रक्तपिपासू भाग १०

Submitted by प्रथमेश काटे on 13 January, 2025 - 11:07

तो तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. ती बावरली, गोंधळली. मात्र त्याच्या नजरेच्या प्रभावी पाशातून स्वतःला सोडवून घेणं तिला शक्य नव्हतं. त्यानं तिला वरून खालपर्यंत नखशिखांत न्याहाळलं. त्याच्या नजरेच्या अदृश्य स्पर्शाने तिच्या शरीरावर हलकेसे रोमांच उठले.

"किती सुंदर दिसतेस तू..." खालच्या, खर्जातल्या सुरात तो म्हणाला.

ते शब्द ऐकून ती लाजली. तिच्या ओठांवर बारीकसं स्मितहास्य उमटलं. अन् ; तिला काही समजण्याआधीच, त्याने आपला राकट, मजबूत हात तिच्या कमरेमागे नेऊन तिला जवळ ओढलं. खरंतर या तरूणाला ती पहिल्यांदाच भेटत होती. तो कोण ? कुठला ? तिला काहीही माहिती नव्हतं. आणि असा व्यक्ती एकदम तिला बाहुपाशात घेतो, हे वास्तविक तिला सहन व्हायला नको ; पण तिने त्याला मुळीच विरोध केला नाही. ती तशीच वेड्यासारखी त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या उरातली धडधड अजूनच वाढली होती. त्याने तिची नाजूक हनुवटी बोटांच्या चिमटीत पकडून तिच्या गुलाबी ओठांचं कडकडून चुंबन घेतलं. आणि तिच्याकडे पाहून हसला. त्याचं हास्य किती मोहक होतं! प्रतिसादा दाखल तीही मंद हसली. मग.. मानेवर त्याच्या राकट ओठांचा स्पर्श. ती शहारली. ते राकट ओठ मग तिची हनुवटी, गळा, मानेला स्पर्शू लागले. त्या स्पर्शात अधीरता होती. तो वेडावला. ती धुंदावली. त्या धुंदीतच.. कधीतरी ती वेदना जाणवली. क्षणभरचीच.. मग शांत.. तरल, सुखद जाणीवेनं शरीर हलकं होऊन गेलं होतं.

*******

"श्री.. रूपाली म्हणे खूप आजारी आहे." राजाभाऊ म्हणाले.

" आजारी ? काय झालं तिला ?" श्रीने आश्चर्याने आणि काळजीने विचारलं.

"तिच्या घराच्या जवळपासच राहणारा गणपत सांगत होता. आज सकाळी त्याची बायको रूपालीच्या घरी गेली.‌ पाहते तर, रूपाली अंथरूणावर पडून होती. चेहरा जरा सुकलेला वाटत होता. बोलताना आवाजही बारीक येत होता.."

"अस्सं ?? पण एकाएकी काय झालं बुवा ?" श्री विचारात पडला. मग जरावेळाने म्हणाला‌ "पाहून यायला हवं."

"हो." राजाभाऊंनी होकार भरला.

*******

श्री, राजाभाऊ आणि सोनाली रूपालीला भेटायला आले. खोलीतल्या जुन्या पलंगावर रूपाली आडवी पडली होती. गणपतची बायको शेजारीच बसली होती. या तिघांना पाहताच ती उठू लागली. रूपालीही उठून बसायचा प्रयत्न करू लागली. श्री पटकन म्हणाला -

"अरे अरे‌ रूपाली.. उठू नकोस. ताई, बसा."

"अशी कशी गं एकदम आजारी पडलीस." सोनाली रूपाली जवळ जात, हळूवार स्वरात म्हणाली. नेहमी फुलासारखा टवटवीत असणारा रूपालीचा चेहरा खरोखरच सुकलेला होता. तिने किंचीत हसून काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं, तोच गणपतची बायको म्हणाली -

"पहा ना.. रोज सकाळी सकाळी तुळशी वृंदावनाला पाणी देताना, अंगण झाडताना, फुलझाडांना पाणी घालताना दिसणारी रूपाली, आज सुर्य चांगला वर आला तरी बाहेर दिसली नाही. म्हणून सहज पहायला आले, तर ही अंथरूणावरच पडून होती. मी लगबगीने जवळ गेले. तोंड पार बारीक झालेलं पोरींचं. विचारलं तर म्हणाली - उठल्यापासून कणकण जाणवतेय. अंघोळ पण झाली नव्हती. मग मीच आधार देऊन उठवलं. तोंड, हात पाय धुवायला लावलं. जेवायला आणू का, म्हणून विचारलं तर म्हणाली इच्छा नाही. मग चहा करून दिला. नको नको करीत असून पण प्यायला लावला."

