सर्व्हे रिपोर्टः विभाग- नोकरी

Submitted by संयोजक_संयुक्ता on 24 April, 2010 - 13:15

नोकरी

या भागात १० प्रश्न समाविष्ट करण्यात आले होते. त्यातला कुठलाही प्रश्न अनिवार्य नव्हता. सध्याचा पदभार, नोकरी/ करियरविषयक मतं, Work- Life Balance, पदोन्नती, नोकरी सोडण्याची कारणे, Glass Ceiling (कामाच्या ठिकाणी लिंगभेदाचा अनुभव), नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्रियांबाबत मैत्रिणींचे विचार याभोवती या सदरातील प्रश्नांचा रोख ठेवला होता.

हे वाचण्यास सुरूवात करण्यापूर्वी प्राथमिक माहिती हा धागा पूर्ण वाचावा.
कृपया या भागातील टीपा काळजीपूर्वक वाचाव्या.

  • सध्याच्या पदभाराचे नाव, विभागाचे नाव

    या प्रश्नाला आणि एकंदरीत नोकरी या सदरातील सर्वच प्रश्नांना बर्‍याच स्त्रियांनी उत्तर देणे पसंत केले नाही. None of your business अशीही एक प्रतिक्रिया आली. सर्व खाजगी प्रश्नांना मो़कळेपणाने उत्तरं देताना मात्र या सदरातीलच काही प्रश्नांना मैत्रिणींनी लक्षणीय संख्येने प्रतिसाद दिला नाही हे कशाचे द्योतक असू शकेल या प्रश्नापाशी विश्लेषक म्हणून आम्ही नक्कीच थबकलो. इंग्रजी प्रश्नावलीत अनुवादात राहिलेली एक त्रुटी याचे एक कारण असू शकेल. इंग्रजी प्रश्नावलीत चुकुन Company Name असा उल्लेख राहिला होता. मराठी प्रश्नावलीत योग्य प्रकारे प्रश्न विचारला जाऊनही मैत्रिणींनी या प्रश्नाला आणि या सदरातील इतर प्रश्नांना उत्तर देणे पसंत केले नाही.

    • पूर्णवेळ नोकरीत कार्यरत असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र : सर्वाधिक संख्येने स्त्रिया संगणकक्षेत्रात कार्यरत आहेत (२९), त्याखालोखाल मानव संसाधन विकासक्षेत्रात (५) , अभियांत्रिकी (३), संशोधन (५), वित्त (४), कंपनी सेक्रेटरी, ग्रंथपाल, प्रशासन (४), Real Estate, शिक्षणक्षेत्रात (४)
    • अर्धवेळ नोकरीत कार्यरत असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र: शिक्षण, संशोधन, शैक्षणिक प्रशासन, संगणक.
    • पूर्णवेळ व्यवसाय/पूर्णवेळ व्यवसायात भागीदारी असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र : चित्रपट, वैद्यकीय, संपादन, इतर (Director)
    • अर्धवेळ व्यवसाय/अर्धवेळ व्यवसायात भागीदारी असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र: सल्लागार, घरातील व्यवसाय, समुपदेशक, सहसंस्थापक
    • विद्यार्थीदशेत असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्रः संशोधन, इतर
  • सध्याच्या पदभाराचे स्वरूप
    ४० मैत्रिणींने या प्रश्नाला उत्तर दिले नाही. पैकी ८ जणींने गैरलागु असे नमुद केले आहे.

    वरिष्ठ
    १४ स्त्रियांच्या मते त्या वरिष्ठ स्तरावर कार्यरत आहेत. यामध्ये सर्वात कमी वर्षांचा कार्यानुभव ४ वर्षे आणि सर्वाधिक ३० वर्ष (स्वतःचा पूर्णवेळ व्यवसाय चालवणार्‍या असल्यामुळे वरिष्ठ पदभार हा पर्याय निवडला गेला असावा.) पूर्णवेळ व्यवसाय/पूर्णवेळ व्यवसायात भागीदारी असलेल्या ४ स्त्रियांच्या मते त्यांचा पदभार वरिष्ठ या सदरात येतो. तर पूर्णवेळ नोकरीत असलेलेल्या १० जणींच्यामते त्यांचा पदभार वरिष्ठ प्रकारात मोडतो. कार्यक्षेत्र संगणकीय, वैद्यकिय, चित्रपट, संपादन , HR, शिक्षण इतर.
    काही पदभारांचे नावे: दृष्य संकल्पक/निर्माती, Director, Technical Lead/Consultant, Training Manager, मुख्य संपादक, S/w Engg, Doctor, Analyst- Institutional Research, Supervisor-Telephone Exchange, AM-Bkg etc
    हाताखाली काम करत असलेल्या व्यक्तिंची संख्या (काही उदाहरणॅ)-
    - ४-४० (कामाच्या स्वरुपानुसार)
    - Direct ४, Total २२
    - 0 (तांत्रिक काम असल्यामुळे)

    मध्यम व्यवस्थापकीय
    ४९ स्त्रियांच्या मते त्यांचा पदभार मध्यमव्यवस्थापकीय आहे. पैकी ४२ पूर्णवेळ नोकरीत आहेत. यामध्ये सर्वात कमी कार्यानुभव ५ महिने (एम.बी.ए नंतरच्या नोकरीचा कालावधी धरला असल्याची शक्यता आहे), सर्वाधिक ३६ वर्षे आहे.
    काही पदभारांचे नावे: Project Manager, Project Lead, Technical Lead (S/w), Librarian, Company Secretary, HR Executive/AVP, Project Office Planning, Accountant, SAP FICO Consultant, Executive Real Estate, Analyst, Reader, Architechtural Designer,Auditor etc.
    हाताखाली काम करत असलेल्या व्यक्तींची संख्या (काही उदाहरणे)
    - Not directly, manage a project team of 50
    - Indirectly manage a project team of 30
    - 15-20
    - 0 (तांत्रिक काम)

    कनिष्ठ
    १९ स्त्रियांच्या मते त्यांचा पदभार कनिष्ठ स्तरात मोडतो. पैकी सर्वात जास्त कार्यानुभव १० वर्षे.
    काही पदभारांचे नावे: Software Engg, Design Engg, Translator, Programmer, Developer, R &D Engineer, Assistant to MD, GR Assistant, Section Officer, SW Test Engg etc

  • मूल झाल्यावर नोकरी करावी की नाही याबद्दल कधी संभ्रम निर्माण झाला होता का?

    (टीपः प्रश्नाचा रोख नोकरी करावी की नाही यावर नसुन संभ्रमात पडण्यावर होता)
    २८ मैत्रिणींने काही प्रमाणात संभ्रमात पडल्याचे नोंदवले आहे. संभ्रमात पडल्याची कारणे :
    - कामाचे तास
    - आर्थिक परिस्थिती
    - परदेशात असल्याने कौंटुंबिक आधारगटाचा अभाव/सोयींचा अभाव
    - मुलं लहान असताना काही काळ नोकरी न करणे/ पूर्ण वेळ काम न करणे.

    हो (संभ्रमात पडले), मला नोकरी आवडते, पण कामाचे तास कमी केले पाहीजेत असं प्रकर्षाने वाटतं. फार घायकुतीला आल्यासारखं होतं.

    पडले, परदेशात असल्याने जास्तच संभ्रम होता.

    काही काळ ब्रेक घेतला होता. करियरच्या दृष्टीने सेटबॅक पण बसला.

    हो. मुल झाल्यावर आईने थोडा काळ नोकरी न करता मुलाकडे राहावे असे मला आधीपासुनच वाटायचे. दुर्दैवाने ते शक्य झाले नाही.

    ५१ मैत्रिणींने संभ्रमात न पडल्याचे नोंदवले आहे. संभ्रम नसण्याची कारणे :
    - आधीपासुनच स्पष्ट विचार/सुरवातीपासूनच नोकरी कुठल्याही परिस्थितीत सोडायची नसल्याचे ठरवले होते
    - मुलं लहान असताना काही काळ घरून काम करायचे योजिले आहे/होते व त्याप्रमाणे केले
    - मुलांची लहानपणीची वर्ष संपल्यावरच कामाला सुरवात केली
    - आर्थिक गरज
    - एकत्र कुटुंब असल्यामुळे आधारगट होता
    - नोकरी करणा-या आईचे उदाहरण समोर असल्यामुळे विचार स्पष्ट होते
    - मुलांना पा़ळणाघरात ठेवायचे नसल्यामुळे विचार स्पष्ट होते .

    कधीच नाही. नोकरीची अत्यंत गरज होती

    नाही. पर्याय उपलब्ध नव्हता. पैशांची गरज होती.

    नाही. मुलांना प्राधान्य द्यायचे हे ठरवले होते.

    मी माझे कामच मुळी मुले शाळेत जायला लागल्यावर सुरू केले.

    नाही. माझी आई नोकरी करणारी असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सांभाळूनही मुलं चांगल्याप्रकारे मोठी होतात याबाबत मनात संभ्रम नव्हता.

  • तुम्ही नोकरी/व्यवसाय कशासाठी करता ?

