वेदकालीन संस्कृती भाग ४

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

राम कोण आणि कुठला होता, ह्यावर अनेक तर्क आणि वाद आहेत. राम नव्हताच इथपासून राम अयोध्येचा की भारतभू बाहेरचा अश्या अनेक थेअरी सध्या सापडतात. राम हा आर्यांच्या पूर्वेकडील (व भारतातील दक्षिणेकडील) आक्रमणाचे प्रतिनिधीत्व करतो व त्याने वैदिक संस्कृती लंकेपर्यंत नेली असे काही लोक मानतात.

राम प्रकरण मी थोडे सविस्तर मांडणार आहे. कारणे दोन. एक म्हणजे ऋग्वेदात ह्या सर्वांचा उल्लेख पहिल्या काही ऋचांमध्ये आहे, म्हणून ऋग्वेदकालाशी निगडित आहे. दुसरे म्हणजे रामायणातून बराच भूगोल लक्षात येतो. पुढे महाभारत युद्धात हा विस्तृतरितीने आहे, पण रामायणाला आधार मानून आपण रामाचे अस्तित्व दिसते का हे पाहू.

हल्लीच लंकेला जोडणारा रामसेतू पाडण्यास काँग्रेस सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रसरकारने दाव्यात असे मांडले होते की राम अस्तित्वात असल्याच्या कुठलाही पुरावा नाही, तसेच हाच तो रामसेतू आहे ह्याला कुठलाही पुरावा नाही, पुराव्याअभावी हे पाडण्यात यावे. कारण त्यामुळे लंका व भारत ह्या दोन देशात नौकानयन सुखकर होईल. व्यावहारिकदृष्ट्या हे जरी बरोबर असले तरी भारतातील हिंदू जनतेच्या भावना ह्यामुळे निश्चितच दुखावल्या गेल्या.

वाल्मिकी रामायण हे एकुण २४,००० श्लोकांचे आहे. सात कांडात, एकुण ५०० प्रकरणांचा विस्तार एवढे साहित्य एका रामायणात आहे. विविध राजे, तत्कालिन संस्कृती, एकमेकांसोबतचे राजकारण, समाज, आचार विचार ह्यांचा समग्र समूह म्हणजे रामायण. राम खरा आहे की नाही, पुरावा आहे की नाही ह्यात मला रस नाही तर ह्या काव्यात रस आहे कारण त्यात तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब उमटल्याशिवाय राहत नाही. भारतीय संस्कृती त्यातून पुरेपूर दिसते त्यामुळे रामायण हे वेदकालीन संस्कृती वा इ स पूर्व संस्कृती मधील फार मोठा मैलाचा दगड ठरते. बाल, अयोध्या, आरण्य, किष्किंधा, सुंदर, युद्ध आणि उत्तरकांड हे ते सात कांड आहेत. पैकी बाल व उत्तर हे मुळ लेखनाचा भाग नाहीत असे आता तज्ज्ञ मानतात.
रामायण हे वाल्मिकी ऋषींनी लिहीले व ते ह्यासर्वाचे साक्षीदार होते असे आपण मानतो. पण त्याच बरोबर वाल्याचा वाल्मिकी हे राम नाम उलटे जपल्यामुळे (मरा मरा) ऋषी झाले अशी कथाही आपल्याला सांगितली गेली. ते प्रस्तावनेत म्हणतात, " मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो, पण किराताकडे* वाढलो, क्षुद्र कामे केल्यामुळे क्षुद्र झालो, क्षुद्र स्त्री सोबत विवाह केला, तिने माझे पाप नाकारले व त्यामुळे राम नामाच्या जपामुळे मी परत ब्राह्मण झालो." ह्यावरुन प्रश्न येतो की वाल्मिकी हे खरच समकालिन होते? का त्यांनी ही कथा होऊन गेलेल्या राजाबद्दल आपली कल्पनाशक्ती लढवून मांडली आहे? मुळात हा वाल्मिकी एक होता की अनेक? तैत्तरिय ब्राह्मण ज्याने लिहले त्याने वाल्मिकी हा व्याकरणकार होता असा उल्लेख केला आहे, तर महाभारतातील उद्योग पर्वात वाल्मिकीचा उल्लेख गरुडाचा वंशज म्हणून आलेला आहे, व त्याला सुपर्ण वाल्मिकी असे उल्लेखलेले आहे.

पूर्ण रामायण मी इथे उद्धॄत करणार नाही तर त्यातील काही भाग, त्या त्या विद्वानांचे मत खोडण्यासाठी मी लिहणार आहे.

दशरथाला पुत्र होत नव्हता म्हणून त्याने एक यज्ञ केला. त्यावेळी शॄंग ऋषी तिथे उपस्थीत होते. अश्वमेधानंतर (वधानंतर, अश्वमेध म्हणजे घोड्याचा राणीशी संग नव्हे तर मेलेल्या अश्वासोबत राणीने एक रात्र घालवायची असते, अश्वाच्या तोंडावर कपडा असतो व त्याच खोलीत राणीला थांबायचे असते.) मुख्य राणी कौसल्या हिने एक रात्र घालवली. मग दुसरे दिवशी पायसदान मिळाले यथावकाश चार पुत्र प्राप्त झाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर रिडल्स इन हिंदूइझिम ह्या पुस्तकात लिहतात, राम हा पायसदानाने नाही तर शृंग ऋषि पासून झालेला पुत्र आहे कारण कौसल्या एक रात्र घोड्यासोबत राहिली, तिथे हे ॠषी होते, त्यामुळे राम हा शृंगाचा मुलगा आहे असे ते माणतात. ह्यात तथ्य मानले तर बाकी तीन पुत्रांचे काय ह्यावर मात्र आंबेडकर मौन बाळगतात. नियोग पद्धत ती महाभारतात होती, तर त्यापूर्वीच्या रामायणकालात असेल असे गृहित धरुन चालले ह्यातून लगेच असे सिद्ध होते की तो कदाचित नियोग पद्धतीने झाला. म्हणजे स्त्री पुरूषातील संबंध पुत्रप्राप्ती ह्या विषयात प्रगत होते असे मानावयास जागा उरतेच! थोडक्यात एक खोडायला गेले तर त्यातून दुसरे दुर्लक्षीलेले पण तत्कालिन समाजास मागे न नेता पुढे नेणारे सत्य समोर येतेच. इतर हजारो प्रवाद लक्षात घेऊन इथे खोडण्यापेक्षा रिडल्स पुस्तकाप्रमाणे राम हा आर्य राजा, सिता त्याची बहिण आणि रावण हा बुद्ध राजा होता. बुद्ध रावणाला पराभूत करुन रावणाला ब्राह्मण म्हणून घोषित केले गेले वगैर वगैरे, थोडक्यात रामाचा काल हा बुद्धानंतरचा आहे असे लेखकाचे म्हणणे आहे. तसेच हे युद्ध राम रावण न होता त्याला वैदिक बुद्ध धर्म युद्ध अशी झालर लेखकाने दिली आहे. रामाची सिता बहिण असे ते म्हणतात पण ती बहिण कशी झाली ह्यावर मात्र कुठलाही प्रकाश टाकलेला नाही. हे मांडण्यासाठी त्यांनी दशरथ जातक कथा (नं ४६१, ५४० ) ह्याचा आधार घेतला आहे. मात्र वरील जातक कथांचा उल्लेख त्यांनी केलेला नाही पण त्यातील कथा भाग घेऊन ते हे पुस्तक लिहतात. वेगवेगळ्या जातक कथांमध्ये रामाचा उल्लेख आहे. पण ह्या सर्व कथांमध्ये रावणाने सीतेचे हरण केल्याचा व राम रावण युध्दाचा उल्लेख नाही. तो का नसावा हे उघड आहे कारण रावणाला बुद्ध राजा मानले गेले आहे. जातक कथा ह्या इसाप निती सारख्या कथा आहेत. त्या सर्वच खर्‍या नाहीत. तसेच सीतेशिवाय रामाच्या अनेक बायका होत्या असे आंबेडकर म्हणतात. पण त्या कोण व कशा ह्यावर काहीही प्रकाश त्यांनी टाकला नाही. .

रामाचा जन्म पायसदानाने झाला हे आपण मानतो. पायस ही पद्धत नियोग पकडली तरी तिला तत्कालिन समाजात मान्यता होती व तसे प्रकार रुढ होते. केवळ ह्यावरुन हिंदू देव चुकीचे व धर्मच कसा गंडलेला आहे हे रिडल्स ह्या पुस्तकात मांडले आहे. कृष्णाबद्दल तर त्याहून हिणकस भाषा वापरली आहे. इथे रामजन्म प्रकरण देणे भाग होते म्हणून ह्या थेअरीचा उल्लेख केला इतकेच. हे मत खोडण्यासाठी हा लेख नाही, तर असेही मत आहे व त्याचा इथे उल्लेख करणे आवश्यक होते इतकेच महत्व आंबेडकरांच्या त्या पुस्तकाला. आंबेडकरांच्या पुस्तकाला दुर्गाबाई भागवतांनी उत्तर दिले होते असे वाचण्यात आहे. त्यामुळे ह्या प्रकरणाला इथेच सोडून पुढे वळू.

