ओळख, नाव, वागणूक इत्यादी आणि मी.
हे ही जुनंच लिहिलेलं. अनेकांना लक्षातही असेल. फरक तसा काहीच नाहीये अजूनही पण प्रसंगांचा त्रास स्वत:ला करून घेण्यापेक्षा समोरच्याची समजण्याची कुवत नाही हे मी शिकलेय थोडंफार इतकंच..
--------------------------------------------------------------------------------------------
"लग्न झाल्यावरही मी नाव बदलणार नाही. आणि ते तुझ्या आइवडिलांना पटवायची जबाबदारी तुझी."
असं स्वच्छपणे त्याला सांगितलं आणि मी निवांत झाले. त्यालाही या गोष्टिचं फारसं काही वाटलं नाही. बायकोने आपलं नाव लावलंच पाहिजे इत्यादी विचार त्याच्या आसपास फिरत नसत सुदैवाने.
लग्नाआधी नी नंतर काही खास शेलक्या प्रतिक्रिया आल्या होत्या मात्र यावर.
"तू काय स्वतःला जास्त शहाणी समजतेस?" इति माझेच एक काका
"आमचं आडनाव लावत नाहीस तू?" (हं विचित्रच दिसतेय ही!) हे मनात म्हणणार्या त्याच्या एक काकू.
"काय म्हणताय मिसेस अमुक अमुक!" हे मुद्दामून म्हणणारा एक मित्र
इतपत होणारंच हे गृहितच होतं त्यामुळे त्या प्रतिक्रियांवर आम्ही दोघांनीही हसून घेतलं.
दोघंही एका क्षेत्रात काम करत होतो पण वेगवेगळ्या विभागात. आपापल्या बळावर एका स्थानापर्यंत आलो होतो. तो captain of the ship आणि मी एक department head. आपापल्या वर्तुळात आमच्या कामाला महत्व होतं. मग झाली गंमत. आमचं एक प्रोजेक्ट खूप म्हणजे खूपच मोठं झालं आणि त्याबरोबर त्याचं नावही. आता त्याच्याकडे खूप लोक आदराने पहायला लागले. त्याच्याशी आपली ओळख आहे हे कॉलरी ताठ करत दाखवू लागले.
त्याच प्रोजेक्टमधले एकजण एकदिवस मला येऊन म्हणू लागले की
"आता तरी निदान सरांसाठी तरी नाव बदला!"
म्हणजे मला आजपर्यंत याच्या नावाची लाज वाटत होती नी आता लाज वाटायची गरज नाही म्हणून मी आता नाव बदललं पाहिजे?
माझं नाव ते माझं मी ठरवीन ना तुमचा काय संबंध?
मला आणि माझ्या नवर्याला, घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही कोण टिकोजीराव मला नाव बदलायला सांगणारे?
असे खूप सारे व्हि.ओ. माझ्या डोक्यात. आणि मी वळून दुसर्या व्यक्तीशी बोलू लागले.
हळूहळू लक्षात येऊ लागलं की माझं नाव बदललेलं नसणं हेच नाही तर मला माझं माझं काही अस्तित्व असणं हेच लोकांना खुपतंय.
माझ्या स्वतःच्या नाटकासंबंधात माझी मुलाखत घेतली गेली आणि मुलाखतीत छापलं काय गेलं की माझा नवरा मोठा दिग्दर्शक असला तरी मला किती सपोर्ट करतो. माझे सासूसासरे कसे मला साथ देतात इत्यादी. ते खरं आहे हो पण त्याच्या मुलाखतीत नाही कधी विचारत बायकोचं योगदान वगैरे.
एकदा एका छोट्या गावात गेलो होतो. कुठल्यातरी विषयावर गप्पा चालू होत्या. एका मुद्द्यावर माझं आणि नवर्याचं म्हणणं वेगळं होतं. आम्ही एकमेकांचा मुद्दा समजून घेत होतो पण बरोबरच्या एका काकांना मात्र त्याचा त्रास व्हायला लागला. आम्ही दोघांनी नंतर बोलू म्हणून विषय थांबवला तरी ते काका नंतर मला खिजगणतीतही धरेनात. माझ्याशी बोलेहीनात. 'बिचारा एवढा मोठा दिग्दर्शक आणि त्याची बायको ही अशी!' असं त्यांच्या तोंडावर लिहिलेलं मात्र दिसू लागलं. चिडचिड झालीच आणि परिणामी मी जेवायचंच टाळलं.
हे असं अनेकदा होतं. मी प्रवासात जीन्स वापरते यापासून माझा माझा वेगळा मोबाइल आहे ज्याच्यावर मी माझ्या माझ्या कामाच्या लोकांशी बोलत असते ते मी माझं मत मांडते, कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल नवर्याकडे न पहाता जे मला पटतं ते उत्तर देते यापर्यंत कुठलंही कारण माझ्या नवर्याला बिचारा ठरवण्यासाठी पुरेसं असतं. असं होऊ नये म्हणून मग मला आदर्श पतिव्रता पत्नी सारखं वागावं लागतं. सिंदूर, बांगड्या आणि साडीचीच कमी असते. स्वतःचं मत/ स्वतःचं आयुष्य नसलेली, नवर्याच्या पावलात स्वर्ग बिर्ग शोधणारी कंटाळवाणी बायको मिळाली असती तर माझा नवरा या लोकांना बिचारा वाटला नसता हे माझ्यासाठी आणि माझ्या नवर्यासाठीही अचाट आणि अतर्क्य असतं.
महाजालावर देखील असे महाभाग भेटतात अधूनमधून की ज्यांना माझं वेगळं अस्तित्व सहन होत नाही. मग सगळा सारासार विचार बाजूला ठेवून 'यशस्वी माणसाशी लग्न करून स्वतःचं नाव मोठं करू पहाणारी' अशी विशेषणं लावली जातात. यावर हसावं की रडावं तेच कळत नाही. अश्यांची नी त्यांच्या मध्ययुगीन मानसिकतेची कीव मात्र येतेच येते.
इतर ठिकाणीच कशाला आमच्या क्षेत्रातल्या अनेकांना, अगदी जे मला आधीपासून ओळखत होते त्यांना सुद्धा माझी ओळख करून देताना वेशसंकल्पक(costume designer) पेक्षा अमुकतमुक ची बायको हे जास्त सोयीचं वाटतं. एक वेशसंकल्पक म्हणून मी जोवर माहित असते अनेकांना तोवरचं काहींचं वागणं आणि नवर्याची ओळख कळल्यावरचं वागणं यात जमिनअस्मानाचा फरक असतो.