    मराठीतील पर्याय आवड, गरज, अंगभूत क्षमतांना न्याय देण्यासाठी असे होते. या प्रश्नाला एकुण ९२ उत्तरं आली.
    Reason for Working.JPGआता नोकरी करत नसल्यास आणि पूर्वी करत असल्यास ( मध्ये काही काळ नोकरी सोडली असल्यास) नोकरी सोडण्याची कारणे :
    - शारीरिक (गर्भवती असणे, स्वतःची तब्येत, कुटुंबाच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी)
    - बालसंगोपन (मुलांकडे पहायला आधारव्यवस्था नसणे, मुलांना वेळ देण्यासाठी, मुलांची तब्येत, आपल्याला न मिळालेले बालपण मुलांना देण्यासाठी)
    - कामासंदर्भातील अडचणी (अपुरा पगार,कामाचे तास आणि तणाव, रोजच्या प्रवासाचा वेळ)
    - आर्थिक गरज नसल्यामुळे
    - नातेस्थिती (लग्न झाल्यामुळे, लग्नानंतर परदेशात डिपेन्डन्ट म्हणुन जावे लागल्याने, कुटुंबाच्या मानसिक समाधानासाठी)
    - स्वेच्छेने आणि योजिल्याप्रमाणे (स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास, छंद जोपासण्यासाठी, स्वाध्याय, सामाजिक कार्य करण्यासाठी )

    लग्नानंतर परदेशी वास्तव्य करावे लागत असल्याने आणि डीपेन्डंट असल्याने नोकरीमध्ये ब्रेक घ्यावा लागला. खरं तर पुढे शिकायचा इरादा पक्का होता मित्राला लग्नासाठी हो म्हणाले तेव्हा. पण त्याचे शिक्षण संपत आल्याने व इतर काही कारणांमुळे भारतात परत जायचा निर्णय झाला. निर्णय अर्थात दोघांनी मिळून घेतला. पण परिणामतः मी सध्या बेकार व भारतात लवकरच जाऊन नोकरी करण्यास उत्सुक आहे. त्याची पी.एच. डी. लांबत चालल्याचे पाहून मी x वर्षांपूर्वी काही महिने देशात जाऊन नोकरी केली. आणि मला प्रमोशन मिळण्याची वेळ येताच त्याचे शिक्षण अजून लांबले. मग आमची गाडी पुन्हा अमेरिकेला परत!

    इकडे कामाला मदतनीस नसल्याने आणि नोकरीत कामाचे तास जास्त असल्याने कामच्या रगाड्यात घराकडे दुर्लक्ष होईल असे वाटले. मुलीची प्रकॄती हेही एक कारण होते.

    मुलगा झाला. एकच मुल असावं हा माझा निर्णय असल्यामुळे त्याचं 'बाळ'पण बघायचं, आईपण अनुभवायचं, त्यानं ते छोटे छोटे माईलस्टोनस पार करतांना त्यात सहभागी असावं असं मला वाटलं. म्हणुन नोकरी सोडली. आर्थिक गरज असती तर नसती सोडली.

    अपुरा पगार, कामाचे तास, मुले झाली, पहायला कोणी नव्हते.

    नोकरी-व्यवसाय कधीच केला नाही. पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ती म्हणून एका सेवाभावी संस्थेत XX वर्षे काम. नंतर XX वर्षे विविध प्रकारची शैक्षणिक कामे. नुकताच काम थांबवण्याचा निर्णय घेतला. कारण साधना व स्वाध्याय यांसाठी वेळ देण्याची मनापासून इच्छा आहे.

    सासुबाई आणि आई दोघी नोकरी करणार्‍या असल्याने आम्हा दोघांनाही हवी त्या प्रत्येकच वेळी आई मिळाली नाही [अर्थात त्या दोघीनीही त्यांच्यापरिने प्रयत्न केलेच पण तरीही...]तेव्हा आपल्या मुलावर ही वेळ येऊ नये, दोघापैकी एकाने तरी त्याला हवे तेव्हा लगेच उपलब्ध असावे आणि यासाठी बाबापेक्षा आईच योग्य अस वाटल्यामुळे नोकरी सोडुन दिली.
    दुसरे कारण...धावायचा [नोकरीनिमित्त दगदग] कम्टाळा आला होता, स्वतः साठी जगावं वाटत होतं, आता मी वाचन/ प्रवास यासाठी हवा तेवढा वेळ देऊ शकते रजेचा प्रश्नच येत नाही.

  • कामातील जबाबदार्‍या निभावताना एक स्त्री म्हणून दुय्यम वागणुक/ खास (स्पेशल) वागणूक मिळाली का ते तपशीलवार लिहा

    ६८ स्त्रियांनी "नाही "असे उत्तर दिले आहे. नाही/ फारशी नाही/ कधीच नाही/ तशी वेळच नाही येऊ दिली - अशी उत्तराची भाषा आढळते. यापैकी फारशी नाही आणि तशी वेळच कधी येऊ दिली नसल्याच्या भाषेकडे विश्लेषकचमु तुमचे लक्ष वेधू इच्छिते.

    यापैकी ६ स्त्रियांनी दुय्यम नाही तरी खास वागणुक मिळाल्याचे नमुद केले आहे. खास वागणुकीत ज्याला साधारणपणे स्त्रीदाक्षिण्य म्हणले जाते (टीपः केवळ भाषेच्या दृष्टीने हा शब्द वापरला आहे. हे विश्लेषकचमुचे मत अथवा पसंती नाही किंवा स्त्रीदाक्षिण्य असावे/नसावे याबद्दलही मत नाही) अशा स्वरूपाची उदाहरणं दिली आहेत:- मुलं लहान असल्याकारणाने वेळेवर घरी जाता येणे, गर्भार असताना खास काळजी घेतली जाणे, उशीरापर्यंत काम केल्यास पुरुष सहकार्‍यांनी सोडायला येणे, बॉसशी पूर्ण कुटुंबाचा परिचय असणे इ.इ.

    फक्त २४ स्त्रियांनी या प्रश्नाला हो असे उत्तर दिले.

    • स्थलसापेक्ष (फक्त भारतात/ भारतीय टीममध्ये काम करताना, फक्त परदेशात दुय्यम वागणुक मिळाली, फिल्ड वर्क मध्ये, रात्रपाळीत, टुरमध्ये,कामाच्या ठिकाणी नाही तरी मोलाने काम करणार्‍या पुरुषांकडुन (मुद्दाम)आज्ञापालन न होणे )
    • कामाच्या ठिकाणी अस्तिवात असलेला सुक्ष्म अथवा उघडउघड लिंगभेद (उघडउघड दुय्यम वागणुक न मिळणे, दुय्यम वागणुकीसाठी तक्रार करावी लागणे, माहिती न मिळणे,स्वतःबाबतीत नाही तरी इतरांबाबत अनुभवले आहे, वरिष्ठ म्हणुन स्त्री खपत नाही, नवराच बॉस असल्याने जास्त गृहित धरणे, हातखालच्या लोकांचे वय जेवढे जास्त तेवढा वागणुकीत फरक, (पेशंटने) स्त्रीडॉक्टरकडुन वैद्यकीय मदत घ्यायला नकार देणे, ठराविक माहिती पुरुषांशीच शेअर केली जाणे, स्त्री म्हणुन नसले तरी मुलांमुळे महत्वाची वेळखाऊ कामं न सोपवल्या जाणे, सारख्या कामासाठी पुरुषांहून कमी वेतन, कमी आव्हानात्मक काम मिळणे, शिक्षीका या पदाला स्त्रियांच्या बहुसंख्येमुळे पुरेसे मह्त्त्व दिल्या न जाणे

    यापैकी ४ स्रियांनी खास वागणूकही कधी कधी मिळाल्याचे नमुद केले आहे.

  • नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्त्रिया याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तपशीलवार लिहा

    ३३ स्त्रियांनी हा जिचातिचा खाजगी निर्णय आहे असे नमूद केले आहे. यापैकी २१ स्त्रिया सध्या नोकरीत कार्यरत आहेत, ६ गृहिणी आहेत. आर्थिक गरज/ मुलं/मुलांच्या खास समस्या, कौटुंबिक गरजा/ आयुष्यातील प्राधान्यक्रम/ स्वतःची शारीरिक क्षमता या घटकांवर अवलंबून हा निर्णय असल्याचे आणि तो आनंदाने घेतला गेल्या असल्यास हरकत नसल्याचे मैत्रिणींने नमूद केले आहे. जोपर्यंत हा निर्णय स्वखुशीने घेतला जातो तो पर्यंत ठीक, पण काही कारणाने दबाव असल्यास मात्र ते योग्य नाही अशी मतं व्यक्त केल्या गेली आहेत. नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्त्रियांमध्ये आर्थिक स्वातंत्र्य वगळता फारसा फरक नसल्याचे एकीने सांगितले आहे, तर काहींनी दोघींवरही महत्त्वाच्या जबाबदार्‍या असुन दोघीही सारख्याच मानाला पात्र असल्याचे नोंदवले आहे. (टीपः "मानाला पात्र असणे" हा शब्दप्रयोग सर्वेक्षणात भाग घेतलेल्या स्त्रियांनी केलेला आहे. हा विश्लेषकचमुचा भावानुवाद नाही. खालील प्रतिक्रियांवरही काहीही प्रक्रिया केलेली नाही. शुद्धलेखनाचीही नाही.)

