मी, माझे वडिल आणि भ्रष्टाचार

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

१९७५ सालच्या दरम्यान कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावर WG Forge Allied Industries नावाची एक कंपनी सुरू झाली. गावातले लोक तिला वायमन गार्डन, वायंगान कार्ड पासून काहीही म्हणायचे. खरंतर ते Wyman Gordon होतं. माझे वडिल या कंपनीत सुरुवातीला Security Guard, आणि नंतर काही वर्षे Security Supervisor म्हणून काम करायचे. तिथे काम करणारे बहुतेक लोक हे भारतीय सेनेतून रिटायर होऊन आलेले गावकरी सैनिक होते. पहिल्या पाच सहा महिन्यात सुरक्षेबरोबर Transportation ची कामंही त्यांच्यावर आली. चार शिफ्ट, त्यासाठी नेणार्‍या आणणार्‍या बसेस, मॅनेजरांच्या दिमतीला असलेल्या गाड्या, टेम्पो इत्यादी वाहनांची जा/ये सतत चालू असायची. तेव्हा त्यावर देखरेख करणारा कुणीतरी जबाबदार माणूस हवा म्हणुन कंपनीने त्यांच्याच आवारात Pre-fabricated म्हणजे तयार भिंतींचे पण Nut-Bolt ने जोडलेला एक गाळा आम्हाला रहायला दिला आणि पुढे कित्येक वर्षं आम्ही तिथे रहात होतो.

माझ्या वडिलांची खासियत म्हणजे त्यांच अक्षर आणि इंग्रजी दोन्ही फार चांगलं होतं. त्यानी लिहीलेली पत्र अजूनही वाचत रहावी इतकी चांगली असायची. त्याचा एक उपयोग असा झाला की आजूबाजूच्या गावातून ओळखीचे आणि कित्येकदा अनोळखी लोकही त्यांच्याकडून इंग्रजी / मराठी अर्ज लिहून घ्यायला येत असत. बर्‍याचवेळा आमच्या घरी एकाद दुसरा माजीसैनिक त्याचे अर्ज लिहीण्याचे काम घेऊन बसलेला असे. माझे वडिलही माजी सैनिक होते. त्यामुळे ते प्रत्येकाचे कसले कसले अर्ज लिहून , फॉर्म भरून देऊन त्यांना मदत करायचे. त्याबद्दल त्याना पैसे देऊ पहाणार्‍यांना 'तुमचे धा रुपये घेवान मी काय बंगलो बांधू?' असं विचारून ते पैसे नाकारत असत. पण त्यांचा भारत सरकार आणि अर्जपध्दतीवर गाढा विश्वास होते हे खरे...

१९८२ साली कंपनीच्या संचालक/मालक्/भागधारकांनी जे काही केले, त्याचा परीणाम म्हणून कंपनीला टाळे लागले, ते अजून टाळे तिथेच आहे. मॅनेजर मंडळी पांगली, कामगाराना जसे जमेल तसतसे ते आपालल्या पोटामागे गेले. फक्त सिक्यूरीटीची गरज असल्याने १५/२० गार्ड, २/३ सुपरवायझर आणि माझे वडिल Security Officer म्हणून राहिले. कंपनी मुंबई हायकोर्टाच्या ताब्यात गेली.

पहिली दोन वर्षं आहे त्याचे काय करायचे यासंबधी वादविवाद, चर्चा इत्यादी जे काही करायचे असते ते झाले, पण त्यामुळे कंपनीच्या सिक्युरीटीला ठेवलेल्या माणसांना एक पै पगार काही मिळाला नाही. तरूण लोक होते ते सोडून गेले, पण माजीसैनिकाना काही पेन्शन असल्याने ते टिकून राहीले. माझे वडिल अर्थातच राहीले, कारण मुलं शाळा कॉलेजमधे, रहायला जागा होती, आणि भारत सरकारवर विश्वास..

१९८४ मधे म. रा. वि. म. च्या लक्षात आलं की कंपनीने कित्येक लाखांची थकबाकी ठेवली आहे, आणि त्यांनी वीज तोडली. नशीब की पाणीवाल्यांनी पाणी तोडले नाही. आता घराला वीज मिळविण्यासाठी वेगळा अर्ज करणं याला पर्याय नव्हता. अर्ज केला, पण त्या अर्जासोबत 'घरमालकाची परवानगी' आणण्याची जरूरी होती.

