ओळख, नाव, वागणूक इत्यादी आणि मी.

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

हे ही जुनंच लिहिलेलं. अनेकांना लक्षातही असेल. फरक तसा काहीच नाहीये अजूनही पण प्रसंगांचा त्रास स्वत:ला करून घेण्यापेक्षा समोरच्याची समजण्याची कुवत नाही हे मी शिकलेय थोडंफार इतकंच.. Happy
--------------------------------------------------------------------------------------------
"लग्न झाल्यावरही मी नाव बदलणार नाही. आणि ते तुझ्या आइवडिलांना पटवायची जबाबदारी तुझी."
असं स्वच्छपणे त्याला सांगितलं आणि मी निवांत झाले. त्यालाही या गोष्टिचं फारसं काही वाटलं नाही. बायकोने आपलं नाव लावलंच पाहिजे इत्यादी विचार त्याच्या आसपास फिरत नसत सुदैवाने.

लग्नाआधी नी नंतर काही खास शेलक्या प्रतिक्रिया आल्या होत्या मात्र यावर.
"तू काय स्वतःला जास्त शहाणी समजतेस?" इति माझेच एक काका
"आमचं आडनाव लावत नाहीस तू?" (हं विचित्रच दिसतेय ही!) हे मनात म्हणणार्‍या त्याच्या एक काकू.
"काय म्हणताय मिसेस अमुक अमुक!" हे मुद्दामून म्हणणारा एक मित्र
इतपत होणारंच हे गृहितच होतं त्यामुळे त्या प्रतिक्रियांवर आम्ही दोघांनीही हसून घेतलं.

दोघंही एका क्षेत्रात काम करत होतो पण वेगवेगळ्या विभागात. आपापल्या बळावर एका स्थानापर्यंत आलो होतो. तो captain of the ship आणि मी एक department head. आपापल्या वर्तुळात आमच्या कामाला महत्व होतं. मग झाली गंमत. आमचं एक प्रोजेक्ट खूप म्हणजे खूपच मोठं झालं आणि त्याबरोबर त्याचं नावही. आता त्याच्याकडे खूप लोक आदराने पहायला लागले. त्याच्याशी आपली ओळख आहे हे कॉलरी ताठ करत दाखवू लागले.

त्याच प्रोजेक्टमधले एकजण एकदिवस मला येऊन म्हणू लागले की
"आता तरी निदान सरांसाठी तरी नाव बदला!"
म्हणजे मला आजपर्यंत याच्या नावाची लाज वाटत होती नी आता लाज वाटायची गरज नाही म्हणून मी आता नाव बदललं पाहिजे?
माझं नाव ते माझं मी ठरवीन ना तुमचा काय संबंध?
मला आणि माझ्या नवर्‍याला, घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही कोण टिकोजीराव मला नाव बदलायला सांगणारे?
असे खूप सारे व्हि.ओ. माझ्या डोक्यात. आणि मी वळून दुसर्‍या व्यक्तीशी बोलू लागले.

हळूहळू लक्षात येऊ लागलं की माझं नाव बदललेलं नसणं हेच नाही तर मला माझं माझं काही अस्तित्व असणं हेच लोकांना खुपतंय.

माझ्या स्वतःच्या नाटकासंबंधात माझी मुलाखत घेतली गेली आणि मुलाखतीत छापलं काय गेलं की माझा नवरा मोठा दिग्दर्शक असला तरी मला किती सपोर्ट करतो. माझे सासूसासरे कसे मला साथ देतात इत्यादी. ते खरं आहे हो पण त्याच्या मुलाखतीत नाही कधी विचारत बायकोचं योगदान वगैरे.

एकदा एका छोट्या गावात गेलो होतो. कुठल्यातरी विषयावर गप्पा चालू होत्या. एका मुद्द्यावर माझं आणि नवर्‍याचं म्हणणं वेगळं होतं. आम्ही एकमेकांचा मुद्दा समजून घेत होतो पण बरोबरच्या एका काकांना मात्र त्याचा त्रास व्हायला लागला. आम्ही दोघांनी नंतर बोलू म्हणून विषय थांबवला तरी ते काका नंतर मला खिजगणतीतही धरेनात. माझ्याशी बोलेहीनात. 'बिचारा एवढा मोठा दिग्दर्शक आणि त्याची बायको ही अशी!' असं त्यांच्या तोंडावर लिहिलेलं मात्र दिसू लागलं. चिडचिड झालीच आणि परिणामी मी जेवायचंच टाळलं.

