चुकलेला गोरख

Submitted by इंद्रधनुष्य on 2 August, 2010 - 01:42

एकीकडे १ ऑगस्टला मैत्रीदिनाच्या निमित्ताने ठाणे गटगचा बेत ठरत असताना आणि दुसरीकडे अगदी गुत्प पद्धतीने गोरखगडची मोहीम आखली जात होती... बोरीवली परगण्यातील एका यो'दगड'ने फितूरी करण्याचा चंगच बांधला होता... स्वतःला कामानिमित्त गटगला जाणे शक्य नसल्याने शक्य तितक्या लोकांना फितूर करून टांगारू बनविण्यात कट त्याने आखला होता...

त्याच झाल असं... Yo Rocksने त्याच्या आवडत्या ट्रेकमेट गृपचा 'गोरखगड'चा मेल मला फॉरवर्ड करून माझ्यातील गिर्यारोहकाला जागृत केलं होतं... 'गोरखगड' सिर्फ नामही काफी है! मुरबाड पासून १२ कि.मी.वर सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून डोके वर काढून उभा असलेला एक सुळका... देहरी हे पायथ्याचे गाव... देहरीला पोहचायचे तर ट्रेकमेट्सच्या गृपला कल्याणला सकाळी ६ला भेटायचे होते... तेथून महामंडळ्याच्या बसने मुरबाड आणि मुरबाडवरून मग जीपने देहरीला ९.३० पर्यंत पोहचायचे असा झोपमोड पिलान तयार होता... (जल्ला ट्रेकला जायच म्हणून काय रविवारी पहाटे उठून परळ ते कल्याण प्रवास करायचा) पण गोरख तर करायचाच होता... एक... एक से भले दो... ईतर धारकर्‍यांची चाचपणी सुरू झाली आणि त्यातच गिरीविहारने आपण गाडीने थेट देहरीला जाऊया असा पिलान ठरवला... म्हंटले अर्धी चढाई इथेच जिंकली Wink

ठरल्याप्रमाणे कांगारू गटला टांग देत मी आणि गिरीविहारने सकाळी सातच्या आसपास ठाणे सोडले... पाउस जेमतेम होता... हवेतील गारवा खड्ड्यांतील उत्साह बेगुणीत करीत होता... कल्याणल्या महापौर वर्षा मॅरेथॉनमुळे आमचा अर्धा तास वाया गेला... देहरीला पोहचण्यास उशिर होणार होता म्हणून ट्रेकमेट्सशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. Sad ठरल्या वेळे प्रमाणे ट्रेकमेटस् १० वाजता चढाईला सुरवात करणार होते. आम्ही बरोबर १०च्या ठोक्याला देहरीला हजर झालो पण त्या आधीच मित्रांनी चढाईला सुरवात केली होती. Sad म्हंटले काही हरकत नाही आपण गाठूच त्यांना... एक वडा, चहा पोटात ठकलून लगेच मार्गस्थ झालो...

मुख्य रस्त्यावरील एका ईसमाकडून पायवाटेची खात्री करून पुढे चालू लागलो... लगेचच एक ओहळ लागला आणि त्याला साष्टांग नमस्कार करून झाला... तेथून पुढे जाता पायवाटांच जाळ दिसू लागलं... अजून थोड पुढे गेल्यावर करवंदीची जाळी गालगुच्चे घेऊ लागली... मग मात्र मागे फिरण्यात धन्यता मानली... सुरवातीलाच रस्ता चुकलोय हे ध्यानी आलं म्हणून स्वतःवर खूष झालो... मागे परताना कपाळमोक्ष करणार ओहळ जपून पार केला... त्या ओहळाच्या डाव्या बाजूने एक वाट थेट गडाकडे जात होती... तेव्हढ्यात ट्रेकमेटचे उशिरा आलेले ५ शिलेदार भेटले... जिवात जिव आला... त्याच्या सोबत डाव्या बाजूचा रस्ता पकडून जंगलात मार्गक्रमण केलं... चांगला मळलेला रस्ता होता... आम्ही योग्य रस्त्यावर आहोत हे वाटेतील बुटमार्क्स बघून खात्री वाटत होती. 'एSSSSS ओSSSSS' ची साद देत पुढे जात होतो पण प्रतिसाद मिळत नव्हता...

