सर्व्हे रिपोर्टः विभाग- समाज

Submitted by संयोजक_संयुक्ता on 3 May, 2010 - 10:16

समाज

या सदरात एकूण १३ प्रश्न होते, आणि त्यापैकी १० अनिवार्य होते.
'देव' या संकल्पनेवर विश्वास, सामाजिक चालीरिती, धर्मकार्ये, धार्मिक निर्बंध, सामाजिक लिंगभेद, समाजाचा घटक म्हणून स्त्रियांना सामाजिक योगदानाविषयी/पर्यावरणाविषयी काय वाटते, शारीरिक/लैंगिक/मानसिक शोषणाचे अनुभव, स्त्रीच्या नातेस्थितीबद्दलचे अदमास, स्त्रीप्रतिमा, या मुद्यांभोवती हे प्रश्न गुंफले होते. भारतीय स्त्रीच्या भावविश्वात सामाजिक परिस्थितीचा, देवाधर्माने परंपरागत आलेल्या घटकांचा, लिंगभेदाचा समावेश असलाच तर तो किती हे तपासून पहायचा मानस होता.

हा भाग वाचायला सुरवात करण्याआधी कृपया प्राथमिक माहिती पूर्ण वाचावी.

  • देव या संकल्पनेवर तुमचा विश्वास आहे का?

    या प्रश्न खुला होता आणि शब्दमर्यादा नव्हती. उत्तर देताना मैत्रिणींनी त्यांचे विस्तृत मत मांडले आहे.
    १०९ जणींनी 'हो विश्वास आहे' असे उत्तर दिले तर ९ जणींनी (ठाम) नाही असे सांगितले. ४ जणींनी 'विश्वास आहे की नाही माहित नाही, गेल्या काही वर्षांपासून देव या संकल्पनेबद्दल गोंधळात पडले आहे' असे सांगितले.

    ज्यांनी देवावर विश्वास आहे असे सांगितले त्यापैकी ३० जणींनी पुढे असेही सांगितले की एक शक्ती म्हणून, कुणावर तरी श्रद्धा ठेवायची म्हणून, जगात चांगलं वाईट बघणारी शक्ती म्हणून देवावर विश्वास आहे, पण रितीरिवाज किंवा कर्मकांड अथवा मूर्तीपूजा अशा बाबींवर फारसा विश्वास नाही.

    हो. आपल्यावरती एक शक्ती आहे ही भावना कृतज्ञता शिकवते. त्या शक्तीला निसर्ग वा देव दोन्ही मानते.

    हो. पण त्याचा सतत उदोउदो करावा असे वाटत नाही. मनापासून हात जोडले अगदी बेडवर झोपून तरीही देवाला काही त्याचा प्रॉब्लेम नसेल असे वाटते. देवळात गेले तर मनाला शांत वाटते म्हणूनच. काही मागायला अथवा आधारासाठी नव्हे.

    थोडाफार, 'देव' किंवा 'दानव' या आपल्याच वृत्ती आहेत असं कधी वाटतंत तर आपण देवाचे कधीच काही करत नाही असा गिल्टीनेसपण कधीतरी येतो.

    देवावर विश्वास नाही असे सांगताना आपण agnostic किंवा huminist आहोत असे काही जणींनी नमूद केले.

    संकटकाळे धावून येणार्‍या, ज्यावर विसंबून संकटातून सुटण्याचे मानसिक बळ यावे अशा देवाची कल्पना आवडते खरी , पण विश्वास नाही.

    देवावर म्हणण्यापेक्षा आपण सगळे एकाच प्रकारच्या उर्जेतून निर्माण झालो आहोत व त्या उर्जेद्वारे एकमेकांशी जोडलेले आहोत. या उर्जेद्वारे आपण एकमेकांच्या विचारांमध्ये व कृतीमध्ये बदल घडवत असतो या संकल्पनेवर विश्वास आहे.

  • सणवार, चालीरिती कितपत पाळता? (१ - अजिबात नाही आणि ५ - सोवळे-ओवळे असे धरल्यास १ ते ५ मधला एक पर्याय निवडा. (To what extent do you follow traditions, rituals, celebrate festivals? (1- not at all, 5- follow strictly)

    Picture1_2.png

    (टीपः यातील २-४ या गुणांची व्याख्या आपण प्रश्नावलीत केली नव्हती. हा प्रश्न मुळातच काटोकोर बांधेसुद नाहीये, तरीही भारतीय स्त्रियांना अंतःस्फुर्तीने तंतोतंत लागु पडतो.)

    या प्रश्नाच्या उत्तरात सर्वात जास्त म्हणजे ४५% स्त्रियांनी ३ (मध्यम) हा पर्याय निवडला आहे. एकाही स्त्रीने ५ (सोवळे ओवळे आदी पाळतो) हा पर्याय निवडला नाही. परदेशात रहाणार्‍या भारतीय स्त्रिया आणि सध्या भारतात असलेल्या स्त्रिया यांनी निवडलेल्या गुणांकनमानात (rating scale) काही ठोस फरक आढळून आला नाही . बहुतांश परदेशात रहाणार्‍या भारतीय स्त्रियांनीसुद्धा मध्यम हाच पर्याय (४३%) निवडलेला आहे. बाकीचे पर्याय निवडलेल्या स्त्रियांचे प्रमाणही भारतीय व परदेशातील भारतीय स्त्रियांमध्ये जवळपास सारखेच आहे. (उल्लेख करण्याइतके वेगळे नाही).

    नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे अभारतीय वंशाच्या दहा स्त्रियांपैकी ५ जणींनीसुद्धा मध्यम हाच पर्याय निवडला आहे. मुळात अभारतीय स्त्रियांचे सर्वेक्षणामधले प्रमाण कमी असल्यामुळे बाकीचे पर्याय किती जणींनी नोंदवले आहेत हे तपासायचा प्रयत्न करण्याएवढ्या प्रतिक्रिया आपल्याकडे नाहीत. (बाकीचे पर्याय निवडणार्‍या स्त्रियांची संख्या २, १, २ अशी आहे.)

  • सणवार, चालीरिती बहुतांशी पाळत असल्यास त्यामागील कारण काय ?

    या प्रश्नाच्या उत्तरादाखल ५ पर्याय उपलब्ध होते. एकापेक्षा जास्त पर्याय निवडण्याची मुभा होती.
    यासाठी पर्याय निवडताना एकापेक्षा जास्त पर्याय निवडता येत असल्याने, एकूण २१८ पर्याय निवडले गेले. जास्तीतजास्त ५ पर्याय एकत्र निवडले आहेत. (३ स्त्रियांनी ५ पर्यायांची निवड केली आहे.)
    फक्त एकच पर्याय निवडलेल्या स्त्रियांची संख्या ६७ आहे. उरलेल्या ५५ स्त्रियांनी एकापेक्षा जास्त पर्याय पर्याय निवडले आहेत.
    Reasons for Following Religious Practices.JPG

    फक्त एकच पर्याय निवडलेल्या स्त्रियांनी पुढील प्रमाणे पर्यायांची निवड केली आहे.
    Picture2_3.pngदेवावर विश्वास असणे / नसणे आणि सणवार पाळण्याची कारणे, सणवार कितपत पाळले जातात या घटकांमध्ये परस्परसंबंध आढळून आला नाही.

  • पाळीच्या वेळेस धार्मिक निर्बंध तुम्ही पाळता का?

    Religious Constraints.JPG
    (टीपः प्रश्नावलीत निर्बंधांची व्याख्या स्पष्टपणे केली गेली नव्हती. त्यामुळे नक्की कशाप्रकारचे निर्बंध पाळले जातात याबाबतचा मजकूर उपलब्ध नाही.)
    असे निर्बंध पाळतो असे सांगणार्‍यांपैकी ५०% स्त्रिया सध्या भारताच्या बाहेर वास्तव्यास आहेत. या सर्व जणींनी देवावर विश्वास आहे असे सांगितले. थोडेफार निर्बंध पाळणार्‍यांपैकी ५९% स्त्रिया (४९ पैकी २९) सध्या परदेशी रहातात. यापैकी २ जणींनी देव आहे की नाही याबाबत संभ्रमात आहेत तर उरलेल्या सर्व जणींनी देवावर विश्वास आहे असे सांगितले. परदेशी वंशाच्या सर्व स्त्रियांनी आपण कधीही असे निर्बंध पाळले नाही असे उत्तर दिले.

  • आपल्या समाजात स्त्रीला समान दर्जा दिला जातो का ?

    हा प्रश्न खुला आणि शब्दमर्यादेविना होता. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या बहुतांशी स्त्रियांचे मत आपल्या समाजात अजूनही पूर्णपणे समान दर्जा दिला जात नाही, अजून बराच पल्ला गाठायचा आहे असे असल्याचे दिसून आले. भाग घेतलेल्या १२२ पैकी ८३ जणींना म्हणजे ६८% मैत्रिणींना स्त्रीला समाजात समान दर्जा मिळत नाही असे स्पष्टपणे वाटते.

