पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला वेगळंच वळण दिलं हे सर्वश्रुतच आहे. विष्णु दिगंबर आणि त्यांच्या गांधर्व महाविद्यालयानं अनेक गायक व शिक्षक तयार केले. त्यांपैकीच एक प्रो. बी. आर. देवधर. विष्णु दिगंबरांनी ज्यांना गायनाबरोबरच शालेय शिक्षणाचीही परवानगी दिली, असे देवधर हे एकमेव विद्यार्थी. कलाशाखेची पदवी मिळवलेले देवधर मास्तर हे त्या काळी एकमेव शिक्षित असे गायक होते. विष्णु दिगंबरांच्या परवानगीने त्यांनी पाश्चात्य शास्त्रीय संगीताचेही धडे गिरवले होते. पुढे देवधर मास्तरांनी स्वतःचं गायनविद्यालय सुरू केलं, व्हॉईस कल्चरचे अनेक प्रयोग पहिल्यांदाच भारतात केले आणि हिंदुस्थानी गायकीत स्वतंत्र स्थान मिळवलेले अनेक गायक तयार केले. त्यांपैकीच एक म्हणजे कुमार गंधर्व.
देवधर मास्तर हे कुमार गंधर्वांचे एकमेव गुरू होते. वयाच्या दहाव्या वर्षी कर्नाटकातल्या एका लहान गावातून कुमार मास्तरांकडे गाणं शिकायला मुंबईत आले, आणि अल्पावधीतच आपल्या गाण्यानं भल्याभल्यांना स्तिमित केलं. कुमार मुंबईत आले तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत कुमारांच्या सांगीतिक व खाजगी आयुष्याचे एक साक्षीदार होते डॉ. चंद्रशेखर तथा बाबुराव रेळे. बाबुराव हेसुद्धा देवधर मास्तरांचेच शिष्य. कुमार व बाबुराव यांचं बहुतेक सगळं शिक्षण एकत्रच झालं. बालवयात झालेली ही मैत्री पुढे आयुष्यभर टिकली. कुमार माझा सखा! हे या मैत्रीचं शब्दरूप आहे.
या कुमारांच्या आठवणी आहेत, पण त्याहीपलीकडे बाबुराव रेळ्यांची हिंदुस्थानी संगीताकडे, कुमारांच्या गायकीकडे, त्या काळातल्या सार्या टोलेजंग गायकांकडे, घराण्यांच्या परंपरांकडे, या परंपरांच्या मर्यादांकडे पाहण्याची एक स्वतंत्र, अभिजात आणि निर्भीड दृष्टी आहे. गाण्याचा व्यासंग, स्वतंत्र विचार आणि कुमार नावाच्या एका अफाट गायकाचा जीवनप्रवावाहे सारं या विचक्षण दृष्टीमुळं या पुस्तकात एकवटलं आहे.
डॉ. चंद्रशेखर रेळे लिखित कुमार माझा सखा! या पुस्तकातील ही काही पानं...
कुमार मुंबईत देवधर मास्तरांच्या गायनक्लासात आला कसा, हा एक किस्साच आहे. ते १९३४ साल होते. पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांचे इनेगिने शिष्य़ जमले होते कानपुरात. त्यांचा मुक्काम होता शंकरराव बोडस यांच्या घरी. सगळे अनेक दिवस राहण्याच्या तयारीनेच जमले होते. त्यातल्या बहुतेकांना कानपुरातल्या कॉन्फरन्सचे निमंत्रण होते. गाण्याच्या गप्पा, रियाज, आठवणींचे उलगडणारे खजिने असा सारा माहोल होता. पंडित विष्णु दिगंबरांचे शिष्य असणारे आमचे देवधर मास्तरही अर्थातच कानपुरात पोहोचले होते. फक्त त्यांना गायचे काहीच नव्हते. ते निव्वळ सर्वांची गाणी ऐकणार होते. देवधर मास्तरांनी आपले क्षेत्र विद्यादानापुरते मर्यादित ठेवल्याने त्यांनी मैफिली दूर ठेवल्या होत्या.
या कॉन्फरन्सचे निमंत्रण दूर कर्नाटकातून आलेल्या एका मुलालाही होते. तो आपल्या वडलांबरोबर कानपुरात दाखल झाला होता. त्याचे बिर्हाडही शंकरराव बोडसांच्याच घरी होते.
