सर्व्हे रिपोर्टः विभाग- नोकरी

Submitted by संयोजक_संयुक्ता on 24 April, 2010 - 13:15

नोकरी

या भागात १० प्रश्न समाविष्ट करण्यात आले होते. त्यातला कुठलाही प्रश्न अनिवार्य नव्हता. सध्याचा पदभार, नोकरी/ करियरविषयक मतं, Work- Life Balance, पदोन्नती, नोकरी सोडण्याची कारणे, Glass Ceiling (कामाच्या ठिकाणी लिंगभेदाचा अनुभव), नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्रियांबाबत मैत्रिणींचे विचार याभोवती या सदरातील प्रश्नांचा रोख ठेवला होता.

हे वाचण्यास सुरूवात करण्यापूर्वी प्राथमिक माहिती हा धागा पूर्ण वाचावा.
कृपया या भागातील टीपा काळजीपूर्वक वाचाव्या.

  • सध्याच्या पदभाराचे नाव, विभागाचे नाव

    या प्रश्नाला आणि एकंदरीत नोकरी या सदरातील सर्वच प्रश्नांना बर्‍याच स्त्रियांनी उत्तर देणे पसंत केले नाही. None of your business अशीही एक प्रतिक्रिया आली. सर्व खाजगी प्रश्नांना मो़कळेपणाने उत्तरं देताना मात्र या सदरातीलच काही प्रश्नांना मैत्रिणींनी लक्षणीय संख्येने प्रतिसाद दिला नाही हे कशाचे द्योतक असू शकेल या प्रश्नापाशी विश्लेषक म्हणून आम्ही नक्कीच थबकलो. इंग्रजी प्रश्नावलीत अनुवादात राहिलेली एक त्रुटी याचे एक कारण असू शकेल. इंग्रजी प्रश्नावलीत चुकुन Company Name असा उल्लेख राहिला होता. मराठी प्रश्नावलीत योग्य प्रकारे प्रश्न विचारला जाऊनही मैत्रिणींनी या प्रश्नाला आणि या सदरातील इतर प्रश्नांना उत्तर देणे पसंत केले नाही.

    • पूर्णवेळ नोकरीत कार्यरत असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र : सर्वाधिक संख्येने स्त्रिया संगणकक्षेत्रात कार्यरत आहेत (२९), त्याखालोखाल मानव संसाधन विकासक्षेत्रात (५) , अभियांत्रिकी (३), संशोधन (५), वित्त (४), कंपनी सेक्रेटरी, ग्रंथपाल, प्रशासन (४), Real Estate, शिक्षणक्षेत्रात (४)
    • अर्धवेळ नोकरीत कार्यरत असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र: शिक्षण, संशोधन, शैक्षणिक प्रशासन, संगणक.
    • पूर्णवेळ व्यवसाय/पूर्णवेळ व्यवसायात भागीदारी असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र : चित्रपट, वैद्यकीय, संपादन, इतर (Director)
    • अर्धवेळ व्यवसाय/अर्धवेळ व्यवसायात भागीदारी असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र: सल्लागार, घरातील व्यवसाय, समुपदेशक, सहसंस्थापक
    • विद्यार्थीदशेत असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्रः संशोधन, इतर
  • सध्याच्या पदभाराचे स्वरूप
    ४० मैत्रिणींने या प्रश्नाला उत्तर दिले नाही. पैकी ८ जणींने गैरलागु असे नमुद केले आहे.

    वरिष्ठ
    १४ स्त्रियांच्या मते त्या वरिष्ठ स्तरावर कार्यरत आहेत. यामध्ये सर्वात कमी वर्षांचा कार्यानुभव ४ वर्षे आणि सर्वाधिक ३० वर्ष (स्वतःचा पूर्णवेळ व्यवसाय चालवणार्‍या असल्यामुळे वरिष्ठ पदभार हा पर्याय निवडला गेला असावा.) पूर्णवेळ व्यवसाय/पूर्णवेळ व्यवसायात भागीदारी असलेल्या ४ स्त्रियांच्या मते त्यांचा पदभार वरिष्ठ या सदरात येतो. तर पूर्णवेळ नोकरीत असलेलेल्या १० जणींच्यामते त्यांचा पदभार वरिष्ठ प्रकारात मोडतो. कार्यक्षेत्र संगणकीय, वैद्यकिय, चित्रपट, संपादन , HR, शिक्षण इतर.
    काही पदभारांचे नावे: दृष्य संकल्पक/निर्माती, Director, Technical Lead/Consultant, Training Manager, मुख्य संपादक, S/w Engg, Doctor, Analyst- Institutional Research, Supervisor-Telephone Exchange, AM-Bkg etc
    हाताखाली काम करत असलेल्या व्यक्तिंची संख्या (काही उदाहरणॅ)-
    - ४-४० (कामाच्या स्वरुपानुसार)
    - Direct ४, Total २२
    - 0 (तांत्रिक काम असल्यामुळे)

    मध्यम व्यवस्थापकीय
    ४९ स्त्रियांच्या मते त्यांचा पदभार मध्यमव्यवस्थापकीय आहे. पैकी ४२ पूर्णवेळ नोकरीत आहेत. यामध्ये सर्वात कमी कार्यानुभव ५ महिने (एम.बी.ए नंतरच्या नोकरीचा कालावधी धरला असल्याची शक्यता आहे), सर्वाधिक ३६ वर्षे आहे.
    काही पदभारांचे नावे: Project Manager, Project Lead, Technical Lead (S/w), Librarian, Company Secretary, HR Executive/AVP, Project Office Planning, Accountant, SAP FICO Consultant, Executive Real Estate, Analyst, Reader, Architechtural Designer,Auditor etc.
    हाताखाली काम करत असलेल्या व्यक्तींची संख्या (काही उदाहरणे)
    - Not directly, manage a project team of 50
    - Indirectly manage a project team of 30
    - 15-20
    - 0 (तांत्रिक काम)

    कनिष्ठ
    १९ स्त्रियांच्या मते त्यांचा पदभार कनिष्ठ स्तरात मोडतो. पैकी सर्वात जास्त कार्यानुभव १० वर्षे.
    काही पदभारांचे नावे: Software Engg, Design Engg, Translator, Programmer, Developer, R &D Engineer, Assistant to MD, GR Assistant, Section Officer, SW Test Engg etc

  • मूल झाल्यावर नोकरी करावी की नाही याबद्दल कधी संभ्रम निर्माण झाला होता का?

