कलासंपन्न बेटः बालि

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

हे काही प्रवास वर्णन नाही. मला जर कुणी विचारलं की आम्ही बालिमधे जाऊन काय काय पहायला हवं? तर मला तिथल्या पर्यटक स्थळांची नावं आता आठवणार नाहीत. जसं काही कालावधीनंतर बरणीत मुरलेलं लोणचं संपून तळात फक्त मोहरीचा गाळं उरतो तसचं काहीतरी माझ्या मनात बालिविषयी आज उरलं आहे.

मनाच्या तळात साठलेल्या ह्या गाळात मग काय काय झिरपलेलं आहे...संधीप्रकाशातले तिथले रस्ते; दोन्ही बाजूंनी कचणारच्या फुलांनी सुशोभित झालेले. आठवलेत की मन उगाचं भावूक होतं. काळोखात चाचपडत वाटचाल करताना अंगाला जाणवलेला झुकलेल्या जास्वंदाच्या फुलांचा...फांद्यांचा स्पर्श. नाहणीघरात, शेजघरात, ओसरीत, उंबरठ्यावर, कट्ट्यावर, शौच्यालयात देखील... सुपात ठेवलेल्या हिरव्या चाफ्याचा मादक गंध. कित्येक दिवस तो गंध कपड्यांना चिकटलेला होता. धुवायला आलेले कपडे तसेच जपून ठेवावेत असे वाटले होते. प्रभातवेळी भातशेताचा वाहत येणारा वारा बिलगता विसावल्यासारखं वाटायचं. कोवळ्या उन्हात सोनसळी झालेली भाताची पातं पाहून वाटे हा पुर्वरंग पालटूच नये. समईच्या प्रकाशात बालि स्त्रि-पुरुषांचे, कळले नाहीत पण कुणीही ज्यांच्या प्रेमात पडावं, असे नाच. धवलशुभ्र चाफ्याच्या फुलांनी सौज्वळ शृंगारीत झालेल्या नाचणार्‍या स्त्रिया. गावकुसाबाहेर झोपडं उभारून वेगवेगळ्या प्रकारचं विणकाम करण्यात तल्लीन झालेले स्त्री-पुरुष. दिवस सरून काळोख ओघळायला लागला की सर्व कामकाज बाजूला सारून कलेची आराधना करण्यासाठी एकत्रीत जमलेला तिथला जनमानस. सगळच कसं अगदी काळाच्या खूप माग गेल्यासारखं वाटायला लावणारं.

पुणं जसं महाराष्ट्राचं संस्कृतीसंपन्न शहर आहे, तसं बालीचं 'उबुद'. नव्हे त्याहीपेक्षा कैक अधिक पटीने आपली ओळख जपून असलेलं शहर! आपली हिन्दू संस्कृती नक्की भारतातली आहे ती की इथे उबुद मधे अनुभवत आहोत ती असा संभ्रम निर्माण करणारं हे एक शहर. गणपतीच्या अगडबंब मुर्ती रस्ते सुशोभित करण्यासाठी चौकात दिसतात. 'बातूबुलान' नावाची तिथे एक निमुळती बोळ आहे, जिथे ज्वालामुखीच्या सच्छिद्र काळ्याभोर पाषाणातून घडवलेल्या गणपतीच्या-शकरांच्या मुर्ती विकायला ठेवलेल्या असतात. मुर्ती विकत घेणारे अल्पच पण मुर्ती बनवन्याचे काम मात्र कधीच खंडीत न पडणारे. ओळीने लावून ठेवलेल्या त्या गणेशाच्या मुर्ती पाहून आपण तिथं आगंतूक आहोत ही कल्पना देखील करवत नाही. भारतापासून इतक्या दूर आणि वेगळ्या देशात आपल्याला आपली संस्कृती भेटली की मन अभिमानान उचांवतं. घरापुढे रांगोळी काढून त्यावर हिरव्या चाफ्याचं सुपडं ठेवून पुजापाती करणार्‍या स्त्रिया. कुठलाही नाच सुरू होण्याआधी पंडीत आधी अर्धातास कलादेवतेची पुजा करतो आणि मग नाच सुरू होतो. नाच सुरू व्हायला प्रेक्षक हवेतचं असे नाही. मंडपात कुणी असो वा नसो, एका पाठोपाठ एक नर्तक येतात आणि आपले मुरके-पदन्यास घेऊन जातात. समईच्या प्रकाशात उजळलेल्या त्यांचा चेहरा आणि भिंतीवर नाचणार्‍या त्यांच्या कमनीय छाया. बहुतेक नृत्य देवळात किंवा जुन्या राजवाड्यातच होतात. काही नाच चंद्राच्या कलेनुसार ठरवण्यात येतात. जसे की प्रथमेची कोर असेल तर काही खास नृत्यप्रकार असतो. पूनवेला जो होतो तो आणि वेगळा. ऐरवी वेगळे नृत्यप्रकार. भारतीय हिन्दु संस्कृतीची कुठेही नक्कल वा झाक दिसत नाही. ती त्यांना नकोही असते आणि ठावूकही नसते. जी तिथे आहे तिच खरी हिन्दु संस्कृती अशी त्यांची ठाम विचारधारणा. बहुतेक नृत्य हे रामायण आणि महाभारत ह्यांच्या प्रसंगावर आधारलेले असतातं. पण आपल्याला जे रामायण आणि महाभारत माहितं आहे त्याच्यापेक्षा जरा वेगळच रामायण-महाभारत त्यांच असतं. कदाचित आपल्याला ती एक भेसळ वाटेल पण त्यांच्या मनात मात्र यत्किंचितही न्यूनगंड नसतो. खूप दीर्घकाळ चालणारं केचक' नृत्य हे खर माकडांच ''चक्-चक केचक' असा आवाज काढून केलेलं नृत्य. पुलंनी या नृत्याच पुर्वरंग मधे अत्यंत बारकाव्यासकट वर्णन केललं आहे. आजही त्यांनी रेखाटल्या नृत्यात आणि आज बघावयाच मिळणार्‍या नृत्यात काडीचाही फरक जाणवत नाही. सगळीच नृत्य अबोल पण भावसंपन्न. ती समजून पाहणं किंवा तसा प्रयास करणही कठिण. ती समजून पाहता पाहता आपण फक्त नाचणार्‍याचे चेहरे, त्यावरील भाव, त्यांची वस्त्र, फुलांचे दागिणे पाहण्यातच गढून जातो.

