आफ्रिका खंडात अनेक वैशिष्ठपूर्ण सरोवरे आहेत आणि त्यापैकी ३ केनयात आहेत.
जगातील दुसर्या क्रमांकाचे गोड्या पाण्याचे सरोवर (क्षेत्रफळ ६७००० चौ. कि.मी.) लेक व्हिक्टोरिया चा काही भाग केनयात आहे. युगांडा, केनया आणि टांझानिया या तिन्ही देशांच्या सीमा या सरोवरात मिळतात आणि नाईल नदीचा उगम या सरोवरात होतो. या सरोवराच्या काठी मी २ वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्य केले आहे.
दुसरे सरोवर म्हणजे लेक नाकुरु. हे खार्या पाण्याचे सरोवर आहे. इथे खुप मोठ्या संख्येने रोहित पक्षी (फ्लेमिंगोज) येतात. त्यांच्या वास्तव्याच्या दिवसात विमानातूनही हा भाग पांढरा गुलाबी दिसतो. आणि ते मी विमानातूनच बघितले होते. प्रत्यक्ष त्या सरोवराच्या परिसरात मात्र मला प्रवेश नाकारला होता (कारण विचित्र होते. मी भारतीय दिसत नाही, हे कारण होते ते). या सरोवरातील फ्लेमिंगोजचा एक अप्रतिम शॉट, मेरील स्ट्रिपच्या, आउट ऑफ आफ्रिका, या चित्रपटात आहे.
क्रिसमसच्या सुट्टीत तिथेच जायचे असे आमचे ठरले होते, पण आयत्यावेळी त्या भागात कडाक्याची थंडी पडल्याचे रेडीओवर सांगितल्याने, आम्ही लेक नैवाशाला जायचे ठरवले.
हे सरोवर त्या मानाने लहान म्हणजे फक्त १४० चौ. कि.मी. विस्ताराचे आहे. या सरोवरात बर्यापैकी संख्येत पाणघोड्यांची वस्ती आहे. याला लागूनच दोन लहान सरोवरे पण आहेत. माझे चार मित्र, त्यांचा सौ, मूले असे सगळे आम्ही सकाळीच ६ वाजता नैरोबीहून निघालो. नैरोबीहून पश्चिमेला जाणारा हायवे पकडून आमचा प्रवास सुरु झाला.
अत्यंत नयनरम्य असा हा रस्ता आहे. अगदी मध्यम असा उतार आजूबाजूला घनदाट जंगल आणि छोटी छोटी गावे. त्यात अधून मधून शेती. असा प्रवास करत, आम्ही एका खास व्ह्यू पॉइंट ला पोहोचलो.
आफ्रिकेत, खास करुन पूर्व भागाच्या भूगोलात, द ग्रेट रिफ्ट व्हॅली, हि खूप महत्वाची आहे. सिरियापासून केनयापर्यंत ती पसरलेली आहे. नैरोबी हा भाग बराच उंचावर आहे आणि एका ठिकाणी तीव्र उताराच्या समोर ही विस्तिर्ण व्हॅली पसरलेली आहे. या ठिकाणावरुन या व्हॅलीच्या काही भागाचे मस्त दुष्य दिसते. (खरे तर जेवढे दिसते त्यातला अगदी थोडा भाग या फोटोत दिसतोय. हवेत असणार्या धुक्यामूळे सर्वच भाग फोटोत येऊ शकत नाही हे एक कारण आणि दुसरे म्हणजे या व्हॅलीचा प्रचंड विस्तार.) या भागात एक कच्चा रस्ता, त्यापूढे काही घरे दिसताहेत त्यापुढे हि व्हॅली आहे. या व्हॅलीतला एक डोंगर अंधूक दिसतोय. पण पुढे हा आपल्याला दिसणारच आहे.
त्याच ठिकाणाहून पूर्व दिशेला दिसणारा हा भाग.
जरा आणखी पुढे गेल्यावर या डोंगराची रुपरेषा आणखी स्पष्ट होत जाते. हा एक निद्रिस्त ज्वालामुखी आहे. आजूबाजूच्या सपाट प्रदेशात हा चांगलाच उठून दिसतो. नीट निरखल्यास याच्या शिखराच्या अलिकडच्या बाजूस असलेले विवर (त्याच्या कडा ) दिसू शकतात.
या वळणानंतर उतार थोडासा तीव्र होतो आणि आपण नैवाशा गावात शिरतो. या गावातच त्या सरोवराचे एक टोक आहे. इथून आपण सरोवराच्या काठाने पण काही अंतर राखून प्रवास करतो.
इथे बरेच रिसॉर्ट्स आहेत आणि तिथे राहण्याची उत्तम सोय आहे.
अशाच एका रिसॉर्टमधे आम्ही शिरलो. दारातच एका प्रचंड अकाशियाने आमचे स्वागत केले.
