श्रावणातल्या एका सोमवारची दुपार… शाळेत शेवटच्या तासाला गौरीचं लक्षच नव्हतं. श्रावणी सोमवारी लवकर घरी जाऊन सर्वांना सूर्यास्तापूर्वी जेवण उरकता यावं म्हणून शाळा लवकर सुटायच्या. श्रावणातल्या सौम्य उन्हात आणि ऊनपावसाच्या खेळानं प्रसन्न झालेल्या हवेत किलबिलाट करत मुली घराकडे जायला निघत. पोटात भूक चाळवलेली असे. शेवटची घंटा कधी होते आणि आपण कधी एकदा 'पानात' जेवायला घरी पोचतो- असं गौरीला झालं होतं. त्यातच ओल्या मातीचा सुगंध नाकात शिरल्यावर बाहेर कवितेतल्या 'क्षणांत येते...' सारखं होऊन ऊनबिन पडलं असणार आणि आभाळात इन्द्रधनुष्यही दिसत असेल या कल्पनेनं तिला बाहेर पळायची घाई झाली. आईपण ऑफिसमधून आलीच असेल, पदर खोचून पटापट स्वयंपाक करत असेल आणि घरात भाजीचा कसा मस्त वास सुटला असणार याची तिला खात्रीच होती. हिरव्यागार पानावर आई छान वरण-भाताची मूद, त्यावर तूप वाढेल...अगदी पानाच्या मधल्या शिरेतून ओघळत जाईपर्यंत. अळूची भाजी, तिच्या आवडीचा गोड पदार्थ आणि पानात अगदी उठून दिसणारी दही-मिरची घातलेली पांढरीशुभ्र मुळ्याची कोशिंबीर! बाबा आग्रह करतात म्हणून नाक दाबून थोडीतरी खावी लागायची..
..बाबांची आठवण येताच मात्र तिनं पटकन खाली पुस्तकाकडे मान वळवली आणि बाईंच्या बोलण्याकडे लक्ष देत अभ्यासात मन गुंतवलं. मग बाईंचं शिकवणं काही वेळ तिच्या कानावर पडत राहिलं आणि पुस्तकातली अक्षरं डोळ्यापुढून सरकत राहिली..
****
बाईंनी धडा संपवून गॄहपाठ लिहून दिला. मग पुस्तक मिटवून आजचा अभ्यास संपल्याचं सांगितलं. तोच सगळ्यांची निघण्याच्या तयारीची धांदल आणि हलक्या आवाजात बडबड सुरु झाली…
"गौरी, ए गौरी.. शुक शुक.."
मधली एक रांग सोडून पलिकडच्या रांगेतल्या बाकावर बसणार्या मधू आणि शुभानं पुस्तकं दप्तरात कोंबत गौरीला हाक मारली. गौरी मान वळवून उत्तर देणार एवढयात वर्गातल्या वाढणार्या आवाजाला बाईंनी टेबलावर दोन वेळा पट्टी वाजवून 'अजून शाळा सुटलेली नाही' याची जाणीव करुन दिली. पण शेवटची घंटा लगेचच झाली, मग सुटका झाल्यागत आणि बाई वर्गातून गेल्या की नाही याकडेही लक्ष न देता मुलींनी मासळीबाजार भरवला. बाईंनीच हे नाव दिलं होतं! एवढ्या गोंगाटात गौरीनं खुणेनंच 'मी येते आहे, बाहेर थांबते' असं सांगून बाकांच्या दोन रांगांतून वाट काढत दरवाजा गाठला आणि व्हरांड्याच्या एका टोकाला मोठ्या आरश्याजवळच्या जागेत ती येऊन थांबली.
