आयपॉड वर गेम खेळता खेळता एकदा माझ्या मुलीने मला विचारले. बाबा तू लहान होतास तेव्हा टिव्ही होता का? मी म्हणालो नव्हता. आयपॉड होता का? मी म्हणालो नव्हता. मग तू काय करायचास? तेव्हा मी विचार करायला लागलो, खरंच यातले काहीच नव्हते पण तरीही मस्त दिवस होते ते कारण तेव्हा आजी होती आणि तिच्या गोष्टी होत्या.
माझे लहानपण म्हणजे १९७७ ते १९८५ चा काळ. पहिली ते आठवी. या संपूर्ण काळात मला आजी सतत लाभली. संध्याकाळी देवघरात देवासमोर दिवा लागला की मग शुभंकरोती म्हणायचे. त्यानंतर काही ठरवलेले श्लोक म्हणायचे आणि मग काही कविता. असा परवचा झाला की मग मी आणि माझी चुलत बहीण आजी जवळ जाऊन बसायचो. तेव्हा काकांचे घर आमच्या बाजूलाच होते म्हणून मी आणि अंजू मंजू एकत्रच वाढलो खेळलो आणि आजीच्या गोष्टीत पण वाटेकरी झालो.
आई बाबांना कामासाठी बाहेर जावे लागे. त्यांना घाई असायची. आजी घरीच असायची. तिला नेहमी हवा तितका वेळ असायचा. हे आमच्यासाठी खूप छान होते, कारण सतत तिच्या आजुबाजुला करता येई. तर परवचा झाला की मग आजीजवळ जाऊन बसायचे आणि आजी गोष्ट सांग म्हणायचे. आजी गोष्टीला कधीच म्हणजे कधीच नाही नाही म्हणायची.
आता मला आठवतेय की तेव्हा तर टिव्ही नव्हतेच, लहान असताना आमचे वाचन किती ते असणार. आजीने गोष्टीच्या माध्यमातून आम्हाला रामायण, महाभारत, शिवाजी महाराजांची गोष्ट इतकेच नव्हे तर अगदी इंदिरा गांधींपर्यंत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास गोष्टीच्या रूपात सांगितला. तिची गोष्ट सिरियल सारखी चालायची. आज इतकेच आता पुढचे उद्या म्हटले तिने की मग आम्ही लहान मुले झोपायला जात असू.
या गोष्टींना बहर यायचा जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्या लागायच्या. उन्हाळ्याच्या सुट्यांमधे एक अजून रोमांचक कार्यक्रम असायचा गोष्ट सुरू व्हायच्या आधी. सगळे अंगणात झोपायचे. हो घराच्या अंगणात बिछाने घालून सगळेच बाहेर झोपायचे. तेव्हा आपल्या घरी एसी आहेत तसे काही नव्हते. लोखंडाचे स्टॅंड होते. त्रिकोणी आकाराच्या दोन पायांवर एक आडवी लोखंडी जोडणारी दांडी असलेले दोन स्टॅंड लावून त्यावर तिन लाकडी पाट्या लावल्या जायच्या. आणि असा बिछाना झाला की त्यावर गादी घालून झोपायची तयारी व्हायची. आईने संध्याकाळीच अंगणार सडा घातलेला असायचा म्हणून जमीनीतली उष्णता काही अंशी कमी झालेली असायची. असे बिछाने लागले की मग त्या बिछान्यावर बसून मंद हवेच्या झुळुकींबरोबर आजीची गोष्ट सुरू व्हायची.
जेव्हा १९८२ मधे नागपुरात टिव्ही आले त्यानंतर काही वर्षांनी आपल्याही घरी टिव्ही आला. त्यात रामानंद सागर यांचे रामायण लागायचे तेव्हा मला वाटायचे अरे ही गोष्ट आपल्याला पूर्ण माहित आहे कारण आजीने रंगवून रंगवून ती आधीच सांगितलेली असायची. तसेच महाभारत लागले किंवा भारत एक खोज हे सिरियल नंतर तेव्हा लागायचे तेव्हापण त्या गोष्टी मला माहितच होत्या. त्यातून कळते की आजीने केवढी मोठी शिदोरी मला देऊन ठेवलेली होती.
