गाडी बुला रही है... ५
डेक्कन क्वीन कितीही आवडती असली तरी दादरला उतरून चालणार असेल तरच उपयोगाची. त्यामुळे दादर, गिरगाव किंवा पश्चिम उपनगरांत राहणारे यांनाच सोयीची आहे. नाहीतर मग खुद्द मुंबईतच काम असेल तर. या गाडीच्या आणखी काही गोष्टी म्हणजे ही भारतातील पहिली 'डीलक्स' गाडी, तसेच एवढ्या लांबचे अंतर धावणारी पहिली इलेक्ट्रिक गाडी आणि पहिली व्हेस्टिब्यूल (म्हणजे ज्यात एका डब्यातून दुसर्या डब्यात आतल्या आत जाता येते) गाडी आहे. फार पूर्वी पहिल्या व दुसर्या वर्गाचे ८-१० डबे घेऊन साधारण पावणेतीन तासात जाणारी ही गाडी आता १७-१८ डबे घेऊन तीन तास वीस मिनिटे घेते. हिच्या बद्दल आणखी छान माहिती या साईटवर आहे. आमच्या ऑफिस मधे एकाचा आयडी २१२३ आहे त्याचा बॅज दिसला की मला नेहमी डेक्कन आठवते, कारण तिचा डाऊन नंबर तो आहे (२१२३ डाऊन, २१२४ अप) (इथे बे एरिया मधे U टर्नला बंदी असताना मारला तर २८१ डॉलर दंड होतो ते पाहून तसाच व्ही व्ही एस लक्षमण आठवतो)!
आणखी एक 'डेक्कन' आहे, ती म्हणजे डेक्कन एक्सप्रेस. ही दुपारी पुण्याहून सुटते व सकाळी मुंबईहून. इंद्रायणी वगैरेच्या मानाने जरा जास्त स्टेशने घेणारी, पण अगदीच कोयना किंवा पॅसेंजर नाही. बर्याच लोकांना सोयीची असावी कारण माझ्या आठवणीत तरी कायम खच्चून भरलेली असायची. मध्यंतरी ती 'प्रगती' सुरू झाली. ही सकाळी डेक्कन च्या मागोमाग निघते आणि संध्याकाळी थोडी आधी. मुळात उशीर झालेला माणूस जसा मग रेंगाळत कामाला जावा तशी ही सकाळी जरा रमतगमतच जाते. पण संध्याकाळी बहुधा तिला लाईन मोकळी करायची घाई असते. डेक्कन चे तिकीट असेल पण मुंबईतले काम जरा लौकर झाले की टीसी ला पटवून यातून मी आलेलो आहे. या गाडीचे बाकी सगळे डेक्कन क्वीन सारखेच आहे, फक्त तो ७०-७५ वर्षाचा इतिहास व त्याबरोबर येणार्या कहाण्या, ते प्रवासी संघ, पार्ट्या वगैरे नाहीत.
पुण्यात लग्नासाठी किंवा एकाच दिवसाच्या कामासाठी येणारे आणि मुंबईतून येऊन त्याच दिवशी ऑफिस पकडणारे यांची 'इंद्रायणी' आवडती आहे. एकतर ती सकाळची फास्ट लोकल ची धांदल सुरू व्हायच्या आत कल्याण सुद्धा सोडते त्यामुळे पुण्याला हमखास वेळेवर पोहोचते. संध्याकाळी निघणारी सुद्धा शक्यतो वेळेवर जाते आणि पुण्यातून निघणार्याला जवळजवळ संपूर्ण दिवस मिळतो. तशी बरीच नंतर सुरू झालेली असूनही ही खूप लोकप्रिय आहे. आणि कामशेट च्या जवळ जे पाणी दिसते ती इंद्रायणी नदी आहे हे मला बर्याच दिवसांनी कळले.
शताब्दी व नंतर ती बंद करून चालू केलेल्या इंटर सिटीने मी कधीच गेलो नाही त्यामुळे काहीच माहिती नाही.
याव्यतिरिक्त फक्त मग 'कोयना' आहे, पुणे मुंबई प्रवासासाठी चालणारी. ही पूर्वी मिरज पर्यंत होती आता कोल्हापूर पर्यंत जाते. ती पुण्यापर्यंत जशी जाते त्यावरून ती कोल्हापूरला पोहोचून दुसर्या दिवशी साधारण वेळेवर कशी येते हेच आश्चर्य आहे. बाकी कोणत्याही गाडीचे रिझर्वेशन नाही मिळाले तर आम्ही या गाडीने जायचो. पण ती असंख्य स्टेशनांवर थांबते आणि त्यामुळे कंटाळा येतो.
बाकी मग कोल्हापूरला जायला 'सह्याद्री' व 'महालक्ष्मी', सोलापूरला 'सिद्धेश्वर' व आता एक 'इंटर सिटी' या रात्रीच्या गाड्या आहेत. आणि इतर अनेक लांब अंतराच्या ही आहेत 'उद्यान' वगैरे. पण पुणे मुंबई मधले लोक इतर काही पर्याय नसेल तरच या गाड्यांने जातात. या लांबच्या गाड्या किमान २ रेक वाल्या आहेत. म्हणजे एक 'कोयना' मुंबईहून कोल्हापूरला जात असते तेव्हा आणखी एक उलट्या दिशेला जात असते. लांब अंतराच्या गाड्यांना किमान किती रेक लागतील हे शोधून काढाणे हा आता अस्सल 'गीकी' वाटणारा उद्योग तेव्हा आम्हाला होता.
आता गेल्या ६-७ वर्षात खूप रेल्वेप्रवास झाला नाही, पण मी ऐकले आहे की एवढा हायवे होऊन सुद्धा गाड्यांच्या गर्दीत काही फरक नाही.
सिटी बजा रही है!
अरे अरे अरे,
उपाशी माणसाला एवढी पंच्पक्वान्ने वाढलीस तर कसं?
मुम्बै-पुणे-मुंबई अशी दर विकांतात धावपळ करणार्या मैत्रिणी आठवल्या. त्यांच्या आनंदाखातर त्यांच्या comupters ची नावे पण त्या त्या गाड्यांची नावे ठेवली होती
लेखमाला मस्त जमली आहे. तू पण कविता लिहितोस की काय अशी शंका येवु लागली आहे मला
प्रवास
प्रवास तोही रेल्वेने अहा... सुंदर !!! आम्ही पुण्याला नेहमी जळगाव हुन महराष्ट्र एक्ष्प्रेस्स ने जाय्चो, मला तो प्रवास खुप खुप आवडायचा..!!!
रेल्वे
त्याला टर्न टेबल म्हणतात का ? मला माहित नव्हते. पुर्वी लोअर परेलला होते ते.
डेक्कनच्या आधी एक कल्याण फास्ट असायची. तिला मात्र मुलुंडला स्लो ट्रॅकवर आणत असत.
पण तरीही कोकण रेल्वेचाच प्रवास अव्वल बरं का ! तोही पावसाळ्यातला आणि दरड कोसळली नसेल तरच.
तू फक्त मुंबई-पुणे रेल्वेवरच
तू फक्त मुंबई-पुणे रेल्वेवरच भर दिलास ..
छोटे छोटे लेख लिहून मालिका करणं एकदम सोयीस्कर वाटतं वाचायच्या दृष्टीने .. त्यामुळे ही आणि आधीची अमिताभवरची अशा दोन्ही लेखमाला त्या कारणाकरता आणखी स्पेशल आवडल्या ..