तो छोटासा, टुमदार, बंगला हमरस्त्यापासून जरा एका बाजूला होता. बंगल्यातील सर्व लाईट्स ऑफ होत्या. सहाजिकच होतं.रात्रीचे साडेदहा होऊन गेलेले. गावामध्ये यावेळी जाग नसतेच ; पण पोर्चमधला मंद दिवा जळत होता. तो रोजच रात्री असा जळत ठेवलेला असे. बंद गेट पाशी ते तिघे बंगल्याकडे बघत उभे होते.
" जायलाच हवं का ? " दबक्या आवाजात रोहितने विचारलं.
" हो मी रूपालीच्या मागेच उभी होते ना ? निघताना तिने हळूच मला इकडे यायला सांगितलं होतं."
त्या घरातून बाहेर पडल्यानंतर रोहित आणि शिवानीने सगळ्या मुलांना त्यांच्या घरी पोचतं केलं. मग रूपालीने सांगितल्याप्रमाणे ते इथे यायला निघाले ; पण रूपालीच्या काळजीत असलेल्या छोटूने त्यांच्यासोबत येण्याचा हट्ट धरला, म्हणून नाईलाजाने त्यांनी त्यालाही आपल्या सोबत घेतलं.
" अगं पण यावेळी ? "
" असा काय करतोस रोहित " शिवानी काहीशी रागाने म्हणाली " आपली रूपाली तिकडे एकटीच अडकलीये. बरं जसं तिने धिटाई दाखवून आपल्याला वाचवलं तशीच तीपण तिथून सुखरूप पळून जाईलही." रोहितने 'तेच तर' अशा अर्थी मान हलवली. " पण ती म्हातारी साधीसुधी वाटली का तुला ? ती आपल्या मागे लागली तर ? आणि आपल्या घरचेही आपल्या अशा हकीकतीवर विश्वास ठेवणार नाहीत."
" हो बरोबर आहे तुझं."
" आणि त्यांना आपण ओळखतच नाही का ? " त्याला समजावत शिवानी म्हणाली. " तुला माहित आहे की ते गावातल्या लोकांची मदत करायला कोणत्याही वेळी तयार असतात. आपलं तर ते नक्कीच ऐकून घेतील."
शिवानीने गेटजवळ असलेलं गोलाकार बटण दाबलं. काहीच आवाज झाला नाही ; पण मिनीटाभरात एक वॉचमन लगबगीने धावत आला. छोटी मुलं पाहून त्याला जरा आश्चर्य वाटलं. त्याने पटकन गेट उघडलं.
" या मुलांनो. आत या." वॉचमन जरा काळजीच्या, नरमाईच्या सुरात म्हणाला.
" काका, आत जाऊ शकतो का ? " शिवानीने विचारलं.
" हो हो. मुळीच भिऊ नका." वॉचमन.
ते तिघे पोर्चच्या पायऱ्या चढून वर गेले. शिवानीने किंचीत दबकतच डोअरबेल वाजवली. काही वेळ गेला. दार उघडलं गेलं नाही. शेवटचा एकदा प्रयत्न करून पहावं म्हणून शिवानीने पुन्हा हात उचलून डोअर बेल कडे नेला. तेवढ्यात दरवाजा उघडला. दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहून शिवानी कसंनुसं हसत म्हणाली -
" राजा काका.. ते आम्ही.. आम्हाला..." तिला कसं आणि काय सांगावं हे सुचेना.
" हो हो..." राजाभाऊ दोन्ही पंजे किंचित वर करून किंचित हसत म्हणाले. तिची मनस्थिती त्यांनी अचूक ओळखली. " या आत या."
मुलांनी आत प्रवेश केला.
" काय रे, काय झालं ? " रोहितला उद्देशून राजाभाऊंनी विचारलं. तो काही बोलणार इतक्यात शिवानीच म्हणाली -
" काका श्री दादांना उठवाल का ? म्हणजे तुम्हाला सगळं एकत्रच सांगता येईल."
