गुप्तहेर रॉबिन आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग ७ (अंतिम)

Submitted by रुद्रसेन on 22 March, 2025 - 13:11

रात्र चांगलीच पडलेली होती. बंगल्याच्या आसपास नेहमी असते तशीच भयाण शांतात होती, बंगल्यातील आरडाओरडा आणि भयानक किंकाळ्याचे आवाज आता बंद पडलेले असले तरी एक प्रकारची विचित्र शांतता अजूनही तिथे होती. बंगल्याच्या आतल्या भागात एका मोठ्या हॉलवजा खोलीमध्ये एका खुर्चीच्या मागे रॉबिन लपून बसलेला होता. शेजारच्याच खोलीत इ. इनामदार देखील लपलेले होते. अंधाऱ्या रात्री कोणी गुपचूप बंगल्यात प्रवेश केलाच तर त्याला बेसावध गाठून पकडण्याचा इरादा केला गेला होता. बंगल्याच्या मागील उसाच्या शेतात केशवदेखील उसाच्या गर्दीत लपून बंगल्याच्या खिडक्यांवर नजर ठेवून होता आणि कोणी बंगल्यात शिरताना दिसलंच तर इशारा देण्याचं काम रॉबिनने त्याच्यावर सोपवलेलं होतं. बंगल्याच्या शेजारी बांधकामाचे साहित्य आणि इतर बस्तू ठेवायला जे शेड उभं केलेलं होतं त्यामागे हरिभाऊ सुद्धा दबा धरून बसलेले होते. सावज हातातून निसटून बाहेर गेलंच तर केशव आणि हरिभाऊ यांना बाहेर सावजाला पकडायला सोप्पं जावं म्हणून रॉबिननेच त्यांना तिथं लपायला सांगितलं होतं.

रॉबिनच्या योजनेनुसार आज रात्रीच भूतबंगल्यात रंगा आणि बाळूला भूतांची थेरं करायला सांगणारा अनामिक खलनायक बंगल्यात येणार होता त्यासाठीच सगळेजण आपापल्या जागेवर दबा धरून शांतपणे त्या खलनायकाची वाट पाहत बसले होते. रात्रीच्या काळोखात बंगल्याच्या आसपासचा परिसर पूर्णपणे बुडून गेला होता. बंगल्यातील एका छोट्या खोलीत मातीच्या ढिगाऱ्यामागे लपलेल्या इ. इनामदारांना मनातून वाटत होतं कि रॉबिनच्या म्हणण्यानुसार खरंच तो खलनायक इथे येईल का? कि तो रंगा आणि बाळूच्या पकडले गेल्याच्या बातमीमुळे पसार झाला असेल आणि येणारच असेल तर तो नक्की इथे कशासाठी येणार आहे हे सुद्धा रॉबिनने सांगितलं न्हवत, काहीही असो प्रयत्न करायला हवा. अखेर रॉबिनने काहीतरी विचार करूनच हि योजना आखली असेल. कितीवेळ झालं ते सगळे तिथे शांतपणे दबा धरून बसलेले होते. एक एक क्षण त्यांना तासाप्रमाणे वाटत होता, अजूनही कोणाच्या येण्याची चाहूल लागलेली न्हवती. रात्र चढत चाललेली होती, रॉबिन डोळे मिटून शांतपणे बसून होता.
एवढ्यात बंगल्याच्या बाहेरून टिटवीच्या ओरडण्याचा आवाज आला, तो आवाज केशवनेच काढलेला होता, म्हणजेच केशवने दिलेला इशाराच होता. काही वेळाने काहीतरी घासल्यासारखा आवाज रॉबिनला आला, केशवचा इशारा समजून रॉबिन सावध होऊन बसला. बंगल्याच्या खिडकीमधून कोणीतरी हळूच बंगल्यात प्रवेश करू पाहत होतं त्याच्या शरीराभोवती गुंडाळलेल्या कापडांमुळे भिंतीला घासल्यासारखा आवाज येत होता. रॉबिन कान टवकारून ऐकण्याचा प्रयत्न करू लागला, इनामदार साहेबांना देखील तो आवाज ऐकू आल्यामुळे ते देखील श्वास रोखून बसले. बंगल्याच्या मधल्या भागातून आतमध्ये येऊन त्या व्यक्तीने रॉबिन ज्या खोली लपलेला होता त्या खोलीकडे मोर्चा वळवला. त्या व्यक्तीच्या हातात फावडे होते आणि ती हळुवारपणे पुढे सरकत होती. रॉबिनला जाणवलं कि ती व्यक्ती आपण जिथे लपलोय त्याचं खोलीत येतेय त्यामुळे तो देखील खुर्चीमागे अंग चोरून बसला. त्या व्यक्तीने खोलीत प्रवेश केला आणि खोलीच्या कोपऱ्यात जाऊन तिथे हातातल्या फावड्याने तिथे खोदू लागला. खाड खाडss फावड्याचा आवाज खोलीभर घुमला.