    (टीपः प्रश्नाचा रोख नोकरी करावी की नाही यावर नसुन संभ्रमात पडण्यावर होता)
    २८ मैत्रिणींने काही प्रमाणात संभ्रमात पडल्याचे नोंदवले आहे. संभ्रमात पडल्याची कारणे :
    - कामाचे तास
    - आर्थिक परिस्थिती
    - परदेशात असल्याने कौंटुंबिक आधारगटाचा अभाव/सोयींचा अभाव
    - मुलं लहान असताना काही काळ नोकरी न करणे/ पूर्ण वेळ काम न करणे.

    हो (संभ्रमात पडले), मला नोकरी आवडते, पण कामाचे तास कमी केले पाहीजेत असं प्रकर्षाने वाटतं. फार घायकुतीला आल्यासारखं होतं.

    पडले, परदेशात असल्याने जास्तच संभ्रम होता.

    काही काळ ब्रेक घेतला होता. करियरच्या दृष्टीने सेटबॅक पण बसला.

    हो. मुल झाल्यावर आईने थोडा काळ नोकरी न करता मुलाकडे राहावे असे मला आधीपासुनच वाटायचे. दुर्दैवाने ते शक्य झाले नाही.

    ५१ मैत्रिणींने संभ्रमात न पडल्याचे नोंदवले आहे. संभ्रम नसण्याची कारणे :
    - आधीपासुनच स्पष्ट विचार/सुरवातीपासूनच नोकरी कुठल्याही परिस्थितीत सोडायची नसल्याचे ठरवले होते
    - मुलं लहान असताना काही काळ घरून काम करायचे योजिले आहे/होते व त्याप्रमाणे केले
    - मुलांची लहानपणीची वर्ष संपल्यावरच कामाला सुरवात केली
    - आर्थिक गरज
    - एकत्र कुटुंब असल्यामुळे आधारगट होता
    - नोकरी करणा-या आईचे उदाहरण समोर असल्यामुळे विचार स्पष्ट होते
    - मुलांना पा़ळणाघरात ठेवायचे नसल्यामुळे विचार स्पष्ट होते .

    कधीच नाही. नोकरीची अत्यंत गरज होती

    नाही. पर्याय उपलब्ध नव्हता. पैशांची गरज होती.

    नाही. मुलांना प्राधान्य द्यायचे हे ठरवले होते.

    मी माझे कामच मुळी मुले शाळेत जायला लागल्यावर सुरू केले.

    नाही. माझी आई नोकरी करणारी असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सांभाळूनही मुलं चांगल्याप्रकारे मोठी होतात याबाबत मनात संभ्रम नव्हता.

  • तुम्ही नोकरी/व्यवसाय कशासाठी करता ?

    मराठीतील पर्याय आवड, गरज, अंगभूत क्षमतांना न्याय देण्यासाठी असे होते. या प्रश्नाला एकुण ९२ उत्तरं आली.
    Reason for Working.JPGआता नोकरी करत नसल्यास आणि पूर्वी करत असल्यास ( मध्ये काही काळ नोकरी सोडली असल्यास) नोकरी सोडण्याची कारणे :
    - शारीरिक (गर्भवती असणे, स्वतःची तब्येत, कुटुंबाच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी)
    - बालसंगोपन (मुलांकडे पहायला आधारव्यवस्था नसणे, मुलांना वेळ देण्यासाठी, मुलांची तब्येत, आपल्याला न मिळालेले बालपण मुलांना देण्यासाठी)
    - कामासंदर्भातील अडचणी (अपुरा पगार,कामाचे तास आणि तणाव, रोजच्या प्रवासाचा वेळ)
    - आर्थिक गरज नसल्यामुळे
    - नातेस्थिती (लग्न झाल्यामुळे, लग्नानंतर परदेशात डिपेन्डन्ट म्हणुन जावे लागल्याने, कुटुंबाच्या मानसिक समाधानासाठी)
    - स्वेच्छेने आणि योजिल्याप्रमाणे (स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास, छंद जोपासण्यासाठी, स्वाध्याय, सामाजिक कार्य करण्यासाठी )

    लग्नानंतर परदेशी वास्तव्य करावे लागत असल्याने आणि डीपेन्डंट असल्याने नोकरीमध्ये ब्रेक घ्यावा लागला. खरं तर पुढे शिकायचा इरादा पक्का होता मित्राला लग्नासाठी हो म्हणाले तेव्हा. पण त्याचे शिक्षण संपत आल्याने व इतर काही कारणांमुळे भारतात परत जायचा निर्णय झाला. निर्णय अर्थात दोघांनी मिळून घेतला. पण परिणामतः मी सध्या बेकार व भारतात लवकरच जाऊन नोकरी करण्यास उत्सुक आहे. त्याची पी.एच. डी. लांबत चालल्याचे पाहून मी x वर्षांपूर्वी काही महिने देशात जाऊन नोकरी केली. आणि मला प्रमोशन मिळण्याची वेळ येताच त्याचे शिक्षण अजून लांबले. मग आमची गाडी पुन्हा अमेरिकेला परत!

    इकडे कामाला मदतनीस नसल्याने आणि नोकरीत कामाचे तास जास्त असल्याने कामच्या रगाड्यात घराकडे दुर्लक्ष होईल असे वाटले. मुलीची प्रकॄती हेही एक कारण होते.

    मुलगा झाला. एकच मुल असावं हा माझा निर्णय असल्यामुळे त्याचं 'बाळ'पण बघायचं, आईपण अनुभवायचं, त्यानं ते छोटे छोटे माईलस्टोनस पार करतांना त्यात सहभागी असावं असं मला वाटलं. म्हणुन नोकरी सोडली. आर्थिक गरज असती तर नसती सोडली.

    अपुरा पगार, कामाचे तास, मुले झाली, पहायला कोणी नव्हते.

    नोकरी-व्यवसाय कधीच केला नाही. पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ती म्हणून एका सेवाभावी संस्थेत XX वर्षे काम. नंतर XX वर्षे विविध प्रकारची शैक्षणिक कामे. नुकताच काम थांबवण्याचा निर्णय घेतला. कारण साधना व स्वाध्याय यांसाठी वेळ देण्याची मनापासून इच्छा आहे.

