चांदणशेला

Submitted by श्यामली on 24 December, 2009 - 23:33

ही कुठली शुभंकर वेळा; हा ऋतू कोणता आला?
कुणी देहावर पांघरला जणू हळवा चांदणशेला

ही नवीन वळणे आतूर.. गात्रांतून उठली थरथर
हे बावरलेले लाघव..त्या डोळ्यांमधुनी आर्जव
मौनाने पसरून बाहु टिपले हे हसरे मार्दव
आकाशी आनंदाने गहिवरला चांदणशेला

ही निशा जरी सरलेली.. ती नशा न ओसरलेली
हा भासांचा नाही घोळ.. वा स्वप्नांचाही खेळ
वचने वा आणा-भाका.. तुटणारच रेशिमधागा
ही सुंदर गंधीत ठेव.. हिरमुसला चांदणशेला

~श्यामली

गुलमोहर: 

काय सुरेख लिहिलं आहेस गं श्यामली! अश्याच शब्ददेखण्या कविता वाचायला मिळू देत तुझ्याक्डून ह्या नव्या वर्षात!

असुदे,मयुरेश, thewind शैलजा तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.

मया, हा फॉर्म टिकवणं अवघड आहे पण फार महत्वाचं आहे, धन्स
शैलजा, शब्ददेखणा>>>सही शब्द Happy

सुरूवात शिर्षकापासून
अहाहा...सुंदर शब्द . लहाणपणी मटका कुल्फीकडे आशाळभूतपने पहात शाळेत जायचो..आणि कधीतरी मग कुणी पाहुणा वाडिलाल आइस्क्रीम घेऊन यायचा तेव्हां झालेला आनंद या शब्दाकडे पाहतांना झाला. काहीतरी मिळाल्याचा !! ( पुढे त्या शब्दाचा उगम सांगायचे सौजन्य दाखवून तो आनंद आणखी वाढलाय).

पण देहावर पांघरलेला चांदणशेला आणि तो ही हळवा..क्या बात है

ही नवीन वळणे आतूर.. गात्रांतून उठली थरथर
हे बावरलेले लाघव..त्या डोळ्यांमधुनी आर्जव

थांब थांब...काय शब्द वापरलास ?? बावरलेले लाघव .. प्रेमात पडणारी षोडषा दाखवायची कि काय ? बस्स दोनच शब्दांतून ??

मौनाने पसरून बाहु, टिपले हे हसरे मार्दव
आकाशी आनंदाने गहिवरला चांदणशेला

बघ...पुन्हा आता हसरे मार्दव ! काय लावलयस बाई तू हे ? तुझा चांदणशेला हळवा, तुझं लाघव बावरलेलं, आणि मार्दव हसरे.. लाघव बावरे असा शब्दप्रयोग करण्याचा मोह झाला असता माझ्यासारख्या धसमुसळ्या कवीला...!!

ही निशा जरी सरलेली.. ती नशा न ओसरलेली
हा भासांचा नाही घोळ.. वा स्वप्नांचाही खेळ
वचने वा आणा-भाका.. तुटणारच रेशिमधागा
ही सुंदर गंधीत ठेव.. हिरमुसला चांदणशेला

खरंच अशा किती आणाभाका पूर्ण होऊ शकत नाहीत पण ती ठेव कायमची असते...! असा शेवट असलेली प्रसन्न करणारी कविता असे हिचे वर्णन केले तर ?

-----------------------------------------------------------------

रैना, अभि, किरण, नंद्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद

किरण भाऊ मायबोलीवर तुमच मनःपूर्वक स्वागत. Happy आणि एवढ्या दिलखुलास अभिप्रायाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

ही कुठली शुभंकर वेळा; हा ऋतू कोणता आला?
कुणी देहावर पांघरला जणू हळवा चांदणशेला
,,,,,, श्यामे, जिंकलेस बाई

इकडे बघितलच नाही अजिबात ,
शरदजी निवडक दहा मध्ये???????? वॉव!!! सहिच की एक्दम Happy तुम्हाला खूप खूप धन्यवाद Happy

Pages