खुर्चीमागून रॉबिनने त्या फावडा मारणाऱ्या व्यक्तीकडे पहिले, ती व्यक्ती पाठमोरी उभी असल्याने तिला मागचे काहीच दिसणे शक्य न्हवते तसेही बंगल्यात अंधारच होता. दबक्या पावलाने पुढे जात रॉबिनने अचानकच मागून त्या व्यक्तीवर उडी घेतली तसं त्या व्यक्तीला मागे वळायचा अवसरही न देता रॉबिनने त्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या. इ. इनामदार सुद्धा आता त्या खोलीत आले, मगाशी केशवने केलेल्या इशाऱ्यासरशीच ते सावध होऊन बसले होते आणि ती व्यक्ती रॉबिन ज्या खोलीत लपलेला होता तिथे गेल्यावर हळूच मागून आत आले होते. ती व्यक्ती रॉबिनच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करत होती पण रॉबिनच्या ताकदीपुढे त्या व्यक्तीचा पाड लागला नाही.

इ. इनामदारांच्या पाठोपाठ तिथे केशव सुद्धा विद्युत गतीने खिडकीमार्गे आतमधे आला होता. इनामदारांनी आपल्याजवळील बेड्या काढून त्या व्यक्तीच्या हाताला मागे अडकवल्या आणि त्याला सरळ उभं केलं. रॉबिन त्या व्यक्तीच्या समोर उभं राहून तिजकडे पाहत उभा राहिला. ती व्यक्ती घाबरत धडपडतच उभी राहिली अंगावर सभोवती एक काळ वस्त्र त्या व्यक्तीने गुंडाळल होतं, तिच्या चेहऱ्यावर अर्धवट कापड लावल्याने ती व्यक्ती कोण आहे हे कळून येत न्हवत. पाठोपाठ हरिभाऊदेखील आतल्या खोलीत येऊन दाखल झाले, इनामदार साहेब त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील कापड दूर केलं आणि जवळच्या छोट्या टॉर्चने त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रकाशाचा झोत मारला, तसं त्या व्यक्तीने चेहरा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण केशवने त्या व्यक्तीला मागून घट्ट धरून ठेवलं. केशवच्या पकडीपुढे त्या व्यक्तीला हलतही येईना.
जसा टॉर्चने टाकलेल्या प्रकाशाच्या झोतात त्या व्यक्तीचा चेहरा दिसला तसे हरिभाऊ उद्गारले
” अनमोल तू ...”

विस्फारलेल्या नेत्रांनी केशव आणि इनामदार सुद्धा अनमोलकडे पाहत उभे होते. शेंडेसाहेबांकडे त्यांच्या पतपेढीवर क्लार्क म्हणून काम करणारा अनमोल एवढ्या रात्री फावड घेऊन अनमोल बंगल्यात काय करतोय हे हरिभाऊंना कळेना. म्हणजेच रंगा आणि बाळू यांना पैसे देऊन बंगल्यात भुताची भीती दाखवायला लावणारा अनमोल होता कि काय?
“ अनमोल..तू इथे काय करतोय ..” हरिभाऊ अजूनही विश्वास न बसल्यासारखे अनमोलकडे पाहत बोलले.
पण अनमोल काहीही न बोलता फक्त धीरगंभीर चेहऱ्याने सगळ्यांकडे पाहत होता, हरिभाऊ सोडून त्याला अंधारात कोणाचा आवाज ओळखता आला नाही आणि कोणी नीट दिसलं सुद्धा नाही.
“ काय मग अनमोल उर्फ सनी धोत्रे .... फावडा घेऊन इथे काय शोधत होतात, सांगायचे कष्ट घ्याल का? “ स्मितहास्य करत रॉबिन अनमोलकडे पाहत बोलला.

आपल्या खऱ्या नावाचा केलेला उल्लेख ऐकून अनमोल चांगलाच दचकला, तसचं हरिभाऊ आणि इनामदार सुद्धा बुचकळ्यात पडले. अनमोलचा रॉबिनने केलेला सनी धोत्रे असा उल्लेख ऐकून कोणालाच काहीही कळेना, तथापि रात्र बरीच झाल्याने रॉबिनने अनमोलला घेऊन पोलीस स्टेशनवर घेऊन जाण्यास इनामदारांना सांगितलं. पुढची चौकशी त्याची तिथेच करावी असं ठरलं. रॉबिनने हरिभाऊंना शेंडे साहेबांना घेऊन तडक पोलीस स्टेशनवरच यायला सांगितलं आणि स्वतः केशवसोबत इनामदारांना घेऊन पुढे निघाला.

