मंडळ आभारी आहे !
माझा यावेळचा भारतदौरा अविस्मरणीय ठरला. इतक्या गावांना जाउन, इतक्या जणांना भेटूनही, मला अजिबात थकवा जाणवला नाही. भारतात गेल्यागेल्या मला माझी पूण्याची भाची भेटायला आली, तिला भेटून मग मी माझ्या बहीणीकडे गेलो.
आणि दुपारच्या विमानाने बंगळुरूला पोहोचलो. तिथल्या रस्त्यावर भटकत असतानाच, मायबोलीकरांचे फ़ोन यायला सुरवात झाली. दुसर्या दिवशी सकाळी माझे छोटेसे काम आटपल्यावर मी अश्विनीमामीला फ़ोन केला. (तिला मामी म्हणण्याइतका मी काही लहान नाही. आणि सगळ्यांनी मामी म्हणण्याइतकी ती वयाने मोठी पण नाही ) ती नुकतीच बंगळुरूमधे पोहोचली होती. मग मी टॅक्सी करुन तिला भेटायला गेलो. टॅक्सीवाला रसिक होता, मला तिथल्या अनेक भागांची स्वत:हून ओळख करुन देत
होता. परत ये असे आवर्जून सांगत होता.
मग मी आणि अश्विनी, ठरल्याप्रमाणे तिथल्या लाल्बागेत म्हणजेच बोटॅनिकल गार्डन मधे गेलो. त्या बागेबद्दल मी बरेच ऐकले होते, पण माझा जाण्याचा दिवस चुकला. १५ ऑगष्टच्या निमित्ताने तिथे बहुतेक काहि समारंभ झाला होता. आम्ही गेलो त्यावेळी, त्याची सजावट उतरण्याचे काम चाललेले होते. ती बाग तशी खुपच विस्तीर्ण आहे, बहराचे दिवस नसूनसुद्धा, तिथे बरेच काहि बघण्यासारखे होते. पण आम्ही दोघानी विमानतळापर्यंतच्या प्रवासाचा धसका घेतल्याने, लवकर निघणे भाग होते. तिथे कुठे भेळ खा, कुठे काकडी खा, असे करत वेळ मारत होतो.
माझ्यासारख्या फूलवेड्याला, तिथे अख्खा दिवसही पुरला नसता. आणि या सगळ्या तंगडतोडीत आमच्या अखंड गप्पा मात्र सुरु होत्या. (तिथले काहि फ़ोटो)
हि आहे एका शोभेच्या केळफूलात खाऊ शोधणारी खारुताई
एक देखणा निळा फूलोरा
कुठेही कृष्णकमळ बघितले, कि मला त्याचा फोटो घेतल्याशिवाय रहावत नाही
एक वेगळा झिनियाचा प्रकार
विमानतळावर तसे लवकरच पोहोचलो. तिथेच मग समोसा आणि कॉफ़ी घेऊन, चेक इन केले. (मी अश्विनीला आणखी काही घेणार का, असे प्रामाणिकपणे विचारले, पण तिला माझ्या सदहेतूबद्दल शंका आली, बहुतेक.)
बोर्डींग अनाउन्समेंट होईपर्यंत आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या. माझे विमान होते एअर इंडीयाचे. (बर्याच वर्षांनी हे धाडस करत होतो.) मुंबईला नेहमीप्रमाणेच एअर ट्राफ़िक जाम असल्याने, हे विमान घिरट्या घालत घालत, शेवटी एकदाचे मुंबईला उतरले.
घरी येऊन, जेऊन मी लगेच, दादरला आलो. मला तिथून श्रीरामपूरला जाणारी, शिरडी फ़ास्ट पॅसेंजर पकडायची होती. या गाडीची मजाच आहे. मुंबईहून निघताना, ती एक जोडगाडी म्हणून निघते. (विजापूर एक्स्प्रेस बरोबर) आणि मग आकुर्डीला वेगळी होते. मी जी ताणून दिली, ती भल्या पहाटे, पुण्याला चहा प्यायला उठलो.