" हम्म." राजाभाऊंना ते पटलं. "तुम्ही इथे कोचावर बसा, मी दादाला बोलावून आणतो हं." असं म्हणून ते हॉलच्या कडेला असलेला जिना चढून वर गेले. 'ही मुलं अचानक एवढ्या रात्री का आली असावीत ? काय घडलं असावं ?' हे प्रश्न त्यांच्या मनात घोळत होते ; पण थोड्या वेळात सगळं कळणारच होतं.
" अरे मुलांनो, तुम्ही इथे ? यावेळी ? " जिना उतरताना मंद स्माईल करत श्रीने विचारलं. त्याच्या मागून सोनालीही येत होती. त्याला बघताच तिघंही लगबगीने उभे राहू लागले.
" अरे बसा बसा..." स्वतः एका कोचावर बसत श्री म्हणाला. सोनालीने क्षणभर मुलांकडे पाहिलं, आणि ती किचनकडे वळाली.
" बोला.. काय झालं ? तुम्ही अचानक यावेळी कसे आलात ? आणि जरा घाबरलेले दिसताय ? "
" होय दादा. गोष्टच अशी घडली आहे." शिवानी म्हणाली. आणि तिने दुपारी त्या म्हातारीशी भेट झाल्यापासूनचा सगळा वृत्तांत गोष्टीचा भाग वगळून कथन केला. श्री गंभीरपणे, लक्षपूर्वक तिचं ऐकत होता. तिचं बोलून झालं. तोच सोनाली ट्रेमध्ये ज्यूसचे ग्लास घेऊन आली.
" घ्या मुलांनो." त्यांच्यासमोर येऊन हसत सोनाली म्हणाली.
" अहो कशाला...? " शिवानी संकोचून म्हणाली.
" घ्या रे गुपचूप. लाजताय काय ? " तिला दटावत सोनाली म्हणाली. मुलांना ही देखणी, प्रेमळ सोनाली ताईही खूप आवडायची. तिच्या सुंदरतेचं, व्यक्तित्वाचं काहीसं अप्रूप वाटायचं. त्यामुळे आणि ती श्री दादांची बहीण म्हणून तिच्याबद्दल खूप आदरही वाटायचा. मुलांनी हसत ज्यूस घेतला.
जरा स्वतःशीच विचार करून श्रीने राजाभाऊंकडे पाहिलं. राजाभाऊ त्याच्या कानाशी लागून काहीतरी कुजबूजले. श्रीने शांतपणे मान हलवली. आणि तो उठून उभा राहिला. मुलंही ज्यूस संपवून उभी राहिली. श्री त्यांच्यापाशी आला. रोहितच्या खांद्यावर हात ठेवून त्याने तिघांवरून नजर फिरवली. मग गंभीरपणे विचारलं.
" एक सांगा मुलांनो. जेव्हा तुम्ही म्हातारीला पहिल्यांदा पाहिलंत तेव्हा तिच्यात तुम्हाला काही वेगळं भासलं ? "
" विचित्रच होती ती." रोहित म्हणाला " तिचे ते मोठाले डोळे आणि सगळा चेहराच भीतीदायक होता."
"हम्म. आणखी काही ?"
"आणखी विशेष असं काही नाही. तिनं डोक्यावर छत्री धरली होती ; पण त्यात काय ? म्हातारं माणूस. उन सहन होत नसेल, असं आम्हाला वाटलं. अन् पायात मोठे गमबूट होते ? "
" आणि आता रूपाली एकटीच तिथे थांबली ? "
" हो पण तिने जळत्या लाकडाने म्हातारीला घाबरवून आम्हाला सोडवलं. त्यानंतर मग मागोमाग तीही तिच्या घरी गेली असेल." रोहित उत्तरला.