    हा प्रत्येकीचा चॉईस आहे. कोणी नोकरी करते म्हणून श्रेष्ठ ठरत नाही आणि कोणी घरी असते म्हणून कनिष्ठ नाही. एक मात्र वाटतं की घरी अस्णार्‍या बायकाच ह्या कॉम्प्लेक्सच्या शिकार असतात की त्या घरी असतात. आणि त्यामुळे नोकरी करणार्‍या बाईची तारेची कसरत पाहून 'सांगितलं आहे कोणी सर्व डगरींवर हात ठेवायला' टाईप कमेन्ट्स त्याच द्यायची शक्यता जास्त आहे.

    तो प्रत्येकचा स्वताचा निर्णय असावा. तुमच्या आवडी, गरजा आणि परिस्थिती यानुसार नोकरी करणे अथवा न करणे ठरते. विशेष भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही.

    जोपर्यंत त्या स्त्रीला 'मला काय करायचे आहे आणि मी काय करते आहे' याची जाणीव असेल, ती आहे त्या परिस्थितीत आनंदी असेल तोवर ऑल इज वेल! नाहीतर धोक्याची घंटा.

    काय वाटायचंय? दोघीही कष्ट करत राहतात. एकीला मोबदला मिळतो आणि त्याबरोबरीने निर्णय घेण्याचा हक्क बजावता येतो. दुसरीला मोबदला मिळत नाही घरात निर्णय घेण्यात सहभाग असतो किंवा नसतो. आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र - सक्षम असणं महत्त्वाचं वाटतं.

    each has responsibility - investing in the lives of others whether its children or adults

    As long as the woman is happy and comfortable with what she is doing, I do not believe in the categories like working/non-working women.

    ४८ स्त्रियांनी आपण नोकरी करणार्‍या स्त्रियांना जास्त पसंती देत असल्याचे नोंदवले आहे. (टीपः पसंती हा शब्द विश्लेषकचमुचा आहे. खुला प्रश्न असल्याकारणाने विस्तृत उत्तरांमधील समान धागे काढून हा शब्द त्याउत्तरातील भावमुद्रेनुसार वापरण्यात आला आहे.) यापैकी ३८ स्त्रिया सध्या कसल्या न कसल्या प्रकाराची नोकरी करतात आणि फक्त ३ गृहिणी आहेत.
    यापैकी बहुतांशी उत्तरांत न करण्यापेक्षा, नोकरी करणे केव्हाही चांगले असा सूर आहे. काहींनी नोकरी करणार्‍या आणि न करणार्‍या स्त्रियांबद्दल तौलनिक दृष्टीकोन मांडला आहे, तर काहींनी नोकरी न करणार्‍या स्त्रियांना आपण समजुन घेऊ शकत नसल्याचे नोंदवले आहे, तर काहींनी घरकाम ही २४ तासांची नोकरी असल्याचे मत नोंदवले आहे. एकीने नोकरी न करणार्‍या स्त्रियांना स्पष्ट पसंती देत असल्याचे नमूद केले आहे. काही प्रतिक्रियांमध्ये फक्त नोकरी करण्याचे फायदे किंवा न करण्याचे तोटे नमूद केले आहेत.

    हा प्रश्न घराबाहेर काम, अस्तित्व असलेल्या आणि घरापुरतंच जग असलेल्या स्त्रिया अश्या तुलनेचा आहे असं समजून हे लिहिते. घरापुरतंच जग असलेल्या स्त्रिया अनेकदा मुलांना स्वतःवर जास्तीत जास्त अवलंबून ठेवण्यात धन्यता मानतात. जे पुढे जाऊन मुलांसाठीच त्रासाचे होऊ शकते. स्वतःचं घराबाहेरही अस्तित्व असलेल्या बायकांचा जगात काय चाललंय याच्याशी थोडा तरी संपर्क असतो. ज्याचा घरावर नक्कीच परिणाम होतो चांगल्या अर्थाने. तसेच मुलं हाच केंद्रबिंदू नसल्याने मुलांनाही स्वावलंबन शिकवले जाते.

    नोकरी करायला पाहिजे. घरी बसणे म्हण्जे नवर्‍याची नोकरी करण्यासारखे आहे.

    नोकरी न करणार्‍या स्त्रिया जर उच्चशिक्षित असतील आणि त्यांचा सगळा वेळ काही प्रॉडक्टिव न करण्यात घालवत असतील तर मला तो साधनसंपत्तीचा अपव्यव वाटतो. जर असे काही न करण्यात आयुष्य घालवायचे ठरले असेल तर त्या स्त्रियांनी घरकामाचे शिक्षण घ्यावे. स्पर्धात्मक क्षेत्रातील जागा अडवू नयेत. ( तसेच पुरुषांचेही. - उदा एखादे घरचे दुकान चालवायचे आधीच ठरले असेल तर स्पर्धात्मक क्षेत्रात जागा अडवू नयेत.)

    न करणार्‍यांमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता कमी असल्याचं लक्षात आलं आहे.

    दोन्ही प्रकारचं जग बघितलं आहे. मला तरी नोकरी करणार्‍या स्त्री ला स्वतःसाठी वेळ मिळतो असे वाटते. घरी राहणारी बाई घरकाम व इतर गोष्टींमध्ये (त्यात जर लहान मुलं असेल तर त्यामध्ये) इतकी गुंतलेली असते की तिला स्वतःचे छंद वैगरेसाठी वेळ देता येत नाही. घरात रहाणार्‍या स्त्रीला बहुतेक वेळा गृहीत धरलं जातं. घरातच आहे मग कामवालीची काय गरज?
    तर नोकरी करणारीला दोन्ही डगरीवर पाय ठेवावे लागतात. दोन्हीकडच्या कामाच्या व्यापामूळे तिलाही स्वतःसाठी वेळ काढणे अवघड जाते. नोकरी करणार्‍या काय अन न करणार्‍या काय, जोपर्यंत स्त्री स्वतःच्या आयुष्याबद्दलचे, कामाबद्दल्चे निर्णय दुसर्‍यांना घेवू देते तोपर्यंत दोघींचे आयुष्य सारखचं असतं
    .

    नोकरी न करणार्‍या स्रियांमधला कॉन्फिडन्स खूप कमी वाटतो. शिवाय त्या आयुष्याबाबत फार उदास वाटतात.

    नोकरी करणार्‍या काही स्त्रियांचे घराकडे पूर्ण दुर्लक्ष होते. हे मी अनुभवले आहे. ते ठीक वाटत नाही. नोकरी करून आर्थिक स्वावलंबन प्राप्त झाल्यामुळे काही जणी भावनिक स्वावलंबन मिळवू शकतात. पण हा नियम सर्वांना लागू करणे कठीण. घरात अशा स्त्रियांचा शब्द मानला जाऊ शकतो पण हेही सरसकट खरे नाही. शेवटी प्रत्येकाची मनःशक्ती ही कुठल्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

    स्त्रीच काय, कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा असा व्यवसाय (occupation या अर्थी) हवाच हवा. त्यातून अर्थार्जन होतं की नाही हा दुय्यम भाग. (मी प्रश्नातला 'नोकरी' हा शब्द 'occupation' याच अर्थी घेते आहे.) असं occupation नसलेल्या व्यक्ती आर्थिक, भावनिक आणि एकूणच दुसर्‍यावर फार अवलंबून रहायला लागतात आणि त्याहून वाईट म्हणजे त्यालाच त्याग वगैरे गोंडस नावं देऊन वर त्याचा मोबदला मिळावा अशीही अपेक्षा ठेवायला लागतात. ही वाईट परिस्थिती आहे. प्रश्न केवळ अर्थार्जनाचा असेल तर त्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास सहसा येतो हे अमान्य करताच येत नाही, पण आपल्या घराला असं 'डिव्हिजन ऑफ लेबर' सूट होत असेल तर कमीपणा न वाटून घेता जरूर योग्य तो निर्णय घ्यावा. नोकरी करणं / न करणं यांतलं काहीच गतानुगतिकतेतून ठरवलं जाऊ नये.

    मला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नसलेल्या स्त्रिया आवडत नाहीत. नवर्‍याच्या जीवावर चैन करणार्‍या स्त्रिया ह्या माझ्या दृष्टीने कलंक आहेत. मला त्यांचा तीटकारा वाटतो.

  • पदभारातील पदोन्नतीचे अनुभव. मिळालेली पदोन्नती तुम्ही कधी नाकारली आहे का ? केवळ स्त्री म्हणुन तुम्हाला पदोन्नती नाकारली गेली आहे का?:

    २० स्त्रियांनी होकारार्थी उत्तर दिले आहे. यापैकी १६ स्त्रियांनी मिळालेली पदोन्नती स्वतः नाकारली आहे. ३ स्त्रियांनी अनुक्रमे "मिळाली नाही" आणि "हो" एवढेच उत्तर दिले आहे. यावरुन केवळ स्त्री म्हणुन पदोन्नती नाकारल्या गेल्याचे सिद्ध होत नाही.

    एका स्त्रीने स्पष्टपणे स्त्री म्हणुन, आणि विशेषकरुन गर्भार राहिल्यामुळे पदोन्नती नाकारली गेली असल्याचे नमूद केले आहे. एकीने केवळ स्त्री म्हणुन पदोन्नती नाकारली गेली नसल्याचे स्पष्ट नमूद केले आहे, तरी राजकारणामुळे पदोन्नती मिळाले नसल्याचे नमूद केले आहे.

