धाकोबा आणि दुर्ग

Submitted by जीएस on 30 December, 2009 - 06:51

१९ डिसेंबरला, जवळ जवळ वीस वर्षांनी भेटलेल्या आमच्या शाळेच्या, पार्ले टिळकच्या सोबत्यांना घेउन गोरखगडाला गेलो होतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेसमोर कोकणात मुरबाडजवळ तुलनेने छोटासा गोरखगड उभा आहे. त्यावर उभे राहून, सह्याद्रीच्या भिंतीचे, एकामागून एक को़कणात सरळ कोसळणार्‍या कड्यांचे दृष्य पहात बसणे हा एक भान हरपायला लावणारा उद्योग आहे.

उजवीकडे सिद्धगड, त्याच्या मागे भीमाशंकर, समोरचा दमदम्या, बाजुला आहुपे गावाकडे वर जाणारी घाटवाट, त्याही बाजुला दुर्ग, अजून पलिकडे, जीवधन, नानाचा अंगठा अशी सगळी ओळखपरेड सुरू असतांनाच, या सर्व उत्तुंग भिंतींवरूनही डोके वर काढून आकाशात घुसलेले एक रूंद शिखर दिसते. 'हा धाकोबा, पुणे जिल्ह्यातले आणि या सर्व परिसरातलेही सर्वात उंच शिखर' असे कोणाच्या तरी प्रश्नाचे उत्तर देतांना आठवते की करायचा करायचा म्हणत धाकोबा आणि दुर्ग राहुनच गेला आहे, आणि गोरखगडावरून परत फिरलो ते मनात धाकोबाला जायचे बेत आखतच.

शनिवार, २६ डिसेंबरला पहाटे साडेपाचला केशवसुमार, धुमकेतू, कल्याण, आरती आणि मी असे पाच जण पुण्याहून निघालो. पुणे नाशिक महामार्गाने नारायणगावला पोहोचलो तोवर उजाडले नव्हते, पुढे जुन्नरला गेलो, तिकडे एका हॉटेलात पोटपूजा, गाडीचे पंक्चर काढणे, आणायचे राहिलेल्या काही सामानाची खरेदी असे पार पडले. प्लेट आणायला विसरलो असे लक्षात आले, तर हॉटेलवाल्याने चक्क त्याच्या पाच प्लेट दिल्या, परत येतांना परत करण्याच्या बोलीवर.

जुन्नरवरुन आपटाळ्याला जाणारा रस्ता पकडला, हा शिवनेरी, हा चावंड, जायचे का पुन्हा बालेकिल्ल्यावर अशी सलगी दाखवत प्रवास सुरु, रस्ता तसा बरा आहे, मात्र मध्ये मध्ये दोन तीन खराब पॅच आहेत. जीवधन, इंगळूण हे फाटे सोडत शेवटी आंबोली या जेमतेम दहा घरांच्या वस्तीला पोहोचलो. रस्ता तिथेच संपला, समोर लगेच डोंगर सुरू. गावही तिन्ही बाजूंनी अक्राळ विक्राळ पहाडांनी वेढलेले. एकदम पाचनई या हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याच्या गावाची आठवण यावी तसे. गाव जवळ येण्यापूर्वी गावाच्या मागच्या पहडाच्या मागे उंचावलेला धाकोबा दिसत होता, पण गावात आल्यावर त्या पहाडानेच सगळे व्यापून टाकले.

गावात शेवटच्या घरासमोर गाडी लावली, दहा वाजता चढाईला सुरूवात. लक्ष्मण नामक एक वाटाड्या घेतला होता धाकोबाच्या देवळापर्यंत वाट दाखवण्यासाठी. दहाच मिनिटात एक ओढा ओलांडून बाजूचा डोंगर चढू लागलो, उंचावर एक प्रचंड धबधबा दिसत होता, पावसाळ्यात तो वाहता असतांना फार सुंदर दिसत असेल. थोड्याच वेळात तो धबधबा ओलांडला, आणि एका विशाल गुहेपाशी आलो, गुहा पहायची तर वाटेपासून थोडे दूर जाऊन बघावी लागते. पन्नास शंभर माणसे सहज मावतील अशी ती गुहा.

पुन्हा चढाई करत दुसर्‍या पहाडाच्या माथ्यापाशी आलो, इथेही एक ओढा, मात्र त्यात अजुनही थोडेसे झुळुझुळु वहाणारे पाणी. तिथपर्यंत पोहोचलो आणि धाकोबाचे पुन्हा दर्शन झाले. उजवीकडे कोकणात उतरणार्‍या दार्‍या घाटाची खाच दिसू लागली. मुंबईहून धाकोबाला यायचे तर मुरबाड, धसई, पळू मार्गे हा दार्‍या घाट चढून यावे लागते. आता बर्‍यापैकी वर आल्याने अंबोलीभोवतालच्या डोंगरांपलिकडची शिखरे दिसू लागली. धाकोबा अजूनही दूरच होता.

