोबत मासेही पण तोंडया बांबूचा असल्याने पाणी वाहून जात व मासे आत अडकून राहतात...शिवाय सतत पाणी चालू असल्याने मासे मरत नाही ,जिवंतच राहतात.
खूपच छान ☺️
खूपच छान ☺️
का माहीत नाही पण कोकणचा फील
का माहीत नाही पण कोकणचा फील येत नाही, खासकरून ते पुतळे आहेत ते कुठल्याच अँगलने कोकणी वाटत नाहीत.
हे मालगुंडचे ना? (३किमी
हे मालगुंडचे ना? (३किमी गणपतीपुळे)
इथे बाजूलाच केशवसुतांचं घर ( स्मारक)आहे ते अस्सल कोकणी आहे.
मलाही कोंकणात फिरतोय असं नाही
मलाही कोंकणात फिरतोय असं नाही वाटलं.