बोडसांच्या घरी जमलेली सारी गायकमंडळी या मुलाचे मनसोक्त कौतुक करत होती. हा मुलगा या कॉन्फरन्समध्ये सगळ्या मोठ्या गायकांच्या मांडीला मांडी लावून गाणे म्हणणार होता. मुंबईहून देवधर मास्तर आल्यानंतर शंकरराव बोडस त्यांना म्हणाले, ’देवधर, या मुलाचे गाणे ऐकाच. थक्क करणारे आहे ते. तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. विशेष म्हणजे तो नकला फारच सुंदर करतो.’
हे ऐकल्यावर प्रसन्न होण्याऐवजी उलट देवधर मास्तरांचा मूड खराबच झाला. काहीशा नाराजीनेच ते म्हणाले, ’अहो शंकरराव, अशी कित्येक मुले मी पाहिली आहेत. ही मुले थोडे दिवस लोकांपुढे चमकतात. त्यांचे नातलगच त्यांचे कोडकौतुक करत त्यांना लोकांपुढे आणतात, फिरवतात, त्यांच्या कलेवर पैसाही कमावतात. पण दुर्दैवाने ही मुले काळाच्या ओघात पार नाहीशी होतात. अगदी दिसेनाशी होतात. त्यांचे असे धूमकेतूसारखे काही काळ चमकणे आणि नंतर पार दिसेनासे होणे फार दु:खदायक असते, त्यामुळे या मुलाचे मी नाही कौतुक करणार, इतकेच काय, कॉन्फरन्समधले त्याचे गाणेही मी ऐकणार नाही.’
देवधर मास्तरांनी इतके पराकोटीचे प्रतिकूल बोलूनही शंकररावांवर त्याचा काडीचाही परिणाम झाला नाही. आपला आग्रह त्यांनी मुळीच सोडला नाही. उलट बोडसांच्या अंगणात खेळणार्या या मुलाचे गाणे जेव्हा कॉन्फरन्समध्ये होते, तेव्हा शंकरराव देवधर मास्तरांना अगदी हाताला धरूनच ते ऐकायला घेऊन गेले. शिवपुत्र नावाच्या या मुलाचे गाणे ऐकून मास्तर स्वाभाविकच खूष झाले. ते गाणेच तसे होते. पण तरीही गाणे संपल्यावर ते पुन्हा शंकररावांना म्हणाले, ’शंकरराव, हा मुलगा खरोखरच गुणी आहे. तुम्ही म्हणालात ते खरे होते. पण तरीही त्याचे हे गाणे ऐकून मी जितका खूष झालो आहे, तितकेच मला दु:खही होते आहे. अहो, हा मुलगा आज आहे अवघा दहा वर्षांचा. किती काळ तो असा मोठ्या गायकांच्या नकला करत फिरेल? मोठा झाल्यावर तो वाया नाही गेला म्हणजे मिळवली.’ मास्तरांच्या या बोलण्यावर शंकररावांकडेही त्या क्षणी काही उत्तर नव्हते.
कॉन्फरन्स संपली. देवधर मास्तर मुंबईला परतले. त्यांचे गायनाचे क्लास नेहमीसारखे सुरू झाले. पण त्यांच्याही मनातून तो दहा वर्षांचा मुलगा गेला नसावा. मुंबईत गाण्याची कॉन्फरन्स करणारी काही मंडळी त्यांच्याकडे आली, तेव्हा त्यांनी या मुलाचे नाव त्यांना सुचवले. हा दहा वर्षांचा मुलगा नामवंत गवयांच्या उत्तम नकला करतो. त्याचे गाणे जरूर करा. लोकांना ते आवडेल, अशी शिफारसही केली. झाले. देवधर मास्तरांचाच सल्ला तो. कॉन्फरन्सच्या आयोजकांनी रीतसर निमंत्रण पाठवले. कुमार, त्याच्या साथीदारांचा संच, कुमारचे वडील असे सारे मुंबईत आले. ते सारे बाडबिस्तरा घेऊन सरळ देवधर मास्तरांच्या गायनशाळेतच आले. गिरगावच्या बनाम हॉल लेनमध्ये. नंतर मुक्काम हलला तो देवधर मास्तरांच्या घरीच. ठरल्याप्रमाणे ही मुंबईतली मैफल झाली. ती होती जिना हॉलमध्ये. कुमारचे गाणे ऐकून गाण्याचे दर्दी खूषच झाले. त्याचे गायन तेव्हाच्या मुंबईकर रसिकांना फारच आवडले. कुमारवर कौतुकाचा वर्षाव झाला. काही चाहत्यांनी तर पडद्यावरच्या लाडक्या हिरोवर पैसे उधळावेत, तसे कुमारच्या दिशेने मंचावर पैसे उधळले. कुमारचा हा एका अर्थाने पहिल्याच पावलातला मुंबईविजय होता.