अश्या वेळांना नाव आडनाव न बदलण्याचा निर्णय किती योग्य होता ते अजून अजून पटत जातं. निदान नवर्याचा संदर्भ कळेपर्यंत तरी लोक माझ्याशी माझ्या माझ्यापुरते वागतात.
आणि मग कधीतरी एखादं असं प्रोजेक्ट होतं जिथे सगळ्यांना माझ्या नवर्याचा संदर्भ माहित असतो. त्याच्याबद्दल आदर पण असतो. त्याचवेळेला माझ्या कामाबद्दलही आदर असतो. माझ्याशी वागणं हे माझ्या माझ्यापुरतं असतं. मी तिथे नीरजा असते. एक व्यावसायिक असते, नंतर एक मैत्रिण होते. मला नीरजाप्रमाणेच वागता येतं. कुठलाच आविर्भाव मिरवण्याची गरज नसते. अश्या ठिकाणी काम केल्याची मजा वेगळीच असते. पुढचे अनेक कंटाळवाणे प्रसंग पचवण्यासाठी इथे ताकद मिळते.
आम्ही दोघं दोन वेगळी माणसं आहोत ज्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि तरीही अनेक बाबतीत मतभेदही आहेत पण या मतभेदांमुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडत नाही. आम्ही एकमेकांमुळे वाढत असतो. दुर्दैवाने हे समजण्याची कुवत किंवा मानसिकता ५% च लोकांकडे असते. बाकी सगळे मध्ययुगातच अडकलेले
इरावतीबाईंनी (इरावती कर्वे) पन्नासेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखातल्याप्रमाणे अजूनही नात्यातल्या पुरूषमंडळींच्या विशेषतः नवर्याच्या संदर्भानेच केवळ बाईकडे बघण्याची, तिला ओळखण्याची सवय आणि गरज सुटत नाही. इरावतीबाईंच्यासारखी मोठी व्यक्तीही यातून गेलीये मग माझी काय कथा असं मनाशी म्हणत मी अनेक ठिकाणी खोटी खोटी वागत जाते.
- नी
... पटलं... परिस्थिती बदलेल
... पटलं... परिस्थिती बदलेल हळूहळू. पण मुलिंनीच पुढाकार घेतला पाहिजे (आणि अर्थातच मुलांनी support दिला पाहिजे) आपल्याकडे लोक पण फारच भोचक असतात. उगाचच दुसर्याच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसून काय मिळतं? फक्त गॉसिप असेल तरी एकवेळ ठीक पण दुसर्याचे वैयक्तिक आणि आपला काहिही संबंध नसलेले तपशील घेउन त्या माणसाबद्दल उगाचच पूर्वग्रह कशाला बांधायचे.
(प्रतिसादांबद्दल भरत मयेकरना अनुमोदन.. काही प्रतिक्रिया उगाचच वाद उकरुन काढण्यासारख्या आहेत.. )
चर्चेला थोडेसे वेगळे
चर्चेला थोडेसे वेगळे वळण..
तूम्ही जर नाव बदलणार असाल तर रितसर गॅझेट नोटीफिकेशन करुन नाव बदला. पण बदलणार नसाल तर कुठेही, कागदोपत्री दुसरे नाव लिहू नका. एकाच व्यक्तीने, दोन नावाने वावरणे हा कायदेशीर गुन्हा आहे. (अर्थात जर तूम्ही दोन्ही नावे लिहिणार असाल, तर गोष्ट वेगळी.)
हे पोस्ट, केवळ ताण कमी करण्यासाठी.
<<<<<<<<<<एकाच व्यक्तीने, दोन
<<<<<<<<<<एकाच व्यक्तीने, दोन नावाने वावरणे हा कायदेशीर गुन्हा आहे. (अर्थात जर तूम्ही दोन्ही नावे लिहिणार असाल, तर गोष्ट वेगळी.)<<<<<<<<<
हे तुम्ही मायबोलीबद्दल म्हणताय का दिनेशदा?:)
दिनेशदा-- मी रितसर नोटीफिकेशन
दिनेशदा-- मी रितसर नोटीफिकेशन करुन नाव बदलला आहे..
फार कटकटी असतात खर तर त्या.. passport , PAN , bank A/C हे सगळच बदलाव लागला..
कुठलाही बदल प्रस्थापितांच्या(
कुठलाही बदल प्रस्थापितांच्या( मग ते कुठलेही असोत. ) हळुहळुच पचनी पडतो. अर्थात त्यासाठी अनेक 'नीरजा' खमकेपणाने उभ्या रहाव्या लागतात , तश्या त्या उभ्या राहु लागल्या आहेत आणि आणखीही राहतीलच.
निंदकांना खमकेपणाने फाट्यावर का कुठे ते, लेखिका आणि तसे विचार असणारे सगळेच, मारतच आहेत. प्रश्न आहे तो अश्या प्रवृत्ती बदलण्याचा. आदळआपट मला तरी कुठे दिसली नाही. असो.
नी छान लिहील आहेस....अगदी
नी छान लिहील आहेस....अगदी मनापासुन
मी पण लग्नानंतर माझं नाव नाही बदलं, ह्या सगळ्या तुन मी ही गेली आहे, जात आहे पण म्हणतात ना " मारणार्याचा हात धरता येतो पण बोलणार्याचं तोंड नाही धरता येत " ही त्यातलीच एक गत आहे. "व्हू केअरस?" म्हणुन मी सोडुन द्याचं प्रयत्न करते पण जमत नाही.....जमेल हळुहळु..:)
लोकं हजार तोंडांनी बोलतात आणि या हजार लोकांची हजार मतं असतात.
नक्की कोणाला फ़रक पडल्याने आपल्याला फ़रक पडेल हे आपण आपल्याशीच ठरवून घेतलं एकदा की त्रास होत नाही बहुधा. एकदा हा सबसेट डीफ़ाईन झाला आपल्यापुरता की बाकीच्यांना फ़ाट्यावर मारता येत आणि तुलनेत फ़ार थोडा त्रास होतो.>>> सुंदर लिहीलस मणि...आवडलं...जमायला हवं मला
मधुरिमा, मायबोलीला कुठलेच
मधुरिमा, मायबोलीला कुठलेच कायदेकानून लागू होत नाहीत. म्हणून तर डु आय चालतात न इथे.
जोक्स अपार्ट, पण हा बदल हळूहळु होतोय हे नक्की. सध्या पासपोर्टसकट सगळीकडे, आईचेही नाव लिहावे लागते, हे काय थोडे आहे ?
पण हा प्रश्न भारतातलाच आहे असे नाही. एखद्या देशांत (मी मुद्दाम नाव घेत नाही) दोन भिन्न नावाच्या व्यक्ती, पति पत्नी म्हणून एका रुममधे राहू शकणार नाहीत.
