वासोटा

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

शुक्रवारी संध्याकाळी मोबाईवर 'Gs1'चा नंबर झळकू लागला आणि मनातल्या मनात नविन ट्रेकचा आनंद साजरा केला... 'वासोटा' करतोय.. येणार का? म्हणून विचारणा झाली आणि लागलीच होकार कळवला. पण एक अडचण होती... ती म्हणजे ट्रेकची सुरवात शुक्रवारी नसुन शनिवारी करायची होती... कारण वासोट्यावर मुक्काम करण्यास बंदी आहे अशी माहिती मिळाली होती. पुणे - सातारा - बामणोली - वासोटा आणि तसाच परतिचा प्रवास दिड दिवसात करायचा होता. 'गिरीविहार'ला फोन करून त्याचाही कौल घेतला.

जीसच्या प्लॅन नुसार आम्ही रात्री ११ वाजता पुण्यात अपेक्षित होतो... तेथून सातारा मार्गे बामणोलीत मध्यरात्री २ - ३ वाजेपर्यंत पोहचायचे आणि पहाटेलाच बामणोली सोडायचे असा प्लॅन होता... पण मैत्री पार्कला ९ वाजता पकडलेली पुण्याची बस स्वारगेटला पोहचे पर्यंत मध्यरात्रीचे २ वाजले होते... जीसने सांगितल्या प्रमाणे 'मिहिर' आम्हाला घ्यायला स्वारगेटला आला... मिहिरच्या आईने केलेला पाहुणचार आमच्यासाठी फार मोलाचा होता... साडेतिनच्या सुमारास मिहिर आणि भक्ती सोबत त्यांच्या गाडीने आम्ही जीसला गाठले... जीसच्या गाडीत पुण्याचे मायबोलीकर कूल, आरती, स्वाती, फदी बसले होते.

सातारा मार्गे जाताना वाटेत अजिंक्यताराचे दर्शन झाले... पुढे कास पठाराचे आणि कोयनेचे सौंदर्य न्याहाळत सकाळी साडेसातच्या सुमारास बामणोली गाठले... कोयनेचे बॅकवॉटर महाबळेश्वच्या पायथ्याला तापोळ्या पर्यंत पसरलेले आहे. या बॅकवॉटर मधून सव्वा तासाचा लाँचचा प्रवास करून आम्हाला वासोट्याच्या पायथ्याला मेट इंदवलीला जायचे होते. चौकशीअंती कळले की वासोट्याची परवानगी देणारे कार्यालय सकाळी ८ वाजता उघडते... (मनात म्हंटले उशिरा आलो ते एक बरच झालं :p)

Koyana

तेथेच नाष्टापाणी करून, बाराशे रुपयात लाँच ठरवून सकाळी ९ला निघालो... नागमोडी वळणे घेत आम्ही कोयनेच्या घनदाट अरण्याकडे सरकत होतो... आपल्या दोन्ही बाह्या पसरून सह्याद्री आमच्या स्वागताला उभा होता... मंत्रमुग्ध करणार निसर्ग आणि निरव शांतता यांचा अद्भुत मिलाप अनुभवयास मिळाला.

Koyana Parisar

सुमारे पाचशे चौरस किमीच्या दाट जंगलात वसलेला दुर्गम किल्ला अशी ज्याची महती आहे, तो पहाण्याचे बर्‍याच वर्षा पासूनचे स्वप्न पुर्णत्वास येत होते. पुर्वेला सह्यकड्यांनी कोयनेच्या पाण्यात हेलकावणारी रांगोळी काढली होती... पण त्याच सह्यकड्यांनी कोकणात आपला दरारा निर्माण केला होता. उत्तरेला मधु-मकरंद गड, दक्षिणेला जंगली जयगड तर कोकणच्या बाजूला नागेश्वर, महिमंडणगड रुबाबात उभे होते. कोकणातूनही वासोट्यावर येता येते पण त्यासाठी बरीच शक्ती वाया जाते.

Welcome

डाविकडे जुना वासोटा आणि उजविकडे खोट्या नागेश्वर सुळक्याला सोबतीला घेऊन वासोटा दिमाखात उभा होता...

