ओळख, नाव, वागणूक इत्यादी आणि मी.

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

हे ही जुनंच लिहिलेलं. अनेकांना लक्षातही असेल. फरक तसा काहीच नाहीये अजूनही पण प्रसंगांचा त्रास स्वत:ला करून घेण्यापेक्षा समोरच्याची समजण्याची कुवत नाही हे मी शिकलेय थोडंफार इतकंच.. Happy
--------------------------------------------------------------------------------------------
"लग्न झाल्यावरही मी नाव बदलणार नाही. आणि ते तुझ्या आइवडिलांना पटवायची जबाबदारी तुझी."
असं स्वच्छपणे त्याला सांगितलं आणि मी निवांत झाले. त्यालाही या गोष्टिचं फारसं काही वाटलं नाही. बायकोने आपलं नाव लावलंच पाहिजे इत्यादी विचार त्याच्या आसपास फिरत नसत सुदैवाने.

लग्नाआधी नी नंतर काही खास शेलक्या प्रतिक्रिया आल्या होत्या मात्र यावर.
"तू काय स्वतःला जास्त शहाणी समजतेस?" इति माझेच एक काका
"आमचं आडनाव लावत नाहीस तू?" (हं विचित्रच दिसतेय ही!) हे मनात म्हणणार्‍या त्याच्या एक काकू.
"काय म्हणताय मिसेस अमुक अमुक!" हे मुद्दामून म्हणणारा एक मित्र
इतपत होणारंच हे गृहितच होतं त्यामुळे त्या प्रतिक्रियांवर आम्ही दोघांनीही हसून घेतलं.

दोघंही एका क्षेत्रात काम करत होतो पण वेगवेगळ्या विभागात. आपापल्या बळावर एका स्थानापर्यंत आलो होतो. तो captain of the ship आणि मी एक department head. आपापल्या वर्तुळात आमच्या कामाला महत्व होतं. मग झाली गंमत. आमचं एक प्रोजेक्ट खूप म्हणजे खूपच मोठं झालं आणि त्याबरोबर त्याचं नावही. आता त्याच्याकडे खूप लोक आदराने पहायला लागले. त्याच्याशी आपली ओळख आहे हे कॉलरी ताठ करत दाखवू लागले.

त्याच प्रोजेक्टमधले एकजण एकदिवस मला येऊन म्हणू लागले की
"आता तरी निदान सरांसाठी तरी नाव बदला!"
म्हणजे मला आजपर्यंत याच्या नावाची लाज वाटत होती नी आता लाज वाटायची गरज नाही म्हणून मी आता नाव बदललं पाहिजे?
माझं नाव ते माझं मी ठरवीन ना तुमचा काय संबंध?
मला आणि माझ्या नवर्‍याला, घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही कोण टिकोजीराव मला नाव बदलायला सांगणारे?
असे खूप सारे व्हि.ओ. माझ्या डोक्यात. आणि मी वळून दुसर्‍या व्यक्तीशी बोलू लागले.

हळूहळू लक्षात येऊ लागलं की माझं नाव बदललेलं नसणं हेच नाही तर मला माझं माझं काही अस्तित्व असणं हेच लोकांना खुपतंय.

माझ्या स्वतःच्या नाटकासंबंधात माझी मुलाखत घेतली गेली आणि मुलाखतीत छापलं काय गेलं की माझा नवरा मोठा दिग्दर्शक असला तरी मला किती सपोर्ट करतो. माझे सासूसासरे कसे मला साथ देतात इत्यादी. ते खरं आहे हो पण त्याच्या मुलाखतीत नाही कधी विचारत बायकोचं योगदान वगैरे.

एकदा एका छोट्या गावात गेलो होतो. कुठल्यातरी विषयावर गप्पा चालू होत्या. एका मुद्द्यावर माझं आणि नवर्‍याचं म्हणणं वेगळं होतं. आम्ही एकमेकांचा मुद्दा समजून घेत होतो पण बरोबरच्या एका काकांना मात्र त्याचा त्रास व्हायला लागला. आम्ही दोघांनी नंतर बोलू म्हणून विषय थांबवला तरी ते काका नंतर मला खिजगणतीतही धरेनात. माझ्याशी बोलेहीनात. 'बिचारा एवढा मोठा दिग्दर्शक आणि त्याची बायको ही अशी!' असं त्यांच्या तोंडावर लिहिलेलं मात्र दिसू लागलं. चिडचिड झालीच आणि परिणामी मी जेवायचंच टाळलं.