पुढची पंधरा वीस मिनिटाची चढण थंडगार जंगलातून आहे, ती चढून एकदम मोकळ्या पठारावर धाकोबाच्या पुढ्यात आलो, आणि धाकोबा उजवीकडे ठेवत त्याच्या एका टोकाकडे जाउ लागलो, थोड्याच वेळात एक काळ्या दगडांचा माळ अथवा सडा लागला, पिवळे गवत आणि त्यावर मोठमोठे काळे दगड पसरलेले. आणि चहूकडे अजूनही विविधरंगी रानफुलांचा बहर टिकून आहे. सप्टेंबर्मध्ये हा परिसर किती सुंदर असेल याची कल्पनाच करू शकतो. तो माळ ओलांडून धाकोबावर चढाई सुरू केली, आमच्या वाटाड्याने मधेच बसकण मारली आणि म्हणाला याच्या वर मी कधी गेलो नाही, मी इथेच थांबतो, पण आम्ही जायला लागलो तर मग आमच्या मागे मागे आला.

एव्हाना दोन तास होउन गेले होते. उन फारसे प्रखर नव्हते, थोडा वाराही होता, पण धाकोबाच्या माथ्यावर पाउल टाकले आणि इथे यायलाच हवे होते असे सगळे दृष्य समोर उलगडले. सगळ्यात उंच शिखर असल्याने माहुली, हरिश्चंद्रगडापासून ते भीमाशंकर, गोरख, मच्छींद्रपर्यंत सारे अगदी नजरेच्या टप्प्यात होते. कोकणात तुटत गेलेला चार हजार फुटाचा सरळ कडा होता, पण सर्वात मंत्रमुग्ध करणारे काही असेल तर ते जिवधन- खडा पारशी आणि त्यांचे समोर उभे ठाकलेले काळे कभिन्न भेदक कडे. केवळ एवढे बघण्यासाठी तरी धाकोबा मस्ट आहे.

बाकी धाकोबा हा काही किल्ला नाही, गिरीशिखर आहे. धुमकेतूने जीपीएसने उंचीची खात्री करून घेतली. पुन्हा खाली उतरून दगडांच्या माळावर आलो. दोन डोंगर पलिकडे दुर्ग खुणावत होता, दुर्गवरच्या जंगलातल्या दुर्गादेवीच्या देवळात मुक्काम करायचा असा आमचा बेत होता. अजून बरीच वाटचाल बाकी होती. दुर्गच्या दिशेने धाकोबाचे पठार उतरायला सुरूवात केली, सुंदर जंगलातून खाली उतरलो, आम्हाला आधी जायचे होते धाकोबाच्या देवळात, पण एका गुराख्याने आम्ही वाट चुकल्याचे लक्षात आणून दिले, मग डावीकडे वळलो, अजून एक जंगलाचा पट्टा पार करून धाकोबाच्या देवळात पोहोचलो.

देवळाजवळच नितळ पाण्याने भरलेली विहिर आहे, काही दगडी शिल्प विखुरली आहेत, मनुष्यवस्तीचे नामोनिशाण कुठे दिसत नाही. पण पठारावर कुठेतरी एक धनगराचे झोपडे/पाडा आहे, त्याच्याकडे उत्तम देशी गाईंच्या दुधाचा खवा मिळतो, पन्नास एक गाई आहेत अशी माहिती नंतर मिळाली. पावणेदोन वाजले होते, बरोबर आणलेल्या ठेपल्यांचा पाच मिनिटात फडशा पडला. थोडा वेळ कोणी काहीच बोलले नाही, त्या पठारावरची ती शांताता, अजूनही टिकून असलेला छोट्या रानफुलांचा बहर, त्यातून मध टिपून घेण्याची मधमाशांची लगबग, देवळाच्या वाशांमधील स्थनिक राहिवासी असलेले दोन मोठे भुंगे असे सगळे शांतपणे आत जिरवून घेतले. अडीच वाजता वाटाड्याला निरोप दिला आणि आम्ही दुर्गकडे वाटचाल सुरू केली.

वाट दुर्ग थोडा डावीकडे ठेवत, धकोबाच्या समोअर्च्या घळीतील ओढ्याकडे उतरते. पण आम्ही सरळ दुर्गची दिशा धरून रस्ता चुकलो, एका जंगलात शिरलो, आणि ते ओलांडून खाली आलो. सुदैवाने समोरच एक गुराखी दिसला आणि त्याने आम्हाला पुन्हा वाटेला लावले. आता समोरच सूर्य असल्याने थोडे उन जाणवत होते, आणि पायही सकाळपासून चालून बोलू लागले होते. एक डोंगर चढलो, उतरलो, त्याच्या समोरचा चढलो उतरलो, त्याच्या डाव्या बाजूचा चढलो तरी दुर्ग आपला अजून एक डोंगर पलिकडेच.
अंधार होण्याच्या आत देवळात पोहोचणे आवश्यक होते, वेग वाढवला. दुरचा माठा हा घनदाट झाडीने वेढलेला आहे, त्यातच आत दुर्गादेवीचे देउळ आहे. दुर्गवाडि ही वस्ती अगदी जवळ पंधरा वीस मिनिटाच्ञा अंतरावर आहे, तिथपर्यंत रस्ता आहे, आणि आता पठारावर पण बंधार्‍याचे काम सुरू असल्याने कच्चा रस्ता आला आहे.