    नाही. स्त्रीला नाक्कीच समान दर्जा दिला जात नाही. तिच्याकडून नेहमीच अवास्तव अपेक्षा केल्या जातात, दर वेळी तिनेच झुकावे अशी अपेक्षा ठेवली जाते.

    नाही. सुशिक्षित घरातूनही नाही. समान वागणुकीसाठी आग्रही राहून सातत्याने आपलं मत मांडत रहावं लागतं आणि स्वतःला सिद्ध करून तो दर्जा मिळवावा लागतो.

    नाही. पुरुषसत्ताक समाज असल्याचा फिल येतो. चीड येते. शक्य तेव्हा विरोध करते. बर्‍याच पुरूषांना , स्त्रीयांना स्वतःची मतं असतात हेच मान्य नसते. भारतीय समाज खूप पिछाडीवर आहे. रस्त्यावरून जाताना मिळाणार्‍या नजरा कमी झाले तर थोडी सुरूवात झाली असे म्हणता येईल.

    नाही. शिव्या स्त्रीचाच अपमान करणार्‍या असतात, स्त्रीने पडतं घ्यायला हवं असतं. अधिकारवाणीने, ठामपणे बोलणारी स्त्री चेष्टेचा विषय होते.

    १३% स्त्रीयांना पूर्णपणे समान दर्जा मिळत नसला तरी 'थोडाफार समान दर्जा मिळतो"( टीपः प्रतिक्रियांमधील शब्द) असे वाटते. तर ११ जणींना (टक्के) स्त्रीला समान दर्जा मिळणं हे ती कोणत्या प्रकारच्या विशीष्ट समाजात वावरते (पक्षी: सुशिक्षित -अशिक्षित, जातिनिहाय, आर्थिकस्थितीनुसार विभागल्या गेलेल्या, शहर -खेडेगाव किंवा प्रगत - अप्रगत देश इ.) यावर अवलंबून आहे असे वाटते.

    yes, atleast in brahmins.

    मध्यमवर्गिय समाजात तरी ९०% स्त्रीयांना समान दर्जा मिळतो.

    In some countries absolutely no, in some so-so, in other it is forced by law but in my opinion happens to be apparent

    Theoretically, yes. However, I think women suffer from a great deal of beneath-the-surface discrimination.

    It depends. It is getting better but in some situations or cases could be better.

    हे त्या त्या समाजावर अवलंबून आहे, पण अजुन दिल्ली बहोत दुर है

    बाकी समाजाचे माहित नाही मराठी समाजात नक्की जास्त दिला जातो. खेडेगावात माहित नाही. /em>

    सत्तर टक्के दिला जातो. उरलेल्या ३०% साठी स्त्रियाच जबाबदार आहेत. कशासाठी लागते स्पेशल ट्रीटमेंट? (प्रेग्नंट नसल्यास) बस/ट्रेनमधे उभं राहिल्यावर बसलेल्या पुरुषाने उठून तुम्हाला जागा द्यावी या अपेक्षित नजरेतच तुम्ही स्वतःला दुय्यम स्थानी आणता.

    फक्त १० जणींनी "हो, स्त्रीला समाजात समान दर्जा मिळतो" असे ठाम उत्तर दिले .

    हल्लीच्या काळात दिला जातो. मी अनुभवतेय

    Yes. They just need to learn to exercise them!

    याव्यतिरिक्त 'अशी तुलना कशासाठी', किंवा 'नक्की कोणत्या समाजाबद्दल बोलत आहात' आणि 'स्त्री स्वतः समान दर्जा घेते का' अशीही विचारणा झाली. तसेच वैयक्तिक पातळीवर नेहेमीच समान वागणूक मिळाली असली तरी सामाजिक पातळीवर स्त्रियांना ही वागणूक मिळत नाही, हेही काही मैत्रिणींनी मुद्दाम नमूद केले आहे.

    'आपला' म्हणजे नक्की कोणता समाज? शिवाय समान दर्जा 'घेतला' जातो का हा त्याहून कळीचा प्रश्न आहे. स्वतंत्र विचार करायची अनिच्छा and/or असमर्थता हा एक लिंगाधारित नसलेला भयंकर रोग आहे. त्याचं खापर कोणी कोणावर फोडायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न! समान दर्जा.. त्यासाठी आपण मुळात ही तुलनाच का करतो? ती पण पुरुषाशी. शेवटी सगळी मनुष्यजात नाहीये का?

    In my life, I have always got good opportunities. My dad was of typical male nature, but he did not let that come in the way he would grow me up. My husband is open minded and helps me to be human being rather than just wife.

    नाही. माझ्या कुटुंबात मला नेहमीच समान दर्जा मिळाला. पण समाजामधे वावरताना नाही.

  • आयुष्यात यांपैकी कुठल्या अनुभवास तुम्हाला सामोरे जावे लागले आहे?
    आणि
  • या विदीर्ण करणार्‍या अनुभवातून तुम्ही कशा सावरलात?

    यापैकी या अनुभवातून तुम्ही कशा सावरलात हा प्रश्न वैकल्पिक आणि शब्दमर्यादेविना खुला होता. इतक्या खाजगी विषयावर ज्या शब्दात मतं आली, त्या शब्दातल्या भावमुद्रांची तीव्रता जशीच्या तशी एक वाचक म्हणून आपणांस अनुभवायला मिळावी म्हणून कसलीही प्रक्रिया न करता, प्रतिक्रिया दिल्या आहेत. कात्री लावणे सहजशक्य नव्हते.

    बलात्कार, लग्नाअंतर्गत बलात्कार, विनयभंग, नको असलेले स्पर्श, जननेंद्रियाचे प्रदर्शन, कामुक नजरा, लैंगिक छळ, मानसिक छळ, मारहाण, हुंड्यासाठी छळ, बालवयापासून शारिरिक छळ यासारखा किंवा यापैकी कोणता अनुभव आला आहे का या प्रश्नाला उत्तर देताना ५१ जणींनी त्यांना यापैकी कोणताही अनुभव कधीच आला नाही असे नोंदवले. यामध्ये ५ मैत्रिणी अभारतीय वंशाच्या आहेत.

    यापैकी कुठलाही अनुभव आला नाही असे नमूद केलेल्यांपैकी:
    असा अनुभव स्वतःला आला नसला तरी एका ओळखीच्या व्यक्तीचा बलात्काराचा अनुभव ऐकल्यापासून आयुष्य बदललं, आपण या दृष्टीने ठोस पावलं उचलली पाहीजेत असं वाटलं. तरीही, unwanted pass/नजरा याचा अनुभव आहे. त्यामुळे कधीकधी लोकं आपल्याकडे आपले अवयव सोडून पाहणार की नाही या जन्मात, असे वाटते

    हो, पण गर्दीत धक्के बसण, नको तिथे स्पर्श होणं...तिरस्कार वाटतो.

    तर एकीने असा अनुभव आला नाही पण आला असता तर काय केले असते हे सांगितले. I did not have any bad experiences. If I would, I would think of increasing my self confidence and engaging myself in other things.

    लग्नाअंतर्गत बलात्काराचा व त्याचबरोबर मानसिक छळाचा अनुभव आल्याचीही प्रतिक्रिया आली. यातून सावरण्यासाठी Self support, meditation, counseling या बाबींची मदत घेतल्याचे सांगण्यात आले.

    विनयभंगाच्या अनुभवातून जावे लागलेल्या मैत्रिणींची संख्या ५ आहे. (यापैकी सर्वजणी भारतीय वंशाच्या आहेत.) चौघींनी नको असलेले स्पर्श, जननेंद्रियाचे प्रदर्शन, कामुक नजरा, लैंगिक छळ, मानसिक छळ यासारख्या इतरही काही अनुभवांना सामोरे जावे लागले असे सांगितले आहे. यातून कसे सावरलो हे सांगताना Therapy, strong sense of self, good support system यांचा उपयोग झाला असे सांगितले तर एकीने सावरले असं म्हणता येईल का खरंच? मला शक्यतो लैंगिक आकर्षण वाटत नाही. मानसिक स्थिती सांभाळायला सायकिअ‍ॅट्रीस्ट, सायकॉलॉजिस्ट, औषधे यांची मदत झाली. असं सांगितलं. त्याचबरोबर मोठं झाल्यावर त्यामागची अत्याचार करणार्‍याची खरी मानसिकता समजल्यावर. आणि आपला त्यात काही दोष नाही हे समजल्यावर सावरले किंवा सावरावं लागलं... कोणाला सांगणार मैत्रिणींशिवाय? असेही सांगितले.

