लक्ष्मीकेशव आदिसनातन, कोळिसरे ग्रामी | शिळागंडकी मूर्ती शोभे, अतिसुंदर नामी ||
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोळिसरे म्हणजे निसर्गाने आपले वैभव मुक्तहस्ताने जिथे उधळले आहे असे एक नयनरम्य गाव. रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर तर रत्नागिरी-जयगड रस्त्यापासून साधारण ३.५ किलोमीटर अंतरावर असणार्या या गावाची लोकसंख्या आहे फक्त ८००. मुंबई किंवा पुणे मार्गे जायचे असल्यास पुणे-बंगळुरू हायवेवर उंब्रज फाट्याला उजवीकडे वळून चिपळूण मार्गे जावे लागते. रत्नागिरी-जयगड रस्त्यावर हातखंबा गावानंतर निवळी फाटा आहे. आधी जाकादेवी, मग चाफे, मग पुढे सुमारे ८ किलोमीटर अंतरावर कोळिसरे फाटा आहे. ह्या ठिकाणाहून कोळिसरे गाव २ किलोमीटर आत आहे. रत्नागिरीहून इथे यायचे असल्यास दुपारची रत्नागिरी-रीळ ही एस. टी. सोयीची आहे. तथापि, आपल्या सोयीने यायचे असल्यास स्वत:चे अथवा खाजगी वाहन अर्थातच अधिक उपयुक्त ठरेल.
निसर्गसौंदर्य
हिरवळीने वेढलेल्या पर्वतरांगा आणि उन्हाळ्यातही तूलनात्मक दृष्ट्या कमी तापमान यामुळे इथे पर्यटकांची एप्रिल-मे महिन्यातही ये-जा असते. अगदी जंगलासारखी घनदाट झाडी हे या गावचे वैशिष्ठ्य. गावात इतकी मुबलक वृक्षराजी आहे की एखाद्या निबीड अरण्यात गाव वसले आहे की काय असा संभ्रम पडतो.
मुख्य रस्त्यापासून मंदिर परिसराकडे येण्याचा मार्ग
श्री तेरेदेसाई यांच्या घराबाहेरून दिसणारा मंदिर परिसर
ऐतिहासिक संदर्भ
कुठल्याही ठिकाणचे पर्यटन, विशेषकरून कोकणातील, हे त्या त्या ठिकाणची देवस्थाने पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्याच प्रमाणे अनेक कुटुंबाचे कुलदैवत असलेले कोळिसरे येथील श्री लक्ष्मीकेशवाचे मंदिर हे ह्या ठिकाणचे आकर्षणस्थान. श्री लक्ष्मी-केशवाची मूर्ती असलेले हे देऊळ इथे कसे बांधले गेले याची एक मोठी रोचक कथा आहे.
सद्ध्या जो भाग मराठवाडा म्हणून ओळखला जातो तिथल्या मालखेडचे राष्ट्रकूट घराणे (इसवी सन ७५० ते ९७३) साधारण बाराशे वर्षांपूर्वी सगळ्या मराठी मुलुखाचे म्हणजेच महाराष्ट्राचे राजे बनले. हे राजे विष्णूचे परमभक्त होते. या घराण्यातील सदस्यांनी त्या भागात अनेक ठिकाणी श्रीविष्णूच्या मोहक मूर्तींची स्थापना करून सुंदर, सुबक मंदिरे बांधली. अनेक वर्षांनंतर यादव घराण्याच्या अंमलाखाली हा भाग आला. त्याच सुमारास परकीय मुसलमान आक्रमक असलेल्या जुलमी आणि मूर्तीभंजक मुघल राज्यकर्त्यांचा साम्राज्यविस्तार जोमाने सुरु झाला. त्या विस्ताराचा एक भाग म्हणून एतद्देशीय जनतेवर अत्याचार सुरू झाले आणि अर्थातच उत्साही 'बुत्शिकन' (मूर्तीभंजक) लोकांनी त्यांचे 'कार्य' जोमाने सुरु केले. या सुलतानी संकटापासून विविध देवदेवतांच्या मूर्ती वाचवण्यासाठी त्याकाळात ज्या अशा अनेक मूर्ती सुरक्षित/गुप्त ठिकाणी हलवल्या गेल्या, त्यातलीच ही श्री लक्ष्मीकेशवाची मूर्ती. ती कोल्हापूर येथे हलवण्यात येऊन तेथील रंकाळा तलावात दडवून ठेवण्यात आली. ही मूर्ती मूळ कुठल्या ठिकाणी होती याची माहिती मात्र मिळू शकली नाही.