    सासुबाई आणि आई दोघी नोकरी करणार्‍या असल्याने आम्हा दोघांनाही हवी त्या प्रत्येकच वेळी आई मिळाली नाही [अर्थात त्या दोघीनीही त्यांच्यापरिने प्रयत्न केलेच पण तरीही...]तेव्हा आपल्या मुलावर ही वेळ येऊ नये, दोघापैकी एकाने तरी त्याला हवे तेव्हा लगेच उपलब्ध असावे आणि यासाठी बाबापेक्षा आईच योग्य अस वाटल्यामुळे नोकरी सोडुन दिली.
    दुसरे कारण...धावायचा [नोकरीनिमित्त दगदग] कम्टाळा आला होता, स्वतः साठी जगावं वाटत होतं, आता मी वाचन/ प्रवास यासाठी हवा तेवढा वेळ देऊ शकते रजेचा प्रश्नच येत नाही.

  • कामातील जबाबदार्‍या निभावताना एक स्त्री म्हणून दुय्यम वागणुक/ खास (स्पेशल) वागणूक मिळाली का ते तपशीलवार लिहा

    ६८ स्त्रियांनी "नाही "असे उत्तर दिले आहे. नाही/ फारशी नाही/ कधीच नाही/ तशी वेळच नाही येऊ दिली - अशी उत्तराची भाषा आढळते. यापैकी फारशी नाही आणि तशी वेळच कधी येऊ दिली नसल्याच्या भाषेकडे विश्लेषकचमु तुमचे लक्ष वेधू इच्छिते.

    यापैकी ६ स्त्रियांनी दुय्यम नाही तरी खास वागणुक मिळाल्याचे नमुद केले आहे. खास वागणुकीत ज्याला साधारणपणे स्त्रीदाक्षिण्य म्हणले जाते (टीपः केवळ भाषेच्या दृष्टीने हा शब्द वापरला आहे. हे विश्लेषकचमुचे मत अथवा पसंती नाही किंवा स्त्रीदाक्षिण्य असावे/नसावे याबद्दलही मत नाही) अशा स्वरूपाची उदाहरणं दिली आहेत:- मुलं लहान असल्याकारणाने वेळेवर घरी जाता येणे, गर्भार असताना खास काळजी घेतली जाणे, उशीरापर्यंत काम केल्यास पुरुष सहकार्‍यांनी सोडायला येणे, बॉसशी पूर्ण कुटुंबाचा परिचय असणे इ.इ.

    फक्त २४ स्त्रियांनी या प्रश्नाला हो असे उत्तर दिले.

    • स्थलसापेक्ष (फक्त भारतात/ भारतीय टीममध्ये काम करताना, फक्त परदेशात दुय्यम वागणुक मिळाली, फिल्ड वर्क मध्ये, रात्रपाळीत, टुरमध्ये,कामाच्या ठिकाणी नाही तरी मोलाने काम करणार्‍या पुरुषांकडुन (मुद्दाम)आज्ञापालन न होणे )
    • कामाच्या ठिकाणी अस्तिवात असलेला सुक्ष्म अथवा उघडउघड लिंगभेद (उघडउघड दुय्यम वागणुक न मिळणे, दुय्यम वागणुकीसाठी तक्रार करावी लागणे, माहिती न मिळणे,स्वतःबाबतीत नाही तरी इतरांबाबत अनुभवले आहे, वरिष्ठ म्हणुन स्त्री खपत नाही, नवराच बॉस असल्याने जास्त गृहित धरणे, हातखालच्या लोकांचे वय जेवढे जास्त तेवढा वागणुकीत फरक, (पेशंटने) स्त्रीडॉक्टरकडुन वैद्यकीय मदत घ्यायला नकार देणे, ठराविक माहिती पुरुषांशीच शेअर केली जाणे, स्त्री म्हणुन नसले तरी मुलांमुळे महत्वाची वेळखाऊ कामं न सोपवल्या जाणे, सारख्या कामासाठी पुरुषांहून कमी वेतन, कमी आव्हानात्मक काम मिळणे, शिक्षीका या पदाला स्त्रियांच्या बहुसंख्येमुळे पुरेसे मह्त्त्व दिल्या न जाणे

    यापैकी ४ स्रियांनी खास वागणूकही कधी कधी मिळाल्याचे नमुद केले आहे.

  • नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्त्रिया याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तपशीलवार लिहा

    ३३ स्त्रियांनी हा जिचातिचा खाजगी निर्णय आहे असे नमूद केले आहे. यापैकी २१ स्त्रिया सध्या नोकरीत कार्यरत आहेत, ६ गृहिणी आहेत. आर्थिक गरज/ मुलं/मुलांच्या खास समस्या, कौटुंबिक गरजा/ आयुष्यातील प्राधान्यक्रम/ स्वतःची शारीरिक क्षमता या घटकांवर अवलंबून हा निर्णय असल्याचे आणि तो आनंदाने घेतला गेल्या असल्यास हरकत नसल्याचे मैत्रिणींने नमूद केले आहे. जोपर्यंत हा निर्णय स्वखुशीने घेतला जातो तो पर्यंत ठीक, पण काही कारणाने दबाव असल्यास मात्र ते योग्य नाही अशी मतं व्यक्त केल्या गेली आहेत. नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्त्रियांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य वगळता फारसा फरक नसल्याचे एकीने सांगितले आहे, तर काहींनी दोघींवरही महत्त्वाच्या जबाबदार्‍या असुन दोघीही सारख्याच मानाला पात्र असल्याचे नोंदवले आहे. (टीपः "मानाला पात्र असणे" हा शब्दप्रयोग सर्वेक्षणात भाग घेतलेल्या स्त्रियांनी केलेला आहे. हा विश्लेषकचमुचा भावानुवाद नाही. खालील प्रतिक्रियांवरही काहीही प्रक्रिया केलेली नाही. शुद्धलेखनाचीही नाही.)