    लैंगिक छळाला सामोरे गेलेल्या स्त्रियांची संख्या ४ आहे. त्यांनी लैंगिक छळाव्यतिरिक्त मानसिक छळ, विनयभंग, नको असलेले स्पर्श यातील काही प्रकारांना सुद्धा सामोरे जावे लागल्याचे सांगितले. यातून सावरण्यासाठी त्याबद्दल कारवाई केल्याचे काही मैत्रिणींनी सांगितले. वाचून व कडक वागून I complained to management and they took due action. That was enough. I knew it wasnt my fault so I was not plagued by it.

    मानसिक छळाला सामोरे जावे लागले असे १५ जणींनी सांगितले. यात ४ अभारतीय वंशाच्या महिलांचा समावेश आहे. यापैकी ४ जणी (यातही २ अभारतीय वंशाच्या महिला) सोडल्यास बाकीच्या ११ जणींना विनयभंग, लग्नाअंतर्गत बलात्कार, लैंगिक छळ व नको असलेले स्पर्श.... यांपैकी कोणत्या ना कोणत्या किंवा एकापेक्षा जास्त छळांना सामोरे जावे लागले. मानसिक छळाला सामोरे जाताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग काही जणींनी अवलंबला तर औषधोपचाराच्या मदतीने या त्रासाला सामोरे गेल्याचे काही मैत्रिणींनी सांगितले.

    सासरचे लोक करतात. चांगला नवरा, मुलगी, आणि संसारातल्या इतर चांगल्या गोष्टींकडे बघुन दुर्लक्ष करते. सासरच्या लोकांकडुन सुरुवातीला खुप त्रास झाला,करुन घेतला. त्यावेळी आजारपण झाले बरेच मोठे, थायरॉईड चा विकार जन्मभरासाठी मागे लागला. सावरायला आईवडील, जवळचे मित्र यांची मदत झाली. स्वतः खूप काही शिकले. दुसर्‍याने त्रास दिला तरी स्वतः करुन घ्यायचा नाही हे थोडेबहुत अंमलात आणायला लागले.

    मानसिक छळाकडे दुर्लक्ष करायला शिकले. वाचनाच्या सवयीचा खुप फायदा झाला

    I had help from my doctor with anti depressants and stress leave, and the help of a therapist, Friends and family support helped too.

    forgiveness - seeking the truth instead of the lies

    शारिरीक छळाला सामोरे जावे लागल्याचेही एका मैत्रिणीने सांगितले. याचा परिणाम म्हणून सावरायलाच पाहीजे. या घटनेमुळेच सगळ बिनसत जाउन त्यात आणखी काही गोष्टींची भर पडुन त्याची परिणीती घट्स्फोटात झाली. त्या स्फोटामुळेच बर्‍याच जवळच्या नात्यान्ची नव्याने ओळख झाली, बर्‍याच जवळची नाती तुटली.

    ६४ जणींना नको असलेले स्पर्श, जननेंद्रियाचे प्रदर्शन, कामुक नजरा यासारख्या बाबींना सामोरे जावे लागल्याचे सांगितले आहे. यापैकी बहुतांश अनुभव भारतात आले आहेत असे नमूद केले गेले आहे. अशा अनुभवांना सामोरे जाताना या घटना विसरण्याचा प्रयत्न करणे, याकडे दुर्लक्ष करणे, भारतात गर्दीच्या ठिकाणी / सार्वजनिक ठिकाणी असे अनुभव येतातच हे गृहीत धरुन दुर्लक्ष करणे, अशा प्रसंगी समोरील व्यक्तीवर कार्यवाही करणे, स्वसंरक्षण करणे, असे अनुभव येऊ शकतील अशा सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळणे व गरज पडल्यास तज्ञांची मदत घेणे इ. चा उपयोग केला आहे. यामध्ये 'अनुभव येणारच हे गृहीत धरणे', टाळण्याचा व विसरण्याचा प्रयत्न करणे असे मत असलेल्या मैत्रिणींची संख्या जास्त आहे.

    मनाने नैसर्गीकरित्या लहानपणापासुनच खंबीर होते म्हणुन जास्त त्रास झाला नाही. मुद्दाम विसरले, कारण विसरले नसते तर जास्त त्रास झाला असता. आणि मला त्रास नको होता. तसेही भयानक प्रसंगाला कधी सामोरे जावे लागले नाहिये कधी. पण कोणत्याही पुरुषाशी (भाऊ असेल तरी), शारिरीक जवळीक कधीच करु नये जे सर्रास सिनेमात दाखवतात, जसे की, आनंदाने मित्रांना मिठ्या मारणे. /em>

    भारतात बस मध्ये धक्के मारणे, इव्ह टीझींग इतके कॉमन आहे की ते गृहीत धरले जाते, तो त्रास होणारच हे आधीपासुन माहित असते त्यामुळे हा त्रास सहन करायची मानसिक तयारी झालेली असते.

    It was disturbing/frustrating when it first started happening.. maybe in early teens. Eventually I grew up and learnt to deal with it better, learnt to ignore it and and in some situations, avoid it. Discussing with friends sometimes helped.

    देशात राहून सवय झाली. पण प्रतिकार करण्याची हिंमत हळूहळू गोळा केली. भारतात सार्वजनिक स्थळी हे इतकं कॉमन आहे की मन बोथट होतं. हे होतंच रहातं. याला पर्याय नाही. हे आतपर्यंत पोचू द्यायचं नाही की त्रास होत नाही. अशी सवय करून घेतली. पण अतिच त्रास झाला तर उलटं फिरून प्रतिकार करणे क्वचित हेही.

    लहान असताना नको त्या ठिकाणी नकोसा स्पर्श. कोणालाच सांगितले नाही. आईलाही नाही. अगदी परवा नवर्‍याला सांगितले. त्यामुळे तेव्हा सावरले मीच. आधी घटना विसरून गेले. त्या माणसापासून लांब राहीले. ओव्हरऑल काळजीपूर्वक वागू लागले. थोडी इन्सिक्युरीटी आली आयुष्यात. बाकी विशेष काही नाही.

    दूरगामी परिणाम नाही. बस, लोकलमधे व गर्दीत नेहमीच असे अनुभव आले. त्या वेळी पुरेशा खांबीरपणे त्यांचा प्रतिकार केला. अविवाहित असल्यामुळे विविध वयाच्या पुरुषांकडून अशा प्रकारची आव्हाने समोर आली. त्यांना त्या त्या वेळी आवश्यक त्या प्रकारे तोंड देण्याचे बळ आतून मिळाले.
    शक्य तिथे प्रतिकार केला, इतर वेळी चक्क दुर्लक्ष केलं. आपल्या शीलाशी वगैरे असले अनुभव नेऊन जोडले नाहीत. विदीर्ण झाले नाही.

    When growing up as woman in India, you are mentally prepared for this. Usually these experiences involved strangers, men I did not know. Sometimes I ignored, occasionally protested publically at that moment. I remember once beating up a guy with my umbrella!

    सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना ( भारतात ) ह्या अनुभवांना रोजच्यारोज सामोरे जावे लागते. फार चिडचिड व्हायची. कधीकधी हताश वाटायचे. फक्त आपणच नाही तर सगळ्याच स्त्रियांना ह्यातून जावे लागते ह्या विचाराचाच आधार वाटायचा. दूरगामी परिणाम असा नाही पण एकंदरित अजूनही ते आठवले की त्रास होतो.

    बसमधे, गर्दीच्या ठिकाणी असे ओंगळ स्पर्श जाणवतात. एकदा बस मधे एक आजोबा खेटायचा, अंगचटिला यायचा मुद्दाम प्रयत्न करत होते गर्दी नसताना देखील. समोरच्या कॉलेजच्या मुलाला म्हंटल "जरा आजोबांना सावरणार का, तोल जातोय बहुतेक त्यांचा" त्यांनाच काय बाकिच्यांना देखील कळल आजोबांचा काय नी कसा तोल चाललेला ते. शरमिंदे होऊन पुढच्या स्टॉपला उतरले ते Happy

    आईचे वाक्य- दुसर्‍याने केलेल्या गोष्टींनी आपल्या मनाची पवित्रता जात नाही. पण या गोष्टींचा झालेला परीणाम म्हणजे पुरुष हा वेळप्रसंगी 'जनावर' असू शकतो आणि अनोळखी पुरुषावर विश्वास टाकू नये हे शिकण्यात झाली.

