शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिस्क्लेमर अशासाठी की ग्राहक वस्तू/सेवा स्वतःच्या जबाबदारीवर पारखून घेतोय, फक्त त्या मजकुरावर विसंबून नव्हे. अर्थात हे डिस्क्लेमर कोणी स्वखुषीने देत नाहीत, तर बहुधा वैधानिक असतात. म्हणजे त्या त्या क्षेत्रातल्या नियामकाने सांगितले म्हणून टाकलेले. जसे म्युच्युल फंड साठी सेबी.

श्रेयअव्हेर शब्द छान आहे, पण मराठीत मधे अ असलेले शब्दच फार कमी आहेत. तसेच मधे ह असलेले (नेहमी ) शब्द पण कमी आहेत. लिहिताना तर होतोच पण उच्चारताना देखील, अ चा संयोग श्रेय मधल्या य शी होउन, श्रेयाव्हेर असा काहिसा शब्द निर्माण होईल.
एक गाणे आठवले,
अश्या अवेळी पैलतीरावर, आज वाजतो पावा मंजूळ

(यातल्या अवेळी मधल्या अ चा गायनात लोप झाल्याने, अश्यावेळी झालेय )

बहुतेक, इंदिरा संतांची, कूब्जा हि कविता,
अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकूळ ...

असा गोंधळ होऊ नये म्हणून तर इंग्रजीत अ‍ॅन हे उपपद वापरतात. जेथे 'अ' + (स्वर) मिसळून संधी होण्याची शक्यता असते तिथे. अ आर्टिस्ट म्हटले की दोन वेगळे शब्द कळतच नाहीत . अ‍ॅन मुळे हे सेपरेशन साध्य होते. अ ऑरेन्ज, अ इव्हिनिंग असे उच्चार करून पहा म्हणजे कशी गम्मत होते ते पहा.

अरे हो की !!
वेळीअवेळी, हा एक शब्द धरतात का ? उच्चारताना खुपदा तो तोडावा लागतो. जोडला, तर वेळोवेळी, असा उलट्याच अर्थाचा शब्द होतो.
डिस्क्लेमर ला एक वेगळा अर्थही आहे. ऑडीटर्स ना एखाद्या गोष्टींबद्दल मत द्यायचे नसले तर हा शब्द वापरतात.

यापैकी बरोबर म्हण कुठली आहे:

घरच्या भाकर्‍या भाजायचे सोडून लष्कराच्या भाकर्‍या भाजणे

की

घरची भाकरी भाजायचे सोडून लष्कराची भाकरी भाजणे

सिंडरेलाच्या मतानुसार भाकरीचे अनेकवचन भाकरीच होते माझ्या मतानुसार भाकर्‍या असे होते. म्हणून ही म्हण आठवली.

स्त्रीलिंगी "ई" कारान्त शब्दांचे अनेकवचन 'या' कारान्त होते. उदा. भाकरी -भाकर्‍या. नवरी- नवर्‍या, चवरी-चवर्‍या, बकरी- बकर्‍या, टपरी-टपर्‍या. भिंगरी- भिंगर्‍या, पिचकारी -पिचकार्‍या., पिशवी-पिशव्या,

असो.
आणि सिंडरेलाला काय कळते अनेकवचनातले. ? तिने फार्फार्तर भाकर्‍याबद्दल पार्ल्यावर लिहावे तेही करणे आणि खाणे यापुरतेच. व्याकरणाच्या उठाठेवीत पडू नये Proud

मात्र महाराष्ट्रात श्रीरामपूर नावाच्या अतिमागासलेल्या आणि गावंढळ खेड्यात भाकरीचे अनेकवचन भाकरीच करतात. उदा- बीने काल पंधरा भाकरी खाल्ल्या . पण ते व्याकरणशुद्ध नाही.

 

लष्कराच्या भाकर्‍या, असेच बरोबर आहे. कोल्हापूर भागात तेच म्हणतात. पण तिथे भाकर्‍या थापल्या जात नाहीत तर बडवल्या जातात किवा लावल्या जातात.
भाकरीचे एकवचन भाकर, असे पण करतात.
आधी हाताले चटके, तवा मियते भाकर ...

