आदि शंकराचार्यांनी केलेल्या ’परापूजा’ ह्या अतीव सुंदर संस्कृत रचनेचा समश्लोकी मराठी भावानुवाद (सुमंदारमाला वृत्तामध्ये).
++++++
मूळ रचना:
अखण्डे सच्चिदानन्दे निर्विकल्पैकरुपिणि ।
स्थितेऽद्वितीयभावेऽस्मिन्कथं पूजा विधीयते ।।
पूर्णस्यावाहनं कुत्र सर्वाधारस्य चासनम् ।
स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च शुद्धस्याचमनं कुत: ।।
निर्मलस्य कुत: स्नानं वस्त्रं विश्वोदरस्य च ।
अगोत्रस्य त्ववर्णस्य कुतस्तस्योपवीतकम् ।।
निर्लेपस्य कुतो गन्ध: पुष्पं निर्वासनस्य च ।
निर्विशेषस्य का भूषा कोऽलन्कारो निराकृते: ।।
निरञ्जनस्य किं धूपैर्दीपैर्वा सर्वसाक्षिण: ।
निजानन्दैकतृप्तस्य नैवेद्यं किं भवेदिह ।।
विश्वानन्दपितुस्तस्य किं ताम्बूलं प्रकल्प्यते ।
स्वयंप्रकाशचिद्रूपो योऽसावर्कादिभासक: ।।
प्रदक्षिणा ह्यनन्तस्य ह्यद्वयस्य कुतो नति: ।
वेदवाक्यैरवेदयस्य कुत: स्तोत्रं विधीयते ।।
स्वयंप्रकाशमानस्य कुतो नीराजनं विभो: ।
अंतर्बहिश्च पूर्णस्य कथमुद्वासनं भवेत् ।।
एवमेव परापूजा सर्वावस्थासु सर्वदा ।
एकबुद्धया तु देवेशे विधेया ब्रह्मवित्तमै: ।।
- आदि शंकराचार्य.
++++++
असे ठायि ठायी सदा सर्वभूती उरे व्यापुनी सर्व भूमंडळा
कशी होय पूजा जिथे राहतो ना तयापासुनी कोणिही वेगळा
मुळाधार संपूर्ण आहे तयाला कसे बोलवा अन् कुठे बैसवा
तया निर्मळाला कसे अर्घ्य देणे, विशुद्धास अन् आचमन पाजवा
कुठे स्नान स्वच्छास अन् वस्त्र त्याला, उभे विश्व ज्यानेच आच्छादिले
जया वर्ण नाही, जया गोत्र कोठे? तया जानवे घालण्याला दिले!
जया राग-लोभादि लवलेश नाही, फुले गंध त्याला कसे वाहतो
हिरे माणकांची नि आरास कैसी अरूपी निराकार जो राहतो
प्रभा सर्व जगतास ज्याची उजळते, तयाला दिवे लाख होती फिके
जया अंतरातील आनंद वाहे, तया गोड नैवेद्य सारे फुके
रमे विश्व आनंदरंगी जयाच्या, तयालाच तांबूल देणे कसे
उरी चंद्र-सूर्यांस तो जन्म देतो, उजेडातल्या जो उजेडी असे
जगा लीलया पूर्ण व्यापून उरला, तयाभोवती भक्त कैसा फिरे
कसे वेद, स्तोत्रांत वर्णा तयाला, स्वभावेच जो वेदमंत्री झरे
जिथे फाकलेला स्वत:च्या प्रकाशी, तया काय नीरांजने लावणे
निरोपास त्याला कुठे घेउनी जा? जिथे आत, बाहेर त्याचे जिणे
अशी ही परापूजनी बुद्धि आता, रमावी स्वये पूर्णज्ञानी निळ्या
परागी वसे त्याच तत्त्वात रंगू, न कमळाहुनी वेगळ्या पाकळ्या
- मंदार.
वा ! छान जमलाय भावानुवाद.
वा ! छान जमलाय भावानुवाद.
शेवटच्या श्लोकातल्या 'परा'चा इथे अर्थ काय आहे? वाचेच्या चार अवस्थांपैकीं पहिली हा अर्थ माहीत आहे. तो इथे बसतो का? या श्लोकातल्या सगळ्याच शब्दांचा अर्थ उलगडून सांगाल का?
इतर श्लोकांचा अनुवाद वाचून मूळ श्लोकातील शब्दांशी सांगड घालता आली.
वाह! फार सुंदर भावानुवाद.
वाह! फार सुंदर भावानुवाद.
>>>>स्वभावेच जो वेदमंत्री झरे
>>>>स्वभावेच जो वेदमंत्री झरे
कमाल!
सुंदर जमून आला आहे अनुवाद.
सुंदर जमून आला आहे अनुवाद. संस्कृत अनुष्टुभ छंदात संक्षेपाने आलेले शब्द मराठीत उलगडून मांडायला सुमंदारमाला हे विस्तृत वृत्त योग्य न्याय देऊन गेलं आहे.
छान जमून आली आहे. फार भावली.
छान जमून आली आहे.
फार भावली.
धन्यवाद -- भरत, सामो, हपा,
धन्यवाद -- भरत, सामो, हपा, आणि डॉ. रोहिणी!