    पहिल्यांदा खूप घाण वाटायचं. ह्या हलकटांचं काही करु शकत नाही म्हणून असहाय्य वाटायचं. पण हळुहळु ह्याविरुद्ध काही तरी केलं पाहिजे असं वाटायला लागलं. मग बसमधे कुणी स्पर्श करत असेल तर सगळ्यांदेखत त्याच्यावर खेकसायला सुरुवात केली. ऑफिसमधे कुणी असं वागत असेल तर आजुबाजुच्या इतर बायांना सावध करते. कुणी लगट दाखवत असेल तर हे असं वागलेलं चालणार नाही असं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सूचित करते. गर्दीमध्ये कुणीतरी पटकन हात लावून घेतं - अशा वेळेस जर व्यक्ती कोण ते कळलं तर सरळ मोठ्यांदा सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात "हात सांभाळा" असं सांगते. बाकीच्या लोकांचा अशा वेळेस बाईला सपोर्ट असतो असा अनुभव. बसमध्ये सेफ्टीपिन ठेवते/उठून त्या व्यक्तीला सांगते.

    जर करणारा माणूस काही करून पळून गेला तर "तो जे वागला ते त्याचं कर्म - आणि ही विल पे फॉर इट वन ऑर द अदर टाईम" असा विचार करते. तसंही जी गोष्ट माझ्याबरोबर माझ्या संमतीशिवाय झाली त्यावर मी किती त्रास करून घ्यायचा? They can touch my body - cant touch my mind/my soul असं मला वाटतं.

    पूर्णपणे सगळी समज यायच्या आधी कधीतरी असा अनुभव आला तर प्रथम स्वता:विषयी घृणा, लाज, किळस वाटली होती. अगदी आतपर्यंत जाळत गेला होता तो अनुभव. आजही चित्र डोळ्यापुढे आहे. हळूहळू काळ हाच औषध असतो. पण अश्या आठवणी खोल द्डलेल्या असतात.

  • पर्यावरणासाठी तुमचे व्यक्तिगत पातळीवर योगदान काय?

    या प्रश्नाला ९४ मैत्रिणींनी उत्तर दिले आहे. यापैकी दोघींनी 'काहीही करत नाही' असे सांगितले तसेच एकीने 'नक्की माहित नसल्याचे' आणि एकीने 'प्रयत्न करत असल्याचे' सांगितले आणि एकीने 'लिहीण्यासारखे काही विशेष करतो' असे वाटत नसल्याचे नमूद केले.

    उरलेल्या ८९ उत्तरांत पर्यावरणासाठी करत असलेल्या योगदानात मैत्रिणींनी खालील गोष्टींचा उल्लेख केला आहे:
    - वीज वाचवण्याचा प्रयत्न ( ४० )
    - प्लॅस्टिकचा वापर टाळणे ( ३०)
    - पाण्याचा कमीतकमी वापर ( ३०)
    - जमेल ते रीसायकल करतो (२६)
    - पेट्रोल/इंधनाची बचत (१४ ) यांत जमेल तिथे चालत जाणे, सार्वजनिक वाहतूकीचा उपयोग करणे, कारपूल करणे ह्या गोष्टींचा समावेश आहे.
    - कागदाचा कमीतकमी वापर (१२) यांत पेपरबिलांऐवजी इलेक्टॉनिक बिले वापरणे, जमेल ते प्रिन्टआऊटस पाठपोट कागदावर घेणे ह्या गोष्टी नमूद केल्या आहेत.
    - कचरा योग्य त्या ठिकाणी जाईल ह्याची काळजी घेणे (११)
    - झाडे लावणे (१०)
    - स्थानिक उत्पादने, पर्यावरण-अनुकूल उत्पादने (७)
    - सी एफ ल आणि तत्सम उर्जा संवर्धनाची उत्पादने (६)
    - गोष्टींचा पुनर्वापर (६)
    - Disposable चा वापर टाळणे (६)
    - गांडूळ खताचा वापर (४)

    या व्यतिरिक्त पर्यावरण संवर्धनासाठी काही जणीं करत असलेल्या खालील गोष्टी उल्लेखनीय वाटल्या:

    - हायब्रिड वाहने
    - सूर्यचूलीचा/ सोलर/बायोगॅस दिव्यांचा वापर
    - भाज्या-तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी झाडांना घालणे
    - कारचे एमिशन नियमीतपणे चेक करुन घेणे
    - घरातील पाणी रिसायकल् करुन सुमारे ३५० लिटर पाण्याचा पुर्नवापर
    - दरवर्षी किमान १० झाडे लावणे
    - opted for 100% wind energy for our power supply
    - स्प्लिट एसीचे निघणारे पाणी बादलीत साठवणे
    - फटाके न फोडणे
    - सिग्नल लाल असतांना गाडी बंद करणे
    - गणपतीचे घरच्या घरी विसर्जन करणे
    - थर्माकोलचा वापर टाळणे

    तसेच ११ जणींनी आपण आपल्या पर्यावरण संवर्धनाच्या सवयी मुलांना लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो असे लिहीले आहे.

  • समाजासाठी तुम्ही व्यक्तिगत पातळीवर काय करता?

    या प्रश्नाच्या उत्तरात जास्तीत जास्त म्हणजे ३१ जणींनी (२५%) वेगवेगळ्या समाजोपयोगी उपक्रमांना / सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करतो असे सांगितले तर त्या खालोखाल २० जणींनी (१६%) वेगवेगळ्या समाजोपयोगी कामांमध्ये / संस्थांमध्ये / उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत असल्याचे सांगितले. तसेच बर्‍याच जणींनी वस्तूच्या रुपात काही संस्थांना / व्यक्तींना मदत करत असल्याचे (६ जणी), घरकामात करणार्‍या नोकरांना वेगवेगळ्या स्वरुपात मदत करत असल्याचे (३ जणी)सांगितले. यातील बर्‍याच जणींनी सध्या दुसरे काही करणे शक्य नाही किंवा भारताच्या बाहेर असताना एवढेच करता येते म्हणून फक्त आर्थिक मदत करतो असे सांगितले. तसेच दुसरे काही करता येत नसल्याबद्दल खेदही व्यक्त केला आहे व काही करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

    यथाशक्ती किमान एका मुलाच्या शिक्षणाचा भार उचलते.

    काही सामाजिक संस्थांना नियमीत देणगी देते. सध्या भारताबाहेरून एवढीच मदत करणे शक्य आहे.

    शिकत असताना वेळ देणे शक्य होते त्यावेळी आदिवासी लोकांबरोबर काम केले. आता वेळ देता येत नाही पण पैशाच्या स्वरूपात मदत करते.

    अजूनतरी ठोस असे काही केले नाही (आर्थिक मदत देण्याव्यतिरिक्त). परंतु करण्याची इच्छा जरुर आहे, "खुप काही. लहान मुलांसाठी वगैरे.. आमचा एक active group आहे . आम्ही गेले २ वर्ष बरच काम करतोय.. touch wood . "

    बरीच वर्षे सामाजिक कामातच होते. आता घरात काम करणार्‍या लोकांना आवश्यक ते सर्व साहाय्य. म्हणजे आर्थिक, भावनिक, मानसिक इत्यादी. त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासाला मदत.
    आम्ही समविचारी मंडळींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून शक्य होईल तितके काम करते. यामधे लहान मुलांमधे वाचनाच्या आवडीसाठी प्रयत्न, महिलांमधे अ‍ॅनिमिया या आजारासंबंधाने जागृतीसाठी प्रयत्न, विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलींसाठी समुपदेशात्मक कार्यक्रम (वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक तिन्ही पातळीवर)

    I volunteer reading to children at the library.In the past I mentored two highschool students, helped homeless children. I volunteer for the La conseverncy also .

    श्रम म्हणाल तर शुन्य, काहीच करत नाही. देणगी म्हणाल तर लेकीच्या वाढदिवसाला अनाथाश्रमाला देणगी देतो, पितृपंध्रवड्यात श्राद्ध न करता रक्कम दान कारतो, एका विद्यार्थ्याला वह्या पुस्तकांची मदत करतोय गेली २-३ वर्ष, माहीतीतल्या चांगल्या संस्था असतील तर त्यांची माहीती इतरांप्र्यंत पोहोचवणे, घरकामाला जी बाई आहे तिच्या नातवडांना थोडीफार फी वगैरे साठी मदत, एकदाच शिबिर घेतलय अनाथ मुलांसाठी, नेरे ला जाऊन वोलेंटिअर म्हणुन जमेल तेव्हा काम करायची इच्छा आहे (अस जाता येत हे नुकतच कळलय), नेत्रदानाच महत्व काही थोड्या लोकांना का होईना पटवुन देता आलय आणि त्यांनीही जाऊन नोंदणी केलेय हे पण सामाजिक काम म्हणता आल तर..ते केलय्/करतोय.

    शक्य असेल तिथे मदत करते- आर्थिक. अजून काही करायची इच्छा आहे.

    Yes- I often volunteer through my church or for educational groups

    याव्यतिरिक्त बर्‍याच जणींनी इतर काही कामांमार्फत वेगवेगळी मदत करत असल्याचे सांगितले (उदा: गरजवंतांसाठी शिकवण्या घेणे, अनाथ / गरजू मुलांच्या/ मुलींच्या शिक्षणाचा भार उचलणे, सांडपाण्यासाठी शोषखड्ड्याचा वापर करण्यासंबंधी जनजागृती, भ्रष्टाचार न करणे, सर्वांना एकसमान वागणूक देणे इ.)