त्यामुळे हा बदल पूर्ण जगात होणे आवश्यक आहे.
छान लिहीलाय लेख....एकूण एक
छान लिहीलाय लेख....एकूण एक मुद्दे पटले!
सह्ही आहे लेख..मी पण
सह्ही आहे लेख..मी पण नाव-आडनाव बदललं नाहिए
लग्नानंतर नाव बदलण्यावरुन
लग्नानंतर नाव बदलण्यावरुन आठवले. एलायसीत काम करण-या माझ्या एका मैत्रिणीने लग्नानंतर ऑफिसमध्ये नाव बदलुन घेतले नव्हते. तिला तसा फरक पडत नव्हता पण करुया करुया करत जवळजवळ ३ वर्षे आधीच्याच नावाने ती वावरली. तिथले वातावरण जरा वेगळे, नावाने कोणाला हाक मारायची नाही. बॉस कायम 'मिस राणे' असेच संबोधायचा. शेवटी जेव्हा मॅटर्निटी लिव घ्यायची वेळ आली तेव्हा तिच्या बॉसने तिला म्हटले, 'बाई आता तरी नाव बदल. तुला काही फरक पडत नसला तरी 'मिस अमुक तमुक यांची बाळंतपणाची रजा सँक्शन केलीय' हे लिहुन द्यायला मला जीवावर येतेय.' शेवटी तिने ९ व्या महिन्यात मॅरेज सर्टीफिकेट देऊन नाव बदलले
मला काही फार विषेश वाटत नाही,
मला काही फार विषेश वाटत नाही, नाव बदलणे ही परंपरा आहे, सगळ्या जगाने ती मान्य केली. तस बघायला गेलं तर आडनाव हवच कशाला? बापाचं आडनाव का लावता? आईच का नाही? कोण कुणाचा मुलगा किंवा वंश कुठला आहे हे समजण्या साठी एक नियम आहे. काही नियमाच्या विरुद्ध दिसल की लोक विचारतात. त्यात वाईट वाटण्या सारखं काय आहे? काही लोकांना उगाच नियम तोडणारी माणसं आवडत नाहीत म्हणुन ते खोच़कपणे विचारतात. बरं तुम्ही नाव नाही बदललं का तर तुमची आयडेंटिटी, मग मुलं बापाचं नावं लवतात, तुम्ही बापाच नाव लवलं, या बाबतित तुमची आणि तुमच्या मातोश्रींच्या आयडेंटिटीचं काय?
वंश बघणे हे लग्न करताना गरजेच आहे, चुलत चुलत बहीण भावातं लग्न होउ नयेत. एकाच वंशात लग्न होऊ नयेत म्हणुन साधा , आणि सोपा पर्याय शोधला आहे तो म्हणजे आडनावं. नियम फार विचार करून बनलेले असतात चुकुन झालेले नसतात. प्रत्येक नियमा मागे एक विचार असतो एक कारणं असतं. दहा लोक सोसायटी मध्ये रहातात, एक प्रस्ताव बहूमताने मान्य होतो, सगळ्यांना मान्य असायलाच हवा अं काही नाही आहे, मग बहुमताने मान्य होतो आणि तो मग सगळ्यांना लागू होतो. बरेच वर्ष ते नियम तसेच रहतात, जुने लोक जातात, नविन लोक येतात जुने नियम आंधळेपणाने फॉलो करतात? एक दिवसा एकाच्या डोक्यात किडा येतो, जुन्यांना मुर्खात काढलं जात, आणि नवे नियम बनतात, नाही तर तसेच आचरणात आणले जातात. (उदा: आपले सण, परंपरा) आता इथे कुणाची मानसिकता चुक?
मानसिकता भुरसटलेले विचार असं काही नाही आहे, जगातिल ९९% लोक घालून दिलेले नियम पाळतात त्या पलिकडे ते विचार करत नाहीत आणि सगळेच जर विचार करत बसले तर नियम होणार नाहीत. काहींना काहीतरी वेगळ करायची खाज असते, ते ते करतात, आणि हेटाळलेही जातात.
शेवटी काय तर...
माणुस हा एक विचित्र प्राणी आहे, म्हणुन आपण सगळे चित्र विचित्र आहोत. मला माणुस ह्या प्राण्या बद्दल अनेक बेसिक प्रश्न अजुनही पडतात. त्यतले अगदी बेसिक...
१) माणुस हा "आपण ह्या प्रुथ्वी तलावरील एक प्राणी आहोत" हे का मान्य करत नाही?
२) माणूस हा एकमेव प्राणी आहे जो कपडे घालतो, का?
३) स्वत:ला बुद्धीवान प्राणी समजतो? एकही बुद्धीमत्तेची गोष्ट माणसाने केली मला तरी माहीत नाही.
अजुन बरेच आहेत, एक वेगला विभाग उघडावा लागेल.
नी "ओळख, नाव, वागणूक इत्यादी आणि मी" जिथे "मी" आहे तिथे प्रॉब्लेम हा असणारच. कारण माणुस हा मुर्ख प्राणी आहे, कारण त्याला डीफाईंड मुलभूत गरजा नाहीत.
"एक (गरज) मिळालं की आपल्याकडे नसलेल दुसरं कसं मिळवायच ह्या साठी धडपड करत रहाणं हिच एक माणसाची मुलभूत गरज आहे आणि हा आपला प्राणी स्वभाव आहे"
मग "नावं, नवरा, वागणुक, मी" हा देखिल त्याच गरजेचा भाग आहे. अजुन बरच लिहीलं असता पण फार लिहायचा मला कंटाला येतो
अमेरिकेत येताना पासपोर्टवर
अमेरिकेत येताना पासपोर्टवर लग्नाआधीचं आडनाव असल्याने, मी अजून त्याच आडनावाने इथे वावरतेय. तेच आडनाव ठेवायचं, असा काही अट्टाहास नाही. नवरा न्युट्रल आहे ह्याबाबतीत. तुला हवं तर बदलं. जुनचं ठेवलसं तरी काही फरक पडत नाही. असं त्याचं मत आहे.
पण मुलीचा जन्म झाल्यावर मात्र अनेकदा मजेशीर घटना घडतात. माझं आणि मुलीचं, दोघींची नाव चांगली लांबलचक आहेत. (प्रत्येक नावाच्या आणि आडनावाच्या spellling मधे किमान ८ अक्षर आहेत.)