    मिळालेली पदोन्नती नाकारण्याचे कारणे:

    • वाढीव पदभारामुळे येणार्‍या जबाबदार्‍या/ वाढीव कामाचे तास निभावण्याची कौटुंबिक परिस्थिती नसणे (मुलं लहान, नवर्‍याच्या निर्णयामुळे पदोन्नती सोडावी लागणे, नवीन लग्न असताना एकमेकांबरोबर घालवायला वेळ मिळण्यासाठी, नवरा दुसर्‍या शहरात/देशात असल्यामुळे
    • वाढीव प्रवास/फिरतीची नोकरी/ बदलीची नोकरी
    • आवडीच्या शिक्षणासाठी
    • प्रत्यक्ष पदोन्नती नाकारली नसली तरी लहान मुलांमुळे नोकरी सोडायचा निर्णय घ्यावा लागला
    • प्रत्यक्ष पदोन्नती नाकारली नसली तरी पदोन्नती पर्यंत न पोचण्याची खबरदारी स्वतःच घ्यावी लागली अशा प्रतिक्रियाही यात समाविष्ट आहेत.

    ६२ स्त्रियांनी पदोन्नती नाकारल्या गेल्याचा/ स्वतः नाकारण्याचा अनुभव नसल्याचे स्पष्ट नमुद केले आहे.

    नाही केवळ स्त्री म्हणुन पदोन्नती नाकारली गेलेली नाही, ऑफीस पॉलीटिक्समुळे नाकारली गेल्याचा अनुभव आहे. परदेशात मात्र काही ठिकाणी भारतीय स्त्रियांना आम्ही नोकरी देऊ इच्छित नाही असे सांगण्यात आले आहे.

    पदोन्नतीमुळे इतर लोकांचा आपल्याकडे पाहायचा दृष्टीकोन उंचावतो. पण तेवढीच योग्य निर्णय, जबाबादारी, सगळ्यांना बरोबर घेऊन राहणं ही टेन्शन्स असतात. स्त्री म्हणून कधीच नाकारली गेली नाही, मी कधी नाकारली नाही.

    असे प्रश्न सामाजिक कामात असल्यामुळे फारसे आलेच नाहीत. या गोष्टींमधे कधी रसही वाटला नाही.
    I like the process at my company. My managers so far have been fair about promotions. Whenever I showed excellent work, I did get promoted. Now with the given economy, promotions are a bit rare.


stline2.gifनिष्कर्ष

I have yet to hear a man ask for advice on how to combine marriage and a career. - Gloria Steinem.

मूल झाल्यावर नोकरी करण्या न करण्याबाबत संभ्रमाची कारणे/ नोकरी सोडण्याची कारणे वर तपशीलवार नमूद केली आहेत. एक वाचक म्हणून तुम्हाला याबाबत काय वाटतं?

एकंदरीतच 'नोकरी' या सदरातील सर्व खुल्या प्रश्नांना बाकीच्या सदरातील प्रश्नांच्या तुलनेत कमी प्रतिसाद आले. विश्लेषकचमुच्या यावर चर्चांच्या फैरी झडल्या. काही ठोस निष्कर्ष काढण्याइतपत पुरावा नाही, तरी सहज सोडून देण्यासारखी ही गोष्ट नाही.

इंग्रजी प्रश्नावलीत राहून गेलेल्या एका त्रुटीमुळेही अपुरा मजकुर हाताशी आहे. इथे वरिष्ठ/ मध्यमव्यवस्थापकीय/ कनिष्ठ हे स्तर त्या त्या प्रतिक्रिया देणार्‍यांच्या मतानुसार आहेत. तिथे काटेकोर व्याख्या नव्हती तरीही कशा प्रकारच्या पदभारांबाबत नोंदणी झाली आहे हे व्यवस्थित समजावे म्हणून दिले आहे.

प्रतिक्रिया देणार्‍या मैत्रिणींच्या सध्याच्या नोकरीस्थितीचा, नोकरी करणार्‍या/ न करणार्‍या स्त्रियांबाबत मतांवर निश्चित प्रभाव दिसून येतो. प्रतिक्रियांची भाषा पाहता 'पूर्वग्रह' हा शब्द वापरता यावा इतपत भाषा नोंदली गेली आहे.

>>समाजाने हा बदल लवकर स्वीकारला तर

खरंय.

परवा ऑफिसातल्या एका मुलीशी बोलत होते. ती म्हणाली, "माझ्या नवर्‍याच्या मित्रांच्या बायका, मैत्रिणी सगळ्या एकतर नर्स किंवा शिक्षिका किंवा मग घरीच. त्यांचे बोलायचे विषय म्हणजे फक्त मुलंबाळं, फार तर डायेट वगैरे. मला इतकं कंटाळवाणं होतं त्यांच्याशी बोलणं. ..." वगैरे. मी एकदम गडबडूनच गेले. सहसा, इंग्रज लोकांशी संभाषण म्हणजे सगळे गोड गोड प्रकारचे असते. हिने एकदम अशी टीका केल्यावर काय बोलायचे सुचले नाही.

मला वाटतं पाश्चात्य समाजात स्त्री जास्त मुक्त आहे असं भासतं, पण इथल्या मुलींना सुद्धा 'जाच' होतो. Happy सहसा मुली काम करतात ते असं 'केअर' क्षेत्रात. रुग्णांची सेवा नाहीतर मुलांना शिकवणे! स्त्रियांना हे चांगले जमते असे त्यांचे लहानपणापासून ब्रेनवॉशिंग करतात. आणि इतर पुरषी कामं करणार्‍या स्त्रियांकडे वेगळ्या दृष्टीने बघतात. (काय प्राणी आहे अश्या!) मला स्वतःला, गोरी इंग्रज नसून, अश्या प्रश्नांचा आणि नजरांचा सामना करावा लागला आहे. पण तरी कमी; कारण इतर वेगळेपणे इतके असतात, की हा त्यात खपून जातो.

आपण नोकरी करतोय म्हणजे काही विशेष अशी भावनाही मला इंग्रज स्त्रियांमधे दिसली. उदा - मी नोकरी करते, म्हणून मी रोज स्वयपाक करत नाही; किंवा डिशवॉशर वापरते इत्यादी. अनेक डगरींवर हात, पाय वगैरे प्रतिक्रिया, न नोकरी करणार्‍यांकडून ऐकल्या.

त्यामुळे, याबाबतीततरी सगळ्या चुली मातीच्याच. त्यातल्या त्यात मला वाटते, आपल्याकडे - महाराष्ट्रात निदान मुलींना हवे ते शिकता येते, अमका कोर्स मुलींचा, तमका पुरषी असे ठळक भेद नाहीत हे खूपच बरे आहे.

चमू, चिकाटीने आणि उत्तम काम करताय. अभिनंदन. Happy

सगळीच निरीक्षणं विचारांत पाडणारी आहेत.

बाकी इथे वानगीदाखल दिलेली टोकाची मतं (किंवा काही मतांची टोकं) ही वैयक्तिक आयुष्यातल्या टोकाच्या परिस्थितीला दिलेला तात्कालिक प्रतिसाद असू शकतील. ती प्रातिनिधिक समजायचं कारण नाही असं मलाही वाटतंय.

<<पदोन्नती नाकारण्याबद्दल मला काही अनुभव नाही आला, परंतू स्त्री गरोदर असल्यामूळे तिची निवड न झाल्याची एक घटना पहाण्यात आहे. >>
असाच अनुभव मलापण आलेला आहे.
अगदी आय टी क्षेत्रातील मोठ मोठ्या कंपन्या ( भारतात तरी ) नोकरीवर रुजु होताना काही मेडिकल टेस्ट कंपलसरी करायला लावतात. त्यामधे प्रेग्नन्सी टेस्ट सुद्धा असते. मी जेव्हा माझ्या सध्याच्या कंपनीत जॉईन झाले तेव्हा माझी पण ही टेस्ट झाली होती. आणि विषेश म्हण्जे अशी टेस्ट होणार आहे हेच मला टेस्ट आधी माहित नव्हते किंवा या टेस्ट साठी माझी परवानगी घेण्यात आलेली नव्हती. ( अता त्यानी काही असे पेपर दिले होते का ते नक्की आठवत नाहीये. बहुतेक असे कोण्तेही परवानगी मागणारे पेपर दिले नव्हते. शिवाय या नोकरीत रुजु व्हायला मी इतकी उत्सुक होते की इतर बाबींचा फारसा विचार केला नव्हता. ) पण जेव्हा मी ते सगळे टेस्ट चे रीपोर्ट घेउन आमच्या डॉ कडे गेले तेव्हा त्यानी मला संगितले की यामधे प्रेग्नन्सी टेस्ट सुद्धा केली आहे. आणि असे परवानगी न घेता कसे काय ही टेस्ट करु शकतात ? परवानगी न घेता अशी टेस्ट करणे अयोग्य आहे असे त्यांचे मत होते.
नन्तर जॉईन झाल्यावर मला कळले की प्रेग्नट असेल तर अशा मुलीना जॉब ऑफर नाकारतात. अर्थात अशी माहिती मला ऑफीसमधिल इतर मैत्रिणिंकडुन मिळली. ती कितपत खरी आहे माहिती नाही.