ऋग्वेदात रामाचा, दशरथाचा व सीतेचा उल्लेख आहे, पण सीतेचा उल्लेख हा पत्नी म्हणून नाही, खरेतर सीतेचा उल्लेख व्यक्तीवाचक नाही, ती जमीनीला दिलेली उपमा पण आहे. पेरणी केलेल्या जमिनीसंबंधी हा उल्लेख आला आहे. ह्यावरुन काही लोकं राम आणि सीता एकमेकांशी संबंधित नव्हते असाही शोध लावतात. पण ऋग्वेदातील सीता व्यक्तीवाचक नसली तरी रामाची पत्नी नाही हे कसे सिद्ध होणार ह्याचा विसर मात्र पडलेला दिसतो. ऋग्वेदातील पहिल्या मंडलात अनेकदा रामाचा उल्लेख आढळतो.
रामायणात राम अनेक असुरांशी, राक्षसांशी लढतो व त्यांना पराजीत करतो. त्यांचे वर्णन करताना त्यांना असुर, दैत्य, दानव, राक्षस, यक्ष अशी नावं नेहमी आढळतात.

असुर नावाची फोड केली असता असे दिसते.
सुराचा एक अर्थ देव म्हणजे जे देव नाहीत ते असुर.
सुराचा दुसरा अर्थ मद्य म्हणजे जे मद्य पीत नाहीत ते असुर. हा अर्थ काढताना मी थोडे वैचारिक स्वातंत्र्य घेत आहे, कारण अनेक यज्ञात सुरा अर्पण करताना सुरा कशी तयार करायची ह्याचे वर्णन आलेले आहे.
ऋग्वेदातील एका ऋचेत (१०|९३|१४) रामाचे वर्णन करताना रामाला असुर ही सज्ञा पण दिली आहे. इथे कदाचित मी जो अर्थ काढत आहे (मद्य न पिणारा) असे म्हणून त्याची सुस्ती केली असावी वा पहिल्या अर्था प्रमाणे जो देव नाही तो असुर राम.

हे असुर मोठे रंजक प्रकरण आहे असे दिसते. आता थोडे लक्ष दिले तर महाभारतात कृष्णाचा मामा, कंस तो असूर आहे. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपु हा देखील असूर म्हणवला गेला आहे. म्हणजे असूर आणि देव ह्यात नातेसंबंध आहे असा सरळ अर्थ निघतो बरेचदा तर पिता पुत्र, मामा-भाचा असेही हे नाते आहे. म्हणजे वैदिक विचारांना विरोध करणारी काही राजे असूर असा तिसरा भाषाशास्त्राशी संबंध न असणारा अर्थ मला जास्त बरोबर वाटतो.

हे असुर मानव होते का नाही ह्यात देखील विद्वानात मतभिन्नता आहे. डॉ स्टेन कोनो हे ते मानव नव्हते असे म्हणतात, F E Pargiter ह्यांना त्यांना कोण मानावे हे कळत नाही, तर भांडारकर म्हणतात असीरियन संस्कृतीमधील लोक म्हणजे असूर. वैदिक लोकांशी त्यांचे भांडणे होत होते आणि असुर हे पण मानवच होते, पण हे असूर अतिशय रानटी असल्याकारणाने वैदिक लोकांनी साहित्यात अजून थोडे भडक लिहले असण्याचा संभव मुळीच नाकरता येणार नाही.

मागील लेखाच्या एका प्रतिक्रियेत मी देव आणि असुर हे भाऊ होते असेही मांडले आहे. तांड्य ब्राह्मण आणि शतपथ ब्राह्मणाप्रमाणे देव आणि असूर हे प्रजापती पासून निर्माण झाले, देव लहान, असुर मोठे. ऋग्वेद, रामायण, महाभारत इ अनेक पुस्तकात देवासुरांचे युद्ध व त्यांचे वर्णन येतात, त्यावरुन काही तज्ञ असुर म्हणजेच हडप्पा, मोहंजदाडो, लोथल इ ठिकाणी राहणारे होते व त्यांचे ऋग्वेदिक लोकांशी लढे झाले असेही मानतात. पण ह्या सर्व थेअर्‍या आर्यन इन्वेजन झाले हे मानून आहे, व नविन इतिहास आता आर्यन इन्वेजन झाले नाही असे मांडू पाहत आहे.

आणखी एक महत्वाचा दाखला आर्य आणि असूर ह्यांचा संदर्भात आहे तो म्हणजे वैवस्वत मनुच्या ( इ स पूर्व ३२०० ) समकालिन असणारा असुर राजा वृषपर्व होता. त्याला शर्मिष्ठा नावाची मुलगी होती. तिने आर्य राजा ययातिशी लग्न केल्याची कथा सर्वांना माहित असावी. हा ययाति हा पुरुरव्याचा पणतू होता. त्याने देवयानी ह्या शुक्राचार्यांच्या मुलीशी पण लग्न केले आहे. शुक्राचार्य हे दानवांचे गुरु म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्या ययातिला पाच मुलं झाली, पुरू, यदू, द्रह्यु, अनु आणि तुर्वसू. हे पाचही मुलं पुढे पाच नद्यांकाठी राहायला गेले. ह्या पाच नद्या म्हणजेच सिंधू संस्कृतीमधील पंचनद. म्हणजे ही मुल आर्य + असूर अश्या संगंमातून आलेली आहेत.

शतपथ ब्राह्मणातील एका ऋचेमुळे ज्यात म्लेंच्छ असा उल्लेख आहे. डॉ मिश्रा असे मांडतात अकिडियन साम्राज्यातील लोक सिंधूसंस्कॄतीला मेलूहा म्हणत. हे मेलूहा आणि म्लेंच्छ जवळ जाणारे आहे व मेलूहा म्हणजे हडप्पा असे ते मांडतात, त्यावरुन म्लेंच्छ म्हणजे हडप्पावासी असे ते मांडतात. त्यांचे व्यवहार मेलूहा, मेगन आणि दिलमान साम्राज्यांशी होते. मेगन म्हणजे आजचे ओमान, दिलमान म्हणजे बहारिन तर मेलूहा हे कुठेही सापडत नाही, म्हणून मेलूहा म्हणजेच हडप्पा असा त्यांचा कयास आहे. त्यांचा मताला अनुमोदन मालती शेंडगे ह्या "सिव्हिलाईज्ड डेमन्स" ह्या पुस्तकात देतात.

राक्षस हा शब्द रक्ष पासून तयार झाला असे काहींचे म्हणने आहे. रक्ष म्हणजे रक्षा करणे. समुद्र मंथनातून जे काही निर्माण झाले त्यांना असूर आणि देव ह्यांचात वाटण्या होण्याआधी ज्या लोकांना त्याची रक्षा करण्यास सांगीतले ते म्हणजे पण राक्षस असाही एक प्रवाह आहे.

रावणाला नेहमीच ब्राह्मण म्हणून पाहिले जाते. तो ब्रह्म कुळ उत्पन्न आहे असेही म्हणलेले आहे. ब्रह्म रक्ष कुळाचा रावण, त्याचा पुढे राक्षस झाला असण्याची शक्यता जास्त आहे. ह्याला पुष्टी म्हणून हा प्रसंग पाहा. हनुमान जेंव्हा लंकेत प्रवेश करतो तेंव्हा त्याला ब्रह्मघोष ऐकू येतो असा उल्लेख सुंदर कांडाच्या १८ व्या सर्गात आहे. ब्रह्मघोषाच्या उल्लेखामुळे ब्रह्म रक्ष म्हणजे कदाचित स्मृतींद्वारे (पठण) ब्रह्मसुत्रांचे रक्षण तो समुदाय करत असावा.

लंकेचे जे वर्णन रामायणात केले आहे, ओळीने घर, मोठ मोठ्या बागा, हमरस्ते, मोठी घर, वाडे वगैरे ह्यावरुन लक्षात येते की रावण हा एक प्रतिभाशाली, विचारवंत व श्रीमंत राजा होता. युद्धतंत्र त्या नगरीत विकसीत झाले होते, एक राजा व त्याचे राज्य म्हणून लंका निश्चीतच प्रगत होती, हे कुणाही अभ्यासकाला सहज लक्षात येते. ह्या नगरीचे वर्णन हडप्पा संस्कृतीशी मिळते जुळते आहे.

