मध्यंतरी मुलीशी बोलताना वर्गातल्या मैत्रीणींमधे होणाऱ्या कुत्सित टोमण्यांबद्दल आणि हेतूपूर्वक केलेल्या हेटाळणीबद्दल गोष्टी निघाल्या. असे वागणे अशी वर्तणूक सुद्धा छळ (बुलीइंग) मानल्या जायला हवे, मात्र बरेचदा ती इतका आडून आणि चतुराईने काळजीपूर्वक केलेली असतो की आपल्याला ते सिद्ध करता येत नाही. अश्या गोष्टीची तक्रार करता यायला त्याला सिद्ध करता यावे लागते हे पण एक मुकाट्याने तो छळ सहन करत राहण्याचे कारण होते.
रेडीट वरती लाईफ प्रो टिप्स या धाग्यावर एक विचार पुन्हा वाचनात आला होता तो म्हणजे कुणी तुम्हाला काही दुखावणारे बोलले, किंवा आडून छळवाद करण्यासाठी काही शब्द बोलल्या गेले तर त्यांना थांबवून विचारावे की हे शब्द किंवा ही कृती माझा अपमान करण्यासाठी तुम्ही केली आहे का? इतर लोकांच्या समोर ते विचारले तर अधिक उत्तम.
सहसा छळ करणारे छळ सहन केला जातोय या एकाच कारणासाठी तो पुन्हा पुन्हा करायला मोकळे होत असतात. जर असे टोकले गेले आणि त्यांचा तसा उद्देश नसेल आणि ते अजाणतेपणी झाले असेल तर ते शब्द मागे घेतील, काहीतरी स्पष्टीकरण देतील आणि तसे नव्हते असे कबूल करतील. त्यांनी मुद्दाम केलेले असताना देखील त्यांनी माघार घेतली तरी तुमचा मुद्दा समोर आला, तुम्ही तुमचा प्रतिकार नोंदवला असे होते आणि पुन्हा तेच करण्याबाबत ते फेरविचार करतील.
जर छळ मुद्दाम होत असेल आणि इतरही लोक त्यात त्यांना शामिल असतील तर ते कदाचित तुमच्या या विचारण्याला हो असे उत्तर देतील. इथे आपण गृहित धरतोय की त्यांना तुमचा आदर नाही हे उघड मान्य करणे त्यांना त्यांच्या सामाजिक दर्जामुळे, कुणाच्या पाठींब्यामुळे किंवा इतर काही घटकांमुळे शक्य आहे. अशी वेळ आणि छळ कुणाच्या वाट्याला येऊ नये आणि शाळेची, कॉलेजची आणि कचेरी ची काही यंत्रणा अश्या कृत्यांना आळा घालण्यासाठी असावी, आणि ती यंत्रणा कशी कामास आणायची यावर वारंवार प्रशिक्षण दिल्या जायला हवे. आपण सध्या वैचारिक प्रयोग म्हणून शक्यता पडताळतो आहोत त्यामुळे, जर त्यांनी हो तुझा अपमान करायचाच हेतू आहे असे कबूल केले तर काय करायचे?
आपले प्रश्न विचारणे यात आपला प्रतिकार नोंदवल्या जातो हे लक्षात ठेवायचे. त्यांच्या सोबत या उत्तरात किती लोक शामिल आहेत हे समजून त्यांचा उल्लेख करून तुम्ही इतक्या लोकांना माझा अपमान करायचा आहे असे मी मानायचे का असे विचारून सगळ्यांना उत्तरदायी करायचे. यातच काही लोक असतील की ज्यांना ते पटत नाही तेव्हा काही लोक तुमच्या बाजूने बोलायला पुढे येतात का ते पण बघायचे. थोडक्यात काय ही कृती तुमच्या कडून होणे हाच एक महत्वाचा टप्पा आपण गाठला हे समजून घ्यायचे.
मुली बरोबर अश्या गोष्टी आपण करू शकतोय यासाठी मला मनातून समाधान वाटत होते. आपले घरातले वातावरण इतके मोकळे आहे की अश्या विषयात झालेले मैत्रिणींमधले संवाद बाबाला सांगणे ती करू शकते आहे याचा मला आनंद वाटला. आणि आपल्या शाळेत घडलेल्या छळाच्या काही घटना मनापुढे तरळून गेल्या आणि सरसरून अंगावर काटा आला.