मूर्ती, भाकरी अशा काही शब्दांच्या अनेकवचनांत विकार होत नाही. मूर्ती, भाकरी अशीच त्यांची अनेकवचनी रूपं राहतात. 'भाकर्‍या' हा शब्द बोलीभाषेत रूढ असला तरी व्याकरणदृष्ट्या चूक आहे.

ग्रामीण भागात जिथे भाकर शब्द वापरला जातो तिथे त्याचे अनेक वचन मात्र 'भाकरी' होते. अकारान्त स्त्रीलिंगी सामान्यनाम म्हणून. मशीद- मशीदी. तोड(दगडाची घडवलेली)-- तोडी. बाभळ- बाभळी.बोर्-बोरी.पाभर- पाभरी.

"बोरी बाभळी उगाच जगती , चंदन घेई कुठार." या गदिमांच्या ओळीतही बोरी, आणि बाभळी ही अनेकवचने बोर आणि बाभळ ह्या अकारान्त स्त्रीलिंगी नामाचीच आहेत.

खरे तर 'मूर्त्या'च अनेक वचन व्हायला पाहिजे. कारण ई कारान्त स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन हिन्दीच्या धर्तीवरच आपण करतो. कैरी-कैरियां-कैर्‍या., बकरी-बकरियां-बकर्‍या, पिचकारी-पिचकारियां-पिचकार्‍या.
गाडी-गाडियां-गाड्या. साडी -साडियां-साड्या. बस्ती-बस्तियां-वस्त्या. तसे मूर्ती-मूर्तियां-मूर्त्या. हे लॉजिकल आहे. पण नाही झाले तसे. बर्‍याचदा व्याकरणातही लॉजिक/कन्सिस्टन्सी नसते आणि ते अपवादाच्या नावाखाली मारून नेले जाते.

धन्यवाद सर्वांचे पण नक्की कुठले अनेकवचन बरोबर अजूनही कळत नाही. तरीही रॉबीनहूड जास्त बरोबर वाटतात.

बरोबर.
सौख्यः Happiness
मांगल्यः 1) Purity, sanctity, auspiciousness 2) a festive occasion (मंगलकार्य)

भरत, हा शब्द कुणासमोर उच्चारला जातोय, आणि कुठल्या देशी (म्हणजे गावी ) त्यावर ते ठरेल.

चंपक, डिस्कव्हरी आणि इनोव्हेशनला, मराठीत शोध असाच शब्द वापरतात ना ? (मी वापरतात नंतर पूर्णविराम दिला होता, पण त्याला ना जोडून आणि एक प्रश्नचिन्ह टाकून, मी बरेच काही साधले आहे. )

कदाचित शोधणे, शोध लावणे आणि शोध करणे असे दोन वेगवेगळे शब्द वापरत असतील..

दिस्कवर, इनोव्हेट आणि इन्वेस्टीगेट ?

अ‍ॅक्च्युअली ते डिस्कव्हरी आणि इन्वेशन आहे. डिस्कव्हरी म्हणजे आधीच असणारी गोष्ट पहिल्यान्दा शोधणे . उदा कोलम्बसाने अमेरिका 'शोधली' म्हनजे ती पूर्वी तिथेच होती की. मात्र एडिसनने विजेच्यादिव्याचे इन्वेन्शन केले.(नव्यानेच शोधला.)

पण इनोवेशन हे असलेल्या गोष्टीत गुणवत्ता वाढवून थोडेसे नाविन्य आणणे. उदा. साबणाचा वास अथवा रंग बदलून पेश करणे.

(चुभुदेघे.)

टोणग्याचं बरोबर आहे. innovate = सुधारणा करण्यासाठी बदल घडवून आणणे. आता यासाठी एक शब्द असा आहे का?

Innovation =
1. नवप्रवर्तन
2. नवरीति
3. नवीनता (f)
4. नवोत्पाद (m)
5. नूतनव्यवहार
6. नवपरिवर्तन (m)
7. नई बात
8. नवीन प्रक्रिया
9. नवीन मार्ग
10. नवरचना

संदर्भ = http://www.shabdkosh.com/s?e=innovation&f=0&t=0&l=hi

Pages