पुस्तक परिचय : बाळूच्या अवस्थांतराची डायरी (किरण गुरव)

Submitted by ललिता-प्रीति on 14 April, 2025 - 03:38

हे तीन मोठ्या कथांचं छोटंसं पुस्तक आहे.
कथा, लघुकथा, दीर्घकथा – यांची नक्की व्याख्या कशी करायची याबाबत माझ्या मनात कायम गोंधळ असतो. माझ्या मते या पुस्तकातल्या तीनही कथा दीर्घकथा म्हणायला हव्यात. असो.

पुस्तकातली पहिलीच (शीर्षक)कथा एक-नंबर आहे, भारी आहे, भन्नाट आहे, झकास आहे!
बाळू हा कथानायक, निवेदक. कोल्हापूरजवळच्या खेड्यात दहावी झालेला. आणि आता त्याला कोल्हापूरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. तिथेच तो हॉस्टेलवर राहणार आहे. त्याला हॉस्टेलला सोडायला समस्त घर त्याच्यासोबत कोल्हापूरला आलं आहे- आई, वडील आणि धाकटे दोन भाऊ. एस.टी.तून ते कोल्हापूरच्या स्टँडवर उतरतात. तिथून पायी चालत मार्केटमध्ये, तिथून बस पकडून जरा गावाबाहेर असणार्‍या इन्स्टिट्यूटपर्यंत, आणि इन्स्टिट्यूटच्या मेनगेटपासून बाळूच्या हॉस्टेलच्या खोलीपर्यंत त्या कुटुंबाचा प्रवास, म्हणजे ही ७६ पानी कथा.
हा प्रवास लेखकाने असा काही रंगवला आहे, की बस्स! पहिल्या १-२ पानावरच्या पावसाच्या वर्णनापासूनच आपण बाळूच्या छत्रीतून चालायला लागतो. डांबरी रस्त्यावर पडणार्‍या पावसाच्या धारांना दिलेली उपमा, धाकट्या भावाच्या तुटलेल्या छत्रीला दिलेली एक भन्नाट उपमा, इथून जी मजा सुरू होते, ती कथा संपल्यानंतरही आपल्या डोक्यात सुरूच राहते.
प्रथमपुरुषी निवेदन खेडवळ-शहरी असं मिश्र भाषेतलं आहे. दहावी झालेल्या, शिंगं फुटू लागलेल्या मुलाला शहरातलं जग कसं दिसतं, तरी आपल्या मर्यादांची जाणीव होऊन ती शिंगं त्याला कशी आवरून ठेवावी लागतात; दहावीतल्या चांगल्या मार्कांमुळे डोळ्यांत स्वप्नं अवतरली आहेत, पण पुरेसा आत्मविश्वास नाहीये... त्यात जनरेशन-गॅप, आणि ‘वडीलराव’ हे संबोधन. बाळूच्या तोंडून पहिल्यांदा आपण हे संबोधन ऐकतो आणि बाळू आपला दोस्त होऊन जातो. बाळूच्या वडिलांच्या वयाचे वाचकही वडिलांचे नव्हे, तर बाळूचेच दोस्त होत असतील, नक्की!
वडीलराव, आई बनाक्का, बाळू, मधला भाऊ बाळ संदीपा, आणि बारका सल्या- प्रत्येकाची व्यक्तिमत्वं, back stories, आसपास दिसणार्‍या गोष्टींवरच्या प्रतिक्रिया- कथानकात या सगळ्याबद्दलच्या कळत-नकळत पेरलेल्या बारीकसारीक नोंदी एका वाचनात नीट गोळा होणंही अवघड आहे. यातल्या प्रत्येक पात्रावर concentrate करून एकेकदा कथा वाचायला हवी इतकी ती full of experience आहे.

अशीच full of experience कथा आहे ‘बाजार : दि मार्केट’. एका लहान गावातला आठवडी बाजार त्यात रंगवलेला आहे. ही चौकट लेखकाला (आणि वाचकालाही) आपसूकच भरपूर स्पेस देते. लेखकाने त्याचा पुरेपूर उपयोग केला आहे. तो बाजार, चढाचा रस्ता, बाजारातला प्रत्येक विक्रेता, कांदा-बटाट्याचे, भाज्यांचे ढीग, शाळकरी मुलाला विक्रीचे धडे देणार बाप, भाजीविक्रेत्यांच्या, दुकानदारांच्या गटात न बसणारा पण बाजारावर आस लावून बसलेला फोटो-स्टुडिओवाला, सगळं अगदी डिटेल डोळ्यासमोर उभं राहतं. कुणी कुठे बसायचं यावरून विक्रेत्यांची होणारी वादावादी, विक्रीला आणलेल्या कोंबड्यांचा कलकलाट यांचे आवाज आपल्या कानात वाजायला लागतात.
कथेच्या प्रत्येक पानागणिक बाजार चढत जातो आणि बाजारातल्या मुख्य रस्त्यावर ‘तो’ अवतरतो. या ‘तो’चं कथेतलं प्रयोजन काय असावं याचे बरेच अंदाज आपण बांधत राहतो. ‘राजू बन गया जंटलमन’मध्ये नाना पाटेकरचं पात्र आहे तसा काही प्रकार असावा, असं सुरुवातीला वाटतं. त्याला दिलेले सुरुवातीचे संवादही त्या धाटणीचे म्हणता येतील असे आहेत. पुढे या पात्राबद्दल आपल्याला हळूहळू कळत जातं आणि ‘बाजार’चा एक वेगळा दृष्टीकोन समोर येतो. ही सांगड मला खूप आवडली. दुसरा दृष्टीकोन समोर येईपर्यंत मला त्याचा जराही अंदाज आला नाही.

