वेदकालीन संस्कृती भाग ३
वेदकालीन संस्कृती भाग १
वेदकालीन संस्कृती भाग २
मागील भागात आपण आर्यन थेअरी, आर्य-अनार्यांचे देव ह्या बद्दल माहिती पाहिली. ह्या भागात हिंदू धर्मग्रंथाची व त्यावर आधारीत साहित्यप्रकारांची थोडक्यात ओळख पाहू.
हिंदू संस्कृती म्हटले की वेद, वेदांत, वेदांगे हे लगेच समोर येते. बर्याच जणांना केवळ चार वेद आहेत, व ते अपौरुषेय आहेत एवढेच माहिती असते, पण वेदांशिवाय जे काही साहित्य आहे ते देखील हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे.
चारही वेद (ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद), वेदांग, वेदांचे उपग्रंथ, जैमिनीची धर्म मीमांसा, बादरायणाची ब्रह्ममिमांसा, अशा काही मिमांसा, वेदांवर आधारित उपनिषदे, व प्रत्येक वेदांचे उपग्रंथ जसे ब्राह्मण आणि आरण्यक, काही उपवेद जसे आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, पुराणवेद इ इ असे सर्व मिळून आपली आजची संस्कृती वा धर्म बनला आहे.
वेद म्हणजे ज्ञान. प्रत्येक वेदाच्या पठणानुसार व तत्वज्ञानानुसार अनेक शाखा होत गेल्या. चारी वेदांच्या एकूण ११८० शाखा आहेत व एक लाखापेक्षा जास्त ऋचा त्यात होत्या. ज्यातील २०,३७९ ऋचा आज अस्तित्वात आहेत. सर्वात जास्त, ऋग्वेदाच्या १०,५५२ ऋचा, ह्या दहा मंडलांत आज अस्तित्वात आहेत. ऋग्वेदाच्या मुख्य संहितेमध्ये मधून मधून जी काही परिशिष्टे जोडली आहेत, त्यांना खिलसूक्ते म्हणतात. कारण ही सूक्ते मूळ भाग नाहीत, तर पदपाठकार शाकल्य ऋषींनी हे जोडले आहेत. अशी एकंदर २६ खिलसूक्ते आहे. पुरूषसूक्त, श्रीसूक्त हे ह्याचाच भाग आहे. कधीकधी नारायण ऋषी असाही उल्लेख आढळतो.
ऋग्वेद : ऋग्वेद या सामासिक पदातील ऋग् म्हणजे ॠचा म्हणजेच पद्यात्मक मंत्र. हे मंत्र छंदंबद्ध असतात.वेदोत्तर साहित्यात अशा रचनेस श्लोक हे नाव प्राप्त झाले. एका सूक्तात साधारण तीनपासून ते ५६ पर्यंत ऋचा असू शकतात. एकू्ण १५ छंद, त्यापैकी गायत्री, अनुष्टुप, जगती , त्रिष्टुप, पंक्ती , उष्णिक व वृहती हे वारंवार आढळतात. व्याकरणावरील लेखात ह्यावर जास्त चर्चा करु. गायत्री ह्या छंदात २४५० ऋचा आहेत.
ऋग्वेदामध्ये पहिल्या आठ मंडलात देवांची स्तुती आढळते. ऋग्वेदातील अनेक देवता ह्या निसर्गाशी संबंधित आहेत, वायू, वरुण, सूर्य, नद्या, उषा, अग्नी, गाय इत्यादी. निसर्ग स्तुती व निसर्गातील बदलांमुळे जीवनसृष्टी कशी प्रभावीत झाली आहे हे त्यात प्रामुख्याने मांडले आहे. अनेकदा एका देवाची स्तुती दुसर्या देवाला पण लागू होते, जसे अग्नी. अग्नीची स्तुती करताना त्याला, तू आधी तू वरुण होतोस, मग धगधगलास की सूर्य होतोस, असे वर्णन जागोजागी आढळते. सुरुवातीच्या काळात वरुणाला दिलेले महत्व नंतर इंद्र ह्या देवतेस दिलेले दिसते, कारण संकरकाली अनेक युद्धे होत होती व त्यात इंद्रदेव पराक्रम गाजवत होता. ९ व्या मंडलात सोमयागाबद्दलचे विवेचन आहे तर दहाव्या मंडलात विविध सूक्ते व ऋचा आहेत. व्यावहारिक वा लौकिक जीवनातली सूक्तेही १० व्या मंडलात आढळतात. पहिल्या मंडलातील काही ऋचा ह्या रामायणाचा संबंध दाखविणार्या आहेत असे काहींचे म्हणणे आहे. रामायण विषय मी थोडा विस्तृतपणे नंतर मांडेन.
वाचस्पती, विश्वकर्मा, गंधर्व, अप्सरा, हिरण्यगर्भ, भूतपती या दुय्यम देव व अप्सरांसंबंधीची माहिती व सूक्तेही ही ॠग्वेदात आढळतात. ऋग्वेदकालीन समाजरचना जातिभेदात्मक नव्हती असे जातींच्या अनुल्लेखावरुन मानता येते. ब्रह्म, क्षत्र व विश् असे व्यवसायभेद मात्र आढळून येतात. ह्यांना वर्ग म्हणता येईल. दहाव्या मंडलातील काही ऋचा हे स्पष्ट करतात. जसे 'इन्द्रायेन्दो परिस्त्रव' वरवर पाहता ह्याचा अर्थ फार सोपा वाटतो, पण इतर ऋचांसोबत जोडल्यावर त्याचा अर्थ असा निघतो, " माणूस विविध व्यवसाय करीत असतो व त्याच्या विविध धारणा असतात. सुताराला मोडलेले लाकूड, वैद्याला रोगी, पुरोहिताला सोमयाजी, सोनाराला चमकदार हिरे बाळगणारा श्रीमंत, घोड्याला चांगला रथ आणि बेडकाला पाणी पाहिजे, यास्तव सोमा, तू इंद्राकरता वाहत राहा. सांसारिक लोकांना जुगारी होउ नका ही शिकवणही त्यात आहे. संपत्ती असेल तिथेच गाय व बायको रमते असे सवितादेव सांगतो. अन्नदानसूक्तात स्वार्थीपणा हा वधाचा एक भाग आहे असे म्हटले असून, स्वार्थी व अप्पलपोट्या माणसाची निंदा केली आहे.
सामवेद : ऋग्वेदातील ज्या ऋचांवर गायन करायचे त्यांचा संग्रह म्हणजे सामवेद. एकूण १६०३ ऋचा आहेत, ज्यातील ९९ ऋचांचा समावेश ऋग्वेदात नाही. सामाचे म्हणजे गायनाचे अनेकविध प्रकार व शाखा ह्यांचे विस्तृत वर्णन ह्या वेदात आहे. जैमिनिय शाखेत एकू्ण गानप्रकार ३६८१ एवढे सांगितले आहेत. गायनाचा इतका समग्र अभ्यास जगातील कुठल्याही धर्मग्रथांत झाल्याचे मला आढळलेले नाही!