या गाडीचा स्लीपर डब्बा दोन्हीकडून बंद असल्याने, गाडीत काहि विकायला येत नव्हते. मग मी दारातच उभा राहून नगरच्या हिरवाईचा अनुभव घेत होतो. गाडी तिच्या ठरलेल्या वेळेवर श्रीरामपूरला पोहोचली.
स्टेशनवर नलीनी आणि तिचा कूकू उर्फ़ शांडिल्य आलेच होता. हा कूकू माझा जिगरी दोस्त आहे. स्टेशनपासून तिथून निघेपर्यंत त्याच्याशी मी अखंड खेळत होतो.
हा आहे कूकू
नगरला कुणाकडेही गेलो, कि पुरणपोळी, भजी असा साग्रसंगीत बेत असतो, आणि नलीनीकडे आधी अनेकवेळा पुरणपोळी खाल्ल्याने, यावेळी मात्र मला फ़क्त भाजीभाकरीच हवी असा हट्ट केला होता.तेवढ्यातल्या तेवढ्यात मी कूकूबरोबर एक फ़ेरी मारलीच. केवळ दोन तीन तास तिच्याकडे थांबून, मी नगरला आलो. नगरहून फ़ास्ट एशियाड पकडून पूण्याला निघालो. त्याबरोबर पुणेकरांचे फ़ोन यायला सुरवात झाली. सगळ्यात आधी माझा ताबा घ्यायचा सगळ्यांचा प्लान होता, पण बाजी मारली ती माझ्या नायजेरियाच्या मित्राने, विनायकने. माझी एशियाड शिवाजीनगरला शिरल्याबरोबर तो मला भेटला. मला रात्रीच तिथून निघायचे असल्याने, मी कोंडूस्करचे बुकींग स्वारगेटहून करुन टाकले. विनायक बरोबर थोड्या गप्पा मारल्या, आणि त्याचा निरोप घेतला.
नळ स्टॉपवरच्या समुद्र हॉटेलमधे आमचे भेटायचे ठरले होते. मी तसा नेहमीप्रमाणे वेळेच्या आधीच पोहोचल्याने,बाकिच्यांची वाट बघत बसलो. मायबोलीकर सचिन दिक्षीत, त्याची वाग्दत्त वधू वृषाली, गिरीराज, त्याची बायको शीतल आणि लेक उर्जा, दक्षिणा, सई, सईचा नवरा योगेश, सईचा छोटा नील, आरती, जीएस, मोनाक्षी, कूल असे सगळे जमलो, आणि आरडाओरडा करत आमच्या गप्पा सुरु झाल्या. बर्याच वर्षांनी सगळे एकत्र भेटत होतो.
हा आहे आमचा कंपू (यात सगळेच नाही मावले ! )
वृषाली अर्थातच आमचा बकरा होती. पण तिनेही आम्हा सगळ्यांचे हल्ले मस्त परतावून लावले.
अगदी दहा, साडेदहा पर्यंत आमच्या गप्पा चालल्या होत्या. परत कधी भेटायचे, असे प्रश्न विचारतच, आम्ही एकमेकांचे निरोप घेतले. गिर्या, शीतल आणि उर्जा मला सोडायला स्वारगेट्पर्यंत आले. तिथून मी कोल्हापूरला निघालो.
रात्री बारानंतर बस सुटली तरी पहाटे चारच्या आधीच कोल्हापूरला पोहोचली. कोल्हापूर एस टी स्टॅंडचा परिसर रात्रभर जागाच असतो. गाड्यांची वर्दळही असते. मला तिथून माझ्या आजोळी जायचे होते, पहिली बस होती सकाळी सहा वाजता. तोपर्यंत तिथे टिपी केला आणि मग, मलकापूरला आलो. हा रस्ता पन्हाळा आणि ज्योतिबा यांच्या मधून जातो.
दुथडी भरलेली पंचगंगा (फोटो धावत्या एस्टी मधून काढलाय !)
तिथे जाऊन अंघोळ वगैरे आटपली तर रत्नागिरीला माझ्या मावसबहिणीकडे पूजा असल्याचे
कळले. मग लगेच कोल्हापूर गणपतीपूळे बस पकडून रत्नागिरीला निघालो. बसमधे नाणिजला उतरणारे बरेच भाविक असल्याने मला जागाच मिळाली नाही. पण मामाने माझा माणूस आहे असे बजावल्याने, मला चालकाच्या शेजारीच बसायला मिळाले. आणि अंबा घाटातला थरार मी मस्त अनुभवला.