पोलीस स्टेशनवर आल्यावर इनामदारांनी रॉबिनने अनमोलचा उल्लेख सनी धोत्रे असा का केला म्हणून विचारलं. त्यावर हसून रॉबिनने शेंडे साहेब आले कि सगळ्या समक्षच अनमोल उर्फ सनी धोत्रे आपल्याला काय ते सांगेल असं सांगितलं. काहीवेळातच शेंडे साहेब हरिभाऊंसोबत स्टेशनवर दाखल झाले त्यांची मुद्रा पूर्णपणे बुचकळ्यात पडलेली होती, पोलीस स्टेशनवर यायची त्यांची तिळमात्र इच्छा नसताना रॉबिनच्या सांगण्यानुसार ते इथे आले होते.

“ या या शेंडे साहेब बसा...” जवळच्याच खुर्चीकडे निर्देश करत रॉबिन म्हणाला.
“ रॉबिन हे इथे पोलीस स्टेशनवर का बसलोत आपण ..अर्थात हरिभाऊ बोलेले रात्री बंगल्यावर काय काय घडलं“ शेंडे अस्वस्थ होत म्हणाले.
शेंडेनी रॉबिनला अगोदरच पोलिसांचा हस्तक्षेप नको म्हणून सांगितलेलं असताना देखील रॉबिनने पोलिसांना का प्रकरणात ओढलं हे त्यांना समजेना.
“ तुमची अस्वस्थता कळतेय मला शेंडे साहेब पण इथे आपल्याला सापडलेला मनुष्य भयंकर बदमाष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे याची तुम्हाला कल्पना नसेल, म्हणून पोलिसांना मध्ये घेणें भाग वाटले आणि तसंही त्यांच्या मदतीशिवाय मला अनमोल हा खरा कोण आहे हे समजलं देखील नसतं” रॉबिन म्हणाला.
रॉबिनकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहण्याशिवाय त्यांना दुसरं काहीही सुचेना. हरिभाऊसुद्धा शेंडेच्या मागे तशाच अवस्थेत उभे होते,
रॉबिन पुढे म्हणाला” शेंडे साहेब हा अनमोल तुमच्याकडे किती दिवसापासून कामावर आहे”
“ झाले असतील सात आठ महिने” शेंडे बोलले.
“ तुमच्याशी त्याची भेट कशी झाली” रॉबिनने प्रश्न केला.
“ एकदा माझाकडे तो काम मागण्यासाठी आला होता, मला मोठा मेहनती वाटला तो म्हणून ठेवून घेतला कामावर” शेंडेनी उत्तर दिलं.
“ शेंडे साहेब मला सांगायला अत्यंत खेद होतोय कि अनमोल या नावाने सनी धोत्रे या नावाचा इसम तुमचाकडे गेले सात आठ महिने नाव बदलून नोकरीला होता, तसचं त्याने रंगा आणि बाळू या दोन चोरांना पैसे देऊन तुमच्या बंगल्यावर रात्री अपरात्री आरडा ओरडा करून तिथे भूत असल्याचा बनाव करायला सांगितलं होतं, जेणेकरून तुम्ही घाबरून जावे आणि बंगला भुताटकीचा आहे सगळ्यांना कळावे” रॉबिन हाताची बोटे एकमेकांत गुंफून शेंडेकडे पाहत म्हणाला.

रॉबिनच्या या वाक्यावर शेंडेना काय बोलावे ते कळेना. इतके दिवस आपल्याकडे काम करणारा मेहनती माणूस हा अट्टल चोर होता हे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
“ रॉबिन पण तो असं का करत होता” शेंडे घाबरत म्हणाले.
“ शेंडे साहेब त्याला तुमच्या बंगल्यात खास रस आहे तो तुमचा बंगला विकत घेण्यासाठी न्हवे तर त्याचं काहीतरी गुपित त्या बंगल्यात दडलं आहे, लोकांनी या बंगल्याच्या जवळ येऊ नये म्हणून त्याने बंगल्यात रंगा आणि बाळूनामक भुते सोडली, आणि तो बंगला भुताटकीचा साबित करून तो त्या बंगल्यात काहीतरी शोधायला येत असे. एवढचं न्हवे तर तुम्हाला सुद्धा त्या बंगल्याच्या जवळ न येऊ देणारा, तुमच्या राहत्या घरात सुद्धा भिंतीवर रक्ताने मजकूर लिहिणारा आणि वस्तूंची फेकाफेक करणारा हाच आहे अशी मला खात्री आहे” रॉबिन म्हणाला.
“ पण बंगल्यात नक्की तो काय शोधत होता” हरिभाऊ कपाळावर आठ्या आणत म्हणाले.
“ मला काहीसा अंदाज आहे, पण आधी त्यालाच याची उत्तरं विचारुयात“ असं म्हणत रॉबिन खुर्चीवरून उठला.
अनमोल उर्फ सनी धोत्रेला एका चौकशीच्या खोलीत आणले गेले, इनामदार आणि रॉबिन त्याची चौकशी करण्यासाठी खोलीत गेले, शेंडे साहेब, हरिभाऊ आणि केशव बाहेरूनच त्यांचं संभाषण ऐकू लागले.