हो आणि विशेष म्हण्जे तेव्हा माझे लग्न झालेले नव्हते. त्यामुळे लग्न झालेले नसुन सुद्धा माझी प्रेग्नन्सी टेस्ट केली याचे मला थोडे वैषम्य वाटले होते.

हा सर्व्हे म्हणजे प्रचंडच काम केलय तुमच्या टीमन... अगदी प्रोफेशनल प्रेसिजनन सगळ हाताळलय..मांडलय..त्याबद्दल अभिनंदन!

प्रतिक्रिया देणार्‍या मैत्रिणींच्या सध्याच्या नोकरीस्थितीचा, नोकरी करणार्‍या/ न करणार्‍या स्त्रियांबाबत मतांवर निश्चित प्रभाव दिसून येतो. प्रतिक्रियांची भाषा पाहता 'पूर्वग्रह' हा शब्द वापरता यावा इतपत भाषा नोंदली गेली आहे.>>> ह्याचे कारण माझ्यापुरते तरी मी सांगते. माझ्या आईच्या पिढीतल्या नोकरी करनार्‍या आणि न करणार्‍या बायकांना बघत आम्ही (ह्यात माझ्या मावस मामे आत्ये बहिणी,मैत्रिणी,officeमधल्या सहकारी ज्यांची प्रामाणिक मते मला माहित आहेत) जेव्हा लहानाच्या मोठ्या झालो तेव्हा काही सन्माननीय अपवाद वगळता एव्हडेच बघायला मिळाले की बाई कमवत असेल तर जास्त मान,निर्णय स्वातंत्र्य तीला मिळते. मुख्य गोष्ट म्हणजे ह्या नोकरी करणार्‍या बायका मला तरी नेहमीच जास्त confident ,knowledgeble वाटतात.नोकरीच्या निमित्ताने त्यांची soft skills पन जास्त develope झालेली आढळुन येतात.ह्यात आणखी एक बाब मला तरी प्रकर्षाने आढळुन आली ती म्हणजे नोकरी न करणार्‍यांचे नवरे नोकरी करणार्‍या आपल्या स्त्री सहकारीशी (कारण त्या पिढीत स्त्री असुन तुम्ही नोकरी करायच निर्णय घेतलाय म्हणजे तुम्ही नक्किच हुशार आहात आणि तुमच्या guts आहेत हे ग्रुहीत धरलेले आहे. )जितके आदराने वागत तितक्याच आदराने नोकरी न करणार्‍या आपल्या बायकोशी वागताना दिसत नसत.
आज पिढीतल्या नोकरी न करनार्‍या मुलींना कदाचित आर्थिक स्वातंत्र्य , आदर मिळतही असेल पण वरची टोकाची मते (जी मला तरी फार प्रामाणिक वाटली) असणे असमर्थनीय नाही.

नोकरी नसेल तर आर्थिक स्वातंत्र्य नसतेच असे काही नाही हे माझ्या नुकतेच लक्षात आले. आई, मावश्या, माम्या, आत्या, काकवा, इतकेच नव्हे तर आज्याही नोकरीव्यवसाय करणार्‍या असल्याने आयुष्यात आपापले कमावणे आवश्यक असे कुठेतरी गृहितच धरले गेले होते.

काल एका मित्राशी बोलताना तो म्हणाला की बाळ झाल्यापासून बजेट कोलमडले. त्यामुळे नव्या, जास्त पगाराच्या नोकरीचा शोध सुरू केला. वगैरे. तसे बघितले तर आम्ही दोघे एकाच क्षेत्रातले, त्यामुळे पगार वगैरे किती असावा याचा मला अंदाज होता. बरे, हे लोक अमेरिकेत. म्हणजे इंग्लंडाच्या मानाने स्वस्ताई. मग बजेट कोलमडण्यासारखी स्थिती कशी काय झाली हे समजेना. त्याला विचारले तर त्याने आकडेच सांगितले. माझ्या अंदाजापेक्षा त्याचे उत्पन्न जास्तच आहे. पण त्यातले साधारण २०% तो आपल्या आईबाबांना पाठवतो. आणि ३०% आपल्या सासरी. उरलेल्यात त्यांची गुजराण. मी थक्क झाले. तो म्हणाला की लग्न झाल्यावर निम्म्या उत्पन्नावर पत्नीचा अधिकार आहे असे त्याचे मत आहे. आणि तिच्या हिश्श्यातले ६०% ती घरीच पाठवते कारण घरी अजून दोन बहिणी शिकत आहेत. आई वडील निवृत्त आहेत आणि त्या बहिणींचे कोर्स महागाचे आहेत. शिवाय आजारपणे वगैरे होतात. त्याच्या घरी त्याचे आईवडील आहेत आणि तो आणि त्याचा भाऊ त्यांना पैसे पाठवतात. दोन्ही घरी निवृत्तीआधीची जी लाईफस्टाईल होती ती सांभाळणे सामाजिकदृष्ट्या आवश्यक. वगैरे.
त्याची पत्नी लग्नाच्या आधीही नोकरी करत नसे. पण घरी मुलांना शिकवत वगैरे असे. तिला नोकरी करणे आवडत नाही. घर सांभाळणे आवडते. त्यालाही अशीच मुलगी हवी होती.

थोडक्यात या मित्रासारखा समजुतदार नवरा मिळाला तर आर्थिक स्वातंत्र्य मिळणे सहजशक्य! Happy

मृदुला म्हणते तसे उदा. फारच प्रश्ंसनीय आहे.. इथे तर कमवत्या बायकोला तिच्या घरच्यांना मदत न करु देणारे अभिमानाने फिरताना/सांगताना दिसतात..

बाकी प्रोफेशनल कोर्सेस च्या बहुमुल्य जागा अडवून नंतर काहीही सबळ कारणाखेरिज घरी बसणार्या मुलींची मलाही फार चीड आहे. (यात फक्त प्रोफ. कोर्सेस जसे मेडिकल, इंजि, आर्किटेक्ट, सीए, एमबीए, फिल्म्स, फॅशन इ.इ. धरले आहेत) भारतासारख्या साधन्-संपत्त्तीचा प्रचंड अभाव असलेल्या देशात तुम्हाला विनासायास (अनेकदा अत्यंत कमी पैशात) संधी मिळाल्या म्हणून तुम्ही घेतल्या आणि आता त्या वाया घालवताय आणि वर त्यालाच "त्याग" वगैरे गोंडस नावे देताय्..व्व्वा!! याला म्हणतात हिप्पोक्रसी, ही मात्र आपल्याकडे अतिशय कॉमन आहे..
या मुलींनी ती जागा न अडवता जर दुसर्या गरजूने ती घेतली असती तर एक कुटुंब चालले असते.. आप्ल्या देशात तर प्रत्येक प्रोफेशनल कोर्स ला जाणाय्रा व्यक्तीला किमान काही काळ त्या क्षेत्रात काम करणे कंपल्सरी करायला पाहिजे (आर्मीसारखे) . आणि काम करत नसल्यास नंतर ती डिग्री टिकवण्यासाठी दर काही वर्षांनी रिनुअल चार्जेस/ परिक्षा ठेवाव्यात ( जसे प्रोफेशनल मेंबरशीप साठी करावे लागते). म्हणजे उगाच सीटा अडवणार्यांना जरा आळा बसेल.
अजुन एक जरा ज्वलंत पण सत्य असलेला मुद्दा हा की भारत सरकारने पैसा खर्च करून घडवलेला एक रिसोर्स जर अमेरिकेत घरकाम करण्यात आपला वेळ आणि शिक्षण वाया घालवत असेल तर ते नुकसान कुणाचे? वैय्क्तीक रित्या तर त्या रिसोर्स ला काहीच नुकसान नाही (कारण ती त्याची मर्जी), पण इथ्ल्या साधनसंपत्तीचा तर आहे ना? ( आता आप्ल्याकडे असे नुकसान सगळीकडेच होते, यांनीच काय घोडे मारले अस विचार केला तर प्रश्न्च मिटला)...

हे कुणीही वैयक्तीक रीत्या मनाला लाऊन घेऊ नये. पण सारासार विचार केल्यास तथ्य नाकारता येणार नाही.

अरे वा. खूपच मुद्देसूद विश्लेषण. हे खरच खूप वेळखाउ काम आहे. विश्लेषण चमूचे आभार आणि अभिनंदन.

एक फुल मला तुमचे विचार अतिशय एकांगी वाटले. आणि खर तर तथ्यहिनही.
शिक्षण हे काय फक्त नोकरी करण्यासाठी असते कि सुसंस्कृत व्हाव म्हणुन?
गव्हर्मेंट काही लोकांना फुकट शिकवीत नाही. शिक्षण जरी कितीही नाही म्हटल तरी सरकारच्या दृष्टीने व्यवहाराचा भाग आहे. तिथ उगाचच सिटा अडवल्या, साधन संपत्तीचा अपव्यय केला असा कारण नसताना भावनात्मक विचार करण्याची काय गरज?
बाई शिकली कि तिच कुटुंब शिकत. आणि कुटुंब शिकल कि देशाची उन्नती होणारच. हा साधा सरळ विचार.
तसा जर साधन संपत्त्तीचा अपव्यय म्हटला तर शिक्षण घेवुन इथे येवुन नोकर्‍या करणारे स्त्री/पुरुष मग देशा साठी काय करताहेत? काहीच नाही . नाही का? उगाच शिक्षण घेतल , आणि इथ घरकाम केल म्हणजेच देशाची साधन संपत्ती वाया गेली का?
नोकरी करण / न करण हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. देशाची प्रगती त्यावर अवलंबुन असेलच अस नाही. तस असत तर १९५० च्या पुर्वी जेव्हा स्त्रीया नोकरी करत नव्हत्या , तिथुनपासुन इथे पर्यंत आपण पोहोचलो नसतो.