हे असं अनेकदा होतं. मी प्रवासात जीन्स वापरते यापासून माझा माझा वेगळा मोबाइल आहे ज्याच्यावर मी माझ्या माझ्या कामाच्या लोकांशी बोलत असते ते मी माझं मत मांडते, कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल नवर्‍याकडे न पहाता जे मला पटतं ते उत्तर देते यापर्यंत कुठलंही कारण माझ्या नवर्‍याला बिचारा ठरवण्यासाठी पुरेसं असतं. असं होऊ नये म्हणून मग मला आदर्श पतिव्रता पत्नी सारखं वागावं लागतं. सिंदूर, बांगड्या आणि साडीचीच कमी असते. स्वतःचं मत/ स्वतःचं आयुष्य नसलेली, नवर्‍याच्या पावलात स्वर्ग बिर्ग शोधणारी कंटाळवाणी बायको मिळाली असती तर माझा नवरा या लोकांना बिचारा वाटला नसता हे माझ्यासाठी आणि माझ्या नवर्‍यासाठीही अचाट आणि अतर्क्य असतं.

महाजालावर देखील असे महाभाग भेटतात अधूनमधून की ज्यांना माझं वेगळं अस्तित्व सहन होत नाही. मग सगळा सारासार विचार बाजूला ठेवून 'यशस्वी माणसाशी लग्न करून स्वतःचं नाव मोठं करू पहाणारी' अशी विशेषणं लावली जातात. यावर हसावं की रडावं तेच कळत नाही. अश्यांची नी त्यांच्या मध्ययुगीन मानसिकतेची कीव मात्र येतेच येते.

इतर ठिकाणीच कशाला आमच्या क्षेत्रातल्या अनेकांना, अगदी जे मला आधीपासून ओळखत होते त्यांना सुद्धा माझी ओळख करून देताना वेशसंकल्पक(costume designer) पेक्षा अमुकतमुक ची बायको हे जास्त सोयीचं वाटतं. एक वेशसंकल्पक म्हणून मी जोवर माहित असते अनेकांना तोवरचं काहींचं वागणं आणि नवर्‍याची ओळख कळल्यावरचं वागणं यात जमिनअस्मानाचा फरक असतो.

अश्या वेळांना नाव आडनाव न बदलण्याचा निर्णय किती योग्य होता ते अजून अजून पटत जातं. निदान नवर्‍याचा संदर्भ कळेपर्यंत तरी लोक माझ्याशी माझ्या माझ्यापुरते वागतात.

आणि मग कधीतरी एखादं असं प्रोजेक्ट होतं जिथे सगळ्यांना माझ्या नवर्‍याचा संदर्भ माहित असतो. त्याच्याबद्दल आदर पण असतो. त्याचवेळेला माझ्या कामाबद्दलही आदर असतो. माझ्याशी वागणं हे माझ्या माझ्यापुरतं असतं. मी तिथे नीरजा असते. एक व्यावसायिक असते, नंतर एक मैत्रिण होते. मला नीरजाप्रमाणेच वागता येतं. कुठलाच आविर्भाव मिरवण्याची गरज नसते. अश्या ठिकाणी काम केल्याची मजा वेगळीच असते. पुढचे अनेक कंटाळवाणे प्रसंग पचवण्यासाठी इथे ताकद मिळते.

आम्ही दोघं दोन वेगळी माणसं आहोत ज्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि तरीही अनेक बाबतीत मतभेदही आहेत पण या मतभेदांमुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडत नाही. आम्ही एकमेकांमुळे वाढत असतो. दुर्दैवाने हे समजण्याची कुवत किंवा मानसिकता ५% च लोकांकडे असते. बाकी सगळे मध्ययुगातच अडकलेले

इरावतीबाईंनी (इरावती कर्वे) पन्नासेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखातल्याप्रमाणे अजूनही नात्यातल्या पुरूषमंडळींच्या विशेषतः नवर्‍याच्या संदर्भानेच केवळ बाईकडे बघण्याची, तिला ओळखण्याची सवय आणि गरज सुटत नाही. इरावतीबाईंच्यासारखी मोठी व्यक्तीही यातून गेलीये मग माझी काय कथा असं मनाशी म्हणत मी अनेक ठिकाणी खोटी खोटी वागत जाते.

- नी

प्रकार: 
शब्दखुणा: 

अरे बापरे सत्या, एवढं काय झालं? बंगलोरचाच सत्या अहेस की दुसरी कोणी आयडी आहे ते जाऊन बघून आले Sad असो. चालूदेत.