जाणार्या मुलींचे घोळके थोडावेळ तिथे रेंगाळून आरश्यात डोकावत आणि मग पुढे जात. त्यामुळं चुकामूक व्हायची शक्यता कमी. तरी बराच वेळ या दोघींचा पत्ताच नव्हता. गौरीला वाटलं, बसल्या असतील आवराआवर करत. ज्या त्या तासाचं काम झालं की वह्या-पुस्तकं आवरुन ठेवावी ते नाही..शेवटी सगळी कोंबाकोंबी! तिला जरा रागच आला, पण मधू आणि शुभा तिच्या चांगल्या मैत्रिणी. तिघींची घरंही एकाच वाटेवर होती. त्यामुळं मघाशी आज थेट घरी जावं वाटत असलं तरी त्यांचा ठरलेला बेत आठवल्यावर तिला मघाच्या हिरव्या पानावरच्या जेवणाचा क्षणभर विसर पडला.-----
श्रावण महिन्याच्या शेवटी शेवटी शाळेतून घरी जाताना थोडी वाकडी वाट करुन त्या कुंभार गल्लीतून जाणार्या वाटेने जायच्या. गल्लीत दोन्ही ओळीत कुंभारकाम करणार्यांची घरं होती. सगळ्या कुटुंबांच्या हातात कला होती. घरांना मोठ्या दगडी चौकटीचे दरवाजे आणि आत पाऊल ठेवलं की एक मोठा फरशीचा चौक. त्यात मातीकामाचे सामान आणि साधने ठेवलेली असायची. मडकी, माठासह आदल्या सणांचे थोडेसे राहिलेले पोळ्याचे बैल, पंचमीचे नागोबा आणि जन्माष्टमीचे कृष्ण मांडून ठेवलेले दिसायचे.
गणेश चतुर्थी जवळ आली की इथल्या सगळ्या घरांत एकदम कामाची धांदल आणि उत्साह दिसायचा. शाडूच्या मातीचे ढीग, आकार घेणार्या गणेशमूर्ती.. बाप्पाच्या मूर्ती घडतानाच्या प्रत्येक पायरीचे दर्शन व्हायचे. गौरी आणि तिच्या मैत्रिणींना हे पहायला खूप आवडायचं त्यामुळे त्यांचा हा दरवर्षीचा नेम होता. गणपती आल्यानंतरही गल्लीच्या मंडळाच्या गणपतीचा मांडव उघडला की नाही ते पहायला रोज त्या तिथून जायच्या. घरच्या गणपतीची कामे संपली की ही मंडळी सार्वजनिक गणपतीच्या कामाला लागायची. प्रत्येक वर्षी अगदी मोठी, सुबक आणि वेगवेगळ्या रुपातली मूर्ती असायची.
गौरीच्या घरचा गणपतीही तिचे आई-बाबा इथल्याच श्यामराव आजोबांच्या घरुन आणायचे. अगदी गौरीच्या आजोबांपासूनची प्रथा. श्यामराव आजोबा आणि त्यांचा मुलगा कधी मूर्तीची किंमत घेत नसत, फक्त नारळ, पान-सुपारी. मग गौरीचे बाबा मानधन म्हणून बळंच त्यांना काही घ्यायला लावत. श्यामराव आजोबांनी गौरीला कधी दारावरुन जाताना पाहिलं तर ते तिला हाक मारुन तिच्या घरी जाण्यासाठी तयार होत असलेला गणपतीबाप्पा दाखवत.. प्रत्येक वर्षी मूर्ती वेगवेगळी असायची आणि ती कशी आहे ते गौरी आधी कुण्णाला सांगायची नाही. अगदी आईबाबांनासुद्धा.
****
मधू आणि शुभा लगबगीनं चालत येताना तिला दिसल्या. त्यांच्याबरोबर 'अ' मधली मंजूपण होती. तिलाही यायचं होतं आज गणपती पहायला. एरवी 'अ' मधली म्हणून शाळेत थोडा भाव खायची, सुट्टीच्या दिवशी खेळायला यायची. अलिकडे बरेचदा गौरीला घरीपण खेळायला बोलायची. चौघीजणी मिळून रस्त्याला लागल्या. बाहेर खरोखरच सरी येऊन गेल्यामुळं छान हवा होती आणि पुसटसं इन्द्रधनुष्यही होतं. चालताना चौघींच्या अखंड गप्पा चालू होत्या.
"आता सुरु झाली असेल ना त्यांची गणपतीची तयारी?" मंजूनं शंका बोलून दाखवली. "मागल्या वर्षी एकदा आपण गेलो तेव्हा नव्हतीच की सुरु!"
"असेल बाई, मला नाही आठवत. आपण गेलो असू पंचमीच्या आधी, मग तेव्हा कुठले गणपती. आपल्यालाच घाई असते!" शुभा म्हणाली.