" हम्म. तीही गेली असेल " श्री स्वतःशीच पुटपुटला मग स्माईल करत तो मुलांना म्हणाला -
" मुलांनो, तुम्ही मुळीच काळजी करू नका. मी पाहतो काय करता येतं ते. हं ? पण माझं एक ऐकाल ना ? "
" हो हो. बोला ना." शिवानी लगेच म्हणाली.
" आता त्या म्हातारीकडे तर तुम्ही साहजिकच जाणार नाहीत ; पण संध्याकाळनंतर, अंधार पडल्यावर सावध रहा. म्हणजे एकट्याने फारसं घराबाहेर पडू नका. याबद्दल घरात कुणापाशी काहीही बोलू नका. कुणाचा विश्वासही बसणार नाही.
यावर तिघांनीही होकारार्थी मान हलवली.
" आणि एक... तुम्हीही याबद्दल जास्त विचार करत बसू नका. खेळा, अभ्यास करा. ज्या गोष्टी आपल्या समजण्यापलीकडे असतात, त्यांच्यात न पडलेलच बरं. हं." शांतपणे बोलणाऱ्या श्रीच्या आवाजात जरब किंवा दटावणी मुळीच नव्हती, मात्र त्यात एक अधिकार होता. निर्णायकता होती. एखाद्या मोठ्या वयाचा, चांगली समज असलेल्या माणसावरही त्या बोलण्याचा परिणाम झालाच असता. ही तर लहानगी मुलं होती. आणि ती अतिशय शहाणी अन् मोठ्यांचं ऐकणारी असल्याचं श्रीला ठाऊक होतं.
" हो. ठिक आहे श्री दादा." रोहित म्हणाला. इतर दोघांनी मानेनेच होकार दिला.
" गुड." श्रीला त्यांचं कौतुक वाटलं. " चला मी तुम्हाला सोडवून येतो."
" अरे तू थांब. मी सोडवते त्यांना." सोनाली म्हणाली.
" अगं पण..."
" अरे अनायासे आता झोप जरा मोडलीच आहे तर येते जरा बाहेरून. तोपर्यंत बहुदा पुन्हा गुंगी येईल."
" बरं." श्री हसत म्हणाला. आणि त्याने खिशातून कारची चावी काढून तिच्याकडे दिली. सोनाली सोडवायला येणार म्हटल्यावर मुलांनाही छान वाटलं.
" या मुलांनो." त्यांना हाताने इशारा करून सोनाली दरवाजाकडे गेली. पाठोपाठ मुलंही बाहेर पडली. दरवाजा बंद करून श्री आत आला. राजाभाऊ प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडेच पाहत होते.
" नाही राजाभाऊ. मुलं खोटं बोलत नव्हती." श्री म्हणाला. राजाभाऊंनी यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. श्रीला हे कसं समजलं हा प्रश्नच त्यांच्या मनात डोकावला नाही. ज्याअर्थी स्वतः श्री हे अगदी खात्रीपूर्वक सांगत आहे, म्हणजे त्यात तथ्य असणारच. ते ओळखण्याच्या श्रीच्या काही विवक्षित पद्धती होत्या ; पण त्याबद्दल राजाभाऊ स्वतःहून कधी काही विचारत नसत. मग श्री स्वतःच म्हणाला.
" एकतर मी त्या तिघांचंही बारीक निरीक्षण केलं. ते तिघेही खरोखर भ्यायलेले होते. छोटूला स्पर्श करून मी त्याच्या मनात डोकावलं, आणि मला सगळं काही स्पष्ट समजलं."
" म्हणजे मग याचा अर्थ, आपल्याला एका वेगळ्याच प्रकाराला सामोरं जायचंय. ज्याची मी तरी कल्पना केली नव्हती."
श्रीने त्यांच्याकडे कटाक्ष टाकला. मग तो हसत म्हणाला -
" तुम्ही ओळखलंत तर..."