दिवा घे गं, शैलजा ते दौपदीच राहिलच...
ईt was not her choice, ती फार सुंदर असणार, बा़कीचे चार गार पडले असणार. कुंती चुकुन बोलली काय, बाकी चैघे अडुन बसले असणार "आईची आज्ञा करत" Happy

हे महाभारत "व्यासानी" लिहलं आहे की "हव्यासाने" हा मोठा प्रश्न आहे. Happy

नीरजाची उत्तरं आवडली.
>> बाकी रुढी पाळायच्या की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असावा आणि बाकी लोकांनी त्याबद्दल कुणालाही मुर्खात काढणे योग्य नाही. हे रुढी पाळणार्‍या आणी न पाळणार्‍या दोघांसाठी लागू पडतं.
१००% अनुमोदन! 'तुम्हीही नाव बदलू नका' किंवा 'नाव बदलणारे मुर्ख' असा रोख लेखातही कुठे वाटलं नाही.
'हजारो वर्षांपासुन चालत आलीये' हे कारण देउन एखाद्या परंपरेला आजच्या काळातही उचित ठरवता येणार नाही. इथे (फ्रांसमधे) आलेले काही अनुभव सांगतो,
- सगळ्या सरकारी कागदपत्रात बायकोचं लग्नाआधीच नाव आधी लिहिलेलं असतं (आणि सध्याचं नावं कंसात)
- बायको (pregnant असताना) दवाखान्यात भेटायला गेल्यावर, परिचारिका तीला सांगते 'तुझा मित्र आलाय'... कारण होणार्‍या मुलाचा मी बाप आहे का? आमचं लग्न झालय का? या आमच्या 'खाजगी' बाबी आहेत. त्याचा प्रभाव परिचारिका आणि आमच्यातील संबंधांवर पडायचं काही कारण नाही.
इथे लग्नानंतर नाव बदलायचं सोडाच लग्न करायचंही काही बंधन नाही... आणि का असावं... शेवटी खाजगी गोष्टीं म्हणजे काय... ज्या केल्या/नाही केल्या/कशाही केल्या तरी इतरांना (त्या बाबींशी संबंधीत नसलेल्यांना) काडीचा फरक पडणार नाही त्या! मग त्यात इतरांनी नाक खुपसायच कारण काय?
(आणि please... खुन, हुंडाबळी, छळ असली उदाहरणं देउ नका. या बाबी (सहभागी व्यक्तिंसाठी) खाजगी असल्या तरी इथे एका व्यक्तीच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारांवर गदा येते त्यामुळे ते योग्य ठरत नाही. ).
अवांतरः सध्या (बर्‍याच समाजात) आढळणार्‍या नर प्रधान सामाजीक रचेनेला 'सामाजीक' कारणं आहेत 'जीवशास्त्रीय' नाही. (पहा: http://en.wikipedia.org/wiki/Patriarchy#History)
[कठिणे.. सगळे if... else लिहावे लागतात बाबा इथे... प्रतिसाद देतोय का code लिहितोय तेच कळत नाही]

हा लेखाचा विषय होऊ शकतो ? काय पाळायच असेल ते पाळा , वापरा , कोणी आडवं आलं का तुम्हाला. मला तर हे उगाचच प्रौढी मिरवल्यासारखं वाटलं.
सत्यजीत मस्त पोस्ट.

आम्ही दोघं दोन वेगळी माणसं आहोत ज्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि तरीही अनेक बाबतीत मतभेदही आहेत पण या मतभेदांमुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडत नाही. आम्ही एकमेकांमुळे वाढत असतो. दुर्दैवाने हे समजण्याची कुवत किंवा मानसिकता ५% च लोकांकडे असते. बाकी सगळे मध्ययुगातच अडकलेले.

पहिल्या दोन ओळी खरोखर सुरेख आहेत. पण हे सगळं शहरात थोड्या बहुत प्रमात चालतं. पण असंच काहीसं खेडेगावात वाचायला,ऐकायला किंवा ऐकवायला मिळालं कि समोरून लगेच ऐकू येतं. लै शानी झालीस काय? नवर्‍याचं नाव लावायचं नाय मग लगिन कशाला करायचं? आज स्वतःचं नाव बदलत नाहियेस उद्या पोरांना सुद्धा तुझंच आडनाव लावशील? चार बुकं शिकायला पाठवली म्हणून आई बापाचीच चूक झाली ना? थोडक्यात काय?

तिथल्याही मुलीला वाटतं कि आपलं एक वेगळं अस्तित्व असावं. पण सध्यातरी ते मर्यादित संख्येने बघायला मिळते याची खंत वाटते.

