केल्याने भाषांतर - प्रवेशिका १० (सानी)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 25 February, 2011 - 18:05

आयडी: सानी

मुळ भाषा: तमिळ
कवी: सुब्रमणीय भारती (भारतीयार) (जन्म: डिसेंबर ११, १८८२ - सप्टेंबर ११, १९२१)

कवितेविषयी थोडेसे: ही राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी प्रसिद्ध कविता दोन भागात 'कपलोटिय तमिळन' (१९६१) आणि 'कई कोडुतं दैवम' (१९६४) ह्या दोन तमिळ चित्रपटात देशभक्तीपर गीत म्हणून वापरली गेली. ब्रिटिशांविरुद्ध लढा देत असतांना लोकांना एकात्मतेचा संदेश देण्यासाठी स्वत: भारतीयार हे गीत या चित्रपटात गात आहेत, असा प्रसंग 'कई कोडुतं दैवम' या चित्रपटात दाखवलेला आहे. त्यात भारतीयार यांची भुमिका शिवाजी गणेशन यांनी केली आहे. 'कपलोटिय तमिळन' चित्रपटात ह्या कवितेचा उत्तरार्ध गाण्याच्या स्वरुपात दाखवला गेला आहे. त्यात एक स्वातंत्र्यसैनिक लोकांना संदेश देत गात आहे असे दाखवले आहे. त्यात कोणी भुमिका केली ते समजू शकले नाही.

मुळ कविता:

सिंधू नदीयीन मिसै निलविनिले
चेर नन्नाटिलम पेन्गल्लुडने
सुन्दरत तेलुंगिनील पाटिसैत्तु
तोनीगल ओटी विलयाडी वरुवोम

गंगै नदीपुरत्तु गोदुमै पंडम
काविरी वेट्रिलैक्कु मारुकोल्वोम
सिंग मराटीयर्तम कविदै कोन्डु
सेरत्तु तंदंगल परिसलिप्पोम

सिंगलत तीविनुकोर पालमामैपोम
सेदुवै मेडुडुत्ती वीदि समैपोम
वांगत्तील ओडी वरुम नीरिन मिगैय्याल
वैयत्तु नाडुगलिल पयिर सेय्युवोम

वेल्ली पणिमलइन मिदुलावुवोम
अडी मेलै कडलमुळुदुम कप्पल विडुवोम
पल्लीत तलमनैतुम कोईलसैगुवोम
एंगल बारद देसमेन्ड्र तोळकोट्टुवोम

मुत्तु कुलिपदोरु तेनकडलिले
मोईत्तु वणिगर पल नाटिनरवन्दे
नत्ति नमक्किनिय पोरुल कोनर्न्दु
नम्मरुल वेन्डुवदु मेरकरयिले

कासी नगरपुलवर पेसुम उरैदान
कान्जीयिल केटपदरकोर करविसैवोम
रासपुत्तानत्तु विरर तमक्कु
नल्लियरकन्नडत्तु तंगम अलिप्पोम

पट्टिनिल आडयुम पन्जिल उडयुम
पन्नि मलैगलेन वीदि कुविप्पोम
कट्टि दिरवियन्गल कोन्डुवरुवार
कासिनि वणिगरक्कु अवैकुडुप्पोम

आयुदम सैवोम नल्ला कागिदम सैवोम
आलैगल वैपोम कल्वि सालैगल वैपोम
ओयुदल सैवोम तलिसायुदल सैयोम
उन्मैगल सोल्वोम पला वन्मैगल सैवोम

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्वार्धः-

चंद्रापर्यंत कीर्ती पोहोचलेल्या सिंधूनदीतूनी
बोटीमधूनी मस्त विहरत तिच्या जलातूनी
सुंदर चेराच्या कन्यकांसह सुमधूर तेलगूतूनी
रमतगमत आपण सारे गुणगुणत जाऊया

कावेरीच्या किनारी उगवल्या पानांच्या बदली
गंगेकाठचे गहू आपण आणून खाऊया
चेरामधले हस्तिदंतही विकूनीया आपण
सिंह-मराठ्यांच्या कविता घेऊन गाऊया

श्रीलंकेशी जोडणारा बांधूनिया सेतू
उंचावूनी भूमीची पातळी रस्ता बनवूया
पश्चिम बंगालातल्या नद्यांचे उरलेले पाणी
वापरूनी आपुल्या जमिनी आपण फुलवू फळवूया

उत्तरार्धः

विहरुया हिमालयाच्या रुपेरी सुंदर डोंगरांतूनी
जहाजे आपुली पाठवूया विशाल महासागरातूनी
मंदिरांइतक्याच आपण शाळाही बांधूया
आपुल्या भारतमातेची महानता साजरी करुया.

