लेहच्या ११००० फुटावर ४-५ दिवसांच्या वास्तव्यात रात्री सुद्धा काही थंडी लागली नव्हती. काल रात्री मात्र सरचूला आलो तेंव्हा बऱ्यापैकी थंडी जाणवत होती. तरी सुद्धा १५००० फुटावर रात्री जाणवायला हवी इतकी काही जाणवली नाही. पहाटे सर्वजण उठले तेंव्हा मात्र बऱ्याच जणांना थंडी जाणवत होती. मला मात्र तसे काहीच वाटत नव्हते. का कोण जाणे... असो. सकाळी ६ वाजता नित्यनियमाने आवराआवरी केली आणि आमच्या नाश्त्याआधी बाईक्सना सुद्धा नाश्ता देणे आवश्यक आहे हे कळून आले. खास करून अमेय आणि कुलदीप यांच्या बाईक्स पेट्रोल पित होत्या. तेंव्हा आदित्य पेट्रोल आणायला ड्रायव्हरला घेउन परत १० किमी. मागे गेला. बराच वेळ होता म्हणुन आसपासचे फोटो काढत बसलो. रात्री इकडे आल्याने कैंपसाइट नेमकी कशी आहे ते सकाळी कळले.
रस्त्याच्या कडेला असलेल्या हिरव्यागार गालिच्यावर डोंगरांच्या पाय्थ्याला असणाऱ्या या साइटचे सौंदर्य काही वेगळेच होते. दुरवर बारालाच्छा-लाचे पर्वत दिसत होते. पहाटे-पहाटे त्या पर्वतांवर जमलेल्या ढगांमुळे मनात एक शंकेची पाल चुकचुकून गेली. काही वेळात त्याच दिशेला आम्हास कुच व्हायचे होते. आमची पेटपूजा आणि सर्वांच्या बाईक्सची पेट्रोलपूजा झाल्यावर आम्ही बारालाच्छा-लाच्या दिशेने निघालो. एव्हाना सर्वजण आटपून निघायला तयार झाले होते.
सरचूवरुन पुढे निघालो तेंव्हा ७:३० होउन गेले होते. ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे पुढे रोहतांग जवळ पाउस नक्की आपल्याला गाठणार तेंव्हा आत्ता जास्तीतजास्त अंतर कमीतकमी वेळात पार करायला हवे होते. बारालाच्छा-ला पार करताना १३२८९ फुट उंचीचा फार त्रास झाला नाही. तासाभरात तो पार करून 'झिंग-झिंग बार' या ठिकाणी आम्ही पोचलो. 'झिंग-झिंग बार' म्हणजे खादाडीचे ठिकाण. एक छोटेसे पण मस्तसे टुमदार टेंट होटेल आहे इकडे. तिकडे नाश्ता घेतला.
एक जोडपे हे होटेल चालवते. त्यांच्या मुलाने म्हणजे समीरने आम्हाला त्याची छोटी सायकल चालवून दाखवली. वेळ मस्त गेला तिकडे. पण उशीर सुद्धा झाला. ड्रायव्हरसाठी हे सर्व नेहमीचेच होते तेंव्हा तो बोंबा मारत होता पण आम्हाला मात्र हे सर्व नवीन आणि वेगळे होते ना. तिकडून निघायला जवळ-जवळ ९:३० होउन गेले. 'जिस्पा'च्या दिशेने पुढे निघालो तशी झटाझट उंची कमी होत होती. 'दारचा'ला पोचलो आणि पावसाचे आगमन झाले. अगदी भुरभूरत पडणारा पाउस. अंगाला न लगता भिजवणारा. जिस्पा मागे टाकत किलोंगच्या दिशेने निघालो तसे पाउस वाढतोय हे लक्ष्यात आले. वळणा-वळणाच्या त्या रस्त्याचा मनालीला गाडीमध्ये बसून त्रास व्हायला लागला होता तेंव्हा ती पुन्हा अभीच्या मागे बाईकवर बसली आणि शोभित गाडीमध्ये आला. पावसामुळे बायकर्स मागे पडले होते आणि आम्ही गाडीमधून वेगाने पुढे जात होतो. मध्ये एके ठिकाणी 'स्पिती व्ह्याली' कडे जाण्याचा रूट दिसला. ट्रेक्किंगसाठी हा एक पर्वणी असलेला भाग. किलोंगला पोचलो आणि बायकर्सची वाट बघत थांबलो ज़रा. एक चहा घेतला आणि ज़रा मोकळे सुद्धा झालो. पावसाने भलतीच गर्दी केली होती. मागुन एक-एक बायकर येताना दिसू लागले तसे आम्ही पुढे निघालो.
