पुस्तक परिचय : मध्यरात्रीनंतरचे तास (तमिळ लेखिका - सलमा. अनुवाद - सोनाली नवांगुळ)
पुस्तकाबद्दल लिहिण्यापूर्वी सलमा यांच्याबद्दल थोडंसं. (कारण त्यामुळेच मुळात मी हे पुस्तक वाचायचं ठरवलं.)
सलमा हे त्यांचं टोपणनाव आहे. तामिळनाडूतल्या ग्रामीण भागात एका कर्मठ मुसलमान कुटुंबात त्या वाढल्या. त्यांच्या घरात मुलगी वयात आली की घरातल्या पुरुषांशिवाय इतर कुणाचीही तिच्यावर नजर पडू नये म्हणून तिचं घराबाहेर पडणं बंद केलं जात असे. अगदी तिचं शाळाशिक्षणही अर्धवट बंद होत असे. तिचं लग्न झालं की मगच तिची त्यातून सुटका होत असे. सलमा यांच्यावरही ती वेळ आलीच. त्यांनी विरोध करून पाहिला. पण उपयोग झाला नाही. पुढे ८-९ वर्षं त्यांनी अशी घराच्या चार भिंतींत काढली.