पुढे अनेक वर्षांनी परिस्थिती थोडी सुधारली. तेव्हा एके दिवशी वर्हवडे गावातील तीन पुरुष श्री. जोशी, श्री. विचारे आणि श्री. काणे यांना ही मूर्ती कुठे ठेवली आहे ह्याचा दृष्टांत झाला. त्यानुसार ही मंडळी कोल्हापुरास गेली व ही मूर्ती तलावाबाहेर काढण्यात आली. ह्या मूर्तीची स्थापना कोकणातील रीळ गावी करावयाची असं त्यांनी ठरवलं. ही मूर्ती वर्हवडे खाडीतून व देवरूख-संगमेश्वर मार्गे एका लाकडी पेटीतून परत आणत असताना त्यांनी विश्रांतीसाठी कोळिसरे गावात रात्रीचा मुक्काम केला. सकाळी पुन्हा प्रवासाला प्रारंभ करण्यासाठी पेटी उचलण्याचा प्रयत्न केला असता ती प्रचंड जड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पेटीतली मूर्ती इतकी जड झाली होती की त्यांच्या बरोबर असलेल्या मजूरांना ती उचलताही येईना. तेव्हा काय करावे असा प्रश्न या तिघांना पडला असता कोळिसरे येथीलच एक ग्रामस्थ श्री. भानूप्रसाद (की भानूप्रभू?) तेरेदेसाई यांना 'ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना याच गावात करावी' अशा अर्थाचा दृष्टांत झाल्याचे समजले व त्याप्रमाणे ही मूर्ती याच गावात राहिली.
डावीकडे: नूतनीकरणा आधीचे श्री लक्ष्मीकेशव मंदिर | उजवीकडे: नूतनीकरणा आधीचे रत्नेश्वर मंदिर
श्री लक्ष्मीकेशवाचे हे देऊळ सन् १५१० मध्ये तेरेदेसाई कुटुंबियांनी बांधले. ही तेरेदेसाई मंडळी म्हणजे दाभोळसमोरच्या अंजनवेल म्हणजेच गोपाळगडाचे किल्लेदार. मंदिराच्या उभारणीसाठी खणायला सुरुवात केली असता एके ठिकाणी पाण्याची धार सुरु झाली.
हा झरा आजही सतत वाहता आहे. ह्या झर्यातील पाणी हे औषधी गुण असलेले आहे अशी वदंता आहे. असेही म्हटले जाते की पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्यासाठी हे पाणी येथून नेले जात असे.
नूतनीकरण केलेले श्री लक्ष्मीकेशव मंदिर
मूर्तीचे वर्णन
श्री लक्ष्मीकेशवाची ही मूर्ती काळ्या संगमरवरातून घडवली गेली असून प्रत्यक्ष पाहणार्यांना अतिशय तेजस्वी भासते. पाच फूट उंचीच्या ही मूर्ती चार हाताची असून खालच्या उजव्या हातात कमळ, वरील उजव्या हातात शंख, वरच्या डाव्या हातात चक्र, तसेच खालील डाव्या हातात गदा अशी शस्त्रे आहेत. उजवीकडे गरूड आणि जय तर डावीकडे लक्ष्मी आणि विजय आहेत. मूर्तीच्या मागे डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी पाच अशा रितीने श्री. विष्णूचे दहा अवतार कोरले आहेत. महाराष्ट्रातील वैशिष्ठ्यपूर्ण मूर्तींमध्ये या मूर्तीची गणना नक्कीच करायला हवी.
मंदिराच्या परिसरातच श्री रत्नेश्वराचे म्हणजेच शंकराचे देऊळ आहे.
नूतनीकरण केलेले श्री रत्नेश्वराचे मंदिर
श्री लक्ष्मीकेशव हे कुलदैवत असलेली आडनावे
श्री लक्ष्मीकेशव हे अडतीस घराण्यांचे (आडनावांचे) कुलदैवत आहे असे मानतात; शोध घेतल्यावर त्यापैकी छत्तीस आडनावे सापडली ती अशी:
उत्तुरकर, काणे, कानडे, काशीकर, कुंटे, केळकर, घनवटकर, घुले, घैसास, घोरपडे,
टिळक, ठोसर, ढब्बू, दांडेकर, नेने, पंडित, पुराणिक, पेंडसे, पोतनीस, फडणीस,
बोरगावकर, बेहेरे, बिवलकर, भट, भागवत, मेहेंदळे, राजवाडे, सुरनीस, सुभेदार, हुपरीकर,
लिमये, जोशी (शांडिल्यगोत्री ), विचारे, साळवे, सुगवेकर, बोंद्रे.