(हे फोटोपण धावत्या एस्टीमधूनच काढलेत.)
रत्नागिरीला मावशीकडे गेलो, आणि मग लगेच मावसबहिणीकडे गेलो, तिथे देवरुखची मावशी पण भेटली. या दोन्ही मावश्यांचा मी लाडका. आईने काय केले असतील, एवढे लाड या दोघींनी केले आहेत माझे. अजूनही करतात. पूजेचे पुरणपोळीचे जेवण करुन, संध्याकाळी परत मलकापूरला.
शाळेत असताना सगळ्या मे महिन्याच्या सुट्ट्या मी मलकापूरला काढलेल्या आहेत. त्या गावाचे मला वेगळेच आकर्षण आहे. छोट्या मामेभावांना घेऊन मी तिथल्या बाजारपेठेत, आडरस्त्याला भटकलो. एका शेतात, मोर बघत बराच वेळ काढला. अंधार पडल्यावर घरी आलो तर मामीने सांज्याच्या पोळ्यांचा बेत केला होता. माझे आजोळ म्हणजे गोकुळ आहे. आजी आजोबा गेल्यानंतर मामा मामीने, आमच्या कौतूकात कसलीच कसर ठेवली नाही. रात्री उशीरापर्यंत गप्पा मारून दमून झोपलो.
पहाटे साडेतीन वाजल्यापासूनच माझे आजोळ जागे होते. मी पण लवकरच उठलो. सकाळची गाडी पकडून कोल्हापूरला आलो. तिथे मायबोलीकर कुलुच्या मामाकडे, त्यानी मागवलेल्या बिया ठेवल्या. आणि माझ्या आवडत्या, महावीर उद्यानात गेलो. (हे उद्यान, अंबाबाईचे देउळ, रंकाळा, लकी बाजार, होता तोपर्यंत शेतकरी बाजार, नवा आणि जूना राजवाडा, ही सगळी माझी आवडती ठिकाणे.) या उद्यानाकडे जाणार्या रस्त्यावर पूर्वी एक मस्त वेगळ्या प्रकारच्या,गडद गुलाबी रंगाच्या कॅशियाचे झाड होते (दिप्ती इमारतीचा बाहेर, कुमठेकर फ़र्निचरच्या समोर) बहरले म्हणजे या झाडावर नजर ठरत नसे. पण आता मात्र त्या झाडाची कत्तल झालेली आहे. तशी त्याला नवी पालवी फ़ुटलेली
आहे, पण पुर्वीचा डोलारा तयार व्हायला बरीच वर्षे जातील. तोपर्यंत त्याचा जीव तगेल का, ते सांगता येत नाही.
महावीर उद्यान मात्र अजूनही श्रीमंत आहे. सीतेचा अशोक, कैलाशपति, टॅबेबुया, तामण, करमळ, बॉटलब्रश, कमळ, अशी अनेक फ़ुले दिसतात तिथे.
तिथल्या "पुरुषांसाठी" इमारतीवरची हि वेल.
तिथलेच एक मस्त रंगाचे कमळ
आपला राज्यवृक्ष तामण
तिथून परत स्टेशनसमोरच्या राजपुरुषमधे जेवायला आलो. पुर्वी तिथे छान जेवण मिळायचे, यावेळी मात्र दर्जा घसरल्यासारखा वाटला. स्टेशनसमोरच एका दुकानात फ़ायबरग्लासच्या मस्त मुर्ती मिळतात. तिथे गणपतिच्या काहि खास मुर्ती घेतल्या.
कोल्हापूरहून माझ्या मामाचा एक मित्र मला सावंतवाडीला सोडणार होता, त्याच्या बरोबर निघालो. मी त्याच्याकडे फ़ोंडा घाटातून जायचा आग्रह धरला. (आता बहुतेक गाड्या वैभववाडी, गगनबावडा करुळ मार्गे जातात, पण माझ्या लहानपणी कोल्हापूरहून मालवणला जाताना, याच घाटातून प्रवास होत असे.)