पाचवी ते आठवी च्या काळात माझ्या वर्गातले काही विद्यार्थी माझा छळ करायचे. मला प्रतिकार करता येत नाही हे त्यांच्याजवळ असलेले एक कारण असावे पण त्याहूनही मोठे त्यांचे कारण असे होते की ते वर्गात पहिला, दुसरा क्रमांक येणारे हुशार विद्यार्थी होते म्हणजेच शिक्षकांचे लाडके विद्यार्थी होते. त्यांच्या विरूद्ध तक्रार केली तरी त्यावर शिक्षक हे हुशार विद्यार्थी असे करूच शकत नाहीत असे गृहित धरून फार गांभिर्याने ते घ्यायचेच नाहीत.
एका खेळाच्या सुट्टीत त्या हुशार मुलांच्या गटाने ठरवले की आपरेशन आपरेशन खेळायचे आणि जोशी ला पेशंट बनवायचे. त्यांनी माझ्या हाता पायांनी धरून माझा शर्ट वर करून पोटाचे ऑपरेशन चालले आहे असा खेळ सुरू केला. मी प्रतिकार करत होतो पण खेळात काहीतरी चालू आहे समजून फार कुणी लक्ष दिलेले नव्हते. मी त्यातून कसाबसा निसटून आमचे पिटी शिक्षक बागडे सरांकडे जाऊन त्यांची तक्रार केली तेव्हा त्यांनी त्या सगळ्यांना काय झाले विचारले तेव्हा त्यांनी काही नाही सर गंमत केली थोडी फार काही झालेले असे सांगितले, आणि बागडे सरांनी त्यांना धड रागवलेले पण मला दिसले नाही आणि त्या गोष्टीचा व्रण आणि परिणाम असा झाला की पुढचे कितीतरी वर्ष त्या वर्गमित्रांनबाबत माझ्या मनात आकस कायम राहिला. अजूनही जेव्हा कधी शाळेच्या मित्रांचे एकत्रिकरण होते तेव्हा त्या वर्गमित्रांना पाहून मी ती घटना आठवतो आणि मला त्यांच्याशी निट मोकळेपणाने बोलताही येत नाही.
आमच्या वेळेत घरी आई वडिलांना अश्या क्षुल्लक गोष्टी सांगायची पद्धत नव्हती, सांगितले तरी त्यात काय एवढे असे ऐकायला मिळेल याची शक्यता अधिक असे. शाळेत सुद्धा काऊंसेलर असणे किंवा मुलावर अभ्यासात काही परिणाम होतोय का किंवा वागणे अचानक बदलले त्याचे काय कारण असेल याचा शोध घेणे किंवा तसा सर्वांगिण विचार शाळांमधे नव्हताच. आता पन्नाशीतही मी जेव्हा ती घटना विसरू शकत नाही आणि त्या वर्गमित्रांना मनाने क्षमा करू शकलेलो नाही तेव्हा लक्षात येते की ती घटना साधी नव्हती तेव्हा माझ्या स्वाभिमानाच्या टिकऱ्या उडालेल्या होत्या आणि आपले ऐकून घेणारे कुणी नाही याची घोर निराशा आयुष्याला चिकटून राहिली हे कळते.
या पार्श्वभूमीवर आपल्या मुलीशी आपण या पातळीवर छळ त्यावर काय करायचे त्याचे उपाय असे विषय बोलतो आहोत याचा मला अभिमान वाटला.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२५
(जागरूक पालक)
तुषार जोशी
नागपूर, मंगळवार २८ जानेवारी २०२५
छळ करणारे छळ सहन केला जातोय
छळ करणारे छळ सहन केला जातोय या एकाच कारणासाठी तो पुन्हा पुन्हा करायला मोकळे होत असतात. >>
त्यांना तुमचा आदर नाही हे उघड मान्य करणे त्यांना त्यांच्या सामाजिक दर्जामुळे, कुणाच्या पाठींब्यामुळे किंवा इतर काही घटकांमुळे शक्य आहे. >> सहमत.
छान लेख आणि छान विषय.
छान लेख आणि छान विषय.