“ बोल मग अनमोल उर्फ सनी, तू त्या बंगल्यात काय शोधत होतास” समोरच्या खुर्चीवर बसत रॉबिन म्हणाला.
रॉबिनच्या या वाक्यावर अनमोलने एकवार रॉबिनला व्यवस्थित न्याहाळल, आणि हसत तो पुढे म्हणाला
“ गुप्तहेर रॉबिन, मला आधी समजलंच नाही कि तू या गावात भूतबंगल्याच्या तपासासाठी आला आहेस, कारण तुझा नाव मी बरंच ऐकून होतो मात्र तुझा चेहरा कधी पहिला न्हवता. शेंडे साहेबांच्या घरात आपली भेट झाल्यावर मला वाटलं कि तू हरिभाऊंच्या सोबत कामाला आलायस, पण मानलं तुला इतके दिवस मी नाव बदलून इथे राहत होतो हे कोणालाच समजलं नाही तू मात्र मला ओळखलंस” तीक्ष्ण नजर रोखत अनमोल म्हणाला.
“ बंगल्यात काय शोधात होतास” रॉबिनने परत आपला प्रश्न अनमोलला विचारला.
“ काही नाही असंच सहज आलो होतो” छद्मी मुद्रा करत अनमोल म्हणाला.
अनमोल उर्फ सनी धोत्रे हा एक अट्टल गुन्हेगार असल्याने आपल्याला तो काही सहजासहजी सांगणार नाही हे रॉबिनला कळून चुकलं त्यामुळे त्याने वेगळ्या प्रकारची खेळी करायचं ठरवलं.
“ हे बघ अनमोल तू जे काही शोधत होतास ते मी स्वतः खोदून काढेन आणि मला ते मिळेल सुद्धा. पण तू जर बऱ्या बोलाने सत्य सांगितलं नाहीस तर लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, शेंडेच्या घरात चोऱ्या करण्याचा प्रयत्न करणे किंवा खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे लावून ते साबित करून तुला कमीतकमी जन्मठेप होईल इतकी शिक्षा कशी होत नाही याकडे मी स्वतः जातीने लक्ष देईन. तसचं तुझा आधीच्या गुन्हेगारीच्या कारनाम्यांमुळे न्यायाधीश महोदयांनासुद्धा याची खात्री पटेल. इनामदार याची फाईल जरा आणता का इकडे” रॉबिन कडक आवाजात म्हणाला.

रॉबिनच्या या वक्तव्यावर अनमोल जरासा घाबरला. रॉबिनला गुन्हेगारीच्या कलमांची इत्यंभूत माहिती असून तो आपल्याला कोणत्याही गुन्ह्यात लीलया अडकवू शकतो आणि ते सुद्धा जन्मठेपेपर्यंत असं वाटून घाबरून अनमोलने सगळं सांगण्याचं कबुल केलं त्याला आयुष्यभर तुरुंगात राहायचे न्हवते. तरीही रॉबिनने त्याकडे दुर्लक्ष केलं. इतक्यात इनामदार साहेब अनमोल उर्फ सनी धोत्रे ची फाईल घेऊन आले.
“ तर हा तुझा सगळा गुन्हेगारीचा रेकोर्ड आहे, नाव सनी धोत्रे, वय ३३, गुन्हेगारीचं स्वरूप – घरफोडी, लुटमारी, दरोडे आणि सध्या गावात राहून अजून काही गुन्हे केलेसच त्यात तू शेंडे साहेबांच्या खुनाचा प्रयत्न सुद्धा केलास हे इथे नमूद करायला हवं, मागे केलेल्या एका मोठ्या दरोड्याखाली तुला अटक झालेली असता तुरुंगातून तू पळून बाहेर आलायस. आणि हो.. हा फोटो पहा इनामदार साहेब या फोटोच्या मिशा आणि तुरळक दाढी जर काढली तर तर हा फोटो मधला इसम सनी धोत्रे म्हणजेच अनमोल आहे हे सिद्ध व्हायला किती वेळ लागेल.” रॉबिन इनामदारांकडे डोळे मिचकावत पटापट बोलला.
इनामदारांनी फोटो निरखून पाहिलं आणि म्हणाले” हो रॉबिन, या फोटोला जशा मिशा आहेत तशा जर या अनमोलला लावल्या तर सनी धोत्रे हाच आहे अशी खात्री पटतेय, मिशा आल्यावरच याला न्यायालयात हजर करू आणि हो शेंडे साहेबांकडून मी जबाब घेतो त्यांच्या खुनाचा प्रयत्न पण केला ना याने”
इनामदार आणि रॉबिन याचं संभाषण ऐकून अनमोल उर्फ सनी धोत्रेची तर चांगलीच पाचावर धारण बसली.