ही कॉन्फरन्स कुमारने गाजवल्यावर मात्र गावोगावी कुमारला नेऊन त्याचे गाणे करणारे वडील सिद्धरामय्या देवधर मास्तरांना म्हणाले, 'माझ्या मुलाला आता तुम्हीच गाणे शिकवा. त्याला संगीताची दीक्षा द्या. शिवपुत्रला तुमच्याकडे ठेवून घ्या'. देवधर मास्तर मात्र त्यांच्या या विनवणीकडे मुळीच लक्ष देईनात. शेवटी सिद्धरामय्या देवधर मास्तरांना म्हणाले, 'अहो आपण कुमारला गाणे शिकवावे, अशी खुद्द शंकरराव बोडस यांचीच इच्छा आहे. त्यांनी सुचवल्यामुळेच मी तुम्हांला आग्रह करतो आहे. माझी एवढी विनवणी तुम्ही ऐकाच. कुमारला गाणे शिकवण्यासाठी माझ्यापुढे दुसरा कोणताही गुरू नाही. आपणच त्याचे गुरू व्हा!’
सिद्धरामय्या यांची एवढी विनवणी ऐकून मास्तर विचारात पडले. कुमारचे गाणे तर त्यांनी ऐकलेच होते. मग त्यांनी कुमारला शिकवण्याचे कबूल केले. पण कुमारच्या वडलांपुढे सरळ तीन अटीच ठेवल्या. पहिली अट, कुमार मुंबईत माझ्याच घरी राहील. त्याचा मी मुलासारखा सांभाळ करीन. दुसरी, कुमारच्या वडलांनी इथे मुंबईत येऊन काही दिवस राहावे, त्याला भेटावे, पण वर्षातून फक्त एकदाच. तिसरी, कुमारच्या ज्या काही मैफली होतील, त्यातले काही उत्पन्न वडलांना वेळोवेळी पाठवले जाईल. मात्र याबाबत भविष्यात कोणताही वादविवाद उपस्थित होता कामा नये.
कुमारच्या वडलांनी ताबडतोब या सार्या अटी मान्य केल्या. आणि आपल्या मुलाला तिथेच देवधर मास्तरांच्या हवाली केले. अशा रीतीने शिवपुत्र म्हणजेच कुमार गंधर्व याचे रीतसर शिक्षण देवधर मास्तरांच्या म्युझिक स्कूलमध्ये सुरू झाले.
कुमार आला तेव्हा माझे शिक्षण चालूच होते. मी शिकत होतो हर्षे मास्तरांकडे. कुमार देवधर मास्तरांकडे शिकू लागला तेव्हा हर्षे मास्तर त्यांना एक दिवस म्हणाले, 'माझ्या वर्गातही एक लहान मुलगा सध्या येतो आहे. तो आहे कुमारच्याच वयाचा. त्याचेही गाणे तुम्ही एकदा ऐका'. हर्षे मास्तर हे सांगत होते तेव्हा माझी देवधर स्कूलच्या क्रमिक अभ्यासातली पहिली दोन पुस्तके पूरी झाली होती.
देवधर मास्तर त्याच दिवशी संध्याकाळी हर्षे मास्तरांच्या वर्गात आले. माझ्याकडे पाहत म्हणाले, 'बाळ, तू थोडा गा पाहू. मला तुझे गाणे ऐकायचे आहे'. त्याप्रमाणे मी त्यांना थोडे गाऊन दाखवले. मग हर्षे मास्तर आणि देवधर मास्तर यांचे काहीतरी बोलणे झाले. त्यानंतर देवधर मास्तर मला म्हणाले, 'तू उद्यापासून माझ्या वर्गात कुमारबरोबर बसत जा. मी शिकवेन तुम्हांला'. हे ऐकून मला खूप आनंद झाला.