ह्या पुढचा संपूर्ण रस्ता म्हणजे स्वर्गाकडे जाणारा की काय असेच वाटत होते. डोंगरांची आणि झाडांची दाटी वाढली होती पण रस्त्याची रुंदी काही वाढत नव्हती... एका बाजूला पर्वतरांग आणि दुसऱ्या बाजूला दरी. आपल्या माळशेज - ताम्हीणी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये जसे हिरवेगार दृश्य दिसते तसे काहीसे दृश्य सगळीकडे दिसत होते. मधून-मधून एखादा धबधबा डोंगरातून डोके वर काढी. दुरवरच्या पर्वतांवर वृक्ष आता त्या कडयान्ना भीत नव्हते. कितीही उंच आणि सरळसोट कडा असला तरी त्याला न जुमानता ते सूचिपर्णी वृक्ष आकाशाला भिड़त होते. त्यांच्या पायथ्याला खाली दरीपर्यंत हिरवळीचे गालीचे पसरलेले होते. दरीमध्ये फुलांनी, छोट्या छोट्या घरान्नी आणि रस्त्यांनी नक्षीकाम केले होते.
आता आम्ही गोंधला, सिस्सू पार करत 'काकसर'कडे निघालो होतो. (बटालिकचे काकसर हे नव्हे. ते द्रास जवळ येते.) सिस्सू येता येता आम्ही घाटाच्या रस्त्याने पूर्ण खाली उतरत नदीकाठी आलो आणि ब्रिज पार करत दुसऱ्या बाजुला पुन्हा वर चढू लागलो. जेंव्हा बऱ्यापैकी उंचीवर गेलो तेंव्हा उजव्या हाताला एक भला मोठा धबधबा नजरेस पडला. फोटोमध्ये बघाल तर २ टप्प्यामध्ये पडणाऱ्या ह्या धबधबाचा १ टप्पा किमान ४००-५०० फुट होता. वरच्या ग्लेशिअर मधून निघून तो नदीसोबत पुढच्या प्रवासाला निघाला होता. ते दृश्य पाहण्यासाठी काही क्षण तिकडे थांबलोच. "चलो अभी. खाना भी खाना है आगे जाकर." ड्रायव्हरच्या वाक्याने भानावर आलो आणि पुढे निघालो. २ वाजत आले होते. पावसात भिजतभिजत सर्व 'काकसर'ला पोहोचलो आणि एक मस्त होटेल सापडले. तिकडचा हिमाचली टोपी आणि कोट घातलेला मालक 'चाचा' पण मस्त होता. गरमागरम रोटी आणि सोबत चण्याची भाजी. सोबत कसलीसी चटणी होती. नंतर डाळभात.
३ वाजता तिकडून पुढे निघालो. मनालीसाठी अजून ७० किमी अंतर जायचे होते आणि मध्ये उभा होता 'रोहतांग पास'. इकडे पडलेल्या धो-धो पावसाने आमच्यासाठी पुढे काय वाढून ठेवले आहे याची आम्हा कोणालाच कल्पना नवहती. ड्रायव्हरला होती नक्कीच पण तो काही आधी आम्हाला तसे बोलला नाही. इकडून १४ किमी. 'रोहतांग टॉप' आणि पुढे ८ किमी उतरून पलिकडे 'मोहरी' हा बेस. बस ड्रायव्हर इतकेच सांगत होता. सकाळपासून बाईकवर असलेले भिडू आता गाडीत बसले आणि गाडीमधले बाईकवर. काकसरवरुन निघालो तेंव्हा समोर रोहतांग टॉपला असणारे पावसाळी ढग बरेच काही सांगून जात होते. निघाल्यावर अवघ्या मिनिटाभरात आत्ता पर्यंत पक्का असलेला रस्ता कच्चा झाला आणि सुरू झाला एक 'चिखलराडा' जो पुढचे २ तास सुरू होता.
