उदंड देशाटन करावे ... लडाख ... भाग १६ (अंतिम) - सारांश ... अर्थात माझ्या मनातला ... !

Submitted by सेनापती... on 26 August, 2010 - 01:49

ही लेखमालिका आजच्या ह्या पोस्टने संपतोय. खरे सांगायचे तर ‘आता काही लिहायचे उरले नाही’ असे एकेठिकाणी वाटते आहे तर ‘हुश्श्श्.. झाले बाबा एकदाचे लिहून पूर्ण’ असेदेखील मनात आल्यावाचुन राहिलेले नाही. लडाखला बाईकवर जाउन येणे हे जितके परीक्षा पाहणारे होते तितकेच त्यावर लिखाण करणे सुद्धा परीक्षा पाहणारे होते. अर्थात माझे लिखाण वाचणे हे देखील तुमची परीक्षा पाहणारे होते बहुदा.. माझे इतके लांबलचक लिखाण खरच कित्ती वाचकांनी पूर्णपणे वाचले असेल काय माहीत. Wink

आम्ही लडाखला जायचे का ठरवले??? मी आणि अभी आम्ही दोघेसुद्धा बऱ्याच वर्षापासून लडाख प्लान नुसतेच आखत होतो म्हणुन?, एक साहसी मोहिम पार पाडावी म्हणुन?, आपल्याच देशाच्या एका अविभाज्य भागाचे निसर्गसौंदर्य बघायचे म्हणुन?, की सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे म्हणुन??? प्रत्येकाची उत्तरे विभिन्न असतील. माझ्या स्वतःसाठी ही मोहिम प्रामुख्याने सैनिकांचे जीवन अधिक जवळून पाहता यावे ह्यासाठी होती. अर्थात एक साहसी मोहिम करत आगळे- वेगळे निसर्गसौंदर्य बघायचे हा उद्देश होताच. पण प्रत्येकाचे ह्या मोहिमेचे उद्दिष्ट वेगवेगळेच होते, त्यात कुठेही सुसुत्रता नव्हती आणि म्हणुनच अखेरपर्यंत पूर्ण टीममध्ये आवश्यक असा ताळमेंळ जमुन आला नाही. ज्या गोष्टीवर आम्ही प्लानिंग करण्यापासून भर देत होतो ती गोष्ट अखेरपर्यंत आम्हाला साधता आली नाही हे या मोहिमेचे एक मोठे अपयश होते. अश्या मोहीमांमध्ये टीमचे एकच उदिष्ट आणि विचार असावे लागतात. तुमच्यापैकी बरेच जणांना असा प्रश्न पडला असेल की मी असे का म्हणतोय. इतक्या दुर्गम प्रदेशात इतक्या उंचीवर बाईक्स चालवून कुठलाही मोठा अपघात न होता आम्ही यशस्वीरित्या परत आलोय तरी ही मोहिम अपयशी ठरली???

माझ्या दृष्टीने अगदी अपयश म्हणता नाही आले तरी हे पूर्ण यश नक्कीच नव्हते. अनेक उणीवा आणि त्रुटी त्यात राहिल्या. हवी तशी एकत्र सुरवात करता आली नाही आणि शेवट तर निराशाजनक ठरला. दिल्लीमध्ये 'इंडियागेट'ला 'अमर जवान ज्योती' येथे नतमस्तक होउन मोहिमेचा शेवट करायचा असे माझे मत होते आणि अभीने त्याला मान्यता दिली होती. पण तसे होऊ शकले नाही. कारणे काहीही असोत. पण ते धैय गाठण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मी कधीच विसरु शकणार नाही. एखाद्या गोष्टीचा शेवट गोड झाला की ती गोष्ट कशी पुर्णच गोड लागते, तसे काही येथे घडले नाही.

