'भर दुपारचे प्रेम'

Submitted by Narayan Thakur on 6 January, 2011 - 09:49

'प्रेम म्हणजे काय' या विषयावर एका मासिकाने लेख लिहिण्याची विनंती केल्याने भर दुपारी चुरमुरे सर त्यावर विचार करत बसले होते. अचानक दारावरची बेल वाजली. 'माझ्यासारख्या निवृत्त प्राध्यापकाच्या घरी अशा मध्यान्हीच्या वेळेस मळक्या चड्डीतला फुलवला किंवा बिल मागायला आलेला पेपरवाला याशिवाय कोण येणार? अशा विचारात आणि ''शी बाई, दुपारची जरा पडले तर आलं मेलं कोणीतरी कडमडायला!'' या सौ. चुरमुरेंच्या मुखोद्गाराच्या पार्श्वभूमीवर चुरमुरे सरांनी दार उघडलं तर दारात शेजारचे चिटणीस! ते इतकी मान खाली करून उभे होते की बहुधा ती मोडली की काय अशी शंका यावी पण नाही, तसे झाले नव्हते. मान वर करून निस्तेज डोळ्यांनी चिटणीस म्हणाले, "माफ करा हं सर! मी तुम्हाला झोपेतून उठवलं तर नाही नं?" थोड्याच वेळापूर्वीचा बायकोचा उद्गार मनातल्या मनात ठेवूनच चुरमुरे म्हणाले, "छे हो! आताशा कुठली झोप यायला? असाच आपला लिखाण करत बसलो होतो. या नं!"

"अगं ए..." असं दबकत म्हणणार इतक्यात स्वयंपाकघरात भांडी आपटण्याचा आवाज येऊ लागला. सौभाग्यवती उठल्याचा चुरमुरे सरांना साक्षात्कार झाला. तशी सरांची अर्धांगिनी म्हणजे 'अतिथी देवो भव'! लग्न जुळवण्याच्या वेळेस जवळजवळ २६ वेळा तरी तिच्या या गुणाचा उल्लेख तिच्या माहेरच्या मंडळींनी केला होता.

चिटणीस चुळबूळ करीत बसले होते पण तोंडातून शब्द काही निघत नव्हता. शेवटी चुरमुरे सर उद्गारले, "चिटणीस, अहो काय झालं? काही समस्या आहे का?" चिटणीस ताडकन मन वर करून म्हणाले, "सर काय सांगू तुम्हाला, सांगण्यासाठी शब्द तर नकोत?"
"असं झालं तरी काय?" चुरमुरे सर जरा गोंधळलेल्या स्वरात म्हणाले.
"सर..सर..माझा मुलगा...कसं सांगू तुम्हाला...सर तो पडलाय..."

यानंतर साधारणपणे अर्ध्या एक तासाने चुरमुरे सरांच्या कानी पुढचा शब्द पडला. मधल्या अस्वस्थ काळात सौ.चुरमुऱ्यांचे चहाचे कप व चकल्यांची बशी टेबलावर आणून आपटणे, चिटणीसांचे चकली म्हणजे विज्ञानाच्या प्रयोगाला निरीक्षण करावयास दिलेली गोष्ट आहे असे समजून खाणे, चुरमुरे सरांची चहात बुडवलेली चकली चहात पडणे, ती काढताना हात भाजणे, चिटणीसांचे सुतकी चेहऱ्याने फुर्र फुर्र आवाज करत बशीतून चहा पिणे आदि आदि गोष्टी घडल्या.

चुरमुरे सरांना वाटले कदाचित चिटणीस त्यांच्या सौसमोर मोकळेपणाने बोलणार नाहीत म्हणून त्यांनी तिला तिच्या महिला मंडळाच्या 'माहेरच्या वाण्याकडून आणलेल्या पिठाचा तयार केलेला मेदुवडा अर्धा कच्चा राहिला म्हणून नवऱ्याने काटा चमचा रागाने फेकून दिला तर काय करावे' या विषयावरच्या व्याख्यानाची आठवण करून दिली. त्यावर ''अगबाई! विसरलेच होते मी..." असं म्हणून सौ. आत गेली आणि कधी नव्हे ते पाचच मिनिटात तयारी करून पायऱ्या उतरली देखील!

"प्रेमात!...चिटणीस जणू काही याच संधीची वाट पाहत असल्यासारखे केव्हाचे अर्धवट राहिलेले वाक्य पूर्ण करत म्हणाले.
"अं?" चुरमुरे सर जरा गोंधळलेच.
"अहो माझा मुलगा प्रेमात पडलाय प्रेमात!" चिटणीस उत्तरले.
"अहो, म्हणजे सध्या कॉलेजात त्याची एक गर्लफ्रेंड आहे..."
"अहो मग असूदेत नं! एकच का? अनेक का असू नयेत? आता कॉलेजात आहे नं तो?"

यावर प्राध्यापक असूनही चुरमुरे सरांनी असं बाळबोध प्रश्न विचारलाच कसा अशा प्रश्नार्थक चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत चिटणीस म्हणाले,
"अहो सर, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड हे नेहमी एकाच असतात. फ्रेंड्स अनेक असू शकतात. याची गर्लफ्रेंड आहे गर्लफ्रेंड! त्यामुळे ही माझ्यावर खूप चिडली आहे. म्हणते, 'तुमच्या लाडाने बिघडला तो! अभ्यासात लक्ष नाही त्याचं!' तशी ती रोज मला बोलत नाही पण हल्ली रोज मला ऑफिसात भाजी खारट किंवा अळणी मिळते. मी या प्रकरणावर लवकरात लवकर काहीतरी करावं अशी हिची इच्छा आहे. आता सांगा मी काय करू?"

