आई आणि आज्जी यांच्या पाककृती - शेंगोळे

Submitted by धनि on 27 January, 2025 - 23:33
  शेंगोळे
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुळीथ पीठ ( हुलग्याचे पीठ) - १ वाटी
कणिक / ज्वारी / बाजरी - २/३ चमचे
लसूण - ४ मोठ्या पाकळ्या
हिरवी मिरची - ४ / ५ (तुमच्या आवडी आणि तब्येती नुसार Lol )
कोथिंबीर
जिरे
मोहरी
हळद
मीठ
हिंग
तेल

क्रमवार पाककृती: 

थंडी सुरू झाली की आमच्या कडे हुलग्याचे कढण किंवा उसळ आणि कुळीथ पिठाचे शेंगोळे केले जातात. इतर ऋतूंमध्ये मागितले तर हुलगे उष्ण असतात आणि थंडीत मिळेल असे सांगितले जायचे. तर अशी ही थंडी स्पेशल पाककृती आहे. या वेळेस देशात गेलो असताना थंडी होती मग आईकडून मस्त शेंगोळे करून घेतले आणि भरपूर खाल्ले. इकडे तसेही रमड कृपेने खास कोकणातले कुळीथ पीठ असतेच मग म्हणालो थंडी आहे तर आपण पण शेंगोळे करूच. तसेही जवळ जवळ सहा वर्षे मी तिला शेंगोळे कसले भारी होतात असे सांगून पकवले आहे मग या वेळेस खरंच शेंगोळे पकवले आणि खिलवले.

इथे खाऊगल्लीवर फोटो टाकला तर लोकांना ही गावाकडची गोष्ट खुप आवडली. त्यांनी आग्रह केला म्हणून ही ते म्हणतात ना तशी "Rustic dish" टाकतो Happy (तिखट पदार्थ गोड मानून घ्या Proud )

१) सुरूवातीला लसूण, मिरची, आणि कोथिंबीर एकत्र बारीक वाटून घ्या.
२) कुळीथ पीठ आणि इतर कुठलेही एक पीठ एकत्र करून घ्या.
३) त्यात हे वाटण एकत्र करून घ्या आणि मीठ टाका. थोडे वाटण बाजूला राहू द्या.
४) पाणी घालून थोडे घट्टसर भिजवून घ्या.
५) इकडे गॅसवर कढईमध्ये तेल, जिरे, हिंग, हळद आणि मोहरी घालून खरपूस फोडणी करून घ्या.
६) फोडणी झाल्यावर गॅस थोडा बारीक करून त्यात ते बाजूला काढलेले वाटण घालून परता.
७) वाटण परतून झाले की पाणी घाला.
८) पाण्याला उकळी येऊ द्या.
९) हाताला भरपूर तेल लावून शेंगोळे वळून घ्या. जनरली फोटोत दाखवला तसा आकार करतात. तुम्हाला पाहिजे तर कडबोळ्याचा पण आकार करू शकता.
१०) आता हे शेंगोळे हलकेच उकळत्या पाण्यात सोडा. लगेच हलवू नका. थोडा आकार पकडला आणि वर यायला लागले की थोडे हलवा म्हणजे चिकटणार नाहीत.
११) १० - १५ मिनिटे मध्यम आचेवर उकळू द्या. शिजल्यावर त्यांचा आकार जवळ जवळ दिडपट वाढतो.
१२) कडा असणार्‍या छोट्या थाळीत किंवा वाडग्यात खायला द्या. आवडत असल्यास वरतून पिळायला लिंबू द्या.

वाढणी/प्रमाण: 
बहुतेक दोघांना पुरेल
अधिक टिपा: 

तसे तर हे वन डीश मिल आहे. पण पाहिजे असल्यास बरोबर खायला भाकरी घ्या. त्या सुपाच्या पाण्यात कुस्करून खायला मजा येते.

बरोबर घेताना एखादा रूमाल / टिशू ठेवा. नाकातून डोळ्यांतून आलेले पाणी टिपण्याकरता Wink

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमची पद्ध्त वेगळी आहे.
लाल मिरची, सुके खोबरे ठेचलेलं , ताजी लसूण पात व सुका लसूण पाकळ्या २-३ तसच तव्यावर भाजून वाटून घ्यायचं.
फोडणीत मोहरी तड्तडली(च) की हिंग टाकलं कि दोन तीन मेथी दाणे टाकले की वरचे वाटण परतायचे. तेल सुटले की पाणी टाकून उकळायचे.
गोल चपट्या पातळ ( बांगडी) बनवायची त्यात हळद, मीठ, मसाला टाकून व सोडायची पाण्यात. शिजून वर आली की २-३ कोकम आणि कोथींबीर.
कुपी आम्ही भाजलेल्या कुळीथापासूनच करतो. दळताना धणे ( भाजून) टाकतो.
अप्रतिम लागतं.

Pages