त्यानंतर कुमारबरोबर माझे गाण्याचे शिक्षण देवधर मास्तरांच्या वर्गात नियमित सुरू झाले. क्लास असायचा आठवड्यातील तीन दिवस. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. वेळ सायंकाळी सहाची. एकदा सुरू झाला की आमचा क्लास सलग दीड तास चालायचा. देवधर मास्तर घेत असलेल्या या वर्गात कुमार आणि मी यांच्याशिवाय दोन मुली होत्या. एक होती शीला पंडित आणि दुसरी कांचनमाला शिरोडकर. दोघीही आमच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. विशीच्या घरात असाव्यात त्या.
गाण्याचे आमचे हे शिक्षण जगावेगळेच होते, असे म्हणावे लागेल. आम्ही सारे विद्यार्थी जमिनीवर जाजम किंवा चटईवर बसत नसू. आम्ही चक्क शाळेत वर्गातल्या बाकांवर बसत असू. या वर्गांमध्ये सकाळी भरे चंदावरकर शाळा. तेव्हा दरवेळी वर्गात मुलांसाठी ठेवलेली बाके दूर करून तिथे बसणे शक्यच नव्हते. त्यामुळे आम्ही त्या बाकांवर बसूनच गाणे शिकत असू. देवधर मास्तर शिक्षकांसाठी वर्गात ठेवलेल्या टेबलखुर्चीचा वापर करत. ते खुर्चीवर बसून तंबोरा मांडीवर आडवा ठेवत. शिकवताना तबल्याची साथ करायला म्हणून तेव्हा हर्डीकर नावाचा मुलगा येई. तो आमच्यापेक्षा वयाने थोडा मोठा. हा हर्डीकरही बाकावर बसूनच तबला वाजवे. असे आमचे गायनाचे शिक्षण उणीपुरी पाच वर्षे सलग चालू होते. आमच्या या वर्गात आम्ही चौघेच.
देवधर मास्तरांची शिकवण्याची पद्धत निराळी, शिस्तीची होती. त्यांनी एखादा राग शिकवायला घेतला म्हणजे ते प्रथम त्या रागाचे रागस्वर सांगत. हे रागस्वर ते आमच्याकडून गाऊन घ्यायचे. मग ते आम्ही आमच्या चोपडीत लिहून घेत असू. त्यानंतर मास्तर त्या रागाची बंदीश आम्हांला सांगत. आम्ही ती बंदीशही आमच्या वहीत लिहून घेत असू. बंदिशीची घोकंपट्टी पुन:पुन्हा होत राही. बंदिशीचे सारे शब्द स्वच्छ पाठ झाल्यानंतर ती स्वरबद्ध केलेली बंदीश सांगितली जात असे. मग या स्वरबद्ध बंदिशीची तबल्याबरोबर घोकंपट्टी होत असे. त्यानंतर मग त्या रागाचे गाणे सुरू होई.
गातानासुद्धा मास्तर आम्हांला स्वत: रागस्वर गाऊन दाखवायचे. संपूर्ण आवर्तन गाऊन, पूर्ण करून मास्तर समेवर येऊन थांबायचे. त्यानंतर आमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या विचाराने तसे रागस्वर आकारात गाऊन समेवर यायचे. असे गाण्यात कोणाची काही चूक झाली असेल, तर मास्तर ती चूक दुरुस्त करत. मास्तरांच्या या पद्धतीमुळे आम्हां सर्वांचाच फायदा होत असे. आमच्या शिकण्याला एक प्रकारची परिपूर्णता यामुळे येत असे.
असे गाण्याचे क्लास सुरू असताना मला आणि कुमारला कधी कधी दंगामस्ती करण्याची हुक्की येई. आमची वयेच तशी होती त्यावेळी. थोडा वेळ गाणे विसरून आमच्या अशा खोड्या चालू झाल्या की देवधर मास्तर आम्हांला दटावत, रागवत. आम्ही मस्ती केली, तरी आमच्या मनांत मास्तरांबद्दल धाक असे. पण देवधर मास्तरांचे आम्हां चारही शिष्यांवर मनापासून प्रेम होते. आमच्या दंग्यामुळे येणारे अपवाद वगळता आमची सगळी तालीम फार खेळीमेळीच्या वातावरणात चालत असे. आमच्या संगीतशिक्षणाचा सारा पाया इथेच घडला, यात काहीच शंका नाही. आणि त्याचे सारे श्रेय देवधर मास्तरांचेच होते.