“ थांबा थांबा..मी कोणाचाही खुनाचा प्रयत्न केलाल नाहीये, उगाचच मला मी न केलेल्या गुन्ह्यात अडकवू नका..मी सांगतो सगळा सांगतो” अनमोल काकुळतीला येत म्हणाला.
आपली मात्र चांगलीच लागू पडली हे पाहून रॉबिन मनोमन हसू लागला. पण तरीही चेहरा शक्य तितका गंभीर करत तो म्हणाला ” बर बाबा पटकन काय ते खरं खरं सांग”

“ हो.. हो सांगतो.. असं म्हणून अनमोलने सांगायला सुरुवात केली –
“ सुमारे वर्षभरापूर्वी मी शहरात एका मोठ्या असामीच्या घरात करोडो रुपयांवर डल्ला मारलेला होता, इतकी मोठी लुट मी आजपर्यंत केलेली न्हवती. हि सगळी लुट घेऊन ती खर्च करत आरामात आयुष्य काढायचं असा माझा विचार होता. त्या असामीच्या घरातून मी सोने चांदी तसेच रोख रक्कम घेऊन पळून गेलो होतो पण ते करत असताना पोलिसांना या गोष्टीचा सुगावा माझ्या मागे पोलीस लागले होते, मी जीवाच्या आकांताने शहराच्या मार्गाने या गावाकडे येणाऱ्या मार्गावर पळून जाऊ लागलो. पोलिसांचा ससेमिरा मागे लागलेला होता आणि हातात करोडोंचा ऐवज अशा परिस्थितीत मी शेंडेच्या आत्ताच्या बंगला असलेल्या जागेवर आलो पण तेव्हा तिथे कोणताही बंगला न्हवता. फक्त मोकळी जागा होती आणि दगडी कंपाऊंड तसचं बाजूला एक मोडक शेड होतं, आजूबाजूला शेते होती. पोलिसांना चकवण्यासाठी मी एक युक्ती केली हातातला ऐवज मी बाजूच्या शेडमधील पडलेल्या अवजारांच्या सहाय्याने एके ठिकाणी मोकळ्या जागेत पुरून ठेवला आणि खुणेसाठी एक मोठ्ठा दगड तिथे ठेवला. पोलिसांना सापडला गेलोच तर मुद्देमालासह सापडला जाऊ नये अशी माझी योजना होती आणि नंतर कधीतरी इथे गुपचूप येऊन इथला माल खणून काढावा असं मी ठरवलं आणि बाजूच्या शेतांमध्ये लपून बसलो पण खराब नशिबाने मी पोलिसांच्या हाती लागलो. त्या असामीच्या घरात दरोडा टाकल्याच्या कारणावरून मला तुरुंगात जावं लागलं, पण तिथे गेल्यावर सुद्धा मला मला चोरलेला ऐवज सुरक्षित असेल कि नाही याची चिंता लागून राहिली कारण त्या ऐवजाच्या बळावर मी माझं उर्वरित आयुष्य आरामात घालणार होतो. मी तुरुंगात राहून इथून बाहेर कसं पळून जावं याचा विचार करू लागलो. तुरुंगात राहून बरेच महिने गेले एकदा संधी साधून मी तुरुंगातून पळालो आणि रात्री या गावात जिथे मी चोरलेला ऐवज लपवलेला होता तिथे येऊन पोचलो, समोर बघतो तर एक भव्य बंगला तिथे दिसला, तसेच बांधकामचे अवशेष दिसतं होते, कोणीतरी हि जागा विकत घेऊन इथे बंगला बांधत होतं. मी पळून जाताना खुणेसाठी दगड कुठे ठेवला होता तोही लक्षात येईना, त्यामुळे मला कळेना कि मी तो ऐवज नक्की कोणत्या जागी पुरून ठेवला आहे, तो कोणाच्या हाती तर लागला नसेल ना? हा विचार येताच माझ्या मनात भीतीचा संचार झाला. ज्याला कोणालाही इथे ऐवज मिळाला असेल त्याच्या घशात हात घालून मी तो बाहेर काढायचं ठरवलं होतं.