सॅम तुम्ही मांडलेले मुद्दे (व्यवहारीक आणि कायदेशीर पातळीवर) आणि नीरजा यांनी लिहिलेलं ललित (वैयक्तीक पातळीवर) दोन्ही परफेक्ट आहेत एकदम. पण दोन्हीकडे (हट्ट म्हणा किंवा वैयक्तिक विचार म्हणा) आणि व्यवहारीक बाबी मांडल्या गेल्या आहेत असे वाटले. पण अश्या व्यवहारीक किंवा ठरवून दिलेल्या नियमांच्या चौकटीत आपण हे स्त्रीचं नाव,स्वतःची मूळ ओळखवगेरे बसवू शकतो. ( कागदपत्रीच फक्त ). आपल्या वैयक्तिक विचारांचा, भावनेचा आदर फार फार तर उंबर्‍याच्या आत होऊ शकतो पण उंबर्‍याच्या बाहेर हे बदलणं फार कठीण आहे.निदान अजून काही पिढिजात संस्कृतीची पन्नाशी तरी ओलांडेल हे सगळं बदलायला असे मला वाटते.

"शेवटी काय चौकटीच्या बाहेर सुरु होतो तो समाज आणि चौकटीचा आत बंद ठेवावा लागतो तो आवाज"
हे सगळं स्विकारूनच खेड्यातल्या किमान ५० % कुटुंबातल्या स्त्रीयां भिंती मातीने आणि घरताल्यांची मनं आनंदानं सारवतच आहेत.

अगागा, परंपरा, संस्कृती वगैरेही शब्द अवतरले का इथे आता.....

इतिहासपुराणसंस्कृतीजतनसमर्थनवाल्यांना माझा एक भा प्र : लग्नानंतर बायकांचे आधीचे नाव बदलून सासरचे नाव लावण्याची परंपरा नक्की कधी सुरू झाली??

मी अभ्यास केलेल्या इतिहासात किंवा साहित्यातल्या स्त्रिया लग्नाआधीचे नावच नंतरही तसेच ठेवणार्‍या दिसतात. तुमच्या माहितीत काही वेगळे असेल तर निव्वळ माझे सामान्यज्ञान वाढवण्यासाठी सांगा...

पंचकन्या : अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी
रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, सुभद्रा, गांधारी, कुंती, माद्री, वासवदत्ता, मालविका, दमयंती, शर्मिष्ठा, देवयानी, शकुंतला.... देवकी, रोहिणी, उलूपी, हिडिंबा....
वरीलपैकी कोणी लग्नानंतर आपले नाव बदलले का?
अलीकडच्या काळातील मीराबाई, जोधाबाई....

नीरजा, अवांतराबद्दल सॉरी.... पण परंपरेचा दाखला देणार्‍यांना नक्की माहित आहे का, की ही परंपरा निश्चित किती जुनी आहे, कोणत्या परिस्थितीत तिची सुरुवात झाली इ. इ. हे प्रश्न मला पडले म्हणून इथेच विचारते आहे.
मुळात आडनाव लावायची परंपराही अगदी अलीकडची आहे. पूर्वी आडनाव लावत नसत.

(परंपरेपेक्षा नाव बदलण्याचा संबंध व्यवहाराशी आहे असे माझे मत आहे. पूर्वी एकत्रित कुटुंबांत वेगवेगळे आडनाव असणार्‍या अनेक व्यक्ती/ स्त्रिया नकोत, इस्टेट इत्यादी मामल्यात हक्क / दावा सांगताना त्या स्त्रीचे आडनाव व (मयत) पतीचे आडनाव तसेच त्यांच्या संततीचे एकच असल्यास जास्त सोयीचे इ.इ. असा विचार करून लग्नानंतर स्त्रीचे आडनाव हे तिच्या पतीचे आडनाव असण्याची प्रथा पडली असावी. )

नी तुमचे दोन्ही लेख छान आहेत. आवडले.
दोन्ही मधील प्रसंगांसाठी माझा एक फुस. जो मी नेहमी वापरतो.
Act , never react.

नाव बदला बाबत माझे मत मात्र वेगळे आहे. माझी आई. जिला मी ५० वर्षे माझ्या घरी पाहिली, जिचे सगळे कर्तृत्व या घरात फुलले, तिच्यासाठी एक वेगळे नाव आणि ज्या वडिलांनी तिला इतकी वर्षे साथ दिली, ज्यांच्या मधे मी एकदाही विसंवाद पाहिला नाही, त्यांच्या साठी वेगळे नाव, मला अशक्य आहे ही कल्पना.