    हा प्रत्येकीचा चॉईस आहे. कोणी नोकरी करते म्हणून श्रेष्ठ ठरत नाही आणि कोणी घरी असते म्हणून कनिष्ठ नाही. एक मात्र वाटतं की घरी अस्णार्‍या बायकाच ह्या कॉम्प्लेक्सच्या शिकार असतात की त्या घरी असतात. आणि त्यामुळे नोकरी करणार्‍या बाईची तारेची कसरत पाहून 'सांगितलं आहे कोणी सर्व डगरींवर हात ठेवायला' टाईप कमेन्ट्स त्याच द्यायची शक्यता जास्त आहे.

    तो प्रत्येकचा स्वताचा निर्णय असावा. तुमच्या आवडी, गरजा आणि परिस्थिती यानुसार नोकरी करणे अथवा न करणे ठरते. विशेष भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही.

    जोपर्यंत त्या स्त्रीला 'मला काय करायचे आहे आणि मी काय करते आहे' याची जाणीव असेल, ती आहे त्या परिस्थितीत आनंदी असेल तोवर ऑल इज वेल! नाहीतर धोक्याची घंटा.

    काय वाटायचंय? दोघीही कष्ट करत राहतात. एकीला मोबदला मिळतो आणि त्याबरोबरीने निर्णय घेण्याचा हक्क बजावता येतो. दुसरीला मोबदला मिळत नाही घरात निर्णय घेण्यात सहभाग असतो किंवा नसतो. आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र - सक्षम असणं महत्त्वाचं वाटतं.

    each has responsibility - investing in the lives of others whether its children or adults

    As long as the woman is happy and comfortable with what she is doing, I do not believe in the categories like working/non-working women.

    ४८ स्त्रियांनी आपण नोकरी करणार्‍या स्त्रियांना जास्त पसंती देत असल्याचे नोंदवले आहे. (टीपः पसंती हा शब्द विश्लेषकचमुचा आहे. खुला प्रश्न असल्याकारणाने विस्तृत उत्तरांमधील समान धागे काढून हा शब्द त्याउत्तरातील भावमुद्रेनुसार वापरण्यात आला आहे.) यापैकी ३८ स्त्रिया सध्या कसल्या न कसल्या प्रकाराची नोकरी करतात आणि फक्त ३ गृहिणी आहेत.
    यापैकी बहुतांशी उत्तरांत न करण्यापेक्षा, नोकरी करणे केव्हाही चांगले असा सूर आहे. काहींनी नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्त्रियांबद्दल तौलनिक दृष्टीकोन मांडला आहे, तर काहींनी नोकरी न करणार्‍या स्त्रियांना आपण समजुन घेऊ शकत नसल्याचे नोंदवले आहे, तर काहींनी घरकाम ही २४ तासांची नोकरी असल्याचे मत नोंदवले आहे. एकीने नोकरी न करणार्‍या स्त्रियांना स्पष्ट पसंती देत असल्याचे नमूद केले आहे. काही प्रतिक्रियांमध्ये फक्त नोकरी करण्याचे फायदे किंवा न करण्याचे तोटे नमूद केले आहेत.

    हा प्रश्न घराबाहेर काम, अस्तित्व असलेल्या आणि घरापुरतंच जग असलेल्या स्त्रिया अश्या तुलनेचा आहे असं समजून हे लिहिते. घरापुरतंच जग असलेल्या स्त्रिया अनेकदा मुलांना स्वतःवर जास्तीत जास्त अवलंबून ठेवण्यात धन्यता मानतात. जे पुढे जाऊन मुलांसाठीच त्रासाचे होऊ शकते. स्वतःचं घराबाहेरही अस्तित्व असलेल्या बायकांचा जगात काय चाललंय याच्याशी थोडा तरी संपर्क असतो. ज्याचा घरावर नक्कीच परिणाम होतो चांगल्या अर्थाने. तसेच मुलं हाच केंद्रबिंदू नसल्याने मुलांनाही स्वावलंबन शिकवले जाते.

    नोकरी करायला पाहिजे. घरी बसणे म्हण्जे नवर्‍याची नोकरी करण्यासारखे आहे.

    नोकरी न करणार्‍या स्त्रिया जर उच्चशिक्षित असतील आणि त्यांचा सगळा वेळ काही प्रॉडक्टिव न करण्यात घालवत असतील तर मला तो साधनसंपत्तीचा अपव्यव वाटतो. जर असे काही न करण्यात आयुष्य घालवायचे ठरले असेल तर त्या स्त्रियांनी घरकामाचे शिक्षण घ्यावे. स्पर्धात्मक क्षेत्रातील जागा अडवू नयेत. ( तसेच पुरुषांचेही. - उदा एखादे घरचे दुकान चालवायचे आधीच ठरले असेल तर स्पर्धात्मक क्षेत्रात जागा अडवू नयेत.)

    न करणार्‍यांमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता कमी असल्याचं लक्षात आलं आहे.

    दोन्ही प्रकारचं जग बघितलं आहे. मला तरी नोकरी करणार्‍या स्त्री ला स्वतःसाठी वेळ मिळतो असे वाटते. घरी राहणारी बाई घरकाम व इतर गोष्टींमध्ये (त्यात जर लहान मुलं असेल तर त्यामध्ये) इतकी गुंतलेली असते की तिला स्वतःचे छंद वैगरेसाठी वेळ देता येत नाही. घरात रहाणार्‍या स्त्रीला बहुतेक वेळा गृहीत धरलं जातं. घरातच आहे मग कामवालीची काय गरज?
    तर नोकरी करणारीला दोन्ही डगरीवर पाय ठेवावे लागतात. दोन्हीकडच्या कामाच्या व्यापामूळे तिलाही स्वतःसाठी वेळ काढणे अवघड जाते. नोकरी करणार्‍या काय अन न करणार्‍या काय, जोपर्यंत स्त्री स्वतःच्या आयुष्याबद्दलचे, कामाबद्दल्चे निर्णय दुसर्‍यांना घेवू देते तोपर्यंत दोघींचे आयुष्य सारखचं असतं
    .

    नोकरी न करणार्‍या स्रियांमधला कॉन्फिडन्स खूप कमी वाटतो. शिवाय त्या आयुष्याबाबत फार उदास वाटतात.