तिला घेऊन डॉक्टरच्या Office मधे गेले की, तिथली receptionist मला माझे नाव आणि मुलीचे नाव विचारते. तिला नुसते नाव सांगून चालत नाही कारण त्या Hispanic सुंदरीला माझे भारतीय उच्चार कळतं नाहीत. प्रत्येक नावाचे आणि आडनावाचे spellling सांगावे लागते. तेही A for apple, b for boy अश्या प्रकारे एक-एक अक्षर सांगतं सांगावे लागते. त्यामुळे नाव सांगणे ह्या प्रकारातच १०-१५ मिनिट जातात. अश्यावेळी कधी कधी वाटतं, माझ आणि मुलीचं आडनाव सारखचं असतं तर थोडा लवकर आटपला असता हा कार्यक्रम.
>>> काही लोकांना उगाच नियम
>>> काही लोकांना उगाच नियम तोडणारी माणसं आवडत नाहीत म्हणुन ते खोच़कपणे विचारतात. <<<
तिन्ही बोल्ड केलेल्या शब्दात घोळ आहे.
दुसर्याने केलेली कृती ह्याला काहीही विचार नसून उगाच केलेली आहे असे गृहित धरणे. दुसर्याने स्वतःच्या आयुष्याचे काय करावे याबद्दल आपल्या आवडी निवडी असणे आणि आपल्याला आवडतं तसं दुसरा वागत नाही म्हणून आपल्याला खोचक बोलण्याचा अधिकार आहे असं समजणे. या सगळ्यात जर काहीच चूक त्या व्यक्तीला वाटत नसेल तर अश्या व्यक्तीला बुरसटलेली म्हणण्यात काय चूक?
आता इथे कुणाची मानसिकता चुक?<<<
आपल्याला वाटतं तसंच दुसर्याने आपलं आयुष्य आखावं अगदी नावाइतक्या खाजगी गोष्टीतही असं मानणारी मानसिकता चूकच.
बाकी सत्या तू नेहमीप्रमाणेच रूढी म्हणजेच बरोबर आणि रूढी मोडू पाहणारे ते सगळे चूक, त्यांची हेटाळणी होतेच त्यात काहीच गैर नाही असे मुद्दे मांडलेले आहेस. आजवर अनेकदा अनेक ठिकाणी रूढीवादीच मुद्दे तू मांडत आलायस. आणि रूढी मोडायचा प्रयत्न करणार्यांवर हिणकस शेरे मारत आलायस. नवीन काहीच नाही. फक्त रूढीप्रिय हटवादीपणातून हेटाळणी करणार्यांना बुरसटलेले म्हणणं तुला पटत नाहीये. हे जामच डबल स्टॅंडर्ड झालंय.
आणि बादवे 'खाज' इज वे आउट ऑफ लाइन!
नाव बदलणं बरोबर की चूक, त्या निर्णयाचे स्पष्टीकरण किंवा तुझ्या पहिल्या परिच्छेदातले प्रश्न या सगळ्यांची उत्तरं मी अनेक चर्चांच्या ओघात माबोवर पण दिलेली आहेत त्यामुळे इथे ते मुद्दे लिहून नाव बदलणे न बदलणे या विषयावर चर्चासत्र घडवण्याची माझी इच्छा नाही.
आणि नाव बदलण्याच्या निर्णय घेतलेल्या कुणालाही मी इथे चूक म्हणलेले नाही.
नी, तुझ लिखाण, त्या मागचि
नी,
तुझ लिखाण, त्या मागचि मनातलि खळबळ पोचलि.
नाव वडिलांच लावतो का नवर्याच यापेक्शा महत्वाच आहे कि जे आपल्या मनाला पट्त ते करता येत
का नाहि. मी बराच विचार करुन ठरवल की आड नाव बदलायच. याच एक कारण हे देखिल होत कि माझे वडिल खुप लहान पणि गेले आणि त्यन्च्या family नी तसाहि आमच्याशी फार सम्बन्ध ठेवला नाहि. विचार केला, ज्या आइनी आपल्याला वाढवल /घडवल, तिच हे आडनाव नाहिच मग आपल्या मुलान्च आणि आपल आडनाव कशाल वेगळ करायच? they should feel we are one family ( not that they
would not have felt one family if I had a different last name..but still) मग बदलल किन्वा नाहि या दोन्हि choices मधे फार फरक दिसेना. वडिल का नवरा..खरच काय फरक पडतो अस वाटायला लागल. लग्न झल्यावर वर्शा दीड वर्शानि निवान्त passport renew करताना बदलल. पण खुप लोकानि "तु नाव बदलशील अस वाट्ल नव्हत" अशि reaction दिलि.
ऐन लग्नात मात्र साबानी नाव बदलायचि पध्द्त आहे म्हणुन नविन firstname सान्गितल्या वर खुप राग अला. तेव्हा सान्गाव लागल,नाव तर सोडाच मी आडनाव सुद्धा नविन लावणार नहिये.:-) दचकल्याच त्या, पन त्या नन्तर कोणि काहि विचारल नाहि कधि.
there is no right or wrong. Choice असण महत्वाच. निर्णय आपला असण महत्वाच.
firm रहा. दुनिया बद्लेल हळु हळु.:-)
there is no right or wrong.
there is no right or wrong. Choice असण महत्वाच. निर्णय आपला असण महत्वाच.<<<
सोला आने सच!
लेख खुपच छान आहे. करुत्ववान
लेख खुपच छान आहे. करुत्ववान सर्वच स्त्रियांना हे प्रश्न पडत नाहीत. त्या योग्य वेळी कस वागायच, काय नाव लावायच याचे निर्णय घेऊन मोकळ्या होतात. हे गुण अगदी लहानपणा पासुन दिसतात.
माझ्या मते स्त्री स्वातंत्र विषयक लेख वाचुन मंगळसुत्र घालव की नाही. कुंकु लावाव की नाही अशी मत ठरवणार्या स्त्रिया असतील तर त्यांना जास्तच मानसीक त्रास होईल.
आनंदाची बाब म्हणजे स्थानीक स्वराज्य संस्थामध्ये आता ५०% टक्के आरक्षण आल आहे. यात किमान ५० टक्के निवडुन आलेल्या स्त्रीया कोणत्याही प्रश्नाच उत्तर " ह्यांना विचारुन सांगते" म्हणणार्या नसव्यात म्हणजे ह्या कायद्याचा मुळ उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.