" होय." राजाभाऊ उत्तरले.
" होय राजाभाऊ. यावेळी आपल्याला एका वेगळ्याच प्रकाराला सामोरं जायचं आहे. खरंतर माझ्यासाठीही हे जरा अनपेक्षितच होतं. 'काउंट ड्रॅक्युला' हम्म..." श्री स्वतःशीच काहीतरी विचार करू लागला. त्याच्या चेहऱ्यावर जराशी शंका, काळजी दिसत होती.
•••••
अगदी सकाळी सकाळीच श्री आपली उबदार, ब्लॅक अँड व्हाईट हूडी चढवून नेहमीसारखा फेरफटका मारायला निघाला होता. त्याच्या बंगल्याजवळच्या या रस्त्यावर यावेळी फारशी रहदारी नसे. एकदम शांतता होती. अधूनमधून एखादी मोटारसायकल भर्रकन शेजारून पळायची, तेवढीच काय ती. त्या शांत, सुंदर वातावरणात स्वतःशीच कुठलंसं गाणं गुणगुणत श्री झपाझप चालला होता. हिवाळ्यातील सकाळचं ऊन सौम्य आणि उबदार होतं. वाटेत मध्येच एखादं सडा पडलेल्या पारिजातकाचं अथवा चाफ्याचं झाड लागायचं. त्याच्या सुगंधाने अजूनच प्रसन्न वाटायचं. खालच्या रस्त्यावरून श्रीची नजर समोर गेली, आणि त्याची पावलं मंदावली. समोरून रूपाली येत होती. नाजूक, वळणदार पावलं टाकत. रूपालीला आपल्या देखणेपणाची चांगलीच जाणीव होती. आपण अजून आकर्षक कसे वाटू शकतो याकडे तिचं नीट लक्ष असे. तिचा बांधा कमनीय, आकर्षक होता. त्याची कमनीयता प्रकर्षाने पाहणाऱ्याच्या नजरेत भरावी, अशी तिची एकूण देहबोली असे. हिवाळ्याच्या थंडीत स्वेटर घालून बाहेर पडणं तिला आवडत नसे, ते याच कारणामुळे ; पण घरात तर थांबून राहू शकत नाही. त्यामुळे तिचा नाईलाज होई. रूपालीच्या अशा काही गोष्टींची श्रीला गंमत वाटे. तिच्या जराशा बालिश ; पण प्रेमळ स्वभावाचं त्याला कौतुक वाटायचं. रूपालीलाही देखणा, स्मार्ट असा श्री खूप आवडायचा. म्हणूनच इतर काही मुलींसारखी ती त्याला दादा वैगेरे न म्हणता जुन्या हिंदी चित्रपटांमधल्या हिरोईन सारखं 'बाबूजी' म्हणायची. आणि श्रीला त्याची कल्पना होती. कधीकधी गंमती मध्ये ते एकमेकांची जरा छेड काढत. एकमेकांची थट्टा मस्करी करत. त्यामध्ये मोकळेपणा, निर्मळता असे.
आता सकाळच्या वेळी हवेत चांगलाच गारवा होता ; पण रूपाली मात्र साडीवरच होती. ना स्वेटर, ना शाल पांघरलेली. सहाजिकच श्रीला नवल वाटलं. 'ही मुलगी पण ना.. आकर्षक दिसण्याच्या नादात आपली तब्येत खराब करून घेणार.' स्वतःशीच विचार करून श्री हसला. अजूनच वेगानं पावलं टाकत तो तिच्या दिशेने जाऊ लागला. तीही त्याच्याकडेच बघून हसत होती ; पण जसजसं त्यांच्यातलं अंतर कमी झालं, तसं श्रीच्या ओठांवरचं हसू मात्र मावळलं. तिच्या चेहऱ्यावर त्याची नजर खिळलेली. तिची नजर स्तब्ध, यंत्रवत वाटत होती ; पण त्यात एक लकाकीही होती. तिच्या ओठांची कड स्मितहास्यात वर चढलेली. त्यात जणू कुत्सितपणा होता.
