आई आणि आज्जी यांच्या पाककृती - शेंगोळे

Submitted by धनि on 27 January, 2025 - 23:33
  शेंगोळे
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुळीथ पीठ ( हुलग्याचे पीठ) - १ वाटी
कणिक / ज्वारी / बाजरी - २/३ चमचे
लसूण - ४ मोठ्या पाकळ्या
हिरवी मिरची - ४ / ५ (तुमच्या आवडी आणि तब्येती नुसार Lol )
कोथिंबीर
जिरे
मोहरी
हळद
मीठ
हिंग
तेल

क्रमवार पाककृती: 

थंडी सुरू झाली की आमच्या कडे हुलग्याचे कढण किंवा उसळ आणि कुळीथ पिठाचे शेंगोळे केले जातात. इतर ऋतूंमध्ये मागितले तर हुलगे उष्ण असतात आणि थंडीत मिळेल असे सांगितले जायचे. तर अशी ही थंडी स्पेशल पाककृती आहे. या वेळेस देशात गेलो असताना थंडी होती मग आईकडून मस्त शेंगोळे करून घेतले आणि भरपूर खाल्ले. इकडे तसेही रमड कृपेने खास कोकणातले कुळीथ पीठ असतेच मग म्हणालो थंडी आहे तर आपण पण शेंगोळे करूच. तसेही जवळ जवळ सहा वर्षे मी तिला शेंगोळे कसले भारी होतात असे सांगून पकवले आहे मग या वेळेस खरंच शेंगोळे पकवले आणि खिलवले.

इथे खाऊगल्लीवर फोटो टाकला तर लोकांना ही गावाकडची गोष्ट खुप आवडली. त्यांनी आग्रह केला म्हणून ही ते म्हणतात ना तशी "Rustic dish" टाकतो Happy (तिखट पदार्थ गोड मानून घ्या Proud )

१) सुरूवातीला लसूण, मिरची, आणि कोथिंबीर एकत्र बारीक वाटून घ्या.
२) कुळीथ पीठ आणि इतर कुठलेही एक पीठ एकत्र करून घ्या.
३) त्यात हे वाटण एकत्र करून घ्या आणि मीठ टाका. थोडे वाटण बाजूला राहू द्या.
४) पाणी घालून थोडे घट्टसर भिजवून घ्या.
५) इकडे गॅसवर कढईमध्ये तेल, जिरे, हिंग, हळद आणि मोहरी घालून खरपूस फोडणी करून घ्या.
६) फोडणी झाल्यावर गॅस थोडा बारीक करून त्यात ते बाजूला काढलेले वाटण घालून परता.
७) वाटण परतून झाले की पाणी घाला.
८) पाण्याला उकळी येऊ द्या.
९) हाताला भरपूर तेल लावून शेंगोळे वळून घ्या. जनरली फोटोत दाखवला तसा आकार करतात. तुम्हाला पाहिजे तर कडबोळ्याचा पण आकार करू शकता.
१०) आता हे शेंगोळे हलकेच उकळत्या पाण्यात सोडा. लगेच हलवू नका. थोडा आकार पकडला आणि वर यायला लागले की थोडे हलवा म्हणजे चिकटणार नाहीत.
११) १० - १५ मिनिटे मध्यम आचेवर उकळू द्या. शिजल्यावर त्यांचा आकार जवळ जवळ दिडपट वाढतो.
१२) कडा असणार्‍या छोट्या थाळीत किंवा वाडग्यात खायला द्या. आवडत असल्यास वरतून पिळायला लिंबू द्या.

वाढणी/प्रमाण: 
बहुतेक दोघांना पुरेल
अधिक टिपा: 

तसे तर हे वन डीश मिल आहे. पण पाहिजे असल्यास बरोबर खायला भाकरी घ्या. त्या सुपाच्या पाण्यात कुस्करून खायला मजा येते.

बरोबर घेताना एखादा रूमाल / टिशू ठेवा. नाकातून डोळ्यांतून आलेले पाणी टिपण्याकरता Wink

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा मस्त रेसिपी, भन्नाट फोटो.

श्रीरामपूरला पहिल्यांदा शेंगोळे नावाची रेसिपी समजली, घरमालकांकडे केले जायचे पण थोडे वेगळे होते, टेस्टी होते आणि ते जिलब्या म्हणायचे. मी त्यांना कुळथाचे पिठलं नेऊन द्यायची, ते शेंगोळ्या द्यायचे.

नंतर डोंबिवलीत आल्यावर tv वर रेसिपी शो मध्ये दोन तीन अजून वेगवेगळ्या शेंगोळे रेसिपीज बघितल्या. त्यातली एक करायची ठरवली, कुळीथ पीठ भरपूर प्लस थोडी कणिक आणि ती आवडली घरात म्हणून तसं करते चेंज म्हणून, बरेचदा कुळथाचे पिठलं करते. मी करते ती रेसिपी वरच्या रेसिपीच्या जवळ जाणारी आहे पण ही वरची मला जास्त आवडली, करून बघेन. फोडणीत वाटण परतून घ्यायची ह्यातली आयडिया आवडली. ह्यात दाण्याचं कूट नाहीये, मी tv वर ते घालून केलेली बघितली होती, पाणी उकळल्यावर दाण्याचे कूट घालायचं, आता ते वगळून करून बघेन.