यजुर्वेद : यजुर्वेद हा अध्वर्यू नामक ऋत्विजाचा वेद आहे. यजुष् म्हणजे यज्ञात म्हणावयाचे गद्य मंत्र. पातंजल महाभाष्याप्रमाणे एकूण १०१ शाखा आहेत असे मानले जाते, पण आज सहा आढतात. त्यात दोन मुख्य भेद. कृष्ण व शुक्ल. तैत्तरीय, काठक, मैत्रायणी, कापिष्ठल ह्या कृष्ण यजुर्वेदाच्या उपशाखा तर काण्व व माध्यंदिन ह्या शुक्ल पक्षाच्या शाखा. महाराष्ट्रात काण्व चे कण्व व माध्यंदिनाचे माध्यांजन ब्राह्मण आजही आढळून येतात. शुक्ल यजुर्वेदाच्या संहितेस वाजसनेयी संहिता असेही म्हणतात. वाजसनेय म्हणजेच वाजसनी ऋषींचा पुत्र याज्ञवल्क्य. ह्या याज्ञवल्क्य ऋषीने पुढे उपनिषदांत मोठे कार्य करुन ठेवले आहे. यजुर्वेद, एकूण अध्याय ४०. सुप्रसिद्ध अश्वमेध यज्ञ ह्या वेदातील २२ व २३ व्या अध्यायात आहे. तसेच पुरुषमेध हा देखील यज्ञ आहे. मेध चा अर्थ वध असला तरी पुरुषमेधात पुरूषवध नाही तर त्यातील वाईट प्रवॄत्तींचा वध अशी कल्पना केलेली आहे. संन्यासासाठी हा यज्ञ आवश्यक समजला गेला. प्रत्येक हवी देताना 'स्वाहा' हे पद उच्चारायचे इतके सोपे मंत्र ह्या वेदात आहेत. उदा अग्नेय स्वाहा, इंद्राय स्वाहा. वगैरे. खांडवनवनाची कथा सगळ्यांना आठवत असेल इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहाची. ह्यावरुन महाभारत होण्यापूर्वी यजुर्वेद असावा काय? ( हे माझे मत वा कयास )
अथर्ववेद : अथर्ववेदात विविध प्रकारचे शत्रूनाशक मंत्र व इतर मंगल / अमंगल मंत्रांचे संकलन आहे. बहुसंख्य ऋचांची रचना अथर्वण ऋषींनी केल्यामुळे अथर्ववेद असे नाव आहे. पण आधी लिहिल्याप्रमाणे त्या ऋषीच्या शिष्यसमुदायला पण तेच नाव प्राप्त होई. म्हणून अथर्वऋषीनी व त्यांचा शिष्यांनी मिळून लिहलेला वेद असे मानावयास हरकत नसावी. अथर्ववेदाच्या एकून ९ शाखा. पिप्पलाद, तौद, मौद, शौनक, जाजल, जलद, ब्रह्मवद, देवदर्श आणि चारणवैद्य. पैकी पिप्पलादाचे उपनिषद फारच प्रसिद्ध आहे.
अथर्ववेदातील कर्मे एकून दहा विभागात मांडली गेली आहेत. १. भैष्यजकर्मे २. आयुष्यकर्मे ३.अभिचारकर्मे, ४ स्त्रीकर्मे ५ सांमनकर्मे ६ राज्यकर्मे ७ ब्राह्मण ८.पौष्ठिककर्मे ९. शांतिकर्मे आणि १०. विश्वोप्तती व अध्यात्म.
पैकी भैष्यजकर्मात विविध रोगांच्या निर्मूलनासाठी वापरायचे मंत्र, निदाने व उपचार आहे. ज्वर, अतिसार, मूत्ररोध, नेत्ररोग, वातपित्तकफादी दोष, ॠदय्रोग, कावीळ, कोड, यश्मा, जलोदर इ सांठी चे उपाय व मंत्र ह्यात मांडले आहेत. पुढे जाऊन आयुर्वेद ह्या वेदांग निर्मितीसाठीची तयारी म्हणजेच भैष्यजकर्मे. वरील प्रत्येक कर्मात खूप माहिती आहे व त्याचा विस्तार पुढील काळात होत गेला. इथे मी सर्व कर्मांची ओळख करुन देऊ शकतो, पण प्रत्येक कर्मावर त्रोटक लिहायचे तरी एक एक लेख होऊ शकतो, विस्तारभयामुळे व वेद साहित्याची ओळख एवढीच व्याप्ती ठरवल्यामुळे पुढे जाऊयात.
संहिता : म्हणजे संग्रह. वेगवेगळ्या ऋषींनी रचलेले गद्य व पद्य एका विषयाला धरुन एकत्रित केले की त्याला संहिता म्हणतात. उदाहरणार्थ मैत्रायणी संहिता.
ब्राह्मण ग्रंथ: ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण इ इ हे गद्य साहित्य आहे. त्यात विविध यज्ञ कसे करायचे ह्याचे तपशिलात विवेचन असते, यज्ञातील अधिकारी, यज्ञकर्मे, इच्छित देव, करावयाची कामे इ इ सोबतच धर्माचे व जीवनाचे तत्वज्ञान ह्या ब्राह्मण ग्रंथांतून मांडले आहे.
आरण्यक - प्रत्येक शाखेचे एक ह्याप्रमाणे ११८० आरण्यके एकेकाळी अस्तित्वात होती. त्यातील केवळ बोटावर मोजण्याएवढी आरण्यके आज उपलब्ध आहेत. मात्र आरण्यकातील मुख्य भाग, म्हणजे उपनिषदातील ज्ञान मात्र आज बर्यापैकी उपलब्ध आहे. आरण्यकांमधून देवाबद्दल व एकूणच तत्वज्ञानाबद्दल विवेचन आहे. देवाची भक्ती कशी करावी, मन, काया, आत्मा, परलोकीचे जीवन, पुर्नजन्म, इत्यादींचा वेध त्यातून घेतला आहे. उपनिषदांसह आरण्यके म्हणजेच, 'वेदान्त' अथवा वेदांचा अखेरचा भाग. पाणिनी व बुद्ध यांच्यापूर्वीच आरण्यके व मूळ १३ उपनिषदे निर्माण झाली असे आता बहुतेक सर्व संशोधक मानतात. आज मुख्यत्वे सहा आरण्यके आढळतात. ऋग्वेदाचे ऐतरेयारण्यक व कौषतकी किंवा शांखायनारण्यक, कॄष्णयजुर्वेदाचे तैत्तरीयारण्यक, शुक्लयजुर्वेदाचे बृहदारण्यक, सामवेदाचे जैमिनीय उपनिषदब्राह्मण आणि कृष्णयजुर्वेदाच्या मैत्रायणी शाखेचे आरण्यक उपनिषत्.
उपनिषदे : उपनिषदांतील तत्वज्ञान हे दोन प्रकारचे आहे. एक उपदेशात्मक व दुसरे युक्तीवादात्मक. काहीकाही ठिकाणी सरमिसळ आहे. तर्क व युक्तीवादावर भर असला तरी मात्र कठोपनिषदात आत्मज्ञान तर्काने प्राप्त होत नाही असेही सांगीतले आहे. एकूनच अध्यात्म, दैव, तत्वज्ञान ह्यांची चर्चा विविध उपनिषदांतून आढळते. एकूण १३ मुख्य उपनिषदे आहेत.
१. छांदोग्योपनिषद - सामवेद व छांदोग्य ब्राह्मणाचा मिलाफ होऊन हे उपनिषद तयार झाले आहे. ॐ मंत्राचा महात्मा ह्यात वर्णन केलेला आहे. कर्माचे फल व पुनर्जन्मावरील भाष्य देखील ह्यात आढळते. मानव धर्म, त्याचे साध्य, ध्यानधारणा व ध्यानाचे रोजच्या जीवनातील महत्व ह्यावर विवेचन ह्या उपनिषदात आहे.