आज सुद्धा लडाख असे उच्चारले किंवा मनात आले की आठवणी उचंबळून येतात. पार केलेला तो एक-एक पास, केलेली ती एक-एक चढ़ाई, गाठलेली सर्वोच्च उंची आणि तेथे घालवलेला एक-एक क्षण. क्षण जे होते आनंदाचे... क्षण जे होते अभिमानाचे... क्षण जे होते आत्मविश्वास वाढवणारे... कारगिल – द्रास येथे जाउन आपल्या जवानांना श्रद्धांजली देण्याचे क्षण, लेहमधील १५ ऑगस्ट अनुभवण्याचे क्षण, १८००० फुट उंचीपेक्षा उंच अश्या जगातील सर्वोच्च रस्त्यावरून बाईक चालवण्याचे क्षण आणि तेथे तिरंगा फड़कवण्याचे क्षण... शब्द अपुरे पडतील असे पेंगोंग आणि त्सो-मोरिरी येथील सौंदर्याचे क्षण, पांगच्या वाळवंटामधले आणि रोहतांगच्या चिखलातील राड्याचे क्षण. असे कितीतरी क्षण आज आठवणी बनून मनात साठवून ठेवल्या आहेत. म्हणूनच जेंव्हा लडाखमधल्या ढग फुटीची बातमी मला समजली तेंव्हा हे सर्वकाही डोळ्यासमोर उभे राहिले.

या लेख मालिकेतून १५ मेंबर्सच्या १३ दिवसाच्या एका थरारक मोहिमेचा पुन्हा एकदा शेवट होतोय. '१३ दिवसात २८१८ किलोमिटर्सचा' प्रवास करून अनेक अनुभव घेउन सफळ संपूर्ण झालेली ही भ्रमंती शेवटपर्यंत लक्ष्यात राहील यात काही शंका नाही. ह्या लिखाणातून मी काय साधले? बरेच काही. पुन्हा ते क्षण जगण्याचा आनंद आणि ते तुम्हा सर्वांसोबत वाटण्याचा आनंद सुद्धा. माझ्या लिखाणाच्या यथाशक्तिनुसार तो इकडे मांडायचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मला अपेक्षा आहे की हे लिखाण तुम्हाला नक्कीच आवडले असेल. काही काळाने पुन्हा येथेच भेटुयात अजून एक हटके आणि आठवणीन्नी भरलेली भ्रमणयात्रा घेउन...


.
.

२ वर्षापूर्वी आम्ही पार पडलेल्या लेह - लडाख ह्या आनंदमय सफारीचा हा व्हिडिओ वृतांत...

ह्या संपूर्ण मोहिमेचे शुटींग आणि पुढचे एडिटिंग वगैरे वगैरे आयबीन - लोकमतने केले होते.

एकूण रेकोर्डिंग ५ भागात...

भाग १

भाग २

भाग ३

भाग - ४

भाग - ५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भटक्या सगळे भाग वाचून झाले.. मस्त लिहिले आहेस.. आणि काही अनुभव तर फारच जबरी आहेत.. परत एकदा अशीच जबरी ट्रीप घडावी हिच सदीच्छा...

रोहन, मस्त मालिका.. अतिशय प्रेरणादायी. मी हा शेवटचा भाग आधी वाचलाय आणि आता सावकाश सगळे भाग एकेक करून वाचणार आहे. Happy

८व्या भागापर्यंत सगळं व्यवस्थित वाचलय.. पुढचे भाग वाचायचे राहिलेत.. आता वाचेन..
पण संपूर्ण लेख मालिका अप्रतिम झालिय यात वाद नाहीच... लेख वाचुन माझी लडाख ला जाण्याची इच्छा अधिकच प्रबळ झालीय Happy

छान! तुमची ही सफर आम्हा वाचकांच्या दृष्टीने तरी यशस्वीच झाली! मनातील सगळ्या गोष्टी, उद्दिष्टे अशी कधी सुफळ संपूर्ण होतात? पण त्या उद्दिष्टपूर्तीच्या मार्गात जे जे अनुभव येतात त्यांनी आपले आयुष्य विलक्षण समृध्द होते, नै का? मला खात्री आहे की लेह लडाख मोहिमेनेही असेच अनेक समृध्द अनुभव तुमच्या झोळीत घातले आहेत. आणि त्या अनुभवांनी श्रीमंत होऊन तुम्ही तुमचा अनुभव सर्वांसमोर मांडलात ह्यातच त्या मोहिमेचे यश सामावले आहे. पुढच्या सफरीसाठी शुभेच्छा! Happy

सर्व भाग वाचले, आणि आवडलेही... Happy
पुढच्या वेळी मलाही भटकायला आवडेल तुझ्यासोबत! नक्की बोलाव Happy

संपूर्ण लेख मालिका वाचली. लिखाण व छायाचित्रे खुप आवडली.

माझा भाऊ ढगफुटीच्या दिवशी लेह ला पोचणार होता.पण तो कारगिलच्या पुढे पुल वाहुन गेल्यामुळे जाऊ शकला नव्हता. २-३ दिवस त्याचा फोन येईपर्यन्त फार तणाव होता.