बोलता बोलता गाडी प्रत्येकीच्या घरच्या तयारीवर घसरली. मधूला शुभाची ताई सजावटीसाठी करायची तश्या कागदी फुलांच्या माळा करायला शिकायच्या होत्या. शुभाच्या दादाला मंजूच्या बाबांनी मागच्या वर्षी केलेल्या थर्माकोलच्या मखरीचे डिझाईन हवे होते. मंजूच्या आईला कधीपासून गौरीच्या आईकडून उकडीचे मोदक शिकायचे होते. ते मंजूला फार आवडायचे पण मंजूच्या घरच्या बाप्पासाठी कणकेचे तळलेले मोदक करत म्हणून मंजू केव्हापासून आईच्या मागे भुणभुण लावली होती.
"या वर्षी आईला नक्की पाठव माझ्या घरी. मी आईला सांगून ठेवते. तू दर्शनाला येशील तेव्हा तुला मिळतीलच." गौरी मंजूला म्हणाली.
मंजू थोडी गोंधळली पण म्हणाली, "बरं, मी सांगीन. पण आई मोदक करणार आहे का यावर्षी?"
"म्हणजे काय? आम्ही दरवर्षीच करतो!"
"अगं, पण तुला माहीत नाही का? आता तुमच्याकडे गणपती नसणार. कालच मी आई-बाबांना बोलताना ऐकलं की आता तुझे बाबा नाहीत तर तुमच्याकडे गणपती नसणार."
गौरी क्षणभर मंजूच्या बोलण्याचा अर्थच कळला नाही. कळला तेव्हा असं काही असतं आणि असू शकेल यावर तिचा विश्वासच बसेना, ती एकदम नि:शब्द झाली. तिचा चेहरा एकदम उतरला. मंजूलाही वाटलं आपण गौरीला तिच्या बाबांची आठवण करुन द्यायला नको होती. मधू आणि शुभा थोड्या नाराज झाल्या. गौरी त्यांची चांगली मैत्रीण असल्यानं या बाबतीत तिला त्या त्यांच्या परीनं जपायचा प्रयत्न करायच्या. मंजू असं बोलून गेल्यावर त्यांना तिचा जरा रागच आला.
"मला माहीत नव्हतं गं, पण तरी तू ये.." गौरीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेली आणि तो विचार तात्पुरता झटकून टाकून तिने संभाषण दुसरीकडे वळवलं. शुभा आणि मधूचा जीव भांड्यात पडला. तेवढ्यात कुंभार गल्ली जवळ आलीच.
गल्लीत वळल्यावर सगळ्या तिथल्या गोष्टी पहाण्यात गुंगून गेल्या. गौरीच्या मनात पुन्हा मंजूनं सांगितलेली गोष्ट घोळू लागली. तिचं मन काही तिथे रमेना. चालता चालता श्यामरावांचं घर जवळ आलं. तिनं नकळत आत डोकावून पाहिलं तेव्हा आजोबा चौकाच्या आतल्या पायर्यांवर बसलेले तिला दिसले. गौरीला पाहताच त्यांनी तिथूनच हात हलवला आणि ते हसले.
गल्लीच्या टोकाशी आल्यावर तिघींचा निरोप घेऊन मंजू आपल्या घराच्या दिशेने निघून गेली. शुभा आणि मधू गौरीबरोबर थोडं पुढे चालून मग आपल्या घरांकडे जायला निघाल्या...
"गौरी, तसं काही नसेल गं. दरवर्षीसारखा येणारच बाप्पा." जाता जाता समजुतीच्या सुरात शुभा म्हणाली. मग मधू म्हणाली, "मंजूने काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. मी माझ्या आईबाबांना असं काही बोलताना ऐकलं नाही..."
गौरी आपल्या मनातला गोंधळ, शंका, निराशा लपवत कसंनुसं हसली आणि घराकडे वळली.
आई बँकेतून येऊन स्वयंपाकाला लागली होती. गौरी शांतपणे घरात येऊन आपल्या खोलीत गेली आणि पडलेल्या खांद्यावरुन ओघळणारं दप्तर काढून टेबलावर ठेवलं. खोलीतली खुडबुड ऐकून आई स्वयंपाकघरातूनच बोलली,
"गौरी.. काय गं? आलीस वाटतं.."
उत्तर न आल्यानं आणि गौरीची नेहमीची बडबड बंद असल्यामुळं ती गौरीच्या खोलीकडे आली. "आज दमलीस का? भुकेनी आवाजसुद्धा फुटेना की काय? चल, हातपाय धुवून घे. मी जेवायला वाढते."