२. केनोपनिषद - केन म्हणजे कोण? ह्या सर्वसृष्ठी पाठीमागे कोण आहे. केनोपनिषदात ब्रह्मज्ञान कसे प्राप्त करावे ह्याचे विवेचन आहे. उदा. पहिलाच प्रश्न पाहा.
केनेषितं पतति प्रेषितं मनः
केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः |
केनेषितां वाचमिमां वदन्ति
चक्षु: श्रोत्रं क उ देवो युनक्ति ||१||
अर्थात कोणामुळे प्राण शरीरातून वाहतो, मन म्हणजे काय? कोणामुळे वाणी बोलते? कोणामुळे नेत्रानी पाहता येते वा ऐकता येते? ह्या व अशा प्रश्नांवर आधारित भाष्य केनोपनिषदात आहे.
३. ऐतरेय उपनिषद - हे उपनिषद ऋग्वेदासंबंधी आहे. केनोपनिषदाप्रमाणेच जीवनावरील भाष्य, प्रश्न, विविध अवयव व त्यांचे इत्सित कार्य ह्यात चर्चिले गेले आहेत.
४. कौषतकि - ह्या उपनिषदात हिंदू तत्वज्ञातील पुनर्जन्माबद्दलची चर्चा आहे.
५. कथोपनिषद - ह्या यजुर्वेदीय उपनिषदात, ऋग्वेदातील एका कथेच्या आधाराने प्रश्नोत्तर आहेत. भगवद्गीतेतील बराचसा भाग ह्या उपनिषदाशी मिळता जुळता आहे.
६.मुंडकोपनिषद - मुंडक म्हणजे टक्कल. त्याअर्थाने हे टकलूउपनिषद. वेदांगे व ब्रह्मज्ञान ह्यावरील भाष्य व फरक ह्यात आहे.
७. तैत्तरेय उपनिषद - तीन भागात असलेल्या ह्या उपनिषदात पहिल्या भागात वाणी, उच्चार, व्याकरण ह्याबद्दल चर्चा तर दुसर्या वर तिसर्यात परमार्थ ज्ञान ह्या संकंल्पनेवर चर्चा केलेली आढळते.
८.बृहदारण्यकोपनिषद - ह्या उपनिषदाचे तीन कांड आहेत. पहिल्या मधु कांडात माणसाची स्वतःची विश्वशक्तींशी ओळख ह्याची चर्चा आहेत. दुसर्या मुनीकांडात तत्वज्ञानावर भर आहे तर तिसर्या खिलकांडात उपदेश, उपासना, ध्यान व भक्ती ह्याचे विवेचन आहे.
९. श्वेताश्वतर उपनिषद - ह्या उपनिषदाचा उद्गाता खुद्द शिव आहे असे मानले गेले पण त्यावचेळी श्वेताश्वतर नावाचे ऋषी पण आहेत त्यांनीही हे लिहिले असेही मानले जाते. मनुष्यात असलेल्या ईश्वराबद्दलचे चिंतन ह्याउपनिषदात आहे.
१० प्रश्नोपनिषद - ह्यात वेगवेगळे सहा प्रश्न कर्ते पिप्पलादाला प्रश्न विचारतात. ते सहा प्रश्नकर्ते हे क्षत्रिय वा ब्राह्मण आहेत. भारद्वाजपुत्र सुकेश, शिबीपुत्र सत्यकाम, सूर्याचा नातू गार्ग्य, अश्वलापुत्र भार्गव, कात्यपुत्र कंबंधी हे पिप्पलादाकडून ज्ञानप्राप्त करुन घेतात. विविध तत्वज्ञानसंबंधी प्रश्न व त्याचे उत्तर म्हणजेच प्रश्नोपनिषद.
बाकीची मुख्य उपनिषदे म्हणजे इशाव्यास, मांडूक्य व मैत्री. प्रत्येक उपनिषदात आत्मज्ञान, ध्यान, इश्वर, भक्ती, मनुष्यजीवन, शरिरासंबंधी प्रश्न इत्यादीचे विवेचन आहे. हिंदू संस्कृतीच्या तत्वज्ञानाचे सार म्हणजे ही उपनिषदे होत.
आदि श्रीशंकराचार्यांनी ईश, ऐतरेय, कठ, केन, छांदोग्य,प्रश्न, तैत्तिरीय, बृहदारण्यक, मांडूक्य आणि मुंडक ह्या उपनिषदांवर भाष्य केलेले आहे.
उपनिषदातील भूगोल हा उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत आहे. उदा. - प्रश्नोपनिषदातील भार्गव हा विदर्भाचा होता अशी सुरुवात पहिल्या मंत्रापासूनच आहे. ॠग्वेदासारखे इथे भूगोलाबाबत अनिश्चितता नाही.
वेदांगे : - एकूण सहा वेदांगे आहेत. जसे व्याकरण, ज्योतिष्य, निरुक्त, शिक्षा, छंद, आणि कल्पसूत्र. वेदागांमध्ये ह्या प्रत्येक अंगाची विस्तृत माहिती व त्यावरील भाष्य आहे. ज्योतिष्यांतर्गत खगोल शास्त्र, बीजगणित ह्यांचा अभ्यासही वेदांगांतून दिसतो.
फक्त ह्या वेदांगांवर मिळून एक वेगळा लेख लिहायचा मनोदय आहे. त्यात बीजगणित, भूमिती, आर्युवेद, खगोलशास्त्र इत्यांदींचा आढावा घ्यायचा आहे.
स्मृती : वैदिकांच्या समाजसंस्थेत वेदपूर्वकालापासून सूत्रकालापर्यंत जे सामाजिक व धार्मिक आचार विचार रुढ होते त्यांचा संग्रह म्हणजे स्मृती. गृहसूत्रे, धर्मसूत्रे व व्यवहार केवळ स्मरणाने लक्षात व सुरक्षित रहात नव्हते म्हणून ते ग्रंथ रुपाने पुढे आले. विविध विधिनिषेधांची, कर्मकांडांची, आचाराची आणि सामाजिक रुढींची मांडणी ह्या स्मृतींमध्ये आहे. आश्वलायन, आपस्तंब, पारस्कर, गोभिल, कौशिक, बौधायण अशी १७ मुख्य धर्म व गृह सूत्रे आहेत व ह्या स्मृती त्यावर आधारीत आहेत. लक्ष्मणशास्त्री जोश्यांनी आजपर्यंत संपादित वा ज्ञात नसलेल्या ४६ स्मृतींचे संपादन, संग्रह केला आहे. ह्यावरुन एकू्ण स्मृतींचा विस्तार लक्षात यावा. सध्या एकच प्रसिद्ध वा कुप्रसिद्ध स्मृती आहे ती म्हणजे मनुस्मृती. मुख्य म्हणजे ह्यात इतर काही ग्रंथांप्रमाणेच काही पाठांत चातुर्वर्ण्याचे रुप दाखविले आहे, ते पाठ आजच्या दॄष्टीने जातीभेदवाचक मानले तरीही इतर खूप मोठा भाग तत्कालीन धर्माचे विवेचन व इतर रुढींची मांडणी असा आहे.
पुराणे : नावाप्रमाणे पुराण म्हणजे जुने, जुन्याकाळचे. पुराणांची निर्मिती विश्वनिर्मितीच्या रहस्य उकलीपासून ते आजपर्यंत इतिहासाची नोंद घेण्यासाठी केली आहे. हे विश्वनिर्मितीचे रहस्य आजच्या भाषेत वैज्ञानिक आधार असलेले असेल असे नाही, तर तत्कालीन तत्वज्ञानावर आधारित असलेली विश्वनिर्मिती, इतिहासाचे वर्णन करणे, वेगवेगळ्या राजांची वर्णने, वंशावळ्या ठेवणे, भूगोल, काळ इ सर्वांचा उल्लेख पुराणात आहे. त्यातही महापुराणे व उपपुराणे असा भेद आहे. महापुराणांचे प्रकार १८.
१. ब्रह्य २. पद्म ३. विष्णु ४. शिव ५. भागवत ६ भविष्य ७ नारद ८ मार्कंडेय ९ अग्नी १० ब्रह्मवैवर्त ११ लिंग १२. वराह १३. स्कंद १४.वामन १५. कूर्म १६ मत्स्य १७ गरुड १८ ब्रह्मांड
पुराणांमध्ये देव-असुरांची युद्धे, भूगोल इ चे वर्णन आहेच पण त्याशिवाय विविध चरित्रे, व्रतवैकल्य, स्मार्त, धर्मशास्त्र, तीर्थस्थाने इ विषय पण आहेत.
पुराणातील इतिहास हा विविध देवांची अदभूत वर्णने, अतिशयोक्ती व कल्पनाविलासाने भरला आहे त्यामुळे बरेचदा कालमापन करुन इतिहासाशी पडताळणे अवघड होऊन बसते. काल्पनिक काय व खरे काय ह्याची सांगड त्यामुळे लागत नाही. भूगोलातील वास्तू, पण अतिशयोक्त वर्णन, ह्यामुळे इतिहासकारांची मोठी गोची होते. उदाहरणच द्यायचे झाले तर आपण दोन मोठी उदाहरण बघू. वेदांत मनुष्याचे साधारण वय १०० सांगीतले आहे परंतु,
१. पुराणात दशरथ राजाने ६०,००० वर्षे राज्य केले, रामाने ११,००० वर्षे राज्य केले व विश्वामित्राने १०,००० वर्षे तप केले. ह्या उदाहरणात कालगणनेला एक वेगळा अन भलताच अतिशयोक्तीपूर्ण अर्थ पुराण लिहिणार्यांनी देऊन ठेवला आहे.
वि का राजवाड्यांनी ह्याची फोड फार मस्त करुन दाखवली आहे. ती कशी ते पाहू. पुराणांप्रमाणे, कलियुग ४३२००० वर्षे, द्वापारयुग ८६४०००, त्रेतायुग १२९६००० व कृतयुग १७२८०००, महायुग ४३२०००० वर्षे होतात. कोणाही इतिहासकाराला व व्यक्तीला हे खोटे आहे हे लगेच लक्षात येऊ शकते. ह्या गणिताप्रमाणे जामदग्न्यकुलोत्पन्न परशुराम हा दाशरथीरामापर्यंत जिवंत होता (त्यांच्या युद्धाची कथा आहे) असे लिहिले आहे, तर मग परशूरामाचे वय दोन कोटी सोळा लाख वर्षे भरते. हे शक्य असेल का? ह्यावर उत्तर तो देव आहे, जगू शकतो हे असेल तर पुराणातले सर्वच बरोबर ठरेल हे म्हणण्याआधी एक क्षण थांबा, मी दुसरे उदाहरण महाभारतातले देतो.
२. महाभारतात पांडवांना १२ वर्षे वनात राहण्यास भाग पडले आहे हे तर सर्वज्ञात आहे. लोमेश ऋषी हे युधिष्ठिरासोबत तीर्थयात्रेस होते. वनपर्वात एके ठिकाणी ( वनपर्व १२१ | १९ ) लोमेश ऋषी युधिष्ठिरास म्हणतो की हा त्रेता व द्वापार युगाचा संधी आहे. ही पर्वणी सोडू नको. पुढे एके ठिकाणी पण हाच उल्लेख तीर्थस्थानी आहे. (वनपर्व १२५ | १४ ). ह्याच वनवासात हनुमानाची व भीमाची गाठ पडते. ती कपिध्वजाची कथा व भीमाचे गर्वहरण हनुमानाने कसे केले व पुढे हनुमानाचे गर्वहरण कृष्ण कसे करतो ती कथा सर्वांना माहित असेलच असे धरुन चालतो. तेथे उल्लेख आहे की 'एतत्कलियुगं नाम अद्चिराद्यत्प्रवर्तते' (भारत १४९ | ३७ ) म्हणजे तेंव्हा द्वापार व कलीचा संधी होता. थोडक्यात १२ वर्षात एकदा त्रेता व द्वापार व एकदा द्वापार व कलीचा संधी होता. शिवाय पुढे जाउन भारतीय युद्धानंतर २६ वर्षांनी कृष्ण इहलोक सोडतो. हे सव्वीसावे वर्ष फार महत्वाचे आहे, कारण युद्ध चालू असताना देखील बलराम श्रीकॄष्णाला म्हणतो , " प्राप्तं कलियुगं विद्धि" (शल्यपर्व ६० | २५ ) व जेंव्हा कृष्ण गेला (२६ वर्षानंतर) तेंव्हा कलियुग प्रवृत्त झाले असे म्हणतात, ह्यावरुन कलीयुगाची तीन वेळा आवृत्ती झाली असे स्पष्ट होते. जर वरील कालावधी (तो अनेक हजारो वर्षांचा) घेतला तर ह्या संधी कश्या होतील? ही केवळ देवांचे महात्म्य ठासून सांगण्यासाठी केलेली अतिशयोक्ती ठरु शकते. खरी कालगणना नाही. ह्या गणितानुसार प्रथम वेदकाळात चार वर्षांचे युग होते व नंतर ते ५ वर्षांचे झाले असा निष्कर्ष राजवाड्यांनी काढला आहे, जो आता सर्वमान्य ठरावा.
असे असले तरी पुराणांतून असेलेल्या वंशावळी व इतर घटना तत्कालिन समाजाचे दर्शन घडवतात. त्यामुळे पुराणातले सर्वच फेकुन देण्याजोगे नाही.
हिंदू साहित्य म्हटले की महाभारत व रामायण हे दोन्हीही त्यात येतात. ह्या लेखात आधीच तो खूप मोठा होत असल्याकारणाने ह्या दोन्हींची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही, कारण हे दोन्ही बहुतेक हिंदूंना माहिती असतात. रामायणा संबंधी अनेक विवाद आहेत. राम कोण होता, तो हिंदू तर सोडा, आर्य ही नव्हता, ह्यापासून तो चांगला होता, वाईट होता, विष्णूचा अवतार होता असे अनेक मतप्रवाह आहेत. रामायणातातील राम कोण? ह्यावर माझा पुढचा लेख लिहायचा विचार आहे.
ही होती आपल्या हिंदू साहित्याची तोंडओळख. ह्यात मी अजून जैन आणि बौद्धसंप्रदाय त्यांचे तत्कालीन लोकांवर परिणाम, संस्कृतीमधील बदल व साम्य, श्रीशंकराचार्य, भागवत संप्रदाय साहित्य, कालिदास, भवभूती इ लोकांचे साहित्य ह्यांचा आढावा घेतला नाही. जसेजसे लेखनकाल पुढे जाईल तसेतसे ते साहित्यही मांडायचा विचार आहे.
खुप छान माहिती. हे सगळे लेख
खुप छान माहिती.
हे सगळे लेख छापुन घेऊन लेकीला पाठवत आहे. वेद आणि वैदिक परंपरेविषयी भरपुर ऐकले जाते, पण मुळात वेद म्हणजे काय, त्यात काय लिहिलेय, ते कोणी लिहिलेय याचा काही पत्ताच नसतो. त्यासंदर्भात ह्या माहितीचा खुप उपयोग होइल.
धागा वर आणायला प्रतिसाद देते
धागा वर आणायला प्रतिसाद देते आहे. अजून वाचून झाला नाही. वाचून पुन्हा प्रतिसाद देईन.
वाचले. नेहमीप्रमाणे उत्तम.
वाचले. नेहमीप्रमाणे उत्तम.
केदार, उत्तम माहिती. एक
केदार, उत्तम माहिती.
एक प्रश्न : 'श्रुती, स्मृती, पुराणे' असा क्रम ऐकला आहे. श्रुतींमधे वेद, वेदांग, वेदांत यांपैकी नेमकं काय काय येतं?
वेदांचं वर्णन पाहता तो त्या काळातला 'एन्साय्क्लोपीडिया' (किंवा त्याहूनही, विकीपीडिया)सारखा संग्रह असावा असं मनात येतं. कोणा एकाने लिहिलेली ही माहिती नसून त्यात अनेकांनी भर घातली असावी, आणि म्हणूनच त्यांना अपौरुषेय म्हणत असतील का?
धन्यवाद. साधना बरोबर.
धन्यवाद.
साधना बरोबर. कश्याला अॅप्रिशिएट करायचे हेच मुळी आपल्याला माहित नसते अन ते करुन घेण्याची इच्छाही नसते. पण कोणे काळी मला वाटलं की हिंदू संस्कृतीच का असावी ग्रेट? म्हणून शोध घेणे चालू केले. अजूनही चालूच आहे.
नाहीतर ह्यां सर्वांची तोंडओळखही नसताना घातलेले वाद आहेतच. ते काय जागोजागी होतातच.
श्रुती म्हणजे ऐकलेले. ऐकीव
श्रुती म्हणजे ऐकलेले. ऐकीव परंपरांमधिल माहिती.
स्मृती म्हणजे ही माहिती डोक्यात साठवून ठेवणे.
पूर्वी श्रुती-स्मृती परंपरेने लोक हे साहित्य वाचवून ठेवत असत. पण कालौघात त्या साहित्यात देखील बदल होऊ लागले म्हणून पुढे स्मृती लिहल्या गेल्या. तसेच हे सर्व साहित्य लिहलं गेलं. लिहताना काही वेदपाठ गणांचा नाश झाल्यामुळे अनेक ऋचा लिहल्या गेल्या नाहीत.
एन्साक्लोपीडिया >> म्हणूनच त्यांना अपौरुषेय म्हणत असतील का? >>
हो विचार करु जाता असे मलाही वाटते. पण काही ग्रंथाप्रमाणे हे सरळ देवाने सांगीतले म्हणून अपौरुषेय, जी अतिशयोत्की असल्याचे मला वाटते.
अपौरुषेय मधील पुरूष ह्या शब्दाची फोड केली असता पुर + इश अशी होते. पुरात राहणारा तो पुरुष. पण इथे हे पुर म्हणजेच आपला देह. वैय्याकरणी लोक जास्त लिहू शकतील ह्यावर, पण मी आपलं मला आकळलेल सांगतोय.
केदार मी आधी लिहिल्याप्रमाणे,
केदार मी आधी लिहिल्याप्रमाणे, मूळ वेदातले बरेचसे नष्ट झालेय. (जे आहे त्याचा नुसता उल्लेख केलाय तरी बराच मोठा लेख झालाय ) ज्ञानेश्वरांनी जसे गीतेचे निरुपण केले, तसे वेदांच्या बाबतीतही व्हायला हवे होते, म्हणजे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले असते. आणि टिकलेही असते.
दिनेश तसे निरुपण आहेत. अगदी
दिनेश तसे निरुपण आहेत. अगदी मराठीतही आहे. श्रीकृष्ण देशमुखांनी बहुतांश उपनिषदांचे मराठीकरन केले आहे. ते सर्व मी वाचले आहे. इतरही कैक आहेत जसे चिन्मय मिशन इत्यादी.
शिवाय तुम्ही जर शोध घेतला तर अप्पा बळवंत मध्ये अनेक लेखकांचे भाष्य ह्यावर दिसेल.
मुळ प्रश्न आहे की गती वगैरे दुर किती जनांना ह्यात आवड असते? कोणालाही नाही. हे सर्व म्हणजे आध्यात्म आहे किंवा पुराणातील वांगी आहेत व आध्यात्म म्हातारा झाल्यावर बघता येईल अशीच धारणा असते त्यामुळे कोणी वाचत नाही. एकदा मी वेदभवनात गेल्यावर तिथल्या माणसाने विचारले बाबा बाहेर आहेत का?
केदार, माझे म्हणणे वेगळे
केदार, माझे म्हणणे वेगळे होते, ज्ञानेश्वरानी प्रत्यक्ष श्रोत्यांना समोर बसवून, त्यांच्या भाषेत निरुपण केले. (ते करताना शंका निरसनही नक्कीच केले असणार. त्याशिवाय का इतक्या रोजच्या जीवनातील उपमा भावार्थदिपिकेत आल्या आहेत. ) ते लिखित स्वरुपात नंतर आले.
आता जी वेदांवर पुस्तके आहेत, त्यांचा वाचक वर्ग सिमीत आहे. म्हणून सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचले नाही.
भारत एक खोज, सारखी एखादी मालिकाही दूरदर्शनवर सादर करता आली असती.
(एक मालिका आली होती, बहुतेक भारतदर्शन असे काहितरी नाव होते. त्यात व्याकरण वगैरे विषय हाताळले होते. सोहिला कपूर लिमये त्यात होती, पण ती मधेच बंद पडली.)
अभिमान कशाचा बाळगायचा, ह्याचे तर ज्ञान हवे ना ? ते झाले नाही.
आवड निर्माण करता आली असती. ती झाली नाही.
त्यातल्या त्यात आयुर्वेदाबाबत जनजागृती आहे, कारण लोकांना त्याच्या प्रत्यक्ष अनुभव घेता येतो, आणि त्याचा प्रसारही गावोगावीच्या वैद्यांमूळे झाला. परदेशी पण केरळ सारख्या राज्यात होणार्या आयुर्वेदीक उपचारांबद्द्ल माहिती आहे. काहि पर्यटक केवळ त्यासाठी भारतात येतात.
रच्याकने, पुराणातली वांगी नाहीत तर पुराणातली वानगी..
केदार, नेहमीप्रमाणेच छान
केदार,
नेहमीप्रमाणेच छान माहिती. लेख आवडला.
पण उपनिषदांचा भाग जरा गुंडाळल्यासारखा वाटला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता - ज्यांना हिंदू धर्माची प्रस्थानत्रयी म्हणतात- त्यांच्यावर एक सेपरेट लेख लिहिला असता तर एकसंध वाटले असते. त्यात मग कोणी लिहिले, कोणास सांगितले, त्यातले तत्वज्ञान वगैरे सगळे एकत्र आले असते. शंकराचार्यांवर लिहिणार आहेस असे तू लिहिले आहेस. त्याचबरोबर बाकीच्यांबद्दलपण कृपया लिही जसे, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, वगैरे. त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान, द्वैत, विशिष्टाद्वैत, वगैरे पण लिही.
सल्ले वगैरे देत नाहीये. पण हे सगळं वाचायला नक्की आवडेल. म्हणून लिहिले.
<<
पुरात राहणारा तो पुरुष. पण इथे हे पुर म्हणजेच आपला देह. वैय्याकरणी लोक जास्त लिहू शकतील ह्यावर, पण मी आपलं मला आकळलेल सांगतोय.
>>
बरोबर आहे. समर्थ रामदासांनी दासबोधातही असेच लिहिले आहे.
देहपुरामधें इश | म्हणोन तया नांव पुरुष |
जगामधें जगदीश | तैसा वोळखावा || दासबोध, दशक ११, समास ९, ओवी १२.
मला आठवत होते हे वाचलेले. म्हणून आज घरी आल्यावर शोधले. आणि चक्क सापडले.
<<हे सर्व म्हणजे आध्यात्म आहे किंवा पुराणातील वांगी आहेत व आध्यात्म म्हातारा झाल्यावर बघता येईल अशीच धारणा असते त्यामुळे कोणी वाचत नाही.
>>
खरे आहे. तत्वज्ञान वाचणे ही गोष्ट 'इन' नसल्यामुळे किंवा तो भयंकर काहीतरी अवघड प्रकार आहे असे वाटत असल्यामुळे फारसं कोणी वाचत नसावं. तसंच हे सगळं म्हातारं झाल्यावर का वाचतात कोण जाणे? म्हणजे भगवद्गीतेमध्ये जीवनात कसे वागावे ह्याबद्दल लिहिले असताना ते म्हातारपणी वाचून काय उपयोग? पण सगळे म्हातारपणीच वाचताना दिसतात.
केदार, चांगले संकलन आहे.
केदार, चांगले संकलन आहे. पुराणांमधील अतीशयोक्तीचे अजुन एक कारण म्हणजे ती पुराणे त्या देवांच्या भक्तांनी एकत्रीत केली होती.
केदार छान जमलाय हाही
केदार
छान जमलाय हाही लेख.
>>पण उपनिषदांचा भाग जरा गुंडाळल्यासारखा वाटला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता - ज्यांना हिंदू धर्माची प्रस्थानत्रयी म्हणतात- त्यांच्यावर एक सेपरेट लेख लिहिला असता तर एकसंध वाटले असते.
अनुमोदन.
अजूनही बरीच माहिती देता येईल. केदार तुझी हरकत नसेल तर ईथेच पोस्टेन. पण मुख्यत्वे हा फरक लक्षात घेतला पाहिजे:
आपल्या धर्मग्रंथांचे साधारणपणे तीन भागात वर्गीकरण होते- श्रुति, स्म्रुति, पुराणे (काही अभ्यासक यांना १,२, ३ अशा ऊतरत्या क्रमाने महत्व देतात):
श्रुति- ऋषींना उच्च भावावस्थेत जे "दिसले" आणि समजले आणि ते त्यांन्नी लिहीले ते म्हणजे श्रुति. वेद म्हणजेच श्रुति. थोडक्यात ऋषी हे वेदांचे कर्ते नव्हेत तर द्रष्टे आहेत. थोडक्यात वेद म्हणजे read only document त्यात बदल करता येत नाही (त्यातील त्रूटींसकट)
स्म्रुति- स्म्रुति या ऋषिमुनींनी प्रत्त्यक्ष लिहील्या आहेत. तत्कालीन समाजाची नीट व्यवस्था लावायच्या द्रूष्टीकोनातून स्म्रुति लिहील्या गेल्या ज्यात प्रामुख्यने पुढील विषय आहेत- चार वर्ण, चार आश्रम, आचार, व्यवहार, सोळा संस्कार, राजनिती, विद्याग्रहण, वगैरे. स्म्रुतिंवर टीका अन भाष्ये ऊपलब्ध आहेत.
पुराणे- वेद वांङ्मयाचा आत्मा म्हणजे पुराणे. भारतीय संस्क्रुतीचा (वेद, स्म्रुती वगैरे) प्रसार करण्यात अन ती तळागाळापर्यंत पोचवण्याचे मह्त्वाचे काम पुरणांनी केले. सर्व पुराणांना पुराणकथा म्हणतात कारण त्यात कल्पनाविलास, आशचर्य, गूढ, अशा सर्व प्रकारच्या कल्पना व प्रतिभेचे मिश्रण आहे. सर्वच पुराणे महर्षी व्यास यांनी रचली अशी एक श्रध्धा आहे.
उपपुराणे- यात विशीष्ट संप्रदाय वा पंथांचा द्रुष्टीकोन आहे. ऊपपुराणात पुन्हा निरनिराळ्या कथा/दंतकथा आहेत. अठरा उपपुराणे आहेतः
१. सनत्कुमार २. नरसिंह ३. नंद ४. शिवधर्म ५. दुर्वास ६. नारदीय ७. वामन ८. कपिल ९. कलि १०. उशनस ११. महेश्वर १२. वरूण १३. सौर १४. पराशर १५. सांब १६. भार्गव १७. मारीच १८. मानव
> सर्वच पुराणे महर्षी व्यास
> सर्वच पुराणे महर्षी व्यास यांनी रचली अशी एक श्रध्धा आहे.
व्यास म्हणजे एडीटर. (यापासुनच व्यासंग हा शब्द बनतो). त्यामुळे जो कुणी एखादे पुराण (किंवा कोणताही ग्रंथ) संकलीत्/एकत्रीत करतो, तो 'व्यास' बनतो.
सहमत. वेदव्यास समयातील असे
सहमत.
वेदव्यास समयातील असे अंतर (कल्प, युग) वगैरे दाखवणार नाहीत असे वाटते, कारण मग महाभारतापण असेच दिसून आले असते, तिथे ते दिसत नाही, त्यामुळे व्यासांनी रचले असे सर्व मानत असले तरी मला थोडे पटत नाही.
उपनिषद भाग गुंडाळला गेला आहे हे मलाही वाटले, शेवटच्या तीनला तर एका ओळीत संपवले, कारण लेख खूप मोठा होत चालला होता असे वाटले व लिहताना उपनिषद भाग सर्वात शेवटी लिहिला. पोस्ट करताना मात्र सुसंगत व्हावे म्हणून वेदांखाली, पुराणांच्यावर पोस्ट केला. फक्त मुख्य उपनिषदांची ओळख करुन देणारा एक लेख ही कल्पना मला आवडली. प्रश्नोपनिषदातील मला आवडणारे अनेक प्रश्न वगैरे ह्यात देता येतील. विचार करतो.
ह्या साहित्यात फक्त तत्वज्ञान आहे असे नाही. गणित, व्याकरण, विविध रोग, रोजची कर्म, माणसाचे एकमेकांसोबत संबंध, भारतातील मुख्य वंश व त्यांच्या वंशावळ्या, विविध राजांनी केलेली काम, कला, संगीत हे सर्व आहे. काही काही भाग अगदिच रटाळ वा कंटाळवाना देखील आहे. थोडक्यात स्वाती म्हणते तसा एन्साक्लोपीडियाच हे सर्व आहे.