Vasota

नावाड्याला पाच पर्यंत परत येण्याचे वचन देऊन झपाझप पायवाट कापत पायथ्या जवळील वनविभागाच्या कार्यालया जवळ पोहचलो... वाटाड्या म्हणून तेथील कृष्णा गोरे यांना चारशे रुपयांच्या मानधनावर मंजूरी देऊन त्यांच्या सोबत चालू लागलो... वाटेत लिंबोणीच्या आकाराच्या गुलाबी आंबोळगी नावाचा रानमेव्यावर ताव मारला...

AmbuLagi

एक सुकलेला ओढा पार करून बजरंगबलीचे दर्शन झाले.

Maruti

वरच्या माळ्यावर सुर्या मार्चची होळी खेळत होता... देवळा शेजारी पिण्याचे पाणी भरून घेतले आणि निघालो...

Thabak Thabak!!!

Butterfly

देवळापासूनची वाट मोठी असली तरी घनदाट आहे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ||
पक्षी ही सुस्वरे आळविती ||१||

Payvat

काही झाडं विचित्र प्रकारच्या नक्षीमुळे विद्रूप दिसत होती... "त्या अस्वलांच्या नखांच्या खूणा आहे". कृष्णाने सांगितलेल्या माहितीमुळे सगळेच जण गपचूप पुढे चालू पडले... सोबत या जंगलात सातशे गवे, भरपूर सांबर, भेकर, रानडुक्कर, अस्वले, सतरा बिबटे आणि दोन पट्टेरी वाघ आहेत अशी पुरवणी त्याने जोडली.

दुसर्‍या टप्प्यात आल्यावर उजविकडे नागेश्वराला जाणार फाटा दिसला... थोडावेळ आराम करून डाविकडच्या वाटेने वासोट्याकडे निघालो... तिन तासात माथ्यावर पोहचण्यात यश मिळाले. पुढे काही अंतर चालून गेल्यावर दरवाजा दिसला... समोरच देऊळ आहे...

Mahadev Mandir

मागिल बाजूस वाड्याचे अवशेष दिसतात... थोडं पूढे गेल्यावर आणखी एक देऊळ दिसले... माथ्यावर उन्ह आणि वारा यांच्याशी झोंबी खेळत सभोवतालचा नजारा बघत होतो... पश्विमेला हिरवगार कोकणात दिसत होतं... कोकणात उतरणार्‍या डोंगररांगा आणि नागेश्वराला गेलेली वाट पाहून पोटात चक्क गोळा आला... अबब!!!

Nageshwarakadil vaat

Kapari

Vinchu Kata

थोडं मागे येऊन डाविकडच्या वाटेने पाण्याच्या टाक्या जवळ गेलो... पेटपुजा करून थोडावेळ तेथेच सावलीत आडवे झालो...

Vasotya varil Hanuman Mandir

"चलाऽऽऽ चलाऽऽऽ पाचच्या आत पोहचयं नव्हं"... कृष्णाने आवाज दिला. जडावलेल्या अवस्थेतच जुन्या वासोट्याकडे निघालो... आणि समोरच दृष्य पाहून झोपच उडाली... चार हजार फूट खोल कोसळणारा बाबूकडा पहाताना कोकणकड्याची याद आली... निसर्गाच्या या रुद्रभिषण अदाकारीमुळेच तर भटकंतीचे वेड लागतं.

Babu Kada

Kadelot

तीन वाजून गेले होते, वचनपुर्तीसाठी सगळेच भराभर पळत खाली उतरलो... बराच पल्ला फार कमी अवधीत गाठला होता... किनार्‍यावर येताच हंटर काढून कोयनेच्या पाण्यात पाय सोडून बसलो... आह्हा... काय तो आनंद!

याची साठी केला होता अट्टाहास | शेवटचा क्षण गोड व्हावा ||

yachi sathi kela attahas

अंधार पडायच्या आत लॉचने बामणोली गाठायचे होते... हंटर तसेच हातात घेतले आणि बोटीत उड्या टाकल्या... वासोट्याच्या मागील सुर्यास्ताचे फोटो क्लिक करून राहिलेल्या बॅकवॉटरच्या प्रवासात झोपेचा तुटवडा भरून काढण्याचा प्रयन्त केला.