महोगमी, सागवान, क्रोकोडाईल वूड, रोझ वूड अशा अनेक प्रकारच्या लाकडावर कोरीव काम करून मुर्ती निर्माण करणे ही बाली मधली आणखी एक कला. जी तिथे कुठेही पहायला मिळेल. खेरीज तैलचित्र. तिथल्या अगदी शाळाकरी मुलांना देखील अवगत असलेली कला.

कुठले तरी सरोवर पाहण्याच्या निमित्ताने खूप उंच शिखरावर मी पोचलो आणि तिथे बालिचा एक वेगळाच नकाशा पहायला मिळाला. संपूर्ण बालित अनेक सरोवर आहेत आणि अनेक उंच उंच शिखर आहेत. त्या नकाशाखाली एक परिच्छेद लिहिला होता. "आमच्या या नगरात कलेला अत्यंत महत्त्व आहे. सर्वसाधारण येथील प्रत्येक स्त्रीपुरुषाला समाजजीवन जगता यावे म्हणून कुठल्यानाकुठल्या कलेत पारंगत रहायला हवं. त्या कलेच्या निमित्त्ताने इथली जनता चार लोकांशी एकत्रीत येऊन परस्परांचे समाजजीवन समृद्ध करण्यास समर्थ होते. असे जर कुणी केले नाहीतर बालि समाज त्याला न्याय्-सन्मान्-प्रेम ह्या सर्वांनपासून परावृत्त करतो." सर्वात शेवटच्या दिवशी मी जेंव्हा हे वाचले तेंव्हा मला ते पटायला लागलं. कारण काळोख होताच तिथली जनता एकत्र येऊन नाच बघण्यात-करण्यात दंग होते. दिवसाला लाकडावरचे कोरीव काम, तैलचित्र, विणकाम, मुर्ती बनवने ह्यात रममान असतात. कलेशी मैत्री साधून समानजीवन जगण्याचा हा किती सुंदर मार्ग आहे! बालित अनेक पर्यटक देशादेशातून येतात. असे असूनही तिथले जग निरागस आहे आणि तिथली संस्कृती निर्भेळ आनंद देणारी वाटली.

-- बी

विषय: 
प्रकार: 

छान लिहिलय.

<<जसं काही कालावधीनंतर बरणीत मुरलेलं लोणचं संपून तळात फक्त मोहरीचा गाळं उरतो तसचं काहीतरी माझ्या मनात बालिविषयी आज उरलं आहे >>
अप्रतिम उपमा !!!

सुंदर लेख. फार हळुवार पणे बालिच वैशिष्ट्य टिपलय.

सुंदर वर्णन केलं आहे. खरंच फोटो असते तर अजून छान वाटलं असतं... Happy

छान लिहीलंयस बी. अजून थोडं मोठं चाललं असतं की.

खुप छान बी. तुझी अनुभुती पोचली आमच्यापर्यंत... अगदी सही न् सही..

छोटासा पण छान लेख!
फोटोनी आणखी सजला असता!

हल्लीच मी पु ल. चे अपुर्वाई (हे कसे लिहितात) त्याच्यात पण एकदम सेम बालीचे वर्णन आहे. त्याचे आठवण झाली.
बी फोटोशीवाय मजा नाही.

छानच लिहिलंय! बालीची हिरवीकंच पाचूची बेटं तिथली आगळी वेगळी हिंदू संस्कृती आम्हालाही खूप भावली पण तुझ्यासारखी शब्दात पकडता नाही आली.
फोटो टाकलेस तर मस्तच!

बी, सहीच लिहिलयंस!
विदर्भाच्या मराठीला एक भलताच गोडवा आहे.. इतकी प्रेमळ भाषा खूप कमी ऐकू येते आजकाल.. ती अजून वापर ना तुझ्या लेखांमध्ये.. मस्त होतील तुझे लेख..

बी ...
खूपच सुरेख लिहिलयस ... हिरवा चाफा असेल तर आपण जगात कुठेही प्रवास करायला तयार आहोत Happy
मुख्य म्हणजे तू प्रवासवर्णन न लिहिता अनुभवलेला आनंद सांगितलायस तो खूप आवडला.

छान रे. शुद्ध लिहल्यास अजून छान होईल.

अरे वा! छानच लिहिलं आहेस! बाली चा सुगंध घेतल्यासारखं वाटलं अगदी.

छान रे. आवडलं.

    ***
    We must not avoid pleasures, but we must select them. - Epicurus