माझ आणि तुझ अस असेल तर लग्न कशाला करायच?. जाउदे. माझे विचार जुने असतीलही.

अकु, अगं परत तेच सगळे मुद्दे येणार बघ आता. Happy
गोजिरी, बी द चेंज यू वॉन्ट टू बी इतकं सिंपल आहे ते.
विक्रम, तुमच्या आईंच्या संदर्भातला मुद्दा हा कंडिशनिंगचा भाग ना. तुम्हाला कळायला लागल्यापासून जे तुम्ही पहाताय ते त्यांच्याबाबतीत चपखल असं तुम्हाला वाटतंय. त्यांनी पहिल्यापासून वेगळं नाव लावलं असतं तर तेही तुम्हाला तितकंच योग्य वाटलं असतं जसं आत्ता वाटतंय.
उत्तम सहजीवन असलेली पण नाव वेगळी असलेली किती जोडपी दाखवू? किती मुलं अशी दाखवू की आई आणि वडिलांचं वेगळं आडनाव असण्याचा अर्थ अतिशय सुरेखपणे समोरच्याला समजावून सांगतात? किती अशी मुलं दाखवू ज्यांच्या नावात आई वडिलांचं पहिलं नाव फक्त आहे. आडनाव नाही? आणि हे सगळे सुखात आहेत हो.

या बाबतीत ज्याला जे योग्य वाटतं ते त्याने करावं. बाकी माझं तुझं करायचं नाही तर माधव ज्युलियनांचा कित्ता गिरवायलाही हरकत नाहीच. Happy

मला इथे फक्त एक सांगायचंय की रूढी परंपरांपेक्षाही कायदा आणि राज्यघटनेला महत्त्वाचं स्थान आहे भारतात आणि लोकशाहीत... नवरा बायको हे एका घरात राहत असले, एका बंधनात राहत असले तरीही त्यांचं स्वत:चं एक वेगळं अस्तित्व लोकशाहीने मान्य केलेलं आहे... घटनेने मूलभूत अधिकार म्हणून ते बहाल केलेलं आहे... ते वैयक्तिक आहे आणि हक्काचं आहे... त्यामुळे त्या वेगळ्या अस्तित्वाने काय नाव लावावं, कुठली परंपरा जोपासावी, अगदी घरात कुठला धर्म आचरणात आणावा हे सगळं ठरवण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे... एखाद्याची त्याबद्दल नाराजी असली तरीही त्याने फरक पडू देणं योग्य नाही... नाव लावणं हे फक्त एक बाहेरचं चित्र झालं... पण त्यात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत... जसं घरातले स्त्रीचे अधिकार, तिचं स्वातंत्र्य...

बरं एखाद्या स्त्रीने स्वतःहून नाव बदलायची तयारी इच्छा- तयारी दर्शवली तर ती गोष्ट वेगळी... पण तिच्यावर ते लादणं म्हणजि तिच्या अधिकारांचा भंग होतो...

मूळात प्रश्न नाव बदलण्याचा नसून स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख निर्माण करण्याचा किंवा होण्याचा आहे असं मला या लेखावरून वातलं आणि नीरजा सारख्या वेगळं करू पहाणार्‍या आणि विशेष म्हणजे ज्यांच्या नवर्‍याभोवती विशेष वलय असणार्‍या स्त्रियांना त्रास न होईल तरच नवल .... पण जेवढी नी मला तिच्या लेखातून कळलीय त्यावरून मी म्हणेन ती मोडेल पण वाकणार नाही आणि वाकूही नकोस विशेषतः जेव्हा तुझे बरोबर असते तेव्हा Happy
खूप छान लेख

बापरे कित्ती मेसेजेस आले आहेत.

नी छान आहे लिहिलेले, पण नविन मला तरी नाही वाटले. त्तुला असे अनुभव आले त्याचे मात्र वाईट वाटले, लक्ष नाही द्यायचे अशा लोकांकडे.

ईथे अमेरिकेमधे असे कित्त्येक लोक ( मैत्रिणि आणि ओळखिचे) आहेत ज्यांनी काही ना काही ( मी कधी विचारले नाही कारण गरज नाही वाटली) कारणाने माहेरचे नाव कंटीन्यु केले आहे. मला निदान २० ते २५ अशा मुली/ बायका माहिती आहेत. आणि मला नाही आठवत कोणी त्या बद्दल वाईट मत प्रदर्शन केलेले.

अरे हो, त्या सगळ्या भारतीय मुली आहेत.