हे असं अनेकदा होतं. मी प्रवासात जीन्स वापरते यापासून माझा माझा वेगळा मोबाइल आहे ज्याच्यावर मी माझ्या माझ्या कामाच्या लोकांशी बोलत असते ते मी माझं मत मांडते, कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल नवर्‍याकडे न पहाता जे मला पटतं ते उत्तर देते यापर्यंत कुठलंही कारण माझ्या नवर्‍याला बिचारा ठरवण्यासाठी पुरेसं असतं. असं होऊ नये म्हणून मग मला आदर्श पतिव्रता पत्नी सारखं वागावं लागतं. सिंदूर, बांगड्या आणि साडीचीच कमी असते. स्वतःचं मत/ स्वतःचं आयुष्य नसलेली, नवर्‍याच्या पावलात स्वर्ग बिर्ग शोधणारी कंटाळवाणी बायको मिळाली असती तर माझा नवरा या लोकांना बिचारा वाटला नसता हे माझ्यासाठी आणि माझ्या नवर्‍यासाठीही अचाट आणि अतर्क्य असतं.

महाजालावर देखील असे महाभाग भेटतात अधूनमधून की ज्यांना माझं वेगळं अस्तित्व सहन होत नाही. मग सगळा सारासार विचार बाजूला ठेवून 'यशस्वी माणसाशी लग्न करून स्वतःचं नाव मोठं करू पहाणारी' अशी विशेषणं लावली जातात. यावर हसावं की रडावं तेच कळत नाही. अश्यांची नी त्यांच्या मध्ययुगीन मानसिकतेची कीव मात्र येतेच येते.

इतर ठिकाणीच कशाला आमच्या क्षेत्रातल्या अनेकांना, अगदी जे मला आधीपासून ओळखत होते त्यांना सुद्धा माझी ओळख करून देताना वेशसंकल्पक(costume designer) पेक्षा अमुकतमुक ची बायको हे जास्त सोयीचं वाटतं. एक वेशसंकल्पक म्हणून मी जोवर माहित असते अनेकांना तोवरचं काहींचं वागणं आणि नवर्‍याची ओळख कळल्यावरचं वागणं यात जमिनअस्मानाचा फरक असतो.

अश्या वेळांना नाव आडनाव न बदलण्याचा निर्णय किती योग्य होता ते अजून अजून पटत जातं. निदान नवर्‍याचा संदर्भ कळेपर्यंत तरी लोक माझ्याशी माझ्या माझ्यापुरते वागतात.

आणि मग कधीतरी एखादं असं प्रोजेक्ट होतं जिथे सगळ्यांना माझ्या नवर्‍याचा संदर्भ माहित असतो. त्याच्याबद्दल आदर पण असतो. त्याचवेळेला माझ्या कामाबद्दलही आदर असतो. माझ्याशी वागणं हे माझ्या माझ्यापुरतं असतं. मी तिथे नीरजा असते. एक व्यावसायिक असते, नंतर एक मैत्रिण होते. मला नीरजाप्रमाणेच वागता येतं. कुठलाच आविर्भाव मिरवण्याची गरज नसते. अश्या ठिकाणी काम केल्याची मजा वेगळीच असते. पुढचे अनेक कंटाळवाणे प्रसंग पचवण्यासाठी इथे ताकद मिळते.

आम्ही दोघं दोन वेगळी माणसं आहोत ज्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि तरीही अनेक बाबतीत मतभेदही आहेत पण या मतभेदांमुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडत नाही. आम्ही एकमेकांमुळे वाढत असतो. दुर्दैवाने हे समजण्याची कुवत किंवा मानसिकता ५% च लोकांकडे असते. बाकी सगळे मध्ययुगातच अडकलेले

इरावतीबाईंनी (इरावती कर्वे) पन्नासेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखातल्याप्रमाणे अजूनही नात्यातल्या पुरूषमंडळींच्या विशेषतः नवर्‍याच्या संदर्भानेच केवळ बाईकडे बघण्याची, तिला ओळखण्याची सवय आणि गरज सुटत नाही. इरावतीबाईंच्यासारखी मोठी व्यक्तीही यातून गेलीये मग माझी काय कथा असं मनाशी म्हणत मी अनेक ठिकाणी खोटी खोटी वागत जाते.

- नी

प्रकार: 
शब्दखुणा: 

निरजातै मस्त लिवलंत.
ते ५%चं गणित काय बदलणार नाय पण.
पण एक गोष्ट सतत म्हणायची, "व्हू केअर?" Proud

रच्याकने, ते शेवटचं वाक्य कन्फुजिंग वाटतं.

