लक्ष्मीकेशव आदिसनातन, कोळिसरे ग्रामी | शिळागंडकी मूर्ती शोभे, अतिसुंदर नामी ||
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोळिसरे म्हणजे निसर्गाने आपले वैभव मुक्तहस्ताने जिथे उधळले आहे असे एक नयनरम्य गाव. रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर तर रत्नागिरी-जयगड रस्त्यापासून साधारण ३.५ किलोमीटर अंतरावर असणार्या या गावाची लोकसंख्या आहे फक्त ८००. मुंबई किंवा पुणे मार्गे जायचे असल्यास पुणे-बंगळुरू हायवेवर उंब्रज फाट्याला उजवीकडे वळून चिपळूण मार्गे जावे लागते. रत्नागिरी-जयगड रस्त्यावर हातखंबा गावानंतर निवळी फाटा आहे. आधी जाकादेवी, मग चाफे, मग पुढे सुमारे ८ किलोमीटर अंतरावर कोळिसरे फाटा आहे. ह्या ठिकाणाहून कोळिसरे गाव २ किलोमीटर आत आहे. रत्नागिरीहून इथे यायचे असल्यास दुपारची रत्नागिरी-रीळ ही एस. टी. सोयीची आहे. तथापि, आपल्या सोयीने यायचे असल्यास स्वत:चे अथवा खाजगी वाहन अर्थातच अधिक उपयुक्त ठरेल.
निसर्गसौंदर्य
हिरवळीने वेढलेल्या पर्वतरांगा आणि उन्हाळ्यातही तूलनात्मक दृष्ट्या कमी तापमान यामुळे इथे पर्यटकांची एप्रिल-मे महिन्यातही ये-जा असते. अगदी जंगलासारखी घनदाट झाडी हे या गावचे वैशिष्ठ्य. गावात इतकी मुबलक वृक्षराजी आहे की एखाद्या निबीड अरण्यात गाव वसले आहे की काय असा संभ्रम पडतो.
मुख्य रस्त्यापासून मंदिर परिसराकडे येण्याचा मार्ग
श्री तेरेदेसाई यांच्या घराबाहेरून दिसणारा मंदिर परिसर
ऐतिहासिक संदर्भ
कुठल्याही ठिकाणचे पर्यटन, विशेषकरून कोकणातील, हे त्या त्या ठिकाणची देवस्थाने पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्याच प्रमाणे अनेक कुटुंबाचे कुलदैवत असलेले कोळिसरे येथील श्री लक्ष्मीकेशवाचे मंदिर हे ह्या ठिकाणचे आकर्षणस्थान. श्री लक्ष्मी-केशवाची मूर्ती असलेले हे देऊळ इथे कसे बांधले गेले याची एक मोठी रोचक कथा आहे.
सद्ध्या जो भाग मराठवाडा म्हणून ओळखला जातो तिथल्या मालखेडचे राष्ट्रकूट घराणे (इसवी सन ७५० ते ९७३) साधारण बाराशे वर्षांपूर्वी सगळ्या मराठी मुलुखाचे म्हणजेच महाराष्ट्राचे राजे बनले. हे राजे विष्णूचे परमभक्त होते. या घराण्यातील सदस्यांनी त्या भागात अनेक ठिकाणी श्रीविष्णूच्या मोहक मूर्तींची स्थापना करून सुंदर, सुबक मंदिरे बांधली. अनेक वर्षांनंतर यादव घराण्याच्या अंमलाखाली हा भाग आला. त्याच सुमारास परकीय मुसलमान आक्रमक असलेल्या जुलमी आणि मूर्तीभंजक मुघल राज्यकर्त्यांचा साम्राज्यविस्तार जोमाने सुरु झाला. त्या विस्ताराचा एक भाग म्हणून एतद्देशीय जनतेवर अत्याचार सुरू झाले आणि अर्थातच उत्साही 'बुत्शिकन' (मूर्तीभंजक) लोकांनी त्यांचे 'कार्य' जोमाने सुरु केले. या सुलतानी संकटापासून विविध देवदेवतांच्या मूर्ती वाचवण्यासाठी त्याकाळात ज्या अशा अनेक मूर्ती सुरक्षित/गुप्त ठिकाणी हलवल्या गेल्या, त्यातलीच ही श्री लक्ष्मीकेशवाची मूर्ती. ती कोल्हापूर येथे हलवण्यात येऊन तेथील रंकाळा तलावात दडवून ठेवण्यात आली. ही मूर्ती मूळ कुठल्या ठिकाणी होती याची माहिती मात्र मिळू शकली नाही.