राजा राम, देव राम आणि भुगोल.

अ‍ॅलेक्झॅडंरच्या भारताच्या स्वारीचे वर्णन एरियन ह्या इतिकासकाराने लिहून ठेवले आहे. तो प्रत्यक्ष अ‍ॅलेक्झॅडंर बरोबर होता. पूर्ण रात्र वाळवटांतून प्रवास करुन आल्यावर अचानक त्याला नदिकाठी एक मोठे गाव दिसले. त्या गावाचे नाव होते रामबाकिया. एरियन लिहतो की अ‍ॅलेक्झॅडंरला वाटले की एकेकाळी हे खूप मोठे शहर असावे, त्या गावातून एक नदी वाहते, तिचे नाव अघोर नदी. त्या आजूबाजूचे लोक हे ओरिटेय नावाच्या टोळीचे होते असा उल्लेख आहे. गावात एक विहिर आहे, त्याचे नाव ""रामचन्द्र की कुप" असे आहे. बाजुलाच एक जुनी गुहा आहे. त्यातील एकात हिंगुला देवीचे तर दुसर्‍यात कालीचे मंदिर आहे. येथूनच रामाने वनवासाला जायला सुरुवात केली असे तिथे मानले जाते. राम आधी गोरख टॅन्कला गेला, तिथून पुढे टोंगाभेरा व तिथून पुढे हिंगुलजला गेला. आजही ह्या भागात रामाची जत्रा भरते. हिंगुलजला शक्ती पिठ आहे असे हिंदू लोक मानतात. हिंगुलज कराचीपासून उत्तरेस २०० किमी आहे. इ स पूर्व ३२६ मधिल राम वा राम कथा अस्तित्वात असल्याचा हा एक मोठा पुरावा आहे

प्रख्यात वैय्याकरणी पाणिनीचा काल हा इस पूर्व ३५० मानला गेला आहे. काहीजन इस पूर्व ५०० आहे असेही गृहित धरतात. पाणिनीने सिंधू, वर्णू, मधुमत, किष्किंधा, कंबोज, काश्मिर, सलवा, गांधार, उरसा, दरद आणी गंधिका ह्या स्थानांचा उल्लेख वेळोवेळी केला आहे. पैकी आपल्यासाठी महत्वाचे आहे ते किष्किंधा कारण रामायणात ह्या राज्याचा उल्लेख आहे. ह्या राज्याचा राजा वाली व नंतर सुग्रिव हे होते. काही इतिहासकार ह्या किष्किंधेचा शोध घेताना आजच्या बलुचीस्थानातील कलत हे गावं आहे असे मानतात. बलुचिस्थान हे आजच्या पाकीस्तानचे एक राज्य आहे. ह्यात गंमत एकच दिसते की जर कलत ते कराची असे अंतर घेतले तर ३०० किमी भरते म्हणजे रामबाग ते कलत हे अजून कमी भरणार. रामबाग जर रामाची जागा मानले तर कलत किष्किंधा म्हणजे केवळ १०० एक किलोमिटर मध्ये रामाला हनुमान भेटतो असे गणित येते. ह्या जागेलाच किष्किंधा का म्हणतात तर तिथे आजही हिंगोल नॅशनल पार्क आहे. किष्किंधेचे रामायणातील वर्णन ह्या जागेशी मिळते जुळते आहे. इच्छुकांनी कराची ते कलत गुगल मॅप्स वर बघावे. माझ्यामते हे अंतर फारच कमी भरते त्यामुळे राम येथील नाही असे अनुमान निघते. रामबाग कुठेही असू शकते, सिंकदराला जरी रामबाग हे गाव लागले तरी सिंकदर भारत पूर्ण उतरुन मध्ये आला नाही तो आजच्या अफगाण, पाक सीमेवरुनच परत गेला. पण त्या उल्लेखावरुन असेही अनुमान काढता येते की कदाचित राम त्या अघोर नदिच्या काठचा असावा.

रामाचे नाव घ्यायचे तर एक मजेशीर उल्लेख बघा. रामल्लाह नावाचे नाव आजच्या पॅलेस्टाईन मध्ये पण आहे.* ह्यावरुन राम पॅलेस्टाईन मध्ये होता असेही उद्या कोणी म्हणाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. ह्यावरुन मी असा अंदाज बांधेन की राम हा राजा अन त्याची कथा तत्कालिन लोकात फार प्रसिद्ध होती व रामाला देव मानून त्याचे नाव भरपूर जागांना दिले गेल. थोडक्यात महाराष्टात प्रत्येक शहरात शिवाजी नगर व महात्मा गांधी रोड असे भाग दिसतात तेवढेच महत्व.

आणखी एक उल्लेख म्हणजे राम सिन नावाचा मेसोपोटेमियन राजा. वयाच्या तेराव्या वर्षी तो राज्यावर आला व त्याने बबिल म्हणजे बाबिलायन राजे ह्यांना हारवले. बबिल लोकांकडून दहा राजे लढत होते. एका थेअरी प्रमाणे राम सिन ह्याने त्या दहा राजांना हारवले. पर्यायाने दशानन रावण अशी जोड ते लावतात.

प्रख्यात भाषातज्ज्ञ डेव्हिड मॅकअल्पिन असे मांडतात की मेडिटरेनीयन समुद्राच्या आजूबाजूला असलेल्या झग्रोस येथील शेती आणि आजच्या पाकिस्तान येथील शेतीचा प्रकार सारखाच आहे, तत्कालिन इलाम राज्यातिल भाषा इलेमाईट ही द्रविडीयन डायलेक्टशी मिळती जुळती आहे. आणि कदाचित हेच इलेमाईट भारताच्या दक्षिण भागात पसरले. हा मला थोडा ओढून ताणून आणलेला संबंध वाटला कारण रामाला इतर थेअरीज आर्य म्हणतात, पण इथे द्रविड म्हणले जाईल. कलत (वर पाहा) येथील भाषा पण द्रविडीयन होती व नंतर देवनागरी झाले असे म्हणले गेले म्हणजे हा राम मध्यपूर्वेतून सरकून आजच्या हिंगोल नॅशलल पार्कात वनवास कालावधी घालवतो असा कयास मांडला तर थोडे अशक्यप्राय वाटते कारण मध्ये खूप मोठे वाळवंट आहे. रामायणात कुठेही इतके मोठे वाळवंट आलेले नाही. अफगाणिस्तानला आजचे नाव इ स १७४७ नंतर मिळाले आहे. त्या आधी त्याला भारतीय नावाने संबोधले जात होते कारण अफगाण, पाक हा भारतभू चा भाग होता. त्या आधी त्याचे गांधार, मद्र, बाल्हिक, अरट्ट असे भूभाग (विविध राज्य) होते. अ‍ॅलेक्झॅडंरच्या वरच्या उल्लेखात पण त्याने मोठे वाळवंट पार केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे ही थेअरी पण परत एकदा थोडी कच्चीच ठरते असा निष्कर्ष मी काढत आहे.

राम हा धनुर्धारी राजा होता. त्याचे मुख्य शस्त्र हे धनुष्यबाण हे होते. वैदिक देव इंद्र, वरुण इ हे धनुष्य बाण चालवणारे देव नाहीत तर त्यांचे वेगवेगळे शस्त्र आहे. मेसोपोटेमिया व इजिप्त येथे सापडलेल्या खुणांवरून व चित्रांमध्ये बाणाचे चिन्ह पण आहे, तो पण अर्धचंद्राकृती असेलेला बाण. असे बाण सिथियन, बाबिलोन आणि मेडस ह्यांनी असिरियन्सच्या विरुद्ध केलेल्या युद्धात वापरले आहेत. त्यामुळे तो इराणी वा सुमेरियन संस्कृतीचा भाग आहे असे आणखी काही लोकं मानतात. रामानन अशी सज्ञा त्याला दिली आहे. हित्ताईत लोकांचा एक योद्धा म्हणून पण रामानन पुढे आला आहे. त्याने आर्यांना पंजाब पर्यंत नेले असा एक उल्लेख आहे. मित्तनी लोकांच्या मध्ये पण वैदिक कालीन नावे आहेत जसे सुबंधू, तुषरता, अर्तसुमरा इ ह्यातील तुषरता म्हणजेच दशरथ असे काहींचे म्हणने आहे.

वैदिक नद्या व भूगोल

रामायणात शरयू नदीचा उल्लेख वारंवार आढळतो व वैदिक साहित्यामध्ये सरस्वती ही नदी प्रामुख्याने आढळते. रामायणासंबंधी ह्या दोन नद्या बघूयात.