मोत्यांच्या खाणीची सुगी दक्षिण महासागरात
देशोदेशीच्या उद्योजकांचा गुंतलाय रस त्यात
पाश्चिमात्यांचाही दिसतसे लोभ किती त्यात
घेऊनी त्यांच्या वस्तू आपण आपुल्या विकूया

काशीमधल्या महाकवींच्या महान काव्याचा
आस्वाद घेण्या कांजीमध्ये वाद्य बनवुया

राजपूत शूरवीरांना कर्नाटकचे सोने

बहाल करुनी आपण त्यांचा सन्मान करुया

सुती अन रेशमाचे आपण विणूनीया धागे
त्यातून बनल्या कपड्यांचे ढिग प्रदर्शनी मांडूया
काशीतील उद्योजकांकडूनी घेऊनी अत्तरे सुगंधी
आपली सुती-रेशमी वस्त्रे त्यांना भेट देऊया

शस्त्रे बनवूया आणिक चांगले कागद बनवूया
कारखाने उभारू या, चांगली शैक्षणिक विद्यापीठे बांधूया
थकू ना कधी; ना कोणासमोर माथा झुकवूया
सत्य बोलूया अन सदा सद्वर्तनी राहूया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. आवडली कविता.
मंदिरांइतक्याच आपण शाळाही बांधूया>>> हे खरच झालं तर! Happy

Happy

छान. Happy
भारतियार यांच्याबद्दल वाचलं होतं. कालिदासानंतर 'महाकवी'चं बिरूद लाभलेले हे दुसरेच भारतीय कवी असतील.
मला वाचायच्या आहेत यांच्या कविता.
सानी, यांच्या इंग्रजी/हिंदी/मराठीत अनुवादित कविता कुठे वाचायला मिळतील काही कल्पना आहे का?

सावली, शैलजा, मामी, रैना, कविता, अरुंधती, श्यामली, स्वाती, लालू, साजिरा... तुम्हा सर्वांचे अनेक आभार!!! Happy

स्वाती, तुला भारतीयार यांच्याविषयी माहिती आहे, हे वाचून खुप छान वाटलं... ते महाकवी तर होतेच. शिवाय समाज सुधारकही होते. त्यांच्याविषयी दक्षिण भारतीयांमध्ये नितांत आदर आहे. सयाजी शिंदे यांना त्यांच्यावरील 'भारती' या चित्रपटात त्यांची भूमिका करण्याची संधी मिळाली, तेंव्हापासून सयाजी शिंदेंविषयी दक्षिणेत प्रचंड आदर निर्माण झालेला आहे. त्यांनी ही गोष्ट एका मुलाखती सांगितली सुद्धा होती. ती मुलाखत येथे पाहू शकता.

भारतीयार यांचे भाषांतरीत काव्य आंतर्जालावर फारसे उपलब्ध नाही.
काही निवडक भाषांतरीत कविता मला येथे सापडल्या. यात मी वर भाषांतर केलेली कविता नाही.

वरची कविता खास निवडली, याचे कारण मला आवर्जून सांगावेसे वाटतेय...
या कवितेत सिंह-मराठ्यांच्या कवितेचा उल्लेख असल्यामुळे आणि मी मराठी असल्यामुळे वरील कवितेचा उल्लेख माझा नवरा (तो तमिळ-भाषिक आहे.) नेहमी करायचा. तेंव्हाच मी ह्या कवितेचे भाषांतर एक दिवस करणार असे ठरवले होते आणि मायबोलीच्या उपक्रमामुळे मला ती संधी मिळाली.