पुढे अनेक वर्षांनी परिस्थिती थोडी सुधारली. तेव्हा एके दिवशी वर्हवडे गावातील तीन पुरुष श्री. जोशी, श्री. विचारे आणि श्री. काणे यांना ही मूर्ती कुठे ठेवली आहे ह्याचा दृष्टांत झाला. त्यानुसार ही मंडळी कोल्हापुरास गेली व ही मूर्ती तलावाबाहेर काढण्यात आली. ह्या मूर्तीची स्थापना कोकणातील रीळ गावी करावयाची असं त्यांनी ठरवलं. ही मूर्ती वर्हवडे खाडीतून व देवरूख-संगमेश्वर मार्गे एका लाकडी पेटीतून परत आणत असताना त्यांनी विश्रांतीसाठी कोळिसरे गावात रात्रीचा मुक्काम केला. सकाळी पुन्हा प्रवासाला प्रारंभ करण्यासाठी पेटी उचलण्याचा प्रयत्न केला असता ती प्रचंड जड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पेटीतली मूर्ती इतकी जड झाली होती की त्यांच्या बरोबर असलेल्या मजूरांना ती उचलताही येईना. तेव्हा काय करावे असा प्रश्न या तिघांना पडला असता कोळिसरे येथीलच एक ग्रामस्थ श्री. भानूप्रसाद (की भानूप्रभू?) तेरेदेसाई यांना 'ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना याच गावात करावी' अशा अर्थाचा दृष्टांत झाल्याचे समजले व त्याप्रमाणे ही मूर्ती याच गावात राहिली.
डावीकडे: नूतनीकरणा आधीचे श्री लक्ष्मीकेशव मंदिर | उजवीकडे: नूतनीकरणा आधीचे रत्नेश्वर मंदिर
श्री लक्ष्मीकेशवाचे हे देऊळ सन् १५१० मध्ये तेरेदेसाई कुटुंबियांनी बांधले. ही तेरेदेसाई मंडळी म्हणजे दाभोळसमोरच्या अंजनवेल म्हणजेच गोपाळगडाचे किल्लेदार. मंदिराच्या उभारणीसाठी खणायला सुरुवात केली असता एके ठिकाणी पाण्याची धार सुरु झाली.
हा झरा आजही सतत वाहता आहे. ह्या झर्यातील पाणी हे औषधी गुण असलेले आहे अशी वदंता आहे. असेही म्हटले जाते की पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्यासाठी हे पाणी येथून नेले जात असे.
नूतनीकरण केलेले श्री लक्ष्मीकेशव मंदिर
मूर्तीचे वर्णन
श्री लक्ष्मीकेशवाची ही मूर्ती काळ्या संगमरवरातून घडवली गेली असून प्रत्यक्ष पाहणार्यांना अतिशय तेजस्वी भासते. पाच फूट उंचीच्या ही मूर्ती चार हाताची असून खालच्या उजव्या हातात कमळ, वरील उजव्या हातात शंख, वरच्या डाव्या हातात चक्र, तसेच खालील डाव्या हातात गदा अशी शस्त्रे आहेत. उजवीकडे गरूड आणि जय तर डावीकडे लक्ष्मी आणि विजय आहेत. मूर्तीच्या मागे डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी पाच अशा रितीने श्री. विष्णूचे दहा अवतार कोरले आहेत. महाराष्ट्रातील वैशिष्ठ्यपूर्ण मूर्तींमध्ये या मूर्तीची गणना नक्कीच करायला हवी.
मंदिराच्या परिसरातच श्री रत्नेश्वराचे म्हणजेच शंकराचे देऊळ आहे.