मुलांसोबत क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींवरचा संवाद देखील महत्त्वाचा याला +७८६
लहानपणी मी सुद्धा असे अनुभव घेतले आहेत. एका ठराविक पिरीअडमध्ये जेव्हा माझा स्वतःचा कुठला ग्रूप नव्हता आणि मी अंगापिंडाने शक्तीमान नव्हतो. एकुलता एक असल्याने भाऊ बहिण सुद्धा नव्हते. आई वडील दोघे जॉबला असल्याने अश्या प्रसंगी कुठली सपोर्ट सिस्टीम नव्हती. स्वाभिमानाला बसलेले बरेच धक्के झेलले. काय कसे किती ही मोठी पोस्ट होईल..
पण मग त्यावर मी माझ्या पुरता उपाय शोधला. तो म्हणजे आपणही टग्या बना..
पण घरचे संस्कार आणि मूळ स्वभाव म्हणा याने ते शक्य नव्हते. मग तसा मुखवटा चढवा.
हा फार पोहोचलेला आहे, अशी आपली किर्ती पसरली की मग कोणी आपल्या नादाला लागत नाही.
आता स्वतःच्या मुलांबाबत असे काही घडू नये याची काळजी घेत ती देखील घरचे संस्कार आणि आपलाच अंश म्हणून हाताबाहेर जाणार नाहीत यावर विश्वास ठेवून त्यांना देखील रफटफ बनविण्याकडे कल असतो. तसेच आपण त्यांना सगळीकडे पुरणार नाही म्हणून त्यांचा मित्रांचा ग्रुप स्ट्राँग राहील हे बघतो. त्यांच्या मित्रांना मुलासारखेच इक्वली ट्रीट करतो. दोन्ही भावंडाच्या मनावर बिंबवले आहे की भले घरी एका चोकलेट वरून एकमेकांची डोकी फोडा पण बाहेर तुम्ही एक टीम आहात. आणि ते तसेच वागतात.
शाळेने कायदे नियम बनवायला हवेत, अश्या गोष्टी गांभीर्याने घ्यायला हवे वगैरे योग्य असले तरी ते सारेच आपल्या हातात नाही. आणि प्रश्न नुसता शाळेचा नसतो तर हे कुठेही होऊ शकते. आयुष्यभर होऊ शकते. त्यामुळे जे आपल्या हातात आहे ते करावे.
प्रत्येकाला आपला स्वाभिमान जपायचा हक्क आहे आणि आपणही इतरांचा जपावा.
स्वताच्या मुलांचा आपल्याकडून दुखावला जाणार नाही याचीही काळजी घ्यावी. किंबहुना कुठल्याच मुलांचा दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी. कारण त्यांना काय करावे ते कळत नाही, आणि तुम्ही म्हणता तश्या जखमा खोलवर राहतात..
इथे एक चर्चेचा धागा होता.
लहान मुलांना सेल्फ रिस्पेक्ट नसतो का?
https://www.maayboli.com/node/64564
छान, महत्वाच्या विषयावर
छान, महत्वाच्या विषयावर लिहिले आहे.
ह्या अशा मिळालेल्या वागणुकी मुळे मुखदुर्बल मुलांचे
शारीरिक, मानसिक व शैक्षणिक नुकसान होते.
हे खूप वाईट आहे. एखाद्याला
हे खूप वाईट आहे. एखाद्याला भीती वाटते याबद्दल सहसा भीती वाटणाऱ्या व्यक्तीलाच घाबरट पळपुटा वगैरे नावं ठेवत दोष दिला जातो. त्यांना ज्यावेळी समजून घेण्याची आणि मदतीची अपेक्षा असते त्यावेळी ती न मिळाल्यास त्याचे दुष्परिणाम होतात.
छान लिहिले आहे. तुम्ही
छान लिहिले आहे. तुम्ही सुचवलेला उपाय प्रॅक्टिकल आणि प्रभावी वाटतो. विद्यार्थीदशेत असे काही अनुभव आलेले आहेत, त्याच बरोबर आपणही इतरांच्या नादी लागुन कुणाचे असे बुलिंग तर केले नसेल असेही वाटुन गेले.
महत्वाचा विषय मांडलेला आहे.
महत्वाचा विषय मांडलेला आहे.