कोकणात कुळथाचे पीठ करताना कुळीथ भाजून करतात, शेंगोळे करताना कुळीथ भाजत नाहीत, असेच दळून आणताना बघितले आहेत, मालकीणबाई असेच पाच किलो दळून आणायच्या, मोठं कुटुंब होतं, त्यामुळे असेल.

कोकणातल्या ज्यांना कुळथाचे पिठलं आवडतं, त्यांना शेंगोळे नक्की आवडतील, आम्हा तिघांना आवडतात. वेळ मात्र हवा, यात थोडी मेहनत आहे, पिठलं झटपट होणारा प्रकार आहे.

हो हो नगर जिल्हा, 2002 ते 2006 तिथे होतो, नवऱ्याची बदली तिथल्या स्टेट बँकेत झालेली. तुमचं संगमनेर लागायचं नेहेमी श्रीरामपूर कल्याण एस टी प्रवासात.

मस्त खमंग रेसिपी.
ज्वारीचे करत असत पूर्वी ते आवडतात..
हे सुद्धा try करायला हवेत.

रेसिपी मस्तच आहे पण तुमच्या गृहलक्ष्मी ला आवडली त्यात आयती मिळाली ह्या वस्तुस्थितीचा सहभाग जास्त प्रमाणात असावा अशी एक शक्यता आहे:).

मस्त! नाव खूप ऐकून आहे पण कधीच केले/खाल्ले नाहीत. आता करून बघितलेच पाहिजेत. शेंगोळे आणि शेंगोळ्या एकच ना?

आज सकाळी नाश्त्याला केले होते ज्वारीच्या पिठात थोडे बेसन आणि गव्हाचे पिठ घालून. कितीतरी दिवसांनी खाल्ले. सध्याच्या थंडीत, खोकला झालेला असताना, तिखट आणि गरम गरम खायला मस्त वाटलं.
मी आधी लिहायचे विसरले, आमच्याकडे यांना शेंगोळे क्वचित म्हणतात, कोंडूळे / कोंडवळे नाव आहे आमच्या भागातले.

आयती मिळाली ह्या वस्तुस्थितीचा सहभाग जास्त प्रमाणात असावा >>> नाही Happy

20250129_211531.jpg

आज केले.
अगदीं चविष्ट झाले होते.
थॅन्क्स धनि
लिंबू पिळून मस्त सुपासारखे प्यायलो.
खालील टीप कामी आली:
बरोबर घेताना एखादा रूमाल / टिशू ठेवा. नाकातून डोळ्यांतून आलेले पाणी टिपण्याकरता Wink

धन्यवाद किल्ली, वावे. शेंगोळ्या कधी ऐकले नाही.

अल्पना, ऋतुराज >> केले आणि तुम्हाला आवडले हे वाचून आनंद झाला. Happy

काहीही हं पर्णीका Lol

आता केले. मस्त झालेत. थोडे तीळ पण घातले. एकदम झणझणीत झालेत. मिठाचा अंदाज जरा चुकला. पिठात पण मीठ आहे विसरलो आणि पाणी पण अळल्याने मीठ थोडं पुढे आलं.
बरोबर भाकरी किंवा भात करेन पुढच्यावेळी.

पाणी पण आळल्याने मीठ थोड पुढे आलं >> हां हे झाले असणार. आणि ते थोडे पीठ पण पाण्यात उतरते ना.

मी बरेचदा थोडे मीठ आधी घालतो आणि मग शेवटी अंदाज घेतो अजून हवे आहे का.

मी पण केल्या काल शेंगोळ्या. १००% हीच रेसिपी न वापरता सिंडीने टाकलेली पण फॉलो केली.
माझ्याकडे कुळथाचं पीठ काही मिळालं नाही त्यामुळे ज्वारी आणि डाळीचं पीठ थोडं भाजून घेतलं. थोडं सुकं खोबरं आणि दाणे हलके भाजले. मिक्सरला जाडसर वाटताना त्यात हिरवी मिरची आणि लसूण बारीक चिरुन जाडसर वाटून पीठात मिक्स केलं. थोडं काळे तीळही घातले आणि मग बाकी वर आहे तशीच केली. मी ही कधी केलेली नाही म्हणून ओके वाटली. घरी बाकीच्यांना आवडेल असं नाही. मी एकटी असताना पुन्हा करायला आवडेल.
cf2aeee9-665c-420a-9a1d-c905d9944fb1.jpeg

या प्रकारे करून बघितले पण रूपाने तुमच्या शेंगोळ्यांसारखे लुसलुशीत, सुंदर न होता काळवंडून किंवा 'ब्राऊनंडून' गेले आहेत. Happy चवीला छान झाले होते पण, तंतोतंत फॉलो केली कृती. कुळीथ इथल्या इंग्रोतले होते. काळसर होते.