या परीसरात सर्वत्र हिच झाडे आढळतात. आपल्या जंगलाच्या ज्या कल्पना असतात त्यापेक्षा इथली जंगले वेगळी असतात. हि तर सव्हाना प्रकारची गवताळ जंगले आहेत. इथे अकाशिया आणि गवत यांच्यात कायम स्पर्धा असते. या स्पर्धेत, हत्ती, जिराफ, हरणे महत्वाची भुमिका बजावतात. (याबद्दल स्वतंत्रपणे लिहावे लागेल)
त्या रिसॉर्ट्मधे पक्ष्यांची रेलचेल होती. आणि ते बरेच धीटही होते. खालच्या फोटोतला सुंदर रंगीबेरंगी पक्षी, मला नैरोबीमधे नीट टिपता आला नव्हता. इथे मात्र ते मुद्दाम पुढे पुढे करत होते. या धटींगणाने तर मला अशी छाती फूगवून दाखवली.
हि उगाचच दिलेली पोझ
मग जरा प्रोफाईल..
तिथे आम्ही भाड्याने तंबू घेतले. आपल्याला हवे तिथे ते ठोकता येतात. हवेत खुपच गारवा असल्याने आम्ही जरा उनाची जागा पकडली.
तळ्याच्या काठापासून साधारण पन्नास पावलांवरच आम्ही होतो. त्या तळ्याच्या काठी उगवणारे हे खास गवत. गवत असले तरी एकेक दांडा सहज आठ दहा फूट उंच.
याचा दांडा त्रिकोणी असतो. त्याच्या अत्यंत पातळ कापा करून त्यावर वजन ठेवून पाणी काढले कि कागदासारखा पातळ ताव तयार होतो. याला नैसर्गिक रित्याच सुंदर सोनेरी रंग येतो. प्राचीन काळी असा कागद तयार करत असत. इजिप्तमधे अजूनही असा कागद तयार करतात. अशा कागदवर केलेली काही सुंदर पेंटीग्ज माझ्या संग्रही होती.
वरच्या फोटोत दिसतोय त गोलाकार सहज दिड फूट व्यासाचा होता.
खालच्या फोटोवरुन त्या माजलेल्य गवताची कल्पना येईल.
हा पक्षी आकाराने ३ फूट उंचीचा असतो. हा माणसाला अजिबात बिचकत नाही. भर ट्राफिकजॅम मधेही सहज फिरत असतात. दिसायला बेंगरुळ असला तरी याचे उडणे मात्र एखाद्या पतंगाप्रमाणे असते. तिथे हे साहेब मजेत फिरत होते.
त्या परिसराची साधारण कल्पना येण्यासाठी..
माझ्या ग्रूपमधल्या बायका अतिउत्साही होत्या. त्या ठिकाणी गेल्या गेल्या वाटल्या डाळीच्या भज्यांचा आणि गरमागरम चहाचा कार्यक्रम झाला. बाकी अनेक पदार्थ केले आम्ही तिथे, आणि त्याची जय्यत तयारी होती.
त्या तळ्याच्या परिसरात अनेक पक्षी दिसतात. त्यापैकी एक
हा दुसरा..
मग आमचा पनीर भूर्जीचा कार्यक्रम झाला.
आता उन चांगलेच चढू लागले होते. अगदी चटके बसावेत असे उन लागू लागले. सकाळच्या थंडीत उबदार वाटलेली जागा आता गैरसोयीची वाटू लागली होती. आम्ही मग तंबूपासून जरा लांब सावलीत पथार्या पसरल्या.
नैवाशा या शब्दाचा स्थानिक भाषेतला अर्थ, अशांत पाणी. शांत सरोवराच्या पाण्याला,हे नाव का दिले, याचा आम्हाला लवकरच अनुभव आला..
(बाकी पुढच्या भागात.)
छान लिहीलय दिनेशदा. प्रचि
छान लिहीलय दिनेशदा.
प्रचि आणि पनीर भूर्जी एकदम मस्त
छान वर्णन, दिनेशदा. ते
छान वर्णन, दिनेशदा. ते पहिल्या प्रचित दिसणारा देखावा थेट आपल्या कोकणातला वाटतोय. तसाच लाल मातीचा रस्ता, वस्ती, हिरवी शेतं....
पक्षीही सही आहेत. तुमचा बेतही आवडला.
आवडले, वर्णन व फोटो. गवत
आवडले, वर्णन व फोटो. गवत वेगळच आहे.
आवडलं वर्णन आणि प्रचि. ते गवत
आवडलं वर्णन आणि प्रचि.
ते गवत कसलं मस्त दिसतंय.( 'कागदाची सुंदर पेंटींग्ज' ह्या वाक्याच्या खालचं )
( त्या निद्रिस्त ज्वालामुखीबाबत मी जर लेकाला सांगितलं तर तो मागेच लागेल, चल जाऊया तिकडे म्हणून. ज्वालामुखी, डायनॅसोर असली विचित्र वेडं आहेत त्याला )
दिनेशदा, (कारण विचित्र होते.
दिनेशदा,
(कारण विचित्र होते. मी भारतीय दिसत नाही, हे कारण होते ते). भारतीय न दिसणार्या इतरांना तिथे प्रवेश नाही का ? गम्मतच आहे. माहिती म्हणुन विचारतो. काय कारणे आहेत या या अश्या नियम/प्रथांची ?