छान विश्लेशण.

ते तिटकारा वगैरे टोकाचे मत कदाचीत वैतक्तीक अनुभवातुन आले असण्याची जास्त शक्यता वाटते. मुळात नोकरी करा वा नका करु तुमचे जग फक्त घरापुरते सिमीत राहिले तर कदाचीत स्वतःचा विकास खुंटु शकतो. नोकरीमुळे आपोआप घराबाहेरच्या जगाशी संपर्क येतो हा एक फायदा. बाकी आर्थिक स्वातंत्र्य व माणुस म्हणुन मिळणारे स्वातंत्र्य ह्यात फरक आहे पटले.

सिंड्रेला, फॉर्म भरुन मला तरी छान वाटले होते कारण आपली सर्व मते एका ठिकाणी एकाच वेळी, एकत्र नोंदवली जात होती म्हणुन, नाहीतर साधारणपणे सर्व मनातच असते आणि वागण्यात असते पण लिहुन असे दाखवले जात नसते कुठे.. त्या अर्थाने छान. ह्यात 'पठडीतले आयुष्य' वगैरे काही नाही (निदान माझेतरी).

चमु चे पुन्हा एकदा अभिनंदन व आभार.

एक फूल चं म्हणणं मला पटलं . माझ्या बॅचमधल्या आणि माझ्या काँटॅक्टमध्ये असलेल्या जवळपास ७५ % मुली ( डॉक्टर असून सुद्धा ) एकतर माझ्यासारख्या परदेशात किंवा भारतात असून सुद्धा मुलं सांभाळून प्रॅक्टिस करणं जमत नसलेल्या आहेत . Sad

<<नोकरी करा वा नका करु तुमचे जग फक्त घरापुरते सिमीत राहिले तर कदाचीत स्वतःचा विकास खुंटु शकतो. नोकरीमुळे आपोआप घराबाहेरच्या जगाशी संपर्क येतो हा एक फायदा. >>
एकदम पटले. मी सध्या मुलगी झाल्यापासुन घरुनच काम करते आहे. तेव्हा नोकरी करत असुनही , ( आधी करत होते तीच नोकरी , पगारही तेव्हढाच ) एकदम घरात बसुन आहे असे वाटतेय. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटल्यासारखेच झालेय. फक्त सध्या मुलगी लहान असल्याने घरुन काम छान वाटतेय.

सीमा, बस्के,
आपल्याकडे सरकारी कॉलेज मध्ये असणार्या फीज मध्ये अन खाजगी मध्ये असलेल्या फीज मध्ये फरक का असतो हे माहीत आहे ना? कारण सरकारी मध्ये सरकार तो खर्च करत असते (सरकारी उत्पन्नातून्)..मग त्यावर जर काही ROI मिळत नसेल, तर तो अपव्यय्च म्हणायचा.

सुसंस्कृत व्हावे म्हणून शिकणे जरूरी आहेच. पण त्यासाठी उदा. इंजिनीअरिंग करायची काय गरज?
ज्याला/जिला घर/बालसंगोपन/चित्रकला/बागकाम याची आवड आहे, त्यांनी त्या त्या क्षेत्रातले विशेष ज्ञान मिळवून ते वापरावे ना.. नाहीतर अनेक विषय आहेत की शिकायला.. ज्याला/ जिला आधीपासून च नोकरी/करीअर मध्ये रस नाही, त्यांनी अशा प्रोफेशनल कोर्सेस च्या सीटा अडवून दुसर्या गरजू व्यक्तीच्या (जी त्यातून उत्पन्न मिळवून घर चाल्वू शकते) संधी मारणे हे बरोबर नाहीच.
इथे फक्त नोकरी न करणे हा प्रश्न नसून तो resource abuse चा आहे, असे मला वाटते.
हाच नियम मी (उगाच मिरवण्यासाठी वा नक्की काय करायचे हे ठाऊक नसल्याने) इंजिनीअरिंग करून नंतर investment banking मध्ये काम करणार्या नि खोर्याने पैसा ओढणार्या एमबीए ला ही लावते. या व्यक्तीने इंजिनीअरिंग चे शिक्षण वायाच घालवले ना? कारण हे शिक्षण जोपर्यंत सतत कामातून upgrade केले जात नाही, गंज चढून ते बिनकामीच होते.

मी आधीही म्हटले आहे, वैयक्तीक रित्या मनाला लाऊन घेऊ नका. प्रश्न नोकरी न करण्याचा नाही. पण जर १८व्या वर्षी आपल्याला करीअर कशात करायचे आहे (homemaker हे ही फुल्-टाइम करीअरच आहे) हे कळत नसेल तर मग हा शिक्षण्/वेळ/पैसा/ शक्ती असा सगळ्याचा अपव्यय आहेच...

तुझ्या ह्या पोस्टमधला 'आधीपासूनच' रस नाही हे वाक्य जास्त महत्वाचे आहे, ते तुझ्या आधीच्या पोस्टमध्ये नव्हते.
अर्थात परत, इंजिनिअरिंग किंवा तू जे लिहीलेस त्या प्रोफेशनल शिक्षणात इंटरेस्ट असलेल्या पण करिअर करायचा मात्र आधीपासूनच रस नसलेल्या मुलींनी शिकायचेच नाही की काय असाही विचार आला.

शिवाय जसे सरकार पैसे भरते म्हणून आपण इथे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय, तसे वैयक्तिक पैसे खर्च करून खाजगी शिक्षणसंस्थेतून मनासारखे शिक्षण घेतल्यावर त्याचा विचार करू नये, असं समजायचे का?

असो..

नोकरी करणार्‍यांनी स्वतःला श्रेष्ठ/ अंहंगंड समजु/बाळगू नये आणि न करणार्‍यांनी कनिष्ठ / न्युनगंड. म्हणजे झालं! Happy

आणि हो सीमा,
भावनात्मक विचार नाहीये..अगदी प्रॅक्टीकल economics चा भाग आहे तो..
जिथे सरकार तुमच्यात "क्ष" गुंतवणूक करतं तिथे जर "क्ष" पेक्षा कमी returns अस्तील तर ती सरकार सठी तोट्याचीच गुंतवणुक नाही का? उद्या जर का सरकारने ठरवले की सरकारी कॉलेजात (प्रोफे. कोर्सेस हे ठळक करतेय दर वेळेला कारण त्यात गुंतवणूक जास्त आणि संधी हुकलेल्याला तोटा जास्त) शिकलेल्यानी कमीत कमी २ वर्षे काम करावे व देशाच्या उन्नतीला हातभार लावावा, तर गैर काय? जास्त इथे लिहित नाही, तो विषय नाही. समजून घ्यायची इच्छा असेल तर विपु त समजवू शकेन.

बस्के,
१. ज्याला/जिला रस आहे तो/ती करीअर का नाही करणार? अन समजा असे असेल तर distance learning/online learning हे पर्याय आहेतच की आजकाल्..किंवा मग अशा कॉलेजातुन करावे जेथे तुम्ही दुसर्या deserving व गरजुची संधी हुकवत नाही.
२. बरोबर. ५-७ लाख डोनेशन देऊन शिकलेल्यांनी काय वाटेल ते करावे (म्हणजे नोकरी किंवा भलताच व्यवसाय किंवा काहीच नाही) पण जनरली ते नाही ना करत? कारण त्यांना ते पैसे काढायचे असतात.

बाकी अहंगंड्/न्युनगंड असु नये हे खरेच..पण ते नोकरी वरून च नव्हे तर इतर कशावरूनही असु नयेत, नाही का?

एक फूल,
>> अजुन एक जरा ज्वलंत पण सत्य असलेला मुद्दा हा की भारत सरकारने पैसा खर्च करून घडवलेला एक रिसोर्स जर अमेरिकेत घरकाम करण्यात आपला वेळ आणि शिक्षण वाया घालवत असेल तर ते नुकसान कुणाचे?

मुळात भारत सरकारने पैसा खर्च करून घडवलेला एक रिसोर्स परदेशात गेला की त्याने/तिने काहीही केले किंवा नाही तरी भारत सरकारचे नुकसान झालेच की.