    नोकरी करणार्‍या काही स्त्रियांचे घराकडे पूर्ण दुर्लक्ष होते. हे मी अनुभवले आहे. ते ठीक वाटत नाही. नोकरी करून आर्थिक स्वावलंबन प्राप्त झाल्यामुळे काही जणी भावनिक स्वावलंबन मिळवू शकतात. पण हा नियम सर्वांना लागू करणे कठीण. घरात अशा स्त्रियांचा शब्द मानला जाऊ शकतो पण हेही सरसकट खरे नाही. शेवटी प्रत्येकाची मनःशक्ती ही कुठल्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

    स्त्रीच काय, कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा असा व्यवसाय (occupation या अर्थी) हवाच हवा. त्यातून अर्थार्जन होतं की नाही हा दुय्यम भाग. (मी प्रश्नातला 'नोकरी' हा शब्द 'occupation' याच अर्थी घेते आहे.) असं occupation नसलेल्या व्यक्ती आर्थिक, भावनिक आणि एकूणच दुसर्‍यावर फार अवलंबून रहायला लागतात आणि त्याहून वाईट म्हणजे त्यालाच त्याग वगैरे गोंडस नावं देऊन वर त्याचा मोबदला मिळावा अशीही अपेक्षा ठेवायला लागतात. ही वाईट परिस्थिती आहे. प्रश्न केवळ अर्थार्जनाचा असेल तर त्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास सहसा येतो हे अमान्य करताच येत नाही, पण आपल्या घराला असं 'डिव्हिजन ऑफ लेबर' सूट होत असेल तर कमीपणा न वाटून घेता जरूर योग्य तो निर्णय घ्यावा. नोकरी करणं / न करणं यांतलं काहीच गतानुगतिकतेतून ठरवलं जाऊ नये.

    मला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नसलेल्या स्त्रिया आवडत नाहीत. नवर्‍याच्या जीवावर चैन करणार्‍या स्त्रिया ह्या माझ्या दृष्टीने कलंक आहेत. मला त्यांचा तीटकारा वाटतो.

  • पदभारातील पदोन्नतीचे अनुभव. मिळालेली पदोन्नती तुम्ही कधी नाकारली आहे का ? केवळ स्त्री म्हणुन तुम्हाला पदोन्नती नाकारली गेली आहे का?:

    २० स्त्रियांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. यापैकी १६ स्त्रियांनी मिळालेली पदोन्नती स्वतः नाकारली आहे. ३ स्त्रियांनी अनुक्रमे "मिळाली नाही" आणि "हो" एवढेच उत्तर दिले आहे. यावरुन केवळ स्त्री म्हणुन पदोन्नती नाकारल्या गेल्याचे सिद्ध होत नाही.

    एका स्त्रीने स्पष्टपणे स्त्री म्हणुन, आणि विशेषकरुन गर्भार राहिल्यामुळे पदोन्नती नाकारली गेली असल्याचे नमूद केले आहे. एकीने केवळ स्त्री म्हणुन पदोन्नती नाकारली गेली नसल्याचे स्पष्ट नमूद केले आहे, तरी राजकारणामुळे पदोन्नती मिळाले नसल्याचे नमूद केले आहे.

    मिळालेली पदोन्नती नाकारण्याचे कारणे:

    • वाढीव पदभारामुळे येणार्‍या जबाबदार्‍या/ वाढीव कामाचे तास निभावण्याची कौटुंबिक परिस्थिती नसणे (मुलं लहान, नवर्‍याच्या निर्णयामुळे पदोन्नती सोडावी लागणे, नवीन लग्न असताना एकमेकांबरोबर घालवायला वेळ मिळण्यासाठी, नवरा दुसर्‍या शहरात/देशात असल्यामुळे
    • वाढीव प्रवास/फिरतीची नोकरी/ बदलीची नोकरी
    • आवडीच्या शिक्षणासाठी
    • प्रत्यक्ष पदोन्नती नाकारली नसली तरी लहान मुलांमुळे नोकरी सोडायचा निर्णय घ्यावा लागला
    • प्रत्यक्ष पदोन्नती नाकारली नसली तरी पदोन्नती पर्यंत न पोचण्याची खबरदारी स्वतःच घ्यावी लागली अशा प्रतिक्रियाही यात समाविष्ट आहेत.

    ६२ स्त्रियांनी पदोन्नती नाकारल्या गेल्याचा/ स्वतः नाकारण्याचा अनुभव नसल्याचे स्पष्ट नमुद केले आहे.

    नाही केवळ स्त्री म्हणुन पदोन्नती नाकारली गेलेली नाही, ऑफीस पॉलीटिक्समुळे नाकारली गेल्याचा अनुभव आहे. परदेशात मात्र काही ठिकाणी भारतीय स्त्रियांना आम्ही नोकरी देऊ इच्छित नाही असे सांगण्यात आले आहे.

    पदोन्नतीमुळे इतर लोकांचा आपल्याकडे पाहायचा दृष्टीकोन उंचावतो. पण तेवढीच योग्य निर्णय, जबाबादारी, सगळ्यांना बरोबर घेऊन राहणं ही टेन्शन्स असतात. स्त्री म्हणून कधीच नाकारली गेली नाही, मी कधी नाकारली नाही.

    असे प्रश्न सामाजिक कामात असल्यामुळे फारसे आलेच नाहीत. या गोष्टींमधे कधी रसही वाटला नाही.
    I like the process at my company. My managers so far have been fair about promotions. Whenever I showed excellent work, I did get promoted. Now with the given economy, promotions are a bit rare.


stline2.gifनिष्कर्ष

I have yet to hear a man ask for advice on how to combine marriage and a career. - Gloria Steinem.

मूल झाल्यावर नोकरी करण्या न करण्याबाबत संभ्रमाची कारणे/ नोकरी सोडण्याची कारणे वर तपशीलवार नमूद केली आहेत. एक वाचक म्हणून तुम्हाला याबाबत काय वाटतं?

एकंदरीतच 'नोकरी' या सदरातील सर्व खुल्या प्रश्नांना बाकीच्या सदरातील प्रश्नांच्या तुलनेत कमी प्रतिसाद आले. विश्लेषकचमुच्या यावर चर्चांच्या फैरी झडल्या. काही ठोस निष्कर्ष काढण्याइतपत पुरावा नाही, तरी सहज सोडून देण्यासारखी ही गोष्ट नाही.