याच काळात आमचे ख्याल गायनाचे शिक्षण सुरू झाले. मास्तरांनी आम्हांला सर्व तालांमधून आणि सर्व रागांमधून ख्याल सांगायला सुरूवात केली. यात तर आम्ही अगदी रमून गेलो. हे सारे शिक्षणच अपूर्व होते. एकदा मास्तरांनी आम्हांला राग जौनपुरीमधला बाजे झनन झननन बाजे हा ख्याल झुमरु या तबल्याच्या ठेक्यात शिकवला. आम्हांला तो शिकवताना मास्तर माझ्याकडे पाहत म्हणाले, तुला मी अलाहाबादला घेऊन जाणार आहे. तेथे कॉम्पिटिशन्स आहेत. त्यांत पंधरा वर्षांच्या आतल्या मुलांच्या गटात तू भाग घ्यायचा आहेस.
मग त्यांनी माझ्याकडून हा ख्याल चांगला समजावून पाठ करुन घेतला. त्यानंतर त्यांनी कुमारला एक काम दिले. मास्तर म्हणाले, कुमार, तू रेळेकडून हा ख्याल चांगला शंभर वेळा तालावर म्हणून घे. शंभरवेळा तालीम केल्याशिवाय तुम्ही दोघेही हलायचे नाही. आम्हांला दोघांनाही काम देऊन मास्तर निघून गेले. मास्तरांच्या आदेशाप्रमाणे कुमार मला घेऊन एका वर्गात बसला. मी त्याच्यासमोर बसून ख्याल म्हणायला सुरुवात केली. माझे वीस -पंचवीस वेळा म्हणून होते ना होते तोच कुमारच कंटाळला. मला म्हणाला, पुरे कर आता, तू बरोबर म्हणतो आहेस. शंभर वेळा म्हणायची काही गरज नाही, चल जाऊ. आम्ही संगनमताने मास्तरांचा आदेश असा धाब्यावर बसवल्याचे कुणालाच समजले नाही.
झाले, कॉम्पिटिशनची कॉन्फरन्स जवळ आली. देवधर मास्तर, त्यांच्या पत्नी, मी आणि कुमार असे चौघे रेल्वेगाडीत बसलो. अलाहाबादला पोहोचलो. तेथे आम्ही उतरलो विष्णुपंत कशाळकर यांच्या घरी. विष्णुपंत आमच्या मास्तरांचे गुरूबंधू होते. ते विष्णु दिगंबर पलुस्करांचे ज्येष्ठ शिष्य होते. आम्ही दोघे मुले त्यांना फारच आवडलो. आमचे त्यांनी मनमुराद कौतुक केले.
गायनाच्या चढाओढी सुरू होणार होत्या दुसर्याच दिवशी सायंकाळी. त्यामुळे मास्तरांनी बजावले, आज कुठेही जाऊ नका. घरातच थांबा. परंतु कुमारच्या मनात वेगळेच बेत शिजत होते. त्याला अलाहाबाद शहरात एक फेरफटका मारायचा होता. मास्तरांची पाठ वळताच कुमार मला बरोबर घेऊन विष्णुपंतांच्या घरुन सटकला. आम्ही गावभर मस्त भटकून आलो. घरी आलो तो आमच्या स्वागताला देवधर मास्तर हजरच होते.
त्यांनी मग आमची चांगलीच कानउघाडणी केली. मास्तरांचा तो अवतार व राग पाहून मीही फार भेदरून गेलो. आत कळते की मास्तरांचा राग बरोबरच होता. स्पर्धेच्या आदल्या दिवशी काहीतरी खाऊनपिऊन आवाज बसला असता किंवा मी आजारी पडलो असतो, तर सार्याच प्रयत्नांवर पाणी फिरले असते. सुदैवाने त्यावेळी तसे काही झाले नाही.
दुसर्या दिवशी एकेक स्पर्धक गाऊ लागला. चढाओढीत यथावकाश माझीही गाण्याची पाळी आली. त्यावेळी तबल्यावर होता बंडू जोग. पुढे अनेक वर्षांनी बंडूने व्हायोलिनवादक म्हणून नाव कमावले. सारा देश त्याला पंडित व्ही. जी. जोग म्हणून ओळखू लागला. स्पर्धेत मी साजे यमन हा ख्याल उत्तम भरला. पण मला आलाप करण्यास वेळच मिळाला नाही. कारण मी आलापी करणार, तेवढ्यात प्रत्येक स्पर्धकाला दिलेली वेळच संपली. मी खूप उदास झालो. काहीसा नाउमेदही झालो. पण मास्तरांनी माझी समजूत घातली. प्रत्यक्षात स्पर्धेचा निकाल लागला, तेव्हा मीच त्यात पहिला आलो होतो...
