भाषांतर आणि शुद्धलेखन तपासणी साठी मंजिरी (सेन्सेइ) चे विशेष आभार.
ही कथा वाचल्यावर मला नेहेमी रवैतक राजाची कथा आठवते. त्यामुळे ही जपानी कथा भाषांतरीत करावे असे वाटले.शिवाय मुलांसाठी असल्याने माझ्यासाठी भाषांतरीत करायला सोपी होती.
------
उराशिमा तारो
浦島太郎
Kusuyama, Masao 1884-11-04 /1950-11-26
http://www.aozora.gr.jp/cards/000329/files/3390_33153.html
लेखक: कुसुयामा मासाओ
भाषांतर : स्वप्नाली मठकर (सावली)
१.
फार फार वर्षापूर्वी समुद्राच्या काठी उराशिमा तारो नावाचा एक कोळी रहात होता. तो रोज सकाळी समुद्रावर जाऊन मासे पकडून आणून आपले आणि आई वडलांचे पोट भरायचा.
एकदा असाच समुद्रावरून मासे पकडून परत येताना त्याला पाच सहा मुलं घोळका करून उभी असलेली दिसली. "काय झालं असेल बरं?" असा विचार करून उराशिमा बघायला गेल्यावर त्याला मुलांनी एका कासवाला पकडलेलं दिसलं. मुलं त्या कासवाला काठीने ढोसत , दगडाने मारत होती. ते पाहून उराशिमाला फार वाईट वाटलं.
"अरे त्या कासवाला असा त्रास देऊ नका. तुम्ही सगळी चांगली मुलं ना!"
"तुम्ही उगाच काळजी करू नका. काही झालं नाहीय्ये. आम्ही खेळतोय." असं उद्धट उत्तर देऊन मुलं कासवाला छळतच राहिली.
उराशिमाला त्या कासवाची फारच दया आली म्हणून तो मुलांना म्हणाला "बरं, मग मी ते कासव विकत घेतो. मग तर झालं?"
हे ऐकताच एका सुरात "हो चालेल" असं म्हणून मुलं पैसे घेऊन आरडाओरडा करत निघून गेली.
इकडे "हं हं आता घाबरू नकोस बरं का." म्हणत पाठी खालून नुकतंच डोकं बाहेर काढलेल्या कासवाला थोपटत उराशिमा समुद्राजवळ घेऊन आला आणि कासवाला हळूच पाण्यात सोडलं. आनंदाने पाय हलवत पोहत कासव पाण्यात निघून गेलं.
असेच दोन तीन दिवस गेले. नेहेमीप्रमाणे उराशिमा सकाळी बोट घेऊन पुन्हा समुद्रात गेला. आज तो बोट वल्हवत वल्हवत समुद्राच्या बराच आत पर्यंत गेला. अचानक मासे पकडत असताना त्याला "उराशिमा , उराशिमा" अशी हाक ऐकू आली.
आपले वडील आहेत का काय असे वाटून उराशिमाने वळून इकडे तिकडे बघितले. पण त्याला कोणीच दिसले नाही. त्याच वेळी एक कासव मात्र बोटीच्या अगदी जवळ आलेलं त्याला दिसलं. आणि आश्चर्य म्हणजे ते कासव माणसाच्या आवाजात उराशिमाशी बोलायला लागलं.
"मला तू परवा त्या मुलांच्या तावडीतून सोडवलंस म्हणून तुझे खुप खुप आभार. आज त्याची परतफेड करायला मी आलोय."
उराशिमाला अजूनच आश्चर्य वाटलं. "असू दे रे. आणि खरच परतफेडीची काहीच गरज नाहीये."
"नाही नाही खरच तुझे खुप खुप उपकार आहेत माझ्यावर. बरं तू समुद्रामधला राजमहाल पाहीला आहेस का?" कासवाने मनापासून विचारलं.
"नाही. कधीच पाहिला नाहीये मी. पण हो लहानपणापासून त्याच्या गोष्टी मात्र खुप ऐकल्यात."
"मग मी तुला त्या राजमहालात घेऊन जाऊ शकतो. आवडेल का तुला तिथे यायला?"
"वा! काय मस्त कल्पना आहे. पण मी तिथे कसा काय येणार? तो तर समुद्रात खुप आतमध्ये आहे ना? आणि मला काही तिथपर्यंत पोहोता येणार नाही बाबा." उराशिमा म्हणाला.
"तू अज्जिबात काळजी करू नकोस. माझ्या पाठीवर बसवून मी तुला घेऊन जाईन." आपली पाठ दाखवत कासवाने सांगितलं.