वडिलांनी नियमाप्रमाणे एक छानसा अर्ज लिहून मुंबई हायकोर्टाला पाठवला. मुंबई हायकोर्ट ही स्वतः एक व्यक्ती नसल्याने तो अर्ज कुठल्यातरी खात्याच्या फाईलीत जमा झाला, पण घर अंधारातच राहिले. कुंपणा पलिकडे असलेल्या 'झोपडीवजा' घरानाही वीज होती, पण आमच्या घराला वीज नाही. सरकारवर विश्वास एवढा की सरकारला अर्ज दिलाय, त्याचं उत्तर येत नाही तर त्याला दुसरे काही पर्याय काढता येतील का असा विचारच केला नाही. अर्ज हायकोर्टाचा फाईलीत पडून राहीले. दोन वर्षांनी ८० सालच्या कुठल्यातरी पगाराला प्रमाण मागून त्याप्रमाणे महिन्याला चेक येऊ लागला. आणि माझे वडिल प्रत्येक माणसाचा पाच पाच मिनिटांपर्यंतच्या कामाचा हिशेब ठेऊन त्याना पगार देत राहिले. उरलेले पैसे आणि बागेत आलेली गुलाबाची फुलं विकून पाण्याचं बिल भरत राहिले.

८७ साली मी अमेरिकेला आलो. त्यावेळी भारतात दिवसा फोन केल्यास मिनिटाला ३.५०$ आणि रात्री १ ते पहाटे ६ मधे केल्यास मिनिटाला १.८०$ असा दर होता. फोन करणं अशक्य म्हणून मी त्यांना पत्र लिहून 'तुम्ही कुणाला तरी विचारा, दुसरा पर्याय शोधा वगैरे म्हणालो', पण 'मी अर्ज केला आहे, त्याचे उत्तर येऊदे' म्हणून ते गप्प बसले. घर सोडण्याचा सल्ला ही दिला, 'पण हायकोर्टाची जबाबदारी, मी सोडुन गेलो तर उद्या इथे लक्ष कोणाचे?' म्हणून घरही सोडले नाही.

हा प्रकार सर्वसाधारणपणे १९९० पर्यंत चालला. मग मात्र मी चिडुन त्यांना लिहिलं की 'तुमचा तुमच्या अर्जावर इतका विश्वास असेल, तर एक अर्ज नीट लिहून, त्याच्या पन्नास/ शंभर कॉप्या काढा. आणि रजिस्टर पोस्टाने रोज एक त्यांना पाठवा. आपण त्यांच्या फाईली तरी भरू मग ते कदाचित जागे होतील.'

पहिला/दुसरा अर्ज पोस्टात टाकलाही असेल. पण तेवढ्यात एका जवळच्या नातेवाईकाचा एक मित्र म. रा. वि. मं. मधे बदली घेऊन आला. त्याच्या कानी गोष्ट गेली. १९९० साली 'कुणी अंधारात रहातं,' हे त्याला पटेना. ओळखीमुळे 'घरमालकाच्या परवानगीशिवाय' त्याने मीटर बसवला. घरात वीज आली, ती ९६ साली वडिल गेल्यानंतर लगेच घर सोडेपर्यंत होती.

हायकोर्टाच्या न्यायाधिशांची चूक नाही, त्यांच्या इतर कर्मचार्‍यांची चूक नाही, म.रा.वि.मं. ची चूक नाही, कंपनीची चूक नाही, चूक कुणाचीच नाही. पण शेवटी माझ्या वडिलांना पैसे देऊन नाही तरी ओळख लावण्याचा भ्रष्टाचार करावाच लागला.
आयुष्यात असे प्रसंग फारच कमी आले असतील की त्यांना वीजेसाठी का होईना हा भ्रष्टाचार करावाच लागला..

(समाप्त).

प्रकार: 

कमाल आहे. जुन्या लोकांची विचार करायची पद्ध्तच निराळी. बाकी आपल्या सरकारी कारभाराबद्दल, नवीन ते काय?

ह्म्म. भ्रष्टाचार न करता कामं करुन हवी तर पेशन्स आणि कदाचित ती कामं कधीच होणार नाहीत याची मानसिक तयारी हविच आपल्या देशात.

याला म्हणतात विश्वास. सरकारी खात्यात असे अडनिडे पत्र गेले, तर त्याचे काय करायचे हेच त्याना कळत नाही. आता हायकोर्टात, वीज जोडणीसंबधी काही फाईल असेल, याची शक्यताच नाही.

देसाई तुमचे वडील खुप साधे आणि सरळ होते पण ह्या जमान्यात फार सरळमार्गी राहुनही चालत नाही . म.रा.वि.मं. तर भ्रष्टाचाराचं कुरणचं आहे.

