आई आणि आज्जी यांच्या पाककृती - शेंगोळे

Submitted by धनि on 27 January, 2025 - 23:33
  शेंगोळे
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुळीथ पीठ ( हुलग्याचे पीठ) - १ वाटी
कणिक / ज्वारी / बाजरी - २/३ चमचे
लसूण - ४ मोठ्या पाकळ्या
हिरवी मिरची - ४ / ५ (तुमच्या आवडी आणि तब्येती नुसार Lol )
कोथिंबीर
जिरे
मोहरी
हळद
मीठ
हिंग
तेल

क्रमवार पाककृती: 

थंडी सुरू झाली की आमच्या कडे हुलग्याचे कढण किंवा उसळ आणि कुळीथ पिठाचे शेंगोळे केले जातात. इतर ऋतूंमध्ये मागितले तर हुलगे उष्ण असतात आणि थंडीत मिळेल असे सांगितले जायचे. तर अशी ही थंडी स्पेशल पाककृती आहे. या वेळेस देशात गेलो असताना थंडी होती मग आईकडून मस्त शेंगोळे करून घेतले आणि भरपूर खाल्ले. इकडे तसेही रमड कृपेने खास कोकणातले कुळीथ पीठ असतेच मग म्हणालो थंडी आहे तर आपण पण शेंगोळे करूच. तसेही जवळ जवळ सहा वर्षे मी तिला शेंगोळे कसले भारी होतात असे सांगून पकवले आहे मग या वेळेस खरंच शेंगोळे पकवले आणि खिलवले.

इथे खाऊगल्लीवर फोटो टाकला तर लोकांना ही गावाकडची गोष्ट खुप आवडली. त्यांनी आग्रह केला म्हणून ही ते म्हणतात ना तशी "Rustic dish" टाकतो Happy (तिखट पदार्थ गोड मानून घ्या Proud )

१) सुरूवातीला लसूण, मिरची, आणि कोथिंबीर एकत्र बारीक वाटून घ्या.
२) कुळीथ पीठ आणि इतर कुठलेही एक पीठ एकत्र करून घ्या.
३) त्यात हे वाटण एकत्र करून घ्या आणि मीठ टाका. थोडे वाटण बाजूला राहू द्या.
४) पाणी घालून थोडे घट्टसर भिजवून घ्या.
५) इकडे गॅसवर कढईमध्ये तेल, जिरे, हिंग, हळद आणि मोहरी घालून खरपूस फोडणी करून घ्या.
६) फोडणी झाल्यावर गॅस थोडा बारीक करून त्यात ते बाजूला काढलेले वाटण घालून परता.
७) वाटण परतून झाले की पाणी घाला.
८) पाण्याला उकळी येऊ द्या.
९) हाताला भरपूर तेल लावून शेंगोळे वळून घ्या. जनरली फोटोत दाखवला तसा आकार करतात. तुम्हाला पाहिजे तर कडबोळ्याचा पण आकार करू शकता.
१०) आता हे शेंगोळे हलकेच उकळत्या पाण्यात सोडा. लगेच हलवू नका. थोडा आकार पकडला आणि वर यायला लागले की थोडे हलवा म्हणजे चिकटणार नाहीत.
११) १० - १५ मिनिटे मध्यम आचेवर उकळू द्या. शिजल्यावर त्यांचा आकार जवळ जवळ दिडपट वाढतो.
१२) कडा असणार्‍या छोट्या थाळीत किंवा वाडग्यात खायला द्या. आवडत असल्यास वरतून पिळायला लिंबू द्या.

वाढणी/प्रमाण: 
बहुतेक दोघांना पुरेल
अधिक टिपा: 

तसे तर हे वन डीश मिल आहे. पण पाहिजे असल्यास बरोबर खायला भाकरी घ्या. त्या सुपाच्या पाण्यात कुस्करून खायला मजा येते.

बरोबर घेताना एखादा रूमाल / टिशू ठेवा. नाकातून डोळ्यांतून आलेले पाणी टिपण्याकरता Wink

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे मराठवाड्यात ज्वारीच्या पीठाचे करतात शेंगोळे. खूप आवडतं पदार्थ आहे माझा. बाकी कृती अशीच असते फक्त शेंगोळे उकळतात त्या पाण्यात थोडे दाण्याचे कुत पण घालतात.
मला शेंगोळे वळायचा कंटाळा येतो. इकडे घराच्या बाकी मेंबराना हा पदार्थ आवडत नाही. मग मी माहेर गावी गेल्यावर आईकडे किंवा जावेकडे खाते. दोन्ही ठिकाणच्या स्वयंपाकाच्या मावश्या तिथून परत यायचा आधी माझ्या आवडते सगळे पदार्थ बनवून खावू घालतात.
कुळीथाचे पिठ नाहीये, पण ज्वारीचे आहे. आज रात्री माझ्यापुरते करेनच