नी, मी रुढीवादी आहे हे ११०%
नी, मी रुढीवादी आहे हे ११०% मान्य, सण साजरे करणे, जुन्या परंपरा जपणे ह्याच मी मनापासून समर्थन करतो. कारण मी म्हंटल्या प्रमाणे त्यामागे एक सॉलीड लॉजिक आहे आणि ते मला जाणवतं म्हणुन मी त्या पाळतो पण कुठल्याच रुढींचा कहर करत नाही. आपल्या समाजाने बदल आत्मसात केले आहेत, कालपरत्वे संदर्भ बदलतात मग ते बदल व्हायलाच हवेत. एखादी गोष्ट का करावी आणि का करू नये या मगे सबळ करणं मिळालीत तर ते बदल घडायलाच हवेत.
मंगळसुत्र घालवच, कुंकु लावावच पाहिजे ह्या आजच्या काळत महत्वाच्या नाहीत हा प्रत्येकाच्या आवडीचा भाग आहे, मग हे पुरुषांना का लागू नाही, तर मानव हा प्राणी नर प्रधान आहे पण बदल होता आहेत आणि ते होतिल. आपण मंगळसूत्र तर पाश्चात्य मॅरेज रिंग घालतात आणि ते त्याला किती महत्व देतात हे सर्व ज्ञात आहे. पण हे असं का आहे? उत्तर शोधा नक्की सापडतिल.
अशा अनेक रुढी आहेत ज्या मागे काही विषेश लॉजिक नाही, मुळात लग्न हा प्रकार हवाच कशाला? सर्वात भुरसटेलेल्या परंपरा आहे ही. प्रत्येल मानव हा समर्थ आहे मग नवरा बायको असण्याची गरजच काय? उगाच फालतू बांधिलकी.
there is no right or wrong. Choice असण महत्वाच. निर्णय आपला असण महत्वाच.<<<
सोला आने सच! << खरं विचार करा, प्रत्येक बलात्कारी, खुनी, चोर, हुंडाबळी घेणारे ह्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्या मते योग्यच असतात. there is no right or wrong, खरयं? प्रश्न आहे नियम का घातले जातात, रुढी का निर्माण होतात. शीरिन म्हणते तिने नाव बदललं, काही फरक पडत नसताना.. का? सोसयटिचा नियम लागू, कारण तो सोईचा वाटला असेल. असेच काही नियम गरजेचे नसतील का बदलायचे.
आमच्या सॉफ्टवेअर मध्ये कोडींग गाईडलाईन्स असतात, नविन पोरं विचारतात येवढा त्रास का घ्यायचा? आम्ही उत्तर देतो "standardization" काही वर्षांनी हे रुळलं/आत्मसात झालं की "standardization" गरज का होती हे नविन लोकांना माहीतही नसेल, आणि फक्त एक "रुढी" म्हणुन लोक फॉलो करतिल पुन्हा प्रॉब्लेम फेस करतिल पुन्हा नव्यानं रुढी जन्माला घालतिल. मज्जा मज्जा आहे सगळी, उगाच का रक्त जाळून घेता?
माझं मत येवढच आहे की लोक असे का वागतात हे जर समजुन घेतेलं तर ते बदल घडवून आणण सोप जाईल. उगाच त्या लोकांची हेटाळणी करणं योग्य नाही, प्रत्येक छोट्या मोठ्या बदलासाठी बदलासाठी क्रांतीची गरज नाही. जे तुमच्या संस्कृतीत सर्वमान्य आहे ते इतरांच्या संस्कृतीत असायलाच हवं असं नाही आहे.
मला तुझ्या लेखात नुसती हेटाळाणी दिसली दुसर्यांना समजुन घेण्याचा सुर कुठेच नाही, फक्त लोकांनी तुला समजून घ्याव येवढाच अट्टाहास दिसला. तुमच्या बाबतित जे योग्य आहे ते सर्व जगाला लागू व्हाव हा विचार नाही पटला...
>>> काही लोकांना उगाच नियम तोडणारी माणसं आवडत नाहीत म्हणुन ते खोच़कपणे विचारतात. <<< खोचक आणि उगाच दोन्ही आहे की दोघांच समर्थन करतोय, दोन्ही बाजुची मत पटतायत मला
समोरच्याची समजण्याची कुवत नाही हे मी शिकलेय थोडंफार इतकंच >> समोरच्याला आपले विचार पटले नाहीत की त्याची कुवत नाही. परफेक्ट!!!
रूढी मोडायचा प्रयत्न करणार्यांवर हिणकस शेरे मारत आलायस.>> संदर्भ दे, पण असेलही कदाचित, उगाच रुढी मोडत सुटा आणि रुढी पाळत रहा.. हे मला पटत नाही, हे असं का हवं आणि का नको, ह्याचा विचार मांडा. पण उत्तर नाहीच सापडलं आणि जड जातं नसेल तर जस आहे तस चालू द्यायला काय हरकत आहे, काहीतरी विचार असावा ह्या मागे, उमगेल कधीतरी आणि अट्टाहास नाही केलात तर विरून जातिल कालापरत्वे.
माझ्या वरच्या पोस्ट मध्ये काय हिणकस शेरे आहेत हे पण सांग. जाहीर माफि मागतो.
मी हे पण मान्य करतो सगळ्याच रुढीं मागे कारण सापडतिल असे नाही. तरी त्या आचरणात आणणार्याला रुढीवादी म्हंटल जात असेल तर मी नक्की रुढीवादी आहे...
संध्याकाळी देवा जवळ दिवा का लावाला? बल्ब असताना दिवा का लागतो. संध्या का करावी, त्या मुळे मुलांच्या अयुष्यात काय दिवे लागतात? रुढी... किती माबोकर हे करतात? आणि ते कराव म्हणुन किती आधुनिक आया मुलांच्या मागे लागतात..का? आई बापांचा आदर का करावा? नमस्कार केल्याने काय होते? कुणाला पाय लागला तर नमस्कार करावा? पुस्तकांना, देवाच्या फोटोला, ई. आदरणिय गोष्टींना पाय लागला तर काय होत? पाय का लाऊ नये? प्रसाद उजव्या हातातच का घ्यावा? एक ना हजार रुढी आहेत ज्यांच्या मागची कारण मला सापडतात आणि काही सापडत नाहीत. काही मी फॉलो करतो तर काही करत नाही, काही सोईने फॉलो करतो किंवा त्या त्या वेळेच्या मानसिकतेने फॉलो करतो. उहापोह कुठलाच नाही.. स्वतःला नियम घालतो, स्वत:चे नियम तोडतो. शक्यतो इतरांना मुर्खात काढत नाही, शक्यतो स्वत:ला मुर्ख म्हणत नाही. म्हणुनच कदाचित मी रुढीवादी आहे.