मी गावातच राहून कामगाराच्या वेशात फिरून तो बंगला कोणाचा आहे, तिथे अन्य काही सापडलं का याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तो बंगला शेंडे साहेबांचा असून तो त्यांनी नुकताच मेहता नावाच्या माणसाकडून तो विकत घेतल्याची गोष्ट कळली. मेहता यांनी कशा प्रकारे तो बंगला शेंडेना विकला याची माहिती देखील काढली पण बंगल्याच्या आवारात पुरलेला ऐवज शेंडेच्या हाती लागला नसेल ना असं वाटून मी शेंडेकडे नोकरी मागण्यासाठी गेलो. सोंगे घेण्यात उस्ताद असल्याने आणि थोडंफार शिक्षण झाल्याने माझी वर्णी त्यांच्या पतपेढीवर लागली, मी कष्टाळू आणि इमानदारपणे त्यांच्याकडे काम केले, हेतू एकच कि बंगल्याच्या आसपास मी पुरलेला करोडोंचा ऐवज त्यांच्या हाती लागला आहे कि तो अजूनही तिथेच आहे हे शोधणे. शेंडेच्या घरात राहून मला त्यांना तो ऐवज अजून मिळाला नसल्याचं लक्षात आलं आणि एक निराळाच आनंद मला झाला. बंगला बांधण्याच काम पूर्ण व्हायच्या आत मला तिथला ऐवज शोधून काढून इथून पळ काढायचा होता. पण सततच्या बांधकामामुळे बंगल्याच्या आवारात कामगारांची गर्दी असायची अशात मला तो पुरलेला ऐवज शोधणे शक्य न्हवते. मग मी एक वेगळीच योजना आखली. मेहतांची मुलगी अवनी हि त्या बंगल्यात जळून मेल्याचं माझ्या कानावर आलेलं होतं याचा फायदा घायचं मी ठरवलं. रंगा आणि बाळू या दोन चोरांना मी गुपचूपपणे जाऊन भेटलो आणि त्यांना पैशाचं लालूच दाखवून रात्री अपरात्री तिथे जाऊन जोरजोरात किंकाळ्या मारण्याचं काम सोपवलं, जेणेकरून तो बंगला भुताने झपाटला आहे असं लोकांना वाटावं. बंगल्यात भुते आहेत अशी अफवा पसरवायला मीच सुरुवात केली. त्यात शेंडेना देखील भुते खरी आहे हे भासवण्याकरिता त्यांच्या घरात रात्री गुपचूपपणे शिरून भिंतीवर जनावरांच्या रक्ताने “मी आले आहे” असा मजकुर लिहिला. नंतर दुसऱ्या एका खोलीतील किल्ल्या मिळवून तिथे सामानांची नासधूस केली आणि चोरीचा बनाव केला. एकदा भुताच्या भीतीने लोक बंगल्याकडे फिरकेनासे झाले कि मग मध्यरात्री तिथे जाऊन आपण पुरलेला ऐवज शोधायचं मी ठरवलं. आधी बरेच दिवस मला ती जागा सापडेना कारण मला आत्ता नेमकं आठवत न्हवत कि रात्रीच्या अंधारात मी तो ऐवज कुठे पुरला होता. मग मी बंगल्याच्या आतमधे सुद्धा खोदकामाला सुरुवात केली. रंगा आणि बाळूच्या मदतीने आधीच वरवरची जमीन भुसभुशीत करून घेतली होती. भुतांच्या अफवेचा जोर चांगलाच पसरलेला होता. बंगला बळकावण्याच्या उद्देशाने बरेच दलाल प्रयत्न करू लागले, त्यात मिस शीला हिने तर एका बाईला तिथे भूत बनून रात्रीचं उभं राहायला सांगितलं हे मला समजलं हे तर माझा पथ्यावरच पडलं आणि लोक आता इथे बंगल्याच्या आसपास देखील यायला कचरू लागले, पण तरीही दलालांच्या दबावाला बळी न पडता शेंडेनी तो बंगला कोणाला विकू नये आणि माझ्या शोधकार्यात अडथळा येऊ नये, म्हणून मी शेंडेना विनवलं कि एवढी महाग मालमत्ता कवडीमोल भावात विकू नका. आपली काळजी वाटुन अनमोलने आपल्याला हा सल्ला दिला असं वाटून शेंडेनी सुद्धा बंगला कोणाला विकायचा नाही हे ठरवलं आणि मग माझं काम बिनधोक झालं. शेंडेनी बंगला कोणी विकू नये तसेच बंगल्याच्या आसपास देखील कोणी फिरकू नये असं मला वाटत होतं. बंगल्यात सगळ्या ठिकाणी जागा खणल्यावर मला अपयश आलं.