    काहीजणींनी (१०) फारसे काही काम करत नसल्याचे सांगितले आहे तर २० जणींनी (१६%) सध्या काही करत नसल्याचे सांगितले.

    सध्यातरी फार काही नाही. पण करायची इच्छा खूप आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

    समाजासाठी काही करता यावं यासाठी स्वत:ला सक्षम बनवण्याचे प्रयत्न आधी चालू आहेत.

    Not a whole lot. but would like to.

    करायची खूप इच्छा आहे, पण काय करायचे ते कळत नाही.

  • तुम्ही मतदानाचा हक्क बजावता का?

    Picture3_1.png

    मतदान करत नाही असे सांगणार्‍या २७ जणींपैकी २ जणी अभारतीय वंशाच्या आहेत तर १७ जणी भारतीय असून सध्या भारताबाहेर आहेत.

  • तुम्हाला सध्या भेडसावणार्‍या टॉप ३ मुलभूतसोयींबाबतच्या समस्या कोणत्या?

    बर्‍याचश्या (मुख्यतः परदेशी वंशाच्या) स्त्रियांनी मूलभूत समस्या व व्यक्तिगत समस्या यामध्ये गल्लत केली आहे. त्यामूळे मासिकपाळीच्या काळात कामातून सूट, नातेवाईकांचा सहवास लाभत नाही, मुलांना सांभाळायला मदत न मिळणे, गरोदरपणातील रजा यासारख्या इतर अनेक व्यक्तिगत समस्यासुद्धा नमूद केल्या आहेत. त्याचबरोबर ३१ जणींनी कोणतीही समस्या नाही असे सांगितले आहे. कोणतीही समस्या नाही असे उत्तर देणार्‍या बहुतांशी स्त्रिया सध्या परदेशात वास्तव्य करत आहेत. भारतात राहणार्‍या स्त्रियांपैकी फक्त ३ जणींनी फारशा मूलभूत समस्या नाहीत किंवा सध्यातरी कोणत्याच समस्या जाणवत नाहीत असे सांगितले. तसेच सध्या परदेशात वास्तव्य करत असणार्‍या काही स्त्रियांनी (१३) इथे कोणत्याच समस्या नाहीत, परंतू भारतात समस्या जाणवतात असे सांगितले.

    सार्वजनिक शौचालय नसणे, शौचालय असलेच तर ते अस्वच्छ असणे व कार्यालयात शौचालयाची सोय नसणे ही समस्या सर्वात जास्त म्हणजे ४६ स्त्रियांनी मांडली आहे. त्याखालोखाल सार्वजनिक वाहतूकीची समस्या १६ जणींना भेडसावते. पाणी (१२), सार्वजनिक स्वच्छता (७), वीज (७), महागाई (८), रस्ते (५) या समस्यांबद्दलही सर्वेक्षणात भाग घेतलेल्या स्त्रिया बोलल्या आहेत.

    याशिवाय कचर्‍याचे विघटन, सर्वांना शिक्षण, पोषक अन्न, आरोग्य, लोकसंख्यावाढ, गर्दी, सुरक्षा, वर्णभेद, फुटपाथ नसणे, घरासाठी वेळ देणे इ. समस्या (यातील बर्‍याचशा समस्या मूलभूत नसल्या तरी सार्वजनिक असू शकतात) नमूद केल्या आहेत.

  • दृष्यमाध्यमातील स्त्रीप्रतिमेबद्दल तुमचं मत काय?

    Media Image.JPG

    दृश्यमाध्यमातील स्त्रीप्रतिमा फारशी वास्तववादी नाही असे प्रतिक्रिया देणार्‍या मैत्रिणींचे स्पष्ट मत असल्याचे दिसुन येते. तसेच (फक्त) अतिरंजीत, अतिरंजीत- आकर्षक आणि उपभोग्य वस्तु- भडक आणि उत्तान हे पर्याय सर्वात जास्त मैत्रिणींने निवडले आहेत.

  • कोणतीही स्त्री पाहताक्षणीच विवाहीत / अविवाहित/विधवा/घटस्फोटित आहे याचा तुम्ही अदमास घेता का? का ?

    Perception- Relationship status.JPG
    (टीपः यापुढील मजकुरात शब्दांचा वापर हा त्या प्रतिक्रिया देणार्‍यांचा आहे. विश्लेषकचमुचा भावानुवाद नाही.)

    असा अदमास घेत नाही असे सांगितलेल्या बहुतांशी मैत्रिणींनी पुढे 'असा अदमास घ्यायची गरज वाटत नाही' असे नमुद केले आहे. काही जणींनी 'नुसती ओळख असेल तर याची गरज वाटत नाही' असे सांगितले.

    'होय, असा अदमास घेते' असे उत्तर दिलेल्या मैत्रिणींनी, 'चुकून बोलताना त्या स्त्रीने दुखावले जावू नये म्हणून अदमास घेतला जातो', 'बोलण्याचे विषय ठरवण्याच्या दृष्टीने', 'गप्पा मारायला सोपे व्हावे म्हणून' अदमास घेतला जातो किंवा 'लक्ष जातेच, सवयीने असे घडतेच' असे सांगितले. त्याचबरोबर एका मैत्रिणीने 'हे योग्य नाही असेही वाढत्या वयाप्रमाणे कळत जाते' असेही सांगितले.

    'कधीकधी बघितले जाते' असे सांगणार्‍या मैत्रिणींनी, 'काही उद्देश नसतानाही बघितले जाते कधीकधी' असे सांगितले. तसेच 'भारतीय बायकांबाबतच असे लक्ष दिले जाते' असेही सांगितले.

stline2.gif
निष्कर्ष


बहुतांश मैत्रिणींनी देव या संकल्पनेवर विश्वास असल्याचे नोंदवले आहे. तो विश्वास (त्यांच्या मते)कर्मकांड/मूर्तीपूजेपुरता सीमित नाही हेही नोंदवले आहे.

सणवार, चालीरिती पाळण्याचे गुणांकन बहुतांश मैत्रिणींने मध्यम (३)नोंदवले आहे. प्रश्नावलीत व्याख्या समाविष्ट केल्या नसल्यामुळे मध्यम या स्तरावर नक्की कुठल्या चालीरिती पाळल्या जातात याबद्दलचा मजकूर आपल्याकडे नाही. तरीही सोवळेओवळे या स्तरावरच्या चालीरीती, या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या स्त्रिया अजिबात पाळत नाहीत हा ठाम निष्कर्ष निघतो.

सणवार/चालीरिती पाळण्यामागील कारणांमध्ये बहुतांश मैत्रिणींनी 'मुलांना संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून' हा पर्याय निवडला तर त्याखालोखाल 'मानसिक समाधान' हा पर्याय निवडला गेला.

मासिक पाळीच्या वेळेस धार्मिक निर्बंध थोडेफार पाळणार्‍या स्त्रियांमधील बहुतांश स्त्रिया सध्या परदेशात वास्तव्य करत आहेत. नक्की कशा प्रकारचे निर्बंध पाळले जातात, याची व्याख्या आपण प्रश्नावलीत समाविष्ट केली नव्हती. सोवळे ओवळे अजिबात पाळत नसताना मासिक पाळीच्या वेळेसचे धार्मिक निर्बंध पाळण्यार्‍यांचे प्रमाण भारतीय वंशाच्या स्त्रियांमध्ये लक्षणीय आहे.

स्त्रियांना समाजात समान दर्जा दिला जात नाही असे बहुतांश मैत्रिणींना स्पष्टपणे वाटते, तरी इतर विभागातील मतांशी तुलना करु पाहता, नोकरीच्या ठिकाणी, शिक्षणाच्या संधींबाबत (पहा: प्राथमिक माहिती, शिक्षण, नोकरी) मात्र लिंगभेदाचा अनुभव नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर, (सर्वेक्षणातील बहुतांशी स्त्रियांच्या मते व्यावसायिक पातळीवर आणि शैक्षणिक पातळीवरही) स्वतःला समान दर्जा मिळत असला तरी एकंदरीत सामाजिक पातळीवर स्त्रियांना समान दर्जा मिळत नसल्याचे गृहितक अथवा अनुभव मांडले गेले आहे. हे मत आपणांस वर नमुद केलेल्या इतर भागातील मतांशी सुसंगत वाटते का ?