एखादी ( बुलींग वाटणारी) कृती आवडली नाही तर तिथेच सांगणे महत्वाचे आहे. सांगून फरक पडतोच असे नाही पण नंतर होणारी आपली चिड चिड कमी होते. आपल्याकडून प्रयत्न केला याचे समाधान असते, आणि अर्धी लढाई येथे जिंकल्या जाते.
बुलींग करणे मानसिक विकृती आहे, आणि समोरचा बचावात्मक पावित्रा घेत असेल तर त्याचे प्रमाण वाढते. स्थळ, वेळ, काळ बघूनच निर्णय घ्यायचा असतो.
बुलींग करणे मानसिक विकृती आहे
बुलींग करणे मानसिक विकृती आहे, आणि समोरचा बचावात्मक पावित्रा घेत असेल तर त्याचे प्रमाण वाढते. >>> या आधी इग्नोर करा असा सल्ला सर्रास दिला जात होता. पण तुषार जोशी यांनी सांगितलेला उपाय जास्त प्रभावी वाटतो. काही लोक स्वतः बुली करत नसतात किंवा ट्रोलिंग करत नसतात, पण जेव्हां ट्रोलिंग आपल्या बाजूने असेल, बुलींग आपल्या बाजूने असेल तर त्यांना काहीही आक्षेप नसतो, पण जेव्हां ते आपल्या बाजूने नसेल तेव्हां विरोधात नसले तरीही हे लोक तिथे हजेरी लावून तात्विक मांडणी करायला पुढे धावत असतात. हे इनडायरेक्ट समर्थन नाही का ?
तुषार, आवडला लेख
तुषार, आवडला लेख
<<<<एखाद्याला भीती वाटते
<<<<एखाद्याला भीती वाटते याबद्दल सहसा भीती वाटणाऱ्या व्यक्तीलाच घाबरट पळपुटा वगैरे नावं ठेवत दोष दिला जातो. त्यांना ज्यावेळी समजून घेण्याची आणि मदतीची अपेक्षा असते>>> हपा +७८६
लहानपणी आईने सांगितलेलं,
लहानपणी आईने सांगितलेलं, कुणाची स्वतः:हून खोडी काढायची नाही, पण इतरांनी खोडी काढली तर आरे ला कारे करता आलच पाहिजे.
(मग ह्यात बोलून सोडवणे/कन्फ्रन्ट करणे, भांडाव लागण्यास भांडणे, औथोरीतींकडे जाणे सगळे आले.)
छान लेख विषय महत्त्वाचा आहे .
छान लेख आणि विषयही महत्त्वाचा आहे .
ऋन्मेश चा प्रतिसादही चांगला आणि महत्त्वपूर्ण आहे.पूर्ण प्रतिसादाला+1
बुलिंग कोणत्याही(ऑनलाईन ऑफलाईन)प्रकारचं असो वाईटच आहे एखाद्याचा अपमान आणि छळ यातही फाइन लाईन असते .अपमान सहन केलाही जातो पण छळ सहन करू नये त्यासाठी मुलांनी बुलींग विरोधात जाब विचारणे ,विरोध करणे महत्त्वाचे आहे . कधी कधी चुकीच्या गोष्टी सहन केल्याने समोरच्या व्यक्तीचं फावतं आणि त्रास देण्याची वृत्ती वाढते. अन्याय करणाऱ्याबरोबर अन्याय सहन करणारी एका रीतीने दोषी असतो या न्यायाने बुलींग सहन करणेही चुकीचे आहे.त्यामुळे किमान आवाज उठवणे स्वतः साठी स्टँड घेणे महत्त्वाचे आहे आणि यासाठी मुलांशी बोलणे त्यादृष्टीने त्यांच्यात विश्वास निर्माण करणे आणि खंबीर टफ बनविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
@रानभुली, @Buki, @मानव, @उदय,
@रानभुली, @Buki, @मानव, @उदय, @भ्रमर, @नानबा, @कल्की – अनेक धन्यवाद मंडळी वेळ देऊन अभिप्राय लिहिलात आणि तुमचे पण अनुभव मांडलेत म्हणून.
.
@ऋन्मेष – तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसतो का वाला धागा सवडिने वाचायला घेतो. धन्यवाद.
महत्वाचा विषय व चांगली मांडणी
महत्वाचा विषय व चांगली मांडणी, तुषार
महत्वाचा विषयपॅर्लेखाच्या
महत्वाचा विषय!
लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केले आहे तसे पॅसिव अॅग्रेसिव बुलिंग हे फार कॉमन आहे विशेषतः मिडलस्कूल पासून पुढल्या मुलींमधे. कामाच्या ठिकाणीही हे पॅसिव अॅग्रेसिव बुलिंग बघायला मिळते. एखादी व्यक्ती पटकन काहीतरी बोलून-वागून अपमान करते ते वेगळे. त्यात व्यक्तीचे चुकीचे वर्तन उघड असते आणि ते चुकीचे आहे हे आजूबाजूचे मान्यही करतात, त्या व्यक्तीच्या वर्तनासाठी दिलगिरीही व्यक्त केली जाते. हे बुलिंग तसे नसते. एकंदरीत परीणाम 'आपलेच काहीतरी चुकले असावे म्हणून' असे विक्टिमला वाटणे आणि आवाज न उठवणे. त्यामुळे याबाबतचे रेड फ्लॅग्ज माहित हवेत..
अगदी लहान पणापासूनच मुलांना बुलिंग बाबत आवाज उठवायला शिकवणे गरजेचे आहेच परंतू त्या सोबत शाळेत किंवा शाळेबाहेर कुठल्याच प्रकारचे बुलिंग खपवून घेतले जाणार नाही या साठी फॉर्मल नियमावली हवी. मुल मस्तीखोर असणे वेगळे आणि बुली असणे वेगळे. मात्र जबाबदार व्यक्तीही याबाबत गल्लत करतात. मुलांना कसे सुरक्षित ठेवायचे याचे जबाबदार व्यक्तींना ट्रेनिंग हवे आणि जोडीला जबाबदार व्यक्तींसाठी चेक-बॅलन्सही हवे. मुलांना सहज मदत मागणे शक्य व्हावे असे वातावरण देणे फार गरजेचे.
पालकांनी या बाबत जागरुक रहावे. प्री टिन आणि टीनएजर्सच्या बाबतीत सो कॉल्ड मित्र-मैत्रीणच बुली असणे, ग्रुपचा भाग होण्यासाठी छळ सहन करणे हे प्रमाण बरेच आहे. पालकांशी छान वागून विश्वास संपादन पण अपत्याचा शारीरिक-मानसिक छळ या कॅटेगरीतल्याही बर्याच केसेस बघण्यात आल्या. यातले बुली सर्वगुण संपन्न, 'तो/ती बघ कसा/कशी...' कौतुक कॅटेगरीतले होते. त्यामुळे आपले मूल पिडीत होवू नये म्हणून प्रयत्न हवेतच, जोडीला आपले मूलच बुली नाही ना , किंवा बाजूला उभे राहून मजा बघणारे होत नाही ना यासाठीही सजग रहाणे गरजेचे.
छान लेख आणि विषयही महत्त्वाचा
छान लेख आणि विषयही महत्त्वाचा आहे .
लेख आवडला.
लेख आवडला.
अभिप्राय लिहून आवड
अभिप्राय लिहून आवड कळविल्याबद्दल अनेक धन्यवाद मंडळी
छान, महत्वाच्या विषयावर
छान, महत्वाच्या विषयावर लिहिले आहे.
ह्या अशा मिळालेल्या वागणुकी मुळे मुखदुर्बल मुलांचे
शारीरिक, मानसिक व शैक्षणिक नुकसान होते.>>सहमत
लेख आवडला.
लेख आवडला, ते माझा अपमान करणे
लेख आवडला, ते माझा अपमान करणे वाला संवाद करा, वाली रील पाहिलीये. त्यात अजून १- व्हेन समवन इन्सल्ट्स यु, आस्क देम, कूड यु रीपीट व्हॉट यु सेड? ह्याने अपमान करणार्याची संवाद तीव्रता कमी होते.
माझा अपमान करणे हा उद्देश आहे का?- आरसा दाखवला जातो.
आर यु ओके?- अस बोलून तुला समाधान वाटत असेल तर तुझी मानसिक स्थिती ठीक आहे ना? हे तपास. असा अर्थ निघतो.
हे संवाद मुलांशी करता यायला हवेत. छान धागा.
हे संवाद मुलांशी करता यायला
हे संवाद मुलांशी करता यायला हवेत. छान धागा. +१२३४५