सुरवातीला तिने पण आम्हाला, चिऊ काऊच्या, कोल्होबाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. इसापनितीच्या गोष्टी पण काही सांगितल्या होत्या. पण माझ्या मनात सदैव लक्षात राहतील अश्या तिच्या ज्या गोष्टी राहून गेल्या त्या आहेत रामायण, महाभारत, शिवाजी महाराजांची गोष्ट आणि भारताचा स्वातंत्र्य लढ्याचा संपूर्ण इतिहास. तेव्हा आजी म्हणजे जादूची पेटी वाटत असे. तिला इतक्या गोष्टी माहित होत्या.
आता विचार करतो तेव्हा कळते की आजी सतत वाचत असायची. आई सांगते की आजी फक्त पाचवी पर्यंत शिकलेली होती. पण नंतर वाचन करून तिने स्वतःला खूप तयार केले शिकवले. आईच्या कोविद च्या परिक्षेत आजीची खूप मदत झाली इतके तिचे वाचन अफाट होते. या वाचनातूनच तिने आम्हाला इतक्या गोष्टी सांगितल्या असतील. गोष्ट सांगायची तिची चिकाटी अफाट होती. आजी गोष्ट सांग म्हटले की ती नेहमी तयार असायची. कोणती गोष्ट सांगू असे तिला कधिच म्हणावे लागले नाही.
हं काल कुठपर्यंत आलो होतो आपण. शिवाजी महाराज आणि संभाजी राजे अफझलखानाच्या कैदेत जाऊन अडकले होते काल. बरोबर मग काय झाले... असे म्हणून तिने गोष्ट सुरू केली की आमची तंद्री लागायची तिने सांगितलेल्या गोष्टी झोप येईपर्यंत ऐकत राहण्याची. तेव्हा टिव्ही नव्हते, टिव्ही आले तरी आजी आणि तिच्या गोष्टींची सर टिव्ही ला कधीच आली नाही. त्यामुळे आम्हाला आजीचा खूप सहवास लाभला.
मधे मधे आजी तिचीच गोष्ट पण सांगायची. आजोबांच्या सरकारी नोकरीमुळे वेगवेळ्या गावी बदली व्हायची. मग काय काय व्हायचे. समितीमधे तिने केलेल्या काही गोष्टी. तिच्या लहानपणीच्या काही गोष्टी, तरीही त्या मला आता आठवत नाहीत आणि सतत हळहळ वाटते की आपण आजीला तिची पूर्ण गोष्ट तेव्हा विचारली नाही. तिच्या बद्दल आपल्याला खूपच कमी माहित आहे आणि आता विचारायची पण सोय नाही कारण आता आजीच नाही.
मला वाचनाची सवय आजीमुळेच लागली यात शंकाच नाही. मला आठवते की शासकीय जिल्हा ग्रंथालयातून आई कादंबऱ्या आणायची आजीसाठी आणि त्या दोघी तेव्हा त्या मराठी कादंबऱ्या वाचायच्या, त्याच ग्रंथालयात एकदा मला एक मोठ्ठे पुस्तक दिसले ते होते शेलार खिंड. नंतर त्या पुस्तकावर मराठी सिनेमा पण आलेला सर्जा नावाचा. भालजी पेंढारकरांनी लिहिलेले ते शेलारखिंड हे मला आठवते असे पहिले मोठे पुस्तक असावे जे मी पूर्ण वाचून काढले होते. त्यानंतर माझे वाचन कधी थांबलेच नाही.
नेहमी वाचताना आधी आपल्याला माहित असलेले पडताळून पाहायची सवय होती. आजीने सांगितलेलेच असल्याने गोष्टी बऱ्याच माहित होत्या त्यात अजून काय झाले हे शोधून काढायला मजा यायची.
आजकाल असे झाले आहे की टिव्ही आणि फोन आल्याने लोकांचा खूप वेळ त्यातच जाऊ लागलाय. त्यामुळे आजीच्या गोष्टी हारवत चालल्या आहेत. आजीपण आता टिव्ही पाहण्यातच गुंग असतात आणि मुले ऑयपॉड किंवा फोन मधे खेळण्यात. या तंत्रज्ञानाने एक खूप सुंदर अशी गोष्ट तुमच्यापासून हिराऊन नेली आहे ती म्हणजे आजीची गोष्ट. तरीही एक सांगतो की जेव्हा पण मोठी मंडळी तुम्हाला भेटतात त्यांना त्यांची गोष्ट विचारत जा. सेवानिवृत्त झालेल्या आजी आजोबांना त्यांच्या वेळेसच्या गोष्टी विचारत जा. त्यांच्याजवळ खूप गोष्टी असतात आपण विचारल्या तर ते त्यांची गोष्ट आपल्याला नक्की सांगतात. किंबहुना त्यांना कुणी विचारले तर खूप आवडते हे लक्षात ठेव.