खूप ऐकलं आहे ह्या पदार्था बद्दल. मला खाऊन बघायच्या आहेत एकदा. आमच्या कडे घरचे कुळीथ, कू पी असतं पण कोकणात कधी ही करत नाहीत शेंगोळ्या.
तर ह्या साठी स्पेशल पीठ असतं की घरात पिठल्या साठीच जे पीठ असतं त्याच्या करता येतील ?

व्वा धनि!
एकदम मस्तच आहे तुमची पाकृ. नक्की करून पाहीन.
वेगळी पद्धत आहे. आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने करतात.
त्या सुपाच्या पाण्यात कुस्करून खायला मजा येते.>>>>> खरंच.
"आई आणि आज्जी यांच्या पाककृती" ही तुमची नवीन सीरिज आहे का? मस्त आहे.

खाऊगल्ली गल्ली वर फोटो पाहीला होता इथे पाहिजेच होती ही ऑथेंटीक रेसिपी .शेंगोळे मस्त दिसतायत विठोबाच्या नामा सारखे .रेसिपी छानच.

छान पाककृती.
शेंगोळे सोऱ्या (चकलीचा ) वापरून केले तर चालतील का? पटकन होतील.

धन्यवाद अल्पना. ज्वारीच्या पिठाचे कसे झाले ते नक्की सांगा.

मनीमोहर करून बघा. आवडतील. आमच्या कोकणस्थ बायडीला आवडले.

धन्यवाद युवी

ऋतुराज, सिरीज करायचा विचार आहे. पाहूया Lol

धन्यवाद सिमरन

शर्मिला, चकलीच्या सोऱ्याने जमतील बहुतेक. चकली सारखे पण करतात. फक्त उकळायला कदाचित थोडा जास्ती वेळ लागेल.

मस्त कृती . झणझणीपणा फोटोत जाणवतोय.
खानदान की इज्जत का सवाल असल्यासारखे सुबक वळलेत शेंगोळे.
मायबोलीवर अन्यत्र पाहिलेल्या फोटोंपेक्षा या फोटोतले शेंगोळे रश्श्यात अंमळ लपून बसल्यासारखे वाटतात.
वन डिश मील आहे, तर थंडी जायच्य आत करायला हवं. कुळथाचं पीठ आहे घरी. केलं तर इथे लिहितो.

झकास !

हे हिरव्या मसाल्याचे व्हेरिएशन हिट होणार.
शेंगोळे निगुतीने वळलेत आणि प्लेटिंग तर उच्च ! ❤

साध्या ग्रामीण रेसिपीला glamour प्राप्त करून दिले तुम्ही. ब्रावो !

…आमच्याकडे ज्वारीच्या पीठाचे करतात शेंगोळे….

आमच्याही. बाईंडिंगसाठी थोडेसेच गव्हाचे/ डाळीचे पीठ + भरपूर लाल तिखट टाकून, झणझणीत. नवी पीढी - Rustic Indian Pasta In red hot gravy म्हणते Happy

आता केले की फोटो देतो इथे.

कुळथाचं पिठलं सततच होत असतं घरी. पण हे शेंगोळे खायला धनि तुझ्याकडे यायलाच हवं आता ..... Happy

खुप मस्त आणि यम्मी दिसतायत फोटोत.

फारच मस्त दिसताहेत. हे एकदा केलेले आणि आवडलेले. मग विसरुन गेलो.
यात दाण्याचं कूट पण घालतात का?
आणि या प्रमाणात केलं तर पाणी किती घालायचं?

फोटो आणि पाकृ आवडली. म्हणजे इथे आधी लिहिल्या गेलेल्या रेसिपीतून हा पदार्थ ओळखीचा आहे पण आमच्याकडे केला जात नाही. माझ्याकडे कुळथाचं पीठ पडून आहे. माझ्यापुरतं करुन बघायला हवं. बाकी लोकांना आवडेल की नाही सांगता येत नाही.
ज्यांच्याकडे केला जातो ते फक्त हेच खातात का? की जोडीला काही घ्यायची पद्धत आहे?