गौरी मान हलवून बाथरुमकडे पळाली. तिचा चेहरा पाहून आईच्या मनात मात्र कालवाकालव झाली. गेल्या सहा-आठ महिन्यात सगळं बरंचसं पूर्वपदावर आलं असलं तरी गौरीला अधूनमधून तिच्या बाबांची आठवण व्हायची आणि मग ती उदास दिसायची. गौरीची आई तिला जास्तच जपायचा प्रयत्न करत होती. तिचे बाबा गेल्यानंतर गौरीच तिचा खरा आधार झाली होती. तिच्या जबाबदारीच्या जाणीवेनंच दु:खात हताश होऊन न जाता विस्कटलेली घडी लवकर बसवण्याचं बळ मिळालं होतं. गौरीच्या बाबांच्या अकाली निधनाला वर्षंही पुरं झालं नव्हतं तरी दोघींचं रोजचं आयुष्य बर्यापैकी सुरळीत सुरु झालं होतं. उणीव लगेच भरुन काढता येत नसली तरी तिला काही कमी पडू नये याची गौरीची आई काळजी घेत होती. सुरुवातीचा हा काळ खूप कठीण होता. वर्षातला प्रत्येक क्षण आणि सण हा बाबांविना येणारा पहिलाच होता. हे सगळे क्षण त्यांच्यासोबत गतकाळच्या आठवणी गडद करत होते तरी दुसर्या बाजूला त्यांच्याविना सुरु असलेल्या नव्या आयुष्याची सवयही करुन देत होते.
मायलेकी जेवायला बसल्यावर आईनेच आज कशी पानंच कुठे मिळत नव्हती मग नीलाकाकीनं गौरीला तिच्याकडची दोन पानं कशी पाठवून दिली, बँकेतून परत येताना वाटेतल्या शंकराच्या देवळाबाहेर कशी भलीमोठी रांग पाहिली अश्या दिवसातल्या काही गोष्टी सांगून तिला बोलतं करायचा प्रयत्न केला.
गौरीही शाळेतल्या अभ्यासाबद्दल बोलली. नीलाकाकी, तिची आत्ये, मामे, चुलत भावंडं यांच्याबद्दल काहीबाही बोलत राहिली. तिला वाटत होतं आई गणपतीच्या तयारीबद्दल काही बोलेल, पण आई काहीच बोलली नाही. जेवण झाल्यावर बोलत बोलतच तिची आवराआवर सुरु होती. गौरी तिला मदत करायच्या निमित्तानं तिथंच घोटाळत राहिली..
"आम्ही ना आज कुंभार गल्लीतून आलो.. मंजूपण होती बरोबर."
"हो का? मग मघाशी बोलली नाहीस ते? काय काय पाहिलं? आजोबा दिसले का?
"नेहमीची तयारी..हो दिसले, काही म्हणले नाहीत. मंजू म्हणत होती की..."
"हं..?"
"अगं, काय म्हणत होती मंजू?" आईने पुन्हा विचारलं.
"काही नाही.." म्हणत गौरी खोलीत पळून गेली. तिच्या मनाची काही तयारी झाली नाही सांगायची. मग तिनं बसून गृहपाठ कसाबसा उरकून टाकला. खेळायला बाहेर न जाताच आज तिमाहीचा अभ्यास करत बसली. दर सोमवारी लवकर जेवण व्हायचं म्हणून गौरीची आई शाळेच्या डब्यासारख्या डब्यात गौरीचा आवडता खाऊ भरुन ठेवायची. तसा आजही तिने भरुन ठेवला होता.
घरात आता शांतता होती. बाहेरच्या खोलीतला मोठा दिवा मालवून आई टेबललँपच्या उजेडात मेजावर बसली होती. राहिलेली कामे, बिले भरणे, हिशेबाच्या नोंदी असं काहीतरी करत बसली असणार असं गौरीला वाटलं. तिने हळूच डब्यातल्या गोड रताळ्याच्या चकत्यांचे दोन घास खाल्ले आणि तोंड धुवून अंथरुणावर येऊन चांदोबा वाचत पडली..