बघता बघता ४ मोठे ओहळ पार केले तशी ती वाट मुख्य जंगलात शिरू लागली... पुढल्या काही मिनिटांत आम्ही चक्क मश्चिंद्रगडाच्या खाली... उजवीकडे गोरखगड, डावीकडे मश्चिंद्रगड आणि सभोवती हिरवे जंगल... एव्हाना आम्ही बरीच उंची गाठली होती त्यामुळे मोबाईला रेंज मिळत होती... पुढे गेलेल्यांना फोनाफोनीचे सत्र सुरू झाले पण त्यांच्या नेटवर्कची बोंबलली होती. गावातील दुकानाराचा मोबाईला लागला... चुकल्याचे सांगितले पण कुठे चुकलोय ते कसे सांगणार... तो पण बापडा कातळात दरवाजा दिसेल तो पार करून जा असे सांगत होता...

थोड उंचावर चढून मी कातळाचा अंदाज घेण्याचा प्रयन्त केला... उजविकडे गोरखच्या खाली झाडीतून एक कातळ भिंत दिसत होती, पण त्यासाठी एक ओढा ओलांडणे गरजेचे होते. पावसाची संततधार सुरू असल्याने ओढ्याला पाणी बर्‍यापैकी होते. ओढा पार करणे तसे सोपे काम नव्हते... साधारण १५ फुट खाली उतरून परत तसेच १५-२० फुट वर चढायचे होते. निसरड्या जमीनीवर प्रत्येकाचा कस लागत होता... जंगलात वाढलेल्या वेलींचा आधार घेत आम्ही तो ओढा पार केला. एक अरुंद धार त्या कातळा पर्यंत जात होती पण पायवाट अशी नव्हतीच... गुढघाभर वाढलेली रोपे हाताने उपटूत वाट बनवत पुढे निघालो... कातळकडा अगदी नजिक दिसत होता... पण त्या उंच धारेवर एक मोठ झाड उन्मळून पडल्यामुळे पुढे जाणे केवळ अशक्य होत.

एव्हाना एक वाजला होता... ठरल्या वेळे प्रमाणे पुढे गेलेली मंड़ळी परतीच्या वाटेवर असणार याची जाणिव झाली... काय करावे? बराच खल झाल्यावर ठरलं की, मगाशी उतरलेल्या ओढ्यात जाऊन क्षुधाशांती करू आणि परतीच्या वाटेला लागू... परतीचा वाटेवर घसरत उतरण्याशिवाय पर्याय नव्हता... सोबतीला करवंदीची जाळी आपलं काम चोख बजावत होती... ओढ्यात उतरताना वेलींचा फार उपयोग झाला... सगळे ओढ्यात उतरल्यावर मग त्या वेलींवर मोगली क्रिडा करून झाल्या... खाद्यपदार्थ बाहेर येताच झाडावर हालचाल झाली... माकडांचे फोटो काढायची नामी संधी होती पण संततधार पावसामुळे कॅमेरा बॅगबंद होता... Sad आप्तबांधवांना ठेंगा दाखवत खाणं अंगाशी येईल म्हणून आम्ही क्षुधाशांतीचा निर्णय बदलला आणि त्या ओढ्यातून काढता पाय घेतला...

सगळी वाट घसरणीची असल्याने वाटेत मिळणार्‍या रोपांचा, झाडांच्या फांद्याचा आधार घेत उतरावे लागत होते... करवंदीचे काटे रक्ततपासणीचे काम करत होते. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला आणि आजुबाजूचे ओढे गर्जना करू लागले... त्या जंगलातील तो धिरगंभीर आवाज एक वेगळाच अनुभव देऊन गेला... जंगलातून बाहेर आल्यावर एका धबधब्या खाली मनसोक्त भिजून घेतलं... फलाहार आटोपून गावाची वाट पकडली.

गड सर करून आलेल्या गृपने आमच्या स्वागताला कांदेपोहे आणि गरमागरम चहाची व्यवस्था केली होती... वडा-थेपला, चहा-कांदेपोहे असा मस्त अल्पोपहार पार पाडला... गडाची वाट, चुकलेली वाट आणि आमची लागलेली वाट असा सगळा उहापोह झाल्यावर आम्ही मुंबईची वाट पकडली...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर म्हणजे या लेखाचे नाव न झालेला गोरखगड हवे होते....
आमच्या या न झालेल्या ट्रेकचे काहि प्रचि...

गोरखगड - पायथ्याकडुन...


गोरख-मच्छिंद्र जोडी


मर्कट्लीला

अहाहा! गोरख-मच्छिंद्र हिरवी जोडी काय भन्नाट दिसतेय! Happy

वेळेवर पोचलेली आणि पुढे गेलेली मंडळीही कातळातला दरवाजा पार केल्यावर फारशी पुढे जाऊ शकली नसतील.