नीरजा, हे मी कधी तूला बोललो नाही, पण कोल्हापूरात श्वास लागला होत्या त्यावेळी, तूम्ही त्यांना ओळखता ना, मग ते दोघे लग्न न करता एकत्र राहतात का ? असे मला एकाने विचारले होते !!!

परत एकदा- सुरेख लेखन. थेट आणि प्रामाणिक ! अत्यंत आवडले.

आम्ही दोघं दोन वेगळी माणसं आहोत ज्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि तरीही अनेक बाबतीत मतभेदही आहेत पण या मतभेदांमुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडत नाही. आम्ही एकमेकांमुळे वाढत असतो. दुर्दैवाने हे समजण्याची कुवत किंवा मानसिकता ५% च लोकांकडे असते.

हे एवढंच लक्षात असणं/ठेवणं पुरेसं ! उरलेल्या पंच्याण्णव टक्क्यांची दखल घेत स्वतःला त्रास करून घेण्याचे कारणच नाही. अशां प्रवृत्तींना प्रदीप कुलकर्णी यांनी लिहिलेला हा शेर चपखल लागू पडतो-

"कधी कधी राग राग येतो तुझा, परंतू-
कधी कधी कीवही तुझी फार फार येते
!"

--------------------------------------------

अवांतर- तुमचे बरेच लिखाण हे 'जुनेच' असल्याच्या सूचनेसह येते. हे जुने लिखाण कुठे वाचायला मिळेल? म्हणजे ब्लॉग वगैरे?

बैजवार सांगणार काय?>>
आवं ते, खोटी खोटी वागत जाते लिवलंत. मंग तसं वागल्यावर असला वरचा अनूभव येईल का?
उलट चारचौघात आदर्श पत्नी म्हणूनच वळखल्या जाल नव्हं?
असं आपलं मला वाटलं म्हणून. तुम्हाला येगळंही सांगायचं असल पण म्हणून कन्फुजिंग म्हटलं.

अरे देवा.. कशी आणी केंव्हा बदलणारे ही मानसिकता.. रिअली सिक..
नी.. मुळीच वागू नकोस कुठेही खोटंखोटं..
वेगळ्या रस्त्यावर पहिले पाऊल टाकणार्‍याला नेहमीच या त्रासातून जावे लागते.. उद्या काय जाणो तूच आदर्श ठरशील कित्येकांचा..

नी.... राग मानु नको पण थोडे नाही पटले.. इथे मला वाटते की समाजाला नवरा बायको या नात्यापेक्षा प्रसिद्धी हा मुद्दा महत्वाचा वाटतो.. श्वास मुळे संदीप ना यशाबरोबर प्रसिद्धी सुद्धा खुप मिळाली.. ऑस्कर वारी मुळे तर ती खुप पटीने वाढली...त्यामानाने तुझ्या कामाची प्रसिद्धी ज्यास्ती न्हवती.. त्यामुळे ज्या लोकाना तु किंवा तुझे काम याची फारशी माहीती नाही त्या लोकाना तु म्हणजे एका प्रसिद्ध दिग्दर्शकाची पत्नी हीच ओळख लवकर पटते... पण जेंव्हा ते तुझ्या सहवासात येतील त्याना तुझे व्यक्तीमत्व तुझ्यातील कलागुण कळतील तेंव्हा तु आपोआप त्यांच्यासाठी "नीरजा "होउन जाशील... Happy
उदाहरणच द्यायचे तर इंदिरा गांधी किंवा प्रियांका गांधी यांच्या नवर्‍याचे सुद्धा देता येईल त्याना सुद्धा त्यांच्या कामापेक्षा यांचा नवरा ही ओळखच ज्यास्ती मिळाली.. Happy
बाकी नाव न बदलणाचा तुझा निर्णय योग्य आणी स्वागतार्ह आहेच Happy

नीधप , छान लिहिलय !
पण आपली मानसिकता बदलायला अजून वेळ लागणार आहे . माझ्या लग्नाला २.५ वर्षे झाली , माझी बायको अजूनही माहेरचेच आडनाव लावतेय . आणी तिने कायमच ते लावाव अस माझही मत आहे . पण कितीतरी ठिकाणी ( तिच्या कॉलेजमधे , सरकारी ऑफिसेस मधे , नातेवाईकात तर default च ) तिला "तुमच /तुझ लग्न झालय ना , मग तुम्ही शिंदे आडनाव कस लावताय ?" हे गरज नसताना काहीतरी मोठ पातक केल असल्यासारख विचारल जात !