मंजूने सांगितलेल्या गोष्टीनं मनात पुन्हा उचल खाल्ली.. "बाबा नाहीत म्हणून गणपतीबाप्पा नाही? उलट आता तर ते नाहीत म्हटल्यावर बाप्पानं यायलाच पाहीजे. आई तर म्हणत होती की तोच आपल्या पाठीशी आहे, तो आपली काळजी घेईल. बाबांना नेलं तर आपल्याला आधार देणारी खूप माणसं दिली आहेत...म्हणजे आई काही बाप्पावर रागावलेली नाही."
आई कशी गणपतीची बडदास्त ठेवते ते तिला आठवलं.. "मोठ्या टेबलावर रेशमी वस्त्र नाहीतर साड्या घालून त्यावर एक छोटी बैठक ठेवायची मूर्ती बसवायला...मग त्याभोवती सजावट, खाली बाजूने रांगोळी काढते मग आपल्याला रंग भरायला सांगते. तिने प्रसादासाठी केलेले उकडीचे मोदक तर सगळ्यांना आवडतात. दिसतातच कित्ती छान ते! आजूबाजूचे सगळे आरतीला येतात, सर्वांना भरपूर प्रसाद मिळतो. मंडळाच्या गणपतीसाठीही करुन देते. थोडा राजाच्या घरीही पाठवते. या राजाचं नाव अब्दुल गब्दुल असं काहीतरी आहे पण सगळे त्याला राजाच म्हणतात. त्याच्या घरी गणपती नसतो पण तो मंडळाच्या गणपतीचं काम करण्यात हुषार.. एकदा चुकून त्याचा धक्का लागून मूर्तीवर ओरखडा आला तर त्याची आई केवढी घाबरली होती! देवाचा कोप होईल म्हणून. मग आईनेच तिची समजूत काढली की असं चुकून झालं तर देव रागावत नसतो. तरी तिचं समाधान होईना, मग आईने तिला पाच नारळ वहायला सांगितलं आणि त्याच्या वड्या करुन दिल्या मंडळाचा प्रसाद म्हणून वाटायला. मग कुठं राजाच्या आईला बरं वाटलं...
गणपती हे तिचं आवडतं दैवत आहे असं आई नेहमी म्हणते. म्हणूनच तिनं आपलं नाव 'गौरी' ठेवलं. म्हणजे तिलाही वाटतच असणार की दरवर्षीप्रमाणं गणपती आणावा. पण आपण काही बोललो नाही ते बरंच झालं. गणपती खरंच येणार नसेल तर आईलाही वाईट वाटत असणार..
मघाशी मंजू काय बोलली ते गौरीनं आईला सांगितलं नाही याचं तिला बरंच वाटलं. आता काही विचारुन आईला अजून त्रास द्यायचा नाही असा निश्चय करुन गौरी झोपी गेली.
****
जन्माष्टमी झाली तसं सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण दिसू लागलं. गौरीची परीक्षा संपत आली. ती आणि शुभा, मधू पुन्हा कधी शाळेतून येताना गणपती पहायला गेल्या नाहीत. त्यांच्या छोटेखानी मंडळाच्या गणपती तयारी चालू असलेली मात्र तिला येताजाता दिसायची. ती राजा, पिंटूकडे चौकशीही करायची. मागच्या वर्षी आणलेलं मागे लावायचं रंगीत फिरतं चक्र त्यांना देऊन टाकावं की काय असंही तिला वाटलं.
एक दिवस गौरी शाळेतून आली तर घरी काका,नीलाकाकी चिंटूला घेऊन आले होते. आई चहापाणी करत त्यांच्याशी गप्पा मारत होती. गौरी काकीनं दिलेला खाऊ घेऊन चिंटूबरोबर खेळायला पळाली. थोड्या वेळाने ते जायला निघाले. काकी जाताना गौरीला म्हणाली की आईला मदत कर आणि ते येतीलच पुन्हा. ते गेल्यावर गौरीने स्वयंपाकघरात सामानाच्या पिशव्या पाहिल्या.
"हे काय आणलंस गं आई?" तिनं विचारलं.
"अगं आत्ता काका-काकी नव्हते का आले? त्यांनी आणून दिलं. मी एवढी कामात अडकले आहे आणि गणेश चतुर्थी जवळ आली..."
"मग..??" गौरीनं एकदम चमकून विचारलं आणि आई काय बोलते ते ऐकायला कानात जीव गोळा झाला.
"मग काय.. काका-काकी आपल्याकडे मदतीला येतातच नेहमी. त्यांनी आज थोडं लागणारं सामान आणून दिलं...आणि काय गं गौरी, तुझं लक्ष कुठं आहे? मला मदत करणार नाहीस का?"