टीपः वरील आडनावांचे कुलदैवत हे श्री लक्ष्मीकेशव असले तरी ते कोळिसरे येथीलच असेल असे नाही.
उत्सव
श्री लक्ष्मीकेशव देवस्थानचा उत्सव कार्तिक शुद्ध दशमी ते पौर्णिमा या काळात होतो. या देवळाचे नोव्हेंबर २००८ मध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. आणखी काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून या देवस्थानचा सगळा कारभार पाहणार्या 'श्रीलक्ष्मीकेशव देवस्थान ट्रस्ट' यांच्या नावे देणगी देऊन आपल्याला मदत करता येऊ शकते.
जेवणाची व रहाण्याची सोय
श्री. तेरेदेसाई यांच्याकडे जेवणाची सोय होऊ शकते. देवदर्शनाला जाताना त्यांना जेवणाचे सांगून मग देवदर्शन घेऊन त्यांच्याकडे जेवायला यावे. निवासस्थानाच्या जवळच 'लकेर' नामक भक्तनिवास आहे तेथे राहण्याची तसेच चहा व फराळाची सोय होऊ शकते. लकेर म्हणजेच लक्ष्मी-केशव-रत्नेश्वर यांची अद्याक्षरे! पर्यटकांची फारशी गर्दी नसल्याने आठवड्याच्या एखाद्या मधल्याच वारी गेल्यास (शनिवार-रविवार सोडून कुठलाही वार) आगाऊ आरक्षण करण्याची तशी गरज नाही. तरीही गैरसोय टाळायची असल्यास आधी पत्रव्यवहार किंवा फोनाफोनी करावी हे उत्तम. श्री. तेरेदेसाई यांचा फोन क्रमांक मिळू शकला नाही, पण पुजारी श्री. मराठे यांच्याशी
०२३५७-२४३८३५ या क्रमांकावर संपर्क साधून श्री तेरेदेसाई यांचा संपर्क होऊ शकतो.
या देवळाचे नोव्हेंबर २००८ मध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. या देवळाच्या बदललेल्या आणि अधिकच चकाचक झालेल्या रूपाबाबत मात्र थोडीफार नाराजी असली, तरी आपले सौंदर्य राखण्यात ते बर्यापैकी यशस्वी झाले आहे.
भरपूर निसर्गसौंदर्य, कोकणातल्या इतर ठिकाणांपेक्षा शांत, पाण्याचा बारा महिने वाहता झरा, रम्य तसेच सात्त्विक वातावरण पाहिलं की इथून जावेसेच वाटत नाही. राहण्याजेवणाचीही छान व्यवस्था असल्याने कौटुंबिक सहलीसाठी अगदी आदर्श वातावरण इथे आहे. गावच्या तळाशी शास्त्री नदी वाहते व पुढे जयगडच्या खाडीत समुद्रास मिळते.
असे हे निसर्गवैविध्य अनुभवल्याशिवाय कोकणची यात्रा पूर्ण होऊच शकत नाही!
------------------------------------------------------------------
या आधीचा लेखः
कोकण यात्रा - १: केळशी – दापोली तालुक्याला पडलेली एक सुंदर खळी
------------------------------------------------------------------
माहितीसाठी विशेष आभारः तेरेदेसाई व मराठे परिवार;
अंतर व सनावळीच्या अचूकतेसाठी: प्र. के. घाणेकर यांचे लेखन.
मंदार, पुण्याच्याच श्री.
मंदार, पुण्याच्याच श्री. मोरेश्वर कुंट्यांच्या 'देवदर्शन जिल्हा रत्नागिरी' या ग्रंथात आणखी काही माहिती मिळेल कांय बघ. (पृष्ठ क्र. ७९ ते ८१). या ग्रंथात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मंदिरांची एकत्रित माहिती संकलित केली आहे. अभ्यासूंनी लाभ घ्यावा.
खूप छान. आमचं कुलदैवत
खूप छान. आमचं कुलदैवत हे.
घनदाट झाडी, हवेतील गारवा, सूरमाडांच्या गच्च झाडीत हि सुंदर वास्तू उठून दिसते. मूर्ती तर डोळ्याचं पारण फेडते. खूप सुंदर आहे हा परिसर. मी ३ वर्षांपूर्वीच जाउन आलो.
सुंदर टीकाण, अप्रतिम वर्णन ,
सुंदर टीकाण, अप्रतिम वर्णन , पूड्च्या आटवडयात जाण्याचा विचार आहे.
Pages