कसल्या ना कसल्या प्रकारचे शोषण ५९% स्त्रियांने अनुभवले आहे. वर नमूद केल्यापैकी कसलाही अनुभव आला नसल्याचे प्रमाण परदेशी वंशाच्या महिलांमध्ये निश्चित जास्त दिसून येते याकडे विश्लेषक म्हणून आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो. आलेल्या प्रतिक्रियांमध्ये भारतात(च) नकोसे स्पर्श, जननेंद्रियाचे प्रदर्शन, कामुक नजरा असे अनुभव येतात असे निश्चित नोंदवल्या गेल्याचे आढळते. भारतातील गर्दीची मानसिकता, दडपलेल्या लैंगिकभावनांना व्यक्त न करु देण्याचे सामाजिक संकेत, आणि इतर कुठली कारणं यामागे असू शकतील या प्रश्नांपाशी विश्लेषक म्हणुन आम्ही थबकलो. (हे विधान केवळ या सर्वेक्षणाला आलेल्या प्रतिक्रियांपुरतेच मर्यादित आहे, आणि मुळातच परदेशी वंशाच्या स्त्रियांच्या प्रतिक्रिया अतिशय मर्यादित संख्येने असल्याचे नजरेआड करता येणार नाही हे लक्षात घ्यावे).
तसेच स्त्रियांच्या (स्वतःच्या) gender identity मध्ये (केवळ) स्त्री म्हणून अशा प्रकारचे अनुभव अध्याहृत धरले जातात का याबद्दल आपल्याला काय वाटते? पुरुषांना आपल्या अनुभवांत स्वतःपुरता (म्हणजे परिचयातील/कुटुंबातील कुठल्याही स्त्रीच्या वतीने न पाहता केवळ स्वतःपुरता) violationच्या भावनेशी किती प्रमाणात सामना करावा लागतो असे आपल्याला वाटते?

पर्यावरणासाठी आणि समाजासाठी व्यक्तिगत पातळीवर स्त्रियांचे (त्यांच्यामते) योगदान, हे नक्की काय करावे ते कळत नसलेल्यासांठी, आणि अजून काय करता येईल यासाठी (थोडेफार) पथदर्शक ठरावे. (विशेषतः पर्यावरणाबाबत आलेल्या प्रतिक्रिया.)

मूलभूत सोयींच्या अभावाविषयी पुन्हा (केवळ) भारतातील परिस्थितीबाबत बहुमताने नोंद झाली आहे.

२२% स्त्रिया मतदान करत नाहीत आणि मतदान निश्चितपणे करणार्‍या स्त्रियांचे प्रमाण ४५% आहे.

दृष्यमाध्यमातील स्त्रीप्रतिमेबाबतचे मत हे आपल्या अपेक्षेनुसार आहे का?

स्त्रियांच्या मनोव्यापारात दुसर्‍या स्त्रीच्या नातेस्थितीला किती महत्व आहे हे गृहितक तपासून पाहण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर, आणि भाषेचा उपयोग रोचक आहे. स्पष्ट बहुमताने स्त्रियांने असा अदमास घेत नसल्याचे स्पष्टपणे नोंदवले आहे. तरीही ६७% स्त्रियां या ना त्या कारणाने लग्न झाल्याचे निदर्शक असे सौभाग्यसंकेत वापरतात. सौभाग्यसंकेत वापरल्यामुळे असा अदमास समोरच्या व्यक्तिला घेणे सोपे जाते तरीही. या काहीशा विसंगतीकडे विश्लेषक म्हणुन आम्ही आपले लक्ष वेधु इच्छितो.
(पहा: लग्न आणि विवाहसंस्थेबाबची मतं). ७८% स्त्रीयांच्या मते सौभाग्यचिन्हे नसावीत किंवा ऐच्छिक असावीत, परंतू तुम्ही सौभाग्यचिन्हं वापरता का या प्रश्नाला ३० जणींनी (२९%) 'घालते' असे उत्तर दिलेय तर ३९ जणींनी (३८%) 'स्थळ, परिस्थिती यानुसार घालते' असे उत्तर दिले आहे.

stline2.gif

प्रश्न सखोल आहेत आणि बरेच विस्तृत विश्लेषण झाले आहे. जर डेटासाईझ मोठा असता तर बायसेस आहेत का आणि कसे आहेत हे नीट कळले असते. आशा आहे की ईतर संस्थांना या सर्वे चे प्रश्न उपलब्ध होतील.

उत्तम .
<<आलेल्या प्रतिक्रियांमध्ये भारतात(च) नकोसे स्पर्श, जननेंद्रियाचे प्रदर्शन, कामुक नजरा असे अनुभव येतात असे निश्चित नोंदवल्या गेल्याचे आढळते.>>
अगदी पटले. आणि तरीही आमची संस्कृती महान !!!

पुन्हा एकदा उत्तम प्रश्नावली आणि विश्लेषण.
स्वतःची काही राजकीय/आर्थिक मतप्रणाली अथवा दृष्टीकोन आहे काय? असल्यास तो काय आहे? आहे तो कशामुळे आहे? हे देखील विचारले गेले असते तर अजून चांगले झाले असते.

(माझ्या) अपेक्षेनुसारच आहेत हे निष्कर्ष..
सोवळं-ओवळं यात 'मध्यम' म्हणजे 'अगदी जाचक रूढींमधून मुक्तता झाली (करून घेतली) आहे, पण सगळंच वार्‍यावर सोडून दिलेलें नाही' असं असावं. हा मार्ग सर्वात बेस्ट असं म्हणेन मी Happy

व्यावसायिक पातळीवर आणि शैक्षणिक पातळीवरही) स्वतःला समान दर्जा मिळत असला तरी एकंदरीत सामाजिक पातळीवर स्त्रियांना समान दर्जा मिळत नसल्याचे गृहितक अथवा अनुभव मांडले गेले आहे.>>> हे पटलं. जेव्हा लढा वैयक्तिक आहे, तेव्हा मी एक, दोन, दहा पुरुषांशी लढू शकेन. माझ्यासारख्या वातावरणात असणार्‍या सर्व स्त्रीया लढू शकतील. पण दुर्दैवाने, मी जे रहाते ते वातावरण म्हणजे संपूर्ण समाज नाही. एकून समाज पाहिला, तर स्त्रीया फारशा चांगल्या स्थितीत नाहीत (थोडीफार सुधारणा आहे, पण एकूणात समाजात बदल व्हायला अजून २५ वर्ष तरी लागतीलच) आणि त्याचमुळे अजूनही संपूर्ण सामाजिक स्तर पाहिला, तर स्त्रीला समान दर्जा नाहीच Sad

आगाऊ, 'राजकारण' हा संपूर्ण विषयच ह्या प्रश्नावलीत समाविष्ट नव्हता. ह्या सर्व्हेचं प्रमुख उद्दिष्ट हे स्त्रीला स्वतःबद्दल विचार करायला लावणं हे होतं. तिला ती स्वतः कशी आहे हे स्पष्ट झालं की राजकारण, समाजकारण यात शिरेल. कदाचित हा प्रश्नावलीचा 'भाग २' होऊ शकेल Happy

खरंच ह्या विभागाचा निष्कर्ष अपेक्षेप्रमाणे आहे. स्त्रियांची ही पिढी समाजात डोळसपणे वावरू लागली आहे असे म्हणायला हरकत नाही. लोकांना किंवा समाजाला काय हवंय ह्यापेक्षा स्वतःला काय हवंय ह्याचा विचार प्रत्येक स्त्रीने केला तर नक्कीच समान दर्जा तिचा तीच मिळवू शकेल, समाजाने देण्याची आवश्यकता नाही. Happy

लोकांना किंवा समाजाला काय हवंय ह्यापेक्षा स्वतःला काय हवंय ह्याचा विचार प्रत्येक स्त्रीने केला तर नक्कीच समान दर्जा तिचा तीच मिळवू शकेल, समाजाने देण्याची आवश्यकता नाही.>> अनुमोदन.

पूनम, पण दुर्दैवाने, मी जे रहाते ते वातावरण म्हणजे संपूर्ण समाज नाही.>>>>हो हेच सत्य आहे. अजून काही ठिकाणी समाजाचा दृष्टिकोन बदललेला नाही. तो बदलावा म्हणून प्रयत्न करणे गरजेचे!!

सारे लक्षपूर्वक वाचले. सँपल साईझ, सॅंपल कम्युनिटी आणि एकंदर versatility याबदल काही प्रश्न असले, तरी संयोजकांनी मेहनत घेऊन हा अभ्यास केला आहे आणि अंतर्मुख करणारे निष्कर्ष काढले आहेत, हे जाणवतेच.

माझ्या दृष्टीने, आशादायक चित्र आहे. Happy

अगदी तंतोतंत निष्कर्ष पटले.
पण दुर्दैवाने, मी जे रहाते ते वातावरण म्हणजे संपूर्ण समाज नाही. >> यासाठी पूनमला अनुमोदन.