तुमचे बाकीचे लिखाणही आवडले.

पु.ले.शु.

वाहवा फारच सुरेख्..अतिशय ओघवते वर्णन आणि त्याला अप्रतिम फोटोंची साथ..
भटक्या, तुझ्या बरोबर आम्ही देखिल लडाखची सैर केली.
मी पहिल्या भागापासून ही लेखमाला वाचली पण प्रतिसाद आत्ता देतोय.
केवळ लाजवाब....

माझे इतके लांबलचक लिखाण खरच कित्ती वाचकांनी पूर्णपणे वाचले असेल काय माहीत. >>>
सर्व भाग वाचले. आवडलं तुमच लिखाण.

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद... तुमच्या प्रतिसादामुळे लिखाणाचा हुरूप वाढला आहे... Happy लवकरच अजून एक भटकंती मालिका घेऊन येतोय... Happy

तुमचा... पक्का भटक्या... Happy

अरे मस्तच लिहिलेय. आणि फोटो पण लै भारी. आता कुठली नवी मालिका येते आहे? वाट बघतो आहे.
बाइक ची पण माहिती लिही ना. आम्ही बाइक प्रेमी आहोत. Happy

मस्त लेखमालिका,
अजुन असे अनुभव वाचायला नक्की आवडतील, पुढच्या लेखमालिकेच्या प्रतिक्षेत Happy

मस्त लेखमालिका,
अजुन असे अनुभव वाचायला नक्की आवडतील, पुढच्या लेखमालिकेच्या प्रतिक्षेत

ज्या गोष्टीवर आम्ही प्लानिंग करण्यापासून भर देत होतो ती गोष्ट अखेरपर्यंत आम्हाला साधता आली नाही हे या मोहिमेचे एक मोठे अपयश होते.>>>>>

रोहन, हे अद्भूत प्रवासवर्णन वाचल्यावर वरील वाक्यावर विश्वास बसत नाही.

खडतर साहसांनी भरलेली सहल, उत्कृष्ट नियोजन, कुशल संघटन आणि व्यवस्थित कार्यान्वयन यांच्या आधारे सुखरूप पार पाडून, हजारो वाचकांच्या मनात अशा संस्मरणीय प्रवासाची अभिलाषा जागवणारी ही प्रवासवर्णनात्मक लेखमाला लिहिल्याखातर हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद.

हे सारेच, अनुभव, लेखन आणि प्रकाशचित्रे आवडली.

पुढच्या सर्व उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा!

कित्येकदा मनात असणारे उद्दिष्ट साध्य झालेले नसते, पण दरम्यानच्या वाटचालीतच अनेक ईप्सिते पार झालेली दिसून येतात. अशावेळी काय म्हणता येईल....

राह बनी खुद मंझील
पिछे रह गई मुष्किल

सगळीच लेखमालिका अप्रतिम !!!

काही काळाने पुन्हा येथेच भेटुयात अजून एक हटके आणि आठवणीन्नी भरलेली भ्रमणयात्रा घेउन...>>>>लवकर घेऊन ये, वाट बघतोय आम्ही Happy

बाईकवरुन लडाख प्रवास हे माझं स्वप्न आहे (बघु कधी खरं होतय... Sad )
बरेच महिने मायबोलीवर नव्हतो... आज तझी लेखमाला बघितली... रात्री जागुन वाचुन काढली. पूर्ण वाचल्यावर मीच इतका भारावलोय तर प्रत्यक्ष प्रवास संपल्यावर तुमची काय स्थिती झाली असेल!
... अप्रतिम प्रवास!
तुलाजरी उदिष्टे पुर्ण झाली नाहीत असं वाटत असलं तरी पुर्ण वर्णन वाचुन असं कुठेही वाटत नाही. १५ जणांनी एकत्र जाणं चेष्टा नाहीये... १३ दिवस तुम्ही एकत्र काढले हे कमी नाही.
तुमच्या बरोबरच्या मुलीचं मला विशेष कौतुक वाटतं.
... मी जेंव्हा केंव्हा लडाखला बाईकवर जाईन तेंव्हा तुझे लेख मार्गदर्शक ठरतील. तुमच्या प्रवासाची तयारी करताना जी माहिती तुम्ही परस्परांना दिली ती आम्हालाही देता येईल का? बाईकची काळजी, स्वतःची काळजी, राहण्याची व्यवस्था.... थोडक्यात, आमच्यासाठी मार्गदर्शन म्हणून अजून एक भाग लिहीच...