नियमांना योग्य ठिकाणी अपवाद करून ज्यांना गरज आहे त्यांना आपल्या खात्यातील सुविधा पुरवणे हे बरोबरच आहे. आता येथे ते ओळखीमुळे झाले हे बरोबर, पण स्थानिक अधिकार्‍यांना त्यांच्याकडे आलेल्या अर्जामधून त्यातील 'लेखी मजकुरापलिकडे' खरोखरच गरज कोणाला आहे याची माहिती असणे चांगलेच ना? त्यामुळे येथे भ्रष्टाचार झाला असे मला वाटत नाही. आता त्या मित्राने अशी इतरांचीही कामे केली नाहीत तर ते बरोबर नाही.

पण तुमच्या वडिलांच्या चिकाटीला दाद द्यावीशी वाटते.

यंत्रणेवर ठाम विश्वास असण्यार्‍या तुमच्या वडिलांच्या प्रामाणिक पणाला सलाम!
म.रा.वि. म अथवा तत्सम यंत्रणांमध्ये असणार्‍या 'काही' संवेदनशील माणसांमुळेच असा विश्वास कायम राहतो. बाकी लोक फक्त यंत्रणा वाईट्ट म्हणुन ओरडत असतात.

एक उदा. कोकणातलेच आहे. श्री. अविनाश धर्माधिकारींनी सांगितलेले.
त्यांचे मित्र कोकणात जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी होते. एका गावात एका माणसाने आपल्याच घरासमोरील झाड तोडले अशी चुगली वजा तक्रार गावातील दुसर्‍या माणसाने केली. त्याची सुनावणी डीएम समोर आली. झाड तोडले म्हणुन नियमाप्रमाणे दहा हजार रुपयांपर्यंत दंड अश्या शिक्षेची तरतुद होती. पण डीएम नी त्या माणसाला झाड का तोडले? असा प्रश्न विचारले. 'बाप मेला, म्हणुन त्याला च्या अंत्यविधीला पैसे नसल्याने दारासमोरचे एकमेव झाड तोडुन पैसे जमवले' असे उत्तर ऐकताच, डीएम नी त्या माणसाला १ रुपया दंड केला! अन केस निकाली काढली. (नियम १०,००० रु पर्यंत दंड असा होता, १ रुपया दंड हा त्या नियमात बसतो)

देसाई, मला वाटते आपल्या सर्वान्च्याच वरच्या पिढीने आपल्यापेक्शा अनेक पटींनी जास्त कष्ट उपसलेले आहेत व हाल अपेष्टा सोसलेल्या आहेत. त्यांच्या कष्टांमुळेच आपण आहोत ह्या स्तरावर पोचलो आहोत. त्यांचे प्रामाणिक आयुष्य हे आपल्याला हेही शिकवून जातात की अजूनही जगात सदाचारी वृत्तीने जगता येऊ शकते. कष्ट व हाल अपेष्टा असतील पण कुणाचा एक शब्दही ऐकून घ्यावा लागणार नाही असा स्वाभिमान असेल.

वरील उदाहरणामध्ये मलाही हा भ्रष्टाचार असावा असे वाटत नाही. तुम्ही ह्यामध्ये सुचवलेला एक पर्याय (रोज पत्र पाठवणे) हाही एक प्रयोग करुन बघता येण्यासारखा होता. पण कार्यालयात भेट देउन देखील काही गोष्टी सुलभ होऊ शकल्या असत्या.

माझा अजूनही माणसातल्या चांगुलपणावर विश्वास आहे आणि त्याचा प्रत्यय मला सरकारी कार्यालयात देखील आलेला आहे. Happy

काही वेगळेच होते तुमचे वडील! पण सध्याच्या काळात ''मायबाप सरकार''वर असा विश्वास ठेवून गैरसोय मुकाट सहन करणारा माणूस विरळाच असेल!

सरकारी कामकाजाबद्दल एव्हढा विश्वास खुद्द सरकारला नसेल वाटला कधी.

जोक्स अपार्ट, पण श्रद्धा आणि सबुरी ह्यात ह्यापेक्षा वेगळं काय असत ?

ही गोष्ट १९८२ ते १९९० दरम्यानची आहे. आता सरकरी नोकरांची नितीमत्ता फारच ढासळली आहे. त्यांच्याकडे त्यांचे वरिष्ठ आता सर्वच गोष्टींचे भाव करतात.
बद्ली हवी आहे एक भाव, बदली नको आहे दुसरा भाव, प्रमोशन तिसरा भाव. कसे काम करावे त्यांनी ?