भारतातल्या प्रत्येक प्रांताचे वैशिष्ठ्य सांगतांना आपल्या मराठीचे भारतीयार यांच्यासारख्या महाकवींना जाणवलेले मुख्य वैशिष्ठ्य हे कविता वाटते, आणि मराठ्यांचा उल्लेख ते त्या काळात 'सिंह' म्हणजेच शूर-वीर असा करतात, यातच बरंच काही आलं, नाही का? म्हणूनच भारतीयारांच्या इतर उत्तमोत्तम कविता भाषांतरासाठी निवडण्याऐवजी मी हिच निवडली. पण ही कविता आंतर्जालावर सापडतच नव्हती... शेवटी कशी बशी तुकड्या-तुकड्यांमधे सापडली आणि सापडली तर तिचे इंग्लिश भाषांतर हे तमिळ भाषिकांसाठीच फार कसोटीचे काम होते, कारण त्यात वापरली गेलेली उच्च तमिळ भाषा!!!! पण नवर्‍याने खुप उत्साहाने आणि संयमाने मला कविता शोधून आणि इंग्लिशमध्ये भाषांतरीत करुन दिली. Happy

२-३ दिवसांपूर्वी ह्या कवितेचा आणखी एक महत्वाचा तुकडा सापडला... तो इथे देतेय.
(संयुक्ता संयोजक, जमल्यास हा तुकडा मुळ कवितेत सर्वात शेवटी आणि त्याचे भाषांतर भाषांतरात शेवटचे कडवे म्हणून डकवाल का? धन्यवाद!)

आयुदम सैवोम नल्ला कागिदम सैवोम
आलैगल वैपोम कल्वि सालैगल वैपोम
ओयुदल सैवोम तलिसायुदल सैयोम
उन्मैगल सोल्वोम पला वन्मैगल सैवोम

भाषांतरः
शस्त्रे बनवूया आणिक चांगले कागद बनवूया
कारखाने उभारू या, चांगली शैक्षणिक विद्यापीठे बांधूया
थकू ना कधी; ना कोणासमोर माथा झुकवूया
सत्य बोलूया अन सदा सद्वर्तनी राहूया

स्वाती, मला शक्य झाल्यास मी भारतीयारांच्या अजूनही काही कवितांचे भाषांतर करेन आणि अजून काही भाषांतरीत दुवे मिळाले तर येथे देईन. Happy

विहरुया हिमालयाच्या रुपेरी सुंदर डोंगरांतूनी
जहाजे आपुली पाठवूया विशाल महासागरातूनी
मंदिरांइतक्याच आपण शाळाही बांधूया
आपुल्या भारतमातेची महानता साजरी करुया.................सह्ही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!१

छान अनुवाद. सरळ, सोपी, रसाळ कविता.
सानी - एक प्रश्न. कविता तामीळ भाषेत आहे ना? अनुवादात तेलगूचा उल्लेख आहे, म्हणून विचारतेय.
"सुंदर चेराच्या कन्यकांसह सुमधूर तेलगूतूनी"

वंदना, रचु, धन्यवाद. Happy
वंदना, अगदी योग्य प्रश्न! कवितेविषयी सुरुवातीला लिहिले आहे त्याप्रमाणे कवी भारतीयार यांनी भारतातल्या निरनिराळ्या प्रांतांमधले त्यांना भावलेले वैशिष्ठ्य सांगितले आहे.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश ते तमिळ जनतेला देत आहेत, तेंव्हा कुठले काय चांगले, हे त्यांनी या कवितेत सांगितले आहे. त्यातून प्रत्येक प्रांतातल्या चांगल्या गोष्टी आपण घेऊ या असा संदेश दिलेला आहे.

जसे- भारतीय संस्कृतीचा उगम ज्या नदीच्या किनार्‍यावर झाला अशा सर्वदूर कीर्ती पसरलेल्या सिंधू नदीतून आपल्या 'सुंदर चेरा' म्हणजे सुंदर केरळ भागतल्या कन्यकांसह सुमधूर तेलगूमधून गात जाऊया...असे ते म्हणतात. ही कविता लिहिली त्या काळात मद्रास प्रांतात सगळी दाक्षिणात्य राज्ये एकत्रित होती. तेंव्हा हे आपल्या प्रांतातले सौंदर्य असे त्यांना म्हणायचे आहे. म्हणूनच चेरातले म्हणजे केरळ मधले हस्तिदंत विकून सिंह मराठ्यांच्या कविता घेऊ असे ते त्यांच्या प्रातांतील लोकांना सुचवत आहेत.

त्यानंतर बाकीच्या प्रांतांमधली सौंदर्यस्थळे, आदरस्थाने, उपयुक्त वस्तू दाखवतांना सिंह मराठ्यांच्या कविता, गंगेकाठचे गहू, काशीतील सुगंधी अत्तरे, राजपूत शूरवीर इ. उल्लेख आलेले आहेत.