संपूर्ण १४ किमीच्या चढणीवर एके ठिकाणी सुद्धा रस्ता चांगला राहिलेला नव्हता. मोठ्या मोठ्या वाहनांनी होत्या-नव्हत्या रस्त्याचे कल्याण करून ठेवले होते. हे एक-एक मोठे-मोठे खड्डे. त्या खद्यांमधून चिखल निघून रस्त्यावर छोटे-छोटे डोंगर बनले होते. झिप-झाप-झुप अशी वेडीवाकडी बाईक चालवत चिखलाने आणि पाण्याने खड्डे चुकवत आम्ही टॉपकडे निघालो होतो. चारचाकी गाडयान्ना काय मागुन वेगाने येत होर्न मारायला. बालान्स तर बाइकवर आम्हाला करावा लागतो ना. तरी बराचवेळ आमची गाडी मागुन आम्हाला कव्हर फायर देत होती. हे.. हे.. जसजसे वरवर जाऊ लागलो तशी वळणे अधिक शार्प होऊ लागली. ह्यात प्रॉब्लम असा होता की जाणाऱ्या-येणाऱ्या गाडयान्नी रस्त्यावरचा सर्व चिखल एका कोपऱ्यात येउन जमा केला होता. त्यातून बाईक वर चढवणे आता अजून कठीण झाले होते. जवळून टर्न मारावा तर बाईक टायरला तितकी ग्रिप मीळणे शक्य नव्हते. शिवाय वरुन पाउस सुरूच होता की. पडायची भीती जास्त होती. तेंव्हा गरज पडली की पुन्हा मागच्याला उतरवून बाईक वर चढ़वायची असे प्रकार सुरू झाले. गेले २ दिवस वाळवंटामध्ये अनुभव घेउन आता तो चिखलात राबवत होतो आम्ही.
अखेर तासा-दीडतासाने सर्वजण कुठे टेकत, कुठे थांबत पावसात भिजत रोहतांगटॉपला पोचले. आणि मग सुरू झाला उतरणीचा प्रवास. हलक्या वजनाचे अभी-मनाली आधीपासून पुढेच होते. अमेय साळवीची बाईक ज़रा बसकी आणि मोठ्या हँडलची असल्याने तो बराच आरामात येत होता. मी, कुलदीप आणि आदित्यमध्ये होतो. सर्वांच्या मानाने बहुदा कुलदीपला जाड टायरच्या यामाहाचा ग्रिपसाठी बराच फायदा झाला इकडे. उतरणे अधिक कठीण जाणवत होते. कोपऱ्यावरचा चिखल वाढला होता आणि त्यातून बाईक्स सरकू लागल्या होत्या. आता कितीही उशीर होत असला तरी घाई करायची नाही हे स्पष्ट तत्व होते. एकेठिकाणी मागुन येणाऱ्या ट्रकला पुढे जाऊ देण्यासाठी मी अगदीच बाजुला गेलो. आता वाटल पडलोच. नशिबाने वाचलो. दुसऱ्या एके ठिकाणी तर पुढच्या गाडीच्या इतक्या जवळ आलो की आता थांबावे लागणार स्पष्ट होते. पण पाय टेकायचे कुठे? दोन्ही बाजुला फुट-अर्धाफुट चिखल. ट्रकच्या टायरने बनलेल्या रूटवरुन बाईक हाकत होतो आम्ही. अखेर एके ठिकाणी उजवा पाय टेकलाच. टेकल्या-टेकल्या लागला सरकायला. परत उचलला आणि टेकवला. पण तो कसला राहतोय. सरकतोच आहे तो आपला. मनात आले आता पडलोच आपण पक्के चिखलात. पण नाही. कसाबसा काही सेकंद उभा राहिलो आणि लगेच बाईक त्या गाडीच्या पुढे टाकली. आता मागुन येणाऱ्या एका सुद्धा गाडीला मी पुढे जाऊ देत नव्हतो. बरोबर ना... रिस्क कोन ले? बऱ्यापैकी खाली आल्यावर चिखल कमी झाला. पाउस सुद्धा बंद झाला होता. २ तास त्यांने पक्की परीक्षा पहिली होती रायडिंगची.