मंत्री बदलला की तो वसुलीची रक्कम वाढवतो कारण पैश्याशिवाय निवडणुका लढवता व जिंकता येत नाहीत्.पुर्वी जानेवारी - फेब्रुवारी व मार्च महिन्यात ड्रायव्हींग लायसन्स चेक केली जायची ती केसेसचा कोटा पुर्ण करण्यासाठी. आताश्या रोजच चेक होत वसुली कोट्यासाठी.

आपल्यासारखे सुशिक्षीत जर झाडुन मतदानाला बाहेर पडले तर हा पैश्याने निवडणुका जिंकायचा राजकारणी लोकांचा विश्वास कमी होऊन हे संपेल.

परदेसाई, गोष्ट भारी, तुमचे वडीलही भारी! Happy
पण....
>>>>> पण शेवटी माझ्या वडिलांना पैसे देऊन नाही तरी ओळख लावण्याचा भ्रष्टाचार करावाच लागला. <<<<
हे मला अजिबात मान्य नाही, मी याला भ्रष्टाचार म्हणणार नाही!
अहो या हिशोबाने उद्या, देवाला कौल लावायला म्हणून गुरवाला पानसुपारी दिली तर देवाशी असलेल्या गुरवाच्या ओळखीचा गैरवापर करुन भ्रष्टाचार केला असेच म्हणावे लागेल की हो! Biggrin

माझ एक तत्व आहे, एण्ड रिझल्ट जो काय असावा अस ठरवल आहे तो योग्य आहे की नाही हे बघावे, सरळमार्गाने कामे होत अस्तिल तर मुद्दामहून वाकडी वाट धरू नये, पण घी सिधी अन्गुलीसे नही निकलता, बोले तो तेढी अन्गुलिसेही निकालना चाहीये! Proud पण अन्तिम साध्य योग्यच नैतिक पाहिजे

जिथे शब्दाला पत असेल, शब्द फेकुन कामे होत असतील, तशी करुन घ्यावित
जिथे तसे नसून पैसेच फेकावे लागत अस्तील तर पैसे फेकावेत अन काम करुन घ्यावे!
अन पैसे फुकुन काम करुन घ्यायला खिशात दमडाच नसेल, तर मुकाट गुमान बसावे... ठेविले अनन्ते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान! Wink

जगाला सुधरविण्याच्या भानगडीत पडू नये, अन प्रवाहाच्या उलटे पोहोण्याचे धाडसही करु नये!
मात्र एक आहे, तत्व म्हणूनच, स्वतः लाच घेणार का, तर नाही!
तुम्ही स्वतःपुरते कसे वागायचे ते ठरवु शकता, बाह्य समाजात अनलेस तुमच्यात तेवढी नैतिक्/मानसिक्/शारिरिक ताकद नसेल, तर असली तत्वे पाळणे हे स्वतःसहित कुटुम्बियान्ना खड्यात ढकलण्यासारखे होते!

>>>> कष्ट व हाल अपेष्टा असतील पण कुणाचा एक शब्दही ऐकून घ्यावा लागणार नाही असा स्वाभिमान असेल. <<<<
किरण, अनुमोदन!

अन प्रवाहाच्या उलटे पोहोण्याचे धाडसही करु नये!>> शिवाजीचा वाढदिवस दुसर्‍याच्याच शेजार्‍याच्याच घरी करावा Happy

चम्प्या, भावी पिढीचा वाढदिवस खूप लाम्बची गोष्ट, आधी स्वतः तरी तसे बनू शकतो का ते आजमावुन बघाव माणसानं!
शक्य असेल तर अन तरच तस करावं हा त्याचा मतितार्थ आहे!

याला कुठल्याच अर्थाने भ्रष्टाचार संबोधता येणार नाही. स्वाभिमानी लोकांना त्यांच्या प्रत्येक शब्दाचे मोल असते, कुठे एक जरी शब्द वापरावा लागला तरी त्याचे दु:ख दिर्घ काळ त्यांना जाचत रहाते...

शिकण्यासारखे आहे.

अन प्रवाहाच्या उलटे पोहोण्याचे धाडसही करु नये!>>
--- प्रवाहाची दिशा बदलायची महत्वाकांक्षा ठेवा... Happy

>>>> --- प्रवाहाची दिशा बदलायची महत्वाकांक्षा ठेवा...
द्याट्स अ गुड आयडीया! Happy

आमच्या (मी आणि विनय) वडिलांच्या तत्वनिष्ठेचा पुढचा किस्सा लिहितोयः -
जून १९९६ मधे अकस्मात पणे वडिलांचं निधन झालं. आम्हि रितसर पणे ही गोष्ट 'हाय-कोर्ट रिसीव्हर, मुंबई' यांना कळवली. कारण कामावर असलेल्या लोकांची जबाबदारी घेणारा कुणितरी त्या जागेवर यायला हवा होता. वडिलांच्या ताब्यात असलेल्या बर्‍याच गोष्टी पुनः नव्याने 'जबाबदारी' घेणार्‍या माणसाच्या ताब्यात 'रीतसर'पणे सोपवून आम्हाला मुक्त व्हायचं होतं.