नितीन>>
आनंदाची बाब म्हणजे स्थानीक स्वराज्य संस्थामध्ये आता ५०% टक्के आरक्षण आल आहे. यात किमान ५० टक्के निवडुन आलेल्या स्त्रीया कोणत्याही प्रश्नाच उत्तर " ह्यांना विचारुन सांगते" म्हणणार्या नसव्यात म्हणजे ह्या कायद्याचा मुळ उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. >> "ह्यांना विचारुन सांगते" ह्यात काय अयोग्य आहे मी देखिल लोकांना सांगतो माझ्या बायकोला विचारुन सांगतो. दोघांच्या किंवा इतरांचा विचार घेउन निर्णय घेण्यात काय प्रॉब्लेम आहे? काही ठिकाणी "ह्यांना विचारुन सांगते" म्हणजे काय हे माहित आहे मला पण "मी ह्यांना विचारणारच नाही" म्हण्जे मी स्वतंत्र झाले/झालो असा अट्टाहास/नियम/रुढी नको,
आपण माणसं आहोत, कळप करुन जगणे आपला स्थाईभाव आहे.
आपल्या कळप करुन जगण्याच्या
व्याख्या कीती रुंदावल्या आहेत
यू ट्यूब, ऑरकूट, फेसबूक अशा
virtual गोष्टींवर स्थिरावल्या आहेत...
तर मानव हा प्राणी नर प्रधान
तर मानव हा प्राणी नर प्रधान आहे >> म्हणजे काय हो? मी खरच विचारतेय. प्लीज वेगळा अर्थ घेउ नका. मला खरच नाही समजला याचा अर्थ.
नितीन>> आनंदाची बाब म्हणजे
नितीन>>
आनंदाची बाब म्हणजे स्थानीक स्वराज्य संस्थामध्ये आता ५०% टक्के आरक्षण आल आहे. यात किमान ५० टक्के निवडुन आलेल्या स्त्रीया कोणत्याही प्रश्नाच उत्तर " ह्यांना विचारुन सांगते" म्हणणार्या नसव्यात म्हणजे ह्या कायद्याचा मुळ उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. >> "ह्यांना विचारुन सांगते" ह्यात काय अयोग्य आहे मी देखिल लोकांना सांगतो माझ्या बायकोला विचारुन सांगतो. दोघांच्या किंवा इतरांचा विचार घेउन निर्णय घेण्यात काय प्रॉब्लेम आहे? काही ठिकाणी "ह्यांना विचारुन सांगते" म्हणजे काय हे माहित आहे मला पण "मी ह्यांना विचारणारच नाही" म्हण्जे मी स्वतंत्र झाले/झालो असा अट्टाहास/नियम/रुढी नको, >>>
सत्यजीत, यात चुकिचं फक्त इतकंच आहे की तू ज्यावेळी बायकोला विचारून सांगतो असं म्हणतोस त्यावेळी तो निर्णय बहूतेक तुमच्या परिवाराशी संबंधित असेल. इथे नितिन म्हणताहेत ते कामाच्या संदर्भात आहे. तुम्ही तुम्हाला कंपनीत एखादा निर्णय घ्यायचा असेल, एखाद्या कामासंदर्भात तुम्हाला ऑफिसात काही विचारणा झाली तर बायकोला विचारून सांगेन असं तर नक्कीच म्हणत नसणार ना.
बाकी रुढी पाळायच्या की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असावा आणि बाकी लोकांनी त्याबद्दल कुणालाही मुर्खात काढणे योग्य नाही. हे रुढी पाळणार्या आणी न पाळणार्या दोघांसाठी लागू पडतं. आम्ही असं करतो किंवा आम्हाला हे पटतं हे सांगणं वेगळं आणि आम्ही करतो तेच योग्य आहे किंबहूना आम्ही करतो ते योग्य आहे की नाही हे विचारायचा प्रश्नच नाही हे आहे तसंच फॉलो करा हा अॅटिट्यूड कुणाचाच नसावा.
सॉरी नी, विषयाशी असंबंधित पोस्ट लिहिली. लेख पूर्वी वाचला त्यावेळी खूपच जास्त आवडला होता, आता तितका नाही पोचला.... याचं कारण मी स्वतः अशा वृत्तीच्या लोकांकडे आता दुर्लक्ष करायला शिकले आहे हे तर नसेल?
सत्यजीत, यात चुकिचं फक्त
सत्यजीत, यात चुकिचं फक्त इतकंच आहे की तू ज्यावेळी बायकोला विचारून सांगतो असं म्हणतोस त्यावेळी तो निर्णय बहूतेक तुमच्या परिवाराशी संबंधित असेल. इथे नितिन म्हणताहेत ते कामाच्या संदर्भात आहे. तुम्ही तुम्हाला कंपनीत एखादा निर्णय घ्यायचा असेल, एखाद्या कामासंदर्भात तुम्हाला ऑफिसात काही विचारणा झाली तर बायकोला विचारून सांगेन असं तर नक्कीच म्हणत नसणार ना. >> हो ना, नोकरीवरून काढतिल ना मला... आई होणं अपने बस की बात नाही...:)
१००% मान्य..मी उगाच लिहीलय हो ते... उगाच खुरापत काढायची असेल तर कशीही काढता येते :), म्हणुन काढुन बघितली .. पण तेही जमतय मला
सत्याचे पोस्ट आवडले!
सत्याचे पोस्ट आवडले! मुद्देसूद आणि काही गोष्टींचा व्यवस्थित विचार दिसला!
माझ्या बायकोनेही तिचे कुठलेच नाव बदलले नाही-म्हणजे ठरवून असे काही नाही- पण नाही बदलले. मला कधी काही वाटले नाही. तसे माझे आई-वडिल रुढीवादी आहेत पण त्यांनीपण कधी याबद्दल आरडाओरड केली नाही.
नीरजाचे म्हणणे पटले पण तरी सत्याचे पोस्ट आवडले.
>>>मंगळसुत्र घालवच, कुंकु
>>>मंगळसुत्र घालवच, कुंकु लावावच पाहिजे ह्या आजच्या काळत महत्वाच्या नाहीत हा प्रत्येकाच्या आवडीचा भाग आहे, <<<
त्याप्रमाणेच स्वतःचं नाव काय असावं हा प्रत्येकाच्या आवडीचा आणि खाजगी मुद्दा आहे.
>>>अशा अनेक रुढी आहेत ज्या मागे काही विषेश लॉजिक नाही, मुळात लग्न हा प्रकार हवाच कशाला? सर्वात भुरसटेलेल्या परंपरा आहे ही. प्रत्येल मानव हा समर्थ आहे मग नवरा बायको असण्याची गरजच काय? उगाच फालतू बांधिलकी.<<<<
असं ज्याला वाटतं ते लिव्ह इन चा पर्याय स्वीकारतातच की. तो दोन व्यक्तींचा निर्णय असतो.