"हे छान केलंत ताई." सोनाली हसून म्हणाली.

"म्हणजे सकाळपासून उपाशीपोटीच आहेस का रूपाली ?" श्रीने विचारलं. रूपालीने त्याच्याकडे पाहिलं ; पण तिच्या नजरेत काहीशी नाराजी, एक सावधपणा होता. श्रीला, सहाजिकच आश्चर्य वाटलं. मग तो गणपतच्या बायकोला म्हणाला -

"डॉक्टरांना बोलावलं होतं का ?"

"हो. यांनी फोन केलेला ; पण तेव्हा डॉक्टर बाहेर गेले होते."

"अच्छा. एव्हाना आले असतील. मी कॉल करतो."

श्रीने डॉक्टरांना कॉल करून बोलावलं. आणि पुन्हा त्याची नजर रूपालीवर पडली. त्याचवेळी रूपालीने त्यांच्या दिशेने मान वळवली ; पण तो दिसताच चटकन तिने तोंड फिरवलं. तिची अशी प्रतिक्रिया खरंच कोड्यात टाकणारी होती.

सायंकाळची वेळ. एव्हानाच थंडी जाणवू लागली होती. राजाभाऊंनी खोलीची खिडकी उघडली. सौम्य, उबदार उन्हाने जरा बरं वाटलं. रूपाली शांतपणे पडली होती, आणि सोनाली तिच्या केसांवरून हलके हलके, हात फिरवत होती. मात्र उघडलेल्या खिडकीतून, राजाभाऊंच्या कडेने उन्हाचा बारीक कवडसा आत येऊन रूपालीच्या दंडावर पडला. तसा चटकन हात बाजूला घेऊन रूपाली जरा मोठ्याने म्हणाली -

"बंद.. खिडकी बंद करा." तिच्या स्वरात भीती जाणवत होती. राजाभाऊंनी पटकन खिडकी लावून घेतली. आतापर्यंत निपचित पडलेल्या रूपालीचा, तो त्वेष पाहून सोनाली गडबडली. तिने श्रीकडे पाहिलं. श्रीने नजरेनेच तिला शांत होण्यासाठी समजावलं‌.

थोड्या वेळात डॉक्टर आले. त्यांनी रूपालीला व्यवस्थित तपासलं, तेव्हा ते काहीसे गोंधळलेले दिसले. त्यांनी गोळी लिहून दिली ; पण काही बोलले नाहीत. श्री आणि राजाभाऊ त्यांना सोडवायला बाहेर आले. तेव्हा श्रीने विचारलं -

"डॉक्टर.. असं अचानक काय झालं हो, या रूपालीला ?"

"अं... श्री.." मनातल्या मनात शब्द जुळवत डॉक्टर म्हणाले - "खूप स्ट्रेंज अवस्था आहे रूपाली ची."

"स्ट्रेंज ? म्हणजे ?" न समजून, राजाभाऊंनी विचारलं.

"तिला बराच अशक्तपणा आलाय."

"अशक्तपणा ! पण असा एकदम ? आणि कशामुळे ?"

"तेच तर मला समजू शकलं नाही. म्हणूनच म्हणालो -स्ट्रेंज ! बरं तापामुळे आला असेल म्हणावं, तर ताप सोडाच. शरीरात उष्णताच जाणवली नाही मला. तिचं शरीर अगदी थंडगार पडलं होतं ! जरा जास्तच."

"काय ??" त्यांचे शब्द ऐकून श्रीलाही धक्का बसला‌.

"होय."

"मग आता ?"

"पाहूयात. ब्लड चेक अप करावं लागेल. बरं.. मी येतो." त्यांचा निरोप घेऊन डॉक्टर गेले. श्रीने आश्चर्य युक्त अन चिंतित मुद्रेने आतल्या दिशेने पाहिलं.

क्रमशः
© प्रथमेश काटे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults