अवघी विठाई माझी (८) - ब्रसेल्स स्प्राऊट्स
मला आदरणीय असलेल्या एका लेखिकेच्या चिनी पाककृतीवरच्या मराठी पुस्तकात
असे लिहिले होते, कि ब्रसेल्स (कि ब्रुसेल्स?) स्प्राऊट्स म्हणजे कोबीच्या मूळाशी
जे छोटे छोटे गड्डे लागतात ते. बरीच वर्षे मी या गैरसमजात होतो.( एकदा तर
एका शेतात जाऊन शोधले पण होते. शेतकरीण बाई विचारायला आल्यावर म्हणालो
होतो, कि छोटे छोटे कोबी शोधतोय, हाताने आकार पण दाखवला, बाईला दया
आली असावी, चांगल्या माझ्या डोक्याएवढा गड्डा काढून हातात दिला माझ्या !!)
तर ब्रसेल्स स्प्राऊट्स हि कोबीच्याच (म्हणजे मोहरी, अलकोल च्या पण) ब्रासिका
कूळातली असले तरी तो एक वेगळा भाजीचा प्रकार आहे. आताच्या बेल्जियम (पूर्वीचा फ्लॅन्डर्स )मधे
त्याची लागवड पहिल्यांदा झाली असे मानतात. (म्हणून तर हे नाव.) एका दोन
फ़ूट्भर वाढणार्या दांडोर्यावर हे गड्डे लागतात. साधारण लिंबाएवढ्या आकाराचे
हे होत असले, तरी खाण्यासाठी मात्र अगदी छोटे छोटे गड्डेच निवडले जातात.
साधारण सुपारीएवढे गड्डे खायला चवदार लागतात.
ही भाजी थंड हवामानात चांगली होते. निवडताना एकसारख्या आकाराचे, गड्डे (खरे
तर गड्डा हा शब्द त्याच्या इवल्याश्या रुपाला शोभत नाही.) निवडून घ्यावेत. देठाचा
भाग कापून टाकावा. बाहेरची कडक असलेली पाने पण काढून टाकावीत. नीट शिजण्या
साठी, हवेतर देठाकडे दोन काप द्यावेत.
इतर नाजूक भाज्यांप्रमाणे, हि भाजी पण जास्त शिजवून चालत नाही. उकडली, वाफ़वली
वा तेलात परतली कींवा रोष्ट केली तरी सहा सात मिनिटात शिजते. जास्त शिजवली, तर
त्यातले गंधकाचे संयुग मोकळे होते, आणि त्याला वास येऊ लागतो.
या पदार्थासाठी मी ब्रसेल्स स्प्राऊट्स आणि बेबी कॅरट्स किंचीत वाफ़वून घेतली, आणि
त्यासोबत पास्ता, नट्स आणि हनी मष्टर्ड सॉस वापरला आहे (मध मोहरीचा सॉस जरा
कसेतरीच वाटतय लिहायला ) या ब्रसेल्स स्प्राऊट्सची चव थोडी गोडसरच असते, त्यामूळे
त्याबरोबर असा गोड पदार्थांचा संयोग चांगला लागतो. कांदा आणि आले यांच्याबरोबर
पण चांगले लागतात. हे बारिक कापून स्टर फ़्राय पण करतात, पण तसे केल्यास या भाजीचे
सौंदर्यच नष्ट होते.
ब्रसेल्स स्प्राऊट्स मधे ए,बी आणि सी अशी तिन्ही जीवनसत्वे असतात. कॅल्शियम आणि
मॆगनीज पण चांगल्या प्रमाणात असते. या भाजीच्या नियमीत सेवनाने, कर्करोगाची शक्यता
कमी होते. (आतड्याचा आणि ब्रेष्ट चा) पण हे या कूळातील सर्वच भाज्यांना लागू आहे.
नेमके शिजवण्याचे तंत्र पाळले, तर अनेक पदार्थात या भाजीचा उपयोग करुन घेता येतो.