अलाहाबादशी आमचे काहीतरी नाते जुळलेले असणार, कारण पुढे १९३८ मध्ये आम्ही पुन्हा अलाहाबाद कॉन्फरन्सला गेलो, तेव्हा तर कहरच झाला. कुमार होता तेव्हा अवघा चौदा वर्षांचा. त्याला कॉन्फरन्सचा गायक म्हणूनच निमंत्रण होते. संयोजकांनी कुमारला दोन बैठकी दिल्या होत्या. पहिले गाणे सकाळचे आणि दुसरे गाणे रात्रीचे. कॉन्फरन्स सुरू झाली. कुमारच्या सकाळच्या गाण्याची तयारी सुरू होती. बंडू जोग, कुमार आणि स्वतः देवधर मास्तर तानपुरे जुळवत बसले होते. तेवढ्यात तिकडून खाँसाहेब तिरखवाँ आले. कुमारला उद्देशून ते म्हणाले, मैं बैठू तेरे साथ? हा प्रश्न ऐकताच कुमारने फक्त आदराने देवधर मास्तरांकडे बोट दाखवले.
खॉसाहेबांनी मग देवधर मास्तरांना तोच प्रश्न केला, आज कुमार के साथ मैं तबले पे बैठू क्या? देवधर मास्तर हसतच म्हणाले, हां, हां, बडे शौकसे | मग दस्तुरखुद्द खाँसाहेब तिरखवाँ कुमारच्या साथीला बसले. कुमारचे हे सकाळचे गाणे झाले चांगले, पण विशेष रंगले मात्र नाही. त्याच रात्री कुमार पुन्हा गाणार होता. तेव्हा गंमतच झाली. कुमार मला म्हणाला, बाबू, मला तुझी शेरवानी दे. कारण कुमारच्या शेरवानीवर पानाचे डाग पडले होते. तेवढ्या वेळात ते काढणे शक्यही नव्हते.
माझी शेरवानी पहनून कुमार रात्री गायला बसला. या रात्रीच्या गाण्याला त्याच्या साथीला तबल्यावर होते कोलकत्याचे नामांकित तबलानवाझ करामत उल्लाखान. तेही स्वखुशीने कुमारला साथ करण्यासाठी बसले होते. गाणे सुरु झाले आणि असे अफलातून रंगले की सर्वजण स्तब्ध होऊन त्यात रमून गेले. तेवढ्यात कॉन्फरन्सचे मुख्याधिकारी असणारे व्हाईस चॅन्सलर भट्टाचार्य यांच्या टेबलावरची छोटी घंटी टुणकन वाजली. त्याबरोबर कुमार गाता गाताच उठला. त्याने आपली टोपी डोक्यावर ठेवली आणि तो शांतपणे आतमध्ये निघून गेला.
त्या क्षणी सारे श्रोते कमालीचे हळहळले. कुमारचे अतोनात रंगलेले गाणे असे अचानक थांबावे, याचे सर्वांनाच विलक्षण दु:ख झाले. हे असे कसे झाले, असे सगळे एकमेकांना विचारत असतानाच भट्टाचार्य धावतच आतमध्ये गेले आणि देवधर मास्तरांना कळवळून सांगू लागले, 'अहो, माझा हात अगदी चुकून त्या घंटीवर पडला आणि ती वाजली. इतके रंगात आलेले गाणे मी थांबवीन कसा आणि घंटी तरी वाजवीन कसा? मी तर म्हणत होतो की, कुमारसारख्या गुणी मुलाने हवा तितका वेळ गावे. त्याला आपण वेळेची कोणतीच मर्यादा घालायला नको'. भट्टाचार्य यांचे हे बोलणे ऐकून देवधर मास्तर हसू लागले. त्यांनीच मग भट्टाचार्य यांचे सांत्वन केले. पण भट्टाचार्य यांचे मन त्यांना खात राहिले. ते तेथून उठले आणि थेट लाउडस्पीकरपाशी गेले. त्यांनी त्यांच्या हातून झालेले चूक सर्वांच्या कानी घातली आणि इतके रंगात आलेले गाणे थांबवून श्रोत्यांचा रसभंग केल्याबद्दल सर्वांची क्षमा मागितली.