एक फुल यांचे मत काही प्रमाणात पटले तरीही
<<हाच नियम मी (उगाच मिरवण्यासाठी वा नक्की काय करायचे हे ठाऊक नसल्याने) इंजिनीअरिंग करून नंतर investment banking मध्ये काम करणार्या नि खोर्याने पैसा ओढणार्या एमबीए ला ही लावते. या व्यक्तीने इंजिनीअरिंग चे शिक्षण वायाच घालवले ना? >>
यामधे सध्या जी अनेक इंजिनीअरिंग कॉलेजेस निघाली आहेत आणि त्यात विविध शाखात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे बघता प्रत्येकाला त्याच्याच क्षेत्रात काम मिळणे ( मनाजोगे काम आणि मनाजोगा पैसा देणारे ) शक्य आहे का ? बहुतेक करुन सगळे आय टी कडे वळतात कारण तिथे इतर पांरंपारीक इंजिनीअरिंग क्षेत्रांपेक्षा भरपुर संधी , आणि लवकर मिळु शकेल असा भरपुर पैसा आहे.
याचप्रमाणे काही होमिओपाथी डॉ देखिल त्या क्षेत्रात प्रॅक्टीस न चालल्याने इतर वेगळीच ( मी पाहिलेले उदा. - मेडिकल ट्रान्सक्रीप्शन , औषधाचे दुकान चालविणे ) कामे करताना दिसतात.

त्यामुळे कोणतेही प्रोफेशनल शिक्षण घेतले असले तरी त्या क्षेत्रातील जॉब करायची, हवे तेव्हढे पैसे मिळवायची संधी न मिळाल्यास लोकांना अशी सन्धी जिथुन मिळु शकेल त्या क्षेत्राकडे वळावेच लागते. हे तात्विकदृष्ट्या चुकीचे वाटले तरी वैयक्तिक पातळीवर त्यात काही गैर आहे असे म्हणु शकत नाही.

सॉरी या बीबीचा हा विषय नाही तरी विषयांतर झाले म्हणुन क्षमस्व.

एक फुल आत्ता बाहेर चाललीय. पण मला तुमच्या पोस्टींना उत्तर द्यायची आहेत. कारण उत्तरं पटली नाहीत.
त्यामुळे होपफुलि बाहेरून आल्यावर मी रिप्लाय करीन..
मी मगाशी वाचले तेव्हा एक मुदा नव्हता तुझ्य पोस्टमध्ये, बहुतेक नम्टर अ‍ॅड झाला.. मी तोच लिहीणार होते. कित्येक इंजिनिअर्स मेकॅनिकल वगैरे नंतर व्यवसाय म्हणून आय्टीमध्ये घुसलेत. ते ही चुकीचे का? पण तो मुद्दा अ‍ॅड झाला नंतर.. असो..
लिहीते २ एक तासांनी

आणि हो सीमा,
भावनात्मक विचार नाहीये..अगदी प्रॅक्टीकल economics चा भाग आहे तो..
>>
माफ करा, मलासुद्धा हा भावनात्मक विचारच वाटतो. Economics वगैरे तर अजिबात पटले नाही. एवढंच सरकारला रिटर्न ऑन इन्वेस्ट्मेन्ट मिळवायचे असते तर त्यांनी नागरिकांच्या परदेशातील मिळकतीवर कर लावला असता. तसे न करता उलट डबल टॅक्सेशन होऊ नये म्हणून शक्य तितक्या देशांबरोबर टॅक्स ट्रीटी करतात. भारताचेही बर्‍याच देशांबरोबर टॅक्स ट्रीटी आहेत.

इथे येऊन काही न करणारे लोक हे भारत-सरकारने भारतात देऊ केलेल्या कोणत्याही सोयी, जसे रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा वगैरे, वापरत नाहीत. त्यावर न होणारा खर्च ही सरकारची मिळकतच आहे. तसेच इथे आलेले लोक खाद्यपदार्थांपासून ते कपड्यांपर्यंत भारतात तयार झालेल्या असंख्य गोष्टी वापरतात. त्यांच्या निर्यातीवर मिळणारा कर हे सरकारचे उत्पन्नच आहे. बरेच लोक भारतात पैसे पाठवतात. त्यामुळे देशाची परकीय गंगाजळी नक्कीच वाढते. अजूनही इन्डायरेक्ट बरेच मार्ग असतील. एवढे करुनही जर तोटा होत असेल तर तो गुडविल (किंवा देशाची प्रतिमा) म्हणून सहन करतही असतील. त्याचा विचार सरकार करेल.

म्हणून कोणी कोणती सीट घ्यावी किंवा घेऊ नये असा विचार करण्यापेक्षा सरळ आपल्याला ती सीट मिळविण्यासाठी काय करावे लागेल एवढा विचार केला तरी पुष्कळ आहे. आणि समजा एखाद्या मेकॅनिकल इंजिनियरने आयटीमध्ये नोकरी धरली, तर जी मेकॅनिकल इंजिनियरींगची नोकरी तो सोडतो आहे, ती दुसर्‍या एखाद्या आवड असणार्‍या मेकॅनिकल इंजिनिअरला मिळेल की.

एक फूल, तुमचे विचार मुळीच पटले नाहीत. फक्त नोकरी करण्यासाठीच प्रोफेशनल कोर्सेस शिकायचे हा कुठला न्याय? काय शिकायचे, काय नाही, नोकरी करणे, न करणे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा मुद्दा आहे. काही लोकं शिकण्यासाठीच शिकतात. कुठलंही शिक्षण कधी वाया जात नाही, नोकरी करा अथवा न करा. डॉक्टर असेल आणि नोकरी करत नसली तरीही तिच्या घरच्यांची आरोग्यं व्यवस्थित सांभाळेल. इंजिनीअर असेल तर तिचे स्किल्स घरात पण कामात आणेल.

<<पण जर १८व्या वर्षी आपल्याला करीअर कशात करायचे आहे (homemaker हे ही फुल्-टाइम करीअरच आहे) हे कळत नसेल तर मग हा शिक्षण्/वेळ/पैसा/ शक्ती असा सगळ्याचा अपव्यय आहेच...>> माणसाची आवड सतत बदलत असते. आज इंजिनीअरिंग आवडले तर उद्या मेडिकल आवडू शकते. आपल्या ऐपती प्रमाणे, आवडी प्रमाणे जो, तो शिकत असतो. त्यावर बंधनं कशाला?

ROI बद्दल म्हणायचे झाले तर कोणतही शिक्षण हे long-term investment आहे. आज नोकरी न करणारीला उद्या करायची वेळ आली तर हेच प्रोफेशनल शिक्षण कामी पडेल. कधीही गरज पडली तर आपल्या पायावर उभं रहायला सोपी पडेल. प्रोफेशनल कोर्सेस करण्यामागे बरेचदा हाच उद्देश असतो.

एक फुल इथे वैयक्तीक रित्या वगैरे घेण्याचा प्रश्नच नाही. किंबहुना मला तर अस वाटल कि केवळ तुम्हाला वैयक्तिक रित्या आलेल्या अनुभवावर तुम्ही हे सगळ लिहिताय.मी तुम्हाला मगाशी विचारलेला तो प्रश्नच परत विचारते.

>>>>उद्या जर का सरकारने ठरवले की सरकारी कॉलेजात (प्रोफे. कोर्सेस हे ठळक करतेय दर वेळेला कारण त्यात गुंतवणूक जास्त आणि संधी हुकलेल्याला तोटा जास्त) शिकलेल्यानी कमीत कमी २ वर्षे काम करावे व देशाच्या उन्नतीला हातभार लावावा, तर गैर काय? >>>>>>>
सरकारच्या पैशाने (तुमच्या मते. खर तर ते पैसे सरकारचे नाहीत. आपण टॅक्स भरतो त्यातले हे पैसे) शिकलेले लोक जर परदेशी राहुन जॉब करत असतील तर त्यांचा माय देशाच्या उन्नतीला कसा हातभार लागणार?

>>> ज्याला/ जिला आधीपासून च नोकरी/करीअर मध्ये रस नाही, त्यांनी अशा प्रोफेशनल कोर्सेस च्या सीटा अडवून दुसर्या गरजू व्यक्तीच्या (जी त्यातून उत्पन्न मिळवून घर चाल्वू शकते) संधी मारणे हे बरोबर नाहीच.>>>

कोणी सांगितल तुम्हाला कि नोकरी करण्यात रस नसुनही बाया शिक्षण घेतात? आज शिक्षण घेताना करियरसाठीच घेतल जात. निदान इंजिनियरिंग चे तरी.(खरतर ते तसच असाव असा अट्टाहास असावाच अस नाही. हा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न झाला परत.) पण पुढे जावुन , प्रायोरिटिज बदलतात. प्रत्येकाला हवी तशी संधी मिळेलच अस नाही. उगाच त्याला देशाच नुकसान केल वगैरे लेबल लावण व्यर्थ आहे.
आणि जे लोक इंजिनियरिंग करुनही इतर क्षेत्रात करिअर करतात , त्याना कुठल लेबल लावणार मग? मग तुमच्या मते त्यानीही सरकारचे पैसे वायाच घालविले की.
आणि अशा बायका ज्यानी ५/१० वर्ष नोकरी केली आणि मग मुलांसाठी किंवा स्वतःचे छंद जोपासावेत म्हणुन घरी रहाण पसंत केल असेल त्यांच काय?
आणि तुम्ही जे ज्यात आवड असेल तेच शिक्षण घ्याव अस म्हणताय ते कितपत व्यावहारीक आहे आपल्या देशात?

संपदा , ७५% बायका काही करत नाहीत त्या केवळ आळसामुळे काही करत नाहीत अस म्हणन धाडसाच ठरेल नाही का?असंख्य प्रॉब्लेम असतील त्यांचे.