निश्कर्ष पटले व अपेक्षितही वाटले. ( त्यामुळे काही बाबतीत निराशादायी तर काही बाबतीत आशादायी चित्र वाटते..)
तुम्ही फार जबरदस्त काम करत आहात!
(तुम्ही सर्व सर्व्हे टीमनी सामाजिक कार्य काय केले? या प्रश्नात या कार्याची नोंद करा! Happy )

सारे निश्कर्ष वाचले. समान दर्जा मिळत नाही! हे अजुनही (दुर्दैवाने) खरेच.

पर्यावरणासाठी आणि समाजासाठी व्यक्तिगत पातळीवर स्त्रियांचे (त्यांच्यामते) योगदान>> हा एक नवा मुद्दा आहे Happy ह्यासाठी बरच काही करता येईल.

सर्व्हे टीम्सच अभिनंदन Happy

कोणत्या ना कोणत्या स्वरुपात शोषणाला सामोरं जायला लागणार्‍या स्त्रियांचं प्रमाण किती जास्त आहे !! वाईट वाटते असलं वाचून (आधीच माहित असलं तरी!)
भारतात गर्दीत हात धुवून घेणार्‍या पुरुषांचं प्रमाण एवढं व्यापक की अगदी प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी (एकाहून जास्त वेळा , बहुतेक बाबतीत) अनुभव येतोच येतो, हे स्टॅटिस्टिक्स / ही वस्तुस्थिती किती लाजिरवाणी आहे!! Uhoh

भारतात गर्दीत हात धुवून घेणार्‍या पुरुषांचं प्रमाण एवढं व्यापक की अगदी प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी (एकाहून जास्त वेळा , बहुतेक बाबतीत) अनुभव येतोच येतो, हे स्टॅटिस्टिक्स / ही वस्तुस्थिती किती लाजिरवाणी आहे!! <<
अगं हो आणि हे होतंच आणि याबाबतीत रोजचे रोज प्रतिकार करणं शक्यही नसतं. प्रतिकार मग त्यानंतर होणारं रामायण.. आख्खा दिवस वाईट जातो. काम होत नाही काही. हे रोजच्या रोज परवडण्यासारखं नसतं त्यामुळे इतर अनेक गोष्टींप्रमाणे दुर्लक्ष करायला शिकण्याशिवाय, गेंड्याची कातडी करण्याशिवाय पर्याय नसतो.... so much for भारतीय संस्कृती.

कोणत्या ना कोणत्या स्वरुपात शोषणाला सामोरं जायला लागणार्‍या स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. थोड अस्वस्थचं वाटत आहे. हे चित्र बदलाव ही अपेक्षा.

मैत्रेयी, नीधप, मृदुला- अनुमोदन.

(१)सुमारे महिन्याभरापूर्वी एक मुलगा बोलायला आला होता. त्याची वाग्दत्त वधु चेन्नईत एका अतिशय नामांकित s/w कंपनीत. तिला तिचा प्रोजेक्टलीडर कॉफी प्यायला आणि जेवायला ये माझ्यासोबत नाहीतर अप्रेझल वर परिणाम होईल असे सांगत असे. तिने भीक घातली नाही म्हणुन तिचा या वर्षीचा रिव्हु त्याने खराब केला, प्रत्येक मीटिंग मध्ये तिच्या पेहरावावर वगैरे तो मुद्दाम सगळ्यांसमोर विशेष भाषेत टिप्प्णी करतो, .. वगैरे वगैरे.... आता तिने काय करावं असं हा मुलगा विचारायला आला होता. याला harassment म्हणतात, आणि तक्रार कशी करायची आणि चौकशी समिती आणि संभाव्य परिणाम हे त्याला समजावताना नाकी नऊ आले. काल भेटला तर म्हणाला तक्रार करण्यापेक्षा तिने नोकरी सोडायची ठरवली !

(२)'पाहण्याबद्दलच्या' एका तक्रारीवर काम करायचा योग आला होता. म्हणजे की विशीष्ट व्यक्ति बोलायला व्यवस्थित, पण पाहण्याने स्त्री कर्मचार्‍यांना हैराण करते अशा विवीध तक्रारी, एकही लेखी द्यायला तयार नाही, आणि शेवटी नुसत्या पाहण्यावरच भागते आहे (आणि लेखी तक्रार नाही) तोपर्यंत काही करायची गरज नाही असा व्यवस्थापनाने निष्कर्ष काढला. Sad

(३) सहकारी मुलीच्या आधीच्या हापिसात एक बाई कायम छोट्या पोरीची शाळा सुटली की स्वतःचं काम संपेस्तोवर तिला गाडीत ( नो किडींग, गाडीत) बसवुन ठेवत असे. खाणी, पिणी होमवर्क सगळं गाडीत. तिच्या राहत्या घरी पोरीवर कोणीतरी कामाला येणार्‍याने हात टाकला तेव्हापासुन पोरीला ती स्वतःबरोबर सतत ठेवत असे, दृष्टीआड होऊ देत नसे. हे ऐकुन तर मी जी काय हबकले होते..

वा! खूपचं छान आहे झाले आहे सर्वेक्षण! सगळी उत्तरे आवडलीत. संयुक्तेचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

याला harassment म्हणतात, आणि तक्रार कशी करायची आणि चौकशी समिती आणि संभाव्य परिणाम हे त्याला समजावताना नाकी नऊ आले.>>>
पण पाहण्याने स्त्री कर्मचार्‍यांना हैराण करते अशा विवीध तक्रारी, एकही लेखी द्यायला तयार नाही, >>>
अगदी ठळक दिसेल अशी घटना जोपर्यंत घडत नाही,( कामाच्या ठिकाणी, विनयभंग किंवा दुसरी एखादी तत्सम उघड सर्वांना जाणवणारी घटना, घरांमध्ये मारहाण इ.इ.) तोपर्यंत आपलं शोषण होतंय हे बर्‍याचदा स्त्रीच्याही (आणि अर्थातच सर्व समाजाच्याच) लक्षात येत नाही. बर्‍याच बाबी (जसे की वरच्या रिपोर्टमध्ये आलेले नकोसे स्पर्श, जननेंद्रियाचे प्रदर्शन, कामुक नजरा इ. प्रकार ) होणार हे गृहीत धरलेलं असतं. आणि मुख्य म्हणजे हे गृहीत धरणंसुद्धा बर्‍याचदा आपल्या स्वतःलाही कळत नाही.

स्त्रियांच्या (स्वतःच्या) gender identity मध्ये (केवळ) स्त्री म्हणून अशा प्रकारचे अनुभव अध्याहृत धरले जातात का याबद्दल आपल्याला काय वाटते? पुरुषांना आपल्या अनुभवांत स्वतःपुरता (म्हणजे परिचयातील/कुटुंबातील कुठल्याही स्त्रीच्या वतीने न पाहता केवळ स्वतःपुरता) violationच्या भावनेशी किती प्रमाणात सामना करावा लागतो असे आपल्याला वाटते? >>>
मला स्वतःला हा प्रश्न पडला आहे. मी स्त्री असल्यामूळे, मला किंवा दुसर्‍या कोणत्याही violationच्या भावनेशी किती प्रमाणात सामना करावा लागतो हे मला माहित आहे पण एखाद्या पुरषाला ह्या भावनेला सामोरे जावे लागते का अन कितपत हे खरंच मला माहित नाही.

भारताची सामजीक रचना ज्याप्रमाणे आहे त्यावरून पुरुषांना विनयभंगाला समोर जावे लागण्याची शक्यता फार कमी - निदान जशी स्त्रियांच्या बाबतीत होते तशी. टाँटींग सारखे प्रकार होतात, पण त्यापलीकडे साधारणपणे काही होत नाही (निदान मी तरी ऐकले नाही).

अजून एक उत्तम रिपोर्ट! धन्यवाद.

वर अनेकांनी सांगितल्याप्रमाणे अपेक्षित उत्तरे आहेत. सणवार, चालीरिती पाळणार्‍यांमध्ये समजून करणार्‍यांचे प्रमाण जास्त आणि सवय, करावेच लागते किंवा त्याबद्दल विचारच केला नाही असे म्हणणार्‍यांचे कमी आहे ही चांगली गोष्ट आहे.