आता फक्त आतली हॉलवजा मोठी खोली खोदायची राहिली होती ऐवज नक्की त्याचं ठिकाणी पुरला असणार असं वाटून मी तिथे खोदायला चालू केलं होतं. नंतर काही दिवसांनी रंगा आणि बाळू पकडले गेल्याचं समजलं मग मात्र मी कामाला वेग घेतला आणि आतल्या मोठ्या खोलीतच खाली तो ऐवज आहे हे मला समजलं होतं. त्यानुसार काल मी तो ऐवज घेण्यासाठीच तिथे गेल्यावर पकडला गेलो.
हि सगळी कहाणी सांगून अनमोल गप्प बसला.

त्याच्या या बोलण्यावर काहीही न बोलता रॉबिनने इ. इनामदारांना इशारा केला. इनामदारांनी लगेचच मागच्या खोलीतून रंगा आणि बाळूला रॉबिनपुढे आणले. अनमोलची चौकशी करायच्या आधीच रॉबिनने रंगा आणि बाळूला बाजूच्या खोलीत अनमोलचा आवाज ऐकू येईल अशा खोलीत उभं राहायला सांगितलं होतं.

“ या सनी धोत्रेची कहाणी जी आत्ता तुम्ही मागे उभी राहून ऐकली, त्यावरून त्याचा आवाज कसा आहे हे तुम्हाला समजलंच असेल, तर तुम्हाला बंगल्यात आरडाओरडा करण्यासाठी पैसे देणारा मनुष्यसुद्धा हाच होता का?” रॉबिनने रंगा आणि बाळूला प्रश्न विचारला.
“ होय साहेब, हाच आवाज होता त्या माणसाचा ज्याने आम्हाला पैसे दिले होते” रंगाने पुष्टी दिली.
चौकशी उरकून रॉबिन आणि इनामदार चौकशी खोलीतून बाहेर आले.

“शेंडे साहेब तुमचं टेंशन आता गेलं असेलं, बंगल्यात कोणती भुते होती हे तुम्हाला समजलंच असेल आता” बाजूच्या खुर्चीवर बसत रॉबिन हसत म्हणाला.
“ खरंच रॉबिन एका मोठ्या तणावातून तुम्ही मला बाहेर काढलंत यासाठी मी तुमचा शतशः ऋणी राहीन” शेंडे साहेब हात जोडतच म्हणाले.
“ खरंच रॉबिन, मला तुझा नेहमीप्रमाणे आजही अभिमान वाटतो. तुला इथे बोलावण्याचा निर्णय अगदीच सार्थ झाला” हरिभाऊ अभिमानाने रॉबिनकडे पाहत म्हणाले.
“ पण रॉबिन अनमोल उर्फ सनीने लपवलेला तो ऐवज चोरीचा असून आपल्याला तो संबंधित मालकाला सुपूर्त करावा लागेल” इनामदार काळजीयुक्त स्वरात म्हणाले.

“ काळजी करू नका मी ज्या खोलीत लपून अनमोल वर झडप घातली होती, त्या मोठ्या खोलीच्या एका कोपऱ्यातच जिथे अनमोल खणत होता तिथे आणखी खाली खणले असता तो ऐवज तुम्हाला सापडेल. तो तुम्ही संबंधित व्यक्तीला सुपूर्त करा” रॉबिन खुर्चीवर रेलत म्हणाला.
‘ रॉबिन त्या बंगल्यात भुते नाहीत हि गोष्ट तुला आधीपासूनच माहित होती ना?” इ. इनामदारांनी विचारलं.
“ हो, म्हणजे जेव्हा मी प्रथम शेंडेसाहेबांच्या बंगल्यावर हरिभाऊंच्या सोबत पाहणीसाठी गेलो असता तिथे भिंतीवर लिहिलेला मजकुर आणि सामानाची फेकाफेक हा प्रकार कोणत्या तरी माणसाचाच आहे हे मला पक्क माहित होतं, थोडीफार पाहणी केल्यावर शेंडेंच्या घराच्या मागच्या बाजूनेच कोणीतरी आतमधे येऊन तो प्रकार केला असणार असा तर्क मी लावला, तसं मी हरिभाऊंना देखील सांगितलं होतं आणि आत्ताच सनी धोत्रेने सुद्धा ते मान्य केलं आहे. तसचं बंगल्यात पाहणीसाठी गेल्यावरसुद्धा तिथे पडलेले ढिगारे आणि जागोजागी पडलेले खड्डे इथे कोणीतरी काहीतरी अमूल्य गोष्ट शोधत असल्याचीच साक्ष देत होते” रॉबिन म्हणाला.
“ आज रात्रीमध्येच तो अनमोल उर्फ सनी धोत्रे बंगल्यावर येणार याची तुला खात्री कशी काय बऱ होती शिवाय त्याचं नाव सनी धोत्रे आहे हे तू कसं काय ओळखलंस?” इनामदारांनी पुन्हा प्रश्न केला.