आणि अजुन एक त्य जे म्हणालिस की, बिचारा एवढा मोठा दिग्दर्शक आणि त्याची बायको ही अशी>>>>>>>>>> अशा वेळेस सुरवातीला त्रास होतो पण नंतर त्या लोकांची कीव येते आणि मग सोडुन द्यायची सवय पडते.

रच्याकने, मी स्वतः जॉब करत होते. शिकलेली आहे Happy पण जेंव्हा माझा नवरा काय करतो , काय शिकला आहे हे समजले की मग कसला महान आहे नवरा अशी प्रतिक्रिया. अरे पण मी कोठे कमी आहे? मी माझ्या जागी योग्य आहेच की. सोडुन द्यायचे झाले. Happy

रिमझिम, नवीन काहीच नाही हे खरेच.
हा लेख लिहिला तेव्हा आणि आताही कामाच्या निमित्ताने ग्रामीण भागात बरेच फिरून झाले. त्यामुळे आलेले अनुभव जरा जास्तच फ्रिक्वेन्सीने... Happy
परत ह्यातलाच कोणीतरी गावातलं काहीतरी महत्वाचं दाखवणार असतो, ह्यातलाच कोणीतरी एखाद्या मुद्द्याची ओळख करून देणार असतो त्यामुळे ४-५ दिवस त्या माणसाचा अ‍ॅटिट्यूड झेलत, खोट खोट हसून वावरावंच लागतं आपल्या कामासाठी... मग होतो कधी कधी संताप.
आता काय झालंय की लोकांचा संबंध नसलेल्या मुद्द्याचा त्यांना इतका त्रास होतो, त्यांची चिडचिड होते याने मला मजाच वाटते. Happy

सत्यजित, रुढीप्रमाणेच वागायचं असेल, तर आजही जातपात, बायकांना घरातच ठेवणे वगैरे गोष्टी कराव्या लागतील.
वेळेप्रमाणे- विचारांप्रमाणे रुढी बदलल्या नाहीत तर समाज मृतप्राय होईल (वा वा टाळ्या)

माणसांकरता रुढी असतात का रुढींकरता माणसं..

असे अनुभव नेहमीच येतात आणि ते अपेक्षितच आहेत. मला जेव्हा नाव न बदलण्यावरून लोक नापसंती दर्शवितात तेव्हा खूपच मजा वाटते. (खरे तर अशा भोचक लोकांना अजुन चिडवायला / डीवचायला मला आवडते)

आणि कहर तेव्हा होतो , जेव्हा हे न बदललेले नाव आपण घरावर लावतो. दरवाजावर नुसते घरातल्या बाईचे नाव बघुनही नाके मुरडणारी अनेक माणसे आहेत त्यातुन फक्त बाईचे आणि तेही माहेरचेच नाव आडनाव पाहुन तर मग विचारायलाच नको. भले, मग ते घर तिने पुर्णपणे स्वकमाईने खरेदी केले असेल तरी.

>>तुम्हाला जसे वागायचे तसे वागा पण दुसर्‍याने इन फॅक्ट प्रत्येकाने ते मान्य करावं असा अट्टाहास का?<<
फक्त ह्या ओळीला अनुमोदन.

स्वतःला जे आवडते ते करताय ना आणि दुसर्‍याला काय वाटते ह्याने फरक पडत नाही ना मग समोरच्याने आपली मतं, आपले विचार समजूनच घेतले पाहिजे किंवा आपल्या विचारांचे जिथे तिथे स्वागतच झाले पाहिजे हे कशाला म्हणून? तुम्ही नवर्‍याचे नाव लावल्याने/न लावल्याने समाजात काही क्रांती होणार नाही की समाजाचे नुकसान. हि गोष्ट फक्त व्यक्तिगत आवड/प्राधान्य आहे बस इतकेच. त्यात जशी कोणी ढवळाढवळ करु नये तसेच समोरच्याची एक वेगळे(भले बुसरसटलेल वाटले तरी) विचार असतात हे नाही का कळत?