इंग्रजी प्रश्नावलीत राहून गेलेल्या एका त्रुटीमुळेही अपुरा मजकुर हाताशी आहे. इथे वरिष्ठ/ मध्यमव्यवस्थापकीय/ कनिष्ठ हे स्तर त्या त्या प्रतिक्रिया देणार्‍यांच्या मतानुसार आहेत. तिथे काटेकोर व्याख्या नव्हती तरीही कशा प्रकारच्या पदभारांबाबत नोंदणी झाली आहे हे व्यवस्थित समजावे म्हणून दिले आहे.

प्रतिक्रिया देणार्‍या मैत्रिणींच्या सध्याच्या नोकरीस्थितीचा, नोकरी करणार्‍या/ न करणार्‍या स्त्रियांबाबत मतांवर निश्चित प्रभाव दिसून येतो. प्रतिक्रियांची भाषा पाहता 'पूर्वग्रह' हा शब्द वापरता यावा इतपत भाषा नोंदली गेली आहे.

निष्कर्ष आवडला.

घरासाठी, कुटुंबासाठी कामाला दुय्यम महत्त्व देणारे काही पुरूष मला माहिती आहेत. पण सहसा, लग्न झाल्यावर मुलीनेच जास्तीत जास्त तडजोड करावी असा सूर सगळीकडे दिसतो.

तुलनेने खूप कमी जणींनी स्त्री म्हणून वेगळी वागणूक (लिंगभेदाचा अनुभव) मिळाल्याचं सांगितलय ही खरंच चांगली गोष्ट आहे.
माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये एनजीओ मध्ये अन कार्पोरेट क्षेत्रात काम करताना असा अनुभव आला नव्ह्ता. परंतू महाराष्ट्र सरकारबरोबर काम करत असताना मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका याठिकाणी मला लिंगभेदाचे अनुभव आले होते. अगदी सरळ सरळ नाही पण तरीही, माझ्या कार्यकालामध्ये एकही काम पुढे सरकु दिले नाही. त्याबद्दल शासनाकडून महानगर्पालिकेची कानउघडणी पण झाली परंतू खूप काही फरक पडला नाही.
पदोन्नती नाकारण्याबद्दल मला काही अनुभव नाही आला, परंतू स्त्री गरोदर असल्यामूळे तिची निवड न झाल्याची एक घटना पहाण्यात आहे.

खूप मुद्देसूद निष्कर्ष.

सर्व विश्लेषण चमूचे यासाठी खास अभिनंदन. या निष्कर्षामुळे कित्येक प्रश्न मनात उभे राहिले.

खास करून या प्रश्नामुळे नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्त्रिया याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तपशीलवार लिहा ::
फारसं डिप्लोमॅटिक न लिहिता यामधे काहीजणानी खरोखर त्याचं मत नोंदवलय.

तुलनेने खूप कमी जणींनी स्त्री म्हणून वेगळी वागणूक (लिंगभेदाचा अनुभव) मिळाल्याचं सांगितलय ही खरंच चांगली गोष्ट आहे.
>> असे अनुभव कित्येकदा प्रत्यक्ष येत नाहीत पण सीनीअर्सकडून कित्येक वेळा अप्रत्यक्ष किंवा छुप्या रितीने असे अनुभव येत राहतात. पदोन्नती सरळ सरळ नाकारण्यापेक्षा कमी र्‍अँकिंग देऊन पाठी ठेवण्यासारखे प्रकार कायम चालू असतातच की..

प्रतिक्रिया देणार्‍या मैत्रिणींच्या सध्याच्या नोकरीस्थितीचा, नोकरी करणार्‍या/ न करणार्‍या स्त्रियांबाबत मतांवर निश्चित प्रभाव दिसून येतो. प्रतिक्रियांची भाषा पाहता 'पूर्वग्रह' हा शब्द वापरता यावा इतपत भाषा नोंदली गेली आहे.>>>

Sad

नोकरी करणार्‍या बायका न करणारींकडे थोडं कमी लेखून बघतात काय? - असं वाटून गेलं आणि वाईट वाटलं. तसंच, नोकरी करणार्‍या बायका थोड्या 'defiant' वाटतात का त्या कमावतात म्हणून, त्या चूल न मूल मध्ये अडकल्या नाहीयेत म्हणून? Uhoh एका परीने, स्त्रीया एकमेकींकडे इतक्या मोकळेपणाने बघत नाहीत, हेच अधोरेखित होतंय का? I may be wrong, or am not able to put it correctly Sad

नोकरी करायला पाहिजे. घरी बसणे म्हण्जे नवर्‍याची नोकरी करण्यासारखे आहे.

मला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नसलेल्या स्त्रिया आवडत नाहीत. नवर्‍याच्या जीवावर चैन करणार्‍या स्त्रिया ह्या माझ्या दृष्टीने कलंक आहेत. मला त्यांचा तीटकारा वाटतो.

बाssप रे!! इतकी भयंकर टोकाची मते वाचून धक्का बसला.

पूनम, तू म्हणत्येस तशी परिस्थिती असेल अशी भिती वाटतेय.

हो न. खरंच अगदी टोकाची मतं आहेत.
नोकरी करणार्‍या बाईची तारेची कसरत पाहून 'सांगितलं आहे कोणी सर्व डगरींवर हात ठेवायला' टाईप कमेन्ट्स त्याच द्यायची शक्यता जास्त आहे. >>> मी पूर्वी (आईच्या बाबतित, ती नोकरी करत असताना) नोकरी न करणार्‍या स्त्रीयांना अश्याप्रकारच्या कमेंट्स करताना बघितले होतं. अन त्याचं वाईट पण वाटायचं, नोकरी करणारीला समजून घेत नाहीत याचं.

पण आता इथली मतं वाचून परिस्थिती उलट झालीये की काय अशी काळजी वाटतेय.

फार टोकाची मतं आहेत की. सुरुवातीला जेव्हा अनेक जणींनी फॉर्म भरुन छान वाटलं, स्वत:विषयी इतका विचार पहिल्यांदाच केला असं नमुद केलं होतं तेव्हा सखेद आश्चर्य वाटलं होतं. असं कसं ? इतकं पठडीतलं आयुष्य ? आता त्याहुन अधिक खेद आणि आश्चर्य ह्या कमेंट्स वाचून वाटलं Sad

At the same time, माझं स्वत:च मत आर्थिक स्वावलंबनाच्या बाजुनेच आहे पण तरी जिचा-तिचा निर्णय.