कुमारने गाजवलेल्या या १९३८ मधल्या अलाहाबाद कॉन्फरन्समधील दोन मैफली मी आणि कुमार यांच्या कायमच्या लक्षात राहिल्या. पहिली मैफल खाँसाहेब बिस्मिल्लाखाँ यांची. त्यांचे सनईवादन फारच बहारीचे झाले. दुसरी खाँसाहेब फैयाजखाँ यांच्या गाण्याची. फैयाजखाँसाहेब सर्वांत शेवटी गायला बसणार होते. ती वेळ आली पहाटे पाचला. त्यानंतर खाँसाहेब दोन तास तब्येतीने गायले. सकाळी सात वाजेपर्यंत खाँसाहेबांची ती मैफल चालली होती. आपल्याला फैयाजखाँसाहेबांचे गाणे ऐकायचेच या एकाच उद्देशाने मी व कुमार त्या दिवशी रात्रभर जागलो. खाँसाहेबांनी श्रोत्यांना त्या सकाळी अक्षरश: तृप्त केले. मी व कुमार तर त्यांच्या देदीप्यमान गाण्याने चकितच झालो. इतकेच नाही तर त्या क्षणापासून मी व कुमार फैयाजखाँसाहेबांचे निस्सीम चाहते बनलो, ते थेट खाँसाहेबांनी देह ठेवेपर्यंत.
******
कुमार माझा सखा!
डॉ. चंद्रशेखर रेळे
शब्दांकन - श्री. सारंग दर्शने
पृष्ठसंख्या - १५२
किंमत - रुपये १५०
राजहंस प्रकाशन
******
हे पुस्तक मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/Kumar-Maza-Sakha.html
खूप खूप धन्यवाद चिनूक्स !
खूप खूप धन्यवाद चिनूक्स ! वाचायलाच हवे असे पुस्तक आहे हे माझ्यासाठी.
सुनीता देशपांडे ह्यांनी 'सोयरेसकळ' ह्या पुस्तकात लिहिलेला कुमारांवरचा लेखही खासच आहे. ज्यांनी वाचला नसेल त्यांनी जरुर वाचावा.
छान आता वाचनालयातून हे
छान
आता वाचनालयातून हे पुस्तक आणून वाचणार
अरे वा! वाचलंच पाहीजे.
अरे वा! वाचलंच पाहीजे.
नक्की वाचणार पुमग्रं मधुन
नक्की वाचणार पुमग्रं मधुन आजच आणेन
नेहमीप्रमाणे छान पुस्तक ओळख
नेहमीप्रमाणे छान पुस्तक ओळख चिनुक्स! वाचलेच पाहीजे च्या यादीत टाकले आहे.
चिन्मय थॅन्क्स. सवडीने वाचेन.
चिन्मय थॅन्क्स. सवडीने वाचेन.
छान वाटले पुस्तकाचा हा भाग
छान वाटले पुस्तकाचा हा भाग वाचून..
धन्यवाद, चिन्मय..
दस्तुरखुद्द खाँसाहेब तिरखवाँ >> म्हणजे कोण? उस्ताद अहमदजान थिरकवाँ का?
ते 'थिरकवाँ' आहे ना?
फचिन, मूळ उच्चार तपासून
फचिन,
मूळ उच्चार तपासून पाहायला हवा. मी तिरखवाँ व थिरकवाँ असं दोन्ही वाचलं आहे.
या पुस्तकात तिरखवाँ असं आहे.
उत्तम नेहमी प्रमाणेच.
उत्तम नेहमी प्रमाणेच.
हे पुस्तक मायबोली खरेदी
हे पुस्तक मायबोली खरेदी विभागात आता उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/Kumar-Maza-Sakha.html
अरे वा छानच.. वाचायला पाहिजे
अरे वा छानच.. वाचायला पाहिजे आता हे पुस्तक..
धन्यवाद चिनूक्स, नक्की वाचणार
धन्यवाद चिनूक्स, नक्की वाचणार पुस्तक
अरे वा ! धन्यवाद चिनूक्स !
अरे वा ! धन्यवाद चिनूक्स !
वा... सुरेख!
वा... सुरेख!
मुंबईत कुठे मिळू शकेल हे
मुंबईत कुठे मिळू शकेल हे पुस्तक?
चिनुक्स या सुरेख लेखाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !
चिनूक्स, धन्यवाद!
चिनूक्स, धन्यवाद!