जशी तुमची मतं आहेत (नवर्‍याचे नाव लावावे की नाही) तशी तुम्हाला भेटणारी/र्‍या ची स्वतःची मतं असतील. त्यात काय एवढे वैतागण्यासारखे आहे.
तुमच्या दुसर्‍याकडून भारीच बाई अपेक्षा.
अजुन काही गावात वा काही शहरात असतात प्रत्येकाचे एखाद्या गोष्टीबद्दल विचार/मतं म्हणून इतका त्रागा करून लेख लिहायची काही गरज वाटत नाही.
इथे लेख लिहून मला किती त्रास होतो असेच दाखवलेय वाटतेय.
हि अशी एखाद्या गोष्टीवरची मतभिन्नता खूपच प्रचलित आहे. त्यात प्रथा वगैरे संलग्न असेल तर थोडीफार दिसणारच मतभिन्नता.
एकीकडे दुसर्‍याला काय अधिकार मी काय व कुठले नाव लावते म्हणायचे मग दुसर्‍या समोर ते नाटक तरी कशाला? ज्याना पटतं ते स्वागत करतील, नाहि पटत तुमची मतं ते फा*** मारतात. तुम्हाला एकुणात फरक नाहीच पडत( कारण तुम्हाला आवडतं ते करता त्यावरून) मग कशाला तो इतका उहापोह?
शेवटी काय की, लेख लिहू नये असे म्हणणे नाही पण उगीचच अनुकंपा मिळवायचे मार्ग वाटला.:)

चांगले लिहले आहे.
@नाचरा/ मीरा१०>> तुम्ही नीट वाचलाय का लेख? की त्या आयडीच्या वैयक्तिक आकसापोटी तेच तेच आरोप करताय?

पाशा, तुम्ही माझी प्रतिक्रिया नीट वाचलीत का? मूळात ती तुम्हाला कळली का?
त्या आयडीशी मला वैयक्तिक आकस आहे असा आरोप कशाला तो?
प्रतिक्रिया स्पष्ट दिली की वैयक्तिक आकस का?
एकच म्हणणे आहे की, एखादी गोष्ट आपल्याला पटतेय व आपण आपल्या त्या विचारांशी प्रामाणिक असल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया कश्या आल्या ह्याचा इतका विचार पडतो की लेख लिहून सांगावे असे काहि वाटले नाही म्हणून हे पाहून आश्चर्य वाटले.
अश्या नाव बदलण्याने/न बदलण्याने गोष्टी घडतातच आजूबाजूला. मी तरी अशी मतप्रदर्शनं पाहिली नाहीत नाव न बदलण्याने.

लेख छान आहे...लिखाणही.
पण निरजातै आपणास आपल्या मिस्टरांकडील नाव लावण्यास कोणती अडचण आहे..? तिथेही तुमच्या कतृत्त्वामुळेच तुमचे अस्तित्त्व असेल ना..? की आपली ही जिद्द आहे..? 'अहंभाव' आहे..?

तरी आपण आपल्या 'मर्जिची' मालकीण आहात...त्यात तुमचे मिस्टरही स्वभावाने मन मीळावु...तुम्हाला त्यांचा अभिमान असायला हवा...!

आपल्या मते "स्वत:चे अस्तित्त्व" म्हणजे नक्की काय...?

मला फक्त एवढेच सुचवायचे आहे की नावात काय आहे नाव काही असले तरी तुम्ही तुम्हीच असणार ना त्याने तुमच्या कतृत्त्वात काही फरक होणार..? व्यवसाय वा सवयीत काही बदल होणार आहे का..?
नावात काय ठेवलं आहे..? का ही एवढी सामाजिक ओढ्ताण..?
असं मला जरा वाटुन गेलं आपलं.

स्पष्टवक्तेपणाबद्द्ल क्षमाप्रार्थि.
धन्यवाद!

>> हि गोष्ट फक्त व्यक्तिगत आवड/प्राधान्य आहे बस इतकेच.
Exactly!! या व्यक्तिगत गोष्टीत इतरांनी नाक खुपसण्याची गरज काय? लेखिकेचं म्हणण हेच आहे. (असं मलातरी लेख वाचल्यावर वाटलं)
>> आपल्या मिस्टरांकडील नाव लावण्यास कोणती अडचण आहे..?
लेखिकेच काय माहित नाही. पण हा प्रश्ण विचारलात म्हणजे, "आपलं जन्मापासुनच नाव का बदलाव?" याचं उत्तर आपल्याला माहिती असेल असं मी समजतो. मलापण कळेल का? (परंपरा वै सांगु नका. अशा कित्तेक परंपरा आपण सध्या पाळत नाही.)