नोकरी करायला पाहिजे. घरी बसणे म्हण्जे नवर्‍याची नोकरी करण्यासारखे आहे.

मला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नसलेल्या स्त्रिया आवडत नाहीत. नवर्‍याच्या जीवावर चैन करणार्‍या स्त्रिया ह्या माझ्या दृष्टीने कलंक आहेत. मला त्यांचा तीटकारा वाटतो.

>>>> Uhoh
ही वृत्ती खूपच खटकली मलाही.

सुरेख विश्लेषण.
प्राथमिक माहिती पहाता सर्वेत भाग घेणार्‍यांमध्ये नोकरी/व्यवसाय करणार्‍या स्त्रिया जास्त आहेत. त्या करियरमध्ये समाधानी असतील, त्याचे फायदे त्यांच्या लक्षात आले असतील तर "स्त्रियांसाठी नोकरी करणं(आर्थिक स्वावलंबन) चांगलं" हे बहुतेक जणींचे मत असू शकते. यालाच "पसंती" असा शब्द वापरला आहे का? तसं असेल तर त्यात काही वावगं वाटत नाही.

नवर्‍याची नोकरी, त्याच्या जीवावर चैन इ. एखाद-दुसरा अभिप्राय असू शकतो. पण त्यामुळं सर्वसाधारण नोकरी व्यवसाय करणारी स्त्री न करणार्‍या स्त्रीला कमी लेखते असा निष्कर्ष काढू नये. ते एक दोन अभिप्राय 'अशीही मते असू शकतात' यासाठी वेगळे नमूद केलेत असं मला तरी वाटलं.

मूल झाल्यानंतर नोकरीच्या बाबतीत संभ्रमात न पडल्याचे ५१ जणींनी नमूद केले आहे. ही चांगली गोष्ट आहे.

अभिप्राय निवडताना दोन टोकाची परस्परविरोधी मतं, आणि लक्षणीय (सम्यक किंवा वेगळा विचार मांडणारी मतं) अशी मतं आपण प्रसिद्ध करतो.
दोन टोकाची मतं यासाठी की वाचणार्‍या व्यक्तिला मतांची काय रेंज आहे त्याचा अंदाज यावा यासाठी.
- विश्लेषकचमुच्या वतीने

आर्थिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य असा काही स्त्रियांचा कल दिसत आहे. तो चांगला असावाही कदाचित. पण दुसर्‍यांनीही तेच मत बाळगावे ह्याचा अट्टाहास का? हे कळत नाही, आणि ते ही सुशिक्षित स्त्रिंयाकडून असे मत नोंदवले गेले ह्याबद्दल आश्चर्य वाटले.

नोकरी व्यवसाय करणारी स्त्री न करणार्‍या स्त्रीला कमी लेखते असा निष्कर्ष जरी निघत नसेल तर सर्वसाधारण कल तसाच दिसतोय. त्यामुळेच कदाचित विश्लेशकांना पूर्वग्रह हा शब्द योजावा लागला.

मला स्वतःला लिंगभेदाचा त्रास जाणवला नाही हे वाचुन जरा आश्चर्य वाटले. कारण गेल्या १० वर्षात कामानिमीत्ताने अश्या कितीतरी घटना पाहिल्या आहेत. असो. अनुभवणार्‍या व्यक्तिचे ते अनुभव असल्यास उत्तमच आहे.

नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या दोन्ही बाजुने इतकी टोकाची मतं का असतात ?
तरीही नंदिनी म्हणते तशी ही केवळ डिप्लोमॅटिक उत्तरं नसुन प्रामाणिक मतं आहेत. मत पटो न पटो.

केदार, तुझ्या पोस्टमधले "हेच खरे" आणि "दुसर्‍यांनीही तेच मत बाळगावे ह्याचा अट्टाहास" हे शब्द खटकले. आर्थिक स्वातंत्र्याचे फायदे सांगत बसायची गरज नाही, पण ते 'असलेले चांगले' इतपतच ते मत असावे. ते स्वतः कमाई केली तरच येते असेही काही नाही. घरी बसणार्‍या स्त्रीलाही हवे तेवढे आर्थिक स्वातंत्र्य असू शकते. फक्त ते आणि तेवढेच खरे नाही हे आलेच. आणि दुसर्‍यांनी ते मत बाळगावं असा अट्टाहास आहे वगैरे काही या सर्वेक्षणातून स्पष्ट होतंय असं मला वाटत नाही. सर्वसाधारण कल कमी लेखण्याकडे नसून 'स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभे असलेले चांगले' असा आहे असे माझे मत.
नाहीतर पुन्हा "तुम्हाला नक्की काय म्हणायचं होतं" असा सर्वे घ्यावा लागेल. Wink

छे.. ती दोन वाक्यं मलाही फारच खटकली.. असे विचार कोणा व्यक्तीचे असतील व ते ही एका स्त्रीचेच हे तर अजुनच नवल!
पण आर्थिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य असे मानणार्‍या मुली मला वैयक्तिकही माहीत आहेत. असा ट्रेंड येतोय खरं! मला पर्सनली आर्थिक स्वावलंबन हवे हे पटते पण ते काही कारणाने नसेल तर त्या स्त्रीला स्वातंत्र्यच नाही, हे फारच न पटणारे आहे..
असो.
बाकी रिपोर्ट नेहेमीप्रमाणेच उत्तम!

मला वाटतय केदारना "आर्थिक स्वातंत्र्य" हेच खर नसुन,ते नसुनही "स्वातंत्र्य" असु शकत "अस काहीतरी म्हणायच होत अस वाटत? बरोबर का केदार?
"दुसर्‍यानीही तेच मत बाळगावे हा अट्टाहास " हे "तिटकारा वाटतो" अस लिहिणार्‍या बाई कडुन कुठतरी ध्वनीत होतोय अस तुला वाटत नाही का लालु?
म्हणजे जनरायलॅझशन कितीही करायच नाही अस म्हटल तरी कुठतरी "नोकरी न करणार्‍या बायकाना" कमी लेखुन त्यानी "नोकरी करावी . त्यातुनच आर्थिक (किंवा अन्य)स्वातंत्र्य जपल जात. घरी बसुन ते शक्य नाही" असच कुठतरी अधोरेखित होतय वरील सर्व्हे मधुन अस वाटल. तो एक प्रकारे अट्टाहासच नाही का?