सचिन द्वेताद्वेत हा भारतीय तत्वज्ञानाचा परमोच्च बिंदू आहे. माझा मर्यादा जाणून मी फारतर ओळख करुन देऊ शकतो. पण ह्या विषयावर मी माझ्या काकांना सांगतो एखादा लेख लिहायला. ते संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व रा चिं ढेर्यांचे शिष्य आहेत.
जबरदस्त माहिती आहे तिन्ही
जबरदस्त माहिती आहे तिन्ही लेख वाचले. भरपूर माहिती मिळाली. धन्यवाद केदार.
> द्वेताद्वेत हा भारतीय
> द्वेताद्वेत हा भारतीय तत्वज्ञानाचा परमोच्च बिंदू आहे.
माधवाचार्य, रामानुजाचार्य, शंकराचार्यांच्या या उपशाखा केवळ वेदांतावर आधारीत आहेत (म्हणजेच बादरायणाच्या उत्तर-मिमांसेवर).
केदार अतिशय सुंदर माहिती ..
केदार अतिशय सुंदर माहिती .. निवडक १०त गेली..
खरे आहे. तत्वज्ञान वाचणे ही गोष्ट 'इन' नसल्यामुळे किंवा तो भयंकर काहीतरी अवघड प्रकार आहे असे वाटत असल्यामुळे फारसं कोणी वाचत नसावं. तसंच हे सगळं म्हातारं झाल्यावर का वाचतात कोण जाणे?>>
कधी वाचावे . शाळेत तर अगदी गीता हि शिकवत नाही ६ वर्षे संस्कृत घेऊन त्यात रामचे मोत्यांसारखे पांढरे शुभ्र दात, नाचणाऱ्या अप्सरा, उर्वशी आणि कोण , असली कुठली तरी सुभाषिते शिकत बसायची कौतुकापुढे जाई पर्यंत संपले श्लोक .. सगळच तुटक तुटक . मग गच्छामि गच्छन्ति करत बसायचे.. प्रामाणिक पणे सांगते..तेव्हा शिकवण तर सोडाच जाचच वाटायचे त्यांचे हार तुरे आणि सगळे देव
तुम्ही स्वतः त्याच्या पुढे जावून काही केले तर ठीक .. मग कॉलेज मध्ये ..आमच्या पूर्ण ब्याच मधून एका मुलीने घेतले होते.. संस्कृत आणि वेदोपनिषद.. अगदी ८० टक्के मार्क्स मिळवून तिचे कोण कौतुक! आम्हाला पण महत आश्चर्यं !!
मग पोटा पाण्याचे >>भयंकर काहीतरी अवघड प्रकार >> हे आहेच मग राहतो कुठला वेळ
असो आंतर जालामुळे मी तरी आता बरेच जण बघते आहे ..अशी कुठून तरी बेसिक माहिती करून सुरुवात जरी झाली तरी खूप आहे .. पण उपनिषद वाचताना मला काही तरी मिस करतो आहे अस वाटले.. अर्धवट झाले वाचून पूर्ण करायचे आहे .. वाचताना कुठला क्रम उपयोगी ठरेल हे हि सांगितलं तर खूप मदत होईल समजायला ..केदार..
हो आश्चिग ती फक्त मिमांसा आहे
हो आश्चिग ती फक्त मिमांसा आहे पण दाखल्यांमुळे सोपी पडते, जशी गीतेची ज्ञानेश्वरी.
प्रित शाळेतून शिकवत नाहीत ते बरेच आहे. नाहीतर शाळा मदरसा ठरली असती.
वाचताना कुठला क्रम उपयोगी >> कुठला क्रम असे नाही, तिकडे जाण्याआधी शंकराचार्य लिखित काही भाष्य, टिका आहेत त्या मिळाल्या तर बघा. आधि थोडे कंटाळवाने वाटते, कधी कधी तर बोअर होण्याचे चान्सेस जास्त आहेत, पण सुलभीकरण असलेले पुस्तक वाचा मग त्यात रस निर्माण होईल. खासकरुन मराठी असेल तर उत्तम.
आणि मराठीतही लिहीणार्यांनी मुक्ती वगैरेचे आव आणून लिहले आहेत, तेंव्हा मुक्ती वगैरे भाग तितका सिरियसली न घेता वाचा, मग आपोआप अर्थ उलगडत जातात, ते मुक्तीच्या मार्गाला लागणे वगैरे सोडून द्या. त्यामुळे दासबोध ग्रेट वाटतो.
>>त्यामुळे दासबोध ग्रेट
>>त्यामुळे दासबोध ग्रेट वाटतो.
१०० अनुमोदन.
शाळा मदरसा ठरली असती>>तेही
शाळा मदरसा ठरली असती>>तेही आहेच म्हणा पण कुठे तरी पाळे मुळे तर रुजली पाहिजे
मुक्तीचा मार्ग हे तर माझ्या साठी खरे कारण आहे त्यांच्या वाटेला न जाण्यासाठी .. गीता मी धकत २० वेळा खाली ठेवली मुक्ती म्हणून कारण चुकीची हातात घेतली .. अर्थ लावून सांगितलेली.इंटरप्रीतेड आवृत्ती म्हणजे माझ्या साठी अशक्य ...आज साठी जगताना काही तरी अर्थ लागेल असं सांगा हो.. म्हणून उपनिषद चालू केला होता.. बाकी हि बरीचधर सोड केली आहे दासबोध आहे बहुतेक तिथून सुरुवात करते मग
केदार, सर्व भाग आवडले. आता
केदार,
सर्व भाग आवडले. आता मार्केट बरोबरच तू वेदकालीन संस्कृतीचाही अभ्यास करायला लावणार असं दिसतंय. अजून वाचायला आवडेल.
जाता जाता ... परशुराम हा नुसताच देव नाही तर चिरंजीव आहे. त्यामुळे दोन कोटी सोळा लाख काय आणि एक अब्ज काय ... नुसतेच आकडे त्याच्याकरता!
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनूमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरञ्जीविनः॥
केदार, वेदांच्या शाखा म्हणजे
केदार, वेदांच्या शाखा म्हणजे काय? बरेच दिवस हा प्रश्ण सतावत होता. बरे झाले तू भेटलास
प्रत्येक शाखेची वेगळी संहिता असायची का? तसे असेल तर वेद 'प्रमाण' कसे ठरले?
थोडे मागच्या भागांशी ताडून बघतो -
१. ऋग्वेद संस्कृत भाषेत आहे
२. ऋग्वेदात सरस्वतीचा महिमा वर्णन केला आहे. म्हणजे त्याचा लेखक ऋषी हा सरस्वतीच्या काठावर असलेल्या संस्कृतीचा नागरीक असला पाहिजे.
३. हराप्पा संस्कृतीची भाषा अजून उलगडली नाहि पण ती संस्कृत नक्की नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे.
४. म्हणजे मग वेद कोणी आणि कधी रचले?
का वरच्या मुद्यात काहीतरी जबरी हरवलय की जे आपण विचारात घेत नाही आहोत?
केदार तिनही लेख अतिशय
केदार तिनही लेख अतिशय माहितीपूर्ण.. हे लेख लिहिण्यामागे तू जे परिश्रम घेतो आहेस त्याबद्दल तुझे कौतुक करावे तेव्हडे थोडेच..