फारशा परिचीत नसलेल्या
फारशा परिचीत नसलेल्या भाज्यांची चांगली माहिती.
अख्ख्या कांद्यांच्या, कैरीचा कीस भरून केलेल्या लोणच्यासारखं या ब्रसलस्प्राउटचं ताजं लोणचं झकास लागतं.
काही दिवसांपुर्वी बिग
काही दिवसांपुर्वी बिग बाझारमध्ये ही भाजी पाहिली होती. माझा समज झाला की, बोन्साय केलेले कोबी आहेत.
मृण्मयी, लोणच्याबद्दल सविस्तर सांगतेस का?
दिनेशदा, अल्फाअल्फा बद्दलही लिहाल का?
धन्यवाद दिनेशदा अजून एका
धन्यवाद दिनेशदा अजून एका भाजीची ओळख करुन दिल्याबद्दल! आणि फोटोत एकदम यम्म्मी दिसताहेत ते!
अवांतर : आमच्या जुन्या जागेतील शेजारी असलेल्या (आता दिवंगत) आज्जी बाळकोबीची की ब्रुसेल स्प्राऊटची स्टफ्ड भाजी करायच्या. आत बटाटा, धणे-जिरेपूड, गरम मसाला, भाजणी, कोरडे खोबरे इत्यादीचे सारण असायचे आणि तेलावर मंद आचेवर त्या ही खमंग भाजी शिजवायच्या. मी तेव्हा लहान असल्यामुळे त्यांना कधी त्या टेस्टी भाजीची पाकृ विचारली नाही. पण आता ही वरची भाजी पाहून प्रश्न पडतोय की मी खायचे ती बाळकोबी की ब्रुसेल स्प्राऊटस?
धन्यवाद दिनेशदा.. या भाजीची
धन्यवाद दिनेशदा.. या भाजीची माहिती दिल्याबद्दल!
>>माझा समज झाला की, बोन्साय केलेले कोबी आहेत.
अगदी अगदी जपान मधे बघितल्यामुळे माझी तर बोन्साय बद्दल खात्रीच होती
दिनेशदा अजुन एक अफलातुन
दिनेशदा अजुन एक अफलातुन माहीती.
आमच्याकडेही कोबी लावतात हिवाळ्यात पण मी कधीच असे खाली छोटे कोबी लागलेले कधीच पाहिले नाहीत.
किती छोटे छोटे कोबी! तुमच्या
किती छोटे छोटे कोबी!
तुमच्या लेखातून छान माहिती मिळते!
हां..इकडे या भाजीला सर्रास
हां..इकडे या भाजीला सर्रास चायनीज कॅबेज म्हणतात.. स्टर फ्राय करताना जराशी कच्चटच ठेवली कि अजून छान लागते..
वर्षू, चायनीज कॅबेज, म्हणून
वर्षू,
चायनीज कॅबेज, म्हणून एक वेगळाच कोबी, आमच्याकडे मिळतो. आता त्याबद्दल पण लिहितो.
अरुंधती, आपल्याकडे छोटे कोबी मिळायचे, पण अमिने लिहिल्याप्रमाणे आपल्याकडे आत्ताच मिळायला लागले आहेत हे.
गौरी देशपांडेंचा वनमाळी
गौरी देशपांडेंचा वनमाळी मीटिन्ग साठी ब्रसेल्स ला जातो एवढाच माझा त्या ब्रसेल्सशी संबंध. भाजी मस्त दिसतेय. इथे मिळत नाही अजून. वाफवून मग बटर वर हलके परतून मीठ मिरेपूड लावूनही मस्त लागेल काय? जुन्या अमेरिकन गूड हाउस्कीपिन्ग मध्ये ही भाजी नेहमी दिसायची रेसीपीच्या फोटोत.
ही बेस्ट असते भाजी..