नूतनीकरण केलेले श्री रत्नेश्वराचे मंदिर
श्री लक्ष्मीकेशव हे कुलदैवत असलेली आडनावे
श्री लक्ष्मीकेशव हे अडतीस घराण्यांचे (आडनावांचे) कुलदैवत आहे असे मानतात; शोध घेतल्यावर त्यापैकी छत्तीस आडनावे सापडली ती अशी:
उत्तुरकर, काणे, कानडे, काशीकर, कुंटे, केळकर, घनवटकर, घुले, घैसास, घोरपडे,
टिळक, ठोसर, ढब्बू, दांडेकर, नेने, पंडित, पुराणिक, पेंडसे, पोतनीस, फडणीस,
बोरगावकर, बेहेरे, बिवलकर, भट, भागवत, मेहेंदळे, राजवाडे, सुरनीस, सुभेदार, हुपरीकर,
लिमये, जोशी (शांडिल्यगोत्री ), विचारे, साळवे, सुगवेकर, बोंद्रे.
टीपः वरील आडनावांचे कुलदैवत हे श्री लक्ष्मीकेशव असले तरी ते कोळिसरे येथीलच असेल असे नाही.
उत्सव
श्री लक्ष्मीकेशव देवस्थानचा उत्सव कार्तिक शुद्ध दशमी ते पौर्णिमा या काळात होतो. या देवळाचे नोव्हेंबर २००८ मध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. आणखी काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून या देवस्थानचा सगळा कारभार पाहणार्या 'श्रीलक्ष्मीकेशव देवस्थान ट्रस्ट' यांच्या नावे देणगी देऊन आपल्याला मदत करता येऊ शकते.
जेवणाची व रहाण्याची सोय
श्री. तेरेदेसाई यांच्याकडे जेवणाची सोय होऊ शकते. देवदर्शनाला जाताना त्यांना जेवणाचे सांगून मग देवदर्शन घेऊन त्यांच्याकडे जेवायला यावे. निवासस्थानाच्या जवळच 'लकेर' नामक भक्तनिवास आहे तेथे राहण्याची तसेच चहा व फराळाची सोय होऊ शकते. लकेर म्हणजेच लक्ष्मी-केशव-रत्नेश्वर यांची अद्याक्षरे! पर्यटकांची फारशी गर्दी नसल्याने आठवड्याच्या एखाद्या मधल्याच वारी गेल्यास (शनिवार-रविवार सोडून कुठलाही वार) आगाऊ आरक्षण करण्याची तशी गरज नाही. तरीही गैरसोय टाळायची असल्यास आधी पत्रव्यवहार किंवा फोनाफोनी करावी हे उत्तम. श्री. तेरेदेसाई यांचा फोन क्रमांक मिळू शकला नाही, पण पुजारी श्री. मराठे यांच्याशी
०२३५७-२४३८३५ या क्रमांकावर संपर्क साधून श्री तेरेदेसाई यांचा संपर्क होऊ शकतो.
या देवळाचे नोव्हेंबर २००८ मध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. या देवळाच्या बदललेल्या आणि अधिकच चकाचक झालेल्या रूपाबाबत मात्र थोडीफार नाराजी असली, तरी आपले सौंदर्य राखण्यात ते बर्यापैकी यशस्वी झाले आहे.
भरपूर निसर्गसौंदर्य, कोकणातल्या इतर ठिकाणांपेक्षा शांत, पाण्याचा बारा महिने वाहता झरा, रम्य तसेच सात्त्विक वातावरण पाहिलं की इथून जावेसेच वाटत नाही. राहण्याजेवणाचीही छान व्यवस्था असल्याने कौटुंबिक सहलीसाठी अगदी आदर्श वातावरण इथे आहे. गावच्या तळाशी शास्त्री नदी वाहते व पुढे जयगडच्या खाडीत समुद्रास मिळते.
असे हे निसर्गवैविध्य अनुभवल्याशिवाय कोकणची यात्रा पूर्ण होऊच शकत नाही!
------------------------------------------------------------------
या आधीचा लेखः
कोकण यात्रा - १: केळशी – दापोली तालुक्याला पडलेली एक सुंदर खळी
------------------------------------------------------------------
माहितीसाठी विशेष आभारः तेरेदेसाई व मराठे परिवार;
अंतर व सनावळीच्या अचूकतेसाठी: प्र. के. घाणेकर यांचे लेखन.
मस्त रे मंदार्..तुझी भटकंतीपण
मस्त रे मंदार्..तुझी भटकंतीपण चालूच असते.. खूप छान आहेत फोटो..असं शांत वातावरण अनुभवून किती वर्षं झाली कोणास ठाऊक ..