धन्यवाद. माधव वेदांच्या शाखा
धन्यवाद.
माधव वेदांच्या शाखा ह्या त्यातील तत्वज्ञानावर आधारलेल्या शाखा आहेत. त्यात पाठ भेदभाव आहेत. म्हणजे कुठली ऋचा कशी म्हणायची ह्यावरुन पण पाठ भेद निर्माण झाले आहेत. उदा. ऋग्वेदी ब्राह्मण आणि यजुर्वेदी ब्राह्मण हे एकच पाठ वेग वेगळ्या पद्धतीने उच्चारतात. तसेच ह्या शाखा विविध विषयांच्या पण आहेत. व्याकरणाचे वेदांग निर्माण व्हायला आधी व्याकरण शाखा असावी किंवा आयुर्वेद तयार होताना भैष्यज कर्मे पालन करणारी एखादी शाखा असावी असा माझा कयास आहे.
तुझे वरचे मुद्दे बरोबर आहेत. तुझे हे प्रश्न माझ्या पुढील लेखांकडे घेऊन जाणारे आहे. एकात मी रामाबद्दल (म्हणजे ऋग्वेद ह्या सर्वात जुन्या वेदातील पहिल्या काही ऋचांकडे घेउन जातात.) मांडणार आहे. त्यात राजा दानू (ज्याला पुढे आपण दानव ही सज्ञा दिली व राक्षस गण ह्या विषयीचे वर्णन करायचा प्रयत्न करणार आहे. तसेच सरस्वती नदी जिच्या प्रवाहावरुन मतभेद आहेत व जिचा अवेस्था संस्कृतीशी तिचा संबंध लावला गेला ते गृहितक मोडायचा प्रयत्न करणार आहे.
वेद कोणी रचले हे अजून कोणालाही सिद्ध करता येत नाही. मागच्या लेखात नानबाने निर्देश केल्याप्रमाणे लोथल, कालिबंगन ही अतिशय मोठी गाव सापडल्यामुळे आता विदेशी विद्वानांनी मांडलेल्या मागच्या सर्व गृहितकांना परत एकदा तपासून पाहावे लागेल. ऑफकोर्स हडप्पा, मोहंजदाडो मुळे हा तडा गेला होताच.
सरस्वतीचा प्रवाह व त्या आजूबाजूची मोठी गावं पाहिली की ही कोणाची संस्कृती हे लगेच लक्षात येते. तसेच काही लोकं वेद हे मोंजदाडो हडप्पाच्या आधीचे आहेत हे ही मांडतात.
उदा. ऋग्वेदी ब्राह्मण आणि
उदा. ऋग्वेदी ब्राह्मण आणि यजुर्वेदी >> बहुदा असे नसावे.
एका वेदावर प्रभुत्व यायला साधारण १३ वर्षे लागतात (घनपाठापर्यंत पोचायला). त्यामुळे सगळ्याच ऋषींचे सगळयाच वेदांवर प्रभुत्व असणे शक्य नव्हते. मग जो माणूस जो वेद शिकेल त्यावरून त्याला ऋग्वेदी, यजुर्वेदी अशी उपाधी मिळत असावी (पण मग सामवेदी आणि अथर्ववेदी का नाही?) किंवा एकापेक्षा जास्त वेद शिकणार्या ऋषींना द्विवेदी, त्रिवेदी अशी पदवी मिळत गेली. ऋग्वेदी व यजुर्वेदी यांच्यात पाठभेद आहेत पण ते पुढच्या काळात निर्माण झाले. पण त्या मूळ ११०८ शाखांमध्ये ऋग्वेदी व यजुर्वेदी या शाखा नव्हत्या.
व्याकरणाचे वेदांग निर्माण व्हायला आधी व्याकरण शाखा असावी किंवा आयुर्वेद तयार होताना भैष्यज कर्मे पालन करणारी एखादी शाखा असावी असा माझा कयास आहे.>> हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
आणि सगळ्या शाखांची संहिता पण एकच असावी. उगाच का पाठभेद होऊ नयेत म्हणून आजही वेदांगांच्या आणि विविध पाठांच्या नियमांनी वेदांचे पठण नियंत्रीत केले आहे? आजही काशीचा वेदशास्त्री आणि तेलंगणावरचा तेलंगी यांचे पठण जवळपास सारखेच येते.
--
--
माझी अशी समजूत होती की
माझी अशी समजूत होती की प्रत्येक वेदाचे 'संहिता, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे' असे चार भाग पडतात, पैकी उपनिषदे शेवटी म्हणून त्यांना वेदांत म्हणतात.
तसं नाहीये का? ब्राह्मणे इ. हे पूर्णपणे निराळे ग्रंथ आहेत का?
की त्याच माहितीचं क्लासिफिकेशन करण्याच्या या निरनिराळ्या पद्धती होत्या?
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Burckle_Crater
या थियरी नुसार इ स पुर्व २८०० साली हिन्दि महासागरात astroid आपट्ल्याने सर्वत्र पुर आले.
हडप्पा संस्कृती या पुराने तर नाश पावली नसेल?
हे crater प्रत्यक्षात मादागास्करच्या पुर्वेस सापडले आहे.
स्वाती, संहितेमध्ये (निदान
स्वाती, संहितेमध्ये (निदान ऋग्वेदाच्या) दैनंदिन आढळणार्या गोष्टींची स्तुती आढळते तर यजुर्वेदात पुजा, यज्ञ यांची माहिती आहे. वेदांतले तत्त्व्ज्ञान प्रामुख्यने वेदांतात आहे ज्यात प्रामुख्याने उपनिषदे येतात. पण अरण्यके ब्राह्मणे आणि उपनिषदे ही वर्गवारी पण आज धुसर झाली आहे. आज उपनिषदात गणले जाणारे 'बृहदारण्यकोपनिषद' हे मुळचे आरण्यक आहे - त्याचे नावच सांगते.
स्वाती आरण्यके, ब्राह्मणग्रंथ
स्वाती आरण्यके, ब्राह्मणग्रंथ इ बद्दल वर मांडले आहे मी. त्या त्या वेदातील गद्य साहित्य म्हणजे हे ब्राह्मण ग्रंथ.
आणि सगळ्या शाखांची संहिता पण एकच असावी >> हो काश्मीर ते कन्याकुमारी एकच साहित्य आढळेल. त्या त्या शाखेची तिच संहिता सर्वांकडे म्हणजे वाजसनेयी संहिता किंवा मैत्रायणी किंवा ब्रह्मसुत्रभाष्य हे सगळीकडे सारखेच आहे. गंमत अशी की इतक्या मोठ्या देशात सगळीकडे आजच्या काळातील स्टॅन्डर्डाझेशन होते. हे कसे शक्य झाले असावे ह्यावर १० मिनिटे विचार केला तर काय उत्तर येईल?
हडप्पाच्या काळात सलग तिनशे वर्ष दुष्काळ पडला होता त्यामुळे हडप्पा, मोहंजदाडो, अवेस्था ही मध्यपूर्वेतली संस्कृती ह्या नष्ट झाल्या असे आता नविन इतिहास सांगतो. लोथल, कालिबंगण ही गावे / बंदर ही त्यामुळेच लयाला गेली असावीत. ह्या बद्दल अजूनही एकमत नाही.
सरस्वती लुप्त व्हायला हा दुष्काळ कारणीभूत ठरला असावा का?
Pages