राम हा इश्वाकु वंशातील राजा आहे. कालिदासाने रघूवंश लिहला आहे, त्यात तो इश्वाकु वंश हा उत्तर कोसलामधील आहे असे लिहीतो. हे उत्तर कोसला म्हणजेच इराण असे काही लोक म्हणतात, तर काही उत्तर कोसला म्हणजे आजचा अफगाण असेही मानतात. अफगानिस्तानातील होरायू नदी म्हणजे शरयू नदी असा त्यांचा कयास आहे. उत्तर कोसला हे इराण होऊ शकत नाही हे मी खाली दिलेल्या नकाशावरुन लक्षात येईल. कोसलाच्यावरचा भाग घेतला तर फार तर अफगाण वा अगदी उत्तरेकडचे अफगाण. इराण कसे होते हे अजूनही कळले नाही. अफगाण हा भारताचा भूभाग असल्यामुळे राम आजच्या पाकिस्थानातील हिंगोल नॅशनल पार्क मध्ये गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण इराण पकडले तर मध्ये पूर्ण वाळवंट आहे, मग त्याचा नी रामायणाचा संबंध कसा लावणार?
तसेच लंका हे द्विप आहे. राम जर उत्तर कोसलाचा असेल तर मग तो लंकेपर्यंत कसा गेला? की आपण जी लंका मानतो ती लंका नसून दुसरेच कुठले तरी द्विप हे लंका होय हा प्रश्न पडणे साहजीक आहे. ह्यावर काही विद्वान उत्तर देतात ते मोंहजंदाडो म्हणजे लंका असण्याचे. हेच का? तर मोंहजंदाडो मधील एका सिलावर कृत्तिकेचे चित्र आहे. कृत्तिका हे आपण नक्षत्र माणतो. इ स पूर्व ३१०२ मध्ये एका बुधवारी जेंव्हा सूर्य कृत्तिका नक्षत्रात होता तेंव्हा कलियुग सुरु झाले असे ते सील सांगते. त्यावरुन लंका, जिथे रावण हा बुद्धीमान, शक्तीशाली राजा राहत होता, तिथेच असे खगोलशास्त्र निर्माण होऊ शकते असे त्यांचे म्हणने आहे.

आर्यभट्ट, ब्रह्मसुक्त, सूर्य सिद्धांत हे सर्व असे मानतात की ब्रह्मकुल हे खगोलशास्त्र शिकण्याचे अतिप्राचिन ठिकाण आहे. हे सर्व विद्वान त्या बुधवारी कलियुग सुरु झाले हे ही मानतात. मग एकतर आर्यभट्ट बरोबर असावा (युगाचा कल्पनेत) किंवा मॅक्समुलर तरी. माझे वैयक्तीक मत आर्यभट्ट बरोबर असावा असे आहे. इथे मला जरा गंमत वाटते कलियुग हे जर आधी चार व नंतर त्यात बदल करुन ५ वर्षांचे ठरवले गेले तर ह्या सीलाला काय अर्थ उरतो? सत्य, द्वापार, त्रेता आणि कली हे चार युग एकानंतर एक येतात तर त्या बुधवारी केवळ कलीयुग सुरु झाले व चार वर्षांनी संपले इतकेच काय तो अर्थ होऊ शकतो. मग मॅक्स मुलर आर्यांचा काळ इ स पूर्व १५०० च्या आधीचा नाही असे लिहतो त्याचा मेळ ह्या पूर्ण थेअरीशी लागत नाही. तसेच ऋग्वेद व रामायण हे एकाच काळात होते हा कयास ह्यांची पण जोड अजिबात लागत नाही.

बरं ह्या सर्व विद्वानांत राम कोण हे युद्ध लागलेले असताना ते सीतेला काही अंशी दुर्लक्षित ठेवतात. जनकाचा उल्लेख अनेकदा वाजसनेयी साहित्यात आला आहे. याज्ञवल्काला उपदेश जनक राजा देतो व जनकाचा दरबारात याज्ञवल्क उपनिषदांवर अनेकदा बोलतो, चर्चा करतो असे कित्येक उल्लेख आहेत. जनक हा विदेह ह्या जनपदाचा राजा. विदेह हे जनपद आजच्या उत्तर भारतात येते. हा भूगोल लक्षात घेता ह्या विद्वानांनी एकतर राम सीता लग्न झाले नाही असे तरी म्हणावे वा सीता हा भाग प्रक्षिप्त ( व पर्यायाने संपूर्ण रामायणच प्रक्षिप्त आहे) असे तरी मांडावे. पण त्यात थोडी मेख अशी आहे की रामायणात वर्णन केलेली मिथीला नगरी कुठे आहे ते लक्षात येत नाही. शतपथ ब्राह्मणात गंडकी नदी ही कोसला आणि विदेह ह्यांची सीमारेषा असे आले आहे. कोसला मध्ये जर राम होता असे मानून चालले तर तीन रात्री प्रवास केल्यावर मिथिलानगरी यायला पाहिजे, पण तसे होत नाही. तसेच जनकनगरही सापडत नाही, पण महाभारतातही मिथिलेचा उल्लेख आहे. म्हणजेच एकतर एखादे मोठे शहर तिथे निर्माण झाले वा तेथील लोक दुसरीकडे गेले. असे होण्याची शक्यता माझ्यामते जास्त आहे कारण बुद्धकालात पण वैशाली राज्यातील लोकांना विदेही म्हणत. उदाहरणार्थ अजातशत्रूला वैदेही असे म्हणले गेले आहे तसेच सीतेला वैदेही म्हणले गेले. विदेह इथे जनकाने राज्य केले, हा भाग जुळून येतो. म्हणजेच वैशालीतच कुठेतरी मिथिलानगर असावे.

रामायणातील अयोध्येचे वर्णन असे आहे. - अयोध्या नगरी ही शरयू नदीच्या तिरी असून सात योजने लांब व तीन योजने रुंद आहे. विशाल असे रस्ते ह्या नगरीतून जातात. नगरीतील वसाहती वेगवेगळ्या प्रकारच्या असून सात मजले असणारी घरं पण ह्या नगरीत आहे. पण नेमके आजच्या अयोध्येला ही मापं लागू होत नाही. ती केवळ अर्धीच भरतात. म्हणजे एकतर नगरीचे मोठेपण सांगण्यासाठी आकड्यांचा विपर्यास केला असावा किंवा ही नगरी मोठी होती व नंतर कालौघात ती लहान झाली असे म्हणावे. कुषान सम्राट कणिष्काने ह्या नगरीवर राज्य केले. त्याने इ स पूर्व मध्ये अयोध्या नगरीचे नाव बदलून साकेत हे ठेवल्याचे व परत नंतर ते अयोध्या झाल्याचे अनेक संदर्भ बौद्ध व हिंदू साहित्यात आढळतात.
महाभारताचा भूगोल म्हणजेच आजच्या भारताचा भूगोल. पुरातत्वखात्याने बी बी लाल ह्यांचावर उत्खननाची जबाबदारी सोपवली. महाभारतातील शहरे म्हणजे हस्तिनापूर इथे त्यांचा टीमने उत्खनन केले असता त्यांना इ स पूर्व ११०० ते ८०० असणारी अनेक भांडी सापडली, जर महाभारताच्या शहरात काही सापडू शकते तर रामायणाच्या का नाही? म्हणून १९७५ च्या आसपास अयोध्येचा आजूबाजूच्या १५ ठिकाणी उत्खनन सुरु झाले तिथे ह्यापेक्षा जुने काही सापडले नाही. जी काही भांडी सापडली ती महाभारतकालीनच होती. लाल एके ठिकाणी म्हणतात पृथ्वीने आम्हाला रामायणकालीन एकही वस्तू सापडू दिली नाही, कदाचित तिची ती इच्छाच नाही. रामायणात शिवधनुष्याचे व एका रथाचे वर्णन आहे. त्यानुसार त्या रथावर ते धनुष्य ठेवले होते. प्रत्येक बाजूला आठ चाक असणारा तो लोखंडी रथ होता. तो वजनाला खूप जड असल्याकारणाने ओढण्यास अत्यंत जड होता. उत्खनना दरम्यान त्यांना अशा रथाचा एखादा अवयव मिळेल असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. ते म्हणतात "कदाचित खरी कथा छोटी असेल, पण प्रत्येक शतकानंतर ही कथा वाढतच गेली व त्यात अनेक गोष्टी घुसडल्या गेल्या असाव्यात." ह्याच लाल ह्यांनी सरस्वती आहे ह्याचे उत्खनन केले आहे व सरस्वती नव्हती हे खोडून काढले आहे.