गौरीचं मन एकदम हलकं झालं. पिसासारखं.. "हो sss मी करणार ना मदत! दूर्वा निवडणार, रांगोळीत रंग भरणार...मोदकपण करणार. मधू शुभाच्या ताईकडून फुलांच्या माळा करायला शिकणार आहे, मला पण शिकायच्यात. .आणि या वर्षी मी संगिताबरोबर नदीवर जाणार. त्या सगळ्या कश्या नदीवरुन वाजतगाजत गौर आणतात ते मला बघायचं आहे. मंजूला फार आवडतात गं आपल्याकडचे मोदक! तिच्या आईला तू आता शिकवूनच टाक. मी सांगते तिला तिच्या आईला आपल्याकडे पाठवून द्यायला. .." हे आणि असं अजून कायकाय बडबडत गौरी बाहेर पळालीसुद्धा.
आई समाधानानं हसली. गौरीला आयुष्यात काही कमी पडू द्यायचं नाही, काही फरक पडू द्यायचा नाही यासाठी आत्तापर्यंत तिने जे निर्णय घेतले होते त्याबाबत ती समाधानी होती. नातेवाईकांनी आणि हितचिंतकांनी तिच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबाच दिला. तो मिळाला नसता तरी तिची संघर्षाची तयारी होती पण पण त्याऐवजी तिला सहकार्यच मिळालं याबाबत ती स्वतःला नशीबवान समजायची.
****
गणेश चतुर्थीला गौरी सकाळी लवकर उठून तयार झाली. काकी तर केव्हाची येऊन आईच्या मदतीला लागली होती. गणपतीच्या टेबलाभोवती काढलेल्या रांगोळीत गौरीनं रंग भरले. काकांनी आदल्या दिवशीच स्वतः बनवलेले मखर आणून ठेवले होते. त्याच्याभोवती काकीच्या मदतीने शुभाच्या ताईने शिकवलेल्या माळा करुन भोवती लावल्या. बागेतून झाडाची लालभडक जास्वंदीची फुलं तोडून आणली. दुर्वा आणून निवडल्या, तीन टोकंवाल्या शोधताना पुरेवाट झाली. पण चिकाटीनं एकवीस दुर्वांच्या दोन तिनं जुड्या तयार करुन ठेवल्या. एक गणपतीला आणि दुसरी गणोबाला. आईने बाकी पूजेची तयारी केली होती. आईनं कापसाचं पांढर्याशुभ्र टपोर्या मोत्यांसारखं दिसणारं महावस्त्र बनवलं होतं आणि दोन मोत्यांना जोडणार्या जागेत हळदकुंकवाचं बोट लावलं होतं. स्वयंपाकघरात नेहमीप्रमाणं लुडबुड करुन तिनं स्वतःच्या चिमुकल्या हातानी दोन-तीन मोदक बनवलेच. आईने आवर्जून ते नैवेद्याच्या ताटात ठेवले. सगळी तयारी झाली तोवर काका आणि चिंटू आलेच. मग सगळे गणपती आणायला चालले.
तिथे आज एकच झुंबड होती. कोणाच्या हातातल्या तबकातून, गाडीतून, रिक्षातून "मोरया" च्या गजरात आपपल्या घरी निघालेले गणपतीबाप्पा...
गौरी आणि मंडळी श्यामरावांच्या घराजवळ पोचली. आजोबा चौकात उभे राहून एकेका मूर्तीला घरी धाडत होते. त्यांनी गौरीच्या कुटुंबियांचं हसून स्वागत केलं.
"ये गौरी, बरी आहेस ना बये? शाळेतनं घरला जाताना दिसलीच नाहीस पुन्हा.. हा बघ तुमच्या घरचा बाप्पा, आवडला का?" आजोबांनी सोप्यात बाजूला काढून ठेवलेली एक सुबक, सुंदर गणेशमूर्ती दाखवली. सोनेरी सिंहासनावर रेलून बसलेला गणपती. धम्मक पितांबर, भरजरी जांभळा शेला, हातात मोदक, डोक्यावर मुकुट आणि पायाशी छोटासा उंदीर. मूर्ती गौरीला खूपच आवडली. तिला एकदम प्रसन्न वाटलं.