एक स्त्री म्हणून दुय्यम वागणुक>> ६८ स्त्रियांनी "नाही >> हा आकडा बरंच काही सांगून जातो. चांगलं आहे. पण असे अनुभव कमी / जास्त येत असतातच.

आर्थिक स्वातंत्र्य हेच खरे>> ह्म्म्म आर्थिक स्वातंत्र्यानं इनसिक्युरिटी नाहीशी होत असावी.

आर्थिक स्वावलंबन हे अतिशय महत्वाचे असं जर वाटत असेल तर त्यात चूक तर काहीच नाही.
शेवटी अनेक गोष्टी तिथेच येतात हे सत्य नाकारून चालणार नाही.

दुरून डोंगर साजरे न्यायाने दुसर्‍या बाजूबद्दल टोकाची मते हे थोडे अपरिहार्य आहे. अ‍ॅनॉनिमस सर्व्हे असल्याने निदान प्रामाणिक उत्तरे आली हे महत्वाचे.

आर्थिक स्ववलंबन आणि स्वातंत्र्य ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भरपूर कमावणार्‍या बाईला सुद्धा आर्थिक स्वातंत्र्य असेलच आणि नोकरी न करणार्‍या बाईला ते नसेलच असे नाही. प्रमाण कमी-जास्त होऊ शकेल इतकेच.

>>टोकाची मतं का असतात ?

मुळात नोकरी करण्या-न-करण्याविषयी प्रश्न विचारावेसे सुचले, यातच मला वाटते त्याचे उत्तर आहे.

कदाचित सतत आपला निर्णय कसा बरोबर आहे हे दुसर्‍यांना सांगावे लागल्याने, मते अशी टोकाची झाली असावीत.

मला हा प्रश्न वाचून आश्चर्य वाटले होते. पण आणखी विचार केल्यावर आपले या विषयी खरोखरच ठाम मत आहे हे लक्षात आले. (ज्याचा त्याचा प्रश्न असे साधे मत नाही. :-)) या प्रश्नावलीने पुष्कळ दिशांनी विचार करायला उद्युक्त केले, त्यातलाच हा एक प्रश्न होता.

मान्य सिंडे पण आर्थिक स्वावलंबन असलेल्या बायांमधे आर्थिक स्वातंत्र्य असण्याची शक्यता जास्त असेल असं नाही का वाटत?

मला ह्या मुद्द्याचे दोन भाग करायला हवे होते असं वाटलं होतं.
नोकरी/व्यवसाय हा एक भाग
आणि आर्थिक प्राप्तीशिवाय घराच्याबाहेरच्या जगाशी संपर्क/ सहभाग हा दुसरा भाग.

@ सिंडरेला, आर्थिक स्ववलंबनामुळं / (च) स्वातंत्र्य मिळायला मदत होते असं वाटत नाही का?

मान्य सिंडे पण आर्थिक स्वावलंबन असलेल्या बायांमधे आर्थिक स्वातंत्र्य असण्याची शक्यता जास्त असेल असं नाही का वाटत? >>> मान्य. म्हणुनच मी लिहिलय, प्रमाण कमी अधिक होउ शकेल.

>>ह्या मुद्द्याचे दोन भाग करायला हवे होते

मला वाटते, मूळ मुद्दा नोकरी, ग्लास सीलींग वगैरेचा अंदाज घेणे हा असावा.

पण नोकरी करणार्‍यांविषयी काय मत, हे विचारल्याने ही मतेमतांतरे दिसली.
नोकरी न करणार्‍यांचे करणार्‍यांविषयी काही मत नाही का आलेले?

नोकरी न करणार्‍यांचे करणार्‍यांविषयी काही मत नाही का आलेले?<<
तिथेही तेवढीच धक्कादायक मते/ विधाने दिसली असती असा माझा कयास आहे. निदान मी तरी पाह्यलंय तसं.

'स्त्रियांनी नोकरी करणे' हे नाही म्हटलं तरी भारतीय समाजासाठी बरचसं अलिकडचं आहे, नवीन आहे. म्हणून हे प्रश्न विचारावेसे वाटले असतील. याबरोबर येणारे प्रश्न, संभ्रम इ. गोष्टींवर कालांतराने सरसकट उपाय निघतील, रुळतील. तेव्हा हे प्रश्न कालबाह्य होतील.

>>'स्त्रियांनी नोकरी करणे' हे नाही म्हटलं तरी भारतीय समाजासाठी बरचसं अलिकडचं

पश्चिम युरोपातही ते अलिकडचेच आहे (असे सारखे टीव्ही वगैरे वर सांगत असतात). पहिल्या व दुसर्‍या महायुद्धांमुळे स्त्रिया घराबाहेर पडून काम करून पैसे मिळवू लागल्या. त्या आधी (आपल्या) घरात, शेतात काम, किंवा (इतर श्रीमंतांच्या घरी) घरकाम एव्हढेच पर्याय होते.

बरोबर का केदार >> बरोबर. सिंडीने मी काय म्हणतोय ते मांडले त्यामुळे परत लिहत नाही.

लालू तू जसा तो मुद्दा घेतला तसा तो नाही, सीमा, सिंडी म्हणत आहेत तसा आहे. अट्टहासाचेही सीमाने बरोबर मांडले आहे.

पण तू स्वतःचं मत कुठे लिहिलंस? Happy सर्वेतल्या बायकांच्या मताच्या कलाबद्दल लिहिलंयस.. आणि एखादीचे मत तसे असेल तर त्याला 'सर्वसाधारण कल' म्हणता येणार नाही.

मृदुला, असेल. समाजाने हा बदल लवकर स्वीकारला त्यातून तयार झालेल्या प्रश्नांना उत्तर मिळणं सोपं होत जातं. तिथला धर्माचा पगडा, समाजरचना, जीवनपद्धती इ. बर्‍याच गोष्टींवर त्यानंतरचे प्रश्न अवलंबून असतात.

Pages