बरेच जण राम ही केवळ कल्पना वा वाल्मिकीच्या डोक्यातील एक पात्र आहे असे लिहतात पण त्यास काही अर्थ नाही हे वालीवधावरुन दिसून येते, रामाला फक्त चांगला पुरुष असे दाखवायचे असते तर वालीवध झाला नसता, वाली किष्किंधापर्वात रामाला म्हणतो, तू क्षत्रिय आहे तरी असे का केलेस? मग जर रामाला सगळे चांगलेच दाखवायचे असले असते तर वाल्मिकींनी हा प्रसंगच आणला नसता. इतर ठिकाणी महान दाखवून इथे कमी दाखवणे ह्याचे प्रयोजन काय? म्हणून राम खरा असावा. तसेच दुसरे उदाहरण म्हणजे राम जेंव्हा सीतेला शोधत किंष्किंधेत येतो तेंव्हा सुग्रीव त्याला सांगतो की वाली हा इंद्रपुत्र आहे. पुढे जैमिनीय ब्राह्मणात इंद्र, इंद्राणी (पत्नी) व तिचे मुल वॄषाकपि असा उल्लेख आहे. मी माझ्या दुसर्‍या लेखात वॄषाकपिचा उल्लेख हनुमानाबद्दल केला होता. पण जैमिनीय ब्राह्मण वालीला पण वॄषाकपि म्हणते. मोठा, महाकाय शक्तीशाली वानर असा अर्थ अभिप्रेत असावा. कदाचित अनार्य देवांना आर्यांनी तेंव्हा आपले मानायला सुरुवात केली होती. दुसर्‍या लेखातील माझी शबर नावाच्या पुत्राची कथा, तश्याच पद्धतीचा एक पुत्र म्हणून वॄषाकपि असण्याशी शक्यता आहे. तसे दुसर्‍या लेखात मी हनुमानाला पण वृषाकपि मानले गेले आहे असेही लिहीले. ह्या तिन्हीचा संदर्भ लावला तर राम होता ह्याच निष्कर्षाप्रत मी येतो. पुरावे नाहीत. उत्खनन चालू आहे, काहीतरी निश्चितच मिळेल.

अशातच हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ह्या पुस्तकाचे लेखक श्री नेमाडे ह्यांची मुलाखत वाचली, ते म्हणतात हिंदूंना कृष्ण कोण आहे हेच माहीत नाही, कारण एकूण तीन कृष्णांचा उल्लेख आहे. पहिला उल्लेख छांदोग्य उपनिषदात कॄष्णाला अंगीरसाचा शिष्य म्हणून आहे, दुसरा, विश्विकाचा मुलगा ऋषी कृष्ण, तर तिसरा यमुनेच्या किनार्‍यावरील कृष्ण. केवळ छांदोग्यात कृष्णाचा उल्लेख झाला म्हणून नेमाडे कृष्णाबद्दल भरपूर बोलतात. तो फक्त एक सारथी होता असे त्यांचे म्हणने आहे. वस्तूस्थितीत जर तो खरच सारथी असेल तर नेमाडे विसरतात तो एक मुद्दा मी मांडू इच्छितो. हा सारथी कृष्ण, महाभारतातील गीता सांगून, महाभारत घडवून आणू शकतो म्हणजे तत्कालिन वैदिक संस्कृतीत जातीला महत्व नव्हते हे लगेच लक्षात येते. कृष्णाचा मुद्दा मी इथे आणला कारण रामाच्या बाबतीत देखील परिटाची अशीच एक कथा. एक धोबी एका राज्याचा व त्याचा पत्नीच्या शीलावर संशय घेऊ शकत होता म्हणजे परत एकदा जात समान होत्या, तर परिट हे त्याचे कर्म होते असा निष्कर्ष निघतो, तसेच तत्कालिन समाजात काही राज्यात लोकशाहीला महत्व होते असा एक उपनिष्कर्षही त्यातून पैदा होतो.

कृष्णाची कथा इथे आणण्याचे दुसरे कारण म्हणजे याज्ञवल्काचा जनकासोबत संवाद चालताना (बृहदारण्यक उपनिषद) जनक, याज्ञवल्काला विचारतो, "परिक्षित कुठे गेला?" गमंत अशी ही आपण रामायण हे महाभारतापेक्षा जुने असे मानतो, तर मग जनकाला हा प्रश्नच का पडावा? कारण परिक्षित हा अभिमन्यूचा मुलगा, अर्जूनाचा नातू. इथे थोडी कालगणनेमध्ये गफलत दिसते. मग बी बी लाल ह्यांना आणखी जुने पुरावे कसे सापडतील? कारण परिक्षित ते राजा जनक असे ४ पिढ्यांचे साधारण १०० ते १२० वर्ष अंतर मानले तर अयोध्येत सापडलेली महाभारतकालीन भांडी बरोबर ठरतील व रामायण हे महाभारतानंतरचे आहे असा निष्कर्ष निघेल. बुद्धकालीन विदेही म्हणणे मग बरोबर लागू पडते. कारण तो काल ६७५ बि सी होईल व बुद्ध लगेच त्या नंतरचा म्हणून ती संबोधने लागू होतील. पण मग असे झाले तर ऋग्वेदात महाभारताचे उल्लेख का नाहीत? कारण महाभारत आधी झाले असले तर उल्लेख, कथा यायला हव्या, ह्याचे उत्तर सापडत नाही.

एक गमतीशीर पुरावा किंवा पुराव्याकडे नेणारे साधन म्हणजे हनुमान जी अंगठी सीतेला दाखवतो ती. त्यावर राम हे नाम कोरले आहे. त्या काळात सर्व अंगठ्या ह्या केवळ गोल असायच्या, उत्खननात ज्या ज्या गोष्टी अंगठ्यासदृष्य म्हणून सापडल्या आहेत त्या सर्व गोल वेढ आहेत, फक्त हडप्पाला सापडलेली अंगठी ही आजकाल खडा घालायला जी जागा असते तशी सापडली आहे. त्यावर नाव लिहता येते.
सीता वनवासात जाते तेंव्हा राम, लक्ष्मण वल्कलं नेसतात पण सीता तिचे रेशमी वस्त्र तसेच ठेवते असा उल्लेख आहे. रावण सीतेला पळवून नेताना देखील तिने पिवळे रेशमी वस्त्र घातल्याचा उल्लेख आहे. रावण दहनाच्या वेळी रावणाला रेशमी वस्त्र घातल्याचा उल्लेख आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ह्या रेशमी वस्त्राचा उल्लेख चिनापट्ट असा आहे, म्हणजे चिन मधून आयात केलेले वस्त्र. म्हणजे एकतर रामायणकाळी चीनशी व्यवहार होता असे तरी मानावे लागेल (महाभारतकाळी होताच) वा ह्या वस्त्राच्या कथा (रेशमी कारण राजाचे म्हणून) ह्या प्रक्षिप्त आहेत असे तरी मानावे लागेल. माझा कल ही वस्त्र कथा प्रक्षिप्त असावी असा आहे.

वाल्मिकीने ह्या कथा ऐकून मग लिहीले असा विचार केला किंवा कोणी विद्वान मांडतात तसे एकापेक्षा जास्त लोकांनी रामायण लिहीले असे मानले तर मात्र ह्या विविध कथा, हे वस्त्र, अंगठी इ. गोष्टी प्रक्षिप्त असण्याचा संभव व थोडा काल्पनिक असण्याचा संभव नाकारता येत नाही. तसेच बाल कांड व उत्तर कांड हे नंतरचे लेखन आहे हे आता मानले गेले आहे त्यामुळे मूळ रामायण कथेतही अश्या अनेक गोष्टी येऊ शकतात. शिवाजी केवळ ३०० वर्षांपूर्वी होऊन गेला, पण त्याचा बाबतीतही दंतकथा आहेत, येशूच्या बाबतीतही अनेक दंतकथा आहे त्या रामाचा बाबतीतही होऊ शकतात.

वरील मते माझी आहेत असे नाही तर ते विविध मतप्रवाह आहेत. वर दिलेल्या मतप्रवाहांपेक्षा आणखी किती तरी मतप्रवाह आहेत. जिथे खोडण्याजोगे वाटले तिथे मी माझी टिप्पणी पण केली आहे. लेखाचा कॅनव्हॉस खूपच मोठा आहे. अजूनही मी ह्यावर मिळेल ते साहित्य वाचत असतो, इथे ते सर्वच देणे शक्य नाही. हा लेख आधीच खूप मोठा होत चालला आहे त्यामुळे इथे थांबतो.

राम आहे का नाही, होता का नव्हता, इ स पूर्व का नंतर ह्यामुळे फरक पडू नये. तत्वज्ञानात इश्वराचे रुप सांगितले आहे. सर्वच माणसं इश्वर असल्यावर राम कुठलाका असो, तो राम आहे इतकेच माझ्यासाठी पुरे आहे.

महाभारतकालिन भारत नकाशा.