अरे वा. गोरखगड म्हणजे माझे रात्री ट्रेक करायचे सर्वात आवडते ठिकाण... पोर्णिमा असली की आम्ही निघालो गोरखगडला.. आणि कुठल्या वाटेने वर गेलेलात?? देहरी मधल्या हमीदच्या दुकानापासून ५०-७० मीटर मागे आले की असलेल्या देवळापासूनच वर चढलात ना??? तिकडे कुठे ओहोळ लागतात? टेकाड चढले की पोचलो कातळ दरवाज्याच्या खाली.... ही दुसरी वाट माहित नाही मला... बघायला पाहिजे...

गोरखगड आणि मच्छिंद्रगड धबाधबा कोसळणार्‍या पावसात, ढग आणि धुक्यात काय अफलातून दिसतात! अतिशय गूढरम्य वाटतात..... मी खूप वर्षांपूर्वी देहरी गावापासून जवळच ह्या गडांच्या पायथ्याशी एका कँपच्या निमित्ताने भर पावसाळ्यात तीन दिवस राहिले होते आणि जबरी गारठून गेले होते! तुमचा वृत्तांत आणि गिरिविहारने दिलेल्या फोटोंनी त्या आठवणी जाग्या झाल्या एकदम! :हुडहुडी भरलेली बाहुली: Happy

म्हणजे गोरखगड चढला नाहीतच तर.. >>> कांगारुंच्या शुभेच्छां सोबत नव्हत्या म्हणून चुकलो Sad

(मी पण आलो असतो की)>> माझ्याही मनात आधी हेच आलेलं >>> जल्ला टांगारू पेक्षा फितूरांची संख्या वाढतेय... :d

अरुंधती... २ वर्षां पुर्वी सिद्धगड केला होता... तेव्हाही गारठवणारा पाऊस कोसळत होता...

देहरीत गावकर्‍यां समोर आम्ही धबधब्यांचे फोटो काढत होतो... त्यावर एक बाई म्हणाली... "हिरव्याचे फोटो घ्यायला लांबन आलेत"

भटक्या देवळाच्या बाजूनेच गेलो होतो...

अरे वा, छान आहेत फोटो आणि वर्णन.
आम्ही पण केला होता हा ट्रेक. मी शेवटपर्यंत नाही गेलो. त्या सुळक्याच्या पायथ्याशी. शेकोटी करुन, बाकिच्या मित्रांसाठी, काहिबाही भाजत बसलो होतो.
जाताना वाट चुकलो, गाडी चुकलो !! पण मजा आली होती.

अश्वे जंगल म्हणजे जनावरांच घर... त्यांच्या नसण्याचा प्रश्णच उद्भवत नाही... आपल्या कडून त्यांना काही त्रास होणार नाही याची फक्त काळजी घ्यायची असते... मग ते आपल्याला त्रास देत नाहीत. Happy

जेवणाच्या वेळेला दोन माकड आले होते... जर का आम्ही त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता तर ते आक्रमक झाले असते... म्हणून आम्हीच तेथून पळ काढला.

दिनेशदा हिवाळ्यात पुन्हा (मेजवानी) ट्रेक करायचाय... तुम्ही कधी येताय Wink

भटक्या देवळाच्या मागून टेकाड न चढता आम्ही देवळाच्या समोरील वाटेने गोरख व मच्छिंद्रला जोडणार्या खिंडीत जावुन पोचलो.

उंचावर गेल्यावर कळले की हि वाट कुठेच जात नाही....

जल्ला बरे झाले मी नव्हतो.. नायतर तुमच्यापायी मला थांबुन रहाव लागलं असतं.. नि मग फुकटची तंगडतोड ! नि कागदावर ट्रेक अपुराच राहिला असता..

बाकी मस्त वर्णन रे.. फोटोज आणखीन टाक असतील तर..

अच्छा.. समजलो... गोरखला उजव्या बाजूने पूर्ण वळसा घालून मागच्या बाजूला जायच्या ऐवजी तुम्ही मधल्या खिंडीत शिरलात... Happy

धन्यवाद सगळ्यांचे

किरू... हरिश्चंद्र करायचा तर डिंसेबरच्या गारठ्यातच... कमरेपर्यंत पाण्यात शिरून शकंराच्या पंडीला प्रदक्षिणा घालायची आहे... Happy