छान आहे वर्णन
छान आहे वर्णन
सुंदर वर्णन मंदार,
सुंदर वर्णन मंदार, निसर्गदृश्यांपेक्षा देवळाची माहिती जास्त झालीये...अजून फोटोज टाक ना...
वर्णन व माहिती छान
वर्णन व माहिती छान
छान माहिती. ही मूर्ती खूप
छान माहिती.
ही मूर्ती खूप सुंदर आहेच त्याचबरोबर सर्व परिसरदेखील अगदी शांत आहे. त्यामुळे इथे गेल्यावर अगदी डोळे मिटून शांत बसावे असे वाटत राह्ते. संपूर्ण मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ आहे.
इथल्या झर्याच्या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते पाणी घरी महिनोनमहिने आणून ठेवले तरी त्याला कसलाच वास वगैरे येत नाही. मिनरल वॉटरची चव आहे त्याला. कोकणामधे तीच तीच ठिकाणे फिरून कंटाळा आला असेल तर कोळिसरेला भेट द्यायला हरकत नाही. अगदी रत्नागिरी गणपतीपुळ्याच्या रस्त्यावरच आहे. इथूनच पुढे जाऊन कर्हाटेश्वर आणी जयगडचा किल्ला देखील बघण्यालायक आहे.
छान फोटो आणि वर्णन. एक
छान फोटो आणि वर्णन.
एक सुधारणा. लिमये आणि करंदिकरांचे कुलदैवत लक्ष्मीकेशव असले तरी त्यांचे स्थान कर्ले, रत्नागिरी येथे आहे (मी माहेरची लिमये आहे).
छान आहे वर्णन. एका अनवट
छान आहे वर्णन. एका अनवट जागेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
अश्विनी, हो! कारण वरच्या
अश्विनी, हो! कारण वरच्या पस्तीस आडनावापैकी काणे, विचारे आणि शांडिल्यगोत्रोत्पन्न जोशीचे कुलदैवत कोळिसर्याचे लक्ष्मीकेशव आहे. (बहुतेक) आणि रत्नेश्वर हे देखील काही घराण्याचे कुलदैवत आहे.
कर्ले, फणसोप इथेदेखील लक्ष्मीकेशवाची मंदिरे आहेत.
धन्यवाद लोकहो
धन्यवाद लोकहो
>>सुंदर वर्णन मंदार,
>>सुंदर वर्णन मंदार, निसर्गदृश्यांपेक्षा देवळाची माहिती जास्त झालीये...अजून फोटोज टाक ना...
धन्स अम्या, पुढच्या वेळी जाऊन आलो की आसपासचे जास्त फोटो टाकेन आणि सगळ्या आल्बमची लिंक टाकेन
मंदार,कोकण मला पहिल्यापासून
मंदार,कोकण मला पहिल्यापासून खूप आवडते. खूप वेगळं वाटतं तिकडे फिरताना.. समुद्र, किनारे , होडी या पेक्षा तिकडची लाल माती, तिकडची घरे, मंदिरे, शेती, लाल माती हे सगळं वेगळच वाटतं.
कोकण म्हणजे, किती ही फिरून मन भरणार नाही असं ठिकाणं.. प्रत्येक भेटीत एक वेगळेपण जपणारं असं. मंदार छान माहीती, आवर्जून संग्रहीत करावी अशीच अगदी.
कोळीसरे म्हणजेच कोळथर
कोळीसरे म्हणजेच कोळथर का?
माझे सासरचे (मोडकांचे) कुलदैवत ते आहे. पण सगळे कोळीसरे असे म्हणतात - कोळीसरे चं शिवमंदीर (की दत्तमंदीर??) . तेथे आम्ही गेल्याच्या गेल्या वर्षी भेट दिली होती. त्या मंदीराच्या गाभार्यात स्त्रियांना प्रवेश नाहिये मात्र. मग हे लक्ष्मीकेशव वेगळे मंदीर आहे का?
कोळीसरे म्हणजेच कोळथर का? >>>
कोळीसरे म्हणजेच कोळथर का?
>>> नाही. लक्ष्मीकेशवाच्या गाभार्यामधे सोवळ्यामधे पुरूषाना व स्त्रियाना प्रवेश आहे. तिथे बसून मूर्तीला अभिषेक देखील करता येतो. (मी आणि सतिशने आतापर्यंत दोनदा अभिषेक केलाय).