नीरजा लेख छानच !
आपल्याकदे आई-वडील मुलाकडे रहातात. पण हेच मुलीकडे आईवडील रहात असतील कितीतरी भुवया उंचावल्या जातात Sad

मग ते दोघे लग्न न करता एकत्र राहतात का ? <<<
असं अनेकांनी अनेकांना विचारलंय. पण गंमत म्हणजे प्रत्यक्ष मला किंवा त्याला कोणी विचारायला येत नाही. तेवढी हिंमत नसावी बहुतेक. Wink
फकीर, खोटी खोटी वागत जाते पण ते जमतंच असं नाही मग येतात अनुभव.
ज्ञानेश, विपु मधे लिंक दिलीये.
राम, अरे प्रसिद्ध माणसाची अप्रसिद्ध बायको असण्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाहीये/ नव्हता. पण अप्रसिद्ध म्हणजे नवर्‍याच्या पावलात स्वर्ग शोधणे आणि नवर्‍याला परमेश्वर मानणे होत नाही ना रे. अपेक्षा तश्या असतात. बाकी काही नाही.

लोकं हजार तोंडांनी बोलतात आणि या हजार लोकांची हजार मतं असतात.
नक्की कोणाला फ़रक पडल्याने आपल्याला फ़रक पडेल हे आपण आपल्याशीच ठरवून घेतलं एकदा की त्रास होत नाही बहुधा. एकदा हा सबसेट डीफ़ाईन झाला आपल्यापुरता की बाकीच्यांना फ़ाट्यावर मारता येत आणि तुलनेत फ़ार थोडा त्रास होतो.

नक्की कोणाला फ़रक पडल्याने आपल्याला फ़रक पडेल हे आपण आपल्याशीच ठरवून घेतलं एकदा की त्रास होत नाही बहुधा. एकदा हा सबसेट डीफ़ाईन झाला आपल्यापुरता की बाकीच्यांना फ़ाट्यावर मारता येत आणि तुलनेत फ़ार थोडा त्रास होतो >>> सुरेख . अतिशय आवडल .ढापयचा मोह होतोय Happy
मणिकर्णिका , जर तुम्हाला हे On The Spot सुचल असेल तर तुम्हाला सलाम !!!

नीरजा, तुझ्यासारख्याच स्वतंत्र करियर्स, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि अस्तित्त्व असलेल्या अनेक मैत्रिणी व त्यांच्या नवर्‍यांना (जे माझे मित्रही आहेत) जवळून पाहिलंय मी... कदाचित ज्या वर्तुळात ते वावरतात तिथे त्यांचं वेगळं अस्तित्व असणं हे गृहित आहे, किंबहुना त्यांची तशीच ओळख आहे. हां, कधीतरी कोणीतरी टाकलाच कुजका शेरा किंवा हाणला टोमणा, तरी ते सरळ दुर्लक्ष करतात. कारण अशा गोष्टींना थारा देऊन काहीही साध्य होत नाही हे त्यांना माहित आहे. आणि कोणाला पटवायलाही जात नाहीत ते. (तशी गरजच पडत नाही.) सगळे लोक आपल्याला आपण जसे आहोत तसे स्वीकारतील हेच मुळात अवघड आहे. ज्यांना नाही आवडत त्यांनी सोडून द्यावं, आणि जर त्यांना नाही सोडता आलं तर आपणच सोडून द्यावं!! Wink शेवटी ''गेलात उडत'' ला कधी कधी पर्याय नसतो.

हे विषयांतर की नाही माहित नाही.
दोन प्रसंग
---माझी पहिली मुलगी;तेंव्हा वय १९--बाबा माझे फ्रांस ला जायला सिलेक्शन झालय्,अन मी जायचा निर्णय घेतेय (जाऊ का???----नाही),तुमचं काय मत आहे?
मला आनंदच आहे,
---जनमत ----तिने तुम्हाला विचारायला हवे होते हो म्हणण्या आधी!!!!!
---दुसरी मुलगी----मला पिझ्झा हट मध्ये जॉब मिळालाय ,काल जॉईन केलय्-कॉलेजनंतर ४ तास---
मला कौतुक अन आनंदच आहे--
जनमत्-नातेवाईक मत---विचारून जायला हवं होतं---इतर मुली ठीक आहेत ,पण तुझी मुलगी???काय गरज आहे अन कसली माणसं येतात तिथे!!!!