बाजार आणि अवस्थांतर – दोन्ही कथांमध्ये आधुनिकीकरणाच्या परिघावरचं ग्रामीण/निमशहरी जीवन फार छान दाखवलं आहे. या दोन्हीच्या मधली कथा ‘इंदूलकर : चरित्र, काळ आणि निर्मिती यांची अन्वेषणकथा’ तुलनेने वेगळी वाटली. अंमळ abstract. Sarcasm वर भर असलेली. यातली पात्रं caricature टाइप रंगवलेली आहेत. इंदूलकर हे मध्यमवयीन सरकारी अधिकारी. त्यांच्या हातात mid level अधिकार आहेत. ते कर्तव्यदक्ष आहेत. आणि त्यांना लेखनाची आवड आहे. सरकारी अधिकारी इंदूलकर आणि लेखक इंदूलकर ही दोन व्यक्तिमत्वं कथेत थोडीफार वेगवेगळी रेखाटलेली आहेत. काही प्रसंगांमध्ये दोन्ही व्यक्तिमत्वं एकावेळी डबलरोलसारखी आपल्यासमोर येतात. त्यात मजा आहे, नाही असं नाही, पण इतर दोन कथांइतकी नाही. किंबहुना कथासंग्रह करताना ही कथा यात का घ्यावीशी वाटली असेल, त्यामुळे पुस्तकाचा म्हणून एकजिनसीपणा कमी झालाय, असंही वाटलं. किंवा कदाचित तोच उद्देश असावा.
एकंदर वाचायलाच हवं असं पुस्तक. आणखी वर्ष-सहा महिन्यांनी आवडलेल्या दोन कथा पुन्हा वाचाव्याशा वाटतील.
---
(या पुस्तकाला २०२१ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. नंतर त्यावर लोकसत्ताच्या एका सदरात मोठा लेख वाचला होता. (आताचे लेखक जुन्या पुस्तकाबद्दल लिहितात, जुने लेखक आताच्या पुस्तकाबद्दल लिहितात, असं एक सदर लोकसत्तात वर्षभर यायचं.) तो लेख वाचल्यावर हे पुस्तक मी विश-लिस्टला टाकलं होतं. नुकतंच, मॅजेस्टिक दुकानाच्या ’जुनी पुस्तकं द्या, नवी घ्या’ योजनेत काही पुस्तकं घेतली. त्यात किरण गुरवांचे चार कथासंग्रह आहेत. त्यातलं वाचलेलं हे पहिलं पुस्तक.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा खूप आवडता लेखक.

ललिता-प्रिती - चार कोणते कथासंग्रह मिळाले किरण गुरवांचे? बाळुच्या अवस्थांतराची डायरी, क्षुधाशांती भुवन आणि राखिव सावल्यांचा खेळ हे तीनच कथासंग्रह आहेत. जुगाड नावाची एक कादंबरी आहे पण ती आउट ऑफ प्रिन्ट आहे. ती मिळाली का?

छान परिचय करून दिलाय.
लोकसत्ता मध्ये वाचले होते ह्याविषयी.
वाचायला हवे.
हे पुस्तक खूप relate होईल असे वाटतंय.
एकतर कोल्हापूर कनेक्शन, ते आमचंच कॉलेज.
आर्थिक सामाजिक समानता असेल कुठेतरी नक्कीच.
वाचणार आहेच.

किरण गुरव दमदार कथा लिहितात. बाळुच्या अवस्थांतराची डायरी, क्षुधाशांती भुवन आणि राखीव सावल्यांचा खेळ हे तिन्ही कथासंग्रह वाचलेत, आवडलेत. पण त्यांची 'जुगाड' कादंबरी वाचताना मात्र बऱ्यापैकी अपेक्षाभंग झालेला आठवतो.‌

अवांतर:
किरण गुरव आवडत असतील तर सीताराम सावंतही वाचून बघावेत असं सुचवतो. त्यांची 'भुई भुई ठाव दे' ही कादंबरी आणि 'हरवलेल्या कथेच्या शोधात' म्हणून एक कथासंग्रह आहे. दोन्ही जोरदार आहेत.

ममो, हो, ठाण्याच्या मॅजेस्टिकमधून घेतलं.

अनया, किंडलवर नाहीये. मी प्रिंट कॉपी वाचली.

टवणे सर, चौथा कथासंग्रह 'श्री लिपी'.

संप्रति, सीताराम सावंत नाव नोंद्वून ठेवलंय. `भुई भुई ठाव दे' या पुस्तकाबद्दल कुठेतरी ऐकलंय्/वाचलंय असं वाटतंय.

अरे हो, श्री लिपी.

क्षुधाशांती भुवन मधली शोध ही हुजरे मास्तरांची कथा पण फारच भारी आहे. आणि एक गवर (गौरी) नावाची कथा पण. मी मागे कधीतरी कुठेतरी याबद्दल लिहिले होते. कुठे आणि कधी दोन्ही आठवत नाही.