Mahajanapadas.jpg

* किरात ह्यांचा उल्लेख वेदात अनेकदा एक जमात म्हणून आला आहे. किरात म्हणजे नेपाळी.
*http://en.wikipedia.org/wiki/Ramallah

वेदकालीन संस्कृती भाग १
वेदकालीन संस्कृती भाग २
वेदकालीन संस्कृती भाग ३
वेदकालीन संस्कृती भाग 5

प्रकार: 

केंद्रसरकारने दाव्यात असे मांडले होते की राम अस्तित्वात असल्याच्या कुठलाही पुरावा नाही, तसेच हाच तो रामसेतू आहे ह्याला कुठलाही पुरावा नाही, >> रामायणात स्पष्ट उल्लेख असताना आणि त्याच जगी सेतूसददृष्य बांधकाम आढळल्यावर वरील विधान करणे भारतियांनाच जमू शकते. बाकीच्या देशात अशी घटना घडल्यावर 'आमचे पूर्वज किती थोर होते' याचा डंका पिटला गेला असता. असो!

बाकी लेख माहितीपूर्ण आहे - नेहमीसारखाच!

आर्य ह्या जमातीबद्दल रावणामुळे खूपच संशय निर्माण होतो. बरेचसे संशोधक रावणाला अनार्य आणि रामाला आर्य मानतात पण त्याचबरोबर रावणाला ब्राह्मण मानले गेले आहे. कोणत्याही अनार्याला आर्यांची जात कशी लागू होईल?

केदार, दंडवत!
पुन्हा वाचते. Happy

एक शंका म्हणजे लेखनाची कला रामायणकाळात अस्तित्वात होती का? कारण 'युगान्त'मधे इरावतीबाईंनी ती महाभारतकाली नसावी असं म्हटल्याचं आठवतंय. पांडवांनी शस्त्रं शमीच्या झाडावर ठेवली तेव्हा त्यांवर 'नावं' घातलेली नव्हती तर चिन्हं होती असा उल्लेख होता.
(म्हणजे शकुंतलेने दुष्यंताला किंवा रुक्मिणीने कृष्णाला 'पत्रं लिहिली' हे कितपत खरं मानायचं?)

त्यामुळे ते आंगठीवर 'नांव' असणे, किंवा सेतू बांधतांना दगडांवर 'नांव' लिहिल्याची आख्यायिका याबद्दल साशंकता वाटते.

अवांतर : असाच उल्लेख घोड्यावर स्वार योद्ध्यांबद्दल आहे. महाभारतात रथांची वर्णनं आहेत, पण घोडयावर बसून रपेट वा युद्ध केल्याचे उल्लेख नाहीत - असं 'युगान्त'मधे वाचल्याचं आठवतं.

धन्यवाद.

माधव एक्झॅटली, मग हा घोळ का? त्यावर थोडा रिसर्च केला माझे मत मांडतो. आणि हो हे हजरबतल प्रकरणी झाले असते तर? तेंव्हा सर्वधर्मसमभाव जागृत होतो. Happy

स्वाती, इ स पूर्व ४५०० वर्षांपूर्वीची लिखीत सील सापडली आहेत. त्यावरची भाषा अजून डिकोड झाली नाही पण ती भाषा आहे असे तज्ज्ञ माणतात. त्यात विविध प्रकारचे चिन्ह आहेत. प्रोटो इंडूस प्रकारात त्याला मोडल्या गेले आहे. त्यामुळे लिखीत कला अस्तित्वात होती असे म्हणता येईल. म्हणजे लिखीत भाषा म्हणून पूर्णपणे निर्मिल्या गेली नसेल पण त्या चिन्हांना अर्थ होता असे म्हणू.

पण सेतूच्या प्रत्येक दगडावर नाव वगैरे जरा अत्यर्कच वाटते. तसेच अंगठीप्रकरण ही. पण ही अगंठी म्हणजे रामाच्या राज्याचे प्रतिक मात्र नक्की असू शकेल असे मला वाटते, कारण प्रत्येक राज्याला एक प्रतिक होते. कदाचित त्याने अंगठीवर ते नोंदवले असण्याची शक्यता आहे.

भुगोल देताना काल मी एक महत्वाचा भाग विसरलो तो म्हणजे लव व कुश ह्या दोघांनी निर्मान केलेल्या नविन राज्यांचा. लाहोर हे गाव लवाने वसविले आहे. थोड्या वेळाने हा भाग टाकतो.

केदार,
तुमच्या मेहनतीला _/\_. भरपूर माहिती मिळाली.
आता जरा उथळ नि पांचट लिहीतो, त्याबद्दल आधीच क्षमा मागतो, वाटल्यास उडवून टाका!

<म्हणजे शकुंतलेने दुष्यंताला किंवा रुक्मिणीने कृष्णाला 'पत्रं लिहिली' हे कितपत खरं मानायचं?>

संपूर्ण खरे. त्या पत्रात 'XXXOOO' असे लिहीले होते आणि माणूस नि बाईचे चित्र, आणि बाजूला हृदयातून गेलेला बाण असे चित्र होते!! कदाचित् झाडाच्या फांदीवर बसलेले क्रौंच पक्षांचे जोडपे बसले आहे, असेहि दृष्य असेल. कदाचित् रुक्मिणीच्या पत्रात पण अशीच अर्थपूर्ण चित्रे काढली असतील!!

पाचशे वर्षानी लोक म्हणतील, अमेरिकेत डॉज (ख्रायस्लर) ची राम नावाची गाडी होती, त्यावरून राम अमेरिकेत होता, आणि त्याचा रथ बिनघोड्यांचा होता, असा शोध लावतील.

Happy Light 1

केदार, केवढी माहिती !! हा एक लेख अजून २-३ भागात होउ शकेल असे वाटले!! राम कोण कुठला यावरून डोक्याला मुंग्या आल्या आता Happy
झक्की Lol

झक्की, एकदम क्रिश्नाम्माचारी सारखी वेडी वाकडी सिक्स हाणलीत Proud
केदार, आणि ह्यांना तू म्हणे पुस्तकं पाठवणार होतास तातडीनी? Proud

असाच उल्लेख घोड्यावर स्वार योद्ध्यांबद्दल आहे. महाभारतात रथांची वर्णनं आहेत, पण घोडयावर बसून रपेट वा युद्ध केल्याचे उल्लेख नाहीत - असं 'युगान्त'मधे वाचल्याचं आठवतं.
>>>
मी मागे एका वाचलेल्या PhDच्या thesis मध्ये 'अलक्षेंद्राच्या भारतावरील आक्रमणात त्याच्याकडे घोड्यांवर बसून बाण सोडू शकणारे सैन्य होते कारण रिकीबींचा वापर त्याच्या सैन्याला माहिती होता व भारतीय राज्यांच्या सैन्याला घोडा संपूर्ण थांबवून मगच बाण सोडता यायचा कारण रिकीबीचा वापर भारतात होतच नसे' हे वाचल्याचे आठवते (thesis लिहिणार्‍याचे नाव आता आठवत नाही.. तो थेसिस पुस्तकरुपाने उपलब्ध आहे)..

केदार, पहिल्या वाचनात गडबड जाणवतेय.. मी सविस्तर वाचून पुन्हा लिहितो..

एकेक वाक्य घेऊन 'एकदा ह्या विषयावर आपल्याशी चर्चा करायची आहे' असे म्हणावेसे वाटतेय. तू अ‍ॅटलांटात पाहिजे होतास. Happy अभ्यास, व्यासंग ... फारच उच्च!

केदार खुप मेहनत घेतली आहेस.
तूला शक्य असेल तर सध्याच्या श्रीलंकेतील, रामायणाच्या प्रचलित स्वरुपाबद्दल काहि वाचायला मिळाले तर अवश्य बघ. माझ्या मित्राकडून, बर्‍याच वेगळ्या गोष्टी मी ऐकल्या आहेत.
थायलंड मधल्या नेत्याचे नाव अजूनही रामच असते तसेच इजिप्तमधला एक राजा, दशरथ होता.
मी वाचल्याप्रमाणे, धनुष्यबाण, हे शस्त्र म्हणून दक्षिणेकडे विकसित झाले, आणि सीता ते चालवण्यात प्रवीण होती.

बाकी माधव, संसदभवनातील, स्वा. सावरकरांचे तैलचित्र हटवले जाते, तिथे काँग्रेस बाकी कशाची पत्रास ठेवेल, अशी अपेक्षाच नको, ठेवायला.

धन्यवाद सर्वांना.

अरे माझा व्यासंग म्हणजे वासरात लंगडी गाय ...इतकाच. फार नाही. Happy अटलांटात येतो भेटीला.