कुलथाच्या पिठाचे नवीन आहे ! चांगलेच लागत असणार. आम्ही ज्वारी+कणीक+ बेसन वाले करतो.
हल्ली मी शेंगोळे वळायचा कंटाळा येतो म्हणून शंकरपाळे लाटून वरणफळे करते. कृती तीच सगळी. परवा एक नवीन प्रयोग केला, कुकरमध्ये वरण उकळले की गॅस लहान करून सगळे शंकरपाळे घातले, अन एक शिट्टी काढली.. एकदम यम्मी, शिवाय सारखे झाकण काढून ढवळावे लागले नाही.

रेसिपी वाचली आणि लगेच केली. आज खुप दमले होते, सैपाकाचा मुड नव्हता, अशा वेळी ही पटकन होणारी रेसिपी अगदी देवासारखी धाऊन आली. लेकीच्या डायेटमध्ये बसणारी..

अशी सोप्पी रेसिपी दिल्याबद्दल मनापासुन आभार.

जबरी फोटो आणि रेसिपी..कधी खाल्लेली नाही आणि कुळीथ पीठ नाहीये...इतर पीठे वापरून नक्की try करणार..

खानदान की इज्जत का सवाल >> Lol म्हणजे डोळ्यांसमोर आईने वळलेले होते ना. त्याच्या जवळपास जायचा प्रयत्न केला. आता इतक्या वर्षांचा अनुभव आपल्याला नाही.

अनिंद्य धन्यवाद नक्की फोटो टाक

मनिम्याऊ धन्यवाद

अरुण ये की इकडे , योग्य किनाऱ्यावर Wink

धन्यवाद अमित. आमच्याकडे कूट घालत नाही पण काही ठिकाणी घालतात.
पाणी आपल्या आवडीनुसार. शेंगोळे शिजून मोठे होतात त्यामुळे जास्ती पाणी लागते. आणि थंडीत ते सुपासारखे प्यायला मज्जा येते.

धन्यवाद सायो. अनिंद्य म्हणाला तसे वन डिश मील आहे. पाहिजे तर भाकरी बरोबर खा.

अनघा .. बरोबर. आमची आई हेच म्हणाली की वरण फळांसारखे करता येतील.

धन्यवाद माधव

रेसेपीचा उपयोग झाला हे ऐकून आनंद झाला साधना.

केया हॉटेलचे काही माहिती नाही. सुरू केले तर खायला आवडतील का हॉटेलात? Lol

धन्यवाद झकास Happy

ओके धनि. लवकरात लवकर मुहुर्त शोधतो. मी सोडून कोणी खाण्याची शक्यता शून्य आहे. Proud मला कु. पि. जीव की प्राण आहे. हे आवडतील यात शंकाच नाही.
वरणफळं पुण्यात करिष्माच्या खाली आणि एफसीवर ज्ञानेश्वर पादुका चौकात मॉडेल कॉलनीला जाणार्‍या रस्त्याच्या तोंडावरच्या रेस्टॉ मध्ये मिळायची. त्यांच्याच दोन शाखा होत्या. एकदम मराठी डब्बा, आईच्या हातचं असलं काही घरगुती नाव होतं.
ही १७ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सो रिलेव्हंस शून्य असू शकतो. तर तिकडे विचारू शकता. Happy

धनी काय मस्त आठ्वण करुन दिलिस, नाशिकच्या थन्डीत आमच्याकडे पण व्हायचे शेगोळे...कुळथाचेच करायचो..आमच्याकडे कुळिथाला हुलगे नाव जास्त प्रचलित आहे.
गरम गरम शेन्गोळे आणी बरोबर ज्वारी नाहितर बाजरीची भाकरी..खरतर त्याचिही गरज पडत नाही नुसते वन डिश मिल म्हणून पण खाता येतात...चव झणझणीतच असायला हवी..मेगळट चान्गले लागत नाहीत.
भरपुर पाण्यात निट शिजवुन घ्यावे लागतात पचायला जड असतात.
काही ग्रामिण भागात गोल वळवुन चकलीसारखा आकार देतात त्याला" तिखट जिलबी" म्हणतात.
इकडे मिळत नाही हुलग्याच पिठ , बे एरियात दिसल तेव्हा आणल होत..आता परत मागवेल घरुन

पुण्यात कुठल्या हॉटेल मध्ये मिळतात का शेंगोळे?>>मिळतात बहुधा, मी एक रिलमधे बघितल्याच आठ्वतय परत दिसल तर इथे अपडेट करते.

हुलगे नाव जास्त प्रचलित आहे >> बरोबर. आता बायडीमुळे कुळीथ नाव जास्ती वापरले जाते.

तिखट जिलबी तसा आकार केला की म्हणतात Happy

सध्या करिश्माच्या खाली फक्त momos ची दुकाने आहेत >> हो ना Sad

Pages