>>>>प्रत्येक बलात्कारी, खुनी, चोर, हुंडाबळी घेणारे ह्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्या मते योग्यच असतात. there is no right or wrong, खरयं? प्रश्न आहे नियम का घातले जातात, रुढी का निर्माण होतात.<<<<
माणसाने स्वतःचं नाव काय असावं हे ठरवण्याचा निर्णय घेणं आणि बलात्कार, खून, चोरी करण्याचा निर्णय घेणं हे एकाच पारड्यात? संपूर्णपणे काहीही.
एका व्यक्तीने आपलं नाव न बदलल्याने कोणाला बलात्कार झाल्याइतका त्रास झाला? कोणाचा खून झाला? कोणाचा जीव गेला? कोणाकडे चोरी झाली?
>>>माझं मत येवढच आहे की लोक असे का वागतात हे जर समजुन घेतेलं तर ते बदल घडवून आणण सोप जाईल. उगाच त्या लोकांची हेटाळणी करणं योग्य नाही, प्रत्येक छोट्या मोठ्या बदलासाठी बदलासाठी क्रांतीची गरज नाही. जे तुमच्या संस्कृतीत सर्वमान्य आहे ते इतरांच्या संस्कृतीत असायलाच हवं असं नाही आहे.<<<
संपूर्ण डबल स्टॅंडर्डस.
>>>मला तुझ्या लेखात नुसती हेटाळाणी दिसली दुसर्यांना समजुन घेण्याचा सुर कुठेच नाही, फक्त लोकांनी तुला समजून घ्याव येवढाच अट्टाहास दिसला. तुमच्या बाबतित जे योग्य आहे ते सर्व जगाला लागू व्हाव हा विचार नाही पटला...<<<<
तुला लेख कळला नाहीये का? लोकांनी मला समजून घ्यावं अशी भीक कुठे मागितली मी?
माझेच निर्णय बरोबर असं कुठे म्हणाले आहे मी? माझ्या खाजगी निर्णयाबद्दल संबंध नसलेल्या लोकांनी दिलेल्या हिणकस शेर्यांची जर मी खिल्ली उडवली तर दोष माझ्या माथी कसा? माझ्या आयुष्याशी या लोकांचा काय संबंध की त्यांनी या मुद्द्यात आपली मतं द्यावीत? प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य वेगळं असतं आणि त्यावर बोलायचा बाहेरच्याचा संबंध नाही. तसं करणार्यांना भोचक, नको तिथे नाक खुपसणारे असंच म्हणलं जातं जगात.
>>>समोरच्याला आपले विचार पटले नाहीत की त्याची कुवत नाही. परफेक्ट!!!<<<
खरोखर लेख समजला नाहीये तुला. माझे विचार पटायलाच हवेत असं मी कुठे म्हणालेय?
विचार/ निर्णय पटो न पटो दुसर्याच्या खाजगी निर्णयांना हिणवायचा, सल्ले-उपदेश द्यायचा अधिकार कोणालाच नाही. आणि अश्या नाक खुपश्यांची हे एवढं समजायची कुवत नाहीच.
>>>उगाच रुढी मोडत सुटा आणि रुढी पाळत रहा.. हे मला पटत नाही,<<<
रूढी उगाच मोडतात हे तुझं गृहितकच पुरेसं हिणकस आहे. परत तुला काय पटतं वा पटत नाही याच्याशी माझ्या आयुष्याचा काय संबंध? तुला पटत नाही तर तो तुझा प्रश्न नाही का?
>>>हे असं का हवं आणि का नको, ह्याचा विचार मांडा. पण उत्तर नाहीच सापडलं आणि जड जातं नसेल तर जस आहे तस चालू द्यायला काय हरकत आहे,<<<
ह्या लेखाचा उद्देश विचार मांडणे आहे असं मी कधी जाहिर केलं होतं? नाव बदलणे न बदलणे या संदर्भातले माझे विचार मी अनेक ठिकाणी मांडलेले आहेत पूर्वी. मला गरज वाटत नाही इथे परत स्पष्टीकरण देण्याची. जड कोणाला जातंय आणि? नाक खुपश्यांना? तो त्यांचा प्रश्न आहे.
>>>काहीतरी विचार असावा ह्या मागे, उमगेल कधीतरी आणि अट्टाहास नाही केलात तर विरून जातिल कालापरत्वे.<<<
तुला कोणी सांगितलं माझ्या कृतीमागे विचार नाहीये? की रूढीविरोधी = अविचार असं धरून चाललायस तू? काय उमगेल? कसला अट्टाहास? अट्टाहास तुझाच चाललाय रूढीवादीच असावे याबद्दल.
>>>माझ्या वरच्या पोस्ट मध्ये काय हिणकस शेरे आहेत हे पण सांग. जाहीर माफि मागतो.<<<
उगाच रूढी तोडणे हे गृहितक. मी माझा माझा काही विचार करून हा एक खाजगी निर्णय घेतलेला आहे. तर तू त्याला उगाच कसं काय म्हणू शकतोस? आणि पहिल्या पोस्टमधला खाज हा शब्द. आता तू हा शब्द एडिट केला असशील तर माहित नाही.
परत एकदा
१. हा लेख 'नाव बदलू नये. बदलणारे ते मूर्ख' अश्या हेतूने लिहिलेला नाही.
२. नाव हा ज्याचा त्याचा खाजगी निर्णय असतो आणि दुसर्यांच्या खाजगी गोष्टीत आपण नाक खुपसू नये हे फारसं काही अवघड नाही समजायला.
३. नवर्यापलिकडे, नवर्याशिवाय बाईला वेगळं अस्तित्व, मत असतं हेही फारसं अवघड नाही समजायला.
४. तरी हे ज्यांना हे नाही समजत अश्यांचे आलेले काही गमतीशीर अनुभव मी इथे मांडले आहेत इतकंच.
सत्यजित, अतिशय संयमित
सत्यजित,
अतिशय संयमित पोस्ट.
>>मी ह्यांना विचारणारच नाही" म्हण्जे मी स्वतंत्र झाले/झालो असा अट्टाहास/नियम/रुढी नको, <<
एकदम पटेश
सत्यजित, अतिशय संयमित
सत्यजित,
अतिशय संयमित पोस्ट.