सहा वाजता देवळात पोहोचलो, चहूकडे गच्च झाडी, दोन अडीच ओबड्धोबड भिंती, दाराच्या ऐवजी दोन चौकटी, चौथ्या भिंतीऐवजी दगडांची रास आणि त्यातच उगवलेले एक झाड असे ते दुर्गादेवीचे देउळ. दाटीवाटीने सहा ते आठ जण झोपू शकतील एवढी जागा. मात्र मागे, पुढे आणि एका बाजूला प्रशस्त अंगण आहे. स्वच्छ पाण्याची विहिर पाच मिनिटाच्या अंतरावर पठारावर आहे.

त्या मागच्या अंगणातच केशवसुमाराने ताबडतोब चूल पेटवायला घेतली, मी आणि धुमकेतू सूर्यास्त
बघायला माथ्यावर चढून गेलो. वाटेत मुंबईहून आलेले दोन ट्रेकर भेटले. ते अहुपे मार्गे चढून आले होते आणि दुसर्‍या दिवशी धाकोबाला जाणार होते. दुर्गची टेहेळणीचा किल्ला म्हणून नोंद असली तरी वर कुठलेच अवशेष नाहीत, सगळा माथा मोठमोठ्या काळ्या कुळकुळीत पाषाणांनी भरून गेला आहे. त्यावरून उड्या मारत गडप्रदक्षिणा संपवली, खाली आलो तोवर भात झाला होता आणि चुलीवर रस्सा उकळत होता.

सात वाजताच जेवायला बसलो, दिवसभर भयंकर पायपीट झाली होती, सगळे काय तुटून पडले जेवणावर. आरतीने साधारण सव्वा अंडे खाऊनही पाच जणात अठरा अंडी संपली Happy नंतर गप्पा मारू असे म्हटले होते, पण कसचे काय, आठ वाजता पथार्‍या पसरून लोक घोरू लागले होते. एक मस्त दिवस लवकर संपला होता. रात्री कडाक्याची थंडी होती, पण झोपेने त्यावर मात केली.

दुसर्‍या दिवशी साडेसहा वाजता उठून, पुन्हा एकदा सगळ्यांबरोबर गडमाथ्यावर जाउन आलो. फोडणीचा भात, पास्ता, चुलीत भाजलेले कांदे, चीज बटाटे असा भरपेट आहार घेउन परतीचा प्रवास सुरू केला, काल भेटलेले ट्रेकर्स पुन्हा एकदा धाकोबाच्या माळावर भेटले. बिचारे आठ वाजता घाईघाईने निघाले होते, पण रस्ता चुकत चुकत आसपासचे साधारण बरेच डोंगर चढुन उतरून पार मेटाकुटीस आले होते. पुन्हा एकदा डोंगर, दर्‍या, धाकोबाचा पायथा असे सगळे करत दुपारी दोन वाजता आंबोली गाठले. वाटेत बाजारला निघालेले एक आजोबा भेटले, साधे मीठ, मिरची घ्यायची म्हटले तरी दोन तास चालून , मग एस्टीने जुन्नर आणि परत येउन पुन्हा चालणे एवढी कसरत करावी लागते त्यांना.

ज्या दुर्गम पाड्यावर, किल्ल्यांवर चालत जायचो तिकडे रस्ता झाला की राग यायचा, आता ट्रेकची मजा तर गेलीच पण किल्ल्याचीही वाट लागणार म्हणून. पण आता हे आजोबाही आठवतील.

वरून उतरतांनाच थोड्या अंतरावरचा एक तलाव खुणावत होता, तिकडे गेलो, मनसोक्त आंघोळ केली, कुणा शौकिनाने तलावच्या काठी पलंग आणून ठेवला होता, त्यावर फोटो काढले आणि नारायणगावची ( फारशी न आवडलेली) राजकमल मिसळ खावून पुण्याला पोहोचलो.

आमचा अधिकृत छायाचित्रकार फदि यावेळेला नव्हता, त्यामुळे धुमकेतूने काही फोटो काढले आहेत, ते कधी मिळणार याची वाट बघतोय.... थंडी आहे तोपर्यंत अजून एक मस्त शेकोटी ट्रेक करायला हवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ४:३० वाजता घाबरुन जागा झालो होतो.. मला वाटले की वाघोबा आला...पण ५ मि. नंतर कळाले की हा तर दुसराच आवाज आहे.... Happy

७ वर्षापूर्वी गेलो होतो दुर्ग ढाकोब्याला.. त्या वेळी हे मंदिर अजून भितीदायक वाटले होते..

सुट्टी नसल्यामुळे इतका मस्त ट्रेक मिसल्याच दु:ख होतयं Sad

GS बहोत खुब... ट्रेक, वर्णन, फोटो, झोप आणि अंडी लगे रहो... Happy

Pages