धाकधूक करतच उराशिमा कासवाच्या पाठीवर बसला आणि कासव पांढऱ्याशुभ्र लाटांवर स्वार होऊन निघाले सुद्धा. थोड्याच वेळात लाटांचा सळसळ आवाज कमी होऊन समुद्राच्या तळाकडचं स्वप्नातल्या सारखं निळशार पाणी दिसायला लागलं. तेवढ्यातच सगळीकडे प्रकाश दिसायला लागला आणि पांढऱ्याशुभ्र वाळूचा एक रस्ताच समोर दिसायला लागला. रस्त्याच्या एका टोकाला एक मोठा सुंदरसा दरवाजा होता. त्याच्याही पलीकडे सोन्याचांदी सारखे चमचम करणारे उंच मनोरे होते.
"पोचलो बरं का आपण महालाजवळ. आता जरा वेळ थांब इथेच." कासवाने उराशिमाला पाठीवरून उतरवून दरवाजाने आत जात सांगितले.
२.
आत वर्दी देऊन कासव पुन्हा बाहेर आले आणि उराशिमाला घेऊन जायला लागले. वेगवेगळे सुंदरसे मासे बघत बघत आत जातानाच एक सुंदर तरुण राजकुमारी आपल्या दासींबरोबर येताना त्याला दिसली. तिच्याबरोबर महालात जाताना रत्नखचित छत , आणि पोवळे आणि रत्नांचे बनलेले खांब बघून उराशिमा अगदी दिपून गेला. तो महालाचा परिसर सुंदर सुवासाने आणि संगीताने भारून गेला होता. चालता चालता ते एका रत्नखचित चकाकणाऱ्या भिंती असणाऱ्या मोठ्या कक्षात आले.
"उराशिमा , त्यादिवशी कासवाला वाचवल्याबद्दल तुझे खुपखूप आभार. आमच्या या महालात तुला हवं तितका दिवस राहून आमचा पाहूणचार स्वीकार कर." असं म्हणत राजकन्येने त्याला आदराने प्रणाम केला. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे माश्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ आणि वारुणी त्याला सादर करण्यात आली. दासी नृत्य आणि गायन करून त्याचं मन रिझवू लागल्या. उराशिमाला अजूनही हे सगळं स्वप्नवतच वाटत होते.
खाऊन पिऊन झाल्यावर राजकन्या उराशिमाला आपला महाल दाखवायला घेऊन गेली. कुठल्याही कक्षात बघाव तर सगळी कडे, रंगीत सुंदर रत्ने आणि पोवळी जडवलेली. सगळा महाल नुसता चकाकत होता. "आता आपण चार ऋतू बघायला जाऊयात" असं म्हणत राजकन्येने उराशिमाला एका मोठ्या दरवाजाकडे नेले.
"हा पूर्व दरवाजा. वसंत ऋतूचा!" असं म्हणत दरवाजा उघडला तर काय आश्चर्य सगळा देखावा एकदम बदलला. समोर गुलाबी बहराने फुलून गेलेली चेरीची झाडं चित्राप्रमाणे उभी होती. कोवळ्या पालवी फुटलेल्या फांद्या वाऱ्यावर हेलकावे घेत होत्या आणि चिमुकले पक्षी त्यावर गाणे गात झोके घेत होते. फुलपाखरे फुलाफुलांवरून उडत मध पीत होती.
तितक्यात "हा दक्षिणेचा दरवाजा, ग्रीष्माचा!" असं म्हणत राजकन्येने दुसरा दरवाजा उघडला आणि डोळ्यासमोर ऋतू बदलून सगळीकडे हिरवेगार झाले. पांढरी फुलं, तळ्यातली कमळे आणि त्यावर उडणारे चतुर असे उन्हाळ्याचे दृश्य समोर उभे राहिले.
हे बघून संपते न् संपतेच "आता हेमंताचा दरवाजा!" असं म्हणत राजकन्येने पश्चिमेचा दरवाजा उघडला. पुन्हा एकदा ऋतू बदलून सगळी झाडे सोनेरी पिवळ्या रंगाने न्हाली.
हा सोन पिवळा नजारा बघता बघताच राजकन्येने "हा शेवटचा, शिशिराचा दरवाजा!" म्हणत उत्तरेचा दरवाजा उघडला. आणि थंडीची एक लहरच आली. सगळे दृष्य आता पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकले गेले होते. डोंगर दऱ्या सगळेच बर्फाच्छादित दिसतं होते.