निंबूडा, तुम्ही कोकणामधे रत्नागिरीच्या आसपास कुठेतरी आला होतात का? कारण कोळथर हे गाव ऐकल्यासारखे वाटत नाही.
साधारणपणे दत्तमंदिराच्या गाभार्यामधे स्त्रियाना प्रवेश नसतो. अर्थात कोळिसर्याचे मंदिर पूर्णपणे वेगळे आहे.
मंदार, लक्ष्मीकेशवाच्या मंदिराचे नूतनीकरण नोव्हेंबर २००९ला झाले. कळशारोहण समारंभानंतर मंदिरात पहिला "जोडीने अभिषेक" आम्ही केला होता.
@ निंबुडा हो, श्री
@ निंबुडा
हो, श्री लक्ष्मीकेशवाचे अर्थातच वेगळे देऊळ आहे. बाकी माहिती नंदिनीच्या पोष्टीत आहे
छानच.
छानच.
अगदि मनापासुन आवडल, कोकनात खर
अगदि मनापासुन आवडल, कोकनात खर नन्दनवन जर का असेल तर या गावि. फोटो पण छान आलेत
मस्त! माहिती व फोटो दोन्ही
मस्त! माहिती व फोटो दोन्ही छान! एकदा आवर्जून भेट द्यायलाच हवी!
अवांतरः माझ्या आजीचे माहेर म्हणजे शांडिल्यगोत्री जोशीच.... आता माहिती करुन घ्यायला हवी त्यांचेही हेच कुलदैवत आहे का ते!
मस्त माहिती रे मंदांर! अत्यंत
मस्त माहिती रे मंदांर!
अत्यंत सुंदर स्थान आहे हे, कितीतरी दिवसापासून याचे फोटो आणि लेख टाकायचे माझ्या मनात होते, पण लक्ष्मीकेशवाच्या मनात नसावे!
जे गेलेले नाहील त्यांनी आवर्जून जावे. याच्याजवळचे कर्हाटेश्वर, जयगडसोबत मालगुंडचे केशवसुत स्मारकही बघण्यासारखे आहे. मालगुंडला डॉ.श्री अमित मेहंदळे यांच्याकडे राहण्याची उत्तम व्यवस्था होते.
रच्याकने, या मंदिराच्या कळसाची रचना मुसलमानी घुमटाकार का वाटते?
खुपच छान माहिति .आडनावांचि
खुपच छान माहिति .आडनावांचि माहिति दिलिस हे चांगले केलेस . माझ्याहि बर्याच मित्रांचे हे कुलदैवत आहे,पण अजुन काहि तिथे जाण्याचा योग आला नाहि. फोटोंमुळे दुधाचि तहान ताकावर तर भागवलिस.
>>मंदार, लक्ष्मीकेशवाच्या
>>मंदार, लक्ष्मीकेशवाच्या मंदिराचे नूतनीकरण नोव्हेंबर २००९ला झाले.
नक्की नोव्हेंबर २००८ हेच असावे. कारण आम्ही २३ जानेवारी २००९ रोजी इथे आलो होतो तेव्हाचे आहेत व त्याच वेळी श्री. तेरेदेसाई यांनी आम्हाला ही माहिती दिली.
मला चांगलं लक्षात असण्याचं कारण की इथे येऊन गेल्यावर माझ्या डोक्याचा एक मोठ्ठा ताप गेला आणि मला नवीन चांगली नोकरी मिळाली होती.
हां पुन्हा एका वर्षाने नूतनीकरणाचे नवीन काम झाले असल्यास ते माहित नाही कारण आम्ही दरवर्षी जात नाही.
कोळथर दापोलीच्या जवळ आहे. हे
कोळथर दापोलीच्या जवळ आहे. हे गाव आगोम ह्या नावाने प्रसिध्द अश्या अत्यंत गुणकारी अश्या सुक्ष्म आयुर्वेद औषधांमुळे अनेकांना परिचयाचे झाले आहे.