टण्या जरुर. चुका असू शकतात किंवा एखादा भाग नीट न मांडला गेल्याची पण शक्यता आहे. माझे स्वतःचे मत ह्यात जास्त नाही. अनेक थेअर्‍या आहेत त्या रामाबद्दलच्य आहेत म्हणून परामर्ष घेणे भाग होते.

मैत्रेयी, मी आधी लिहलेला लेख ह्यापेक्षा खूप मोठा होता, काट छाट केली, लव कुश भाग खोडला, रामाचा पुतन्या पुष्कर त्याचा भाग काढला, त्या काटाकाटीत नेमके भुगोलाचा भाग पण गेला. खरेतर त्या सर्वांनी वसवलेले अनेक शहरं आजही आहेत. एकून दोन किंवा तीन छोटे लेख करता आले असते, पण मग दर वेळी अजून 'रामच का ' म्हणून एकच ठेवला. Happy

झक्की पाचशे वर्षांनी राम अमेरिकेत ड्रेट्रॉइट शहरी राहत होता, त्याचा मुळ उच्चार रॅम होता व तो डॉज कुळाचा होता असे मांडले जाणार आहे हे नक्की Happy

केदार मस्त ! तुझी मालिका वाचते आहे. खूप माहिती. आत्ताचा भाग वाचला बरच कन्फ्युजन झाल खर तर Happy
पण दिनेश म्हणतात तस मी थायलंड मधे रामायण ऐकले आहे. तिथे कोरलेली हनुमान आणि राम, सितेची चित्र बघितली. आणि तिथे अयोध्या पण आहे जी थायलंडची १७६० वगैरे पर्यंत राजधानी होती,. शरयु नदी देखिल आहे.. आणि त्यांचे म्हणणे राम त्यांच्या देशातला राजा होता. त्याच्या कथेप्रमाणे सिता ही रावण आणि मंदोदरीची मुलगी होती. आणि रावणाचे भविष्य होते की पहिल्या अपत्यापासून मृत्यु. म्हणून रावणाने सितेला नदीत फेकले. eventually ती जनकाला सापडली.
असो, पण अशा अनेक ठिकाणी ही कथा जर प्रचलीत असेल तर कदाचित ही कथाच असेल.

छान लेख आहे केदार. Happy प्रचंड माहिती दिली आहेस! तू स्वतः बरच वाचत असल्यामुळे तुला ह्या सगळ्यांमध्ये लिंक लागणे सहाजिक आहे पण आमच्या सारख्यांना हे सगळं एकत्र डोक्यात ठेवणं केवळ अशक्यच आहे.
हा लेख विषेश आवडला कारण रामा बद्दलचा प्रचलित असलेला तपशील माहित आहे आणि त्यामुळे शेवट पर्यंत उत्सुकता टिकुन राहिली. ह्या विषयात फारसा रस नाही पण अशी जरा डोक्याला सुलभ हप्त्यांमधे मिळणारी माहिती असेल तर आणखिन वाचावीशी वाटते.
ग्रेट वर्क माय फ्रेंड (वन्स अगेन)!!! Happy

केदार, अतिशय छान. एकदा वाचायला घेतल्यावर मधे थांबवेना.
एक प्रश्नः ह्या संदर्भांकरता कोणती पुस्तकं वाचली आहेस?

केदार फारच सुरेख आणि अभ्यासपुर्ण लेख.
दिनेशदा Thailand मध्ये केवळ राम नाही तर अयोध्या ही आहे.
Thai रामायणात राम तिकड्चाच दाखवतात.
Ayutthaya (Thai: อาณาจักรอยุธยา, RTGS: Anachak Ayutthaya, also Ayudhya) http://en.wikipedia.org/wiki/Ayutthaya_Kingdom

माझ्या मते राम हा राजा जुन्या IndoIranian राजांमधील एक होता.
सर्वात जुने राम हे नाव रामासीस ह्या Egyptian राजाचे ३००० BC आढ्ळते. हा खुपच famous राजा
होता History चानल वर ह्याच्याबद्द्ल एक show होउन गेला.
http://en.wikipedia.org/wiki/Ramesses_I

माझे मत Ram हे नाव Egypt च्या Sun God "रा" पासुन आले आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Ra

मागे लिहिले तसे (H)Ind Ra (इन्द्रा) , Asu Ra (अहुरा) ह्या composite gods बनविण्याच्या पद्ध्ती नुसार आले असावे.
Amun and Amun-Ra (theban god)
Atum and Atum-Ra
Atum-Ra (or Ra-Atum) was another composite deity formed from two completely separate deities, however Ra shared more similarities with Atum than with Amun. Atum was more closely linked with the sun, and was also a creator god of the Ennead. Both Ra and Atum were regarded as the father of the deities and pharaohs.

ह्या pharoh प्रमाणे राम सुर्यवंशी मानतात.
रथ संस्क्रुती आर्यांशी खुप जवळुन निगडीत आहे.
Horaayu H चा स केल्यावर सोरायू नदी होतेच.
मंथरा चा अर्थ Persian मध्ये मंत्रा म्हण्जे प्रार्थना असा होतो.
लक्ष्मण शतरुघ्न या मध्ये जो "क्ष" वा "शत" येतो तो जुन्या "Indo Persian " मध्ये क्षत्रियांसाठी वापरतात.

तुझे हे म्हणने मान्य की रामाने वाळवंट ओलांड्ल्याचा उल्लेख नाही.
याचे कारण, दशरथ हा आधिच भारतात येउन स्थाइक झाला असावा.
रामायणाचे तुझे location एक्दम बरोबर वाटते.
आर्य Egypt --> kazakstaan --> Iraan India Europe एकाच वेळी move zaale असावेत.

पण मग हे मायग्रेशन का होऊ शकते? त्या बद्दल तुमचा व्हियू काय आहे?

इराण मधील काही कुर्दिश टोळ्यांचे नाव राम आर्देशिर, राम होर्मूझ्ड, राम फिरोझ असेही आहेत. रचना व दिनेश ह्यांनी नोंदविल्यासारखे मलेशिया, थायलंड, मध्यपूर्व व भारत ह्या पूर्ण भागात राम हा एक लिजंड आहे हे नाकारता येत नाही. फार पुर्वी रशियातून हे आर्य आले अशीही एक थेअरी होती, पण आता त्यात दम राहिला नाही. तिथे राम कथा आहे का? हे तपासायला पाहिजे.

दशरथाच्या बाबतीत बोलायचे झाले तर दशरथ व तिमीध्वज ह्यांचात एक मोठे युद्ध झाले व त्यात दशरथला मार बसला, पण त्याने हे युद्ध जिंकले. कैकयीचे वर ह्याच युद्धामुळे मिळाले अशी वंदता आहे. ह्या दशरथाचा मध्यपूर्वेत तुसरता हे नाव आहे हे मी वर दिले आहे.

रघूवंशात कालीदास म्हणतो की रघूचे सैन्य आजच्या कॅस्पीयन समुद्रापासून ते नॉर्थईस्ट मधील पामिर पर्वतराजी पर्यंत होते. हे वर्णन गृहित धरले तर मग इश्वाकु वंश हा अफगाणच्या वरचा आहे हे मान्य करावे लागते. हे पामीर पर्वत हिमालयापासून उत्तरेकडे आहेत. मेरुपर्वत हा पर्वत हिमालय, पामिर, हिंदूकुश ह्या पर्वतरांगातील एक पर्वत आहे असे देखील मी वाचले आहे. मग रघू किंवा रघूवंशी म्हणजे दशरथ जर खरच आणखी खाली आला व पंचनदाकडे वळला तर आजच्या रामायणातील भरपुर गोष्टी जुळू शकतात. व हे वर्णन पकडले तर हिंगोल भाग (आजचा अफगाण - पाक - व हिमालय) असे पकडून मुळ रामराज्य वा दशरथ राज्य होते हे म्हणावे लागेल. व जो भाग अलक्क्षेंद्रने उल्लेखला तो, त्यात वाळवटं येत नाही, शिवाय त्याचा जवळच पुष्कर, लव व कुशाने पंजाबात राज्य स्थापले, हा भुगोल मस्त जुळून येतो असे मला वाटते. पण अयोध्येचा प्रश्न परत उरतोच. बरं कोसला हे रामायणातील वर्णन मान्य केले तर इतर कोठेही कोसला मध्ये इतके मोठे शहर दिसत नाही. मग राम नक्की वनवासात गेला कुठे व वापस कसा आला हे प्रश्न अनुत्तरीत राहतात, त्यामुळे एक तर कोसला हे गांधाराच्या पॅरलली पसरले होते का? पण ते तसेही नाही.
दुसरी वस्तुस्थिती म्हणजे जनक राजाचे राज्य विदेह व सीता इत्यादी. मग राम खास स्वंयवराकरता अफगाणच्या वरुन वा इजिप्त, इराण वरुन येणे संभवत नाही.