ही अभूतपूर्व कमाल उराशिमा शब्दहीन होऊन केवळ बघतच राहीला.
३.
रोज अशा अनेक नवनवीन गोष्टी अनुभवत तीन वर्षे कशी गेली ते उराशिमाला कळलं सुद्धा नाही. तिसऱ्यावर्षी वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी अचानक एखादं स्वप्न बघितल्यासारखे उराशिमाला आपले पूर्वायुष्य आठवायला लागले. ते समुद्राकाठचे घर, बोट, मासेमारी, आपले आईबाबा या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर दिसायला लागल्या. आपले आईबाबा काय करत असतील, इतके दिवस कसे राहिले असतील या काळजीने तो व्याकुळ झाला. लवकरात लवकर घरी परतावं असं त्याला वाटायला लागलं.
त्याच्यामधला हा बदल राजकन्येने अचूक टिपत विचारलं. "तुला कसली काळजी लागलीये उराशिमा? तुझी तब्येत तर ठीक आहे ना?"
"नाही तसं काही विशेष नाही. पण आता मला घरी परत जावसं वाटायला लागलं आहे." उराशिमाने आपल्या मनातले बोलून दाखवले.
हे ऐकून राजकन्येला खूप वाईट वाटले तरीहि उराशिमाला बरे वाटावे म्हणून तिने त्याला एकदा घरी जाऊन यायला सांगितले.
दु:खी होत राजकन्येने जातानाची भेट म्हणून एक रत्ने जडवलेला डबा त्याच्या हातात ठेवला.
"या डब्यात माणसांसाठी अतिशय महत्वाचा खजाना ठेवला आहे. तू तुझ्या घरी असताना हा डबा तुझ्याजवळ ठेव. पण एक लक्षात असुदेत, तूला परत यायचं असेल तर हा डबा कधीही, कुठल्याही परिस्थितीमध्ये उघडू नकोस."
"हो, हो, मी नक्की लक्षात ठेवेन." असं म्हणत उराशिमाने राजकन्येचा निरोप घेतला.
पूर्वी आलेलं कासव पुन्हा त्याची वाट बघत होतंच. कासवाच्या पाठीवर चढून एका अनामिक ओढीने उराशिमा परतीच्या वाटेवर निघाला.
४
उराशिमाला कासवाने समुद्राच्या काठावर पोहोचवलं आणि ते पुन्हा पाण्यात निघून गेलं. उराशिमा एकटाच किनाऱ्यावर उभे राहून इकडे तिकडे बघत होता. ओळखीचे असे काही दिसतं नव्हते. दूरवरून कुठूनतरी कोळ्यांच्या गाण्याचे सूर कानावर पडत होते. तरीही स्वप्नात बघितलेल्यापेक्षा हे दृष्य फार काही वेगळे नव्हते. पण आजूबाजूला जाणारे कुणीच ओळखीचे वाटत नव्हते. उराशिमा तसाच कोणाशीही न बोलता घराच्या दिशेने चालत राहिला.
तीन वर्षात सगळं किती बदललं आहे हे वाटून उराशिमाला विचित्र आणि उदास वाटायला लागलं. तो घराच्या जागी पोहोचून बघतो तर काय त्याला तिथे घर दिसलेच नाही. घर बांधल्याच्या खुणाही कुठे दिसेनात. आपले आईबाबा कुठे गेले असतील या काळजीने तो अगदी ग्रासून गेला.
तितक्यात त्याला एक खूप म्हातारी आज्जी कमरेतून वाकून चालत येताना दिसली.
"आज्जी इथे उराशिमा तारोचे घर होते ते कुठे गेले?" मोठ्या आशेने त्याने त्या म्हातारीला विचारले.
"उराशिमा तारो? छे! असा कोणी माणूस मलातरी माहीत नाही बा."
"नाही नाही. नक्कीच इथे रहात होता तो. बघाना आठवून." उराशिमाने पुन्हा विनंती केली.
"हां हां. आठवतं खरं मला थोडसं या नावाबद्दल. पण ती किनई तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या लहानपणी मी हि गोष्ट ऐकलेली. एक उराशिमा तारो नावाचा कोळी समुद्रात बोट घेऊन गेला तो परत आलाच नाही कधी. लोकं म्हणायचे कि तो समुद्रमहालात गेलाय. पण खरं काय ते कोणालाच माहीत नाही." एवढ सांगून कमरेत वाकून चालत म्हातारी निघून गेली.