तुमची व्यथा तत्सम आहे असे मला वाटते अन काय घाणेरडे प्रतिसाद आहेत काही--
आवडलं!!!

नी, खरं ग बाई. मानसिकता बदलायला अजून वेळ जावा लागेल हेच खरे. मात्र त्याचबरोबर जीन्स आणि मोबाईल हे ज्यांचे मुद्दे आहेत त्यांना काडीइतकीही किंमत देण्याची गरज नाही. रामचं म्हणणंही पटलं.

आमच्या लग्नाच्या वेळची गोष्ट. रजिस्टर लग्न करायचे ठरवले आणि आम्ही दोघे फॉर्म भरायला गेलो. फॉर्मवर दोघांची नावे घालताना माझे नाव आधी घातले आणि त्याचे नंतर. तर ती बाई तो फॉर्म परत घ्यायलाच तयार नव्हती. तिच्या मते नवर्‍याचे नाव आधी घातले पाहिजे. कारण ऐकून तर हसावे की रडावे तेच कळेना. म्हणे 'तो माझ्याशी लग्न करणार आहे'. आँ? तिचा मुद्दा आम्हाला कळेना आणि आमचा तिला. पण भरपूर बोंबाबोंब करून तिला तोच फॉर्म घ्यायला लावला.

रेव्यु, खरंय..

मामी, गंमत अशी होते ना की ग्रामीण भागातून कामासाठी फिरताना याच काडीइतकी किंमत द्यायची गरज नसलेल्या लोकांशी कधी कधी संपर्क येतो आणि आपल्या कामासाठी का होईना त्यांना किंमत द्यावी लागते खोटं खोटं हसून. आधीच कामाचा ताण असतो वर त्यात हे.. फुकट ताप होतो डोक्याला इतकंच. मग हे असं काहीतरी लिहून वाफेला वाट करून द्यायची.. Happy

लेख वाचताना वाटत राहिलं की यात लिहिण्यासारखं खरंच आहे का?
प्रतिसाद वाचताना जाणवलं, लिहायची गरज का वाटली असेल ते.

आजही एखाद्या स्त्रीची ओळख करुन घेताना तिची पार्श्वभूमी,म्हणजे ती कुणाची पत्नी आहे?कुणाची मुलगी आहे,कुणाची बहीण आहे? वगैरे धागेदोरे तपासून आपण तिच्याशी कसं वागायचं हे ठरवलं जातं.

तुमच्या मनातील खळबळ अप्रतिम रित्या शब्दबद्ध झाली आहे. असो.... हे ही दिवस बदलतील.

छान आहे.................मुख्य म्हणजे प्रवाहात राहताना त्या विरुध्द पोहत आहत.............वंदनीय........

मस्तच ! >>>हळूहळू लक्षात येऊ लागलं की माझं नाव बदललेलं नसणं हेच नाही तर मला माझं माझं काही अस्तित्व असणं हेच लोकांना खुपतंय.<<< हेच अगदी, अगदी खरं Happy वा !

नि लेख पटला

माज्या बाबतीत जवलच उदाहरण म्हणजे... माझ्या एक चुलत चुलत भावाने एक दिवस कही कारणाने माझ visting कार्ड पहिल, अणि लग्न आधिचच आडनाव लावतेस म्हणून वैतागुन दाखवल,
माझा नवराही तिथेच होता, तो म्हणाला त्यात काय एवढ वैताग्न्यासरख काय आहे , अणि मुलात तू कशाला वैतागतोस,

ह्यावर त्याने मला काय म्हनाव? ...माज्या बायकोला अज्जिबात दाखवू नकोस हे कार्ड :O Angry

नाव बदलणे हा issue क होतो हेच कळत नाहीये हे मला....
मी माझा नाव आणी आडणाव कसलीही खळखळ न करता बदलला.. Happy
माझा मते नाव बदलणे ही आपली परंपरा आहे.. ज्याला पटते त्यानी फोलॉ करा नाहीतर राहू द्या..

नी, लेख मागे वाचला होता तेव्हा आवडला होताच, पण आताही खूप आवडला.
>>>>>>>>>ज्याला पटते त्यानी फोलॉ करा नाहीतर राहू द्या..>>>>>>>>>

अवनी, तुमच्या पहिल्या वाक्यातल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच नाही का दिलं? अन नी नाव बदलणं वाईट कुठेच म्हणाली नाहीय. तिनं बदललं नाही त्याबद्दलच्या लोकांच्या मानसिकतेवर लिहिलंय लेखात.

Pages