Bye Bye !!!

संध्याकाळी साडे सहाला बामणोली वरून निघालो. सातारा रोडवर मिसळपाव खाऊन पुण्याकडे रवाना झालो. मिहिरने आम्हाला स्वारगेटला सोडले तेव्हा रात्रीचे १२.३० वाजून गेले होते. मुंबईची एस्टी पकडून सायनला उतरलो तेव्हा पहाट होत आली होती. असा दगदगीचा ट्रेक पार पडूनही मनात खूप समाधान होतं.

विषय: 
शब्दखुणा: 

वर्णन व फोटो सुरेख. नागेश्वरहून कोकणात उतरणं म्हणजे फारच दगदगीचं आहे, नाही उतरलात ते छान केलंत.

त्याने इतके लिहीण्यासाठी कष्ट घेतले तेच खूप आहे बघ.. >>> :d

लेख लवकर आटोपला आहे...! >>> आपले काम फक्त ट्रेक करायचे... वृत्तांत लिहायचे काम 'यो' कडेच...

खूप छान फोटो व वृत्तांत. कड्याचे फोटो खरेच सुंदर आहेत. शेवटचा सूर्यास्ताचा फोटो मस्त आहे.

वासोटा.. आsssssssssssहा.. ! कॉलेज डेज आठवले. आमचे 'राडुची शिकार' अनुभव जबराच होते

फोटो जबरदस्त, एक रात्र पहावी अनुभवून इथे. धम्माल येते.

गिरी १७ मार्च २००७ ला गेलो होतो....
बरं झालं सांगितलंस... मी चाट पडलो होतो.. कारण कृष्णा गोरे म्हणत होते की सहा महिन्यात त्यांचं गाव धरणाच्या पाण्याखाली जाणार आहे त्यामुळे ते स्थलांतर करतील आणि postingही बदलेल.
मी २००८ च्या दत्तजयंतीला गेलो होतो (पौर्णिमेचे शुभ्र चांदणे म्हणजे काय हे तेव्हा अनुभवले होते, पट्टेरी वाघाचं गुरगुरणं रात्रीच्या नीरव शांततेत ऐकलं होतं आणि गव्याला पाच-दहा फुटांवरून अनुभवलं होतं.. :))

अरे वासोट्यावर राहू देत नाहीतच, पण कृष्णा गोरेंकडे राहायची परवानगी आहे. I mean वासोट्याच्या पायथ्याला फॉरेस्टचे तंबू आहेत. तिथे राहता येते.

>>>अरे वासोट्यावर राहू देत नाहीतच, पण कृष्णा गोरेंकडे राहायची परवानगी आहे. I mean वासोट्याच्या पायथ्याला फॉरेस्टचे तंबू आहेत. तिथे राहता येते.

या वर्षीपासून नाही. आता वासोटा व्याघ्रप्रकल्पात गेले आहे.

इंद्रामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. नागेश्वराच्या गुहेत रहायचे राहूनच गेले, आता चोरवणेवरून वर चढून आले आणि राहिले तरच राहता येईल त्या गुहेत.

धन्यवाद मित्रांनो Happy

जीएस, आनंद... चोरवणेवरून चढून आले तर परवानगी नाही का घ्यावी लागत?

btw नागेश्वरचा योग कधी जुळून येणार?

इंद्रा, फारच शॉर्ट लिहिलंयस.

आनंदयात्री, तुझे वासोट्याचे अनुभव लिही प्लिज. वाघ ऐकलास आणि गवा बघितलास ना?

अरे चोरवणेवरून आलं ना तर मेट इंदवलीला (म्हणजे बामणोलीकडून उतरतो ते) पत्ता ही लागत नाही. तिथून चढायला फॉरेस्ट्ची परवानगी लागतच नाही.फक्त जीवाची जबाबदारी स्वतःची!! Lol

चालणारे असतील तर नागेश्वर आणि वासोटा एका दिवसात होतो... पण पूर्ण ट्रेकला कमीत कमी दोन दिवस हवेत.

अश्विनी के, आता सगळं आठवणं अवघड आहे हो... त्याला दोन वर्षं होऊन गेली... आपली सूचना लक्षात ठेवेन... Happy