राधानगरीच्या स्टॅंडजवळ हिरड्याची दोन झाडे मी अगदी लहानपणापासून बघतोय. ती अजूनही तशीच फ़ळावतात ते बघून खुप छान वाटले.
राधानगरी धरणापासून, दाजीपूरपर्यंतच्या रस्त्यात सहसा कुणीही गाडी थांबवत नाही. सध्या तिथे काहि वाड्या दिसल्या, पण पुर्वी या रस्त्यावर गाडी थांबवत नसत. अनेकदा गवे आडवे येत. या जलाशयाच्या बाजूबाजूने रस्ता पुढे जातो, त्यावेळी आपल्याला उंचीचा अंदाजच येत नाही. पण जिथे कोल्हापुर जिल्ह्याची हद्द संपते, तिथून प्रचंड खोल दरी दिसते. लहानपणी मी तिथे बघायचेहि टाळायचो. यावेळी तिथे दाट धुके होते.
तिथून फ़ोंडाघाटाची उतरण सुरु होते. अत्यंत थरारक असा हा उतार आहे.
साधनाने मला अंबोलीचे आमंत्रण दिले होते. तसा अंबोलीला अनेकवेळा गेलोय, पण श्रावणात कधी जमले नव्हते जायला. अंबोली घाटात दरड कोसळ्याने, सावंतवाडीशी संपर्क तूटलेला होता. पण दोनच दिवसांपूर्वी, छोटी वहाने जाण्याइतपत रस्ता मोकळा केलाय, असे कोल्हापूरला कळले होते. तो नसता झाला तर मला आजर्याहून जावे लागले असते, पण आजर्याला मी यापुर्वी एस्टीने वा गाडीने गेलो होतो. तिथे कधी थांबलो नव्हतो. त्या भागाची तशी काही माहितीही नव्हती. म्हणून मी सावंतवाडीचा पर्याय निवडला.
तिथून एक रिक्षावाला सहज तयार झाला. भल्या सकाळी तो प्रवास निखळ आनंददायी होता. रिक्षावाल्याने सांगितल्याप्रमाणे ७२ वळणे पार करत तिथे पोहोचलो. वाटेत बरेच धबधबे दिसतात.
साधनाने अगदी नकाशा वगैरे पाठवल्याने, घर सहजच सापडले. तिथे ती पंकज उभयता आणि सुनील
भेटले. तेवढ्या गडबडीत साधनाने बटाटेवडे केले. मग आम्ही धबधब्यावर गेलो. नेहमीच्या मानाने गर्दी
फ़ारच कमी होती. माझ्या हातातले एक कणीस माकडाने जवळजवळ हिसकावूनच घेतले. (त्याआधी
सनसेट पॉइंटवरच्या देवळाजवळ, मी आणि पंकज घसरुन पडल्याने, प्रत्येक पाऊल जपूनच टाकत
होतो.) मी मात्र तिथे भिजणे टाळले.
तिथे एक नवपरिणीत जोडपे आले होते. त्यातली नवरी शालू वगैरे नेसूनच धबधब्यात गेली. तिथेच
आम्हाला दोन मोठी फ़ुलपाखरे दिसली. (पुढे प्रत्येक ठिकाणी ती दिसत राहिली.) महादेवगड पॉइंटवर
पण डोकावलो.
परत घरी येऊन थोडेफ़ार खाऊन आम्ही कावळेसाद पॉइंटवर गेलो. तिथे जायला रस्ता नव्हता, तिथे
संरक्षक कठडे नव्हते, त्यावेळेपासून मी तिथे जातोय. आता बर्याच पुढे रस्त्याने जाता येते.
तिथे मेंढीगवत म्हणून एक अनोखा प्रकार साधनाने दाखवला. आता तिथे कठडा झाल्याने सुरक्षित
वाटते. तिथे धुक्याचा अनोखा खेळ अनुभवला. आता होता, गेला कुठे, असा खेळ, प्रत्येक धबधबा
खेळत होता. वारा नसल्याने, उलटा उडणारा धबधबा मात्र अनुभवता आला नाही. तिथे बराच वेळ
आम्ही काढला. मग हिरण्यकेशीच्या उगमाकडे गेलो.