अथ पासुन इति पर्यंत नीट सगळ वाचलं Happy
छान लिहिलं आहेस सगळच.

<<तुमची ही सफर आम्हा वाचकांच्या दृष्टीने तरी यशस्वीच झाली! मनातील सगळ्या गोष्टी, उद्दिष्टे अशी कधी सुफळ संपूर्ण होतात? पण त्या उद्दिष्टपूर्तीच्या मार्गात जे जे अनुभव येतात त्यांनी आपले आयुष्य विलक्षण समृध्द होते, नै का? मला खात्री आहे की लेह लडाख मोहिमेनेही असेच अनेक समृध्द अनुभव तुमच्या झोळीत घातले आहेत. आणि त्या अनुभवांनी श्रीमंत होऊन तुम्ही तुमचा अनुभव सर्वांसमोर मांडलात ह्यातच त्या मोहिमेचे यश सामावले आहे. >>
अरुंधतीला अनुमोदन.

अशा ठीकाणी जायला भाग्य लागतं आणि अस बाईकवर वगरे जायला तर परम भाग्य आणी तेवढीच इच्छाशक्ती लागते जी माझ्यासारख्या बहुतांशांकडे नाहीए. तुम्ही एवढी मोठी सफर इतक्या छान पुर्ण केलीत यातच सगळं यश आहे.
तुझ्या ग्रुपच्या बाकिच्यांच सुध्दा अभिनंदन Happy

सुंदर लेखमालिका.. मला वेळ लागला वाचायला, पण वाचायचे आहे हे लक्षात होतेच..

सुंदर फोटो आलेत सगळेच.. आणि वर्णनही साग्रसंगीत..
मनातल्या सर्वच इच्छा कदाचित ह्या साहसी टूरवर पूर्ण झाल्या नसतील, पण अपघाताविना, आणि मोठ्या वादावादीविना तुम्ही ट्रिप पूर्ण केलीत आणि सुखरूप परत आलात हे यश काही कमी नाही! ब्राव्हो सगळ्यांनाच..

तुम्ही साहसी, पण सेफ मोहिमा करा, आणि त्यावर नक्की लिहा, आम्ही शुभेच्छांसहित वाचतोय! Happy

धन्यवाद मित्रा. ही मालिका लिहिल्याबद्दल.. सर्वच भाग आवडले... प्रचि पण मस्त आहेत. आता पुढची तयारी कुठली?

अप्रतिम लिखाण आहे ... लदाख ला जाऊन आल्या सारखे वाटले ... त्यात bike ची सफर म्हणजे मस्तच .... एक गोष्ट मात्र मनुद करावीशी वाटते ... ती म्हणजे ... मध्ये मध्ये खूपच technical details आहेत ... फोटो सुंदर आहेत ...

सर्व भाग वाचले आणि खुपच आवडले
.मलाही असे भटकायला आवड्ते !
ह्या प्रवासात मुलींमुळे / मुलींना काही त्रास होतो ? ( गैरसमज करुन घेवु नये)

विनोबा... नेमका कसला त्रास म्हणायचे आहे तुम्हाला?? आमच्याबरोबर असणाऱ्या मुलींना कुठलाही त्रास झाला नाही किंवा त्यांच्यामुळे देखील काही त्रास उद्भवला नाही.

सॅम .. मी त्यात तसा इतका अनुभवी नाही पण लडाख मोहिमेचा अनुभव घेऊन काही लिखाण करायचा प्रयत्न करतो.. Happy

बाकी सर्वांना धन्यवाद.. Happy लवकरच मी एक सह्याद्रीमधल्या ट्रेकची लेख मालिका सुरू करत आहे... Happy

पक्का भटक्या,
अतिशय मस्त प्रवासवर्णन केले आहेस की मी स्वतः तुमच्या टिम मधे असल्याचे वाटत होते. वाचनास सुरवात केली आणि त्यातच हरवून गेलो.
हे लेखन माझ्या कडून वाचायचे राहीले होते.:अरेरे:

सचिन... धन्यवाद...

मायबोलीकरांनो.. आमच्या मोहिमेचे चित्रण ५ भागात यु-ट्यूब वर टाकले आहे... ते बघावे... धन्यवाद..

Pages

Back to top