“ रंगा आणि बाळूला पकडल्यावर माझी खात्रीच झाली कि त्यांना कोणीतरी गुन्हेगारी जगताशी संबंध ठेवणाऱ्या माणसानेच पैसे देऊन भूताटकीचे कृत्य करायला लावलं आहे, मिस शीला हिने फक्त बंगला स्वस्तात मिळावा या उद्देशानेच तमाशात काम करणाऱ्या बाईला तिथे बंगल्यात रात्री उभं राहायला लावलं होतं. तुम्ही जेव्हा तमाशाच्या फडातील बाईला शोधायला गेला होतात तेव्हा मी मागच्या वर्षभरातील सगळ्या गुन्हेगारी घटनांचे आणि त्यातील सामील आरोपींचे रेकॉर्ड व फोटो पाहत इथे पोलीसस्टेशनवर बसलो होतो, त्यात मला वर्षभरापूर्वी एका दरोड्यातील आरोपात असणारा एक गुन्हेगार दिसला ज्याचं नाव सनी धोत्रे होतं, सोबत जोडलेल्या फोटोमध्ये पाहिल्यावर तो माणूस आपण नक्की कुठेतरी पहिला असल्याची जाणीव झाली, नंतर आठवलं कि शेंडेंच्या पतपेढीवर काम करणाऱ्या अनमोलशी या फोटोचं साम्य जुळतंय, अनमोलला आत्ता दाढी मिश्या असत्या तर तो असाच दिसला असता असं मला वाटलं. म्हणजेच रंगा आणि बाळूला पैसे देणारा आणि रात्री अपरात्री बंगल्यात येऊन खोदकाम करणारा अनमोलच असला पाहजे हे मला वाटू लागलं. रंगा आणि बाळू पकडले गेले आहेत म्हटल्यावर सनी धोत्रे शक्य तितक्या लगबगीने बंगल्यात येऊन त्याला हवी असलेली वस्तू शोधायला येणार हे उघडंच होतं” रॉबिन म्हणाला.

“ तुझ्या योजनेनुसार तो आला सुद्धा आणि अलगद आपल्या जाळ्यात सापडला सुद्धा” इनामदार खुषीत येऊन म्हणाले.

यावर रॉबिन फक्त हसला.
“ चला हरिभाऊ, आता मला खूप भूक लागली आहे. घरी जाऊन मस्तपैकी जेवण करून ताणून देऊयात” रॉबिन शरीराला आळोखे पिळोखे देत खुर्चीवरून उठत म्हणाला.

“ हो चला.. मला सुद्धा बंगल्याच्या बांधकामाच काम लवकरात लवकर पूर्ण केले पाहजे आणि ते सुद्धा इतर कोणती नवीन भुते बंगल्यात उच्छाद मांडण्याच्या आत” शेंडे साहेब हसत म्हणाले.

शेंडे साहेबांच्या या वाक्यावर मात्र रॉबिन, हरिभाऊ मोठ्याने हसले आणि त्यांच्या या हास्यात केशवसह इन्स्पेक्टर इनामदार सुद्धा सामील झाले.

समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

छान झाली कथा
गुप्तहेर कथा तशा predictable वाटतात, सगळी संशयित पात्र समोर असतात पण शेवट अनपेक्षीत झाला तर कथेच यश त्यात असत.
ह्या कथेचा शेवट अगदीच धक्कादायक किंवा अनपेक्षीत वाटला नाही तरी एकंदरीत छान खुलवली आहे.
रॉबिन ची मालिका बराच काळ चालू रहावी

जमलिये कथा.
रहस्य कथा मस्त लिहिता तुम्ही.

Back to top