असे सांगून मी मुलीला उत्तर दिले. तिच्या या प्रश्नामुळे मला आजीबरोबर घालवलेल्या त्या सुवर्णकाळाची एक सफर घडली आणि सुखाऊन गेली.
तुषार जोशी,
नागपूर, रविवार ४ जानेवारी २०२५
आवडले.
आवडले.
छान लेख.
छान लेख.
सेवानिवृत्त झालेल्या आजी आजोबांना त्यांच्या वेळेसच्या गोष्टी विचारत जा. त्यांच्याजवळ खूप गोष्टी असतात आपण विचारल्या तर ते त्यांची गोष्ट आपल्याला नक्की सांगतात. किंबहुना त्यांना कुणी विचारले तर खूप आवडते हे लक्षात ठेव.>>>+1 हे मी वडीलांसोबतही करते आपण फक्त विषय काढायचा आपल्याला त्यांची लाईफ स्टोरी गोष्टीस्वरूपात ऐकायला मिळते मग ती कितव्यांदाही असो ऐकायला मजा येते.
छान. आवडला.
छान. आवडला.
छान लेख.
छान लेख.
<सेवानिवृत्त झालेल्या आजी आजोबांना त्यांच्या वेळेसच्या गोष्टी विचारत जा. त्यांच्याजवळ खूप गोष्टी असतात आपण विचारल्या तर ते त्यांची गोष्ट आपल्याला नक्की सांगतात. किंबहुना त्यांना कुणी विचारले तर खूप आवडते हे लक्षात ठेव.> हे मी माझ्या बाबांसाठी ठेवलेल्या केअरटेकरकडून शिकलो. तो बाबांना त्यांच्या तरुणपणीच्या गोष्टी विचारे. त्यानिमित्त त्यांच्या मेंदूला व्यायाम आणि बोलतेही होत.
तेव्हापासून मी माझ्या परिचयातल्या अनेक अतिज्येष्ठांना त्यांच्या तरुणपणाबद्दल, लहानपणाबद्दल बोलतं करतो. अनेकदा तीच तीच उत्तरं ऐकायला लागतात, पण पहिल्या वेळच्याच उत्सुकतेने ऐकतोय असं दाखवतो.
छान लेख, आवडला !
छान लेख, आवडला !
रामायण महाभारत अगदी लहानपणी बघितले तरी त्या आधीच ते माहीत होते हे खरे आहे आणि त्याचे कारण वाचन आणि आईने सांगितलेल्या गोष्टी हे सुद्धा खरे आहे..
नुकतेच छावा निमित्त मनात विचार आलेला की आताच्या मुलाना चित्रपटातून वीर मराठी मावळ्यांची माहिती मिळत आहे, आता छावा मधून संभाजी राजेंबद्दल सुद्धा समजेल. पण किती जणांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत असेल जो या सर्व कथांना गुंफतो... तो आपणच सांगायला हवा. त्यांच्यावर नवा चित्रपट यायची वाट बघायला नको.
मागच्या पिढीतील वैयक्तिक अनुभव जसे ज्येष्ठांना सांगायला आवडतात तसे ते लहान मुलाना ऐकायला सुद्धा आवडतात. आजी आजोबा आणि नातवंडे यांच्यातील संवाद वाढायला हवा.. पण हल्ली किती कुटुंबात अश्या आजी आजोबा नातवंडांच्या जोड्या एकत्र नांदतात हा वेगळा विषय होईल.
छान लेख.
छान लेख.
आम्हाला आजी (आईची आई ) फक्त उन्हाळ्यात मिळायची. तिच्या गोष्टी ठरलेल्या होत्या की आम्हीच मागे लागायचो तीच गोष्ट सांग म्हणून... आठवत नाही पण रोज रात्री कोंडाळ करून बसायचो तिच्याभोवती.
@रानभुली, @सिमरन, @आर्च, @
@रानभुली, @सिमरन, @आर्च, @@भरत, @ऋन्मेष, @SharmilaR,
अभिप्रायांसाठी अनेक धन्यवाद मंडळी.