व ह्याला चॅलेंज करणारी आणखी एक वस्तूस्थिती म्हणजे विश्वामित्र, ज्याचासोबत राम जातो. ऋग्वेदीकाळात सरस्वतीचा उल्लेख अनेक वेळेस आहे. आता तर सरस्वती सापडली आहे, आणि ती भारतातून वाहते, मग राम एकाच वेळी इतक्या ठिकाणी कसा. (देव आहे हे उत्तर का? Happy ) ह्या सरस्वतीवरच मी एक लेख लिहणार आहे. कारण आपली पूर्ण संस्कृती पंचनद आणि सरस्वतीह्यांना धरुन आहे. गोदावरी, यमुना ह्या ऋग्वेदकाला नंतरच्या आहेत.

अवेस्ता मधिल हरकावती म्हणजे सरस्वती असे खूप म्हणाले पण मग सतलज, रावी चे काय? तसेच दृष्दवती आणि अपया ह्या नद्या सरस्वतीत विलीन होतात. हरकावतीत त्या होताना दिसत नाहीत. पाच मोठ्या नद्या अन त्या शिवाय सरस्वती अश्या मुख्य नद्या केवळ भारताच सापडतात ह्याकडे भौगोलिक स्थितीमुळे दुर्लक्ष करता येत नाही. हा प्रश्न सुटने अवघड झाले आहे. सरस्वती लेखात हे सगळे मांडेनच.

सायो मी अनेक पुस्तक रेफर केली आहेत. त्यातील काही लेखात पण दिली आहेत.

रामायण (अनेक वेळेस Happy )
महाभारत (अनेक वेळेस Happy )
रामायणावर मिळतील ती भाष्ये,
महाभारतावर मिळतील ती भाष्ये
अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया,
केम्ब्रीज हिस्टी ऑफ इंडिया
वल्ड मायथॉलॉजी - रॉय विलिस
सिव्हिलाईज्ड डेमन्स - मालती शेंडगे
लिजंड ऑफ राम - घोष
अर्लि आर्यन्स ऑफ इंडिया - रॉय
अ हिस्ट्री ऑफ इंडिया - रोमिला थापर
इंटरनेट
विकीपिडीया
http://www.archaeologyonline.net/artifacts/archaeology-india.html
द सरस्वती बी बी लाल
आणि रेफरंस साठी गुगल वापरले.

आणखी आता बरेच आठवत पण नाहीत, रेफ मिळाला की अरे हे वाचले होते एवढे लक्षात येते. Happy

असाम्याच्या भाषेत आता माझे बींग फुटले. Happy

केदार तुझ्या अभ्यासाला साष्टांग दंडवत..____/\____ आणि ________

तुझा अभ्यास नक्की कोणत्या कोणत्या क्षेत्रात आहे ते सांग. कारण मार्केटच्या बीबीवर आम्हांला अमूल्य मार्गदर्शन करत असतोसच.

केदार केवढा अभ्यासपुर्ण लेख आहे हा.
छानच. एवढ वाचन करुन परत ते सुसंगतपणे लिहितोयस सुध्दा Happy
मस्तच. पुढच्या लेखाची वाट बघतेय.

आडो, अगदी! इतके सगळे एका माणसाला कसे जमु शकते? संस्कृती,इतिहास्,मार्केट! हॅट्स ऑफ!!! Happy
हा लेख खूप आवडला. तुझे वाचन किती(!!!) आहे हे कळतेय.
ही सर्व माहिती नवीन होती, वाचायला मजा आली.
या मालिकेचे १७६० भाग झाले तरी चालतील, पण तू हात आखडता घेऊन लिहू नकोस. प्लीज!

केदार तो काट्छाट केलेला भाग पण टाक रे. त्यातूनही खूप काही माहिती मिळेल. आणि पुढच्या वेळेस जरा देखील काट्छाट करू नकोस. Happy

केदार तो काट्छाट केलेला भाग पण टाक रे. त्यातूनही खूप काही माहिती मिळेल. आणि पुढच्या वेळेस जरा देखील काट्छाट करू नकोस.
>> अनुमोदन..

तुझा अभ्यास छान.. - लेखाचा सुरुवातीचा भाग जरा त्रोटक वाटला ..पण एकूणात लेख चांगला Happy

पण मग हे मायग्रेशन का होऊ शकते? त्या बद्दल तुमचा व्हियू काय आहे?

साधारण पणे BC १०००० पर्यंत माणुस हा hunter and gatherer होता. या नंतर माणुस २ स्वतंत्र व्यवसाय करु लागला. उत्तरेला पशुपालन हा प्रमुख व्यवसाय होता. तर दक्षिणेला शेती. पशुपालन करणारे
लोक टोळ्यांनी रहात. आपल्या प्राण्यांच्या कळपाचे संरक्षण सतत करणे गरजेचे होते. अश्वकला ही या
गरजेतुनच निर्माण झाली.
दक्षिणेला शेती करणारे त्या मानाने स्वस्थ होते याला कारण शेत कोणी पळवुन नेउ शकत नाही. पीक आले की कापणी नंतर काही काळ दरोडेखोरांपासुन सावध रहावे लागे पण वर्षभर शेताचे रक्षण करण्याची गरज नव्हती. शेती करणारे तसे गरीबच असत परंतु एका जागी भरपुर काळ राहिल्याने त्यातिल काही श्रीमंत होत. उत्तरेचे लोक जसे जसे अश्वकलेत निपुण होत गेले तसे तसे हिवाळ्यात दक्षिणेला हल्ला करुन काही संपत्ती लुटणे हा side buisness झाला. सुरवातीला हे हल्ले क्वचितच होत असावेत पण हळुहळु ह्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत गेले. अशात मग काही टोळींच्या राजांनी आपले प्रतिनीधी या प्रदेशात कायमचे ठेवले. हा उपक्रम हल्ली ह्ल्ली म्हणजे मुघल येइ पर्यंत चालु होता.
इतिहास आजच्या द्रुष्टीतुन पाहताना एक चुक नेहमी होते. आपण मुघलांचे (किंवा इतर राजांचे) राज्य म्हणुन बरेचदा अक्खा भारताचा नकाशा (south & far east) सोडुन रंगवलेला पाह्तो. प्रत्यक्षात पुर्वी अनेक राज्य एकमेकांना overlap करत. हे नकाशे फ॑क्त त्या संस्क्रुतीची पहुन्च दाखवित. अदिलशाह हा तुर्कस्थानच्या ottoman king चा पळुन आलेला मुलगा होता हे आताचेच एक migration चे उदाहरण. असे अनेक राजपुत्र फार पुर्वीपासुन India China (China मध्ये mongol, siberian टोळ्या) मध्ये बिनबोभाट राज्य स्थापन करीत.

फार पुर्वी रशियातून हे आर्य आले अशीही एक थेअरी होती, पण आता त्यात दम राहिला नाही. तिथे राम कथा आहे का? हे तपासायला पाहिजे.

रशिया फार उत्तरेला आहे. आर्य हे मध्य asia (Media) मधुन आले हे सयुक्तिक वाट्ते.
ved.GIF

Ref: http://www.heritageinstitute.com/zoroastrianism/aryans/airyanavaeja.htm#...

आधी मी म्ह्टले त्याप्र्माणे
राम (Egyptians राजे "रा" या सुर्यदेवाला सर्वश्रेष्ठ आणि राजाला त्याचा प्रुथ्वी वरील अवतार मानत)
Amun-Ra , Atun-Ra ही Egyptians लोकांची composite gods ची नावे होती जी
ईरानीयन "आहु रा" वेदिक "ind Ra" मध्ये सापडतात.

या वरुन असे वाटते की हे आर्य केंव्हा तरी Egyptians शी संकरीत झाले असावेत वा त्यांच्या समकालीन असावेत. याउलट Thai/Vietnameese Hinduism मध्ये shiva ला जास्त महत्व आहे,
ही जुनी चंपा civilization ख्मेर राजवटीत त्यांचा वैष्णव लोकांशी संबंध आलेला दिसतो.
रावण हा देखील शीवाचा भक्त होता हे प्रसिध्द आहेच.

कधी कधी असे देखिल वाट्ते की रामायण अर्धी काल्पनिक गोष्ट ही असेल
राम (incarnation of Ra the sun)
वानरा (Helpers of Ra)
रावण ( enemy of Ra)

रावन ~ वानर खुप जवळचे शब्द वाट्तात
देव ~ वेद खुप जवळचे शब्द वाट्तात
यातुन हे शब्द रचणार्यांना काहीतरी सुचवाय्चे होते असे नाही वाटत तुम्हाला?

Pages

Back to top