मला वाटत नोकरी करणार्‍या / न करणार्‍या हा वाद बास झाला. ग्रूहीणीना त्यांच्या मनासारख without any guilt जगु द्या. निदान देशाची उन्नती त्यांच्यामुळ नक्कीच थांबली नाही एवढ मात्र नक्की.

असो. मला "तिटकारा वाटतो" अस लिहिणारी कमेंट आणि तुमच वरच लिखाण हे दोन्ही सारखच वाटल. त्यामुळ हे माझ इथल शेवटच पोस्ट.

>>>कोणी सांगितल तुम्हाला कि नोकरी करण्यात रस नसुनही बाया शिक्षण घेतात?

सर्वत्रीकरण नाहीच. पण माझ्याबरोबर शिकलेल्या माझ्या वर्गातल्या दोन मुलींचे असे मत होते की इंजिनियरिंगला या साठी यायचं की अमेरिकेतला नवरा मिळावा!! विनोद नाही. अगदी खरे.

असो, काही असले तरी त्यांचेही विचार स्पष्ट होते हेही महत्त्वाचंच आहे. Happy

<< पण माझ्याबरोबर शिकलेल्या माझ्या वर्गातल्या दोन मुलींचे असे मत होते की इंजिनियरिंगला या साठी यायचं की अमेरिकेतला नवरा मिळावा!! विनोद नाही. अगदी खरे >>
अशा मुली माझ्याही माहितीत आहेत. आणि त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नवरे देखिल मिळालेले आहेत Happy
काही मुलांचे पण असे अनुभव आहेत की बायको उच्चशिक्षित तर हवी पण तिने नोकरी करु नये. घर संभाळावे.

मला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नसलेल्या स्त्रिया आवडत नाहीत. नवर्‍याच्या जीवावर चैन करणार्‍या स्त्रिया ह्या माझ्या दृष्टीने कलंक आहेत. मला त्यांचा तीटकारा वाटतो.>>>> बापरे, एवढं टोकाचे विधान अन नोकरी न करणार्‍या बायकांना तुच्छ लेखणारे विचार!!!! जिचे असतील ती उच्चशिक्षित नी उच्चपदावर कार्यरत असावी असा अंदाज. (गर्वाचा नी अहंकाराचा वास येतोय पोस्टला) उच्चशिक्षण दुसर्‍याला कमी लेखणं शिकवतं का? काय उपयोग मग त्याचा?
स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलं तर उत्तमच. पण प्रत्येकीच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. हे विसरुन कसं चालेल? माझी मैत्रिण एमडी आहे. जपानमध्ये थोडीफार वॉलंटरी कामं केली हॉस्पिटलमध्ये पण पूर्ण वेळाची नोकरी मिळणं शक्य नव्हतं किंवा स्वतःची प्रॅक्टिसही सुरु करता येणं शक्य नव्हतं. मग दुसरं मूल झाल्यावर ते ऑटिस्टीक आहे हे लक्षात आलं. मग त्याच्या थेरपीमध्ये वेळ गेला नी त्याला जास्त लक्ष देण्याची गरज ओळखून स्वतःच करियर बॅकसीटवर. अशा केसमध्ये काय करावं? तिलाही तुच्छ लेखावं का? (हेच उदाहरण एक फूल यांनी मांडलेल्या मुद्द्यांनाही लागू होईल)

सायो,
पहिली गोष्ट म्हणजे मी कुणालाही तुच्छ लेखत नाहीये. दुसरी म्हणजे मी "सबळ कारणाशिवाय शिक्षण वाया घालवणर्यांविषयी" बोल्तेय. उदा. इंजिनीअर्/सीए वगैरे बनून एक दिवसही ते काम न करणर्या मुली किंवा मुलेही (जसा माझा एक इंजि मित्र जो वडीलोपर्जीत कपड्यांचा व्यवसाय करतोय) , केवळ अमेरिकेतला नवरा मिळावा म्हणून इंजिनीअर होणार्या मुली (ह्या तर असंख्य आहेत माझ्या पाहाण्यात्)...

अंबानी ने मिल्यन्स ऑफ डॉलर्स खर्च करून मुंबैत घर बांधले तर म्हणे त्याला morality नाही कारण भारतासार्क्या गरीब देशात ते बरोबर नाही. मग भारतासार्ख्या देशात जिथे पदवी पर्यंत शिक्षण मिळणे ही देखील मोठीच जहागिरी म्हणायची, तिथे ते वाया घालवणे कसे काय justifiable वाटते बुआ?

आणि ज्यांना आप्ल्या क्षेत्रात नोकरी/व्यवसाय्/संशोधन/teaching/voluntary work असले काहीही करण्यात रस/इच्छा/गरज नाही त्यांनी सरळ नॉन्-प्रोफेशनल कोर्सेस करावेत की..

जास्त वाद घालणार नाही. एकच छोटीशी कथा सांगते. निष्कर्ष आणी तात्पर्य प्रत्येकाने आपापले काढावेत.
एका वाळवंटात दोन यात्रेकरु प्रवास करत होते. दुपारच्या उन्हात दोघेही बिचारे होरपळून निघत होते. अधुमधुन असलेल्या छोट्या छोट्या मुक्कामावर पाण्याची सोय असण्याअची शक्यता होती. पाण्याचे इतके दुर्भिक्ष होते की जो आधी मुक्कामाला पोचेल, तो पहिले पाणी पिणार अन कमी असले तर संपवणार यात शंका नव्हती.
काही अंतरावर थोडीसे पाणी मिळेल अशा आशेने त्यापैकी एक भरभर पाय उचलत होता. दुसर्याकडे पाण्याची बाटली होती, पूर्ण नाही पण तरी बरीच भरलेली. अन ती त्याला वेळ आली तर कामी पडू शकणार होती. ही गोष्ट पहिल्याला माहिती नव्हती.
ज्याच्याकडे पाणी होते तो नेमका पहिले मुक्कामाला पोचला. क्षणभर विश्रांतीसठी थांबल्यावर त्याच्या लक्षात आले की तिथे ठेवलेल्या मडक्यात पाणी अगदीच थोडेसे आहे. दोघांचाही जीव काकुळतीला आलेला आणि अजुन बरेच अंतर चालायचे होते. ह्याने विचार केला की एवितेवी मीच आधी पोचलोय, त्यामुळे मी पाणी संपवले तरी पहिला काही बोलू शकणार नाही. आणि ह्याने घटाघटा पाणी संपवून टाकले आणि पुढ्च्या प्रवासाला लागला.
मागून आलेला तहानलेला प्रवासी मात्र पाण्याअभावी पुढ्चा प्रवास करु शकला नाही.

माझ्यापुरते तात्पर्यः ज्याला कुठ्ल्याही (विशिश्ट परिस्थीत) दुर्मिळ साधन्संपत्तीवर कुठ्ल्याही कारणाने हक्क मिळाला आहे, त्याने आप्ल्याला ते वापरून संपवण्याची खरंच किती गरज आहे हे तपासून बघण्याची त्याची moral responsibility आहे. "ज्याची त्याची मर्जी" ही गोष्ट प्रत्येकच ठिकाणी लागू होतेच असे नाही.

मला एक फूल ह्यांचे म्हणण्यातील काही अंश पटले. त्यांनचा भारतात शिकून अमेरिकेत बसून राहण्याचा जो मुद्दा मांडला आहे त्यात तिथे काम करणारे भारतात पैसे पाठवतात/भारतीय उद्योगास मदत करतात पण तिथे जाउन घरात बसले तर ह्यातली कोठलीच गोष्ट होत नाही असे म्हणायचे आहे. Indian Diasporaचा भारताला किती उपयोग होतो ह्यावर अनेक पेपर्स उपलब्ध आहेत (नुकतेच इकॉनॉमिक्स मध्ये उत्तम लेख आला होता ह्यावर). एक नक्की की भारतात शिकलेला/भारतीय माणुस परदेशात जाउन काही प्रमाणात का होईना भारतास मदत होतेच. दुसरे असे की तुम्ही माणसांची आवक-जावक रोखली तर दूरगामी परिणाम अधिक घातक असतात.

आता एक फूल ह्यांनी मांडलेला दुसरा मुद्दा असा की शिक्षण घेउनसुद्धा काम न करणे हा एक प्रकारचा resource abuse आहे. मुलांच्या संगोपनासाठी काही वर्ष (पती वा पत्नी कुणीही) घरी राहुन मुलांचे संगोपन करणे हे देखील ज्यांना शक्य आहे व आवश्यक वाटते ते योग्यच आहेत. पण म्हणुन शिक्षण झाल्यादिवसापासून केवळ लग्न करुन काहीच न करणे हे मला अयोग्य वाटते. आणि फक्त प्रोफेशनल शिक्षणच नव्हे तर शक्य त्या सर्वांनी (पुरुष-स्त्रीया) काम करावे.

त्यांचा अजून एक मुद्दा म्हणजे ज्या क्षेत्रातले शिक्षण घेतले त्याच क्षेत्रात काम करणे हा. तर हा मुद्दा चुकीचा वाटतो. कारण शिक्षण तुम्हाला एका पातळीवर आणून ठेवते. मग ते कुठल्याही क्षेत्रातले असो. त्यानंतर जिथे संधी आहे/ज्या क्षेत्रात प्रगती होत आहे तिथे उपलब्ध मनुष्यबळ जाणार व काम करणारच. हे नैसर्गिक संक्रमण आहे.

Pages