.
याच निमित्ताने तुमचे अनुभव आणि विचार वाचायला मिळाले हे देखील आवडले
सुंदर लिहीलंय. दोन्ही
सुंदर लिहीलंय. दोन्ही आज्यांचा सहवास फार न लाभल्याने हे सगळं अप्रूपाचं वाटतं.
छान.. रम्य आठवणी जागवणारा
छान.. रम्य आठवणी जागवणारा लेख!
वाचायला लागल्यावर आजीने जनरल गोष्टी सांगायच्या बंद केल्या तरी कौटुंबिक जुन्या गोष्टी अगदी रंगवून सांगे आणि त्याच त्या गोष्टी ऐकायला भारी मजा यायची.. त्यातच एक दोन बोधपर / उपदेश ती सांगून जात असे..
गोष्ट सांगणाऱ्या माझ्या दोन
गोष्ट सांगणाऱ्या माझ्या दोन आज्यांची ही एक गोष्ट...
https://www.maayboli.com/node/83149#comment-5076615
सुरेख लिहिलंय.
सुरेख लिहिलंय.
माझी आई खूप बोलकी होती त्यामुळे ती स्वतःहून तिच्या बालपणापासून सर्व सांगायची. शेवटी काही वर्षे तिला अल्झायमर झालेला, ती नवीन गोष्टी विसरायची पण जुन्या जशाच्या तशा लक्षात होत्या. बाबांचं एकंदरीत जनरल नॉलेज खूप होतं पण कमी बोलायचे मग त्यांच्या आवडीचे कोकण, बालपण याबद्दल आम्ही विचारत रहायचो मग भरभरून बोलायचे. आई गेल्यावर जास्तच विचारायचो आणि व्हिडीओज केले. तंत्रज्ञान व्हिडीओ करण्याच्या कामी आलं मात्र, आई बाबांची आठवण आली की बघतो. अर्थात ते मनात आहेतच पण तरी समोर आहेत असं वाटतं. सेम सा बां बाबत, त्यांची मेमरी शार्प होती. शंभरी उलटलेल्या आजे सा बा ही असंख्य आठवणी सांगायच्या, त्यांचे मात्र तुरळक आहेत पण त्यांची आठवण, सांगणे मनात अजून आहे. माझ्या दोन्ही आजींनी आणि एका आजोबांनी सांगितलेल्या आठवणी अशाच मनात आहेत.
किती सुरेख आहे हे. अश्या
किती सुरेख आहे हे. अश्या आज्या हव्यातच खरंतर.
छान लेख. आजीचा सहवास फारसा
छान लेख. आजीचा सहवास फारसा लाभला नाही. आई गोष्टी आठवणी सांगायची त्यात खूप रंगून जायचो. बाबा त्यांच्या आठवणी सांगायचे.
माझ्या आईची आई खूपच लवकर
माझ्या आईची आई खूपच लवकर देवाघरी गेली. बाबांची आई गेली, तेव्हा मी एक वर्षाची होते. त्यामुळे 'आजी' हा कप्पा रिकामा राहीला. आई-बाबांनी अगदी प्रेमाने वाढवलं. लहानपणी आजी नसल्याचं फार वाटलं नाही.
पुढे मला मुलगा झाला. तो त्या बाबतीत नशीबवान आहे. त्याला आजी-आजोबांचा सहवास अजूनही लाभतो आहे. त्याचं ते नातं बघून आपल्याला हे मिळालं नाही, असं जाणवलं.
छान लिहिलंय. मलाही दोन्ही
छान लिहिलंय. मलाही दोन्ही आज्यांचा सहवास भरपूर लाभला. दोघींकडे गोष्टीचा खजिना होता. आजी, आजोबा, आईबाबा सगळ्यांनी गोष्टी सांगितल्या आहेत. कॉलेजात असताना आजोबांचं बालपण, चौदाव्या वर्षी वडील गेल्यामुळे अचानक समोर आलेलं खडतर आयुष्य याबद्दल समजलं. तेव्हा त्यांचा स्वभाव असा का आहे हेही उमागलं. दोन्हीकडील आजोबांची हीच कहाणी पण दोघांच्या आयुष्याकडे बघण्यात जमीन आसमानाचा फरक असं बरंच काही लक्षात आलं.