माझ्या पुसट आठवणीप्रमाणे मी
माझ्या पुसट आठवणीप्रमाणे मी कोळथर ला गेलेलो आहे पण आत्ता रस्ता वगैरे काहीच आठवत नाही! नन्तर नीट आठवुन व विचारुन घेऊन सान्गतो
कोळिसरे मात्र हुकले म्हणायचे, कारण माझी १९९८ च्या सहली मधे जयगडला मुक्काम केला असते!
असो, परत कधीतरी
चान्गली माहिती दिलीये
मस्त आहेत फोटो आणि माहिती
मस्त आहेत फोटो आणि माहिती सुद्धा (आताच वाचून झाली) !
छान फोटो आणि माहिती आता
छान फोटो आणि माहिती
आता पुढच्या गणपतीपुळे दौर्यात कोळिसरेला भेट आवश्यकच !!!!
मंद्या मस्तच रे कोळीसरे
मंद्या मस्तच रे
कोळीसरे लक्ष्मीकेशव माझे माहेरचे कुलदैवत. खुप सुंदर जागा आहे. मी १५ एक वर्षांपूर्वी गेले असेन पण अजुन ती लक्ष्मीकेशवाची काळीशार दगडी मुर्ती, तो खळखळता झरा आणि ते थंड निर्मळ पाणी, तिथली शांतता आणि निसर्गरम्य परिसर लक्षात आहे.
मंदार खुप खुप धन्यवाद रे. तुझ्यामुळे इथे बसुन मला कुलदैवताचे दर्शन झाले
मी अनेक वेळा निवळी- जयगड
मी अनेक वेळा निवळी- जयगड रस्त्यावरून जयगडपर्यंत गेलो आहे. रस्ता वर्दळीचा नसूनही माझ्या लक्षात हे सुंदर स्थळ नाही कसं आलं ? देवस्थानाबद्दल फलक वगैरे लावलेला नव्हता/ नाही का रस्त्यावर ? जयगडकडे जाताना डाव्या [समुद्राच्या] बाजूला कीं उजव्या ? खंडाळ्याच्या जवळपास तर नाही ? मंदारजी, परत त्या बाजुला गेलो, तर तुमच्या वर्णनामुळे व फोटोंमुळे कोळीसरेला जाणं भागच आहे. धन्यवाद.
मस्त फोटो. शांत वाटलं बघुन
मस्त फोटो. शांत वाटलं बघुन माहिती नंतर वाचीन.
काय प्रसन्न फोटो आहेत!
काय प्रसन्न फोटो आहेत! माहितीसुद्धा सुंदर लिहीली आहे. तेथे जाण्याच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त. या गावाला किनारा आहे का?
या सगळ्या मंदिरांबद्दलच्या कथा कोठेतरी रेकॉर्ड करून ठेवल्या पाहिजेत.
मी कोळथर च्या लक्ष्मीकेशव मंदिराबद्दलही ऐकले आहे.
मंदार बरोबर. आमचे लग्न
मंदार बरोबर. आमचे लग्न डिसेंबर २००८ला झालय. वेंधळेपणाच झाला.
भाऊ, खंडाळ्याच्या जवळपासच हे ठिकाण आहे. देवस्थानचा फलक वगैरे हायवेवर आहे, पण फार मोठा नाहिये. जयगडच्या रस्त्यावरून उजवीकडे फाटा आहे. (जयगडला जाताना!)
मुळात हे पर्यटनस्थळ नाही... त्यामुळे इथे वर्दळ जास्त नसते. (हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ होऊ नये ही इच्छा!! गणपतीपुळ्याची अवस्था बघवत नाही आता)
आगाऊ, कोकणातल्या बर्याच मंदिराच्या कळसाची रचना साधारण अशीच असते.मुळात कोकणातली मंदिरे फार भव्य वगैरे नसतात, किंबहुना ती कौलारू घरासारखीच दिसतात.
आयला, कर्हाटेश्वराचे फोटो टाकतेय मी!!
छानच माहिती आणि फोटो कोळीसरे
छानच माहिती आणि फोटो
कोळीसरे म्हणजेच कोळथर का?>>>निंबुडा तु दापोली-दाभोळ रस्त्यावरच्या कोळथरे गावातील श्री देव कोळेश्वरबद्दल बोलतेय का? (हे देवस्थान श्री शंकराचे आहे ना??)
आगोमच्या गुटिका केशरंजनसाठीही हे गाव प्रसिद्ध आहे.
Pages