'तीनशे वर्षापूर्वी!! बापरे! मी जाऊन तर फक्त तीन वर्षे झालीत. असं तर नाही कि समुद्रातली ३ वर्ष म्हणजे इथली ३०० वर्ष!' उराशिमा विचार करत राहीला. अचानक खूप उदास वाटायला लागून तो समुद्रकिनारी परत आला. आणि समुद्राकडे बघत बसला. आता परत समुद्रामहालात राजकन्येकडे जावं असं त्याला वाटायला लागलं. पण आता पुन्हा जायचं तरी कसं या विचाराने तो परत दु:खी झाला.
तितक्यात त्याला राजकन्येने दिलेला तो रत्नजडीत डबा आठवला. तो डबा उघडला तर कदाचित आपल्याला परत जाता येईल या विचाराने तो राजकन्येने सांगितलेली गोष्ट विसरून गेला. घाई घाईत त्याने तो डबा बाहेर काढला आणि उघडून बघितला. उघडताच त्या डब्यातून जांभळ्या रंगाचा धूर बाहेर आला. आणि बघतो तर काय तो डबा रिकामाच होता. इतक्यात त्याला जाणीव झाली कि काहीतरी बदलतंय. त्याचे हात पाय सगळे सुरकुत्यांनी भरून गेले. पाण्यात आपले प्रतिबिंब पहातो तर काय केस , दाढी सगळे अगदी पांढरे शुभ्र झाले होते. चेहेऱ्यावर सुरुकुत्यांचे जाळे पसरून तो जख्ख म्हातारा झाला होता. क्षणभर त्याला काही कळेचना. पण नंतर त्याच्या लक्षात आले. राजकन्येने माणसासाठी सगळ्यात महत्वाचा खजिना यात आहे असे सांगितले होते. माणसाचं जीवन आणि तारुण्य हे माणसाला सगळ्यात प्रिय आहे. हा डबा उघडल्यावर म्हणूनच मी तीनशे वर्षाचा म्हातारा झालो.
आणि उराशिमा आपल्या गतायुष्याच्या आठवणी काढत समुद्राकडे बघत राहीला.
किती सुरेख गोष्ट. धन्यवाद
किती सुरेख गोष्ट. धन्यवाद सावली.
अनुवादही फार छान झाला आहे.
छान आहे अनुवाद
छान आहे अनुवाद
मस्त ग सावली आता ह्या दोन
मस्त ग सावली
आता ह्या दोन गोष्टींवर नको थांबुस. अनुवाद चालु ठेव.
खरंच, छान गोष्ट आहे आणि सुंदर
खरंच, छान गोष्ट आहे आणि सुंदर अनुवाद आहे. तुझ्या दोन्ही गोष्टींमध्ये 'हा अनुवाद आहे' असं वाटलंच नाही इतका मस्त फ्लो आहे!
सुंदर गोष्ट.. अजुन अशा मस्त
सुंदर गोष्ट.. अजुन अशा मस्त गोष्टी येऊ दे..
मस्त
मस्त
सुं द र! सावली, ह्या
सुं द र! सावली, ह्या निमित्ताने सुरु केलेले गोष्टींचे अनुवाद चालू ठेव आणि आम्हाला अशा सुंदर सुंदर गोष्टींचा खजिना पुरवित रहा.
मस्त आहे कथा आणि अनुवादही
मस्त आहे कथा आणि अनुवादही अगदी मस्त झालाय.
धन्यवाद हि कथा अनेक दिवस
धन्यवाद
हि कथा अनेक दिवस मराठी मधे आणायची होती. पण जमेल की नाही हि भिती होती
सावली किती छान छान गोष्टींचा
सावली किती छान छान गोष्टींचा खजिना तुझ्याजवळ आहे. खरंच... अजून लिही...लिहित रहा
वैद्यबुवांना सांगारे कुणितरी
वैद्यबुवांना सांगारे कुणितरी या गोष्टीबद्दल.
सानी धन्यवाद aschig
सानी धन्यवाद
aschig वैद्यबुवा कोण?
मस्त. ही पण आवडली. सावली,
मस्त. ही पण आवडली.
सावली, वैद्यबुवा सापडले का ?
हो हो पाहिली गोष्ट! छान आहे,
हो हो पाहिली गोष्ट! छान आहे, अनुवाद पण छान!
किती छान आहे गोष्ट .. मस्तं
किती छान आहे गोष्ट :).. मस्तं गं सावली, अजुन अनुवाद कर बालकथांचे , मजा येते वाचायला !
खूप मस्त आहे गोष्ट.
खूप मस्त आहे गोष्ट.