आमच्याकडे शेंगोळे व्हायचे पण कुळीथ पीठ हा प्रकार मराठवाड्यात नाही. त्यामुळे मला त्याची परीक्षाही येत नाही. निदान मला तरी कधी खाल्ल्याचे आठवत नाही. कणीक, ज्वारी, बेसन घालून सर्रास व्हायचे. शेंगोळे आणि वरणफळं हिवाळ्यात खूप वेळा व्हायचे घरी. ही कृती आवडली. Happy

IMG-20250130-WA0002_0.jpgIMG-20250130-WA0003_0.jpg

पुढच्या वेळी मी एक दोन शेंगोळे मोडून घालेन त्यात म्हणजे पाण्याला घट्टपणा येईल थोडा.

आमच्याकडे ह्याला *कोडोळे* म्हणतात. अस्मिताने लिहीलाय तसं करतो पीठ भिजवताना ताक/दही घालतो. कुळीथ ऐकूनच माहिती होतं. कोकणात कु पीठलं खाल्लं होतं.

मला फोमो होतोय.
ही dish केलीच पाहिजे.
कुलीथ मिळाले तर ठीक नाहीतर ज्वारीच्या पीठचे तर होतीलच!!!

किल्ली मला पण फोटो होतोय पण माझी समस्या तुझ्या समस्येपेक्षा जास्त कठीण आहे. म्हणजे कुळीथ पीठ तर नाहीच मिळणार, पण त्याचा काही तरी जुगार होइल. पण शेंगोळे बेत जमवण्यासाठी आवश्यक घटक, "थंडी " कुठुन आणु? इथल्या गरम आणि दमट वातावरणात अजिबात जमणार नाहि शेंगोळे यांचा बेत :(. तेव्हा भारत/अमेरिका वासी मंडळींपैकी कुणीतरी माझ्यासाठी थोडी थंडी पाठवा.

मस्त रेसिपी! सध्या कु पि संपले आहे, कोकणातून आले की करून बघेन.
अमितव म्हणतोय ते पोटोबा नावाचे रेस्टॉरंट होते, काही वर्षांपूर्वी बंद झाले. २००८-०९ वगैरे साली आम्ही आजीला घेऊन तिथे घरगुती म्हणून जेवायला घेऊन गेलो होतो. तेव्हा मेन्यू मध्ये फोडणीची पोळी - १५० रू बघून आजी गाssss र झाली होती Lol सगळे जमल्यावार ते आठवून आम्ही अजूनही खूप हसतो. सध्या सांदण नावाच्या कोथरूडच्या रेस्टॉरंट मध्ये कोकणी आणि काही बाकी महाराष्ट्रातील असे पारंपरिक पदार्थ मिळतात. हल्ली पुण्यात मराठवाडा, खानदेशी, वर्‍हाडी अशीही खूप रेस्टॉरंटस झाली आहेत.

रच्याकने, हुलगे आणि कुळीथ हे एकच असले तरी त्यांचा सब सेट वेगळा आहे. हुलगे घाटावर पिकतात, ते आकाराने थोडे मोठे आणि चवही किंचीत वेगळी असते रंग कुळथांपेक्षा थोडा गोरा असतो. कुळीथ कोकणात पिकवले जातात, त्यांचा रंग काळसर चॉकलेटी, आकार बारीक अणि चव थोडी वेगळी असते. माझ्यामते शेंगोळे कुळथापेक्षा प्रॉपर हुलगे पीठ घेऊन केलेले चांगले लागतील.

मध्ये मी एक पोस्ट वाचली, देवगड तालुक्यात होणारे कुळीथ पिठल्यासाठी चांगले आणि रत्नागिरी जिल्ह्यातले उसळीसाठी चांगले. अनेक वर्षे मला हे समजत नव्हतं की माहेरच्या कुळीथ पिठापेक्षा, सासरच्या पिठाचे जास्त चविष्ट का होतं पिठलं, दोन्हीकडचे होतं पण सासरच्या भागातले अधिक टेस्टी होतं.

कुळीथही तीन वेगवेगळ्या रंगाचे असतात, एखाद्या दुकानात सर्व प्रकार बघायला मिळतात.

त्यामुळे मॅगी म्हणते तसं असू शकेल, देशावरच्या कुळीथ किंवा हुलग्यांचे शेंगोळे जास्त टेस्टी होत असतील. यावरून मला वरचे अवांतर आठवलं, एकाच कोकणात हा फरक असेल तर देशावरचं हवामान अजूनच वेगळं.

होणार होणार म्हणता आज झाले.

a4652ddf-50d6-4c51-a566-4caa380cce0b.jpeg

समहौ हे नेहेमी वन डिश डिनर म्हणूनच होतात. “दिन का उजाला” बापड्यांनी कधी बघितलाच नाहीए आजवर.

c7c58181-6136-49db-9dc3-24fa4942cede.jpeg

आमचे गावठी वर्जन = ज्वारी पीठ+बेसन+ कणीक. झणझणीत, तर्रीदार. आकार जरा ओबडधोबड.
पण ये लाल रंग… लिहितांना पुन्हा लाळ गळते आहे. 😋

Pages