ज़रा खाली 'मोहरी' दिसत होते आणि एकदम दुरवर बिआस नदीकाठचे मनाली शहर सुद्धा. बिआस नदी रोहतांग मधुनच उगम पवते. मोहरीला पोचलो, चहा घेतला आणि पुन्हा एकदा मोकळे झालो. फार वेळ नव्हता थांबायला. अजून मनाली गाठायला २ तास होते.इकडून पुढचा रस्ता एकदम मस्त होता. मख्खन के माफिक स्मूथ. संध्याकाळ होत आली होती तेंव्हा समोरून येणारे ट्राफिक सुद्धा फार नव्हते. गुलाबा (९३९७ फुट) - केठी - पालचन अशी गावे मागे टाकत आम्ही मनालीला जवळ करत होतो. इतक्यात पुढे रस्त्यावर ट्राफिक दिसले. ही..... लांब रांग. बघतोय तर एका ट्रकचा विली झाला होता. फोटो बघा म्हणजे कळेल मी काय बोलतोय ते.
भन्नाटच प्रकार होता हा. लोखंडी सळ्यान्नी ओव्हरलोड केलेला ट्रक सरळ-सरळ उभा झाला होता. नशीब त्या ड्रायव्हरचे डावी-उजवीकडे नाही कलंडला. सर्व बायकर्स इकडे येउन पोचलो त्या आधीच गाडी इकडे पोचली होती. आम्ही येउन पोचलो तसे जमलेले सर्व देशी -विदेशी पर्यटक आमचे इतर टीम मेंबर्स असे सर्वजण टाळ्या वाजवायला लागले. त्या टाळ्या रोहतांगच्या यशस्वी रोहणासाठी होत्या. काहीवेळ खरेच मस्त वाटते आम्हाला. आता आम्ही त्या ट्राफिकमधून बाईक्स पुढपर्यंत काढल्या. ट्रकच्या बाजूने पुढे जायला वाट दिसली तिकडून बाइक्स एक-एक करून पुढे काढल्या. आमचे ५ मेंबर्स गाडीसकट मात्र मागे अडकले होते. पण म्हणुन आम्ही सुद्धा तिकडे थांबून न रहता पुढे जाउन बाकी व्यवस्था बघणे महत्वाचे होते. गरज पडलीच तर मनालीहून त्यांच्यासाठी दुसरी गाडी पाठवणे महत्वाचे होते. अंधार पड़ता-पड़ता भांग गाव पार करत मनालीमध्ये प्रवेश केला आणि नदीकाठचे होटेल बिआस गाठले. अडकलेल्या मेंबर्सचा अपडेट घ्यावा म्हणुन फोन केला तर ते सुद्धा तिकडून निघाले असे कळले. गाडी आली तेंव्हा ९ वाजले होते. सामन रूम्स मध्ये लावले आणि अंगावरचा चिखल राडा साफ़ करून 'चंद्रताल'ला जेवायला गेलो. ऑर्डर आधीच देऊन ठेवली होती... झोपायला ११ वाजले. बिछान्यावर पडलो तेंव्हा मला आजची बाईक राईड राहून राहून आठवत होती. अगदी आत्ता सुद्धा तितकीच लक्ष्यात आहे... रोहतांगचा चिखलराडा पार करून आता आम्ही उदया बिआसच्या सोबतीने 'चंदिगढ़ मार्गे दिल्ली'साठी निघणार होतो...
पुढील भाग : बिआसच्या सोबतीने ... !
मस्तच, पहिला फोटो आणि चौथा
मस्तच, पहिला फोटो आणि चौथा फोटो जास्त आवडले. बाकी प्रवासवर्णन सहीच आहे.
प्रवासवर्णन नेहमीप्रमाणेच
प्रवासवर्णन नेहमीप्रमाणेच मस्त! झिंग झिंग बार नाव वाचून लहानपणी पाहिलेला ''झँग्बो झिंम झिंम बार'' बालचित्रपट आठवला. (बादवे बार व झिंग ह्या शब्दांचा परस्पर संबंध असावा काय? ;-)) प्रचि १, २ ४, ६ मस्त!
पक्या..पाहिलस ओरिजनल साईज मधे
पक्या..पाहिलस ओरिजनल साईज मधे कसले भन्नाट दिसतायेत फोटो.. यारा तुम तो स्वर्ग कि सैर करके आये.. बाकी ट्रक ने चांगलीच पोझ घेतली आहे...