गौरी म्हणाली, "आजोबा मी मोठी झाले की माझ्या घरीही गणपती येईल, तोही मी तुमच्याकडूनच नेणार!"
आजोबा हसले आणि म्हणाले, "होय गं पोरी, जरूर ने..." आणि गणोबा गौरीच्या हातात देत म्हणाले, "जपून ने हां.."
गौरीच्या आईने आजोबांच्या हातात नारळ, पान-सुपारी आणि दक्षिणा दिली आणि त्यांना वाकून नमस्कार केला. त्यावेळी आजोबा आणि आईचा चेहरा शांत आणि प्रसन्न दिसत होता. आजोबांनी मूर्ती उचलली आणि गौरीच्या आईच्या हातातल्या तबकात ठेवली..
"मोरया" आजोबा म्हणाले.
पाठोपाठ गौरी, चिंटू ओरडले "मोरया!!!"
आणि मग गौरीचा गणपती तिच्या घरी जायला निघाला..
****
जेलो... सुंदर, लहान मुलीच्या
जेलो...
सुंदर, लहान मुलीच्या मनातले विचार एकदम छान शब्दात पकडलेत....
जेलो सुंदर गोष्ट. शेवट वाईट
जेलो सुंदर गोष्ट.
शेवट वाईट होणार का काय या धास्तीने वाचली पण नंतर खुप आवडली.
छानच.
चांगली आहे. मोरया
चांगली आहे.
मोरया
सुरेख
सुरेख
सुंदर कथा वातावरणनिर्मिती पण
सुंदर कथा
वातावरणनिर्मिती पण मंगल आणि सुरेख झालीये... कथा वाचून अगदी प्रसन्न वाटलं.
...
...
छानच.
छानच.
छान लिहिली आहे, आवडली..
छान लिहिली आहे, आवडली..
सुंदर कथा. खरंच आवडली.
सुंदर कथा. खरंच आवडली.
छानच
छानच
...............
...............
खूप छान आणि सकारात्मक गोष्ट.
खूप छान आणि सकारात्मक गोष्ट. छान वाटले.
खुप खुप सुंदर, छान
खुप खुप सुंदर, छान
सुंदर कथा !!!!!!!!
सुंदर कथा !!!!!!!!
सुरेख!
सुरेख!
मस्त. शॉर्ट अॅन्ड स्वीट.
मस्त. शॉर्ट अॅन्ड स्वीट.
उगाच मेलोड्रॅमॅटिक केली नाहीये ते आवडलं.
मस्तच! आवडली.
मस्तच! आवडली.
सुरेख लिहिली आहे कथा. आवडली
सुरेख लिहिली आहे कथा. आवडली एक्दम.
गोष्टीत शाळकरी मुलीच्या आयुष्यातले लहान सहान तपशील फार चांगले भरले आहेत. उदा. चांदोबा , "अ" मधली मंजु.
सुंदर कथा! एका श्वासात वाचली
सुंदर कथा! एका श्वासात वाचली अक्षर्शः! शेवट भावला!
खूप सुंदर लिहिली आहेस.
खूप सुंदर लिहिली आहेस.
छान लिहिलं आहे
छान लिहिलं आहे
आवडली उगाच मेलोड्रॅमॅटिक
आवडली
उगाच मेलोड्रॅमॅटिक केली नाहीये ते आवडलं > अनुमोदन
खूप आवडली. मस्त लिहीलीय.
खूप आवडली. मस्त लिहीलीय.
सुरेख लिहिली आहेस कथा... जरा
सुरेख लिहिली आहेस कथा...
जरा जास्त फ्रिक्वेंटली लिही की !!!
मस्त गोष्ट. किती पॉझिटिव्ह!
मस्त गोष्ट. किती पॉझिटिव्ह! छान वाटलं वाचून
खूप सुंदर. सगळे प्रसंग अगदी
खूप सुंदर. सगळे प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहिले.
मस्त लिहिलयस ग ... आवडली.
मस्त लिहिलयस ग ... आवडली.
आवडली गोष्ट. >>एक गणपतीला
आवडली गोष्ट.
>>एक गणपतीला आणि दुसरी गणोबाला.
गणोबा कोण??
खूपच सुंदर लिहीली आहेस गं !
खूपच सुंदर लिहीली आहेस गं !
जेलो आणि लालु एकच का? छान..
जेलो आणि लालु एकच का?
छान.. आवडली हं जेलो.
Pages