पाळीच्या वेळेस काही वेळा निर्बंध पाळणार्‍यांचे प्रमाण जास्त वाटले तरी ते इतर सतत पाळणार्‍यांमुळे होऊ शकते. उदा. तुम्ही स्वतः घरी पाळत नसला तरी कोणी नेहमीच पाळते हे माहीत असल्यास त्या व्यक्तीच्या घरी धार्मिक प्रसंगासाठी जाताना विचार केला जातो. तुम्ही पाळत नाही हे पाळणार्‍यांना माहीत असेल तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्या बाबतीत हे पाळले जावे असे सांगितलेही जाते. Happy

समाजात समान हक्क/दर्जा बाबत काहींचे मुद्दे पटले. 'समाज' कोणता आणि 'समान' म्हणजे नेमकं काय याबाबत उत्तरे देताना कल्पना वेगळ्या असू शकतील. काही हक्क हे कायद्याने दिलेले आहेत. ते वापरले जातात का आणि दर्जा घेतला जातो का हा कळीचा मुद्दा आहे तसंच स्वतंत्र विचार करायची अनिच्छा and/or असमर्थता हा एक लिंगाधारित नसलेला भयंकर रोग आहे. हे एकदम मान्य. हक्क, दर्जा, स्वातंत्र्य या गोष्टी कोणी द्याव्या लागत नाहीत, तुम्ही "आहेत" असं समजून वागलात तर त्या असतात, कोणी त्याबद्दल शंका घेण्यापूर्वी विचार करेल पण कधीकधी लोकांना आठवण करुन द्यायचीही वेळ येईल. पण तुम्हीच त्याबद्दल साशंक असलात तर झालंच!

शोषणाबाबतची आकडेवारी, तिर्‍हाइतांकडून बहुतेकवेळा भारतातच आलेले अनुभव आणि त्यावर हे 'गृहित धरले जाते' हे सगळे खूप अस्वस्थ करणारे आणि लाजिरवाणे आहे. घरी होणारा छळ, मारहाण यापेक्षा इतर वेळा अनोळखी लोकांकडून दिला जाणारा त्रास हा एक वेगळाच प्रकार आहे जो मी भारतातच अनुभवला आणि इथे एकदाच अनुभवला तोही भारतीयांकडून! तरीसुद्धा कायदा आणि सुव्यवस्था नसणे हेही यामागचे एक कारण आहे. यातले कितीजण परदेशात, परदेशी स्त्रियांच्या अश्या गोष्टी करायला धजावतील?

एकच टक्केवारी मला थोडी धक्का देणारी वाटली ती म्हणजे मतदान न करणार्‍यांची. होणार्‍या एकूण मतदानाच्या टक्केवारीकडे बघितले तर आश्चर्य वाटत नाही पण सर्वेत भाग घेतलेला स्त्रियांचा गट पाहता माझी ही अपेक्षा नव्हती. अर्थात त्या २२ टक्क्यांना 'करता येते तरी करत नाही' मध्ये मी धरले. याची कारणे दिली आहेत का कोणी?

शेवटी विसंगती म्हणून जो मुद्दा नोंदला आहे ती विसंगती नसेलही. सौभाग्यालंकार वापरणारी स्त्री नातेस्थितीचा अदमास दुसर्‍यांना यावा म्हणूनच वापरत असेल असे काही नाही.

लालू, नेमका गोषवारा मांडलास. अनुमोदन.

'समान सामाजिक दर्जा' हा प्रश्न मलाही थोडा संदिग्ध वाटला. समितीने हा प्रश्न ठेवण्यामागची त्यांची मनोभूमिका सांगितली तर बरं होईल.
नेमका कुठला समाज? कोणत्या दर्जाबाबत प्रश्न आहे? कौटुंबिक / व्यावसायिक हे भाग निराळे आले आहेत. कायद्याने मतदान इ. हक्क आहेतच, मग सामाजिक दर्जा म्हणजे नेमकं कशाबद्दल मत अपेक्षित होतं?

स्वाती-

मनोभूमिका- (अनु, काही निसटले असल्यास कृपया लिही)

प्रश्नावलीवर काम करताना काही प्रश्न गोळीबंद हवे असा आमचा कटाक्ष होता (म्हणजे तुमचा अनुभव लिहा, पर्याय देऊन उत्तर अधोरेखीत करणे वगैरे. त्यात दिलेल्या टिपांवर काळजीपूर्वक काम केले होते जेणेकरुन Pointed उत्तरं यायला मदत होईल.) तसेच काही प्रश्न मुद्दाम अश्या संदिग्ध स्वरुपात ठेवले होते, जेणेकरुन प्रतिक्रिया देणार्‍याचे मत आणि प्रतिबिंब त्यात आपोआप येईल. दोहोंच्या मध्ये कुठेतरी मर्म (काहीसे) सापडायला मदत होते. प्रश्न विचारताना सुद्धा त्यात कुठल्यानंतर कुठला यावा याचा क्रम त्यानुसार ठेवला होता, म्हणजे खुले प्रश्न सगळे शेवटी ठेवले असते तर उत्तर देणार्‍यांना कंटाळ यायची शक्यता वाढते, तसेच सगळेच अनिवार्य ठेवले तरीही. काही प्रश्न conceptual level वर, काही मुद्दाम perception, पूर्वग्रह तपासुन पहायला आणि काही क्रियापातळीवर (तुमचे अनुभव लिहा, तुम्ही हे केलं का) असे.
उत्तरं बदलत गेली. उदा- लग्नानंतर नाव बदललं का - हो, बाह्यसंकेत असावे का- नाही, फक्त स्त्रियांसाठी असावे का- मुळीच नाही, पण मी वापरते, पण ते एक दागिना म्हणुन.. (विस्तृत माहिती), लग्नासाठी दबाव जाणवला ? मला नाही पण बहिणीला जाणवला... - उत्तरं प्रश्नाच्या पातळीनुसार, कंगोर्‍यानुसार, शब्दांच्या वापरानुसार, थेटपणानुसार हलके हलके बदलत गेली. Kaleidioscope फिरवल्यासारखी.

आपण तात्विक पातळीवर आणि क्रिया करण्याच्या पातळीवर कितपत वेगळा विचार करतो/करत नाही/ सोयीनुसार करतो हे सापडत गेलं.
मुळातून तात्विक पातळीवर प्रश्न विचारला की असावे, नसावे, वाटत नाही, वाटतं अशा प्रकारची ideation level ची मतं येतात. कुठल्या समाजाची ?- आपल्याला जो आपला परिघ वाटतो त्या समाजाची. त्यात वर दिलेल्या काही प्रतिक्रिया आणि इतरही सर्व बोलक्या आहेत. उत्तरं आपल्या मनातील परिघाच्या perception नुसार उत्तरं आली- व्यावसायिक पातळीनुसार, कौटुंबिक परिस्थितीनुसार, जातिनिहाय, देशानुसार/भौगोलीक प्रांतानुसार, आर्थिक वर्गवारीनुसार इ.

आगाऊ
स्वतःची काही राजकीय/आर्थिक मतप्रणाली अथवा दृष्टीकोन आहे काय?>> हो. खरंय. हे प्रश्नावलीत समाविष्ट केले नव्हते. मलाही आवडेल जाणुन घ्यायला आणि मुळातून उत्तरं तरी येतील का ते पहायला. शेवटी एक प्रश्नावलीतील त्रुटी / राहुन गेलेले/ अधिक काय करता येईल, यावर एक भाग लिहायचा मानस आहे. त्यात हे नोंदवुच.

आश्चिग, साजिरा
खरंय. या रिपोर्टला (फारतर) एक Pilot Study म्हणता येईल याची चमुला पूर्ण आणि नम्र जाणीव आहे. हेच प्रश्न पुन्हा मोठ्या पातळीवर विचारले, आणि त्यावर काम झाले तर आपल्याला अभ्यास म्हणवण्याइतपत तरी डेटा मिळेल. तरीही मर्यादित स्वरुपात का होईना, ही एक सुरवात आहे.

NPR वर सध्या भारताशी संबंधीत एक मालीका सुरु आहे. त्यात आज ते कानपुर मध्ये होते. IIT मधील एका मुलाशी व त्याच्या बहिणीशी बोलले. तीला विचारले की तुला फ्रि वाटतं का (उदा. बॉयफ्रेंड असणे). ती म्हणाली 'शक्यच नाही, माझे आईवडील आणि भाऊ मला मारुन टाकतील'. 'भाऊ सुद्धा?' यावर तोच बोलला: 'हो तर'. मग हसुनः 'माझी पण गर्लफ्रेंड आहे, पण ती गोष्ट वेगळी. मुलिंनी त्यांची मर्यादा सांभाळायलाच हवी'.

असे मुलं (आणि मुली!!) जोपर्यंत आहेत तो पर्यंत कठीण आहे.

जर बदल घडवायचा असेल तर तो प्रत्येक घरात व्हायला हवा, आणि इतर बाबिंशीही संलग्न असायला हवा. मुलांना जन्म देणे = मुलांचे पालनपोषण करणे = घरी रहाणे = न कमावणे = दुय्यम असणे या प्रकारची काही ईक्वेशन्स बनली असतात. या गोष्टी बदलल्या आहेत, आणि मुळात त्या गोष्टी कोरिलेटेड असायची गरज नाही हे अनेकांना समजत नाही.

यावर तोच बोलला: 'हो तर'. मग हसुनः 'माझी पण गर्लफ्रेंड आहे, <<<< त्याची गर्लफ्रेण्ड मुलगा होती का? विचारायला हवे होते... (मुलींनी मर्यादा... )