>>मी ह्यांना विचारणारच नाही" म्हण्जे मी स्वतंत्र झाले/झालो असा अट्टाहास/नियम/रुढी नको, <<
एकदम पटेश
तर मानव हा प्राणी नर प्रधान
तर मानव हा प्राणी नर प्रधान आहे >> म्हणजे काय हो? .. अरे बापरे केवढं मोठ्ठ उत्तर लिहाव लागेल. येवधे मोठे लेख मला लिहणं शक्य झालं असत तर मी कविता कशाला लिहील्या असत्या
माझ्या आकलन क्षमते नुसार समजावण्याचा प्रयत्न करेन, तो वर हे वाचा
http://www.gender.org.uk/about/10ethol/a4_mldom.htm
थोडक्यात
बहुतेक प्रजाती ह्या male dominated किंवा female dominated असतात, त्याच एक कारण म्हणजे.
प्रत्येक "जिवमात्र" हे एकाच उद्देशासाठी जन्माला येतात, ते म्हणजे प्रजनन आणि काही एक उद्देश नाही. ज्या प्रजातींमध्ये नर हे जास्त प्रजनन क्षम असतात आणि संततीची काळजी घेउ शकताते त्या प्रजाती नर प्रधान, अशा प्रजातींमध्ये नर हे शारीरीकदृष्ट्या जास्त बलवान असतात आणि म्हणुनच ते आपल्यापेक्षा कमी शक्तीशाली मादीवर वर्चस्व सिद्ध करतात. "बळी तो कान पिळी". आणि त्याप्रमाणेच मादी देखिल जास्तीजास्त जो प्रबळ आहे असा नर शोधत असते जेणे करून इतर नरांपासून तिची आणि तिच्या पिल्लांची रक्षा होवो.
किती अशा स्त्रीया आहेत ज्यांना त्याचा नवरा हा त्यांच्या पेक्षा कमी पगाराचा आवडतो?आणि कीती पुरूष बायकोचा पगर जास्त असला की जळफळतात.
म्हणुन पुरुष हा सैंदर्याला महत्व देतो आणि स्त्रिया कर्तुत्वाला. वर्चस्व सिद्ध करणं हा प्रत्येक प्राण्यांचा मुळ्स्वभाव.
नराच एकच काम असत जमेल तिथे बिज पेरत जाणं, आणि मादीचं त्या बिजाच संगोपन करण. पुरूष एकपत्नीव्रता का असतात आणि स्त्रीया पतीव्रता का असतात, त्याच हे एक कारण आहे.
मी मुळ वृत्ती बद्दल बोलतो आहे , उगाच उहापोह नको. म्हणुन आधी राजे माहाराज्यांच्या अनेक राण्या असायच्या. पण तुम्ही एका राणीचे एकाच वेळी अनेक राजे होते हे ऐकलं आहे का?
डिस्कवरी वर एक छान प्रोग्राम होता, आपण कसे फक्त एक प्राणी आहोत, हुशार वगैरे काही नाही हे छान सांगितलं होत त्यात.
>>पण तुम्ही एका राणीचे एकाच
>>पण तुम्ही एका राणीचे एकाच वेळी अनेक राजे होते हे ऐकलं आहे का?
सत्या, द्रौपदी
आणि खुरापत नाही रे, कुरापत. लिही आता १० वेळा.
नीऱजाचं नावाबद्दलच म्हणणं पटलं, पण तुझी पोस्टही आवडली.
ओके! धन्यवाद बकासूरराव!
ओके!
धन्यवाद बकासूरराव!
ह्या लेखाचा उद्देश विचार
ह्या लेखाचा उद्देश विचार मांडणे आहे असं मी कधी जाहिर केलं होतं? >> नी, माझ्या मते तू एक विचार मांडला आहेस, त्यात वयक्तीक असं काही नाही. फक्त तू स्वतः उदाहरण घेतल होतसं असा माझा समज. त्या विचारांवर मी काही मुद्दे मांडले आहेत, त्यातही वयक्तीक अस काही नाही. आपल्या क्रीयांना - येणार्या प्रतिक्रियांची मानसिकता समजण्याचा एक प्रयत्न.
मी तुला "नीरजा" म्हणुन कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, लेखातल्या विचारांना आहे. एका वेगळ्या प्रकारे विचार करुन लोकांच्या वागण्याच समर्थन करता येत का, जेणे करून, तू म्हंटल्या प्रमाणे
"त्रास स्वत:ला करून घेण्यापेक्षा" ते असं का वागतात हे समजुन घेण्याचा एक प्रयत्न. त्या "खाज" शद्बाचं मनावर घेउन नको.
मला माहीत आहे मुंबईत खुप गरम होतय, फ्रि़जचं थंड पाणी पी, फॅन लाव, एसी लाव, आणि थंड हो
मा़झा ऑफिस मध्ये वेळ जात नाही आहे म्हणुन ही खाज (उद्योग)...
तळटीपः ज्यांना खाज शद्ब आवडत नाही त्यांनी तो उद्योग असा वाचावा.
आसूर आले पट उधळायला...!!!
आसूर आले पट उधळायला...!!!
शैलजा... माझ्या शुद्ध लेखनाची फार आणि पार बोंब आहे आणि येवढ टाईप करा आणि त्यातल्या चुका शोधा..त्या सुधारा...मरो, तुम्हाला कळतय ना...पुरे.
१० वेळा कॉपी पेस्ट केल तर चालेल काय?
नी, पुन्हा वाचला हा
नी, पुन्हा वाचला हा लेख.
आम्ही दोघं दोन वेगळी माणसं आहोत ज्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि तरीही अनेक बाबतीत मतभेदही आहेत पण या मतभेदांमुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडत नाही. आम्ही एकमेकांमुळे वाढत असतो. >> प्रचंड आवडलं हे वाक्य आणि पटलंही!!!
अवांतरः आमची वोखार्ड्ट हॉस्पी. ची मार्केटिंग अॅडमिन पंजाबी आहे... गुढीपाडव्याला तीने शुभेच्छा पाठवलेल्या. मी तिला विचारलं कसं माहीत? तर म्हणाली नवरा मराठी आहे. साहाजिकच मी म्हणाले पण आडनाव...तर पंजाबी... तर पटकन म्हणाली, मी नाही बदललं. मी काही मिनीटं गप्प!!! कित्तीपण पटलं आणि आपणही नको पुसून टाकूयात आपली आधीची ओळख असा बंडखोर विचार केला तरी एवढ्या वर्षांपासून मनावर नकळतपणे/जाणीवपूर्वक बिंबवलेले संस्कार मिनिटभर तरी विचार करायला प्रवृत्त करतात.. नंतर भलेही वाटो, काय हरकत आहे, आपल्यालाही असं अनेकदा वाटून गेलंच की... हे विचार पाळण्याचं आणि त्याच्या बर्या वाईट परीणामांना, प्रतिक्रियांना तोंड देण्याचं सामर्थ्य एखादीच दाखवू शकते!
Pages