चातक, सॅम म्हणतात तसे ही माझ्या वैयक्तिक निर्णयाची बाब आहे. त्या निर्णयाशी मी आणि माझ्या घरातले सोडून कुणाचाच संबंध नाही त्यामुळे या निर्णयाची कारणे देण्याची माझी बांधिलकी माझ्या घरच्यांच्यापुरतीच आहे. तेव्हा स्पष्टतेबद्दल क्षमस्व पण आपण माझ्या घरच्यांपैकी नाही त्यामुळे मला गरज नाही वाटत >>>आपल्या मिस्टरांकडील नाव लावण्यास कोणती अडचण आहे..?<<< या वैयक्तिक प्रश्नाला उत्तर देण्याची.
रादर काहीच ओळख नसताना कुणी असा प्रश्न विचारावा तोही माझ्या नवर्‍याच्या स्वभावाचा दाखला वगैरे देऊन आणि मला त्याचा अभिमान नाही इत्यादी सोयीस्कर गृहितकं धरून हे माझ्यामते माझ्या खाजगी आयुष्यात नाक खुपसणे आहे. आणि संपूर्ण लेखात असल्या नाक खुपसण्यावरच माझा आक्षेप आहे.

बाकी नावासंदर्भाने तुमची मतं ती तुमची मतं. तुमची कारणं ती तुमची कारणं. बरोबर वा चूक नव्हे पण मी तुम्ही तुमच्या मताप्रमाणे चालणं जितकं योग्य आहे तितकंच मी माझ्या मताप्रमाणे चालणं योग्य आहे.

इथे तुम्ही हा प्रश्न विचारलात म्हणून तुम्हाला उत्तर दिले पण तुम्ही हे केवळ उदाहरणादाखल घेऊनही हाच मुद्दा राहील.

"आपलं जन्मापासुनच नाव का बदलाव?" >>> याचे उत्तर काहीही असो. पण यावरु एक बाब 'स्पष्ट' होते ती म्हणजे "अहं" "इगो" 'मीपण'. 'अस्तित्त्व' नाही. जर आपल्या 'स्वार्थासाठीच' नाव न बदलणे हे कारण असेल तर...मग ठीक आहे...पण...या साठी समाजातिल लोकांना 'दोष' देणे बरोबर नाही.

वर्षानुवर्षे पतिकडल्या नावाची परंपरा आपल्या देशात असल्यामुळे त्यात "लोकांचाही" दोष नाही आणि नव्या विचारांच्या निरजाताईं यांचाही दोष नाही.
व या लेखाचाही..., मुळात गरज नव्हती. कारण या लेखाने 'समाजाला उपयोगी' अशी दिशा मीळणारी नाही... "हि गोष्ट फक्त व्यक्तिगत आवड/प्राधान्य आहे बस इतकेच."

(परंपरा वै सांगु नका. अशा कित्तेक परंपरा आपण सध्या पाळत नाही.) >> मान्य..!

धन्यवाद!

ही माझ्या वैयक्तिक निर्णयाची बाब आहे.>> ठीक आहे..! पण लोकांनाही तुम्ही समजुन घ्या त्यांच्यावर 'परंपरेचा पघडा आहे' ते आपले 'वाईट इच्छीत' नाहीत. फक्त परपंरा समजाउन देतात्..तुम्हाला नाही पटत तर सरळ दुर्लक्ष करा.. Happy त्यांना दोष देउ नका.

तेव्हा स्पष्टतेबद्दल क्षमस्व पण आपण माझ्या घरच्यांपैकी नाही त्यामुळे मला गरज नाही वाटत >>>आपल्या मिस्टरांकडील नाव लावण्यास कोणती अडचण आहे..?<<< या वैयक्तिक प्रश्नाला उत्तर देण्याची.>>>

निरजाताई आपल्या कडुन अश्याच प्रतिसादाची अपेक्षा होती...यात काहीच गैर नाही...आपला आदरच आहे.

धन्यवाद!

नी, लेखाला मनापासून १००% अनुमोदन... वाचताना मी मनात 'अगदी..अगदी..असंच होतं बघ...' चा पाढा लावला होता.

मणिकर्णिकेच्या प्रतिक्रियेला पुर्ण अनुमोदन; बाकी इतर वाद घालणार्‍या प्रतिक्रिया अपेक्षितच होत्या. त्यांना लेख किंवा लेखाचा उद्देशच नाही कळला, असं म्हणावंसं वाटतं. त्या सगळ्यांना उत्तर म्हणून खरं तर एका प्रतिक्रियेत तुम्ही 'परत एकदा' म्हणून जे मुद्दे मांडले आहेत, ते उत्तर पुरेसे असले पाहिजे.

असो. किमान पुढच्या पिढीच्या नशिबी कमी त्रास असतील, असा विचार करून मी तुर्तास या विषयालाच पुर्णविराम देते. अशा अजुन किती पातळ्यांवर आपण बायका लढतोच - त्यात एक अजून भर, आणि काय? Wink

Pages