अप्रतिम ! [ दिनेशदा, तुमच्या
अप्रतिम ! [ दिनेशदा, तुमच्या सादरीकरणाला, रसिकतेला व विविधांगी व्यक्तिमत्वाला आणायची कुठून नवी विशेषणं !]
६७,०००चौ. कि.मी.चं सरोवर ! आपल्याकडे कां नाही एकही मोठं सरोवर ? आपल्याच पाण्याला कां असते अशी घाई, धावत जावून समुद्रात स्वतःला झोंकून द्यायची !!
खुपच छान लिहल आहे.... गवत तर
खुपच छान लिहल आहे....
गवत तर एकदम खास... गवत म्हणू की झाडच्...:स्मित:
पुढचा भाग लवकर येऊदेत... आणि सगळ्या फोटोंमध्ये तुमचा पण फोटो
सगळेच प्रचि आणि वर्णन सुरेख
सगळेच प्रचि आणि वर्णन सुरेख
ते पहिल्या प्रचित दिसणारा देखावा थेट आपल्या कोकणातला वाटतोय>>>अगदी, मी सुद्धा हेच लिहिणार होतो
रुणुझूणू, अवश्य या. इथे बरेच
रुणुझूणू, अवश्य या. इथे बरेच असे डोंगर आहेत. काहि विवरांत उतरताही येते. तिथल्या काही विवरांत
वैषिष्ठपूर्ण दगड सापडतात.
नितीन, इथे प्रत्येक भारतीयाला एक ओळखपत्र (एलियन्स (??) कार्ड) नेहमी जवळ बाळगावे लागते.
त्यावर माझा भारतीय असल्याचा उल्लेख आणि माझा चेहरा याचा ताळमेळ तिथल्या अधिका-याला
लागेना. त्याचे असे म्हणणे पडले कि भारतीय नसल्याने. मला प्रवेश फ़ी, यू एस डॉलर्स मधेच भरावी
लागेल. इतरांना ती स्थानिक चलनांत भरता येते. असे काहि होईल याची कल्पनाच नसल्याने माझ्याकडे
यू एस डॉलर्स नव्हते.
भाऊ,
हि सरोवरे या लोकांसाठी वरदानच आहेत. लोकांसाठी नव्हे तर प्राण्यांसाठीदेखील. इथल्या नद्या थेट
समुद्रापर्यंतच वाहतील याची शाश्वती नसते. त्या मधेच वाळवंटात लुप्त होऊ शकतात.
मी या लेकचेच पाणी पित असे. त्या काळात रवांडामधे दंगल झाली होती आणि त्या दंगलीतले मृतदेह या सरोवरातच टाकत होते, तरीही...
या सरोवरात मी बोटीने प्रवासही केला आहे. आपल्याकडे पूर्वी गावोगावी सरोवरे बांधायची रित होती.
अजूनही ठाण्यात अनेक आहेत पण ते किती टिकतील, याची शंका आहे. आपण ते साफ ठेवले असते,
तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्कीच सूटला असता.
आणि दोस्तानो, तिथे बघण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे बरेच होते. ते सगळे पुढच्या भागात लिहिन
आज रात्री.
खुपच छान लिहिले आहे दिनेशदा!
खुपच छान लिहिले आहे दिनेशदा! पुढचा भाग ऐकण्याची खूप उत्सुकता आहे.
छान. वाचते आहे.
छान. वाचते आहे.
दिनेशदा, मस्त वर्णन आणि
दिनेशदा, मस्त वर्णन आणि प्रचि!
वा, काय सुंदर फोटो आहेत. आणि
वा, काय सुंदर फोटो आहेत. आणि वर्णन तर काय, ते तुम्हीच करु जाणे..
व्वा! मस्त फ़ोटो आणि वर्णन
व्वा! मस्त फ़ोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणेच.
(कॅमेरा घेतला ना? ......आता आमची मज्जा. भरपूर फोटो बघायला मिळणार.)
मस्त लेख, आणि फोटो . विशेषत:
मस्त लेख, आणि फोटो . विशेषत: ...पक्षांचे, मोठे गवत, सरोवरातली पानवनस्पती,कमळे
या लेखात तुम्ही पक्षांची नावे लिहायला विसरलात का?
पनीर भुर्जी पण मस्त दिसते. भजी ज्या शेगडीवर तळलीत तशीच शेगडी मी भारतातुन ईथे आणली. कँपींगला त्याचा मस्त उपयोग होतो.
वॉव्..कित्येक दिवसांनी दिनेश
वॉव्..कित्येक दिवसांनी दिनेश दा च्या फोटोंची ,वर्णनासमेत मेजवानी मिळाली..
मस्त वाटलं... नेक्स्ट सुट्टी चे ठिकाण केनिया ला ठरवू का?????
'अशा कागदवर केलेली काही सुंदर पेंटीग्ज माझ्या संग्रही होती'.... होती????? आता कुठे गेलीत???