ही बेस्ट असते भाजी.. हॉलंडमध्ये असताना माझ्या नेहेमीच्या खरेदीत असायची.. मस्त ताजे मिळायचे तिथे नुकतेच शेतातून आलेले.. आणि शिजवायला एकदम सोप्पे.. मी मसालेभातासारखे काहितरी करायचो त्यात आख्खे घालायचो हे ब्रसेल्स स्प्राउट.. मस्त लागतात..
दिनेशदा, झक्कास.. पुन्हा एकदा
दिनेशदा,
झक्कास.. पुन्हा एकदा "विठाई" च्या निमित्ताने तुमचा मा.बो. स्पेशल खाना खजाना ऊघडलात हे फार बरे केलेत.
योग
दिनेशदा, मी पण वापरते ही भाजी
दिनेशदा,
मी पण वापरते ही भाजी पास्ता बनवताना.
मसूर डाळीची आमटी करताना त्यात पण छान लागतात हे ब्रुसेल्स स्प्राउट्स
अरे वा, मसालेभात, मसूराची
अरे वा, मसालेभात, मसूराची आमटी , मला पण करुन बघायला हवे आता.
योग, काय बोलू ?
ह्या ब्रसल्स स्प्राऊट्सना
ह्या ब्रसल्स स्प्राऊट्सना भरल्या वांग्यांना देतो तसा क्रॉस कट द्यायचा. त्यात मसाला भरायचा आणि स्टर फ्राय करायचं. मस्त लागतं.
आर्च, योजाकृटा
आर्च, योजाकृटा
Calcium भरपूर असते यात. याची
Calcium भरपूर असते यात. याची कोबीसारखी भाजीही करता येते.
या भाजीची चव विचित्र असते असं
या भाजीची चव विचित्र असते असं माझं एक मत.. त्यामुळे कधीही खाऊ नये अश्या यादीमधे मी टाकलीय.. (शेपू, पडवळ, दोडक्याबरोबर)... जर्मनीत असताना खाऊन बघितलीय, आणि मला अजिबात आवडली नाही.
(चैन करा.. खा खा ब्रसेल्स स्प्राऊट खा ... )
मला आवडतात. झटपट कृती म्हणजे
मला आवडतात. झटपट कृती म्हणजे अर्धे कापून , नन्तर तव्यावर दोन थेंब तेल,चिमुट साखर, (कॅरमलाइझ/ ग्लेझ होण्यापुरती. जास्त नाही) आणि गार्लिक फ्लेक्स किंवा गार्लिक पावडर टाकून हे काप फक्त १-२ मिनिट भाजायचे. जास्त शिजू द्यायचे नाही. मस्त लागतात. बरोबर इतर पण भाज्या अशाच ग्रिल केल्यासारख्या थोड्याच भाजून घ्यायच्या. कांदे, सिमला मिर्ची, ब्रोकोली वगैरे. सही लागतं.
दिनेशदा, आजच ही भाजी
दिनेशदा,
आजच ही भाजी मुद्दामून केली गेली घरी. झकास एकदम.
एक दोन निरीक्षणे:
१. कोवळे स्प्राऊट्स असतील तर आतला पांढरा भाग उत्तम लागतो. (साधारण पोपटी हिरवा रंग असेल तर कोवळे असतात)
२. मिठ घालून पाण्यात उकळवणे म्हणजे जर थोडा ऊग्र वास असेल तर जातो
मला तरी वाटतं हे छोटे कोबी चायनीज डिशेस बरोबर मस्त लागतील. यांचे चक्क फ्राईड मंचुरीयन बनवता येईल. किंव्वा चायनीज फ्राईड राईस मध्ये नुसते वरून शिजवून टाकले तरी छान लागेल. शिवाय यात भरली वांगी प्रमाणे चीज भरून shallow fry देखिल छान लागतील.
भारताबाहेर ही भाजी जास्त चांगली मिळते.