'प्रकरण' हं शब्द ऐकून चुरमुरे सरांच्या छातीत धस्स झाल्यासारखं झालं!
चिटणीस पुढे म्हणाले, "काही नाही हो सर! ही आजकालची पिढीच असली! प्रेम कशाशी खातात हे तरी कळतं का त्यांना? आणि हे असले उद्योग करून ठेवतात!"

'प्रेम कशाशी खातात' हे चुरमुरे सरांना मात्र चांगलेच परिचित होते. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात ते जवळजवळ अगदी २७ वेळा मसाला डोसा, इडली, उत्तप्पा, झुणका-भाकर, छोले ते अगदी केकपर्यंत सगळ्याशी खाऊन झाले होते आणि प्रत्येक वेळी ते थोबाडीत खाईपर्यंतच लांबले होते. अखेर सौ. मिळाली आणि आता इतकी वर्षं तिच्या हातचा स्वयंपाक चविष्ट नसला तरी प्रेमाने केलेला असतो म्हणून नाव न ठेवता ते खात होते!

हे सगळं विचारचक्र डोक्यात फिरत असताना उत्तराच्या अपेक्षेत असलेले चिटणीस जणू काही चुरमुरे सरांच्या बुबुळांचा रंग नक्की कोणता असावा हे पाहत असल्यासारखे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते. चुरमुरे सर भानावर येऊन म्हणाले, "अहो चिटणीस...हे वयच आहे त्यांचं प्रेमात पडण्याचं. निसर्गाची देणगी आहे ती! तेव्हा हे असं होणं स्वाभाविक आहे. त्याला प्रकरण वगैरे नाव देऊन तुम्ही जरा अतीच करताय असं नाही का वाटत तुम्हाला? अहो तुमचे कॉलेजचे दिवस आठवून पहा आणि तुमच्या मुलाच्या जागी तुम्हाला ठेवा आणि मग पहा तुम्हाला आपोआपच उमजेल. अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय असं वाटत असेल तर द्या माझ्याकडे पाठवून. अहो विद्यार्थी म्हणजे माझे मित्रच आहेत! त्यामुळे माझं कितीही वय झालं असलं तरी मी त्यांच्याच वयाचा आहे. त्यांच्या भावना समजू शकतो. ती चुकीचं पाउल टाकणार नाहीत याकरता त्यांना अगदी मैत्रीच्या नात्याने मार्गदर्शन करू शकतो. चिटणीस, प्रेमाच्या फक्त संज्ञा बदलल्या आहेत, पण मूळ संकल्पना तर त्याचं आहेत नं?"

चिटणीस लक्ष देऊन ऐकत होते. "तेव्हा आता अजिबात काळजी करू नका! राहता राहिला वहिनींचा प्रश्न! त्यांच्याशी मी किंवा ही अशा तशा निमित्ताने या विषयावर बोलून त्यांची समजूत काढू. बरं का? वाटल्यास तुमच्या मुलाशीही मी सवड काढून बोलेन. आता जास्त चिंता करत बसू नका. आपल्या मुलांवर विश्वास असू द्या, तरच नात्यातलं सामंजस्य टिकून राहील!"

चिटणीसांच्या डोळ्यात हलकेच पाणी तरारलं. "धन्यवाद सर! तुमच्याशी बोललो आणि खरच खूप बरं वाटलं. येतो मी!" दिसेल न दिसेल असे पटकन डोळे पुसून चिटणीस दार ओढून निघून गेले. प्रेमातली ही दुपार जेव्हा दूर होईल तेव्हाच आयुष्याची संध्याकाळ आणि रात्र जास्त सुखकर होईल या विचारात चुरमुरे सरांनीही 'प्रेम म्हणजे काय..' लिहिण्यासाठी पेन सरसावलं.

गुलमोहर: 

या विचारात चुरमुरे सरांनीही 'प्रेम म्हणजे काय..' लिहिण्यासाठी पेन सरसावलं. >>> कदाचित इथुन विनोद सुरु होतो......! पुढे लिहण्याची तस्दी घ्यावी ठाकुरसाहेब.

लिहू लिहू...पुढे नक्की लिहू...सुरुवातीचा आपला प्रतिसाद आवडला! Happy हे मी सातवीत असताना केलेले लिखाण! मायबोलीवरची सुरुवात जुन्या लेखांनी करावी अस विचार होता. आपण फारच चोखंदळ वाचक दिसता बुवा! असे वाचक मित्र भेटल्याने समाधान वाटले! Happy

अजुन तुम्हाला चोखदंळचा वाचक भेटलेत भाऊ...अजून काही वाचक आले की मग कळेल...
बाकी लेख जुने असायला हरकत नाही...पण त्यात काहीतरी हवे ना...
लेख चांगला जमत आला होता पण शेवट काय झेपलाच नाही...हा क्रमश आहे का

'माहेरच्या वाण्याकडून आणलेल्या पिठाचा तयार केलेला मेदुवडा अर्धा कच्चा राहिला म्हणून नवऱ्याने काटा चमचा रागाने फेकून दिला तर काय करावे' या विषयावरच्या व्याख्यानाची आठवण करून दिली.>>>

हा हा हा! मस्त!

-'बेफिकीर'!

हा लेख जरी ७ वीत लिहिला असला तरी त्यातल्या भाषेवरून तो हल्लीच editकेल्यासारखा वाटतो तरीही चांगला प्रयत्न आहे.