मस्त. मी मनालीला गेले होते
मस्त. मी मनालीला गेले होते तेव्हा बियास पार करुन पलिकडच्या हॉटेलात राहिले होते. मार्केटात जाताना नेहमी हॉटेल बियास दिसे. हॉटेल बियासमधे तेव्हा उतरलेल्या एका जोडप्यापैकी पुरुष, स्वतःच्या बायकोचा खडकावर बसून फोटो काढायच्या नादात नदीत पडून वाहून गेला होता
रंगासेठ.. अरुंधती... असेल
रंगासेठ..
अरुंधती... असेल बहुदा.. माहित नाही...
हो रे सूर्या... म्हणून आधीचे सर्व पोस्ट्समधले फोटो बदलले आहेत... बघ एकदा जाऊन...
अश्विनी... मी पहिल्यांदा राहिलो बियास मध्ये. जेंव्हा-जेंव्हा मी जातो तेंव्हा 'सोलांग'ला राहतो.. मनालीमध्ये फारतर २ दिवस ते सुद्धा मित्र आहे माझा 'ओल्ड मनाली'मध्ये त्याच्याकडे.. मार्केट प्लेस मला अजिबात आवडत नाही...
अप्रतिम फोटो. काश्मिर, मनाली
अप्रतिम फोटो.
काश्मिर, मनाली इथे सगळे नागमोडी रस्ते नी एका बाजूची खोल दरी हे सगळे स्वर्गाच्या जास्तीत जास्त जवळ नेणारेच असतात.
मस्त फोटो आणी प्रवासवर्णन
मस्त फोटो आणी प्रवासवर्णन
जबरदस्त!!
जबरदस्त!!
सह्हीच आहेत फोटो अन्
सह्हीच आहेत फोटो अन् वर्णन.
अरुंधती, मी पण हा सिनेमा पाहिलाय अन् हाच प्रश्न मलाही होता
फोटो जबरदस्तचं!!!! मोठे करून
फोटो जबरदस्तचं!!!! मोठे करून टाकल्याने अधिकच परिणामकारक......
ट्रक चा विली >>>>>
अप्रतिम फोटो प.भ. !! मजा आया
अप्रतिम फोटो प.भ. !! मजा आया दोस्त.
सर्वांना धन्यवाद... आधीच्या
सर्वांना धन्यवाद... आधीच्या सर्व भागामधले फोटो देखील मोठे करून टाकले आहेत... जमले तर ते भाग पुन्हा जाऊन नजरे खालून घाला...
आधीच्या सर्व भागामधले फोटो
आधीच्या सर्व भागामधले फोटो देखील मोठे करून टाकले आहेत... जमले तर ते भाग पुन्हा जाऊन नजरे खालून घाला... >>>>>> तसं असेल तर जमवायलाच हवं!
छान फोटो आणी वर्णन ही छान .
छान फोटो आणी वर्णन ही छान . सगळेच फोटो छान आहेत (सगळ्या भागातले)
मस्तच रे म्हणून आधीचे सर्व
मस्तच रे
म्हणून आधीचे सर्व पोस्ट्समधले फोटो बदलले आहेत>>>>त्यादिवशी कट्ट्यावर हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो
छान तो मोठ्ठा धबधबा काय
छान
तो मोठ्ठा धबधबा काय अप्रतिम सुंदर आहे. (सुंदर हा शब्द पुरेसा नाही, आणि माझ्याकडे दुसरा शब्दच नाहीए) एकाच वेळी शिखरे, त्या बर्फातुन विरळणारे पाणि आणि तेही अस उंचावरुन स्वतःला लोटुन देणारं !! वाह!
तो बघुन आपलं पृथ्विवरच अस्तित्व किती कवडिमोल आहे हेच जाणवलं.
सुंदर. पहिला फोटोपण अप्रतिम. ढगांची सावली मस्त आहे त्यात.
फोटोवर वॉटरमार्क टाकच.
हे सगळे वाचायचे राहिले होते.
हे सगळे वाचायचे राहिले होते. मस्त वर्णन आणि फोटो.
जबराट रे.. फोटुज तर
जबराट रे.. फोटुज तर वर्णनाइतकेच बेस्ट !