या ठिकाणी जायचा रस्ता चांगला चढउताराचा आहे. या रस्त्याने मी अनेकवेळा पायी गेलो आहे,
पण यावेळी मात्र गाडीने गेलो. मधेच मला एक मोठे फ़ूलपाखरु दिसले. मी पंकजला गाडी थांबवायला
लावली. त्या फ़ूलपाखराने, आम्हाला बराच वेळ मनसोक्त फ़ोटो काढू दिले. प्रत्यक्ष उगमाकडे
जाणारा रस्ता, आता बराच नेटका आहे. उगमाजवळच्या कुंडातही पुर्वी डुंबलो आहे, पण आता
गाडीची वेळ होत आल्याने, आमची घाई घाई होत होती. साधनाच्या काकांकडे थोडावेळ टेकलो.
त्यांचे गणपतिच्या मुर्ती करण्याचे काम जोरात चालू होते. इतक्या जवळून मुर्ती घडवताना
पहिल्यांदाचा बघत होतो.
अंबोलीचे काही फोटो, प्रतिसादात टाकतोय.
मग स्टॅंडवर आल्यावर कळले कि गाडीला थोडा उशीर आहे. मग तिथेच जेवायला गेलो.
काळ्या वाटाण्याची उसळ, सोलकढी, खोबरे घातलेले वरण, भेंडीची भाजी असा खास
अंबोली मेनू होता. अपेक्षा नसताना एसटी वेळेवर आली. (कंडक्टर साहेबांनी आम्हाला
खास गप्पा मारण्यासाठी वेळ दिला.) उत्तूर, आजरा, निपाणि कागल मार्गे कोल्हापूरला
आलो. आजर्याचे जंगल अजून तसेच आहे, हे बघून खुप छान वाटले.
कोल्हापूरला आलो, तर गाडी सुटायला जरा वेळ होता. मग लकी बाजारमधे गेलो.
तिथे गेलो कि, काहि खास प्रकारचा तांदूळ मी नेहमीच घेतो. मग घरी नेण्यासाठी
कंदी पेढे घेतले. आणि एक महत्वाचे काम म्हणजे सोळंकी कडचे स्पेशल कॉकटेल
आईसक्रीम खाल्ले. ( हे मी जेवणाला पर्याय म्हणुन खाल्ले !)
रात्री बारा वाजता निघालो ते भल्या पहाटे मुंबईला आलो. योगेश चे अंबोलीला येणे
काहि कारणांसाठी रद्द झाले होते, त्यामूळे त्याला भेटायचे राहिलेच होते. माझा राणीच्या
बागेत जायचा प्लान होता. तिथली काहि दुर्मिळ झाडे बघितल्याशिवाय मला चैन पडत
नाही. लोकांचा झाडांना होणारा त्रास वाचावा, म्हणुन तिथल्या अनेक झाडांवरच्या पाट्या
आता काढून टाकल्या आहेत. पण मला असलेली माहिती, कुणातरी जबाबदार माणसाला
द्यावी म्हणून मी योगेशला तिथे बोलावले होते.
तिथल्या कलाबाशच्या दुर्मिळ झाडावर आता गदा आलीय, पण गोरखचिंच, गायत्री,
विषवल्ली, मणिमोहोर, कनकचंपा, नागचाफ़ा, सुवर्णपत्र, नोनी, कॅशिया, उर्वशी अशा
अनेक झाडांची त्याला ओळख करुन दिली. आता दुरदेशी असलो, तर त्याच्या प्रचिमधून
त्या फ़ूलांचे दर्शन होत राहील.
मग आम्ही चौपाटीवरच्या न्य़ू यॉर्करमधे खास फ़लाफ़ल आणि छोले भटुरा खायला गेलो,
मग चौपाटीवरची प्रसिद्ध कुल्फ़ी खाल्ली. आणि मग चर्चगेट ते व्हीटी करत घरी.