साधारणपणे दीड महिन्यानंतर 'हाय-कोर्ट रिसीव्हर, मुंबई' यांचे तीन जबाबदार अधिकारी परिस्थीतिची पहाणी आणी पुढच्या कार्यवाही साठि हजर झाले. घरी मी आणि आई होतो. आलेल्या लोकांच्या आदेशावरुन मी वडिलांची ऑफिसची बॅग, ऑफिसच्या किल्ल्या घेऊन त्या लोकांबरोबर वडिलांच्या ऑफिस मधे गेलो. कागदोपत्री करायचे ते सगळे सोपस्कार पुरे केल्यावर वडिलांच्या ताब्यात असलेल्या 'पैशां'चा हिशेब सुरु झाला. आमचे वडिल महिन्यातून दोन वेळा स्वतःच्या ताब्यात असलेल्या 'प्रत्येक पैशाचा' हिशेब 'हाय-कोर्ट रिसीव्हर, मुंबई' याना कळवत होते. सुदैवाने निधना पूर्वी दोन दिवस अगोदरच स्वतः जवळ असलेल्या 'पैशां'चा हिशेब त्यानी कळवलेला होता. वडिलांच्या बॅग मधले पैसे, ऑफिस मधल्या तिजोरितले पैसे यांची मोजदाद करुन, वडिलांनी कळवलेल्या हिशेबा सोबत तपासणी केली तेव्हां, आलेल्यां पैकी जो वरिष्ठ होता तो अक्षरशः चक्रावून गेला होता. कारण वडिलांनी लिहुन पाठवलेल्या हिशेबात आणि हातात असलेल्या रकमेमधे 'एका पैशा'चा देखिल फरक नव्हता. दैनंदिन व्यवहारातून 'बाद' झालेले पाच पैसे (चौकोनी), दहा पैसे (जुने छोटे आणि नवे मोठ्या आकाराचे), वीस पैसे (जुने पितळी आणि नवे षटकोनि), एक, दोन आणि पाच रुपायाच्या जीर्ण झालेल्या नोटा अगदि 'डिनोमिनेशन' सकट लिहुन, जपून जाग्यावर ठेवलेले होते. आणि प्रत्येकवेळी 'स्वतःच्या ताब्यात असलेल्या' या सगळ्या पैशांचा हिशेब त्यानी 'स्वत:च्या शेवटा पर्यंत' पुढे कळवलेला होता. तत्व एकच - 'मी फुकट मिळालेला पैसा माझ्या कुठल्याही गोष्टि साठि वापरणार नाही'.

तुमच्या वडिलांच्या प्रामणिकपणला कडक सलाम ! Happy

खरं आहे ....अशी माणसे विरळीच !

उरलेले पैसे आणि बागेत आलेली गुलाबाची फुलं विकून पाण्याचं बिल भरत राहिले. >>
'पण हायकोर्टाची जबाबदारी, मी सोडुन गेलो तर उद्या इथे लक्ष कोणाचे?' म्हणून घरही सोडले नाही. >>
असा प्रामाणीक पणा आणि अशी निष्ठा क्वचीत दिसते.

हे वाचुन मला 'शं.नां.ची एक गोष्ट आठ्वली .त्यांनी त्यांच्या वडिलाबद्दल कि काकांबद्द्ल लिहीलेली.
फाउंटन पेनातली शाई सरकारी आहे म्हणुन ते पेन ते मुलांना वापरु देत नसत. (अशा स्वरुपाची गोष्ट होती - मला नीट सांगता येत नाहिये)
देसाई, तुमचे वडिल ग्रेट होते. अशा कितीतरी आठ्वणी असतील ना त्यांच्या प्रमाणिकपणाच्या?

विवेक आणि विनय, असे वडील लाभणं हे सौभाग्यच. खरच काही माणसं चुकून सत्ययुगातून आपल्या युगात जन्मली असेच वाटते!

या भ्रष्टाचाराच्या जमान्यात अशी उदाहरणे वरचेवर स्मरणास आणून द्यायला हवी.
अशी माणसे विरळा.
खरोखर साध्या माणसांत
दिव्यत्वाची प्रचिती.
कर माझे जुळती.

Pages