"काय गं रूपाली. तुला थंडी नाही वाजत का ?" काहीतरी बोलायचं म्हणून श्रीने विचारलं.
"नाही बाबूजी." ती उत्तरली. "ही थंडीच तर मला आवडते. हा अंगावर शहारा उठवणारा, मन हलकं करून टाकणारा गारवा कसा हवाहवासा वाटतो." रूपाली स्वतःच्याच धुंदीत बडबडत होती. श्री आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता.
" रूपाली..." तो उद्गारला. तिने चटकन त्याच्याकडे पाहिलं.
"काय हे बाबूजी. तुम्ही तर आजकाल दिसतच नाही. नेहमी लोकांच्या अडीअडचणी, तुमचे ते मंत्रतंत्र यांच्यातच फक्त मग्न असता. आम्हाला विसरलातच की काय ? " तिने हसून खट्याळपणे विचारलं ; पण आज श्रीला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. तिच्या हसण्यात, बोलण्यात गोडवा होता, मादकता होती. पण तो गोडवा, ती मादकता धोक्याचा इशारा देणारी भासत होती. निदान श्रीला तरी. आणि त्याच्या इन्ट्यूशन्स सहसा चुकत नसत.
"नाही. असं काही नाही." श्री.
" मग घरी या की कधीतरी."
"अं... हो हो. जमल्यास नक्की येईल. नाहीतर तूच ये की वेळ भेटेल तेव्हा."
"अं ?" ती जराशी चपापली, मग म्हणाली"बरं एक सांगू का ?"
"हो सांग की. तुला कधीपासून परवानगीची गरज पडू लागली." श्री मिश्कीलपणे म्हणाला.
"हंहं. तसं नाही पण... या मुलांचं काही मनावर घेऊ नका बरं का ? काहीतरी पिक्चर वैगेरे बघत असतात. तेच त्यांच्या डोक्यात असतं. तुमची मस्करी करायला काहीबाही सांगतील, आणि तुम्ही ते खरं समजून चालाल. पोरंंच ना शेवटी."
"हो हो. अगं पोरंच काय, मला कुणीही फसवू शकत नाही." श्री शांतपणे म्हणाला.
त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे तिला समजलं नसावं.
" बरं.. चला." मान हलवून त्याचा निरोप घेत ती म्हणाली. आणि निघाली. श्री वळून तिच्याकडे पाहू लागला. दोन तीन पावलांवर थबकून तिने हलकेच मान वळवली. तसा श्री दचकून इकडेतिकडे पाहू लागला. गालातल्या गालात हसत ती निघून गेली. श्रीने गंभीरपणे स्वतःशीच मान हलवत एक दीर्घ निःश्वास सोडला.
क्रमशः
© प्रथमेश काटे
छान झालाय हा भाग. जरा मागच्या
छान झालाय हा भाग. जरा मागच्या भागांची लिंक देत जा.
छान पकड घेतली आहे कथेने.
छान पकड घेतली आहे कथेने. पुढील भाग पटापट येऊ द्या
छान चालली आहे
छान चालली आहे
श्री , राजाभाऊ, सोनाली ... Ghostbusters
" आणि आता सोनाली एकटीच तिथे थांबली ? " ... इथे रुपाली हवं ना?
@manya - थॅंक्यू. आणि
@manya - थॅंक्यू. आणि द्वेषच्या वेळी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी लक्षात आहेत. या कथेत नक्कीच आपल्याला वेगळेपणा दिसेल
" आणि आता सोनाली एकटीच तिथे थांबली ? " ... इथे रुपाली हवं ना? >>> लक्षात आणून देण्यासाठी आभार. बदल केला आहे.
छान भाग
छान भाग