आता भारतातला शेवटचा दिवस हातात होता. लॅमिंग्टन रोडवर काही वस्तू घ्यायच्या
होत्या, त्या घेण्यासाठी गेलो. आता तिथपर्यंत गेलोच होतो, तर मेरवानजीचे मावा केक
सोडीन का ? (हा केक ४० पैश्याला मिळत होता तेव्हापासून खातोय. आता तो ७
रुपयाला मिळतो, आणि आकारपण बराच छोटा झालाय.)
यावेळेची ट्रिप, माझ्या थॉमस कूक मधल्या मैत्रिणीने सगळे बुकिंग करुन ठेवल्याने,
अगदी मस्त पार पडली. माझ्या बॅटर्या चार्ज करण्याचे काम, नेहमीच मायबोलीकर
करत आलेत. ते यापुढेही करणार आहेतच.
मुद्दाम लिहायची गरज अजिबात नाही, तरीपण लिहितोच.
मंडळ आभारी आहे.
बापरे केव्हढी ती भटकंती!!
बापरे केव्हढी ती भटकंती!! धमाल आली असेल पण..
राजपुरूषचे जेवण ६-७ वर्षांपूर्वी मला फार आवडले होते.. तेथील मूर्तीदेखील फार सुंदर आहेत!!
हे अंबोलीचे काही फोटो.
हे अंबोलीचे काही फोटो.
केवढी भटकंती केवढुशा
केवढी भटकंती केवढुशा वेळात.
अंबोली घाटात कॉलेजमध्ये असताना केलेल्या कलेक्शन ट्रीप्स आठवल्या. अंबोली घाटाचे फोटो मस्त आहेत.
असं वाचलं की मनात नेहेमी प्रश्ण असतो, असा प्रवास करताना विशेषतः एस टी स्टँडवगैरेतून जाताना रेस्ट रुमचा प्रॉब्लेम येत नसेल का म्हणून. असो.
हे अंबोलीतले आणखी काही फोटो
हे अंबोलीतले आणखी काही फोटो
हा आहे राणीच्या बागेतला,
हा आहे राणीच्या बागेतला, मणिमोहोर, आणखी काही दिवसांनी अशा फूलोर्याने झाड भरुन जाईल. आणि झाडाखाली यांचा सडा पडेल.
राणीच्या बागेतल्याच या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गायत्रीच्या झाडांना ज्यावेळी बहर येईल, त्यावेळी झाडावर गर्द निळी आणि आकाशी रंगांची फूले असतील, आणि झाडाखाली पांढर्या पाकळ्यांचा गालिचा असेल.
आणि हा आहे मेरवानजीचा मावा केक !
कमी वेळात केवढी भटकंती, सहीच.
कमी वेळात केवढी भटकंती, सहीच. मस्त फोटोज!!
मस्तच दिनेशदा! केवढे भटकलात!
मस्तच दिनेशदा! केवढे भटकलात! फोटो आणि वृत्तांत मस्त जमुन आलेय. वाचताना जाणवतं तुमची ही भारतेवारी किती वेगात झाली ते!
आणि हो, कुकु गोड आहे हं एकदम!
आणि हो, कुकु गोड आहे हं एकदम!
दिनेश दा.. सुरेख फोटो..रंजक
दिनेश दा.. सुरेख फोटो..रंजक वर्णन, वर्णनावरून तुमची भटकंती भलतीच सुपर फास्ट स्पीड ने झालेली दिसली.. पण थोड्या वेळातही भरपूर भटकायला मिळणे ,हे टाईम मॅनेजमेंट चे छान उदाहरण आहे
व्वॉव. केवढी भटकंती !! मजा
व्वॉव. केवढी भटकंती !! मजा आली असेल ना
कोल्हापुर ते सावंतवाडी हा प्रवास फोंडा घाटातुन पावसाळ्यात केलाय काहीवेळा. अप्रतिम असतो घाट.
अंबोलीपण पावसात मस्तच. हिरण्यकेशीचा उगम पण पाहिलाय तिथे अगदी गुढ गंभिर वाटल होतं.
फोटो मस्त आलेत
आता मी फोंडा आणि आंबोलीला
आता मी फोंडा आणि आंबोलीला जायचे म्हणतोय... मस्त असेल ना एकदम तिकडे आत्ता..
दिनेश मस्त वर्णन आणि फोटोज !
दिनेश मस्त वर्णन आणि फोटोज !
जबराट राजपुरुष ची क्वालिटी
जबराट
राजपुरुष ची क्वालिटी गेलीच का
ते शेजारी गणेश आर्ट्स
समुद्र... आंबोली ...
आज कामात लक्ष न लागायला वेगळं कारण मिळालं
बरोबर! आपले लोक्स भेटले असे, की थकवा कसला. जाणवतोय?
उलट अॅटीट्युड पॉझिटीव्ह होते महिनाभर तरी
कुकुशेठ भारी!
आता मी पण व्रुत्तांताचा झब्बू
आता मी पण व्रुत्तांताचा झब्बू देते. दिनेशने सामोसा करिपफ व कॉफी खायला घातले.विमानतळातील सीसीडीमध्ये. पण मी त्याला खूपच दादा भेळ दादा शॉपिन्ग वगैरे करून पिड्ले. खूप गप्पा मारल्या. बेंगलुरास येताना उतरल्यावर जुना फोटोग्राफर कलीग भेट्ला त्याच्याबरोबर पण गप्पा मारल्या व त्याने मला टॅक्सीत बसवून दिले. त्याला कोरमांगला म्हणजे दुसृया दिशेला जायचे होते. ही अजून एक गंमत. एअरपोर्ट ते चामराजपेट अडीच तास टॅक्सीत हे माझ्या शक्तीच्या बाहेरचे आहे. मी इथे भुर्रकन कुठेही जायला सोकावलेली बेगम आहे. बेंगलोर ट्रापिक मुंबैपेक्षाही वरस्ट आहे( हो इथे असेच म्हणतात. व पर्स ला परस. ) मी काही फोटोवगैरे काढले नाहीत. विमानातून दिसणार्या ढगांचे विशेषतः नाहीत.
दिनेशला कराचीची बिस्किटे दिली. एकूण मला खूप मजा आली. मुख्य म्हणजे हातात फक्त एक हाना मोंटाना परस घेऊन हिंडायची संधी नाहीतर जन्माच्या कर्माची जड ब्याग असतेच कायम. बागेत हिंडून खूप झाडे पाहिली तिथे गुलाबाच्या फुलांचा मंड्प बनविला होता. सुन्दर होता पण ते कामगार सर्व सजावट
पाडायच्या मूड मध्ये होते. सच इज लाइफ.
दिनेश मस्तंच झाली की भारतवारी
दिनेश मस्तंच झाली की भारतवारी तुमची... सॉलिड वृ आणि फोटो तर नेहमीप्रमाणेच अतुलनिय..
वा दिनेशदा, माहेरपण जोरदार
वा दिनेशदा, माहेरपण जोरदार झालेले दिसते. नव्या दमाने, तृप्त पोटाने आणि भरल्या हृदयाने परत रूटिन चालु....
पायाला भिंगरी बांधून फिरणे म्हणजे काय ते समजले. पाणबुडी, बलून राईड असे किरकोळ अपवाद वगळता, सर्व प्रकारच्या वाहनांतून फिरलेले दिसता. झोप तर तुम्ही बहुधा चाकांवरच काढलेली दिसते. तुमच्या उत्साहाला आणि एनर्जीला सलाम!!!
फोटो, वर्णन अप्रतिम!!!! (कुकू चा फोटो पूर्ण दिसत नाहिये.) कॄष्णकमळ माझेहि अत्यंत आवडते फूल आहे. घरी वेलच लावलाय मी त्याचा.....
दिनेशदा ह्या एवढ्या प्रवासात
दिनेशदा ह्या एवढ्या प्रवासात पुर्ण एक दिवस एकाच ठिकाणी कुठे राहिलात का हो??
बादवे वृ आणि फोटो दोन्ही छानच.
सॉरी, आत्ता मला कुकू चा पूर्ण
सॉरी, आत्ता मला कुकू चा पूर्ण फोटो दिसतोय .... किती छान आहे कुकू....
बाप रे..........भरपूर भटकंती
बाप रे..........भरपूर भटकंती आणि भेटी गाठी झालेल्या दिसताहेत.........ग्रेट !!
दिनेशदा मस्त
दिनेशदा मस्त भटकंती.
कृष्णकमळाचे फुल बघुनच सुगंध मनात दरवळला. तुम्ही ज्याला तामण म्हणता त्याला आम्ही खोबर्याचे फुल म्हणतो. खवलेल्या खोबर्याप्रमाणे पाकळ्या असतात त्यामुळे असेल कदाचीत असे नाव. त्यात पांढरा कलरही येतो.
व्वाव!!!!!!!!!!!!!!! मस्तच
व्वाव!!!!!!!!!!!!!!! मस्तच भटकंती सोबत गट्ग पण.
फोटो तर छानच. तो फुलपाखराचा जाम आवडला. कूकू पण गोडू आहे
दिनेशजी मस्त व्रूत्तांत आणी
दिनेशजी मस्त व्रूत्तांत आणी फोटो सुद्धा
त्या दिवशी मस्तच मजा आली
दिनेशदा, खरंतर आम्ही तुमचे
दिनेशदा, खरंतर आम्ही तुमचे आभार मानायला पाहिजे एव्हढ्या बिझी शेड्युलमधुनही आम्हाला वेळ दिलात. राणीच्या बागेतील इतक्या दुर्मिळ वृक्षांची ओळख करून दिल्याबद्दल तुमचे खुप खुप आभार.
न्युयॉर्करमधले फ़लाफ़ल एकदम आवडेश. परत यासाठी नक्कीच जाणार
आता दुरदेशी असलो, तर त्याच्या प्रचिमधून त्या फ़ूलांचे दर्शन होत राहील.>>>>>नक्कीच, मी पूर्ण प्रयत्न करणार आणि तुम्ही दिलेला हा वारसा पुढे नेणार.
पुन्हा एकदा मनापासुन धन्यवाद दा, माझा विकएण्ड सत्कारणी लावल्याबद्दल.
वा.. काय भिंगरीसारखे गरागरा
वा.. काय भिंगरीसारखे गरागरा फिरलात... अतुलनिय उत्साह आहे बाबा तुम्हाला फिरायचा... एका आठवड्यात वर्षाचा कोटा पुर्ण केलात जणु....
तुमची बस सुटल्यावर आम्ही नांगरतास धबधबा पाहायला गेलो. काकाचे शेत पाहुन आलो.. पण नंतर खुप पाऊस सुरू झाला. दुस-या दिवशीही जाम पाऊस होता.. म्हणुन गोकाकला गेलो.. तिथे पाऊसही नव्हता आणि धबधब्याला पाणीही नव्हते... मग आलो परत मुंबईला गुपचुप.
राणीबागेला तुमच्याबरोबर भेट द्यायची खुप इच्छा आहे. पुढच्यावेळी जमवुया. माहिमच्या नेचर पार्कलाही तुमच्याबरोबर जायचे आहे. मी जुलैला जाऊन आले तिथे, एक फेरीही मारली. पण झाडांची ओळख नाही झाली. तिथे माहितगारच पाहिजे.
अरे वा ! सॉलिड भटकंती केलेली
अरे वा ! सॉलिड भटकंती केलेली दिसतेय
बापरे, कित्ती फिरलात तुम्ही
बापरे, कित्ती फिरलात तुम्ही इतक्या कमी वेळात..
सगळे फोटो मस्तच. तुमच्याबरोबर आम्हालाही सगळीकडे फिरवुन आणलतं.
लॅमिग्टन रोडला जाउन कॅरेमल कस्टर्ड नाही खाल्लं??
दा दमलो की हो... मॅरेथॉन
दा दमलो की हो... मॅरेथॉन वृत्तांत
तो खारुताईचा फोटू आवडला...
तो खारुताईचा फोटू आवडला... भारी आहे एकदम..
खूपच सुंदर प्रचि आणि सगळा
खूपच सुंदर प्रचि आणि सगळा वृत्तांत! फ्रेश वाटलं वाचून!
मस्त.
मस्त.
Pages